Skip to main content

II पितृदेवो भव .. II




II पितृदेवो भव ..  II


अत्ताच मी जुन्या मोबाइलमधले काही SMS बघत होतो. त्यांत बाबांच्या पोटाच्या ऑपरेशन संदर्भातील, सुचित्राने त्यावेळी मला पाठविलेले २ मेसेज पाहिले . पहिला मेसेज होता "Operation started" आणि दुसरा होता "operation successful ". मी दुबईला असताना हे सगळं अचानक घडलं. आदल्या दिवशी ऑपरेशन झाल्यावर लगेच मी रजा घेऊन आलो. पण बाबा ICU त होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर जास्त थांबता यायचं नाही. पण शस्त्रक्रिया करणारे डॉ. पटवर्धन  म्हणाले वयाच्या मानाने speedy recovery आहे. आम्ही निर्धास्त झालो. पण.... नंतर मात्र अनाकलनीय घडलं. रात्री १०.३० ची वेळ. आता थोड्याच वेळात झोपाझोप होणार होती. बाबा ICU त असल्याने ४ थ्या मजल्यावर आणि आम्ही एक रूम घेतली होती ती पहिल्या मजल्यावर होती. मी झोपण्यापुर्वी बाबांना भेटायला वर जाणार, एव्हढ्यातच मला निरोप आला कि वर बोलावलंय तुम्हाला ताबडतोब. मी अक्षरशः स्प्रिंट मारून वर आलो. बाबांना खूप वर्षांनी दम लागला होता. ऑक्सिजन आणि नेब्युलायझरचा मारा सुरु झाला. खोकल्याची उबळ आली म्हणून बाबांनी ऑक्सिजन मास्क बाजूला करून, कफ काढण्यासाठी बाजूचे पॅन  वापरले.  जे काही मी पाहिलं, त्याने काळजात चर्रर्र झाले. कफातून रक्त पडू लागले होते. मला काहीतरी विचित्र घडणार याची चाहूल लागली. त्याही परिस्थितीत बाबा म्हणाले "मला वाटलंच कि असं होणार"( ते नेहमीच सर्जरीच्या विरुद्ध होते ). पहिल्या मजल्यावरच्या नेहमीच्या औषधाच्या पाउचमध्ये Tedral SAची गोळी ठेवली होती, ती बाबांनी मला आणायला सांगितली. मी घेऊन आलो. पण गोळी घेऊनही उतार पडेना. ह्या परिस्थितीत ICU सोडायला मी तयार नव्हतो.  कारण आत फक्त अनुनभवी housemen होते. परंतु मग पॅनलवरचे डॉक्टर आले. त्यांनी मला जबरदस्तीने बाहेर काढले व पेशंटचा ताबा घेतला. पाठीला छातीला मसाजिंग केलं गेलं, पण उपयोग झाला नसावा. व्हेंटिलेटर लावल्याचे कळले. पण सगळं व्यर्थ ठरत होतं. मी हे सगळं दृश्य ICU च्या काचेतून पाहत होतो. मग मात्र पडदा सारला गेला आणि आतले काहीही दिसेनासे झाले. १५ मिनिटांनी फॉलोअप केला. डॉक्टर काही नीट बोलेनात. दम लागणे हे काही बाबांना नवीन नव्हते . कदाचित ऑपरेशन मुळे असेल, पण हे आक्रमण बाबांच्या शक्तीच्या पलीकडचं होतं, ते स्पष्ट दिसत होतं. आणि कदाचित लाखात एक केसमध्ये घडेल, ते नेमकं बाबांच्या  बाबतीत घडलं . Pulmonary Embolism हा माणसाचा शेवट करणारा आकस्मिक किंवा अपघाती आजार आहे. सहसा एखाद्या सर्जरीनंतर काही तासांच्या अवधीत एखादा सूक्ष्म रक्ताचा क्लॉट फुफ्फुसात शिरतो आणि मग मात्र सगळेच उपाय संपतात. ह्या पल्मोनरी एम्बोलिसमनेच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.   हा २६ जुलै २००७ म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस होता. विजेचा धक्का बसतो तसं मला झालं. मोजून १ तासात खेळ आटपला. त्यावेळच्या माझ्या मन:स्थितीचे वर्णन करणे केवळ अशक्य. काही आस नाही, भास नाही आणि बाबा आम्हाला सोडून गेले. मी दुबईला असल्याने त्यांच्याशी बरंच बोलायचं राहून गेलं होतं. आता राहिल्या फक्त आठवणी  ....!!


२६ जुलै २००७ हा दिवस वगळता बाबा गेलेयत् हे मनाला पटतच नाही. पण ते ह्या पोटाच्या ऑपरेशननंतर राहिले असते, तरी कदाचित त्यांचे उर्वरित जिणे हे वेदनामय झाले असते (ऑपरेशन करून काढून टाकलेला आतड्याचा ६ इंच गँगरिनस भाग डॉक्टरांनी दाखवला तेव्हा भीतीच वाटली). त्यापेक्षा सुटका बरी. एव्हढ्या एकाच समजुतीने आमच्या दुःखाचे थोडेफार निवारण थोडेफार होत होते. बाबांच्या अस्तित्वाचा गंध अजूनही असंख्य आठवणींच्या स्वरूपात आमच्याभोवती दरवळतोय. खरंच सांगतो, पण आजही असा कुठलाही दिवस जात नाही कि त्यांची आठवण येत नाही. जर कामात नसेन, तर मन हळवे होण्यापर्यंत मजल जाते. स्वप्नात तर अजूनही आठवड्याला एकदा तरी त्यांचे दर्शन होते. जन्मोजन्मीचे बंध असावेत कदाचित ! कधीकधी आपण काय करतो, यापेक्षा ते कोणासाठी करतो किंवा कशासाठी करतो हे महत्वाचे ठरते. आई-वडिलांचे अस्तित्व हे एखाद्या चित्राच्या कॅनव्हासप्रमाणे असते. त्या बिचार्या चित्राला कल्पनाच नसते कि आपण बोलतोय ते ह्या विशाल कॅनव्हासमुळे. पण चित्रकाराला ही कल्पना पाहिजेच. मी काही चित्रकार नाही. पण असतो, तर मात्र संपूर्ण चित्रातला एखादा तरी पॅच मी कॅनव्हास न रंगवता तसाच ठेवला असता, ....... just to acknowledge it's presence !! बाबांच्या आणि आईच्या जाण्याने आयुष्यातील एक महत्वाची प्रेरणा लुप्त झाली हेच खरे.

बाबांच्या माझ्या संदर्भातील असंख्य आठवणी पन्नास-एक वर्षांपासूनच्या आहेत आणि त्या मी व्यवस्थित स्मरणकुपीत जपल्यायत. मला 'नॉस्टाल्जिक' व्हायला आवडतं. Cherishing the memories कि कायसं म्हणतात ना हो, तसंच काहीसं. आज बाबांच्या अकराव्या स्मृतिदिनी नेमकं तेच मी करणार आहे. आमचे बाबा काही कुठल्यातरी क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे उद्योजक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ , कलाकार, साहित्यिक वगैरे नव्हते. 'सरळ मार्गाने जीवन जगणारा एक मध्यम वर्गीय गृहस्थाश्रमी माणूस' असं त्यांचं एका वाक्यात वर्णन होईल.  पण त्यांचं घरातलं 'वडिलपण' मला नेहमीच जाणवलं आणि  भावलं देखील. त्यांनी घराला 'छत्र' तर दिलेच ,आणि 'घरपण'ही दिले. त्यांना काय मिळालं आणि त्यांनी काय मिळवलं याची कथा पुढे येईलच. पण एव्हढे कष्टदायक आयुष्य असूनही त्यांची कशाविषयीच तक्रार नव्हती. तसेच नाहक अपेक्षांचे ओझे त्यांनी स्वतःवर आणि इतरांवर कधी लादले नाही. हे वाटतं तितकं सोपं नाही. मला तर तो एक योगच वाटतो. भल्याभल्यांना स्वतःच्या अपेक्षांना खीळ घालणं जमत नाही. आधीचे फळ पदरी पडले. कि लगेच पुढच्या फळाची अपेक्षा निर्माण होते. मुळात 'समाधान' हा बाहेरून दाखवायचा विषयच नाही. समाधान हे आत्मिक पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला हा भवसागर पार करुन समाधानाने जायचे असते.  मला वाटतं असं समाधान घेऊनच म्हणजे कुठलीच इच्छा मागे न ठेवता ते गेले आणि म्हणूनच ते मला मोठे वाटतात.


आम्ही चौघांनी एकत्र खूप मजा केली होती. आठवणींची सुरुवात आपण माझ्या लहानपणापासून करूयात. मी अगदी पाचेक वर्षांचा होईपर्यंत मी त्यांना रस्त्यातून चालताना कडेवर घ्यायला लावीत असे. कडेवर घेतल्यावर माझ्या मांडीवर रुपणाऱ्या त्यांच्या घड्याळाच्या पट्ट्याचा वळ उठायचा हेही छान आठवतंय. थोडा वेळ झाला कि मला तहान लागत असे. (विशेष करून आजूबाजूला रसवंती गृह किंवा माने कोल्ड्रिंक हाऊस असल्यावर तर हमखास). तृषा शांती झाल्यावर उर्वरित पायपिटीत मी रस घेत असे. हा प्रवास म्हणजे झावबाची वाडी, ठाकूरद्वार, खाडिलकर रोड, प्रार्थना समाज तर कधी कधी व्ही पी रोड ( किंवा बाबांच्या  परिभाषेत गिरगाव बॅक रोड ) आणि मग बॅक टु होम, असा असायचा. अधेमध्ये आमच्या आजोबांच्या (म्हणजे आईच्या प्रेमळ काकांच्या) खास वशिल्याने चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या मराठी साहित्यात हमखास सापडणाऱ्या सुप्रसिद्ध कुलकर्ण्याच्या हाटेलात बटाटेपोहे किंवा कांदाभजी यांचा अल्पोपहार असे ( तोही मागे राखून ठेवलेल्या खास पाहुण्यांसाठीच्या कक्षांत !). क्वचित कधी आम्हाला जपानी गार्डनला ( स. का. पाटील उद्यान) किंवा चौपाटीला घेऊन जायचे. गाडीवर भेळपुरी देखील खाल्लेली स्मरतंय. कधी कधी ठाकूरद्वारच्या 'सागर ड्रेसेस' मध्ये (किंवा धूतपापेश्वर बिल्डिंग मधल्या ड्रेसलँड स्टोअरमध्ये ) मला 'बाबा सूट' तर ताईला फ्रॉक खरेदी असे, त्याचे अप्रूप अजूनही आहे. ('बाबासूट' ही फ्रेज गेल्या ३०-४० वर्षात ड्रेस विक्रेते वापरत नाहीत. तसेच 'जर्किन' हा शब्द देखील कालबाह्य झाल्याचे दिसते). हे सगळे ड्रेस त्या वेळचे  Best in their own kind असे असत, हे महत्वाचे. पण ड्रेसचे सिलेक्शन मातोश्रींचे असे हे नक्की. आमच्या आईला  कपड्यांसाठी एक विशेष नजर देवाने बहाल केलेली होती. एकदम चुन चुनके कपडे आणायची ती आम्हाला. एकदा कौतुकाने गिरगावच्या Vanguard स्टुडिओमध्ये आमचा दोघांचा एक छानसा फोटो काढल्याचे आठवते. प्रचंड हौसेने नवीन घेतलेला बाबासूट आणि बूट मोजे घालून मी ह्या फोटोत उभा राहिलोय. पण विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांचा फोटो का काढला नव्हता, ते त्यांना आणि आईला विचारायचेच राहून गेले. बहुधा आमच्या हौसेसाठी त्यांनी स्वतःची हौस मारली असावी.  दर दिवाळीत बाबा स्वतः आकाशकंदील करायचे. ऑफिसातून येताना एक बांबू आणून नंतर कोयत्या सुरे घेऊन हाताला लागणार नाहीत अशा त्याच्या गुळगुळीत आधी कामट्या करायच्या.  कंदिलाचा सांगाडा बनवून मग त्यावर रंगेबिरंगी कागद चिकटवायचे. मग flagging ceremony सारखा कंदील १५ फूट वर जाऊन, आतला बल्ब प्रकाशित केल्यावर जो काही आम्हाला आनंद होई कि, आज HP चा नवीन लॅपटॉप आणल्यावरसुद्धा  एव्हढा आनंद होणार नाही . एकदा घरी लाद्या घालण्याचे काम सुरु असताना, बाबांनी आम्हाला सलग ३ दिवस रात्री 'yummy फिस्ट' टेंबे आहार भुवनात दिली होती, ती केवळ अविस्मरणीय होती. फाईव्ह स्टार हॉटेलातील सगळे बुफे त्यापुढे फिक्के ठरतात. आमच्या (म्हणजे माझ्या आणि ताईच्या ) कळत्या वयाच्या जरा आधीच, आई बाबांनी आम्हाला मंदारमाला, सौभद्र , मत्स्यगंधा, इथे ओशाळला मृत्यू , नटसम्राट, अकुलीना अशी काही नाटके दाखवली होती. सरस्वती चंद्र (ऑपेरा हाऊस), अपराध (मॅजेस्टिक), प्रपंच (मॅजेस्टिक),आराधना (रॉक्सी), कटी पतंग (रॉक्सी), जंजीर (इम्परीरीयल), ऑंधी (मेट्रो), अभिमान (न्यू एम्पायर), दोस्त (गंगा) हे त्यांच्याबरोबर बघितलेले सिनेमेही आठवतात. आमच्या संस्कारक्षम मनावर डिम्पलच्या बिकिनीचे विपरीत परिणाम होतील म्हणून कि काय, पण  बॉबी  मात्र आम्हाला दाखवला नव्हता. (नंतर मी IIT मध्ये ३ वेळा बॉबी पाहिला). बॉबी चित्रपट आणि काचेचा चंद्र हे प्रौढ नाटक मात्र त्यांनी दोघांनीच पहिले होते.  संगीत न शिकताही घरंदाज गायकी बाबांना पसंत होती. ब्राह्मण सभेत पं. अभिषेकी, धसवाडीत निर्मलाताई गोगटे, पारेख बिल्डिंगमध्ये ज्योत्स्ना मोहिले यांच्या मैफिलींना बाबांबरोबर गेल्याचे स्मरते. दर गणेशोत्सवात गिरगावातल्या सगळ्या गणपतींचे दर्शन घडवल्याशिवाय तो उत्सव पूर्ण होत नसे. ठाकूरद्वार, मुगभाट, निकदवारी लेन, केशवजी नायकाची चाळ वगैरे सगळी पायपीट करून तंगड्या गळ्यात याची वेळ आली, तरी "बाबा, भाजीवाल्याचा गणपती राहिलाय अजून " असे आम्ही त्यांना.स्मरण द्यायचो.

एकदा एक साकुरामारू नावाची जपानी सागरी पर्यटक बोट मुंबईमध्ये दाखल झाली होती. पर्यटकांना तिकीट लावून पाहण्यासाठी ही बोट काही दिवस खुली होती. बाबांनी आम्हाला अगदी कौतुकाने ही बोट पाह्यला नेले होते. आतून सजविलेली आलिशान दालने, विविध रेस्टॉरंट्स, देखणी प्रेक्षागृहे, तरण तलाव, विविध जपानी नृत्य प्रकार, ज्युडो कराटे प्रात्यक्षिके, जादूचे प्रयोग यांनी युक्त असलेल्या ह्या श्रीमंत बोटीने अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडले. आपल्याला भूलोकीचा स्वर्गच पाहायला मिळाला, अशी काहीशी समजूत आमची झाली होती. अलीकडे मी सहज वेब सर्च दिला तेव्हा ह्या साकुरामारू बोटीचे काही फोटो मला या लिंक वर पाहायला मिळाले.   (https://www.flickr.com/photos/worlddiscoverer/sets/72157646816697463/). आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. आता मुंबई पोर्ट ट्रस्टला लागूनच एक cruise टर्मिनल आहे आणि ते आणखी अद्ययावत होणार आहे असं ऐकलंय. ते काही असलं, तरी साकुरामारूची फाईल माझ्या मेंदूरूपी संगणकात अजरामर आहे आणि त्याचं श्रेय बाबांना आहे.

१९६६ साली हजारो नव्हे तर लाखो शोकाकुल लोकांच्या आणि अनुयायांच्या उपस्थितीत चंदनवाडीच्या दिशेने निघालेली स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांची अंतयात्रा झावबावाडीच्या कोपऱ्यावर मला खांद्यावर घेऊन बाबांनी दाखविल्याचे स्मरते. फ्लोरा फाउंटन , जिजामाता उद्यान , महालक्ष्मी मंदिर यांसारख्या लोकल स्थळांबरोबरच माथेरान, सातारा, महाबळेश्वर, रत्नागिरी, गणपतीपुळे , बंगलोर , म्हैसूर,  डहाणू ह्या ठिकाणी आई-बाबांबरोबर केलेले पर्यटन अविस्मरणीय  होते. आमच्या लहानपणी टिटवाळा-शहाड हि नेहमीच TWIN व्हिजिट असायची. टिटवाळ्याचा गणपती आमच्या देव्हाऱ्यात होता. त्याचबरोबर वल्लभ अवताराची एक तसबीर, लक्ष्मीची मूर्ती  आणि सरस्वतीची मूर्ती असे लिमिटेड देव आमच्या देवतार्जनात होते. बाबांनी फार कधी देव देव केलं नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा नेहमीच त्यांचे हात नमस्कारासाठी जोडले गेले. घरांतील नित्यपूजा कधीही चुकली नाही. गिरगावांत असताना वर्षातून एकदा तरी ते रजा घेऊन सोवळे नेसून गुरुचरित्राचे एक दिवस पारायण करीत असत. त्यात नंतर म्हणजे ठाण्याला आल्यावर खंड का बरं पडला ?? बहुधा तब्येतीच्या तक्रारीमुळे असावा. घराणे भिक्षुकांचे असल्याने त्यांना बरीच स्तोत्रे मुखोद्गत होती. त्यामुळे रोजच्या पर्वचेबरोबर आम्हाला मारुती स्तोत्र व गीतेच्या १५व्या अध्यायाची दीक्षा मिळाली. नंतरच्या काळात मी त्यांच्याकडूनच  गणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष आणि पुरुषसुक्त शिकून घेतले. दर वर्षी नाही, तरी अध्येमध्ये एखादी सत्य नारायणाची पूजा देखील घरी व्हायची. करंबेळकर गुरुजींवर तुमचा दांडगा विश्वास. अगदी विद्याताईंच्या लग्नातही तेच पुरोहित होते. प्रसन्न व्यक्तिमत्वाचे करंबेळकर भटजी स्वतःच्याच विनोदावर स्वतःच हसायचे, त्याची आठवण झाली. ठाण्याला आल्यावर त्यांची जागा जोशी गुरुजींनी घेतली. भटजींची निवड किंवा पसंती ही त्यांच्या मांत्रिक आणि तांत्रिक विद्वत्तेवर नाही, तर बाबांच्या comfort level तसेच ओळखीवर होत असे. बाबांनी निवडलेले हे सगळे भिक्षुक अंमळ जरा उदारमतवादी किंवा कमी कर्मठ असत. दाक्षिणात्य पद्धतीचे करडे (hardcore & inflexible) अध्यात्म आणि महाभिक्षुक बाबांना मानवणारे नव्हते. 


दर वर्षी सहसा आई, मी आणि ताई असे तिघेच आमच्या आजोळी ( म्हणजे मु पो सोनवडे, ता. संगमेश्वर ) उन्हाळ्यात निदान महीनाभर जायचो. पण बाबा  मात्र  आमच्याबरोबर क्वचितच कधी आले. असेच एकदा आम्ही सोनवड्याला निघालो असताना, मुंबई सेंट्रल स्थानकातच बाबांनी अगदी आयत्या वेळेला सोनवड्याला आमच्या बरोबर यायचे कबुल केले, त्यावेळी आमचा आनंद अगदी गगनात मावेना. आमची सगळी व्हिजीटच एका क्षणांत मंतरली गेली. काही दिवस सोनवड्यात राहिल्यावर ते त्यांच्या  मूळ गावी म्हणजे देवघरला गेले. घनदाट जंगल असलेले देवघर हे माणसांपेक्षा वाघांसाठी प्रसिद्ध होते.  नंतर भीत भीत का होईना, आम्ही देखील तिथे यायचे प्लॅन केले होते.  बाकी काही आठवत नाही फार, पण मुंबई - तुळसणी ह्या एस टी ने आम्ही एका अंधाऱ्या रात्री देवघरात पोहोचलो. मी निदान ३-४ मैल तरी सिनेमातल्या ओमपुरीसारखा दिसणाऱ्या धर्माभाऊंच्या खांद्यावरून आलो असेन. घरी पोचल्यावर कंदिलाच्या प्रकाशात आम्हां दोघांना घडलेले बाबांचे सुभग दर्शन हे कुठल्याही सिनेमातल्या हिरोच्या पहिल्या एन्ट्रीपेक्षा जास्त मोलाचे वाटले. “आता वाघ येऊ दे नाहीतर सिंह , आम्ही डरत नाही” अशी शूर मनोवस्था झाली. ( आम्ही यायच्या २ दिवस आधीच वाघ पडवीच्या बाहेर येऊनही गेला होता म्हणे. अय्यय्यो ....!! ) परत मुंबईला येताना खुद्द कंडक्टरच त्यांचा मित्र निघाल्याने, एरवी राज्य परिवहन मंडळाची असलेली एस. टी. ही आम्हाला आपल्याच मालकीची वाटू लागली. लहानपणीच्या भाबड्या समजुती पण किती रम्य असतात नाही ?? वडील प्रवासात आमच्याबरोबर असण्याचा आनंद अगदी पुरेपूर बसमध्ये भरून राहिला होता. एरवी मात्र ते बरोबर नसताना, संगमेश्वर - मुंबई हा आठ नऊ तासांचा प्रवास अगदी त्रासदायक वाटे. पण एकदा का बॉंबे सेंट्रल स्थानकात यष्टी शिरली, कि आम्हाला उतरवून घ्यायला आलेल्या बाबांच्या शोधार्थ आमची नजर इकडे तिकडे भिरभिरत असे. आणि ज्या क्षणी त्यांची मूर्ती दिसे, त्या क्षणी सगळा प्रवासाचा शीण कुठच्या कुठे निघून जाई. एस. टी. स्टॅण्डवर उतरल्यानंतर टॅक्सीने झावबावाडीत जायची पर्वणी असायची ( रिक्षा हे श्वापद गिरगांवात त्यावेळीही नव्हतं आणि आत्ताही नाही ). आता महिन्याला किमान पाच एक वेळा तरी टॅक्सीत बसण्याचा योग्य येतो. पण मुंबई सेंट्रल ते झावबावाडी ह्या प्रवासाची त्याला सर नाही. गोऱ्या राममंदिराच्या डावीकडून एकदा टॅक्सी झावबावाडीत शिरल्यावर अनुक्रमे धसवाडीची पाटी, अरुणोदय लौंड्री, बोडसांचे किराणा दुकान, चौकातला गांधी पुतळा आणि शिशु विहार हायस्कुल आपापल्या जागी आहेत ह्याची खात्री झाली, कि सिंदबादची सफर सुफळ संपूर्ण झाल्याचा फील यायचा. बालपणीचं सारं विश्वच न्यारं होतं म्हणा !!

बाबांना इंग्रजी आणि गणित ह्या विषयांची चांगल्यापैकी गोडी होती. ती पाहिल्यानंतर त्यांनी खूप शिकायला पाहिजे होतं असं वाटायचं.  But it was easier said than done !! वयाच्या ११ व्या वर्षीच त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं कि "आता याच्यापुढे तुमचं तुम्ही बघा." बाबांची आई तर त्यांच्या वयाच्या ७ व्या वर्षीच जलोदराने गेलेली.  मग वडिलांना ह्या निर्णयापासून कोण परावृत्त करणार ..?? त्यानंतर बाबांना जे शारीरिक कष्ट (आणि कदाचित उपासमार सुद्धा) सुरु झाले त्याला सीमा नाही. वारावर राहून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मग मुंबईला नोकरी पत्करली. त्यांच्या उत्तम इंग्रजीचा आणि गणिताचा आईला व आम्हा दोघांना फायदा झाला. आई तर कित्येक वर्षांपूर्वी पास झालेल्या ७ वी उर्फ व्ह.फा. नंतर (म्हणजे तिच्या वयाच्या पस्तिसाव्या वर्षी) डायरेक्ट मॅट्रीकलाच बसली (१९७०) आणि व्यवस्थित उत्तीर्ण झाली. त्याचे निम्मे श्रेय बाबांचेच होते. आम्ही सकाळी उठायच्या आधी आणि रात्री झोपल्यानंतर जमिनीवर खडूने ते आईला बीजगणित शिकवायचे ते चांगलं आठवतंय ( १९७०). SSC झाल्यावर आईला बाबांनी एक कॅमी कंपनीचे घड्याळ बक्षीस म्हणून दिले होते. पुढे जाऊन आमच्या आईने वयाच्या ४९ व्या वर्षी BA पण पूर्ण केले. 


बाबांचे जवळ जवळ सगळे आयुष्य कष्टदायकच होते. आयुष्याच्या पूर्वार्धात (लहानपणी आणि तरुणपणी ) पोटासाठी आणि शिक्षणासाठी उपसलेले कष्ट , तसेच उत्तरार्धात ( ४८ वर्षां नंतर ) आजारपणाचे आणि शारीरिक व्याधीचे कष्ट. गिरगावांत  पहाटे रोज उठून पाणी भरण्याचा कार्यक्रम असे. गिरगावातील सिंगल रूम मधील  अंघोळ आठवते. तरुणपणी वेटलिफ्टिंग केल्यामुळे कमावलेले त्यांचे शरीरसौष्ठव पाहताना मला अगदी मौज वाटे. बाबांच्या ह्या गुणवैशिष्ट्याचे आणि व्यक्तिमत्वाचे आजोबांना खूपच कौतुक वाटे. कधीकधी माझ्यापुढे तुमचा आदर्श ठेवला जाई. ज्याचा काहीच उपयोग झाला नाही. (नाही म्हणायला त्यांच्या नातवाला ह्या संस्कारांमुळे व्यायामाची बऱ्यापैकी आवड लागली असं म्हणता येईल ). बाबांनी स्टेट लेव्हलला मारलेल्या बँटम वेट (Bantamweight 115-126 Lb) गटातील रौप्यपदकाची कथा मी बरेच वेळा मित्रांना सांगून त्यांच्या भुवया उंचावतो आणि भाव खातो. पण ह्या सदगुणाचा कधीही त्यांनी अहंकाराने दुरुपयोग केल्याचे स्मरत नाही.  बाबांचा स्वभाव किती साधा आणि सरळ होता हे यावरून लक्षात येईल. हल्लीच्या काळात चांगली शरीरसंपदा असलेले काही ऊटपटांग तरुण शर्टाची वरची निदान ४ बटणे उघडी ठेवून बायसेप्स आणि ट्रायसेप्सचे सगळ्यांना ओंगळवाणे प्रदर्शन करतात. त्या काळी जवळजवळ त्याच तोडीचे शरीरसौष्ठव असलेल्या बाबांनी असले काहीही प्रकार केल्याचे स्मरत नाही. बाबा नेहमीच down to earth होते. ह्याचे अजून एक उदाहरण मी नंतर देणारे. यावरून एक गोष्ट आठवली. साधारण ७४-७५ मध्ये बुल-वर्करची साथ तरुणांमध्ये आली होती. केवळ नव्याची नवलाई म्हणून त्यातील विविध प्रकार आमच्या चाळीतील विशी पंचविशीचे तरुण सार्वजनिक पद्धतीने करीत. कॉमन गॅलरीत हा करमणुकीचा कार्यक्रम चाले. बाबांची तब्येत जोर-बैठका काढून आणि वेट लिफ्टिंग करून कमावलेली. बुलवर्कर हे नक्की काय फ्याड आहे, ते अजमावण्यासाठी बाबांनी सहज एकदा बुलवर्कर मागवून घेऊन, तो सर्वच्या सर्व Over the length शेवटपर्यंत दाबून ह्या तरुण मंडळींना फेफरे आणल्याचे स्मरते.  लगेच चाळीत माझी 'वट' वाढली हे वेगळे सांगायला नकोच . माझ्या आठवणीत मला पाठीवर घेऊन त्यांनी दंड काढल्याचे मला चांगलं आठवतंय. रिटायरमेंटनंतर नियमितपणे ते योगासने करायचे. अगदी भिंतीला न टेकता शीर्षासन सुद्धा ! सगळं निंबाळकरांच्या पुस्तकावरून चाले. पण नंतर कमरेचा आजार बळावल्यावर हे थांबलं ( म्हणजे मृत्यूआधी वर्षभर असेल).  मला वाटतं तिथूनच त्यांचा descend सुरु झाला.....



त्यांच्या काही वस्तू आणि लकबी अजूनही मला आठवतात. त्यांच्या मनगटावर MEDORINA ह्या जुन्या स्विस कंपनीचे घड्याळ शोभून दिसे ( ही कंपनी आता भारतात पण active आहे म्हणे). कदाचित जगबुडी होईल, पण हे घड्याळ बंद पडणे अशक्य. निदान पंचवीस-एक वर्षे तरी  ते मी बाबांजवळ पाहिलंय. नंतर सौ ताईने त्यांना नवीन घड्याळ भेट म्हणून दिले होते, जे ते वापरत असत. गजर करून संपूर्ण चाळीला झोपेतून जागे करण्याची क्षमता असलेले फावरलुबा कंपनीचे अलार्म क्लॉक ही अशीच एक त्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट ! ह्या घड्याळाला एक स्वतंत्र लाकडी केसही होती. हे मात्र कधीतरी बंद पडे. खोताच्या वाडीतल्या हळबे नावाच्या वयस्कर गृहस्थांकडे रिपेअरसाठी बाबा ते देत असत. खोताची वाडी हे एक गिरगावातले जंतर मंतरच होते. असंख्य गल्ल्या पार करून आम्ही हळब्यांच्या घरी पोचायचो.  त्यांचे आणि बाबांचे नक्की काय नाते होते, हे मला कधी उमगले नाही. पण कधीही गेलो तरी हळबे स्वतः चहा करून आम्हाला द्यायचे आणि मग एक इंचभर लांबीचा सूक्ष्मदर्शक (cum भिंग) स्वतःच्या डोळ्याभोवतीच्या खोबणीत खुपसून घड्याळाची शल्यचिकित्सा करायचे. ह्या रिष्ट वॉच एक्सपर्टने आपल्या घरातल्या सगळ्या घड्याळांची अरिष्टे दूर केली. ठाण्यात आल्यावर हळब्यांची जागा पोंक्ष्यांनी घेतली.


बाबांशी निगडित असलेल्या अनेक गोष्टी आणि व्यक्ती स्मरतात. अखंडपणे टिक टिक करूनही अनेक वर्षे टिकणाऱ्या घड्याळाप्रमाणेच उकारान्त दांडीची १२ वर्षे टिकलेली बाबांची मस्टर कलर मुठीची रिच छत्री, बाटाचे तीन तीन वर्षे टिकणारे रोबस्ट सँडल्स, संदकचे पावसाळी बूट, पॅन्ट पोटरीपर्यंत वर करून पावसाळ्यात लावायची क्लिप, जिलेट रेझरचा जमाना यायच्या आधीचा  फिरकीचा मेकॅनिकल रेझर अशा expiry date नसणाऱ्या अनेक वस्तू बाबांचे व्यक्तिमत्व अजूनही समोर उभे करतात. त्यांना इंपोर्टेड Wilkinson ब्लेड्स चे विशेष कौतुक होते. खास पट्टेरी पायजमे शिवायला जन्म घेणारा चौकातला बाबुराव टेलर, पाच सहा वर्षांतून एखादा टेरेलिन-टेरिकॉटचा शर्ट शिवणारा चर्नी रोडचा हाय फाय गुजराथी टेलर, माझ्या हट्टापायी नळबाजारातून आणलेली  शाळेची मोरपंखी रेग्झिन बॅग , चिकित्सक हायस्कुल ते झावबाची वाडी या दरम्यान भल्या पहाटे माझी केलेली ने-आण , लहानपणी मी गर्दीच्या लोकलमधून उतरू न शकल्यामुळे परळला त्यांनी धावत पेडलिंग करून पुन्हा पकडलेली लोकल, दिवाळीतील फटाक्यांचे बाळूकाका ओळकरांबरोबर केलेले ५ रुपयांचे स्पेशल डील (१९६५-७०),  अशा एक ना अनेक गोष्टी !


बाबांचे सगळे मित्रही अगदी निवडक होते. बाबांची त्यांच्यापैकी काहींशी झालेली मैत्री हि नेमक्या कुठल्या भांडवलावर होती हे मला फार कधी कळलं नाही. झब्बा पायजमा घालून रोज इंग्लिश कंपनीत काम करणारे बाळू ओळकर , पदवीदान समारंभाचे गाऊन शिवणारे आणि अगत्याने दुकानात उसाचा रस मागवणारे दांडेकर टेलर,  ठाकूरद्वारला स्टीलच्या भांड्यांचे ऐसपैस दुकान असणारे आणि नेहमीच कोलगेट स्माईल देणारे  पाटीलशेट, गुलजार व्यक्तिमत्वाचे बाळू हर्षे, डिझाईन एक्सपर्ट आपटेसाहेब , मोडककाका, दर दोन वाक्यांनंतर finish म्हणणारे रुईकर , फूड कॉर्पोरेशनमधले पोतदारकाका, एरोनॉटिकलचे आठवलेसाहेब, केमिस्ट्रीतले तज्ज्ञ डॉ. मुळे, बरोज लेनमधील मुळे ह्या सर्व व्यक्ती अगदी वेगवेगळ्या साच्यातल्या होत्या. मला वाटतं बाबांच्या  साधेपणावर ह्या मंडळींनी प्रेम केलं असावं. नातेवाईकांमध्ये सातारच्या आत्यावर आणि सदाशिवदादावर बाबांची विशेष माया होती. तसेच त्यांचीही बाबांवर होती. माझ्या विवाहापूर्वी जेव्हा आईची तब्येत खूप बिघडली तेव्हा आणि नंतरही मदतीसाठी आत्या लगेच धावून येत असे, ते त्यांच्या प्रेमाखातरच ! प्रत्येक वेळी बाबांबद्दल कऱ्हाडच्या आठवणी सांगताना सदाशिवदादाला गहिवर येत असे. एके काळी बाबांना स्वतःला दोन  वेळच्या जेवणाची भ्रांत असूनही स्वतःच्या भाच्याला मदतीचा हात देऊन स्थिरस्थावर करण्याचा मामाच्या मनाचा मोठेपणा तो कधीच विसरला नाही. मोठे बंधू कै, रामभाऊकाका व कै दत्ताकाका यांच्याविषयीही खूप आदर होता. त्यांच्याबद्दल बोलताना चुकून कधीही उणा-अधिक शब्द त्यांच्याकडून गेलेला ऐकिवात नाही. मितभाषी रामभाऊकाका तर दर आठवड्याला आम्हाला भेटायला येत. बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या रामभाऊकाकांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला, असं मला नेहमीच वाटत आलंय. माझे दोन्ही मामा आणि मावशी यांच्याबद्दल (आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल ) त्यांना खूप आदर होता आणि मला वाटतं त्यांच्या वागण्या बोलण्यातून तो कायम व्यक्त होई. 

बाबांची श्रद्धास्थाने अगदी ठरलेली होती व  त्यात शेवटपर्यंत बदल झाला नाही. राजकीय क्षेत्रातील सरदार पटेल, बॅरीस्टर नाथ पै, सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ राजेंद्र प्रसाद, फिल्ड मार्शल करीअप्पा, आचार्य अत्रे, कमिशनर पिंपुटकर आदी आदरणीय व्यक्तिमत्वे !! आवडते वृत्तपत्र संपादक म्हणजे म.टा. चे कै. गोविंद तळवलकर आणि लोकसत्तेचे  कै. माधव गडकरी.  महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे वाचन रोज पहिल्या अक्षरापासून शेवटच्या पानावरील बेनेट कोलमनच्या जाहिरातींपर्यंत चाले. चित्रपट क्षेत्रात मा. विनायक, मीनाक्षीबाई, शांताबाई हुबळीकर, शांता आपटे. नाट्यसंगीत मास्तर कृष्णराव, बापूराव पेंढारकर, इंदिराबाई खाडिलकर, भार्गवराम आचरेकर, सुहासिनी मुळगावकर ह्या मंडळींचे आवडे. बाबांचे सगळ्यात आवडते गाणे विष्णूपंत जोगांचे 'घे भरारी उंच आता... ' हे होते . 'आम्ही जातो आमुच्या गावा ' हे संत तुकाराम चित्रपटातील विष्णुपंत पागनीसांचे निर्वाणीचे गाणे टीव्ही वर पाहताना बाबांना भरून यायचे आणि ते स्वतःच तुकारामाला निरोप देणारे एक वारकरी होऊन जायचे हे मी पाहिलंय (ह्या सिनेमाचं केशवराव भोळ्यांचं संगीत आणि पागनीसांचा गानाभिनय आहेच उच्च दर्जाचा !! ) शास्त्रीय संगीतात सगळ्यात लाडके गायक कै मल्लिकार्जुन मन्सूर !! त्यांचे वीरश्रीयुक्त आघाती गाणे त्यांना गुंगवून ठेवायचे.  प्रा . शिवाजीराव भोसले ,विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, यशवंत पाठक, दाजी पणशीकर आणि वेदशास्त्री सुरेश शेवडे यांच्या व्याख्यानांना ते न चुकता जायचे. ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला कधीही चुकविली नाही. दूरदर्शनवरील सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे "बातम्या"!! छायागीत वगैरे कार्यक्रमात त्यांना काहीही रस नसे. टीव्ही वर आवडते बातम्या देणारे म्हणजे निथी रवींद्रन, तेजेश्वर सिंग , अविनाश कौर सरीन , मिनू तलवार, अनंत भावे , प्रदीप भिडे आणि रेडिओवरील इंदुमती काळे व दत्ता कुलकर्णी !! शिवाय "प्रतिभा आणि प्रतिमा", गजरा आणि फुल खिले है गुलशन हे कार्यक्रमदेखील आवडीने पाहायचे. क्रिकेट विथ विजय मर्चंट अगदी मन लावून बाबा ऐकत. आवडता क्रिकेटवीर फरुख इंजिनिअर होता. कारण तो त्या काळी  झटपट धावा काढी. चंदु बोर्डे देखील आवडत. सुनील गावस्कर बाबांच्या पचनी पडला नाही, कारण तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळत असे. एव्हढा त्यांना वेळ नव्हता. (......बाकी भारतीय खेळाडू आऊट होण्यामध्ये बिझी असत.😅😅). 

स्वावलंबन, व्यवस्थितपणा आणि स्वच्छतेची आवड हे बाबांचे काही व्यवच्छेदक गुणविशेष !. जुने नळ काढून नवीन नळ स्वतः बसविणे, किंवा नळांचे वॉशर बदलणे, पाण्याची टाकी स्वतः साफ करणे, सिमेंट लांब्या यांची कामे करणे, बर्शनच्या शेगड्या साफ करणे, खिडक्यांची शटर्स काढणे-बसविणे, सिलिंगवरून पंखे काढून ते पुन्हा नव्यासारखे करणे, गोदरेजची जुनी कपाटे नवीन करून दाखविणे अशा Maintenanceच्या कामांमध्ये बाबांना विशेष गती आणि आवड होती. वस्तू व्यवस्थित टिकाव्यात, एव्हढाच शुद्ध हेतू त्यात असे व तो साध्य झाला. एव्हढेच काय, पण एकदा गिरगावातील जागेचा जुना रंग जाळून, स्वतः रंग लावण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवला होता. त्यामुळे कित्येक वर्षे आम्ही प्लम्बर, इलेकट्रिशिअन, गवंडी हि मंडळी नक्की कशी असतात हेच पाहिलं नव्हतं. रिटायरमेंटनंतर मात्र घरांत सिव्हिल किंवा कुठलेही काम निघाले कि विश्वासाची (आणि रास्त मोबदला घेणारी) गवंडी, सुतार, वायरमन व प्लम्बर इत्यादी माणसे ठरलेली होती. बाबांच्या मार्गदर्शनाखाली हि मंडळी व्यवस्थित काम करून जात.  भास्कर कॉलनीतल्या संपूर्ण बिल्डिंगची रिपेअर आणि प्लास्टरिंग बाबांनी एकट्यानी सुपर वाईज केले होते. अर्थातच काम एकदम पक्के झाले. (परंतु ह्या सगळ्या कामात भरपूर धूळ असल्यामुळे दम्याचा एक अटॅक पण त्यामुळे येऊन गेला). कधी कुणाची बिले थकवून धरलेयत असं कधीच झाले नाही. सचोटी हा देखील त्यांचा वाखाणण्यासारखा गुण होता. बाबांना maidने किंवा अन्य कोणीही त्यांचे कपडे धुतलेले आवडत नसे. अगदीच होईनासे झाले, तेव्हा स्वतःचे स्वतः कपडे धुणे थांबले. म्हणजे शेवटचे वर्षभर असेल. शिवणकामातही त्यांना विशेष गती होती. (म्हणून कि काय, आमच्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी  त्यांनी सुचित्राला भेट म्हणून मेरिटचे शिलाई यंत्र दिले होते). शिवण जर हाती करण्याचे असेल, तर हमखास दातांमध्ये सुई धरून त्यांनी आईचे बरेच ओरडे झेलले होते.  तसेच सफरचंद कापून ते सुरीचाच फोर्क सारखा उपयोग करून एकेक फोड खाणे हि एक कायम राहिलेली सवय. आजारपणात ४-५ औषधाच्या गोळ्या एकदम फक्की मारून तोंडात टाकणे व त्यावर पाणी पिणे ही अजून एक सवय आठवते. पाणी पिताना मात्र त्यांनी  कधीही पेल्याला तोंड लावून पाणी पिताना मी पाहिलं नाही. राजगिरा, मेथी आणि नाचणीचे लाडू विशेष आवडत. लाडू उजव्या हातात धरून कधीच खाल्ला नाही. डाव्या हातात तो घेऊन त्याचे उजव्या अंगठ्याने  ४-५ तुकडे करणार व मग हळू हळू खाणार हि एक सवय आठवते. बहुतेक ही उतार वयातील सवय असावी. बाबांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे 'गोडाचा शिरा'!! अजूनही हे पक्वान्नं आम्ही घरी केले, तरी बाबांची आठवण करूनच ते प्राशन करतो. २६ जुलैला हाच नैवेद्य आमच्याकडे असतो. 

एकंदर बाबा मितभाषी होते असेच म्हणावे लागेल. गिरगावात असताना अगदी अत्यावश्यक असेल तरच चाळीमध्ये कुणाशी बोलणार, अन्यथा नाही. नाही म्हणायला आपल्या समोर संगीतमय झालेले जोशी कुटुंब होते, त्यांच्याशी थोडाफार संवाद चालायचा. (पण संगीत विषयावर नाही हां.......😃 ). तरीही इतक्या वर्षात मी त्यांना (तसेच आईला ) कोणाच्याही घरी जाऊन उगीचच गप्पा छाटत बसल्याचे पाहिलेले नाही. कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही असा स्वभाव. अत्यंत सरळ मार्गी माणूस. पण अगदी जवळच्या मंडळींमध्ये व आप्तमित्रांत मात्र बोलून चालून असायचे. घरी कोणी नात्यातली मंडळी आली तरी बाबा त्यांच्याशी बोलून चालून असायचे. समोर राहणारे जोशी गुरुजी संगीताचे क्लास घेत. पण मला संगीताची एव्हढी आवड असताना बाबांनी त्यांना मला संगीत शिकविण्याची गळ घातल्याचे कधी ऐकिवात नाही. ( वयाच्या ७ व्या  वर्षीच मी कुणीही न शिकविता तीन ताल, एक ताल आणि रूपक झपताल हे ठेके जोशी गुरुजींच्या तबल्यावर वाजवीत असे.). किंवा विचारलं असेल, पण कदाचित व्यवहार जमला नसेल. असो ! अर्थात, जे झालं ते चांगलंच झालं. सुरांचा कोंडमारा सोसणे हे मला अवघड गेले असते. कारण मला आता हार्मोनियमवादनाची आवड लागली होती, ज्यात सूर आणि ताल दोन्ही आहेत . ठाण्यात आल्यावर माझे संगीताचे वादळ हे जेव्हा चक्रीवादळ झाले (१९८२),  तेव्हा मात्र बाबांनी लगेच मला एक छोटीशी पेटी घेऊन दिली होती.  जिथे कुठे मला संगीत शिकायचं असेल तिथली काय असेल ती क्लासची फी देखील काहीही तक्रार न करता ते द्यायचे. ह्यामुळे माझा संगीताचा पाया रचला गेला.  मला नोकरी लागण्यापूर्वीच माझी संवादिनीतील प्रगती पाहून बाबांनी मला हरिभाऊंकडून नवीन पेटी घेऊन देतो असे आनंदाने आणि आग्रहाने सांगितले होते. पण मीच नकार दिला. IITतील माझा ५ वर्षांचा खर्च, संगीत शिक्षणाचा आणि बाकी पडेल तो खर्च हे सर्व एकहाती मिळकत असलेल्या बाबांच्या दृष्टीने खूपच होते, ह्याची मला जाण होती. आईने लावलेली पेटीची आवड आणि बाबांनी दिलेला भक्कम पाठिंबा, यामुळेच संगीतातल्या ७ स्वरांना पुढे मी थोडेतरी वश करू शकलो.

बाबांनी मध्यमवर्गीय ( कि मार्गीय..??) जीवनशैलीचे सगळे प्रोटोकॉल्स ( उदाहरणार्थ लग्न-मुंज समारंभाला जाणे वगैरे) नेहमीच पाळले. ते काही नेटवर्किंगच्या जमान्यातील नव्हते. पण रिटायर झाल्यावर ते दर दोनेक महिन्यांनी तरी त्यांच्या प्रत्येक इष्ट मित्र व इष्ट नातेवाईकांना न चुकता फोन करायचेत. त्यांचा फोन अपेक्षेप्रमाणे आला नाही, तर पलीकडून फोन खुशाली विचारण्यासाठी येत असे. बाबांनी सगळ्यांशी ठेवलेल्या संबंधात स्वार्थ नव्हता, फक्त आत्मियताच होती. इथे बाबा मोठे ठरतात. (आता Social fabric विस्कटलंय आणि आत्मीयतेची जागा स्वार्थ घेऊ लागलाय असं जाणवतं.) बाबांचा एकंदर स्वभाव शांत, मूलतः सरळमार्गी, गरीब आणि पापभीरु होता,  पण एकदा का संयम सुटला, कि मग मात्र समोरच्याची खैर नाही. प्रायमरी शाळेत माझे वाईट हस्ताक्षर असल्यामुळे फाडलेल्या माझ्या वहीबद्दल भर वर्गात येऊन त्यांनी केलेली मास्तरांची कान उघाडणी मी अजूनही विसरलेलो नाही. घरी न सांगता  प्रा मधु दंडवतेँच्या चौकातील निवडणूक सभेला गेल्याबद्दल माझ्या कानाखाली मिळालेल्या प्रसादाने मला 'सहस्र काजवे दर्शन' झाले होते. तसेच मी सहावीत असताना माझी अभ्यासातील निष्क्रियता बघून त्यांनी मला असे काही चौदावे रत्न दिले होते कि बस रे बस !! ताईलाही त्यांच्या संतापाचा एखाद दुसरा अनुभव असावा. (ताईसाठी त्यांच्याकडे प्रेमाचा एक वेगळा कप्पा होता व ते साहजिकच आहे). माझा मुलगा विभव क्रीडासंकुलात जायचा तेव्हा त्याच्या एका शिक्षकाने नायलॉन स्किपींग रोपने त्याच्या पायावर सपासप मारले होते. त्याच्या पायवरचे वळ पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि शिक्षकालाच चोपायच्या इराद्याने ते तिरीमिरीने  शाळेत जायला निघाले होते. त्यांना घरात विनाकारण कटकट नको असायची. एकदा भर पावसाळ्यात मी आईचे PET SCAN रिपोर्ट्स आणायला हिंदुजाला गेलो होतो. येताना ट्रेनला खूप गर्दी होती. ह्या गर्दीत माझा मोबाईल हरवला.  मी घरी पोचल्यावर त्यावर थोडी वादविवादवजा चर्चा झाली. ती ऐकल्यावर तात्काळ त्यांनी मला एका चांगल्या मोबाईलला पुरतील इतके पैसे काढून दिले आणि दुसऱ्या दिवशी नवीन मोबाईल आणायला भाग पाडले. आम्ही दोघंही खजील झालो. ( बाय द वे , मी आत्तापर्यंत हरवलेल्या मोबाईलची संख्या आहे 'चार'. पण ते वेगळे !!)

आमचे बाबा निर्व्यसनीच होते. क्वचित कधीतरी गिरगांवात असताना रविवारी दुपारचे जेवण झाल्यावर  मला चौकातून एखादी कॅव्हेंडर सिगारेट आणून द्यायला सांगायचे. चौकातील पानवाला नेव्ही ऑफिसरचे चित्र असलेल्या  नेव्ही कट कॅव्हेंडरच्या रिकाम्या पोपटी कलरच्या पाकिटातून २ सिगारेटी मला द्यायचा. प्रत्येक सिगारेटची किंमत बहुतेक ७ पैसे असावी. त्यांचे हे क्वचितचे धूम्रपान आईला मान्य होते का, हे अजूनही माहिती नाही. पण असावे, कारण हे व्यसन नव्हते. ही  फक्त त्यांच्या चैनीची कल्पना (किंवा परमावधी) असावी. वारसा हक्काने एक अडकित्ता मात्र त्यांच्याकडे आला होता, त्याचा क्वचित सुपारी कातरण्यासाठी वापर व्हायचा; पण तो देखील दोनपैकी कुणीही काका घरी आले तरच.  ( मला वाटतं एखादा वडिलोपार्जित 'गुण' सोडून वारसा हक्काने बाबांकडे आलेल्या गोष्टी शून्य.... !! कारण जे काही आहे,  ते बाबांनी शून्यातून आणि सचोटीनं उभं केलं). त्यांना व्यसन होतं ते कामाचं !! कारण बसून राहण्याचा स्वभाव नाही. अगदीच अतिकष्ट झाले असतील, तर एक टिपिकल आराम खुर्ची होती, त्यात ते बसायचे. पण मिनिटभरातच झोप लागे.  झोपेची आवड नसली, तरी एकदा का गादीला पाठ टेकली कि पुढच्या क्षणाला झोप लागे. ही त्यांची एक प्रकारची योगसाधनाच होती असं मला वाटे. रिटायर झाल्यावर दुपारी वामकुक्षी असे, पण तीही मोजून वीस मिनिटे !!  एकविसाव्या मिनिटाला उठून पुढचे काम सुरु.  


ह्या तीनही भावांना पायी फिरण्याचा अतोनात छंद होता . रिटायर झाल्यावर बाबांची घरातून फिरायला बाहेर पडायची वेळ म्हणजे दुपारी अकराची आणि घरी यायची वेळ टळटळीत दुपारी १ नंतर (कारण BF, पेपर वाचन आंघोळआदी कार्यक्रम, नित्यपूजा, हे सगळं होईस्तोवर ११ वाजायचेच).  बाहेर पडल्यावर कधी ठाण्याचा गोखले रोड, तर कधी कोपिनेश्वर, कधी सुधीरच्या गोखले रोडच्या ऑफिसमध्ये तर कधी आपल्या दोन्ही जेष्ठ बंधूंच्या घरी. येताना सहज म्हणून सुद्धा कधीही रिक्षा केल्याचे आठवत नाही. किंबहुना बाबा रिक्षेतून उतरतायत हे चित्रच डोळ्यापुढे येत नाही. उन्हातून आलो म्हणून डोकं दुखतंय वगैरे तक्रार मी कधीही ऐकलेली नाही. अमृतांजनचा वापर जन्मात केला नसेल.  बाजारहाट करताना काही बारीक सारीक खाद्यपदार्थ घेऊन यायची सवय होती. (आल्याच्या, श्रीखंडाच्या किंवा दुधी वड्या वगैरे). येताना हमखास काहीतरी भाजीपाला घेऊन येणार. त्यातली एक तरी भाजी ही अनवट रागासारखी rare melody असणार. उदा. भारंगीचा पाला, फोडशी, टाकळा, केळफूल, मुळ्याच्या शेंगा, अळकुड्या  वगैरे. भर पावसाळ्यात अशा भाज्या आणून त्यांनी कितीतरी वेळा आईच्या तोंडचे पाणी पळविल्याचे स्मरते. एकदा तर आईने विचारले होते कि रस्त्याच्या बाजूचं  रान उपटून आणलंय कि काय ?? अगदी वेळ पडली तर स्वतःच भाजी चिरण्यापासून करणार. कारण बाबांना उत्तम स्वयंपाक यायचा. अगदी फणसासारखी जटील भाजीसुद्धा लाल मिरचीची चरचरीत फोडणी देऊन तुम्ही फर्मास केल्याचे मला अजूनही स्मरते (ते कशाला, पण मोठ्या काकूलाही भाकरी कशी करायची हे प्रात्यक्षिकासहित त्यांनी गिरगावांत असताना शिकविले होते) . आमच्या लग्नाआधी आईच्या मोठ्या आजारपणात बाबांचे हे पाककला कौशल्य चांगलेच कामी आले.

अस्थम्याने मात्र बाबांना अक्षरशः आटवले ( आणि नंतर नेलंही.....!!😪). केवळ त्यांनी म्हणूनंच ह्या शत्रूला ८० व्या वयापर्यंत पर्यंत धैर्याने तोंड दिले. लहानपणीच्या दम्यावर मात केली ती व्यायाम करून. त्यामुळे हा शत्रू त्यांच्या वयाच्या ४५ वर्षांपर्येंत भूमिगत राहिला. पण ७५ साली गिरगावातून ठाण्याला आल्यावर मात्र वाईट हवामानामुळे त्याने बाबांवर चौफेर हल्ला चढवला. भुईसपाट व्हायची वेळ आली. ( ठाण्याची हवा नाही म्हटलं तरी खराबच  !! ) ६ महिन्याच्या काळात वजन १६० पाऊंड वरून ११० पाऊंड वर आले. हे खरोखरच गंडांतर होते. पावसाळ्यात तर प्राण कंठाशी येईपर्यंत दम लागायचा. आम्ही तिघंही खूप घाबरून गेलो होतो. ह्या काळात वैद्यकीय मदत केली, ती डॉ सुरेश वैद्य यांनी. त्यांचे खरोखरच आमच्या कुटुंबियांवर उपकार आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना घरी बोलावलं, तेव्हा काहीही नाही होय न करता ते आले. मी १० वीत असताना पावसाळ्याचे ३ महिने जवळजवळ रोजच पहाटे दम लागायचा. सकाळी ६ च्या सुमारास मी डॉक्टरांना त्यांच्या घरून घेऊन येत असे. ते डेरिफयलीनचे एक इंजेकशन देऊन दम आटोक्यात आणित आणि मग मी क्लासला जात असे. सगळं काल घडल्यासारखं आठवतंय मला.  पण  बाबांनी हे सगळं चिकाटीने सोसलं (आणि बिचार्या आईने सुद्धा !!).  अन्यथा काय घडले असते ते सांगायलाच नको. याच दरम्यान मुळचे मध्य प्रदेशातल्या धारचे, पण राहणारे अंबरनाथचे असे डॉ. मानसकर हे आयुर्वेदिक तज्ञ् देवदयेने भेटले ( मला वाटतं त्यांची  शिफारस आमच्या डोंबिवलीच्या भाऊकाकांनीं  केली होती). अचूक नाडीपरीक्षा झाली. औषध बनवले गेले. पथ्ये ठरली. थंड पेये, दूध, अळू, वांगे, वालाची उसळ आदी आवडते पदार्थ आयुष्यातून कायमचे बाद झाले.  वैद्यबुवाही चिकाटीचे आणि पेशंट त्यापेक्षा जिगरी !! मग काय, ह्या असाध्य रोगाला वर्षभरातच वेसण बसली. १९७५ ते १९९२ हि वर्षे कुठलेही मोठे संकट न येता निमूट सरली. मुख्य म्हणजे रिटायरमेंट पर्यंत बाबांना नोकरी करता आली. त्यानंतर १९९२, १९९६ आणि १९९८ या वर्षी प्राणघातक दम्याचे अटॅक आले. पण बाबांनी ते  शौर्याने परतवून लावले. महत्वाचं म्हणजे अगदी आजारपणाच्या दिवसातसुद्धा बाबा आयुष्याला कधीही कंटाळले नाहीत. कधीही झोपताना त्यांच्या तोंडून "परमेश्वरा, सोडव रे बाबा " असे निराशाजनक उद्गार काढल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही, त्यांची जीवनेच्छा भक्कम होती; पण जीवनाविषयीच्या अपेक्षा सीमित होत्या. माणसाला चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी हे डेडली कॉम्बिनेशन आहे. सगळ्या आजारपणात तीनच आधार होते " डॉ मानसकरांचे वैद्यकीय ज्ञान, बाबांची  चिकाटी आणि परमेश्वरी कृपा "!! मानसकरांनी १९७६ मध्येच सांगितले होते , "कात्रे, तुम्ही मी सांगतो तसे केलेत, तर ८० पर्यंत जाल".  कात्र्यांनी ते शब्दशः खरं करून दाखवलं !! (१९२७ ते २००७)

बाबांना रिटायरमेन्टनंतर वैद्यकीय शास्त्राची म्हणण्यापेक्षा Medicine या विषयाची खूप आवड लागली. ती बहुधा त्यांच्या तब्येतीवर होणाऱ्या असंख्य उपचारांमुळे असावी. सुरवातीला पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मध्ये २ वर्ष केलेली नोकरीही ह्याला कारणीभूत असावी. "आयुर्वेदवाले genuine असतात  आणि ऍलोपॅथवाले तब्येत बिघडवतात " हा त्यांचा एके काळी झालेला समज अगदी शेवटपर्यंत कायम होता. बाबांकडे डॉ. चंद्रशेखर ठाकूर (आयुर्वेद) आणि सगळ्या chemist लोकांकडे असणारे मेडिसिन रेडी रेकनॉर अशी २ पुस्तके होती. बरीच औषधे तोंडपाठ होती. अर्थात ह्याचा सगळ्यात जास्त त्रास डॉक्टरांना व्हायचा. त्यांना दर वेळी बाबांचे पारायण निदान १५ मिनिटे तरी ऐकावे लागे. बाबांनी घरच्या घरी केलेल्या औषधी उपाययोजना पहिल्या असत्या, तर बटवा-वाल्या आजीबाईने पण तोंडात बोट घातले असते. एकतर निम्म्या रोगांवर औषध ' बिब्बा' हेच असे. ( शेवटपर्यंत त्यांत कोणीही बिब्बा घालू शकले नाही ) बिब्बा हे अत्यंत ड्रॅमॅटिक, जालीम पण रासवटी औषध होते. एकदा तर त्यांच्या स्वतःच्याच जखमेवर हाच बिब्बा चांगला फुलून वर आला होता ते आठवतंय.  जखम चिडली ((आणि आई सुद्धा ! ), पण बाबा शांतच होते.  कोकमाच्या बियांचा गोळा चिमणीवर धरून त्याचे तेल बरेच ठिकाणी लावायचे. तळपायावर घासायला त्यांनी आणलेली कास्याची वाटी ( कि  काशाची ??? तेच ते कशाची तरी....) अजूनही आमच्याकडे आहे बरं का ही वाटी . ठाण्याला राहायला आल्यावर बाबा कॉपरच्या तांब्या भांड्यातून पाणी प्यायचे. लहानपणी आम्हाला दर वर्षी नाक दाबून एरंडेल दिले जायचे. घरामध्ये असंख्य अरिष्टे (कुटजारिष्ट वगैरे), आसवे, वट्या, समुद्रफळ, लेंडी पिंपळी, गुग्गुळ, रक्त चंदन, आणि  सगळी चूर्णे असायची. पण दम्यासारख्या बिकट रोगाला ताब्यात ठेवायला त्यांना नाईलाजाने ऍलोपॅथ औषधेच घ्यावी लागली. बाबांना अस्थम्यासाठी दिली गेलेली कित्येक ऍलोपॅथ औषधे मला आजही आठवतात (उदा. Tedral-SA, Aminophylline, Deriphyllin, Erythromycin, Asthalin Rotacap, Kenacort, Ciffosin, Tetracycline, Brovana etc). ह्या सगळ्या औषधांमध्ये मुख्य मेडिसिन कुठले आणि ते स्वतःला चालते कि नाही ह्याचा अभ्यास बाबा website नसण्याच्या काळात  करायचे . बाबा, तुमचा पुढील जन्म हा नक्की डॉक्टरचा असेल.......!!

कर्तव्याला ते कधीही चुकले नाहीत. १९५८ साली विवाहित झाल्यावर अर्थातच बाबांनी संसाराला पूर्णपणे वाहून घेतले होते. आम्हां दोन मुलांच्या सर्व हौशी मौजी त्यांनी पुऱ्या केल्या. याचे लहानपणीचे काही किस्से मी आधी लिहिलेच आहेत. त्यांचा प्रेमळ सहवास हवाहवासा वाटायचा. आमच्या आजारपणात त्यांनी पाठीवर नुसता हात जरी ठेवला तरी दुखणे कमी व्हायचे.  १९५९ पासून बाबांनी IIT मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नोकरी केली. मला 'आय आय टी' त ऍडमिशन मिळाली, तेव्हा आनंदाने ओसंडून वाहणारा बाबांचा चेहरा मी आजही विसरू शकत नाही. कारण ते कित्येक वर्षे पाहत आले होते कि तेथील प्राध्यापकांच्या हुशार मुलांनाही कधीकधी प्रवेश मिळवणे शक्य होत नसे. This was first time ever when I made him proud !! माझे आय आय टी मधील तब्बल ५ वर्षांचे शिक्षण एकहाती व सामान्य मिळकत असूनही त्यांनी निभावून नेले. एव्हढेच काय, पण मला US ला जायचंय का हे देखील त्यांनी मला एकदा विचारल्याचे मला स्मरतंय.  बाबा 'डाउन टू अर्थ' असल्याचे दुसरे उदा इथे देता येईल. माझा result पाहिल्यावर मला ऍडमिशन मिळाल्याचे कळूनही, ते घरी येताना रिक्षेने न येता भाजी घेत घेत चालत आले.  मी घेतलेल्या पहिल्या नवीन जागेसाठीही त्यांनी मोठा आर्थिक हातभार लावला होता. एकदा नवीन पेटीवर काहीतरी छान वाजवले असता, त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले, हे मी हळूच पहिले होते. नातू विभववर त्यांचा खूप जीव होता. तो कधी भास्कर कॉलनीत राहायला गेला, कि बाबांकडून काही वस्तूंची तो परस्पर वसुली करे ( उदा. बास्केट बॉल, वॉटर बॅग, सँडल्स , अंगात घालायची बंडी, ड्रेस , खाऊ वगैरे). होमी भाभा विज्ञान स्पर्धात्मक परीक्षेत त्याने सुवर्णपदक मिळविले तेव्हा, तो समारंभ त्यांनी टी. व्ही.वर पाहिला होता. त्यापुढे  एस. एस. सी. परीक्षेत संस्कृतमध्ये २००८ मध्ये शंभरात शंभर गुण मिळविले होते. ते स्वतः SSC ला होते तेव्हा त्यांच्या वर्गातील बोर्डात येणाऱ्या हुशार कोल्हटकरने शंकरशेठ मिळविली होती, त्याची कथा त्यांनी बऱ्याच वेळा कौतुकाने सांगितल्याचे स्मरते. ह्या पार्श्वभूमीवर विभवच्या यशाने त्यांना खचितच अत्यानंद झाला असता.  "बाबा, त्याने आता IIT- IIM अभ्यासक्रम उत्तमपणे पूर्ण करून उत्तम नोकरी मिळवलेय .हे तुमच्यापर्यंत आलंय का ??? हे सगळं पाहायला तुम्ही नक्कीच आमच्यात हवे होतात".

गृहस्थाश्रम स्वीकारून आई वडिलांची सेवा त्यांच्या वृद्धापकाळीसुद्धा जर नीट करता आली नाही, तर हा जन्म व्यर्थ आहे अशी माझी मनोधारणा आहे. आमचे लग्न झाल्यानंतर सौ सुचित्राने बाबांच्या सगळ्याच आजारपणात त्यांची (आणि त्यानंतर आईची सुद्धा) कर्तव्यनिष्ठ भावनेने शुश्रूषा केली. मी एकटा दुबईला असताना आणि विभव जेमतेम १२-१३ वर्षाचा असताना , तिने स्वतः सगळी जबाबदारी उचलून व  अक्षरशः डोळ्यात तेल घालून दोघांची कर्तव्यनिष्ठेने सेवा केली. ही माझ्या दृष्टीने कायम चिरंतन समाधानाची बाब आहे. त्याबद्दल सुचित्राचा मी अत्यंत ऋणी आहे. 


परवा मला Whatsapp वर एक पोस्ट आली. पोस्ट म्हणते ...." काय फरक आहे या वड़ाच्या  झाडात आणि वडिलांत ???. 'वड़' पासून 'वडील' हा शब्द बनला असावा. समजायला वेळ झाला हो sssss,  झाड पडलं माझं. आता स्वतः झाड व्हावं लागलं ... तेव्हा कुठे हे समजलं .... !" 

माझी आजची मन:स्थिती यापेक्षा वेगळी नाही……









Comments

  1. That generation was a different breed!

    ReplyDelete
  2. Katre I have gone through word to word taken 45 minutes. You can be a good authour also Eventually we are also originated from girgaum mugbhat lane. Pl provide me your cell phone. I wish to to talk many more fond memories.Regards Rajan vagal

    ReplyDelete
  3. Amche Dhakte Kaka (Kaka ajoba), hyan chya varil tuzha lekh vachun mala athvat aslelya junya athvani jagya jhalya . Kaka'n che hubehub varnan tu kele ahes... Tyancha neet-netke Pana, hata varil wristwatch ..well maintained physic , disciplined lifestyle etc etc ... Khoop chaan lihile ahes ... Looking forward for more such articles..rgds, Avanti Katre

    ReplyDelete
    Replies
    1. अवंती, तुझी फोनवरील आणि ही लेखी प्रतिक्रिया माझ्या लेखनाचा उत्साह वाढवणारी आहे.
      एव्हढा मोठा लेख असून तू वाचलास ह्याचा आनंद झाला. 🙏

      बाबांना पाहिलेल्या बऱ्याच मंडळींना हा लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया WA वर आल्या आहेत.

      साधारण तीनशे वाचकांपर्यंत बाबांचे व्यक्तिमत्व मी पोचवू शकलो ह्याचे खूप समाधान वाटले.☺️

      Delete
  4. Lekh Khoop chaan aahe tumhi babanche varnan evadhe chaan kele aahe ki tyanche vaktimatva hubehub dolyasamor ubhe rahate.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार केंजळे वहिनी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !! यामुळे माझा लेखनाचा उत्साह नक्कीच वाढेल.- विकास कात्रे

      Delete
  5. You have a very lucid style of writing.Very touching and made me nostalgic !!

    ReplyDelete

Post a Comment