-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज ९ सप्टेंबर २०२०..... ऋषितुल्य संवादिनीजनक आणि संवादिनीवादक कै. पं. मनोहरराव चिमोटे यांची आठवी पुण्यतिथी !! त्यानिमित्त ही माझी सुमनांजली ... 🙏🌺🌺🌺--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१९८२-८३ चा काळ असेल. रसिकाग्रणी कै गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे "हार्मोनियममधील काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे सौंदर्य जगात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत नाही". तरुण वयात १८ व्या वर्षी माझीही स्थिती ह्यापेक्षा वेगळी नव्हती. मिळेल तिथले पेटीवादन ऐकण्याचा छंद जडला होता. तशातच दोन अप्रतिम संवादिनीवादनाच्या कॅसेट्स मार्केटमध्ये आल्या. एक कै. पं. गोविंदराव पटवर्धन यांची व दुसरी कै. पं. मनोहर चिमोटे यांची !! या दोन्ही ध्वनीफिती मी जुन्या कॅसेट प्लेअरवर असंख्य वेळा ऐकल्या, ज्यांचा खुप गहरा असर माझ्या सांगीतीक मनावर झाला. माझ्या डोक्यावर पेटीचे भूत सवार करण्यासाठी एव्हढ्या दोन कॅसेट्स पुरेश्या होत्या. गोविंदरावांनी कॅसेटमध्ये वाजवलेल्या तोडी रागातील बंदिश पेटीवर वाजवून मी एका स्पर्धेत पहिले बक्षीस देखील मिळवले होते (IIT-1982). कॅसेटमध्ये पंडितजींनी राग मारवा, हंसध्वनी, मिश्र पिलु व भैरवी ठुमरी अफलातुन वाजवले होते. थोडाफार बासरीचा आवाज असणाऱ्या पेटीमधून पंडितजींनी काय काय एकेक गोष्टी काढल्या होत्या. पिलूमधील 'अतिद्रुत गत' तर 'आयसिंग ऑन केक' होती. मला आठवतं कि माझ्या आईलादेखील ही कॅसेट खूप आवडत असे. एके दिवशी मी ज्यांच्याकडे पेटीवादन शिकत होतो त्या कै. विनायकबुवा काळ्यांना मी ह्या कॅसेट संदर्भात सांगितले. त्यावर गुरुजी म्हणाले "पं. चिमोटे हे एक हार्मोनियममधले आश्चर्य आहे. तुम्ही जरूर ऐका त्यांचं वादन...". तरुण वयात अनुकरणाने संस्कार अधिक गहरे होतात, तसेच माझेही झाले. पंडितजींचं वादन आगळंवेगळं आहे हे कळायचं, पण analysis करण्याची तेव्हा कुवत नव्हती. पण त्यांचं वादन वंदनीय तसेच अनुकरणनीय होते हे मात्र नक्की जाणवायचं. पण तेव्हा पुरेशी परिपक्वता नव्हती ना.....
नंतर काही वर्षांनी पंडितजींचं प्रत्यक्ष वादन ऐकण्याचा योग छबिलदास हायस्कुलला आला. (तबल्यावर बहुदा पं. सदानंद नायमपल्ली होते). मैफिल सुरु व्हायच्या आधी पंडितजींना नुसते त्या संवादिनीसमोर बसलेलं बघणं हे देखील केवळ दृष्टिसुख होते. अत्यंत तेज:पुंज आणि प्रसन्न व्यक्तिमत्व !! पंडितजींचा aura आणि दबदबा काही किलोमीटरमध्ये असेल असं वाटायचं. मैफिल सुरु करण्याच्या आधी पंडितजी थोडे अंतर्मुख झाले. छान तंबोरे, तबले मिळवलेले. 'आपण कोणीतरी मोठे आहोत' ह्या अर्थी काहीही आढेवेढे न घेता पंडितजींची बिहागमधल्या अंतर्गन्धारावर विसावणारी 'प नी सा ग ssss' ही पहिली उपज निघाली आणि एका स्वराकृतीतच मैफिल त्यांच्या कब्जातच आली असं वाटलं. श्रोत्यांकडून कोरसमध्ये "वा s ह !!" आणि "क्या बात है !" अशी पुषपवृष्टी झाली. मोठ्या कलाकारांचं हे वैशिष्ट्य असतं कि त्याचं कलावैभव पहिल्या स्वराकृतीतून दिसतं. कधीकधी त्यांनी लावलेल्या नुसत्या षड्जातून देखील ते दिसतं. कारण ते सिद्धीचं लक्षण असतं. नंतर पंडितजींनी बिहागमध्ये अशी काही आलापी केली, कि गवई काय गाईल ..!!अक्षरशः महाकाय 'बिहाग' त्यांनी श्रोत्यांसमोर उभा केला. कुठेही घाई नाही, गडबड नाही, हातातला नखरा मुद्दाम दाखवण्याची 'हलकी' प्रवृत्ती नाही. ज्या त्या स्वराला योग्य तो ठहराव आणि ट्रीटमेंट देऊन रागाची बढत ते करत होते. ह्या बिहागमुळेच संवादिनीचा 'अंतर्गन्धार' माझ्या डोक्यात बंदुकीच्या गोळीसारखा घुसला. तेव्हा एवढं कळलं कि त्यांची वादनाची बैठक खुपच मोठी आहे. बिहागसारखा वक्र चलन असलेला आणि मींडेचा सतत उपयोग असलेला रागदेखील पेटीवर परिणामकारक रित्या सादर होऊ शकतो, हा माझा त्या दिवशीचा takeaway होता. हे माझे बिहागचे वेड किंवा भूत मी ९३ सालच्या संस्कारभारतीच्या Solo pgm मध्ये चांगला ४५ मिनिटे 'बिहाग' वाजवुन उतरवले. एखाद्याच्या कलेचा केवढा खोलवर परिणाम आपल्यावर होऊ शकतो याचे हे उदाहरण..!! त्यानंतर त्यांचे हेमललत, यमन, मधुकंस, मिया मल्हार, मधुवंती, गुजरी तोडी, अहिर भैरव, जोग, दुर्गा, राजेश्वरी, पहाडी, भैरवी ठुमरी यासारखे अनेक राग ऐकता आले व त्याचा स्वररुपी सुगंध आजही मनात दरवळतोय.
मला पंडितजींच्या वादनात असंख्य वैशि्ष्ट्ये जाणवतात. मैफिलीत पहिली २ मिनिटे गेल्यावर, ही मैफिल किमान दोन अडीच तास तरी चालेल याची ग्वाही पंडितजी आपल्या वादनातून श्रोत्यांना देत. अत्यंत सुरेल व कमी जव्हारीची 'नर नर' संवादिनी ते वापरायचे. नेहमीच दीर्घ षडज, रागातल्या महत्वाच्या स्वरांवर फोकस व ठहराव, भात्यावरील नियंत्रण, घेतलेल्या बंदिश व गतीचा सौंदर्यात्मक अभ्यास, विरामाचा सुरेख व परिणामकारक वापर, तालावर विलक्षण हुकुमत, अध्येमध्ये एखाद्या स्वराला कटनोटस सारखी कलापुर्ण छेद देण्याची होतोटी अशी काही महत्वाची वादन वैशिष्ट्ये सांगता येतील. प्रत्येक स्वराचा लगाव आजुबाजुच्या तीनचार स्वरांच्या स्पर्शाने enrich केलेला असायचा. वादन तुटक किंवा विस्कळीत न होता ते seamless किंवा एकजिनसी होण्यासाठी ह्या तीनचार स्वरांचा टच ते इस्तमाल करीत. प्रसंगी मींडेचा भास, वादनात नजाकत असली तरी अध्ये मध्ये वादन जोरकस असायचे. वादनात कमालीचा संयम असे. तडतड्या फुलबाजीसारखी त्यांनी कधीही संवादिनी वाजवली नाही. त्यांच्या कर्णमधुर वादनाने कान आणि मन तृप्त होत असे. पंडितजींनी सादर केलेल्या संवादिनीवादनाची भाषा (dialect) वेगळी होती, असं मला वाटतं. त्या भाषेत त्यांचे वाद्य त्या त्या रागात बोलत असे. रागाचे सादरीकरण संवादिनीवर कसे करायचे याचे एक वेगळेच तंत्र त्यांनी विकसित केले होते. जे होतं ते सगळं विचारपुर्वक केलेलं !! सर्रास कटनोटस वापरुन त्यांनी कधीही वादन केले नाही. पण जिथे कुठे कट नोट्स वापरायचे, तिथे बंदिशीचे शब्द उच्चारल्याचा भास व्हायचा. वादनात शांतपणा असला तरी वादन 'बोजदार' (dignified) होते; कारण तो 'शांतपणा' तपश्चर्येने आलेला होता. रागाची बढत करताना अवरोहांतील एखाद्या महत्वाच्या स्वरावर विसावल्यासारखे करून त्या स्वराला छेद देऊन ती स्वराकृती संपवत असत. हे त्यांच्या वादनशैलीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या वादनात कधीकधी थोडेसे चमत्कृतिजन्य पण सौंदर्यपूर्ण टचेस असत. पंडितजींची तानक्रिया ही मला impressionist पद्धतीची वाटते, ज्याची सरगम करणे अशक्यच. पंडितजी तबलजीबरोबर मारामारी करून लयकारी वगैरे करीत नसत, पण त्यांच्या संपूर्ण वादनात एक ख्यालाची अंगभूत लय होती. ज्यामुळे त्यांचे वादन परिपूर्ण वाटत असे.
सहसा गुरुदक्षिणा देऊन ज्यांच्याकडे शिकायला जातो त्यांना आपण गुरु मानतो. पण पंडितजी आपल्या वादनातुन सहजपणे असंख्य वादकांना शिकवुन गेले त्याचे ऋण आपण मानलेच पाहिजे. पंडितजींच्या पवित्र स्मृतीला माझ्यातर्फे नम्र आदरांजली..!! 🙏🌺🌺🌺
मोबाईल: ९८३३६१०८७५
काका, तुमचे लेख नेहमीच वाचनीय आणि मार्मिक असतात।
ReplyDeleteहा लेख ही असाच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संग्रहित करावा असा आहे।
खूप आभार ।
नांव कळलं नाही. पण सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद!! लेखनाचा हुरूप वाढला...
DeleteKhup Chan
ReplyDeleteहरी ओम स्वातीवीरा, श्रीराम अंबज्ञ नाथसंविध !!
Deleteखूप छान लेख!
ReplyDeleteमनापासून आभार !!
DeleteVery well written Katre sir.
ReplyDeleteGirish, thank you very much !!
Deleteखुप सुंदर लेख लिहिला आहे काका
ReplyDeleteविदुला, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!
Delete