Skip to main content

माझ्या आठवणीतले डॉक्टर …


माझ्या आठवणीतले डॉक्टर 






साधारण दहाएक वर्षांपूर्वीची गोष्ट !! ठिकाण........ दुबईच्या व्हिनस रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये… पुण्याचे दिपकजी अन्नछत्रे आणि त्यांचे एक मित्र दिवेलागणीच्या सुमारास मला अचानक भेटले. अर्धा भिजलेला टी शर्ट आणि ट्रॅक पॅण्ट या पेहेरावावरून बहुतेक ते दोघेही नुकतेच WALK घेऊन आले असावेत. दिपकजींनी ओळक करून दिली. " हे डॉ. प्रमोद कऱ्हाडकर. हे पण आय आय टीयन आहेत वगैरे. पुढल्या १ ० -१ ५ मिनिटांच्या संभाषणावरून मला ही व्यक्ती सर्वच दृष्टीने आदराला पात्र आहे ह्याचा पूर्ण साक्षात्कार झाला. जरी ते मला खूप मितभाषी वाटले ( नव्हे होतेच ते तसे !!). डॉक्टरांनी मुंबई आय आय टी मधुन बी. टेक.,  एम. टेक. व पी एच डी केले संपादन केले. विषय- सिव्हिल इंजिनिरिंग व पर्यावरणशास्त्र अर्थात Environmental Science !! त्यांना PhD दरम्यान फ्रान्स सरकारकडून  संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. डॉक्टरेटनंतर NEERI मध्ये सिनिअर शास्त्रज्ञ म्हणून काम केले.  त्यानंतर कानपुर IIT मध्ये काही वर्षे प्राध्यापकी केली, पण तिथल्या (राजकीय) वातावरणामुळे या पर्यावरणतज्ज्ञाने ती नंतर सोडली. मग यशस्वीपणे कन्सल्टन्सी केली काही वर्षे. सेफ्टी मॅनेजमेंट मध्येही त्यांना उत्तम ज्ञान होते. त्यानंतर २००४ मध्ये दुबईत नोकरी स्वीकारली व शेवटपर्यंत त्यामध्ये सातत्याने प्रगती केली. अशी डॉक्टरांची थोडक्यात व्यावसायिक ओळख आहे. 



थोड्याच दिवसात मीही स्फूर्ती घेऊन झबील पार्कमध्ये त्यांच्या बरोबर Walk ला जाऊ लागलो. दिपकजी आणि प्रमोद, हे दोघेही athlete कॅटेगरी मधलेच !! मी काही त्यांच्यासारखा नियमित walk घेणारा नव्हतो. त्यामुळे गाठीभेटी महिन्याकाठी फार तर चारपाच वेळाच व्हायच्या. कधी कधी डिनरसाठी एकत्र वगैरे. थोडक्यात दुबईतील forced Bachelors हे 'चुकले फकीर' म्हणून भेटतात ना, तसे. पण आमची गट्टी व्हायला एव्हढे पुरेसे होते. संगीताची आवड, वाचन व IITian हे  आमच्यातील कॉमन दुवे होते. देवकी पंडित यांच्या इंडियन कॉन्सुलेट मधील कार्यक्रमाला मी संवादिनी साथसंगत करायला होतो, तेव्हा प्रमोदनी दिपकजींकडे "अरे, आपला कात्रे काय सॉलिड वाजवतो रे पेटी" अशी मनापासून दिलेली प्रतिक्रिया मला एकदम आपलेसे करून गेली. मग काय..... डॉक्टर , दीपकजी, मी आणि तरुण तबलावादक पराग धडफळे यांचा एक 'लाईक माईंडेड' ग्रुप नुसता तयारच नाही तर पुढे घट्ट झाला. माझे दुबईतील यापुढील वास्तव्य सुसह्य होण्यात या तिघांचा मोठाच वाटा होता. 



एकत्र गप्पा, खाणे, short trips व संगीत असे सेशन सुरु झाले. आमच्यांत दिपकजी व डॉक्टर हे पाकशास्त्र प्रवीण !! या दोघांनाही किचनमध्ये काहीतरी नवीन पदार्थ बनवताना खूप मौज वाटे. कदाचित UAE त असल्यामुळे कि काय, पण दिपकजींचा भर काही पदार्थ करताना तेलावर असे. तर डॉक्टरांचा सगळा कल हा आरोग्यदायी आहाराकडे असे. डॉक्टरांना कॉंटिनेंटल व नॉन veg पदार्थ जास्त आवडत. एकदा घरी साबुदाणा खिचडी करताना दिपकजींनी पातेलीत सोडलेल्या तेलाची धार बघितल्यावर डॉक्टरचा चेहरा भीतीने तांबूस झाल्याचे माझ्या लक्षात आलं. यापुढील पाककृतीमुळे त्यांना अधिक त्रास नको म्हणून मी त्यांना निमूट बाहेर सोफ्यावर आणून बसवले ( चक्कर आलेल्या माणसाला जसे बसवतात...). पण हे पाहिल्यावर पुढल्याच आठवड्यात त्यांनी पुन्हा एकदा खिचडीचा घाट घातला व आम्हा सगळ्यांना बोलावले घरी. पण यावेळी दिपकजीकडे Chef चा रोल नसून समोर काय घडेल ते पाहणे एवढाच रोल होता. डॉक्टरांनी इंटरनेट वरून चक्क खिचडीची पाककृती डाऊनलोड केली होती व त्याबरहुकूम सगळे किचनमध्ये चालले होते. ही कमी तेलावरील खिचडी छानच झाली होती. पण त्यांच्या चिकाटीचे मला कौतुक वाटले. 



डॉक्टर खूप शिस्तप्रिय व वक्तशीर होते. दिलेल्या वेळेच्या आधी ते ५ मिनिटे हजार असत. दुसर्याने मात्र वेळ पाळली नाही ( मग तो जवळचा मित्र का असेना... ) कि नाराजी लपवणे त्यांना जमत नसे. संगीताच्या कार्यक्रमाला तर ते किमान अर्धा तास उपस्थित राहत. नाहीतर आयत्या वेळेला पार्किंग मिळाले नाही म्हणून इतरांसारखे घाई गडबडीत त्यांना येताना मी कधीही पहिले नाही. कुठल्याही कारणाने ऑफिसला पोचायला १ तास उशीर झालाच, तर तो भरून काढण्यासाठी ते संध्याकाळी १ तास किमान जास्त काम करीत असत. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर हा आमचा दोघांचा वीक पॉईंट !! आम्ही त्यांच्या घरी काहीही कारणाने जमलो, तरी आम्हाला वेलकम करायला ते बिस्मिल्लांच्या सनईसारखी ताईंची एखादी रेकॉर्ड लावून ठेवत. मला आठवतेय कि एका किशोरीताईंच्या Delhi मध्ये होणाऱ्या मैफिलीचे प्रयोजन साधून त्यांनी आयत्या वेळचे महागडे airfare देऊन सरळ Delhi गाठली होती. नंतर त्यावरचा रिपोर्ट घेताना एका दुबईतील सद्गृहस्थाने त्यांना " काय मग, एव्हढे करून ताईंचा मूड लागला का गायला ??" असं उपहासात्मक विचारले, तेव्हा डॉक्टरांचा सात्विक संताप शिगेला पोचल्याचे मी पाहिलंय. 'ती' व्यक्ती माझ्या मनातून कायमची उतरली असही नंतर मला त्यांनी सांगितले. एकदा कुठल्याशा विषयावरून आम्हा दोघांच्या चर्चेला वादाचे स्वरूप आले तेव्हा माझ्यावरदेखील ते खूप चिडले व त्यांनी सडेतोडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.  त्यांना एवढे रागावल्याचे पाहून मला आश्चर्य नाही तर थोडी मौजच वाटली. पण त्यांचं सगळं काम मनस्वी होतं हेच खरं ..... !!



उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन करणे, चांगले चित्रपट पाहणे, विदेश पर्यटन फोटोग्राफी हे त्यांचे अजून काही छंद होते. वाचनांत नॉन-फिक्शन ते मीना प्रभूंच्या सफरी असा आवाका होता. वाचलेले किंवा पाहिलेले जे काही असेल, ते त्यांच्या मनात ताजे असे. एकदा आमच्या घरी कोजागिरीला ते 'ध्यासपर्व' या काकासाहेब कर्व्यांवरील चित्रपटावर तासभर बोलले होते. दुबईमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो, त्याला प्रमोद  जया (त्यांची सहधर्मचारिणी) ही जोडी नेहमी हजार असणारच. मग त्यात दाखवला जाणारा एखादा इटालियन किंवा आफ्रिकन चित्रपटदेखील  दोघेही अगदी तादात्म्याने पाहत त्यावर चर्चा करीत. तीव्र सामाजिक जाणीव हा दोघांमधील पूरक विषय होता. जया ही World Women Forum चे काम करीत असल्याने ती यानिमित्त भारतात तसेच बाहेरील देशांत फिरलेली, धाडसी, बुद्धिमान स्त्री !! तिच्या व्यक्तिमत्त्वांचा आणि मतांचा डॉक्टरांवर बऱ्यापैकी असर होता (निदान मला तरी तसं वाटतं). जयाबद्दल खूप आदर कौतुक डॉक्टरांच्या बोलण्यातून नेहमीच व्यक्त होत असे. मग ते तिने ऑस्ट्रेलियात जाऊन केलेले धाडसी 'पॅराग्लाईडींग' असो किंवा तिने टी. व्ही. वर दिलेली एखादी मुलाखत असो. जयाने 'महानगर' वृत्तपत्रांत केलेले बरेचसे लिखाण त्यांनी मला forward केले होते. एकंदरच 'स्त्रीकाय किंवा घरची गृहिणी असो, महिलांविषयी त्यांना खूप आदर होता. आमच्याकडे कधी जेवायला आले, तर माझी पत्नी सुचित्रा जेवायला बसल्याशिवाय मी जेवणार नाही असा त्यांचा हट्ट असे एक दोन वेळा त्यांनी तसे करूनही दाखवले. अमेरिकेत तर ते कामानिमित्त नेहमीच जायचे. माझ्या आठवणीत त्यांनी फ्रान्स, नेदर्लंड्स, इजिप्त, तुर्कस्तान, जॉर्डन अशा काही देशांना मुद्दाम भेटी दिल्या होत्या. मग परत आल्यावर त्यांनी केलेली फोटोग्राफी आम्ही मित्र मंडळी विशेष औत्सुक्याने पाहायचो. त्यांच्या फ्रान्समधील डॉक्टरेटमुळे एकंदरच त्यांचे या राष्ट्रावर चांगलेच प्रेम होते.  त्यांची दुबईतील पहिली कारही Renault या फ्रेंच कंपनीची होती. 



डॉक्टरांचा स्वभाव मनस्वी असल्याने त्यांना थिल्लरपणा पसंत नव्हता दुबईतील महाराष्ट्र मंडळाचे जवळजवळ सगळे कार्यक्रम ते अटेंड करीत. उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या डॉक्टरांना टीव्ही वरील मराठी सिरियल्समध्ये दिसणारी वैगुण्ये अस्वस्थ करीत त्या बघणाऱ्या तमाम मराठी प्रेक्षकांविषयी त्यांना थोडी कीव येई. यांत त्यांचा तऱ्हेवाईकपणा वगैरे अजिबात नव्हता. असंख्य इंग्रजी चित्रपट पाहिल्याने त्यांची अभिरुची खूप उच्च होती इतकेच. ते स्वतः संगीताचे कार्यक्रम अत्यंत उत्कटपणे पाहत. एकदा एका प्रख्यात गायिकेच्या चेहऱ्यावर घरगुती मैफिलीत गाताना आलेले विलोभनीय तेज आम्ही दोघांनीही एकाच वेळी टिपले होते कार्यक्रमानंतर त्यांनी हे निरीक्षण माझ्याशी शेअर केलेशिस्तबद्ध स्वभाव असलेल्या या माझ्या मित्राला exclusive घड्याळे  मोबाईल खरेदी करण्याचा शौक होतात्यांना छानछोकीने राहण्यापेक्षा 'डिग्निफाईड' आणि टापटीप राहायला आवडे. त्यामुळे कपडे देखील त्यांना शोभतील असेच असत. फॉर्मलमध्ये त्यांनी कधीही रंगीत कपडे घातल्याचे मला स्मरत नाही. पण खाजगीत मात्र 'इंग्लिश कलर' टी शर्ट घालणे पसंद करीत. घड्याळाला नेहमीच काळा किंवा चॉकलेटी रंगाचा चामड्याचा पट्टा असे, जो त्यांच्या तुकतुकीत गोऱ्या मनगटावर शोभुन दिसे. बाकी जगाला फार काही मोबाईल इंडस्ट्रीचा पत्ता नव्हता, तेव्हा त्यांच्याकडे एक 'कम्युनिकेटर कम मोबाईल' होता. नंतर ब्लॅकबेरीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या कुटुंबातील तिघांकडेही blackberry आले. Bose कंपनीच्या स्पीकर्सवर त्यांचे अतोनात प्रेम व श्रद्धा, जी त्यांनी शेवटपर्यंत जपली. 

मला स्वतःला डॉक्टरसाहेब मोठ्या भावासारखे वाटत. मला जेव्हा एखादी समस्या भेडसावे, तेव्हा मी त्यांना 'वन टूं वन' सांगायचो. ते निमूट ऐकून घेऊन साधकबाधक विचार करून एकदम practical सल्ला द्यायचे. मग ते कुठल्या आजारपपणाविषयी असो किंवा कंपनी पॉलिटिक्सविषयी असो. सल्ला देताना ते त्याची पूर्ण जबाबदारी उचलत. एकदम दिलदार मन होते त्यांचे. एकदा एका सामाजिक संस्थेने चॅरिटीसाठी दिवसांची  ४०० किमी सायकल मॅरेथॉन आयोजित केली होती . लगेच प्रमोदने स्वतःचे नाव दिले. दिवस रजा घेतली . मॅरेथॉनपूर्वी १५ दिवस रीतसर रिहर्सल केली. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर त्यांच्या कृतकृत्य चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे समाधान मी अजूनही विसरलो नाही. स्वतः उच्चविद्या विभूषित असलेल्या डॉक्टरांचे Academics वर खूपच प्रेम होते. माझ्या मुलाला IIT ला प्रवेश मिळाला, तेव्हा त्यांना खूप कौतुक वाटले.( किंबहुना त्यांनी आधी हे भाकित वर्तवलेही होते ). त्याबद्दल बक्षीस म्हणून विभवला त्यांनी MP प्लेअर दिला, जो विभव अजूनही श्रद्धेने वापरतो

डॉक्टरांकडे खूप प्रेम होते. काही जणांना त्या प्रेमाचा अनुभव त्यांच्या शिस्तीमुळे घेता आला नाही. पण आम्ही
तिघांनीही त्यांचा अनुभव अगदी जवळून घेतलाय.  माझ्या ऑपरेशन नंतर त्यांनी मला कडक वॉर्निंग देऊन जवळ जवळ महिनाभर स्वतःच्या घरी compulsory जेवायला लावले होते. अजून काय सांगू ?? मी ऑफिसमध्ये बरेच वेळा आठ साडेआठ पर्यंत रात्री काम करत असे, तेव्हा आमच्या watchman ला पटवून ते व दिपकजी मला जेवायला घेऊन जात. विभव, त्यांचा मुलगा गौतम किंवा जया दुबईला आले कि नेहमी एखाद्या नवीन हॉटेल मध्ये घेऊन जायचे सगळ्यांना. असे असले तरी त्यांचे खरे प्रेम दुबईतील करामामधील 'अर्ज लेबेनॉन' या रेस्टॉरंटवर होते. पराग, मी, दिपकजी ,जया, गौतम व डॉक्टरसाहेब यांनी दुबईतील असंख्य रेस्टॉरंट व्हिसिट केल्येत. खाण्यातला आणि गाण्यातला निखळ आनंद आम्ही खूप वेळा एकत्र अनुभवलाय. मी फारसा रियाझी गायक नसूनही त्यांना पेटीबरोबर माझे गाणेही खूप आवडे. बहुदा त्यात माझ्या गायन कौशल्यापेक्षा आमच्या घट्ट मैत्रीचा मोठा वाटा असावा. 

आम्हाला पार्टीसाठी फक्त निमित्त लागे. असंच एकदा मी नवीन गाडी घेतल्याचे निमित्त साधून सगळ्या मित्रांना मी पार्टी दिली (जून २०१३). (मुद्दाम त्या वेळचाच फोटो दिलाय मी इथे). पार्टी सुंदर झाली. प्रमोदने रेस्टोरंटच्या बाहेर लावलेली माझी नवीन गाडी आतून बाहेरून पहिली आणि गाडी सुंदर आहे असा निर्वाळा झाला. ( त्याआधी टेस्ट ड्राईव्हला तेच आले होते). मग दुसऱ्या दिवशी Whatsapp मेसेज झाले . त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं कि त्यांच्या घश्याला त्रास होतोय. त्यावरून थोडे थट्टा विनोद देखील झाले. हॉटेलमधील तेलाचा त्रास झाला कि काय असं सगळ्यांना वाटलं. पण तिसऱ्या दिवशीसुद्धा त्यांना बोलायला त्रास होतच होता. मग ते Physician कडे गेले. त्यानंतर तर त्यांना अजिबात बोलताच येईना. डॉक्टरने वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितले. हे चक्र साधारण ८-१० दिवस सुरु होते. जया दुबईतच होती. एक दिवस अचानक जयाचा फोन आला आणि आम्ही सगळे हबकून गेलो. कॅन्सरची शक्यता वर्तवली होती. प्रमोदला  एका दुर्धर प्रकारच्या कॅन्सरने त्यांना गाठले होते. एव्हढेच नव्हे तर उपचारापूर्वी अजून बऱ्याच चाचण्या आणि तपासण्या बाकी होत्या. पण त्या दिल्लीला करायच्या होत्या. प्रमोद आणि जयाने पटापट सूत्रे हलविली. आम्ही सगळे ट्रॅव्हल एजन्टकडे जमलो होतो. अथक प्रयत्नांनी तिकिटे मिळाली. दिल्लीचे बुकिंग झाले. प्रमोदने नेहमीच्या शिस्तीने काही गोष्टी anticipate करून योजनापूर्वक हालचाली केल्या. गाडीची चावी माझ्याकडे दिली. निघताना प्रमोदने जयासोबत एक फोटो काढवला. आमच्या काळजात चर्रर्र झाले. Did he know what the fate was upto ?? कारण दिल्लीला पुढच्या टेस्ट झाल्या. कॅन्सर thyroid चा होता आणि तोही दुर्धर !! जयाने उत्तमातले उत्तम डॉक्टर गाठून उपाय योजनांची शिकस्त केली. पण प्रमोद नक्की बरा होणार कि नाही याविषयी साशंकता कायमच राहिली. एखाद दोन वेळा दुबईहून आम्हाला प्रमोदचा आवाज ऐकता आला. He was very positive always. ऑगस्ट महिन्यात मी आणि दिपकजी प्रमोदला एक दिवस भेटायला दिल्लीला गेलो . पण काय दुर्दैव !! प्रमोदला नॉनस्टॉप उचकी लागली होती. अख्ख्या दिवसात त्याला ४ शब्द  काही आमच्याशी बोलता आले नाहीत. तरीही काही आर्थिक व व्यावहारिक तरतुदींविषयी चर्चा आम्ही प्रमोदच्या खोलीत जाऊन केली त्यासाठी लॅपटॉप कामी आला. संध्याकाळची वेळ झाली. आमचा दोघांचा पाय निघेना . पण परतणे अपरिहार्य होते. जड अंतःकरणाने आम्ही प्रमोदचा निरोप घेतला. पुन्हा केव्हा हा भेटणार या प्रश्नाने आमचा संपूर्ण प्रवासभर भेडसावले. आशा-निराशेचा खेळ पुढे २ महिने चालूच राहिला. जयाकडून बित्तमबातमी कळायची, पण आशेचा किरण क्वचित दिसे. प्रमोदने एखाद्या वीराला शोभेल अशा धैर्याने या दुर्धर रोगाला तोंड दिले. जयाने आणि गौतमने प्रमोदची केलेली अविरत सेवा थक्क करणारी होती.  प्रमोद बरा व्हावा म्हणून तिची आणि गौतमची काहीही करण्याची तयारी होती. पण अमेरिकेतसुद्धा याला उपाय नाही असे कळले कळले. आणि निव्वळ ४ महिन्यांत अखेर ह्या दुष्ट रोगाने प्रमोदला अक्षरशः आटवून आटवून काळाच्या पडद्याआड नेले. माझ्या या सचोटीच्या आणि प्रेमळ मित्राच्या वाट्याला अकाली मृत्यू का यावा हे अनाकलनीय आहे.ही दुर्दैवी घटना सहन करण्याखेरीज त्याच्या कुटुंबीयांकडे व आमच्यासारख्या जवळच्या मित्रांच्या हातात काहीच राहिले नाही. ९ ऑक्टोबर २०१३ हा प्रमोदच्या मृत्यूचा दिवस !! म्हणून मनांत दाटून आलेल्या सगळ्या आठवणी सद्गगदीत अंतःकरणाने मी शब्दबद्ध केल्या आहेत आणि ब्लॉगमधील हे दुसरे पुष्प प्रमोदला अर्पण करीत आहे .



                                            प्रमोदच्या पवित्र स्मृतीला माझी आदरांजली !! 


Comments