Skip to main content

सर्जक आणि साधक गुरु ...पं. अरुण कशाळकर !!




 सर्जक आणि साधक गुरु ...पं. अरुण कशाळकर !!

------------------------------------------------------------------------------- 

साधारण वीसेक वर्षांपूर्वीची घटना असावी. म्हणजे मी पेटीच्या थोड्याफार साथी करायचो तेव्हाची. माझे मेंटर 
आणि एके काळचे म.टा.चे संगीत समीक्षक कै. श्रीकृष्ण दळवी (उर्फ अण्णा) यांना मी विनंती केली, कि मला जरा अनवट रागांचे एक्सपोजर हवंय, तर मी काय करू ?? अण्णा लगेच म्हणाले कि मी तुला योग्य आणि अधिकारी व्यक्तीकडे घेऊन चलतो. आम्ही दोघं एका सुंदर सकाळी पं. अरुण कशाळकर यांच्या घरी म्हणजे मुलुंड येथील 'कविता' अपार्टमेंट येथे दाखल झालो. फार काही प्रस्तावना वगैरे अण्णांनी केली नाही. फक्त "इनको अनवट रागों के बारे मे कुछ बताइए" असं बुवांना मित्रत्वात सांगितल्याचं स्मरतंय. अरुणकाकांनी पण त्यावर लगेच 'येत चला इथे' असा अनौपचारिक पण आस्थेवाईक सल्ला मला दिला. त्यावेळी नोकरीमध्ये माझे खूप touring असायचे.  त्यामुळे नंतर मी किती दिवस त्यांच्याकडे गेलो हे काही नक्की आता मला आठवत नाही. पण असंच एकदा गेलो असताना त्यांनी माझ्या हातात तंबोरा देऊन 'जयत कल्याण ' सांगितला होता हे चांगलं आठवतंय. तो माझ्या इतका डोक्यावरून गेला कि माझी अनवटपणाची वटवट तिथेच थांबली आणि आपल्याला काय काय येत नाहीये याचा बऱ्यापैकी अंदाज आला. पण या भेटीगाठींमुळे शिकायला मिळालं आणि काही मोजक्या मैफिलींमध्ये त्यांच्याबरोबर पेटीची साथसंगत करण्याचं भाग्य मात्र मला लाभलं. त्यानंतर मी बरीच वर्षे दुबईला असल्याने खूप गॅप गेली. १९९२ ते २००२ ही १० वर्षे मी ठाण्याच्या कै. विनायकबुवा काळे यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायन शिकलो होतो. अलीकडे दुबईहून परत आल्यावर शिकलेले गाणे पुढे वाढविण्यासाठी म्हणा किंवा रागांचे जास्त आकलन करून घेण्यासाठी म्हणा, २०१७च्या जुलै महिन्यात मी बुवांकडे गाणं शिकण्याचा निग्रह करून पुन्हा एकदा रुजू झालो.

वीस वर्षांपूर्वी बुवांच्या घरांत तेव्हा जसं हलकं फुलकं वातावरण होतं, तसंच अजूनही आहे. सध्या एका वेळी किमान ८-१० विद्यार्थी शिकायला असतात. सुरवातीला बुवा बंदिशीच्या अंगानं अगदी थोडक्यात गाऊन रागाचं वातावरण निर्माण करतात. विलंबित ताल बहुतेक वेळा तिलवाडा किंवा क्वचित कधी झुमरा असतो. राउंड-रॉबिन सेशन सुरु होतो. प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपापल्या कुवतीप्रमाणे आलाप, बोल, सरगम, ताना म्हणत असतो. बुवांना उपज मिळायला काहीही trigger पुरतो. प्रत्येक विद्यार्थी जे काही गातो त्यातून बुवांना काही ना काही उपज मिळते. ( पिंडात एखाद्याला ब्रह्मांड दिसते ना, तोच प्रकार !!) कुठल्याही मात्रेवरून सुरु होऊन, बुवा बोलांचे वेगवेगळे प्रकार करून लीलया सम गाठतात. लग्नामध्ये मुलीला मामा बोहल्यावर आणण्यापूर्वी उपस्थित जनांमध्ये जसा सस्पेन्स होतो, अगदी तशीच हुरहूर बुवा सम गाठण्यापूर्वी निर्माण करतात😄. दर २-३ आवर्तनांनी बुवांचं संगीत किती परिपक्व, घराणेदार आणि श्रीमंत आहे याचं दर्शन घडतं. जाताजाता वरच्या सा पासून खालच्या सा पर्यंत खाली येताना गुरुत्वाकर्षणाचे तत्व बुवा सांगतात. तसेच, बोल करताना शब्दाचे उगीच तुकडे करू नयेत हा धडा आम्ही शिकतो (उदा.  मनभावन हा एकच शब्द आहे त्यामुळे मन आणि भावन असे दोन शब्द गाताना विलग करू नयेत). बंदिशीतील ''कासे कहूँ'' ह्या (प्रश्नांकित) शब्दांचे बोल करताना पूर्णविराम येऊ नये, काय केल्यावर क्लासिकलचे नाट्यसंगीत होते, आलापीतील Punctuation किती महत्वाचे किंवा अमीरखां साहेबांची सरगम कशी असायची, अशा एक ना अनेक ज्ञानमूलक गोष्टी बुवा आम्हांला प्रात्यक्षिकासहित सांगतात. जिया मानत नाही ह्या यमन रागातील बंदिशींमधील निसंदिन पलछीन हे शब्द र्हस्व आहेत, त्यामुळे बोल करताना ते दीर्घ म्हणू नयेत असा सल्ला ते विद्यार्थ्यांना  देतात आणि अर्थातच तसं स्वतः तिथल्या तिथे demo करून दाखवतात. तसंच गाताना बोल करताना जे वाक्य बोल करायला घेतलंय ते पूर्ण करायचं, हा कटाक्ष ते पाळतात. अर्थात हे सगळं सौंदर्यपूर्ण पद्धतीनंच हे करायचं. गुरुजींच्या कृपेने आणि त्यांनी गेल्या ३ वर्षांत केलेल्या गायकीच्या संस्कारांमुळे पूर्वीची भीती जाऊन अलिअलिकडे मी निदान बोल-बनाव करायचा निदान प्रयत्न तरी करतो. शास्त्रीय संगीतातील सौंदर्य व्यक्त करण्यासाठी 'बोल' हे एक सुंदर माध्यम आहे.  A musicologist Rajiv Nair in his book states that "A singer focuses on the melodic possibilities that can be unleashed using the vowel and phonemic possibilities in words and clusters of well-chosen phrases from the bandish". [Nair, R. (2007). A rasika’s journey through Hindustani music (p. 19)]. बोलाचे शब्द वापरून आलाप, लयकारी आणि तानक्रिया असे तिन्ही गड सिद्ध गायक सर करू शकतो.  अरुण कशाळकर गुरुजींइतके सुंदर बोल क्वचितच ऐकायला मिळतात. 'शब्द ' त्यांना कमालीचे वश आहेत. कुमारजींना जसा राग समोर दिसे , त्याप्रमाणे बंदिशीतला एखादा नादमय शब्द बुवांना चारी बाजूने दिसतो. मुख्य म्हणजे बोलांची लयकारी करताना सुद्धा ते शब्दाला जरासुद्धा दुखवत नाहीत. शब्दांच्या नादमयतेचे त्यांना विशेष ज्ञान आहे. पण ते शब्दात पकडणे खरोखरच अवघड आहे. 

बोल कसे करायचे, हे शिकताना काय काय गमती जमती होतात क्लासमध्ये. कधी कधी विद्यार्थी बोल करायला शब्द निवडतो, पण त्याचा लहेजा त्याला नीट ठेवता येतोच असे नाही आणि परिणामी गाणे तिथेच थांबू शकते. कधी कधी नीट प्लँनिंग आणि रियाज नसेल, तर बरेच शब्द समेपूर्वी गायचे शिल्लक राहतात आणि समेवर यायला घिसडघाई करावी लागते. परिणामी गाण्यातील सौंदर्य नष्ट होते. पण आमचे बुवा मुद्दाम urgency निर्माण करूनही समेपूर्वीची जागा अतिशय सौंदर्य पूर्ण पद्धतीने भरून काढतात.  एक गंमतशीर किस्सा सांगतो. एकदा गुरुजींनी क्लासमध्ये मारू बिहागातील 'परी मोरी नाव मझदारा रे' ही बंदिश घेतली होती. गुरुजी अतिशय सोप्या पद्धतीने शब्दांना गोंजारत बोल करत होते. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी जमेल त्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करीत होते. माझी टर्न आल्यावर बोल कसे करायचे, ह्या विवंचनेत मी होतो. पहिले तीन शब्द बोलांसाठी सोपे जात होते. पण ' मझदारा' शब्द काही केल्या नीट बसत नव्हता. एव्हढ्यातच, तिथे बसलेल्या एका नवख्या मुलीने म्हणायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे तिने तर 'मझदारा ' ह्या शब्दानेच गायला सुरुवात केली व व्यवस्थित बोल पूर्ण केले. मी एकदम चकितच झालो. प्रत्येक गाणाऱ्याचा पिंड वेगळा असतो आणि त्याचे पोषण करण्याची अद्भुत शक्ती आपल्या संगीतात आहे, ह्याची जाण गाणाऱ्याने आणि श्रोत्यांनी जरूर ठेवावी. 

बुवांच्या विचारात सुस्पष्टता आहे; मग ती गायकीच्या संदर्भात असो, बंदिशींच्या संदर्भात असो, किंवा रागविचाराच्या बाबतीत असो. रागांच्या छटा बारीक बारीक गोष्टींनी कशा बदलतात, ते अरुणकाकांकडून शिकावं. छायानट रागात 'सारेगमप' असे न घेता 'सासारेगमप' किंवा 'साsरेगमप'असे घेतल्याने तो राग अधिक सिद्ध होतो किंवा छायानटाचे सौंदर्य अधिक खुलते. तसेच ह्याच रागात ग म निs ध पs असे नुसते न घेता रे ग म निs ध पs असे घ्यावे. बंदिशींसारखी रागाचीही  एक चाल असते व ती गवयाने बदलू नये असे ते सांगतात. राग-वाचक फ्रेजेसचे इथे अनन्यसाधारण महत्व ते अधोरेखित करतात. उदा. मारू बिहाग रागात अवरोहमध्ये 'सा नि ध प' असं व्याकरणदृष्ट्या चालत असलं, तरी आलापी करताना "ग म प नि सा(नि)धsप" असं गायचं किंवा वाजवायचं ( जरी तनकारीसाठी सानीधप असं चालू शकतं).  मुलतानीमध्ये नी सा म् प S असे सरळ घेण्यापेक्षा नी सा म् प S असे घेतल्याने राग अधिक परिणाम साधतो. तसेच शंकरासारख्या रागांत ताना, लयकारी किंवा सरगम करताना रागाचे चलन कायम ठेवून गंधार -पंचम-निषादाची पुनरावृत्ती केल्यास राग अधिक गहिरा होतो, याचा प्रत्यय ते शिकवताना स्वतः गाऊन विद्यार्थ्यांना देतात. हे सगळं गळ्यांत थोडंफार रटवुन बसवायचं असतं हे खरंय.  याचा अर्थ क्रिएटिव्ह गाऊ नका असा होत नाही.व्यासंगी गायक आणि संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नियमाच्या आजूबाजूला सांगीतिक शक्यता असतात. सरस्वतीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर असेल, तर ह्या शक्यता गायनातून प्रतीत होतात.  ललतमध्ये आलापी करताना रे नी ध म् म गs  असं सरळ गाण्याऐवजी  रे नी म् ध s म्  गs असं घ्यावं. खरं म्हणजे 'बिभास' हा काही माझ्या फार आवडीतला राग नाही. पण गुरुजींनी एके दिवशी असा काही शुद्ध धैवताचा बिभास सांगितला, कि मी ह्या रागाच्या प्रेमातच पडलो. माझ्यात एकदम १८० अंशाने बदल झाला. कोमल रिषभ असलेला, पण देसकार अंगाने गायलेल्या ह्या रागाचा flavor काही औरच होता. एकदा प्रत्यक्ष किशोरीताईंना मी " ताई, आपल्याला एखादा राग आवडत नाही म्हणजे काय होतं नक्की ??" असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या " आपल्याला राग आवडला नाही , म्हणजे तो राग समजला नाही असं समजावं " असं मार्मिक उत्तर दिलं होतं. त्याची आठवण आली इथे. त्यामुळे रागाची 'उकल' ही बरेच वेळा गुरुनेच करून द्यावी लागते. ते कसं, हे कळण्यासाठी तुम्हाला आधी बुवांचं गाणं ऐकावं लागेल.

त्यानंतर मग त्या त्या रागातील काही बंदिशींची उजळणी होते. त्यातल्या बऱ्याच बंदिशीं स्व-रचित असतात. या ‘मेन कोर्स’ला जोड असते ती बुवांच्या मार्मिक नर्म-विनोदाची. बंदिशीतले “अतई रसाल…”  हे शब्द काही लोक “अत ईरसाल” असे म्हणतात, अशी कोटी करून बुवा हशा पिकवतात. सम गाठण्यासाठी एखादा आलाप उगीचच कुणी लांबवला कि बुवा विनोदाने म्हणतात "पतंगाची शेपटी किती लांब असावी यालाही काही प्रमाण आहे". स्वरांची नुसती भेंडोळी करू नयेत. तसे केल्यास गावाला जाताना घाईघाईत बॅगेत सामान कोंबल्यासारखे ते दिसते, असा शेराही ते मारतात. गुरु-विद्यार्थ्यांचा हा संगीतमय संवाद अगदी खेळीमेळीने चालत असतो. प्रत्येक क्लास हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सौ. धनश्रीकाकूंचा फर्मास चहा आल्याशिवाय संपत नसतो. हे सगळं जवळून अनुभवायला मला मिळतय, हे माझे भाग्य ! त्यामागची बुवांची तपश्चर्या जाणून घायची मला उपरती झाली नसती तरच नवल ! बुवांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं ही आयती संधी मला चालून आली……  

बुवा मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या छोट्याश्या गावचे !  बुवांना लहानपणीच संगीताची आवड लावण्याचे श्रेय त्यांच्या वडिलांचे. वडील ( कै. ना द. कशाळकर) व्यवसायाने वकील असले, तरी त्यांना संगीताचे उत्तम अंग होते. त्यांच्या सर्व मुलांनी संगीत शिकलेच पाहिजे असा त्यांचा आग्रहच होता व त्यासाठी त्यांनी अगदी दूरदृष्टीने प्रयत्न केले. घरी अगदी भर थंडीतही नियमितपणे पहाटे पाच साडेपाचला ते सर्व मुलांना उठवायचे आणि समोर चहा ठेवून बाबापुता करीत अंथरुणात ते ब्लॅंकेट मुलांच्या अंगावर घालून म्हणायचे "हं , आता सा लावा". मग जसजशी मुले जागी व्हायची, तसा पुढील संगीताभ्यास दिवसभर होत असे. सर्व भावंडांना शिकवायला कोणी संगीत शिक्षक वगैरे न नेमता, स्वतःच संगीत शिकवीत असत. सुरवातीला गावातील मुले घरासमोरून जाताना " आ sssss " असे करून कशाळकरांच्या मुलांना चिडवत. पण या सगळ्या निग्रही मुलांचे चित्त कधीच विचलित झाले नाही व त्यांनी आपले विद्यार्जन चालूच ठेवले. बुवांना विशारद होईपर्यंतचे सगळे मार्गदर्शन वडिलांकडून मिळाले. बुवांना संगीताचे इतके आकर्षण होते कि, कॉलेजला जाण्याच्या आधी ते  विशारदही झाले. स्वतः शिकविण्याबरोबरच वडील मुलांना प्रोत्साहनही देत असत. वयाच्या तेराव्या वर्षी मध्य प्रदेशप्रदेश सरकारने घेतलेल्या एका खुल्या स्पर्धेत पहिला नंबर आल्याबद्दल खुष  होऊन वडिलांनी बुवांना मनगटी घड्याळ त्या काळी बक्षीस दिले होते, ज्याचे त्यांना आजही अप्रूप आहे.

मॅट्रिक झाल्यावर मात्र बुवांना कॉलेजसाठी यवतमाळ येथे जावे लागले. “आमची ग्वाल्हेर घराण्याशी जणू काही जन्मापासूनच नाळ जोडलेली होती” असं बुवा अभिमानाने सांगतात. त्याची सुरवात यवतमाळला श्री. डी. व्ही. पणके गुरुजी ( जे कृष्णराव पंडितांकडे शिकले होते) यांच्याकडे झाली. अलंकार परीक्षेचा अभ्यास त्यांच्याकडे सहजगत्या झाला. ही  गोष्ट आहे १९५८-६२ सालची. याच कालावधीत त्यांच्या BA च्या परीक्षेसाठी यवतमाळला श्रीमती सुमती मुटाटकर आल्या होत्या . त्यांनी बुवांचा गाण्याकडे असलेला कल बघून आणि परीक्षेतील त्यांचे गाणे ऐकून, आग्रेवाले विलायत हुसेन खां साहेबांकडे गाणे  शिकण्याची आपण सगळी सोय करु असं सांगितलं. पण दुर्दैवाने तसं व्हायचं नव्हतं, कारण लगेचच्या मे महिन्यात खांसाहेब दिवंगत झाले (१९६२)आणि बुवांचं सोनेरी स्वप्न भंग पावलं. ( असं असलं तरी पुढे जाऊन अरुणकाकांनी प्राणप्रियांच्या बंदिशींवर प्रबंध लिहून संगीताचार्य हे बिरुद प्राप्त केले. ह्याला म्हणतात श्रद्धा !!) असो !! बुवांनी BA ची पदवी प्राप्त केली. संगीत अलंकार हे बिरुदही मिळविले. BA झाल्यामुळे नागपूर AIR मध्ये नोकरी मिळाली. या नोकरीमुळे सुधीर फडके, पं. जितेंद्र अभिषेकी, डॉ. प्रभाताई अत्रे, संगीतकार राम फाटक अशा गुणवंतांचा थोडाफार सहवास लाभला. कै राजाभाऊ कोगजे यांच्याकडे गायन शिक्षणही झाले. एकदा पं गजाननबुवा जोशी नागपूरला रेडिओला Inspection साठी आले होते तेव्हा त्यांचीही जुजबी ओळख झाली. असे असले, तरी रेडिओवरील नोकरीमध्ये बुवांचे काही मन लागेना. मुंबईला गेल्याशिवाय आपले भले होणार नाही, असे बुवांना कुठेतरी जाणवले. अर्थात त्यांनी रेडिओची नोकरी सोडली आणि खटपट करून मुंबईच्या AG ऑफिस मध्ये नोकरी मिळविली.

मुंबईला आल्यामुळे राहण्याच्या जागेचा प्रश्न आला, तेव्हा त्यांच्या एका नातेवाईकाने आपल्या बहिणीचा डोंबिवलीचा पत्ता देऊन तिच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून रहावं अशी व्यवस्था केली. जणू काही नियतीने दिलेल्या ह्याच संधीची ते वाट पाहत होते. कारण दुसऱ्याच दिवशी ते गजाननबुवांचा पत्ता शोधून त्यांच्याकडे गेले. आणि एका दिवसातच नवल घडलं..... !  त्यांचा छायानट प्रत्यक्ष ऐकला आणि  'करत हो' हा मुखडा घरी परत येताना म्हणण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते अजिबात जमेना. एकीकडे गजाननबुवांची गायकी किती बिकट होती याचा त्यांना प्रत्यय आला; तर दुसरीकडे अगदी योग्य ठिकाणी ते पहिल्याच दिवशी येऊन पोचले होते ह्याची त्यांना खात्री झाली. गजाननबुवांचं मोठेपण जाणून घ्यायची जबरदस्त उर्मी मनांत नेहमीसाठी निर्माण झाली होती. अर्थातच, त्यांनी  गजाननबुवांकडेच गाणे शिकण्याचे निश्चित केले..!!

पहिले सात आठ महिने गजाननबुवांनी त्यांना प्रत्यक्ष काहीही शिकवलं नव्हतं. नोकरी व्यतिरिक्त उपलब्ध वेळात त्यांच्याकडे जायचं, तंबोरा धरायचा, त्यांचं गाणं मनसोक्त ऐकायचं आणि परत यायचे एव्हढेच  काम होते. पण श्रवणातून जे संगीताचे संस्कार मनावर होतात, ते मात्र यावेळी झाले असावेत. तरीही प्रत्यक्ष गुरुमुखी पद्धतीने विद्या घेतल्याशिवाय नुसत्या श्रवणाने नेणिवेत आलेलं गाणं जाणिवेत येत नाही. (“Artist acquires a knowledge by means of abstractions and needs the power to bring his widest metaphysical abstractions into his immediate, perceptual awareness”- A relevant QUOTE of Ayn Rand). साताठ महिने चिवटपणा सिद्ध केल्यावर मात्र गजाननबुवांनी त्यांना रीतसर तालीम द्यायला सुरवात केली. ग्वाल्हेरच्या नैसर्गिक लयीत कधी 'येरी लाल मिले' तर कधी ' हजरत तुर्कमान ' सारखे ख्याल शेकडो वेळा सांगून त्यांच्याकडून रटवून घेतले. लय बांधून रागविस्तार करणं, ख्याल भरणं जेव्हा सुरु असतं, तेव्हा त्याच लयीत गतिमानता प्राप्त व्हावी म्हणून दोन तीन लयींचा उपयोग कसा करायचा हे गजाननबुवांनीं शिकवलं. एखादं आवर्तन जर नीट आलं नाही, तर ते पुन्हा पुन्हा घोटून घेऊन ते नीट करायचे. गजाननबुआंकडे ५-७ वर्षे शिकल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच अरुणकाकांना पं. बबनराव हळदणकरांकडे पाठवावे हा योगायोग नव्हे काय ? कदाचित त्यांना सुरुवातीपासूनच आग्रा गायकीच्या खाणाखुणा कुठेतरी या आगळ्या वेगळ्या शिष्यात दिसल्या असाव्यात. नाहीतरी आग्र्याच्या बंदिशी, राग, मांडणी, बोलबाट, समेवर येण्यातली हुकुमत इत्यादींची मोहिनी या शिष्यावर पडली होतीच. Law of attraction... दुसरे काय ???

पं. बबनरावांकडे सुरु केलेल्या ‘’श्री’’ रागाचा प्रथमाध्यायच बुवांच्या बाबतीत कळसाध्याय ठरला.  झपतालातील ‘गरीब नवाज…’ह्या श्रीच्या बंदिशींतून शास्त्रीय संगीतातील सर्व संकल्पनांची क्रियात्मक अनुभूती मला मिळाली’’ असं अरुणकाका सांगतात. बोलबाट, बोलबनाव करीत आवर्तन भरत असताना जागा शिल्लक असल्यास ती तिहाईंनी कशी भरून काढायची, शब्दांची ओढाताण न होऊ देता, तोल सांभाळून नेमक्या उच्चारानं ओळ कशी संपवायची, आग्रा गायकीतील अठरा अंगातील कुठली अंगे कशी, कुठे वापरायची अशा अनेक गोष्टींची यथायोग्य तालीम बबनरावांकडून त्यांना मिळाली.  स्वतः बबनराव एक महान गुरु होते तरी, आपल्या शिष्याचं योग्य ठिकाणी मोकळेपणाने कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. त्यांनी कितीतरी जणांना  सांगितले होते कि जर ''खेमकल्याण'' राग तुम्हाला ऐकायचा असेल, तर तुम्ही अरुणचा ऐका. गुरूंनी केलेलं हे कौतुक अरुणकाकांनी 'मर्मबंधातील ठेव 'म्हणून जपलेले आहे. संगीतभूषण कै.रामभाऊ मराठे यांचीही तालीम काही काळ अरुणकाकांना मिळाली. तसेच जयपूर घराण्याचे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांनादेखील ते  गुरुस्थानी मानतात.

अरुणकाकांनी बंदिशी करायला सुरवात केली, ती गुरुवर्य गजाननबुवांच्या आशीर्वादानेच ! त्यांना काव्याची तसेच कविता करण्याचीही आवड आहे. (एकदा शिकवणीनंतर त्यांच्या डायरीतल्या काही निवडक कविता त्यांनी मला मुडमध्ये येऊन वाचून दाखविल्या होत्या, त्या खूपच आशयघन होत्या ). अलीकडे त्यांनी रचलेल्या साधारण दीडेकशे बंदिशींचा एक संग्रह CD सहित प्रकाशित झाला आहे, त्यातील बहुसंख्य बंदिशी खूप श्रवणीय आहेत. मी बुवांकडे गाणं शिकायला आलो, तेव्हापासून त्यांच्या बंदिशींच्या प्रेमातच पडलोय. सहसा बंदिश आकर्षक करण्यासाठी जोरकस शब्द योजना, तालातील आघात, अनाघात-अतीत, विराम, गतिमानता यासारख्या खुब्या वाग्गेयकार वापरत असतात. पण बुवांच्या जवळजवळ सगळ्याच बंदिशींचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे 'सात्विक आकर्षकता'' हे होय. त्यात भडकपणा नावाला सुद्धा नाही. (एक प्रकारे बुवांच्या विवेकी पण रसिक व्यक्तिमत्वाचे त्यांच्या बंदिशींमध्ये प्रतिबिंबच आहे, असंही म्हणता येईल). ही गोष्ट वाटते इतकी सोपी नाही. बुवांच्या बंदिशींची पहिली ओळ एक दोनदा गायली कि त्याचा छंद व्हायला वेळ लागत नाही. बऱ्याचशा बंदिशींची नुसती पहिली ओळ जरी म्हटली , तरी तो राग म्हणायला आपली तबियत लागते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे उत्तम बंदिशीचे लक्षण आहे.  रागवाचक स्वराकृती, रागभाव, नादमधुर शब्दयोजना, आमद इत्यादी उत्तम बंदिशींचे निकष त्यांच्या रचनांमध्ये आहेतच, पण सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या पुष्कळ गोष्टी बुवांच्या कित्येक बंदिशींमधून सहजपणे प्रतित होतात, ज्यांना बुवांच्या आगळ्या वेगळ्या प्रतिभेचा स्पर्श आहे. जाता जाता वानगीदाखल काही उदाहरणे सहज देण्यासारखी आहेत. 'बसंतमुखारी'तील बंदिशीत भवानी देवीविषयी शारण्यभाव दाखवताना अनुप्रासाचा सम्यक उपयोग बुवांनी केला आहे.  बसंत बहारातल्या ‘आयी बन मे’ या बंदिशीत ममपमप ह्या विरळा स्वरसंगतीने ओळीची सुरुवात करून, ओळीतील शेवटचे अक्षर शुद्ध मध्यमावर अगदी देवाला फूल वहावे इतक्या अलगदपणे त्यांनी ठेवलंय. एरवी बंदिशींची वानवा असलेल्या राग ‘बहादुरी तोडी’मधील प्रासादिक शब्दयोजना असलेली बंदिश ‘शिवशंकर गंगाधर हर’ही गवयाला अंतर्मुख करते  तसेच या रागाचा आवाका सिद्ध करते. त्यासाठी वापरलेला आडा चौताल हा भगवान शंकरांच्या नृत्याचेच जणू प्रतीकात्मक दर्शन घडवतो. केदार रागात बुवांच्या ‘गुंदे लावोरी मालनीया’ आणि ‘मालनीया गुंदे लावोरी’ या बंदिशी जुळ्या बहिणींसारख्याच, पण वेगवेगळ्या तब्येतीच्या आहेत. एक बंदिश आलापी करण्यास गवयाला उद्वयुक्त करते तर दुसरी तनकारी करण्यासाठी.  मधुवंतीतील "अब मैका जाने दे " हि भावपूर्ण बंदिश श्रुंगाररस आणि विरहरस यांचा मिलाफ तर आहेच, पण ‘बालमवा’ हा शब्द वरच्या षडजावर ठेवल्यामुळे प्रियतमाविषयी केलेल्या तक्रारीचा सूर त्यामुळे तीव्र झाला आहे. (मला सांगा कि बालमवाचं हे प्रेयसीशी खोटं बोलणं चांगलं आहे का हो ..?? पण हे जेव्हा सरांच्या वेगवेगळ्या बंदिशींतून "झूठी बतिया"च्या स्वरूपात समोर येतं, तेव्हा मात्र मन उल्हसित करून जातं). यमन मधील ‘दरस दिजो मोहें’  हि त्यांची बंदिश 'नयने लाजवीत' ह्या मराठी नाट्यगीतातुन प्रेरणा घेऊन झाली आहे. रामनवमीला बुवांनी या रागाची खासीयत आम्हाला सांगितली. हे एक यमन रागाचे वेगळे रूप आहे असं गुरुजी सांगतात. त्यात यमन-कल्याणाबरोबरच खेम कल्याण, जेमिनी कल्याण या रागांचा आभास होतो. काही विशिष्ट्य स्वराकृती घेऊन म्हटल्यास ही बंदिश छान खुलते.  उदाहरणार्थ ..ध नी प , प s ध नी सा, ध नि स ग रे, नि रे म् ग प प म् ग म ग रे ग नी रे सा. बिहाग रागात आपले शास्त्र रिषभ धैवताचे अल्पत्व सांगते. पण बुवांच्या ' पनघट की गैल' ह्या बंदिशीत 'बाट' आणि रसदास ह्या दोन शब्दावर रिषभाला त्यांनी एक वेगळेच रूप देऊन स्वरांचा यमक साधलाय.  बुवांच्या एक शिष्या सौ. निलीमा करमळकर यांनी तर बुवांच्या काही बंदिशींतील प्रेयसींची तुलना साहित्यातील वासकसज्जा, स्वाधीनभर्तृका ...आदी अष्टनायिकांशी केली आहे. अशा ह्या विविध पैलूंच्या बंदिशी सादर करण्यासाठी आघाडीच्या कलाकारांनी जरूर घ्याव्यात असं वाटतं.

औंध संगीत महोत्सवासाठी घेतलेल्या मुलाखती दरम्यान शास्त्रीय संगीताच्या भवितव्याविषयी काही प्रश्न विचारले असता, त्यांनी काही उद्बोधक विचार मांडले ते असे - "चांगली कला हि मूठभर लोकांकडूनच सांभाळली जाते. पूर्वीच्या काळी शिष्याला सतत गुरूच्या सहवासात राहूनच विद्या ग्रहण करावी लागे.  गेल्या २५-३० वर्षात विविध कारणांमुळे जीवन खूप धकाधकीचं झालं आहे.  त्यामुळे सतत गुरूच्या सहवासात राहणे शिष्याला शक्य नसते. पण त्याचबरोबर इतर सोयीदेखील खूप वाढल्या आहेत. हजार हजार तासांचे संगीत आज एका छोट्याश्या पेन ड्राइव्ह वर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे, जे पूर्वी नव्हतं. त्याकाळी, एखादी छोटी बंदिश हवी असेल तरी ती गुरूकडून किंवा अन्य कुठूनही मिळविण्यासाठी नाना खटपटी कराव्या लागत. आजच्या युगात तांत्रिक प्रगतीने कितीतरी प्रश्न सहज सोडवलेले आहेत. संगणक, Wi Fi, यू ट्यूब् , रेकॉर्डिंग, साउंड सिस्टिम्स अशा अनेक साधनांचा आणि माध्यमांचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांनी करून घेतला पाहिजे. आपलं गाणं अधिक कसदार कसं करता येईल ते बघितलं पाहिजे. आपले संगीत हे 'कष्टसाध्य'च आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे रियाजाची आवश्यकता कधीच कमी होत नाही. तो करावाच लागेल. त्यासाठी कमालीचा प्रामाणिकपणा व संयम हवा. चांगल्या कलेविषयी आदर तसेच शिक्षणाची बूज राखायला हवी. आजकाल सगळ्यांचा कल चकचकीतपणाकडे आहे. धंद्यासाठी आजकाल केलं जाणारं फ्युजनवजा संगीत आणि आपल्याला करायचं असलेलं शास्त्रीय संगीत हे वेगळे आहे, ह्याची स्पष्ट जाण असली पाहिजे ठेवता आले पाहिजे. या सगळ्या विचारांचा व साधनांचा योग्य ताळमेळ घातल्यास  शास्त्रीय संगीताचे संवर्धन नक्कीच होऊ शकते. फक्त योग्य प्रयत्नांची आवश्यकता मात्र आहे ”.

आपल्या संगीत कारकिर्दीत अरुणकाकांनी संगीतातले अनेक प्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी , नाट्यसंगीत , गझल हे गानप्रकार देखील ते खूप रंजकतेने सादर करू शकतात. एव्हढेच काय, पण यवतमाळला असताना त्यांनी गीत रामायणाचे अनेक कार्यक्रम सादर करून खूप वाहवा मिळाली. कै. विद्याधर गोखले यांच्या संपर्कात आल्यामुळे काही ठिकाणी अभिनय नैपुण्यही त्यांना दाखवता आले. अरुणकाका सर्व भावंडांमध्ये ज्येष्ठ !! त्यांना इतर भावंडे 'बाबा' म्हणतात. पद्मश्री उल्हास कशाळकर हे त्यांच्यापेक्षा १२-१३ वर्षांनी लहान. पुण्यातील मान्यवर आणि विद्वान संगीतगुरू डॉ. विकास कशाळकर हे देखील त्यांचे कनिष्ठ बंधू. कशाळकर ह्या आडनावाशी संगीताचा खूपच घनिष्ठ संबंध आहे. अरुणकाकांनी गुरुवर्य गजानननबुवांकडे जाऊन चोखाळलेली सोनेरी वाट अर्थातच उल्हासदादांनीही स्वीकारली. अजूनही काही भावंडांना मुंबईत स्थायिक होण्यासाठी अरुणकाकांनी सर्वतोपरी मदत करून ज्येष्ठ बंधूचे कर्तव्य आनंदाने पार पाडले. 

बुवांच्या या सगळ्या तपश्चर्येला जवळजवळ अर्ध्या शतकाची साथ आहे, ती काकूंची म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी सौ. धनाश्री कशाळकर यांची !! कलाकाराशी संसार करणं हे वाटतं तितकं  सोपं नाही. कलाकाराची पत्नी ही पडद्या मागच्या कलाकारासारखी असते. बुवांचा मुड सांभाळणे ( जरी बुवा फार काही मुडी नसावेत), घरी येणाऱ्या कलाकार तसेच शिष्यवर्गाची उठबस करणे, कार्यक्रमांची तयारी, प्रवास आणि नेटका संसार अशा एक ना अनेक गोष्टी धनश्रीकाकूंनी नेमस्तपणे आणि समर्थपणे पेलल्या आहेत. बुवांसारख्या महान कलाकार आणि गुरूचे व्यक्तिमत्व एका लघुलेखात रेखाटणे केवळ अशक्यप्राय आहे. त्यासाठी एखादा चरित्रग्रंथच लिहावा लागेल. ५ जानेवारी २०१८ रोजी बुवांना वयाची पंच्याहत्तरवर्षे पूर्ण झाली.  त्यानिमित्त विद्यार्थीवर्गाने १९ मे २०१८ रोजी मुलुंड येथे एक सुंदर अमृतोत्सवी कार्यक्रम केला. प्रख्यात व्हायोलिनवादक पद्मश्री डी. के. दातार यांच्या हस्ते बुवांचा सत्कार समारंभ झाला.  गुरुजींना सर्व रसिक व शिष्यवर्गातर्फे मी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो.
जीवेत शरदः शतम् !!

Comments