Skip to main content

मुलतानीचं गारुड

मुलतानीचं गारुड

                                          
मी शास्त्रीय संगीतातील 'फ्री लान्सर' आहेपण हे संगीत समजून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी जी काही भक्ती लागते, ती माझ्या कुवतीनुसार मी अजूनही करतो. अर्थार्जनाशी मात्र त्याचा संबंध मी ठेवलेला नाही. एखाद्या रागाने एकदा का मला भुरळ घातली, कि मी निदान दोन तीन महिने त्या रागात असतो. यापूर्वी अशा अनेक रागांशी माझी प्रेम प्रकरणे झाली आहेत. उदा. पुरिया कल्याण, नट भैरव, तोडी, चारुकेशी, गोरख कल्याण, गौड मल्हार , काफी कानडा ..... वगैरे !!  ह्या ब्लॉगमध्ये 'मुलतानी' रागावर माझे  प्रेम कसे कसे जडत गेले, हे मी जरा विस्ताराने लिहिलं आहे...... 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


वर्षांपूर्वी ठाण्यातील हार्मोनिअम संमेलनाच्या निमित्ताने मुलतानी या रागाचा सांगोपांग नाही, पण समाधानकारक अभ्यास झाला असं म्हणता येईल. बरंच ऐकणं झालं, वाजवणं झालं....पण मन मात्र अजून भरलं नव्हतं. म्हणुन कि काय, पण मी एके दिवशी भल्या पहाटे राजन साजन मिश्रांचा मुलतानी यु ट्यूब वर लावला. बैठक मोठीच आहे त्यांच्या गाण्याची !! पण काय झालं माहीत नाही....... पहिल्या १० मिनिटातच माझा थोडा अपेक्षाभंग झाला.  काही वाईट गात नव्हते ते. पण जरा नियम दाखवल्यासारखं वाटलं !! कदाचित पहाटे ४. ३० ची वेळ असल्याने नियमबरहुकूम गाणं ऐकण्याचा मला कंटाळा आला असावा. पण त्या वेळच्या संगीतक्षुधेची शांती झाली नव्हती हे खरं. म्हणून मी जरा वैतागूनच, पण आशेने यु ट्यूबवरच मन्सूरदांचा मुलतानी सुरू केला. खरं म्हणजे जयपूरवाले कशाला गाताहेत मुलतानी, असंही एकदा वाटून गेलं. ऐकलं तरी नव्हतं कधी पूर्वी ( पण डॉ. मिलिंद मालशें सरांनी सांगितले तेव्हा कळले कि 'अरे मन काहे' ही जयपूरवाल्यांची प्रसिद्ध बंदिश आहे). पण ह्या माझ्या पूर्वग्रहदूषित मानसिक प्रतिकूलतेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मन्सूरअण्णांनी पहिल्या १५ सेकंदातच माझा ताबा घेतला. मी एकाग्रतेने ऐकू लागलो आणि पुढची ४० मिनिटे मुलतानीत अक्षरशः न्हाऊन निघालो. झालं !! सकाळी एकदा डिस्टर्ब् झालेली झोप 'वाईट' काय किंवा 'चांगल्या' विचारानेसुद्धा पुन्हा आपल्याकडे फिरकत नाही. त्या दिवशी साखरझोपेचा गोडवा नाही, पण झोपेनंतरची ''साखर'' मात्र मला मन्सूरदांच्या गाण्यातून अनुभवायला मिळाली. असं गाणं ऐकायला मिळालं कि आपल्याला एकदम "blessed "आहोत असं वाटायला लागतं. त्या अवस्थेत मी अर्धाएक तास तरंगत होतो. पण झालं काय, कि हे निमित्त झाले आणि मुलतानी रागाची माझ्या डोक्यातील impressions कशी कशी उत्क्रांत होत गेली त्याचा एक जणू धांडोळाच मनाने आपसूक घेतला. हल्ली फेसबुकवाले तुम्ही वर्षभरात पोस्ट केलेल्या इव्हेंट्सची एक फिल्म बनवतात ना, तशी या रागाविषयीची एक चित्रफीतच डोळ्यासमोरून उलगडत गेली आणि ती जमेल तशी शब्दबद्ध करण्याचं मनांत आलं  ......

मी औपचारिकपणे संगीत शिकायला अजून सुरवातही नव्हती केली. IIT च्या हॉस्टेलमध्ये ठेवलेली पेटी स्वतःची स्वतः शिकून वाजवून बघणं हा एक मात्र माझा छंद होता. त्यामुळे मुलतानी रागाची आणि माझी साधी तोंड ओळख सुद्धा झाली नव्हती. ‘मुलतानी’ राग शिकविणारा माझा पहिला गुरु (१९८१) म्हणजे विविध भारतीवर सकाळी ७.३० ला लागणारा " संगीत सरिता" हा कार्यक्रम ! नेहमीच्या सवयीप्रमाणे मी रागाचे सर्व आरोह अवरोहातले स्वर व्यवस्थित वहीत लिहून घेतले आणि जाणवले कि ही सुरावट आपल्या परिचयाची आहे. नुसती सुरावट सुद्धा ओळखीची वाटणे हे उपजत स्वरज्ञान चांगले असण्याचे लक्षण आहे. ( हल्ली त्यासाठी वेगळी कार्यशाळा घेतली जाते😆 ). कुठल बरं गाणं आहे ह्या रागात ..??  ते होतं कै. अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेलं मत्स्यगंधा नाटकातील "नको विसरू संकेत मिलनाचा " हे पद !!  चाल बुवांची असल्यामुळे एकदम 'स्ट्रॉंग' आणि न विसरण्यासारखी. नाहीतरी पं अरुण कशाळकरांसारख्या विद्वतजनांनी म्हटलंच आहे कि "राग म्हणजे आकर्षक चाली आहेत". ते गाणं माझ्या कुवतीप्रमाणे पेटीवर मी लगेच बसवलं.  परंतु तोडी आणि मुलतानी रागातील स्वर बरेच सारखे आहेत हे मात्र जाणवलं. ह्यात तोडी सारखे म् नी सा असे न जाता म् प नी सा असे घेतात हे लक्षात आले. अशा गोष्टी मी त्यावेळी क्वचित करत असलेल्या साथसंगतीसाठी उपयोगी होत्या. परंतु कोमल रिषभ व धैवताचे अल्पत्व म्हणजे काय, किंवा मुल्तानीतला तीव्र मध्यमवरून घेतला जाणारा कोमल गंधार काय; काही म्हटल्या काहीही गंध नव्हता. श्रुती वगैरे तर दूरच राहिल्या. नंतर काही दिवसांनी "प्रेम सेवा” या गाण्याची मा. दीनानाथांची चाल ह्याच रागात आहे हे कळले. काही वेळा आय आय टी मध्ये माझे गायक-मित्र सांगलीच्या शरद बापट यांच्याबरोबर पेटीची साथसंगत करताना ‘मानत नाही जियरा मोरा’ हि बंदिश वाजवल्याचे स्मरते. तेव्हा मात्र मुलतानीचे चलनवलन तथा थोडेसे व्याकरण कळले. पण ''व्याकरण'' म्हणजे रागाचा आत्मा नसतो, हे त्यावेळी कळत नव्हते. वरपांगी सरळ वाटणाऱ्या व्यक्तीचे काही स्वभावाचे विशिष्ट पैलू असावेत तसे काही रागांचेही आहे (जसे देसकार, शुद्ध कल्याण ). 'मुलतानी' हा त्याच category मधला आहे. 'मुलतानी'चे सार्थ ‘ललित’ वर्णन जिनिअस श्री अच्युत गोडबोले यांनी आपल्या 'नादवेध' या सुंदर पुस्तकात केले आहे. त्यामुळे तसा काही प्रयत्न मी करणार नाही इथे. पण मला या रागाचा स्वभाव इतक्या वर्षात कसा उलगडत गेला हे मात्र लिहिणार आहे. हे मुलतानी रागाविषयीचं माझं स्वतःचं अनुभवकथन आहे. अलीकडे कै भास्कर चंदावरकर यांच्या लिखाणातून Hermeneutic हा शब्द कळला. तस काहीसं करण्याचा माझा मानस आहे. Hermeneuticचा अर्थ आपापल्या तऱ्हेने आपल्या मन आणि अनुभवाने एखाद्या गोष्टीचे किंवा विचारांचे अर्थ लावणे म्हणजे 'इंटर प्रिटेशन’ करणे. तशी या लेखाला फारशी दिशा वगैरे आहे असे नाही. पण माझ्या चष्म्यातून दिसणारा 'मुलतानी' मी प्रांजळपणे व पारदर्शीपणे उलगडायचा हा प्रयत्न आहे. बऱ्याच रागांचा आनंद मी या पद्धतीने घेतो किंवा लुटतो असे मानायला हरकत नाही. 'मुलतानी' हे फक्त निमित्त आहे. या लेखांत मुल्तानीचं व्याकरण, माझी वैयक्तिक आवडनिवड, थोडीफार या रागाची सौंदर्यमीमांसा, कदाचित श्रोत्यांचं आणि कलाकाराचं संगीत ऐकण्याचं तसेच व्यक्त करण्याचे मानसशास्त्र अशा अनेक गोष्टी पुढे येतील. 

कॉलेजमध्ये असताना एका संगीत स्पर्धेमध्ये एका तरुणाने संवादिनीवर मुलतानी वाजवला होता. त्याने वाजविलेली रूपकमधील गत देखील माझ्या स्मरणात आहे. त्यात मुख्य लक्षांत राहिलेली गोष्ट म्हणजे  सानीसाप म् प  हा संवाद !!  हे मला त्यावेळी नवीन होते. हा भाग जेव्हढा तांत्रिक किंवा instrumental होता, तेव्हडाच आपल्या संगीतातला षड्ज पंचम भाव समजण्यासाठी उपयुक्त होता. त्याला निमित्त ठरले राग मुल्तानीचे. त्या काळी, जोग, मारू बिहाग, गोरख कल्याण अशा काही निवडक रागांनी मला मोहिनी घातली होती. पण मला स्वतःला मुलतानी ह्या रागाशी कधी सलगी करावी असे मात्र वाटले नाही. याचे कारण मला तो राग फारसा समजला नव्हता हेच असावे. रागाचे व्याकरण कळणे म्हणजे राग कळणे नव्हे.  राग आणि त्याचा भाव हा नेहमी "" between the lines "" सारखा असतो. मी एकदा किशोरीताईंना "आपल्याला एखादा राग आवडत नाही असे का होते ??" असा प्रश्न खासगीत विचारण्याचे धाडस दाखवले होते. त्यावर त्यांनी "बाळ, आपल्याला राग आवडत नाहीये म्हणजे तो आपल्याला समजला नाहीये असा होतो असे उत्तर दिल्याचे स्मरते. (जो राग आपल्याला आवडतो, तो आपल्याला नक्की कळलेला असतो का ?? हा प्रश्नांकित व्यत्यास मी ताईंना न विचारता माझ्याजवळच ठेवला). अर्थात ताईंच्या दृष्टीने त्यांनी दिलेले उत्तर बरोबरच होते. कारण जेव्हा एखादा राग त्यांना म्हणायचा असेल तेव्हा त्या स्वतः अगदी रागमय होत असत. हे पर-आत्म्यात प्रवेश केल्यासारखेच होते. कितीतरी रसिक श्रोत्यांनी आणि ताईंच्या शिष्यांनी ताईंना यमन-मय आणि बागेश्रीमय झालेले त्यावेळी प्रत्यक्ष पहिले आहे. राग समजण्याची ही  पराकोटीची अवस्था आहे असं मला वाटतं. पण ती येण्यासाठी साधनाही तितकीच हवी. असो ! शिवाय ‘मुलतानी’ राग मला आवडला नव्हता असेही नाही. पण भक्ती केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असं म्हणतात ना, तद्वतच काही रागांनी माझ्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावला हे खरं आहे. (उदा. जौनपुरी, मुलतानी, गौड मल्हार, गौड सारंग वगैरे).  ह्या सगळ्या रागांना प्रसन्न करण्यासाठी मला ते राग ऐकावे तर लागलेच, पण गावेही लागले. बुजुर्ग संगीतज्ञ कै. अशोक रानडे म्हणायचे त्याची आठवण झाली कि, कुस्तीबद्दल कितीही गप्पा मारल्या; तरी जोपर्यंत स्वतःच्या अंगाला लाल माती लागत नाही, तोपर्यंत त्या गप्पांना काहीही अर्थ नाही. असे असंख्य राग समजून घेण्यासाठी, त्यावेळी आणि नंतरसुद्धा गुरुवर्य विनायकबुवा काळे यांची गायनाची १० वर्षांची तालीम माझ्या उपयोगास आली. गायनाच्या फडात माझ्या अंगाला माती लावण्याचे काम ठाण्याचे 'काळे सर' या वस्तादाने केले.

इतकी वर्षे मला मुलतानी राग फार काही समजला नव्हता ह्याची पहिली जाणीव मला 2002 साली झाली, जेव्हा काळे बुआंनी ह्या रागाचा " गरवा डारू माला.." हा विलंबित एकतालातील ख्याल पहिल्यांदा गायला शिकवला तेव्हा....

तो ख्याल असा आहे……….

गरवा S S डारू माला
श्यामसुंदर कि अगम कि भई बेला I
            अंतरा
जब ते देखी सुरतीया सावरे की ,
तब ते मोमन बावरी भईलवा II

बुजुर्ग बंदिशकार असलेले माझे गुरु पं. विनायकबुवा काळे यांनी या बंदिशीत गवयाला गाण्यासाठी भरपूर आकार ठेवला आहे, हे पहिली ओळ वाचल्यावर चोखंदळ रसिकाच्या लक्षांत येईल. तसेच वरच्या षड्जावर ईकार ठेवलाय. षड्जावर सम आहे तर स्थायी व अंतर्यामध्ये कालावर पंचम आहे. शास्त्रनुसार हे स्वर मुलतानीतील अनुक्रमे संवादी व वादी आहेत.  जवळजवळ सगळ्याच शब्दांना गोलाई आहे. मुलतानी रागाची साधना करायला लागणारी सगळी गुणवत्ता ह्या बड्या ख्यालात आहे. काळे बुवांनी हा ख्याल माझ्याकडून काही  वेळा गाऊन घेतला. त्यांनी मला आकारात कसे गायचे हे शिकविलेच होते.  ही बंदिश आकारात गाताना खूप छान वाटतं. आपल्या आकाराला विलंबित मात्रांचे एक परिमाण मिळते. त्यामुळे आलापीत वैविध्य येते. असे असले, तरी मुलतानी रागाचे मला आज जेव्हढे आकलन झालंय तेव्हढे नक्कीच मला हा ख्याल शिकण्याच्या वेळी नव्हते, हे मान्य करावे लागेल. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन नुसते बेलपत्र वाहून येणे वेगळे आणि खऱ्या अर्थी 'शिवमहिमा' स्वतःला माहित असून त्याची प्रचिती घेणे वेगळे. आजही या रागाचं पूर्ण ज्ञान झालंय असंही मुळीच नाही. पण अलीकडे हा राग ऐकताना, वाजविताना तसेच गाताना आस्वाद प्रक्रियेत मौलिक भर पडलेय हे नक्की.

मग असं काय बरं स्पेशल आहे ह्या रागात ??? त्यासाठी वेगवेगळ्या पंडितांनी या रागाबद्दल आधी काय काय म्हणून ठेवलंय ते पाहूयात. 

अमेरिकास्थित राजन पर्रीकर यांनी त्यांच्या आर्काइव्ह वेबवर आपल्या ओघवत्या इंग्रजीत बघा काय लिहिलंय ते .... " An in-opportune nyasa on the rishab is a 'kiss of death' for Multani. Characteristic of Multani is the arohi uccharana of g: it is tugged with m as in (m)g (m)g m P.  Since g is approached from m, it has the effect of raising the shruti of g to a level above its nominal komal value.  This in turn has the effect of elevating the shruti of r. These microtonal nuances are later demonstrated tellingly by Pandit Ramashreya Jha “Ramrang.” The teevra madhyam in Multani is close to Pancham, in the latter’s penumbra, as it were”.

अच्युत गोडबोले म्हणतात " मुलतानी तसा नीट गायला नाही, तर खूपच लांबट कंटाळवाणा होऊ शकतो. असे कित्येक बोअर करणारे मुलतानीही कानावर आत्तापर्यंत आदळले आहेत. मुलतानीच्या मुड विषयी नक्की अंदाज बांधता येत नाही".

तर, चतुरपंडित भातखंडेजी म्हणतात कि मुल्तानीमध्ये योग्य ठिकाणी योग्य स्वर उच्चारणे हे आवश्यक व कौशल्याचे आहे.  

Music Scholar Hon. Deepak Raja writes " Omkarnath Thakur, another scholar musician from the Gwalior gharana believes that the Re and Ga of Multani are intended to be a trifle sharper than the standard komal [flat] frequencies, as also the tivra [sharp] Ma. [Sangitanjali, Vol. IV. Second edition. 1997, Omkarnath Thakur Memorial Estate, Bombay]”.

पं सत्यशीलजी देशपांडे म्हणतात "मधूवंती काय कोणीही मांडेल, पण मुलतानी गायला दम पाहिजे गाणाऱ्यात " याबद्दल अंमळ जरा विस्ताराने लिहावं लागेल. २०१३ ची दुबई मधली गोष्ट आहे. त्याचं असं झालं, कि एकदा माझ्या डोक्यात मुलतानी ठाण मांडून बसला होता. मनात  कवन देस गये पिया ही बंदिश सारखी रुंजी घालत होती (actually पूर्ण बंदिश नाही, तर बंदिशीचा फक्त मुखडाच). नवीन घातलेल्या कैरीच्या लोणच्याला खार सुटतो ना तसे आलाप डोक्यात येईत. ह्या बंदिशीच्या मुखड्यात एक वेगळीच चैन आहे. मुलतानीचं सगळं ऐश्वर्य नुसत्या मुखड्यात साठून राहिलंय असं वाटतं. राग आळवायला हा मुखडा प्रवृत्त करतो. त्यामुळे मग ही बंदिश मिळवण्याच्या खटपटीत काही दिवस गेले. बंदिशीचे text स्वरगंगा (swaraganga.org) मध्ये मिळाले, ते असे :


कवन देस गये पिया मोरा ,
बालम  रे लोगवा 

ना जानो  काई अनत बिलम  रहे
मै  तो वाहु देस की बलिहारी

पण स्वरगंगामध्ये ही बंदिश विलंबित तीनतालात दिली होती. मला तर विलंबित एकतालाची सवय होती. बरेच वेळा नुसता ह्या बंदिशीचा मुखडा घेऊन 'मुलतानी' एकतालात गायलो देखील. पण पूर्ण बंदिश येत नसल्याने सारखे अपुरेपण जाणवत होते. मी २०१४ मार्च मध्ये दुबई सोडून ठाण्यात आलो. अध्ये मध्ये मुल्तानीची लहर यायचीच, पण तिचं पुढे काहीच झालं नाही. तसे YouTube वर चाळुन झाले होते. पण हीं "दीड मीटर" लांबीची बंदिश 'एकताला'त नक्की कशी असेल त्याची नीट कल्पना येईना. एका नामांकित गायकाने तर एकतालाच्या २ आवर्तनात गाऊन सम येण्यापूर्वी शेवटच्या ४-५ मात्रा नुसतेच 'आ' 'ऊ' केले आहे. तर काहींनी झूमऱ्यात गायलेय ही बंदिश. शेवटी आमचे Encyclopedia सत्यशीलजींना फोन केला. ते म्हणाले "घरी या एकदा, छान मुल्तानीचा रियाज करू". लगेच त्यांच्या घरी गेलो. त्यांनी स्वतः कडील सगळी पुस्तके पहिली, पण हीं बंदिश कुठेही एकतालात दिलेली नाही. पण आमचा मुल्तानीचा रियाज मात्र छान झाला.  मी ऐकलेल्या बऱ्याच उदयोन्मुख गायकांची अर्धी energy ही या रागाची आकृती काढण्यातच जाते. मला ते रंग न भरलेल्या ठिबक्यांच्या रांगोळीसारखे वाटते.  या रागाची पथ्ये आणि स्वरलगाव सांभाळताना ५-१० मिनिटे अशीच जातात. (रागभाव तर पुढेच राहिला).  रियाजाच्या वेळी सत्यशीलनी मुल्तानीतील षड्ज लावण्याचे तीन वेगवेगळे प्रकार दाखवले. हा प्रकार जरी सकृतदर्शनी तांत्रिक वाटत असला, तरीही या तीन प्रकारच्या लगावांचे सौंदर्य वेगळे होते हे नजरेआड करून चालणार नाही . नुसत्या षडजाची हीं स्थिती, तर पुढे काय असेल त्याची आपण कल्पनाच केलेली बरी. आश्चर्य म्हणजे रियाज करताना मुल्तानीतील कोमल गंधार हा त्यांच्याकडे असलेल्या 'परिपूर्ण' पेटीमध्ये कसा नाहीये हेही त्यांनी प्रत्यक्ष गाऊन दाखवून दिले. यामुळे मी ‘संगीतातल्या श्रुती’ या विषया संदर्भात जरा अधिक संवेदनाशील झालो. (आधी डॉ. ओकांचे श्रुतींवरचे पुस्तक वाचून विषयप्रवेश झाला होताच) त्यानंतर 'रामाश्रय झा'साहेबांचे मुलतानीतील जरा चढ्या स्वरांविषयीचे सकारण स्पष्टीकरण ऐकुन मुलतानीतील स्वर किंवा श्रुती व्यवस्थेविषयी साधारण अंदाज आला. निदान ''असं'' काही असतं, एव्हढं तरी कळलं.  प्रत्येक रागाच्या बाबतीत मी काही एव्हढा श्रुतीविचार करीत नाही. पण काही निमित्ताने का होईना, तो मुलतानी रागाच्या बाबतीत तो झाला हे खरं आहे. माझ्या मुल्तानीच्या भक्तीत त्यामुळे भरच पडली. 


आता जरा माझ्या ऐकण्यात आत्तापर्यंत आलेल्या निवडक गायकांच्या मुलतानीचा माझ्यावर कसा कसा असर झाला ते थोडक्यात लिहिणारे. कदाचित माझ्या स्वतः च्या अभिरुचीवर त्यामुळे प्रकाश पडेल. थोडेसे आत्मपरीक्षणही होईल. हरकत नाही, कारण ह्यात सिक्रेट काहीच नाही. हे एक अनुभवकथन आहे असे मी वरती म्हटलेच आहे.

म. उस्ताद बडे गुलाम अलींचा चाळीसएक मिनिटांचा मुलतानी 'यु ट्यूब' वर ऐकला. खूप आवडला. कवन देस गईलवा या पारंपारिक बंदिशीतली "चैन" बडे गुलाम अलींनी पुरेपूर लुटली आहे. सुमारे २२ मिनिटे उस्तादजीनी कुठलीही हरकत मुरकत न घेता नुसती आलापी केली. भरदार षड्ज पंचम, थक्क करणारे मींडकाम, आवाजातील कमालीचा दर्द, गमकयुक्त अलंकार यांचा सुरेख संगम घडवून आणून एखाद्या राजवाड्यासारखा प्रशस्थ मुलतानी उभा केलाय उस्तादजींनी. आता मी इथे अच्युत गोडबोले यांच्या comment वर विचार करतो. इतक्या विस्ताराने जर कुणी मुलतानी मांडला तर कंटाळवाणा होऊ शकतो. मग बडे गुलामनी नेमकी काय जादू केलीय ?? त्याचं उत्तर आहे त्यांनी मिळवलेली 'आवाज' या माध्यमावरील सिद्धी, जी डोळस परिश्रम व रियाजानेच एखादा गवई मिळवू शकतो. तसेच ते आलापी करताना मुलतानीशी एकरूप झाल्यामुळे त्यांना हे प्रभुत्व मुद्दाम दाखवावे लागत नाही .... ते आपोआपच दिसते. एव्हढे असून, आलापी करताना रागाचा परिपोष सुद्धा ते भावपूर्ण करतात. वरच्या षड्जावर पोचल्यावर त्यावर बारीक बारीक मीनाकारीचे नक्षीकाम सुरु केले. (अर्थात इथून मात्र मुलतानी ह्या मेलडीचे त्यांचे काम थांबले. आणि माध्यम तथा गळ्यावरील प्रभुत्व वेगवेगळया कसरती करून त्यांनी दाखवले आहे). पतियाळा घराण्याच्या या बुजुर्ग गवयाला गायकीमधल्या सगळ्याच गोष्टी अवगत होत्या.   

स्वरभास्कर कै. पं भीमसेन जोशी यांचा ''मुलतानी'' मला प्रत्यक्ष ऐकण्याचा योग माझ्या दुर्दैवाने कधीच आला नाही. पण YouTubeवर त्यांचे अनेक मुलतानी आता अपलोड झाले आहेत, त्यातील एक रेकॉर्डिंग मी ऐकले ( Ref: Publisher: Raju Asokan). पंडितजींनी नियामत खां (उर्फ सदारंग) यांची ''ए गोकुल गांव का छोरा'' ही सुप्रसिद्ध बंदिश विलंबित एक तालात आळवली आहे. जसे एखाद्या व्यक्तीच्या कलाने आपण वागतो, तसे पंडितजी अगदी मुलतानीच्या कलाने गायलेत.  मैफिलीत रंग मारण्याच्या दृष्टीनं आणि शास्त्र कसोटीच्या दृष्टीनं मुलतानी हा राग गवयाची परीक्षा घेणारा आहे. ("मधूवंती काय कोणीही मांडेल, पण मुलतानी गायला दम पाहिजे गाणाऱ्यात "- इति पं. सत्यशील देशपांडे). मुलतानी या रागाला हलक्याफुलक्या हरकती अजिबात मानवणाऱ्या नाहीत, एव्हढा तो Dignified राग आहे ("श्री " हा असाच एक राग आहे).  तसेच नाजूक साजूक आवाजाचे या रागात काही काम नाही. उद्या पहिल्या बाजीरावावर सिनेमा काढला , तर बाजीरावाच्या भूमिकेत एखादा पाच फुटी आणि ४५ किलो वजन असणारा तरुण शोभून दिसेल का ???  या सगळ्याचे भान ठेवून पंडितजींनी मुलतानीचे अगदी साहेबी थाटात मानपान केलंय.  हे गाणं ऐकल्यावर मला अजून एक साक्षात्कार झाला कि 'मुलतानी' गाण्यासाठी जबरदस्त ताकदीचा आवाज आणि कमालीची ऊर्जा पाहिजे. स्वतः ऊर्जास्त्रोत आणि स्वरभास्कर असणाऱ्या भीमसेनजींना energyची काय कमतरता ?? पुराने जमाने मे किसी ने कहा हैं कि " षड्ज में सब राग है, षड्ज में सब सूर; जो जाने ये बात को, गावे रस भरपूर !".  किशोरीताई, भीमसेनजी आणि मन्सूर अण्णा ह्या तीन गायकांचा षडज एकदा लावल्यावर कधीच संपू नये किंवा कधीच संपणार नाही असे वाटते. याचे कारण त्यांनी मिळविलेली स्वरसिद्धी !!  पंडितजींच्या स्वरसिद्धीमुळे मुल्तानीतील 'आर्तता' अक्षरशः हात जोडून उभी राहिली आहे. ज्या श्रोत्यांना ते प्रत्यक्ष अनुभवता आलं, ते 'भाग्यवंतच !! शास्त्रीय संगीतात षडज व पंचम हे स्थायी किंवा अचल स्वर असल्याने, फक्त ते स्वर लावून रंजकत्व येत असले तरी भावनाविलास होत नाही.  स्थायी स्वर असणाऱ्या षड्जावर पंडितजींनी निषाद, कोमल रिषभ आणि कोमल गांधार या जवळच्या स्वरांच्या साहाय्याने अतिशय सुंदर 'कलम' करून एक प्रकारे मुलतानीतील षडजाचे सर्व बाजूंनी पूर्णदर्शनच घडवलंय. आश्चर्य म्हणजे या मैफिलीत पंडितजींनी मुक्त कंठाने मुलतानीची अप्रतिम सरगम केलेय. परिणामकारक आलापी, बोलबनाव, सरगम आणि बुलंद 'भीमसेनी' ताना यामुळे प्रत्यक्ष या मैफिलीला उपस्थित असलेल्या रसिकांना पंडितजींच्या या मुलतानीने नक्कीच व्याकुळ केले असणार.  ही कधीची आणि कुठली मैफिल आहे ह्याविषयी मी YouTube वर पृच्छा केलेली आहे. आपणही जरूर ऐका. दुसरा एक भीमसेनजींचाच मुलतानी  मी यु ट्यूबवर ऐकला ( Publisher: Dipankar Sen). फार कुणाला संगीत कळत नसेल तरी त्यानेसुद्धा ही क्लिप फक्त पंडितजींचा 'षड्ज' किती चांगला, निकोप आणि दीर्घ लागायचा एव्हढे जाणण्यासाठी ऐकावी. आणि ज्याला घराण्याची गायकी कळते त्याला ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वरप्रधान गायकी असणारे भीमसेनजीं बोल अंगाची लयकारी सुद्धा किती सुंदर करायचे ते कळेल. पंडितजींवर फक्त घराणं नाही, तर सगळं संगीत फिदा होतं !!  


पं उल्हास कशाळकरांचा मुलतानी देखील मला खूप आवडला, तो त्यांच्या गायनातील तालीम आणि अभिव्यक्ती यांच्या विलक्षण संयोगामुळे !! कवन देस हीच बंदिश त्यांनी झूमऱ्यात म्हटली आहे. उल्हासदादा ४ लयींमध्ये फिरले आहेत, हुंकारयुक्त षड्ज, नोम तोम, गमक, दमसास आणि गायनातील शिस्त यामुळे हा मुलतानी मला भगवी वस्त्रे परिधान केलेल्या एखाद्या तपस्व्यासारखा वाटला. माझ्या बऱ्याच संगीत मित्रांनी कुमारजींचा मुलतानी मला ऐकायला सांगितले होते. म्हणून मी मोठ्याच कौतुकाने ऐकला. कुमारजींचं गाणं ऐकताना रागाचं नांव आधी माहित नसेल तर बरे असते. अगम्य मार्गाने ते आपल्याला माहित असलेल्या पायवाटेवर कसे आणतात हे बघण्यात जास्त मजा आहे. वरच्या षड्जावर सम असणारी 'बेगी यार साईयां' ही सदारंगांची बंदिश त्यांनी म्हटलेय. ( विलंबित ख्यालात मला स्वतः ला वरच्या षड्जावरील सम अजिबात आवडत नाही. अर्थात, ही माझी वैयक्तिक नावड आहे ).  या रेकॉर्डिंगमध्ये मुल्तानीची पहिली कुणकुण तब्बल अडीच मिनिटांनी लागली.  ह्या रेकॉर्डिंगमध्ये कुमारजींनी मुलतानीचे नुसते एक अंग पकडून पाहिली अडीच मिनिटे पंचमावर फोकस केले आहे . वास्तविक तीव्र मध्यमाचे मुल्तानीतील महत्व अनन्य साधारण आहे. पण त्याला अंमळ जरा कमी लेखून कुमारजी बऱ्याच स्वराकृती पंचमावर आणून सोडतात.  पु लंनी एकदा कै. गजाननबुवा जोशींना " कुमारजी प्रत्येक रागाचा वेगळ्या अँगलने फोटो घेतात " असे मिस्किलपणे सांगितले होते. म्हणजे काय हे पाहायचे असेल तर त्यांचा हा मुलतानी ऐकावा. अर्थात म्हणूनच ते क्रांतिकारी गवई !!

आणखीही काही कलाकारांचे मुलतानी माझ्या ऐकण्यात आले. सगळेच आपापल्या परीने चांगले आहेत. बाकी काय असेल ते असो, पण मला जाणवलेले मुलतानीतील सगळ्यांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मुळातच कमी घेतल्या जाणाऱ्या कोमल रिषभाचे 'कमी अधिक' प्रमाण !! आलापचारी करताना प नि सा रेसाSS ही रागवाचक स्वराकृती सहसा  प नि सा सारेसाSS अशीच घेतली जाते. पण यातील रिषभाचे प्रमाण वेगवेगळे गायक कमी अधिक प्रमाणात ''अल्प' ठेवतात. दीर्घ रिषभ  ठेवत नाहीत, कारण त्यामुळे अर्थातच तोडी राग उत्पन्न होईल. हिराबाई आणि भीमसेनजींनी ह्या रिषभाचे अल्पत्व विशिष्ट प्रमाण रागरस न बदलता कमाल मर्यादेपर्यंत ठेवले आहे, तर मी ऐकलेल्या एका रेकॉर्डिंगमध्ये उ.अमीर खांसाहेबांनी बरेच ठिकाणी अवरोहांत रिषभ न घेता प नी सा , नी साS असे घेतले आहे. तर दुसऱ्या एका त्यांच्याच रेकॉर्डिंगमध्ये अमीरखा साहेब पहिली पंधरा मिनिटे फक्त खर्जात गाऊन फक्त समेसाठी मध्यसप्तकात येतात. अनेक गायकांचा मूलतानी ऐकताना आलापीचा हा भाग माझ्या मौजेचा भाग ठरला. तसेच एरवी या रागात प्रबळ असणाऱ्या, आणि पहिल्या क्षणापासून गाणाऱ्याला अंतर्मुख करणाऱ्या निषादाला ग म् प नी सां नी   SS ह्या स्वराकृतीमध्ये अवरोहांत कणसुराइतके नगण्य केले जाते हादेखील कुतुहल वाटणारा भाग आहे.  संगीतातील सौंदर्य हे कधीकधी असे गूढरम्य देखील असते


शेवटी दुसऱ्याचे गाणे ऐकणे आणि स्वतः गाणे वाजविणे हे दोन वेगळे अनुभव आहेत. नाहीतर इतके सुंदर सुंदर मुलतानी ऐकल्यानंतर आपल्याला स्वतंत्रपणे हा राग गायची किंवा वाजवायची गरजच काय .... ?? आपण स्वतः गाणे किंवा वाजविणे ह्यामध्ये 'व्यक्त' होणं अभिप्रेत आहे. म्हणूनच लाखावारी लोकांनी जरी आत्तापर्यंत यमन म्हटला, तरी अजूनही तो दशांगुळे उरलाच आहे आणि लोक तो गातायत. आणि दुसऱ्याचं चांगलं ऐकलं, की व्यक्त होण्याची आपली 'कळ' उलट वाढतेच. चांगली बंदिश तुम्हाला रागदारी गाण्यासाठी उद्युक्त करते. व्यक्त होण्यासाठी 'राग' हा माध्यमाचे काम करतो.  प्रत्येकाचं 'व्यक्त होणं' वेगळं आणि त्यासाठी प्रत्येक कलाकाराने प्रामाणिक राहायची गरज असते. (दुसऱ्याची कॉपी करणं म्हणजे व्यक्त होणं खचितच नाही). तर असाच एक मला उमजलेला 'मुलतानी' वाजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न ४ वर्षांपूर्वी माझ्याकडून झाला असं म्हणता येईल.  ठाण्याला हार्मोनियम संमेलनात मी 'जो' काही 'मुलतानी' संवादिनीवर वाजवला त्याविषयीचा माझा अनुभव मी थोडक्यात लिहिणार आहे. त्याचे असे झाले .... 

अखिल भारतातून २०-२२ संवादिनीवादक संमेलनासाठी जमले होते. त्यामुळे टेन्शन येणे साहजिकच होते. आयोजकांनी मला दुपारी ३ ची वेळ दिली होती. त्यामुळे रागांचे पर्याय खूप कमी होते. भीमपलास , मुलतानी आणि पटदीप यापैकी मी 'मुलतानी' निवडला, तो मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने !  हा राग माझ्या वादनातील नक्कीच नव्हता. आपल्याला काही वर्षांपूर्वी मिळालेला छानसा फ्लॉवरपॉट कुठेतरी साता गाठीत सात मुठीत ठेवलेला असतो, तसा माझ्या डोक्यात मुलतानी दडी मारून बसला होता. मुलतानी ही एक मला ज्ञात असलेली creative idea होती, ज्यावर माझ्याकडून काहीच काम इतके वर्षात झाले नव्हते. पण माझ्या नकळत त्याचे ''unconscious processing'' झाले असणार. (तसं नसतं तर फक्त एक महिन्यात मला चांगला मुलतानी अजिबात वाजविता आला नसता. असो !) 

एव्हढ्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात वाजवायचे म्हणजे अर्थात नीट तयारी करणे आले. माझ्याजवळ महिनाभर होता. संवादिनीवर मी शक्यतो विलंबित बंदिशी न वाजविता मध्यलयीतील ''गत'' वाजवतो, कारण विलंबित बंदिशीतील शब्दांचे सौंदर्य नेहमीच वाद्यातुन प्रतीत होते असे नाही.  शिकविलेली गत जर माझ्या वादनशैलीला पोषक नसेल, तर मी हल्ली प्रयत्नपूर्वक योग्य अशी ग बांधतो. अर्थात यासाठी माझ्या गुरुजनांनी मला दिलेली तालीम खूप उपयुक्त ठरते. 'मुलतानी'चा रियाज सुरु झाला आणि रूपक ठेक्यात स्थायी अंतऱ्यासहीत चांगली गतही डोक्यात आली. माझे साथीदार अनुभवी श्री प्रकाश वगळ यांना एकदा घरी पाचारण करून त्यावर शिक्कामोर्तब केले. 'मुलतानी'चे अमूर्त स्वरूप संवादिनीसारख्या वाद्यावर संपृक्तपणे व्यक्त करणं हे खरोखरंच शिवधनुष्य उचलण्याइतकं बिकट काम होतं. त्यामुळे ते वाजविता येईपर्यंत (निदान आपलं स्वतःचं समाधान होईस्तोवर) काही वेळा भावनिक चढ-उतारही झाले. एक दोन वेळा वगळजी घरी रियाजाला आले, त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. हा राग मी लहर लागली तर विलंबितमध्ये थोडाफार गाऊही शकतो. पण गायनातल्या जागा संवादिनीवर निघाव्यात असं मला कधीही गेल्या २०-२५ वर्षात वाटलं नाही. (त्यामुळे मी सुखात असतो). संवादिनीला काय सांगायचंय हे मात्र मी नेहमीच 'गौर'से ऐकत आलोय. हेही मुद्दाम सांगितलं पाहिजे कि माझ्या संवादिनीवरच्या अभिव्यक्तीत गुरुवर्य पं . विश्वनाथ कान्हेरे यांच्या १०-१२ वर्षांच्या तालमीमुळे खूप मोठी मोलाची भर पडलेय. त्यामुळेच कि काय, पण मींड गमक नसलेल्या या वाद्यावरील माझे प्रेम तसूभर देखील कमी झालेले नाही. अखेर संवादिनीवर मला अभिप्रेत असलेला 'मुलतानी' मला गवसला. एव्हढ्या टेन्शनमध्ये सुद्धा ज्या उत्साहाने आणि आनंदाने मी तो पेश केला यातच सगळं आलं.  

सोलो हार्मोनिअम वादनाच्या ध्यासामुळे माझ्या गायनात बऱ्यापैकी खंड पडला. त्यामुळे गेली ४-५ वर्षे मी गुरुवर्य पं. अरुणजी कशाळकर यांच्याकडे आग्रा गायकीचे शिक्षण घेतोय.  त्यांच्यामुळे माझं गाणं पूर्वीपेक्षा जोमानं सुरु झालं. कारण आता गाण्यासाठी मला पुरेसा वेळही देता येतो. ( इथे मला गाण्याचा परफॉर्मन्स नाही, तर रागसंगीतातील सौंदर्य अभिप्रेत आहे.  ताजं, दर वेळी नवं, वेगळं, सुंदर ,भावविश्वाच्या विविध छटा  निर्माण करण्याची क्षमता असणारं असं रागसंगीत मला नेहमीच मोहात पाडत आलं आहे. त्यामुळे त्याची उपासना करणं हे माझ्यासाठी 'आन्हिक' झालं आहे). यापूर्वी काळे सरांकडे मी विस्तृत आलापीची (किंवा पसाऱ्याची) गायकी शिकलो होतो. अरुणकाकांकडे आल्यावर मी लयीच्या अंगाने गायला शिकलो, तेही झुमरा आणि तिल्वाडा यासारख्या तालांमध्ये. नीसाम् प सारख्या फ्रेजेस वापरून  किंवा निषादासारख्या स्वरांचा आघात करून मुलतानी राग अधिक गहिरा कसा करायचा हे त्यांनी शिकविले. ज्या 'कवन देस गईलवा' च्या प्रेमात मी होतो, नेमकी तीच बंदिश एके दिवशी गुरुजींनी झुमऱ्यामध्ये शिकवायला घेतली. मला आकाशच ठेंगणे झाले . बंदिशीच्या नुसत्या मुखड्याच्या प्रेमात न पडता, त्यातील सगळे शब्द मुलतानीच्या पाकात घोळवून (किंवा marinate करून) बोल कसे करायचे, ते कमालीच्या सहजतेने गुरुजी शिकवतात. त्यामुळे माझी ही आवडती बंदिश मी खऱ्या अर्थाने 'जगलो' असेच म्हणावे लागेल. माझे मुल्तानीचे पुढचे धडे कवन देस गईलवा ह्या बंदिशीने घेतले. त्यामुळे मुलतानी आणि 'मी' जवळ जवळ एकरूपतेच्या अवस्थेला येऊन पोहोचलो ( निदान माझ्या दृष्टीने तरी !! ). याची एक झलक म्हणून मी २०२१ च्या गुरुपौर्णिमेमध्ये मुलतानी राग सादर केला, ज्याला द्त्तूरखुद्द गुरुजींची देखील दाद मिळाली. 'याज साठी केला होता अट्टाहास' असे क्षणभर वाटून गेले. माझ्या नकळत एखाद्या गुरूप्रमाणे मुलतानी रागाने  मला बाकीचे राग कसे गायचे ह्याचीही वाट दाखवून दिली...... !!

थोडेसे विचार मंथन .... 

या लेखाच्या सुरुवातीलाच मी ''मुलतानी'' ऐकून किंवा वाजवूनही 'मन भरले नाही' असं लिहिलंय. म्हणजे काय नक्की ?? शास्त्रीय गाणं ऐकताना नेमकं कशानं मन भरतं ?? मला वाटतं या प्रश्नांची सांगड ही श्रोत्याच्या त्या त्या वेळच्या गाण्याविषयीच्या अपेक्षेशी निगडीत आहे. सुप्रसिद्ध न्यूरोसाईन्टिस्ट डॅनिअल लेव्हीटीन काय म्हणतो बघा .... Daniel J. Levitin states that we like music because it plays with our expectations. When we hear music, our brain tries to predict what sound we will hear next. Usually these predictions are met as the “thing” we call music has to have some kind of structure or sound pattern. But sometimes those predictions are violated and we hear something unexpected. These surprises keep our mind interested in the given music. बरीच वर्षे संगीत ऐकल्यानंतर अमुक एक राग आपल्याला असा असा हवा आहे असं काहीतरी माझ्या सुप्त मनांत (subconscious) घर करून असावे....(निदान काही रागांच्या बाबतीत तरी). मी जेव्हा राजन साजनचा मुलतानी YouTube वर लावला, तेव्हा मला व्याकरणाचे नियम दाखविणारा मुलतानी ऐकायचा नसेल कदाचित. मी आता जेव्हा विचार करतो, तेव्हा मला seamless किंवा आसदार ''मुलतानी'' त्यावेळी अभिप्रेत होता असं जाणवतं. बुध्दिगम्य मुलतानी मला हवा असता, तर मी अमीर खा साहेबांचा असंख्य उपजा असणारा मुलतानी ऐकला असता. मन्सूरअण्णांनी जणू काही मुल्तानीच्या स्वरांचा झराच माझ्यासाठी आणला आणि ती अपेक्षा पूर्ण केली. झऱ्याचे पाणी आपण पीत असताना झरा वाहायचा थांबतो का ??? तशीच 'आस ' आणि अखंडित प्रवाह मन्सूरदांच्या या मुल्तानीत मला जाणवला. मी मुलतानी पीत होतो आणि त्यांचं गाणं वाहत होतं.  Each note beckoned the next note with open arms and one merged into the other असे मंजीखांसाहेबांच्या गाण्याचे वर्णन स्वतः मन्सूरदांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. मन्सूरदांच्या गाण्यात मला तोच प्रत्यय आला.  अर्थात आणखी काही प्रेमात पडण्यासारखे कहन, पुकार ह्यासारखे गुणविशेष देखील मन्सूर अण्णांच्या गायनात आहेतच, ज्यामुळे त्यांच्या गाण्याने ही उंची गाठलीय. कदाचित, पुलंनी ''गुण गाईन आवडी''त म्हटल्याप्रमाणे मन्सूरांच्या स्वरातील 'भिजलेपण' देखील या उंचीला कारणीभूत असेल  या मुल्तानीमध्ये घेतलेल्या ख्यालाचा ''छंद'' त्यांनी शब्दांनी न करता स्वरांनी केलाय, जो मनाला भिडला.  मुल्तानीतील भावनेला त्यांनी केलेलं आवाहनही  खूप परिणामकारक आहे. आपण किती छान गातोय हे मुद्दाम न दाखवता ते सहजगत्या छान गायलेत. His was not the way of gimmickry, flamboyance and showmanship. The narrative of his memoir begins with a startlingly simple, yet meaningful !! असं मन्सूरदांचेच चिरंजीव त्यांच्या गाण्याविषयी लिहितात ते किती खरं आहे ते पटतं. आस, मींड आणि गमक ह्यांच्या साहाय्याने मन्सूरअण्णांनी हा मुलतानी पूर्णत्वाला नेऊन ठेवलाय; इतका, कि यात काय नाही हा प्रश्नच मनांत येत नाही. शास्त्रीय संगीतातील अष्टांगांपैकी काही अंगे यांत कदाचित नसतीलही. पण श्रोत्याला त्याचा विसर पाडणे हे त्यांचे यश आहे.

आपण संगीत शिकतो म्हणजे काय करतो  ?? ज्ञान वाढवतो किंवा गोळा करतो. गाण्याच्या संदर्भांत ज्ञान म्हणजे व्याकरण का  ?? व्याकरण म्हणजे  'माहिती' असं म्हणता येईल कदाचित. पण मला विचारलंत तर रागाचं व्याकरण हे, 'तो' राग समजून घ्यायचं फक्त एक साधन आहे. ''साध्य'' तर पुढेच आहे.  एखाद्याच्या गाण्यात किंवा वादनात जर 'बात 'बनत असेल, तर व्याकरण न समजताही ती 'बात' समजणारे काही माझे निवडक सहृदय रसिक मित्र आहेत. फक्त तशी बात का बनली ह्याचे शास्त्रीय विश्लेषण ते  कदाचित करू शकणार नाहीत. कारण ''बनलेली बात'' ही नेहमी हृदयाला जाणवते. हृदयाला व्याकरण कळत नसते. ते काम मेंदूचे!! हृदयाला अभिव्यक्ती कळते. एखाद्या रागातील रसाचा परिपोष जर गाणारा करत असेल, तर तो शास्त्रीय संगीत आवडणाऱ्या सामान्य रसिकाला नक्कीच भावतो. सुझान लँगर पासून सुशील कुमार सक्सेनांपर्यंत सगळ्यां विद्वज्जनांनी संगीतात समालोचन (Articulation) किती आणि अभिव्यक्ती (Expression) किती याचा सांगोपांग अभ्यास केलाय. यातील गायक वादकाच्या अभिव्यक्तीचा संबंध ''बात'' बनण्याशी असतो. नुसत्या व्याकरणाने बात बनत नसते. रागाचे स्वर आणि त्याचे आरोह अवरोह ( किंवा चलन, पकड ) यांनी फक्त काही सांगीतिक शक्यता निर्माण होतात.... नुसत्या कलाकाराच्याच मनात नाही, तर श्रोत्यांच्याही मनात !! कलाकाराच्या बाबतीत या अमूर्त शक्यता हळू हळू मूर्त स्वरूप घेत जातात. त्यामागे त्याला मिळालेली तालीम, त्याच्यावर झालेले पूर्व संस्कार, त्याची स्वतःची प्रतिभाशक्ती, त्याची आवडनिवड, त्याची सौंदर्य दृष्टी, त्याची कुवत, त्याचा रियाज, त्याची साधना यांचा खूप मोठा भाग असतो. प्रत्येक मानवाच्या मेंदूची जडण घडण वेगळी असते. (Every brain is wired differently. Daniel talks about how the brain is different in people who are accomplished musicians compared to the average layperson. He also refers to a part of the brain that can grow larger through practice.)  त्यामुळे कुठलीही गोष्ट ऐकल्यावर त्याचे मेंदूवर होणारे संस्कार तसेच रेस्पॉन्सेस वेगळे असतात. अर्थातच, प्रत्येक कलाकाराच्या जाणिवेतून आणि नेणिवेतून उमलणारं संगीत वेगळं असतं. तसेच, प्रत्येक श्रोत्याच्या जाणिवेतून आणि नेणिवेतून आवडणारं संगीतही वेगळं असतं. मला आज मुलतानी रागात स्वरांचा अखंड स्त्रोत अभिप्रेत आहे. एखाद्याला रोमँटिक किंवा चैनीचा  मुलतानी आवडेल किंवा एखाद्याला आखीव रेखीव मुलतानी आवडेल.  प्रत्येक राग हा आपापल्या स्थानी विराजमान असतोच. पण आपली रसिक किंवा कलाकार म्हणून आकलन आणि आस्वादक शक्ती तसेच कलेसंदर्भातील आपली ‘अभिरुची ही काळानुसार बदलती व संपन्न होत जाणारी असते . असे असूनही काळाच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला प्रत्येक ‘राग’ प्रतिसाद देतोच देतो, हा माझा अनुभव मुलतानीच्या निमित्ताने मी या लेखांत मांडलाय. म्हणूनच इतकी वर्षे इतके जणांनी गावुन वाजवुन देखील त्या रागातील आनंद संपत नाही आणि हीच खरी शास्त्रीय संगीतातील मजा आहे. काही वाचकांना माझा हा लेख बऱ्यापैकी लांबल्यामुळे हे मुल्तानीचे ''भारूड'' वाटेल. पण माझ्या दृष्टीनं मात्र हे मुलतानीचं "गारुड" आहे. अशा अनेक रागांनी आत्तापर्यंत माझ्यावर वेगवेगळ्या वेळी गारूडे केली आहेत. म्हणूनच कि काय, पण मला ''असा'' जन्म मिळाल्याचं सार्थक वाटतं. 

कै गजाननबुवा जोशी यांसारखे उच्च कोटीतले संगीतज्ञ देखील या 'मुलतानी' रागाच्या प्रेमात पडले होते. एव्हडेच नव्हे, तर ग्रेस सारख्या प्रतिभावंत कवीला सुद्धा या रागाने वश केलंय, (ज्याचा एकदा सत्यशीलजींनी माझ्याजवळ ओझरता उल्लेख केला होता).  त्यांच्याच एका कवितेतील या रागाचा उल्लेख असलेल्या चार ओळींनी या लेखाची सांगता करतो.... 

कंठात दिशांचे हार,  निळा अभिसार ,
वेळूच्या रानी   I

झाडीत दडे,  देऊळ गडे ,
येतसे जिथुन मुलतानी    II



                                                                           **********OOOOOO*********


 





Comments

  1. तुमचे गुरुबंधू आणि माझे मित्र हा समान दुवा असलेले विवेक यांनी हा लेख पाठवल्याबद्दल धन्यवाद. मोठा लेख वाचायला थोडा वेळ लागला, पण मजा आली!

    उत्तम लिहिलंय! नवीन काही गोष्टी समजल्या आणि काही पूर्वी जाणवलेल्या गोष्टी या लेखामुळे पक्क्या झाल्या. असेच लिहीत रहा.

    मला तुमचे म्हणणे शंभर टक्के पटते. जसे तुमच्याकडून संवादिनीवर वाजायच्या आधी काळेबुवांनी बंदिश गाऊन घेतल्या, तश्या विद्यार्थ्यांना गायलालावायला हव्यात. म्हणजे संवादिनी वाजवताना बंदिशीतले शब्द, भाव आणि गायकी अंग अजून उठून येईल.

    "मुलतानी" कि "मुल्तानी"? मला तरी "मुलतानी" बरोबर असावं असं वाटतं. मुलतान या (सध्या पाकिस्तानात असलेल्या) प्रांताचा काही संबंध असावा का?

    वेगळीच मजेशीर उपमा वाचायला मिळाली - "नवीन घातलेल्या कैरीच्या लोणच्याला खार सुटतो ना तसे आलाप डोक्यात येईत." :)

    बाकी एक छोटीशी इच्छा - ब्लॉगवर मोठा फॉन्ट size वापरला तर वाचायला सोपं पडेल.

    एका श्रोत्याच्या नजरेतून मी लिहिलेली एक आठवण तुमच्यासाठी इथे देतो आहे, आवडल्यास कळवा (किंवा ठाणे): http://madhurajani.blogspot.com/

    ReplyDelete

Post a Comment