** एक भन्नाट व्यक्तिमत्व... सुधीर !!**
माझी एक सवय आहे. माझे ज्यांच्याशी सूर जुळले, त्यांची दोस्ती मी सहसा स्वत:हुन सोडत नाही. सुधीर माझा सख्खा चुलत भाऊ. सुधीरची आणि माझी झालेली १५-२० वर्षांची दोस्ती शेवटपर्यन्त कायम राहिली, जरी तो माझ्यापेक्षा १०-११ वर्षांनी मोठा होता. त्याचं असं झालं……
सुधीर माझ्याआधी काळे सरांकडे गाणं शिकत असे. त्याच्याकडे एक छोटीशी पेटी देखील होती (जी त्याने मला १ वर्ष वापरायला दिली होती). कुठल्याही रागाचे तान पलटे घोटताना मी सुधीरला कधीही पहिले नाही. त्यामुळे पुरेसा रियाज नसल्यामुळे कि काय पण, तो गुरुपौर्णिमेला कुठलाही राग वगैरे म्हणत नसे. “घननीळा लडिवाळा”व “संगीतरस सुरस मम” ही दोन गाणी त्याने गुरुपौर्णिमेला म्हटल्याचे स्मरते. पण त्याला शास्त्रीय संगीताचे वेड होते, इतकेच नव्हे तर तो उच्च अभिरुची-संपन्न होता. मला संगीत कळण्याआधी तो मला सवाईचे स्पीकरजवळ बसुन केलेले रेकॉर्डिंग ऐकवत असे. स्वतः काळे सर, सुधीर आणि त्याचे 'अवलिये' मित्र न चुकता पुण्याच्या उद्यानप्रसादमध्ये तळ ठोकून सवाईचा आस्वाद घ्यायचे. तराण्यात ‘आकाराच्या’ ताना लोक का म्हणतात वगैरे चर्चा करायचे. माझ्या मनांत नकळत सुधीरने काही गवयांविषयी वलये निर्माण केली. वादग्रस्त किंवा 'सटाक' गायक वादक त्याला आवडंत. उदा. कुमारजी, केसरबाई, मुकुल शिवपुत्र , बसवराज वगैरे !! त्याची दाद बहुदा टोकाची असे. बुधादित्यने आजचा सवाई खाल्ला, सामताप्रसादने गोपीकृष्णला नाचुच दिले नाही, किंवा झाकिरने १५००० श्रोत्यांना रात्रभर झोपूच दिले नाही वगैरे. बहुदा आपण सांगितल्यावर या गोष्टींवर
समोरच्याने फार चर्चा करु नये अशी त्याची इच्छा असे. त्याची टेस्ट खूप 'हट'के होती. ( एका अर्थी आमचा सुधीर 'हट'योगीच होता असे विनोदाने म्हणता येईल). "भन्नाट-रस' आणि ‘अतिशयोक्ती अलंकार’ त्याला प्रिय होते. श्रीकांत बाक्र्यांसारख्या एखाद्या सरळ चालीच्या गवयाने जमवलेल्या मारव्यापेक्षा, अब्दुल हलिमने स्वतःचा झब्बा घामाने चिब्ब होईस्तोवर सतारीवर वाजवलेल्या तिलक कामोदाचे त्याला जास्त अप्रुप वाटे.
मला थोडाफार सुधीर कळू लागला ते ७९-८० च्या दरम्यान. भास्कर कॉलनीमध्ये आमच्याच बिल्डिंगमध्ये सुधीर दुसऱ्या मजल्यावर काही वर्षे राहत असे. एअर फोर्स मधील १५-२० दिवसांच्या सुट्टीवर आलेले प्रभाकर गरुड ( म्हणजे आत्ताचे एअर मार्शल अरुण गरुड ), विनोदी लेखक डॉ. र. म शेजवलकर, सुधीर आणि अस्मादिक (लिंबु ट्टिम्बू) असे चौघे जण गॅलरीत साहित्य संगीत विषयांवर तासंतास गप्पा मारायचो. सुधीरची रास वृषभ होती खरी, पण मिथुनेच्या व्यक्तींसारखी त्याला एकाच वेळी अनेक गोष्टींची गोडी होती. एके काळी तो वर्तमानपत्रांत 'कानसेन या नावाने संगीतावर लिखाण करी. काही दिवसांनी ते थांबले. पण त्यानंतर कलरकेम मधली केमिस्टची नोकरी सोडून शेअर मार्केटमध्ये तो घुसला. यामध्ये मध्यमवर्गीय माणसाने जेवढी प्रगती करायची, तेव्हढी नक्की त्याने केली. किंबहुना जास्तच केली असं म्हणता येईल. सद्दीच्या काळांत त्याचे नौपाड्यातले ऑफिस बझिंग असायचे. कित्येक वर्षे त्याने जत्रा या बेहेऱ्यांच्या साप्ताहिकांत 'गुंतवणुक' हे सदरही लिहिलं व ते खूप पॉप्युलर झालं. पण plantation च्या एका प्रोजेक्टमुळे व त्याच्या थोड्या अव्यवहारीपणामुळे त्याची या धंद्यात फसगत झाली व मग बिझिनेस थांबवावा लागला. त्यानंतर न्युमरॉलॉजी व ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळविले. या कमावलेल्या ज्ञानावर त्याने एक ASTRO-COUNSELLING काउंटर पण उघडला होता, जो त्याने तब्येत बरी असेपर्यंत चालवला.
एक काळ असा होता कि सुधीरचे हे ऑफिस म्हणजे एक सांस्कृतिक अड्डाच झाला होता व याचा अनुभव मी पुष्कळ वेळा घेतलाय. कधी तो शेअर्सचे काम करीत असे, तर कधी एखादे ‘ऑफबीट’ पुस्तक वाचतसे. ऑफिसमध्ये एकदा मी त्याला 'कुमारसंभव' वाचताना पहिले होते.. त्याचे एक भालेराव नावाचे 'गुरु' होते. त्यांना एकदाच मी सुधीरबरोबर पाहिलंय (पण तेव्हा तेच काहीतरी सुधीरला विचारीत होते). पण कधी गेलो तिथे कि त्यांचे ‘भन्नाट’ विचार मला सुधीर सांगे. बरोबर एक बासुंदीवजा कटिंग चहा पण होत असे. कधी कधी नुकताच ऐकलेला एखादा नॉनव्हेज विनोद पण सांगायचा. पण त्यातल्या अश्लीलातेपेक्षा त्याचा focus तो जोक बनविणाऱ्या प्रतिभावान कर्त्यावर असायचा. त्याला विनोदबुद्धीची पण देन होती . एकदा त्याच्या वाढदिवशी एक जवळचा मित्र त्याच्या ऑफिस मध्ये आला होता. काहीतरी बिनसले होते त्याचे, म्हणून तोंड पाडून तो सुधीरपुढे बसला होता. त्यावर सुधीर म्हणाला " अरे लेका, आज माझा वाढदिवस आहे, जयंती नाहीये. तेव्हा तू हसलास तरी चालेल". तसेच एकदा मी आणि सुधीर कुठल्याश्या संगीत कार्यक्रमाला गेलो होतो. सुरुवातीला आयोजकांनी बऱ्याच लोकांचे सत्कार करून उच्छाद आणला. साधारण २०-२५ लोकांना स्टेजवर बोलावून श्रीफळ दिले गेले. तेव्हा सुधीर मला म्हणाला " कदाचित तुला आणि मला पण बोलावतील. तयार रहा विकास... ".
सुधीरला लाल, हिरवा, निळा अशा गडद रंगांचे प्लेन शर्ट घालायला आवडत. खुद्द स्वतःच्या लग्नातही मोरपंखी रंगाचा शर्ट त्याने घातल्याचे मला आठवते. घड्याळाला चामड्याचा पट्टा असे ( मेटॅलिक कधीच नाही ). एकंदरच एखाद्या गोष्टीने वाहुन जाण्याची त्याची वृत्ती होती. एकदा त्याने Cassette to CD conversion मशीन ऑफिस मध्ये आणले होते. त्यातून त्याने मला २ इंटरेस्टिंग सीडिज बनून दिल्या. त्यात केसरबाई, मोगुबाई, मास्तर, अमीर खांसाहेब, BGAK म्हणजे बडे गुलाम अशा एकाहून एक गायकांच्या रेकॉर्ड होत्या. एकदा लता बाईंनी गायलेला १५ मिनिटांचा मालकौंस दिला, तोही video !! बरे या क्लिपमध्ये मध्येच इकडून तिकडे गेलेले गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सी. रामचंद्र आहेत हाही तपशील पुरवला. मी दुबईला असताना त्याने अख्खेच्या अख्खे कै गोविंदराव टेंबे यांचे आत्मचरित्र मला xerox करून दिले होते. अशाच एकदा कुमारजींच्या खाजगी मैफिलीच्या videos भेट दिल्या ((ज्यामध्ये कै वसंत बापट, कै वसंतराव कानिटकर वगैरे थोर मंडळी श्रोत्यांमध्ये ऐकायला आहेत). अशा एक ना अनेक गोष्टी त्याने मला दिल्यात. मी काढलेल्या अनिरुद्ध बापूंच्या पोर्ट्रेटची कॉपी त्याने ऑफिस मध्ये ठेवली होती. येईल जाईल त्याला तो कौतुकाने दाखवीत असे. तसेच माझ्या हार्मोनियम-वादनाच्या व्हिडिओ क्लिप्स देखील त्याने निवडक मित्रांना कौतुकाने दाखवल्या होत्या. दुबईहून मी निदान ४ महिन्यातुन एकदातरी ठाण्याला येत असे . पण सुधीरशी एकदातरी भेट ठरलेली असायचीच. नाहीतर अपुरेपणा वाटायचा. त्याला नेहमी वेळ घेऊन गेलेले आवडायचे. लगेच निघालो तर नाराज व्हायचा. मला तुझ्यासाठी वेळ नाही, असे त्याने मला खूप बिझी असतानादेखील कधी सांगितले नाही.
सुधीरला लाल, हिरवा, निळा अशा गडद रंगांचे प्लेन शर्ट घालायला आवडत. खुद्द स्वतःच्या लग्नातही मोरपंखी रंगाचा शर्ट त्याने घातल्याचे मला आठवते. घड्याळाला चामड्याचा पट्टा असे ( मेटॅलिक कधीच नाही ). एकंदरच एखाद्या गोष्टीने वाहुन जाण्याची त्याची वृत्ती होती. एकदा त्याने Cassette to CD conversion मशीन ऑफिस मध्ये आणले होते. त्यातून त्याने मला २ इंटरेस्टिंग सीडिज बनून दिल्या. त्यात केसरबाई, मोगुबाई, मास्तर, अमीर खांसाहेब, BGAK म्हणजे बडे गुलाम अशा एकाहून एक गायकांच्या रेकॉर्ड होत्या. एकदा लता बाईंनी गायलेला १५ मिनिटांचा मालकौंस दिला, तोही video !! बरे या क्लिपमध्ये मध्येच इकडून तिकडे गेलेले गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सी. रामचंद्र आहेत हाही तपशील पुरवला. मी दुबईला असताना त्याने अख्खेच्या अख्खे कै गोविंदराव टेंबे यांचे आत्मचरित्र मला xerox करून दिले होते. अशाच एकदा कुमारजींच्या खाजगी मैफिलीच्या videos भेट दिल्या ((ज्यामध्ये कै वसंत बापट, कै वसंतराव कानिटकर वगैरे थोर मंडळी श्रोत्यांमध्ये ऐकायला आहेत). अशा एक ना अनेक गोष्टी त्याने मला दिल्यात. मी काढलेल्या अनिरुद्ध बापूंच्या पोर्ट्रेटची कॉपी त्याने ऑफिस मध्ये ठेवली होती. येईल जाईल त्याला तो कौतुकाने दाखवीत असे. तसेच माझ्या हार्मोनियम-वादनाच्या व्हिडिओ क्लिप्स देखील त्याने निवडक मित्रांना कौतुकाने दाखवल्या होत्या. दुबईहून मी निदान ४ महिन्यातुन एकदातरी ठाण्याला येत असे . पण सुधीरशी एकदातरी भेट ठरलेली असायचीच. नाहीतर अपुरेपणा वाटायचा. त्याला नेहमी वेळ घेऊन गेलेले आवडायचे. लगेच निघालो तर नाराज व्हायचा. मला तुझ्यासाठी वेळ नाही, असे त्याने मला खूप बिझी असतानादेखील कधी सांगितले नाही.
सुधीरला पुस्तके (व जुन्या रेकॉर्डस) यांचा प्रचंड नाद होता. ठाण्याच्या श्री रविंद्र भट यांनी १९८८ साली काढलेल्या लायब्ररीचा सुधीर हा सगळ्यात पहिला मेम्बर होता, असे ते स्वतः सांगतात. त्यावेळी ८ हा आकडा सुधीरने मुद्दाम मागुन घेतला होता . ह्यात त्याची न्युमरोलॉजिची आवड असावी. सालही ८८ असावे म्हणजे विशेषच !! विकास सबनीसांनी त्याचे जुन्या पुस्तकाच्या दुकानात जातानाचे एक व्यंगचित्र काढले होते. त्याच्या वाचनाचा आवाका हा 'चांदोबा' ते 'मेघदुत' एवढा प्रचंड होता. एकदा म टा चे संगीत समीक्षक कै श्रीकृष्ण दळवी मला आश्चर्याने विचारीत होते कि एव्हढे सगळे वाचायला सुधीरला २४ तास कसे पुरतात ?? ‘सुधीर’ हि उत्सवप्रिय व्यक्ती होती. सुप्रसिद्ध सतारवादक व बंदिशकार पं शंकरराव अभ्यंकर यांच्यावर त्याचाविशेष लोभ होता. त्याच्या आई वडिलांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने पं शंकरराव अभ्यंकर यांची प्रकट मुलाखत व त्यांच्या सतारवादनाचा जाहीर कार्यक्रम ठेवला होता. तो प्रचंड गाजला. एकदा "काबुलीवाला" हा हटके आणि दुर्मिळ जुना पिक्चर त्याने स्वखर्चाने मल्हार टॉकीजला लावला होता.
सुधीरला मित्रांचे व्यसन होते. अनेक वर्षांपासून त्याचे स्वत:सारखे साताठ अवलिये मित्र होते. प्रत्येकजण असा काही हिरा होता कि त्याला कोंदण शोधणे अवघड !! बरेचसे नावानिशी माझ्या परिचयाचे होते...अगदी १९७४-७५ सालापासून ! हे देखिल सगळे ‘हटके’ होते. लाखभराच्या गर्दीत सुद्धा मी त्यांना सुधीरचे मित्र म्हणुन ओळखले असते. माझ्या लहानपणी जगातले सर्व ज्ञान या साताठ जणात एकवटले आहे असे मला वाटे. हे सगळे मित्र मला बहुतेक ‘नाकासमोर चालणारा सुधीरचा भाऊ’ म्हणुन ओळखत असावेत. सुधीरची उपस्थिती असलेली या सर्वांची शेवटची पार्टी ठाण्याच्या दि शेल्टरमध्ये झाली याचा मी विटनेस होतो (६ डिसेम्बर २०१४). कारण पक्षाघाताचा कारणाने सुधीरला नीट चालता येत नसल्याने या पार्टित त्याला सोडायला मीच गेलो होतो.......अर्थात त्याला त्या कंपूत सोडून मी परत आलो.
कुणाला खरं वाटणार नाही, पण मी पं विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे संवादिनी शिकायला जायचे अप्रत्यक्ष श्रेय सुधीरचे आहे. एकदा सहज मी त्याला म्हटलं कि माझे पेटीवादन कुठेतरी अडल्यासारखे वाटतेय. काय करू ?? लगेच त्याने शक्कल काढली व सरळ कै. श्रीकृष्ण (अण्णा) दळवींना माझ्या घरी घेवून आला व मला पेटी चांगली तासभर वाजवायला लावली. अण्णांचे ते ऐकणे !! त्यांनी दुसर्या दिवशी मला फोन केला व माझ्या वादनात चांगले काय वाईट काय ते समजावून सांगितले व सुचित केले कि " तू जिथे अडला आहेस त्यावर एकच उपाय म्हणजे विश्वनाथ कान्हेरे !!" अर्थात मी लगेच त्यांच्याकडे जाऊ लागलो. बरे आपण केलेली कृती किती योग्य आहे किंवा काय हे ताडण्यासाठी त्याने थेट एकदा गुरुजींना फोनही केला " विकास कसा वाटतो तुम्हाला ??". त्यानंतर २-३ वर्षांनी माझे वादन ऐकल्यावर मला त्याची मोठी पण subtle दाद आली…….."विकास, कान्हेरे छान झिरपलेत तुझ्या हातात ...”
मनांत येईल ते लगेच करण्याचा स्वभाव होता त्याचा. शेगावच्या गजानन महाराजांवर त्याची श्रद्धा होती. त्याच्या घरातील हॉलमध्ये एक सहा बाय पाच फुट आकाराचे महाराजांचे अप्रतीम पेंटिंग आहे, जे त्याने अति प्रचंड मूल्य देऊन ऑर्डर देवून करून घेतले होते. एकदा असेच मी व माझी पत्नी त्याच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी ७.३०ला स्टेशनहुन येता येता चक्कर टाकली. तर या गृहस्थाने घरी त्याची मुलगी अवंती हिला फोन करून फर्मानच काढले " अगं अवंती, विकास-सुचित्रा जेवायला घरी येतायत. आज गरम मसाल्याची आमटी कर ". बिचारी अवंती !! तिला उत्तम स्वयंपाक येत असल्यानेच ती तरली. कधी कधी कुठून कुठून वेगवेगळ्या खायच्या गोष्टी आणायचा . कुठे ड्राय फ्रुट सामोसे, कुठे स्पेशल मुरुक्कू आण…….काही विचारू नका. पण एकंदर कल चमचमीत खाण्याकडे !! अलीकडेच ठाण्यात एक नवीन मराठी उपहारगृह निघालंय. तिथे सुधीर व अवंती आम्हां सगळ्यांना हौशीने घेऊन गेले. सुधीरने काही ऑर्डर करायचे शिल्लकच ठेवले नाही . फणसाची भाजी, थालीपीठ, भरली वांगी,डाळींबी उसळ वगैरे अशा अनेक डिशेस त्याने एका मागोमाग मागवल्या. परंतु वेगळ्या तंत्राने केलेल्या पदार्थांची चव घेवून तो पांढरा फटक पडला. चिडला कि तो असा दिसे. पण हौस दांडगी !! मात्र सुधीरमध्ये एक वेगळीच विसंगती मला जाणवते. एव्हढी खाण्यापिण्याची आवड असलेल्या सुधीरला कधीही तब्येतीत चापून खातापिताना मात्र मी पहिले नाही. तो सतत कुठल्यातरी कामात किंवा वाचनात गर्क असे. पण त्याला नाविन्याची ओढ होती. मग ते गाणे असो, खाणे असो किंवा वाचन असो. ह्या नॉव्हेल गोष्टी दुसऱ्याला खिलवण्याची देण्याची त्याला आवड होती. दर वर्षी दिवाळीत लक्ष्मीपुजनाला तो कात्रे परिवार व त्याचे निकटवर्तीय यांच्यासाठी त्याच्या या गोखले रोडच्या ऑफिसमध्ये snacks पार्टी द्यायचा व दरवेळी नवीन चमचमीत पदार्थ खाऊ घालायचा. असा रसिक होता आमचा सुधीर... !!
सुधीरविषयी लिहिण्यासारखे खूप आहे. पक्षाघात झाल्यावर सुधीरचा punch गेला. पण त्याचे रसिकत्व कायम राहिले. अगदी तो जायच्या आधी मी त्याला किशोरच्या हाफ टिकेट पिक्चरचा आस्वाद घेताना पाहिलंय. तसंच जाण्यापूर्वी दत्तप्रसन्न दाभोळकरांच्या एका पुस्तकानं त्याला झपाटून टाकलं होतं ( जे त्याने लगेच माझ्या बायकोला वाचायला दिलं होतं !). आपल्या जवळच्या नात्यांतील व्यक्ती किंवा मित्रपरिवारांतील कुणी जवळचं, यांचं आपल्या आयुष्यांत एक स्थान असतं, तसंच सुधीरचं माझ्या आयुष्यांत होतं. आज घडणाऱ्या कितीतरी गोष्टी मनातल्या मनांत राहून जातायत. कारण त्यातल्या काही गोष्टी शेअर करायला माझ्याकडे योग्य व्यक्तीच नाही. कारण सुधीरची replacement नाही. सुधीर जाऊन आता तीन वर्षे झाली, तरी त्याचं ते 'असणं' मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलंय आणि 'नसणं' हे मनाला पटत नाही. गोखले रोडच्या संजय स्टोअर्सच्या फुटपाथने जाताना मान आशेने काटकोनात त्याच्या ऑफिसकडे फिरतेच. पण तो दिसत नाही , मी निराश होतो. पण लगेच वास्तवात येतो ( नव्हे यावच लागते आपल्याला ) आणि 'शो मस्ट गो ऑन' च्या चालीवर समोरचा रस्ता निमुट तुडवु लागतो…………..
सुधीरच्या रसिकत्वाला माझा कुर्निसात …. !!
Far ch Chan
ReplyDeleteSudhir mama che mahit naslele Pailu samajle
Thank you Asmita !!
Delete