Skip to main content

'संगीत मंदारमाला'....एक देजाऊ अनुभव !!




संगीत मंदारमाला ... एक 'देजाउ' अनुभव !!


ध्या मला चहापान, खानपान ह्या धर्तीवर मराठी संस्कृतीपानाचा  योग आहे असं दिसतंय. गेल्या महिन्यात कै. वि स. खांडेकरांची १९७४ मध्ये ज्ञानपीठ विजेती ठरलेली  ‘ययाती’ कादंबरी पुनश्च वाचनात आली आणि
भौतिकशास्त्रातील स्थितीस्थापकत्वाच्या (कि जडत्वाच्या ??) नियमाला डावलून माझा मेंदू अचानक उद्दीपित झाला. उदात्त मानवी जीवनमुल्ये आणि विकारी मने ह्यातील संघर्ष खांडेकरांनी इतक्या उत्कटतेने रंगवलाय, कि वाचक अक्षरशः दिग्मूढ होतो. त्यानंतर लगेचच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘सं.संन्यस्तखडग’ हे नाटक बघितले. हे 'सिद्धार्थ गौतम' आणि शाक्य गणराज्याच्या इतिहासावर आधारित असलेले हे नाटक म्हणजे त्यांचे स्वतःचे देशप्रेम, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि अफाट  प्रतिभाशक्ती यांचा अपूर्व संगमच आहे. (त्याला जोड आहे वझेबुवांच्या चालींची आणि दीनानाथरावांनी एके काळी लोकप्रिय केलेल्या पदांची…!) बरं ह्या सगळ्याचा हँगओव्हर असताना, लगेच आठवड्याभरातच सांगलीच्या 'देवल स्मारक मंदिर' ह्या संस्थेने बसविलेल्या 'सं. मंदारमाला'  ह्या नाटकाचा नेटका प्रयोग पाहण्याचा मुंबईत योग आला.

माझ्या आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच मला मराठी रंगभूमीवर सादर होणारी चांगली नाटके बघण्याचा अतोनात नाही, पण बऱ्यापैकी शौक आहे. मुळात रंगमंचाचा मखमली किंवा मलमली पडदा हाच मुळी मराठी संस्कृतीचे एक प्रतीक वाटावे इतका दिमाखदार असतो.  तो उघडण्यापूर्वी एका विशिष्ट लयीने आतून वाजणारी बेल मेटल धातूची अजस्त्र घंटा स्टेजच्या आतमध्ये डावीकडून उजवीकडे वाजत गेली, की मेंदूत 'डोपामाईन' की काहीसे संप्रेरक आपसूक स्त्रवायला लागते ( हल्ली 'आनंद होणं' किंवा ‘समाधान होणं’ असं नुसतं लिहिणं हे बुद्धिजीवी आणि एलिट वर्गात खूप 'डाऊन मार्केट' समजतात, त्यामुळे असं लिहिलंय... ). आणि नाटक जर का 'संगीत नाटक' असेल, तर नांदी सुरू झाल्यावर अंगावर अक्षरशः रोमांचच उभे राहतात. अहो, पुलंसारख्या रसिकाग्रणींनी सुद्धा लिहून ठेवलंय की " एकदा का ऑर्गनच्या संथ सुरांवर तबला आणि सारंगी मिळायला लागली की, आम्ही संपूर्ण शरणगातीची चिट्ठी लिहून समोरच्या कलावंतांच्या चरणी अर्पण करायचो". मग आमच्यासारख्यांची काय स्थिती होईल, ते  सांगायला नको. 

साधारण अशाच आनंददायी वातावरणात 'सं मंदारमाला' ह्या अजरामर नाटकाचा प्रयोग दादर माटुंग्याला परवा म्हणजे ५ एप्रिलला सुरू झाला. तरुण कलाकार अभिषेक काळे याने आपल्या दमदार आवाजात मोठ्या आत्मविश्वासाने ‘जय शंकरा गंगाधरा’ ही प्रार्थना सादर करून नाटकाची पहिली टाळी मिळवली.  रत्नमाला- मकरंद- मंदार ह्यांच्या पहिल्याच प्रवेशात प्रेक्षकांना विषयाची तोंडओळख झाली आणि ते ह्या नाट्यप्रयोगात ‘शरीक’ झाले असं  म्हणता येईल. १४ वर्षांपूर्वी विषप्रयोग करून झालेल्या आपल्या कलाकार  पित्याच्या हत्येने धुमसत असलेल्या मंदारच्या मनातील असंतोष आणि त्यातून निर्माण झालेली स्त्रीजाती विषयीची चीड (तसेच घृणा) उमद्या अभिषेकने आपल्या अभिनयाने चांगली व्यक्त केली.  सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या  कै. विद्याधर गोखल्यांच्या अजोड लेखनातील वाङ्बाण सुटू लागले आणि नाटकाची रंगत वाढत चालली. मला खात्री आहे कि मंदारच्या तोंडी अण्णा गोखल्यांनी योजलेले किंवा घातलेले हे संवाद नीट बसवण्यासाठी अभिषेकला (आणि दिग्दर्शकाला) अतोनात मेहेनत घ्यावी लागली असणार. ह्या संपूर्ण नाटकात महत्वाच्या संवादांमध्ये भाषा अलंकारिक असली, तरी समजण्यासारखी आहे आणि मुख्य म्हणजे भावनात्मक परिणाम साधणारी आहे.  मराठी भाषेतील श्लेष, उपमा, यमक, अनुप्रास, विरोधाभास, उपरोध अशा अनेक अलंकारांची योजना अण्णा गोखल्यांनी कल्पकतेने विविध संवादांमध्ये केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, रत्नामालेचे कौतुक करताना मंदारच्या तोंडी घातलेले काही संवाद इथे वानगीदाखल देता येतील. " राज राजेश्वरांनी कंठात मिरवावी अशी ती रत्नमाला धुळीत फेकून दिली मी" हा श्लेष ,  किंवा कोण असशी तू ह्या गाण्यात  तिला ‘गंगेची अथांग शुचिता’  व ‘भाविकतेची मंगल गाथा’ अशा उच्च कोटीतील  उपमा दिलेल्या आहेत. तसेच एका प्रसंगात, मदन गोपाल- भैरव-मल्हार ह्यांच्या एका संवादात  राग, लय , हरकत, खटके ह्या शास्त्रीय संगीतातील पारिभाषिक संज्ञांची तुलना रोजच्या व्यवहारातील पूर्णपणे विरुद्ध असलेल्या त्यांच्या अर्थाशी करून नर्म पण दर्जेदार विनोदाची निर्मिती करून प्रेक्षागारात हशा पिकविला. बसंत-बहार रागाचं वर्णन करताना "पंचम स्वराचं पंचामृत शिंपडून आम्रवृक्षावर आनंदाच्या मंजिऱ्या फुलवणारा कोकिळांचा तो बसंत-बहार" अशा अलंकारिक पद्धतीने पण विलक्षण संवेदनशीलतेने केलंय. संत तुलसीदासांचे एक वचन उद्धृत करून 'स्त्री-विरोधी' मत मांडणाऱ्या मंदारशी प्रतिवाद करताना रत्नमाला ‘हे वचन खारट सागराच्या तोंडी घातलंय', असा युक्तिवाद करते. हा संवाद निर्माण करून  लेखकाने रत्नामालेच्या बुद्धिमत्तेची चुणूक तर दाखवली आहेच,  पण पुराणातील वचनांचा चुकीचा अर्थ लोकांनी  लावू नये, असा एक संदेशही अप्रत्यक्षपणे दिला आहे. (मराठी साधारण चांगले असणाऱ्या प्रेक्षकांना हे संवाद जास्त नक्कीच भावतील. बाकीच्यांना कदाचित ग्रीक-लॅटिन वाटू शकतील). असो !!  पहिला अंक दीड तास रंगला. 

सुरेल असलेल्या श्रद्धा जोशीनेही रत्नमाला चांगली साकारलेय. गोड गळ्याच्या गायिका ज्योत्स्नाबाई मोहिले यांनी अजरामर केलेले सो हम हर डमरू बाजे हे बंदिश-cum-पद तिने उत्तम रंगवले. श्रीरंग जोशी यांनी जातीचा कलाकार असलेला पण ऐषारामी आणि कारस्थानी 'मदन गोपाळ' परिणामकारक रंगवलाय. त्यांच्या आवाजात प्रसाद सावकार लपलेत असं मला अध्येमध्ये जाणवले. कदाचित संस्कारांमुळे किंवा सावकारांच्या प्रभावी गानशैलीमुळे असेल . त्यांना चांगल्या माईकची साथ लाभली असती, तर त्यांचा परफॉर्मन्स अधिक चांगला झाला असता. (अभिषेक आणि श्रीरंग ह्या दोघांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्रा. शरद बापट ह्यांच्याकडे घेतले आहे ).  मकरंद, भैरव आणि चंद्रकला ह्यांच्या भूमिकाही चोखपणे बजावल्यायत. मकरंद आणि भैरवाला चांगले पंचेस आलेत, ते त्यांनी छान वापरले आहेत. संगीत नाटकातील गायक कलाकारांना पेलावे लागणारे आव्हान चार पदरी असते. अचूक टायमिंगसह करावी लागणारी परिणामकारक संवादफेक, खिळवून ठेवणारे उत्तम आवाजी गायन (तेही उभे राहून),  वस्त्र पोशाख सांभाळणे ( ज्याला हल्ली आपण carrying the outfit म्हणतो), आणि स्टेजवरील वावर, अशा बऱ्याच गोष्टींचे अवधान गायक-अभिनेत्याला सांभाळावे लागते. असे असूनहि संगीतनाट्यकलेचा आंतर्भाव एक स्वतंत्र कला म्हणून चौसष्ट कलांमध्ये नसावा, हे एक आश्चर्यच आहे.  त्यामुळे संगीत-नाटकातील चांगली भूमिका वठवणाऱ्या कलाकाराला हल्ली बारावीच्या परीक्षेत देतात तसे शंभर पैकी एकशेदहा मार्क दिले पाहिजेत. नाटक बघणाऱ्या सगळ्याच प्रेक्षकांना हे मुद्दे किती appreciate करता येतात, हा मोठाच प्रश्न आहे. म्हणून मुद्दाम मी लिहिलंय इथे. मला मात्र अशा कलाकारांचे खूप कौतुक वाटते. आत्ताआत्ताच्या काळात नव्या पिढीतील केतकी चैतन्य, संपदा माने, नचिकेत लेले, श्रीरंग भावे, अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, श्रीरंग जोशी, अस्मिता चिंचाळकर, सावनी दातार, ओंकार प्रभुघाटे आणि धनंजय म्हसकर ह्या विशीपंचवीशीतल्या कलाकारांनी हे आवाहन पेलून आमच्यासारख्या रसिकांच्या संगीत नाटकांविषयीच्या आशा पल्लवित केल्या आहेत, हे निश्चित !! दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रासारख्या नावाजलेल्या संस्थेने पुढाकार घेऊन असा संगीत-नाट्य महोत्सव आयोजित करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी संस्थेचं कौतुक करतो. अण्णासाहेब किर्लोस्कर, खाडिलकर, सावरकर, कानेटकर,अण्णा गोखले यांसारख्या थोरामोठ्यांनी पुढील पिढ्यांना दिलेला सांस्कृतिक ठेवा जर आपल्याला खरोखरच जतन करायचा असेल, तर अशा प्रकारे संगीत नाटकांचे प्रयोग  महाराष्ट्रात ठीकठिकाणी होणे महत्वाचे आहे.  मात्र ह्याला अजून जोड हवी, ती रसिकांच्या उदंड प्रतिसादाची…….

साथसंगतीची धुरा सांगलीचे ऑर्गनवादक श्री भास्कर पेठे आणि मुंबईचे प्रख्यात व्हायोलिनवादक श्री राजेंद्र भावे यांनी अतिशय उत्तम पणे  सांभाळली. तसेच श्री परेश पेठे आणि श्री चैतन्य करंदीकर ह्यांच्या बोलक्या ठेक्यांमुळे सगळीच नाट्यपदे उत्तम रंगली. नाटक पौराणिक नसले, तरी दरबारातील पात्रांची वेशभूषा करणे हे एक कठीण काम होते, जे शरद बापट यांच्या पत्नी सौ. अनुराधा बापट आणि सौ अंजली भिडे ह्यांनी मोठ्या हिरीरीने आणि कौशल्याने पार पाडले. त्या त्या कलाकारांना तर त्यांच्या यशाचे श्रेय जातेच, पण विशेष करून ते ह्या प्रयोगाचे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रा. शरद बापट यांनाही ते बऱ्याच अंशी द्यावे लागेल. नाही म्हटलं तरी , मुंबई -पुण्याच्या मानाने सांगलीसारख्या ठिकाणी नाट्यक्षेत्राचे एक्सपोजर कमी मिळत मिळते.  पण ही समस्या नाटकाचे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रा शरद बापट यांनी सोडवली. स्वतः बापट हे एखाद्या इलेक्ट्रॉनिक PCB सारखे ऑल-इन-वन असल्यामुळे त्यांच्याकडे दिग्दर्शनातले आणि नाट्यसंगीतातले आवश्यक ते ज्ञान आहे. आय. आय. टी. चे सिव्हिल इंजिनिअर आणि संगीत अलंकार असलेल्या प्राध्यापक शरद बापटांनी ह्यापूर्वी 12 वेळा हे नाटक इचलकरंजी, इंदोर , लखनौ  वगैरे ठिकाणी केले आहे. अनेक वेळा राज्य नाट्यस्पर्धांमध्ये त्यांना संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिकही मिळाले आहे. एव्हढेच नव्हे, तर त्यांनी स्वतः मंदार आणि मदनगोपाळ ह्यांच्या भूमिका त्यात केल्या होत्या. त्यांना संपूर्ण नाटक तोंडपाठ आहे. अगदी  बारीकसारीक गोष्टी त्यांनी ह्या तरुण मुलांकडून करून घेतल्या आणि मुलेही कसोटीला उतरली. ह्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने त्यांना स्वतःला धोतर नेसण्याच्या तीन पद्धती नीट शिकाव्या लागल्या ( आणि अर्थात सावरण्याच्याही !! 😝) सगळी कलाकार मंडळी टॅलेंटेड असली, तरी अनुनभवी असल्याने त्यांच्यावर खूप मेहनत बापटांनी घेतली. काही कलाकारांच्या व्यस्त व्यावसायिक दैनंदिनीमुळे काही तालमी तर Skype वर घेण्यात आल्या म्हणे ( धन्य ते बिल गेट्स आणि स्टीव्ह हॉब्स …..!!  ). 

१९६७ साली, मी पाच-सहा वर्षांचा असताना हे नाटक गिरगांवच्या साहित्य संघ मंदिरात पहिले होते, हे मला अगदी अंधुकपणे आठवतंय. म्हणूनच मी ह्या लेखाचे शीर्षक संगीत मंदारमाला ...... एक 'देजाउ' अनुभव !! असे दिले आहे. प्रत्येक अंकात आपण हे  दृश्य कुठेतरी आधी पाहिलंय असा सारखा भास होत होता. (ज्यांना कुणाला देजाहू ह्या शब्दाचा  नसेल, त्यांच्यासाठी- As per Cambridge English Dictionary, DÉJÀ VU means the strange feeling that in some way you have already experienced in past what is currently happening now). आता ज्या अतुलनीय कलाकारामुळे ''मंदारमाला " अजरामर झाले, त्या कै संगीतभूषण पं. राम मराठे यांच्याबद्दल थोडंसं तरी लिहिल्याशिवाय ह्या लेखाला पूर्णत्व येणे अशक्य. मी पाहिलेल्या प्रयोगात स्वतः रामभाऊ, प्रसाद सावकार आणि ज्योत्स्ना मोहिले होत्या, हे नक्की आठवतंय. पण ह्या तिघांच्याही गाण्याचा दर्जा किती उच्च होता, हे कळण्याचं माझं वय नव्हतं. (तेव्हा कशाला, पण रामभाऊंचं आक्रमक शास्त्रीय गाणं देखील मला गेल्या दहा एक वर्षातच कळू लागलंय असं मी म्हणेन). ह्या नाटकाच्या सगळ्या पदांना रामभाऊंनी एकाहून एक सुंदर चाली लावल्या. शब्द हे ‘चाल’ घेऊन आलेत, कि चाल ‘शब्द’ घेऊन आली हे कळणे सुद्धा कठीण होईल, इतक्या ह्या चाली काव्याशी एकरूप झाल्यायत. आणि नाटकातील बरीचशी गाणी त्यांनी स्वतःच गायल्यामुळे दुग्ध-शर्करा योगच जुळून आलाय. जय शंकरा ह्या शंकराच्या भजनाला भक्तिपूर्ण ‘अहिर भैरव’ची निवड किती योग्य होती, हे ह्या गाण्याच्या पॉप्युलॅरीटीवरून आपल्या लक्षांत येते. टॅक्सीतून येताना रामभाऊंचे चिरंजीव मुकुंद मराठे मला म्हणाले, की त्या काळी नुकतेच शास्त्रीय संगीत समजायला लागलेले रसिक 'अहिर भैरव' हा राग जय शंकरा  ह्या गाण्यावरून ओळखायचे (...... हल्ली ‘अलबेला साजन आयो’ वरून ओळखतात तसे !). तसेच हे गाणं ‘नाटका’त गायचे आहे, ह्याचं भान ठेवून एरवी पुर्वांगींप्रधान असलेल्या अहिर भैरवातली चाल रामभाऊंनी  ‘उत्तरांगी’ ठेवलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.  रत्नामालेला ओळखण्यात केलेल्या चुकीमुळे मंदारच्या मनाची झालेली उलघाल रामभाऊंनी जोगकौन्ससारख्या अतिसंवेदनशील मेलडीत पकडलेय (कोण असशी तू न कळे मजला). मंदारमालामध्ये आणि वेगवेगळ्या मैफिलींमध्ये  रामभाऊंनी गायलेलं हरी मेरो हे मीरेचं भजन त्यांच्या जिनिअसची कल्पना देऊन जातं. आविर्भाव, तिरोभाव आणि वेगवेगळ्या मूर्च्छनानी  ते श्रोत्यांना नुसते खिळवूनच नव्हे, तर अक्षरशः  कसे गुंगवून टाकत, ह्याच्या कथा वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात. (वानगीदाखल मुकुंद मराठ्यांनी ह्यातील रामभाऊंच्या काही बेफाट व्हरायटीज आम्हाला टॅक्सितच ऐकवल्या). ५२ वर्षांपूर्वी मी प्रयोग पहिला तेव्हा, एव्हढं मात्र आठवतंय कि सावकारजींच्या प्रासादिक आणि मधुर आवाजीनं साहित्य संघाचं ऑडिटोरियम काठोकाठ भरून गेलं होतं. मुकुंदजींनी सांगितल्याप्रमाणे “त्या काळी प्रयोगाला आलेले प्रेक्षक शेवटच्या बसंत-बहारच्या जुगलबंदीसाठी शेवटची ट्रेन चुकवत, आणि मग प्रयोग संपल्यावर पहाटेच्या गाडीने जात. एव्हढेच काय, पण फक्त ही रामभाऊ आणि सावकारांची जुगलबंदी पाहण्यासाठी हिंदी चित्रपटाचे सुप्रसिद्ध संगीत -दिग्दर्शक मदनमोहनजी कित्येक वेळा प्रयोगाला येत असत”. ह्यातच सारं आलं .....!!

मंदारच्या मठाचा सेट बघून ‘मंदारमाला’ ह्या नाटकाला जणू काही शंकराचं अधिष्ठान लाभलंय, अशी कल्पना करावीशी वाटली. असं असलं, तरी ते नाटक व्यावसायिक रंगमंचावर उत्तमपणे सादर करणे हे खरोखरंच 'शिवधनुष्य' उचलण्याइतकंच अवघड  आहे. पण हा पराक्रम सांगलीच्या प्रा. शरद बापट आणि त्यांच्या टीमने करून दाखविल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन !!!              
    
                                                               OO******OO





Comments

Post a Comment