Skip to main content

जुळलेल्या पट्टया...!!



जुळलेल्या पट्ट्या ....!!


मी किती चांगलं संवादिनीवादन करतो किंवा कसे, हे खरंच मला माहित नाही. ते ऐकणाऱ्यांना नेमके ठाऊक असते. प्रत्येकाची अपेक्षा असते त्याप्रमाणे जो तो आपापले मत बनवतो. ते वेगवेगळ्या कार्यक्रमा दरम्यानच्या आणि नंतरच्या प्रतिक्रियांवरून माझ्यापर्यंत पोचते. पण थोडीफार संवादिनी वाजवता यायला लागल्यापासून माझी मात्र स्वतःकडून एकच अपेक्षा होती, की आपल्याला स्वप्नातलं पेटीवादन करता आलं पाहिजे आणि संगीताचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. आज वयाच्या ५८ व्या वर्षी का होईना, पण मला स्वतःला समाधान लाभेल इतके पेटीवादन मी करू शकतो आणि  ह्या स्वप्नपूर्तीचे बरेचसे श्रेय माझे गुरुजी पं. विश्वनाथ कान्हेरे ह्यांना आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्लॉगवर प्रकाशित होणाऱ्या माझ्या ह्या लेखाचा सूर आहे ....श्रेयोSर्पणमस्तु !!🙏

सुप्रसिद्ध संगीतज्ञ  महाराष्ट्र टाइम्सचे एके काळचे नावाजले गेलेले संगीत समीक्षक कै. श्रीकृष्ण दळवी यांनी १९९७ साली 'स्वानंदी' नावाची संस्था ठाण्यातील निवडक संगीत-रसिकांसाठी स्थापन केली. सुमारे ७० ते ८० सभासद असलेल्या ह्या छोट्याश्या संस्थेने साधारण सहाएक वर्षांत नुसत्या आघाडीच्याच नाही, तर एकाहून एक दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम ठाण्याच्याच अगत्यशील दाम्पत्य श्री नंदन व सौ चित्रा म्हसकर ह्यांच्या घरी आयोजित केले. ही संस्था अगदी नगण्य शुल्क घेऊन वर्षातून किमान सहाएक तरी प्रोग्रॅम्स देत असे. कार्यक्रम घरी आयोजित

करण्यामागची कल्पना अशी, कि गायक-वादक आणि श्रोतृवृंद ह्यांच्यात जवळून संगीत-संवाद घडावा मैफिलीने आनंदाचा परमोच्च बिंदू गाठावा. अण्णांच्या वजनदार शब्दाला मान देऊन अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला अगदी मनोभावे इथे सादर केली. उदा कै. भाई गायतोंडेकै डी. के. दातार, पं अरुण कशाळकर, पं. उल्हास कशाळकर, विदुषी सौ श्रुती सडोलीकर, पं. सुरेश तळवलकरविदुषी सौ पद्मा तळवलकर, पं शौनक अभिषेकी , विदुषी सौ मंजुषा कुलकर्णी आणि बरेच काही कलाकार. जवळ जवळ सगळ्या मैफिलींचा आनंद मी कलाकारापासून फार तर चारेक फुटावर भारतीय बैठकीवर बसून घेतला. (एव्हढेच नाही तर, काही मैफिलींमध्ये मला कै यशवंतबुवा जोशी, कै. शरद साठे, पं अरुण कशाळकर, पं. गणपती भटविदुषी सौ. अश्विनी भिडे अशा श्रेष्ठ कलाकारांबरोबर संवादिनीची साथसंगत करण्याचे भाग्यही लाभले). १७ जून २००० रोजीची अशीच एक बैठक होती ..... पं. विश्वनाथ कान्हेरे ह्यांच्या एकल-संवादिनीवादनाची ! पंडितजींनी झूमऱ्यामध्ये ढंगदार बागेश्री पेश केला. त्यांचे संवादिनीवादनातील प्रभुत्व पाहून मी अर्थातच खूपच प्रभावित झालो. बागेश्री ही नाजूक मेलडी आहे हे अचूक हेरून बुवांनी तो अतिशय कलात्मक पद्धतीने सादर केला. त्यांच्या नजाकतदार हातातून बागेश्रीत आधीच अलिप्त असलेल्या पंचमाचे एक वेगळे रूप ऐकायला मिळाले. मध्यंतरात, आकाशी रंग दिलेल्या म्हसकरांच्या ग्रीन-रूममध्ये अण्णांनी माझी ओळख कान्हेरेंशी करून दिली. " हा विकास.. !! ह्यालाही पेटीवादनात खूप रस आहे" वगैरे त्यांना सांगितले. कान्हेरे एव्हढंच म्हणाले कि " ते लक्षात आलंय माझ्या..". वेळोवेळी माझ्याकडून जाणारी दाद बहुधा त्यांच्या लक्षात राहिली असावीअगदी काही क्षणांपूर्वी बाहेरच्या खोलीत संवादिनीवर 'चमत्कार' करून दाखवणाऱ्या कान्हेरेंजींनी माझा 'नमस्कार' सहर्ष स्वीकारला. ही त्यांच्याशी झालेली माझी पहिली भेट !!

ह्यानंतर एखाद वर्ष गेलं असेल. माझी नोकरी सांभाळून त्या काळी मी वीकेंडला थोड्याफार पेटीच्या साथी करत असे. पण सोलो किंवा एकल संवादिनीवादनावर फोकस चांगलाच कमी झाला होता असं म्हणता येईल. त्यामुळे रियाजही कमी होता. माझा गायनातला वाढत जाणारा इंटरेस्ट आणि प्रगती पाहून १९९२ मध्ये काळे गुरुजींनी पेटी शिकविण्याचे  थांबवून मला २००० सालापर्यंत (म्हणजे सलग ८ वर्षे) फक्त ख्यालगायन शिकवलं. मोठे आणि छोटे मिळून साधारण अडीचशे ख्याल त्यांनी शिकवले. त्यातले बरेचसे मला अजूनही येतात. पण २००१ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. मग सगळंच ठप्प झालं. एकीकडे माझी करिअर देखील ऐरणीवर आली होती. ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम असा झाला, कि माझे एकल वादन माझे मलाच निरस वाटू लागले. वास्तविक पहाता पद्धतशीरपणे गाण्याची तालीम घेतल्याने रागांचे आकलन आता पूर्वीपेक्षा बरे झाले होते. मग वादनात निरसपणा का बरं असावा ?? कदाचित माझ्या वादनात प्रेरणेची जी 'फुंकर' पाहिजे ती नव्हती (जी आधी होती!). वादनात आणखीही काही व्हिटॅमिन्स कमी असावीत. पण 'आत्मपरीक्षण' हे बरेच वेळा मनुष्याला अवघड जाते, हे खरे. माझे पेटीवादन कुठेतरी अडल्यासारखे मला वाटू लागले होते. त्यातलं प्रवाहीपण लुप्त झाल्यासारखे वाटत होते. पण नक्की काय झालंय ते नेमके कळेना. त्यामुळे बेचैनी वाढत होती हे मात्र खरे.... !!

एके दिवशी ही गोष्ट माझे ज्येष्ठ आणि रसिक चुलत बंधु कै. सुधीर कात्रे ह्यांना खाजगीत मी सांगितली. मला अपेक्षित होते त्याहीपेक्षा सुधीरने ही गोष्ट जास्त सिरिअसली घेतली आणि माझ्यापुढे एक प्रस्ताव मांडला. तो म्हणाला "मी अण्णा दळवींना तुझ्या घरी घेऊन येतो आणि तू त्यांना एक तासभर पेटीवादन ऐकव. मग तेच काय ते सांगतील". आणि एक दिवस सरळ अण्णांना माझ्या घरी घेवून आला व मला पेटी चांगली तासभर वाजवायला लावली. सुरवातीला भिंतीला टेकून बसलेले अण्णा माझे वाजवून संपले, तेव्हा एक फूटभर पुढे आलेले माझ्या नजरेनं टिपलं होतं. पण अण्णांच्या चेहेऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नव्हती. अण्णांचे ते ऐकणे !! खूप उशीर झाला होता. त्यामुळे त्यांनी लगेच निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी बरोब्बर सकाळी नऊ वाजता त्यांचा फोन आला.  माझ्या वादनात चांगले काय, कमी काय आहे ते नीट समजावून सांगितले व मला सुचित केले कि " तू जिथे अडला आहेस, त्यावर एकच उपाय म्हणजे विश्वनाथ कान्हेरे !! तू ह्या गोष्टीवर विचार कर आणि मला सांग काय ते, म्हणजे मी विश्वनाथला सांगून ठेवेन त्याप्रमाणे.....". 

अरे बाप रे, विश्वनाथ कान्हेरे हे नांव खूपच मोठं होतं. एव्हढ्या मोठ्या व्यक्तीकडे जायचं, म्हणजे आपल्यालाही कलेला वेळ देता आला पाहिजे ना ?? त्यामुळे मी विचारात पडलो. नोकरीच्या व्यापामुळे त्यानंतरही चारेक महिने गेले. थोडीशी टंगळ मंगळहि झाली असेल माझ्याकडून कदाचित. पण मग अचानक एक प्रसंग घडला. ५ एप्रिल २००२ रोजी आठव्या राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा पहिला दिवस होता. ह्यात दोन मोठे कलाकार सादर करणार होते. एक होते पं. गणपती भट आणि मग गाणार होत्या डॉ. अश्विनी भिडे देशपांडे !! मला आयोजकांनी पं. भटांबरोबर पेटीच्या साथीला निमंत्रित केले होते, तर अश्विनीताईंबरोबर साथीला बसणार होते पं. कान्हेरे ! आमची ग्रीन रूममधली पेट्या तबल्यांची जुळवाजुळव झाल्यावर, अचानक माझ्यासमोर कान्हेरेंबुवा येऊन उभे ठाकले. मी अर्थात रीतसर नमस्कार केला. पण पुढे काही बोलायच्या आत, पान लावता लावता ते म्हणाले " ऐकून आहे कि तू शिकायला येणार आहेस म्हणून. बघू कधी मुहूर्त लागतो तुला ते ". आई शप्पथ, एकदम दिव्य बाणच सोडला त्यांनी आणि माझ्याही तो वर्मी लागला. त्यांना 'सॉरी' म्हणून माझ्याकडून झालेल्या दिरंगाईबद्दल मी थातुरमातुर कारणमीमांसा केली, पण लगेच नम्रपणे विचारणाही केली " पुढल्या आठवड्यात येऊ का ?". ते म्हणाले " जरूर या......!!" 

नंतर आठवड्याभरातच एके दिवशी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी थेट त्यांच्या नॅन्सी कॉलनीतल्या घरी पोहोचलो. अर्चनाताई बँकॉकला गेल्या होत्या आणि  मुलगा निषाद ऑफिसला. त्यामुळे आमची भेट अगदी 'वन टु वन' झाली. त्या घरघुती वातावरणात मला बुवांशी संवाद साधणं सोपं गेलं. समोरच्या व्यक्तीवर लगेच छाप पडेल असे रुबाबदार व्यक्तिमत्व, निकोप तब्येत, जणु काही समोरच्या व्यक्तीचा वेध घेणारा नजरेचा कटाक्ष, विद्वत्तेचे लक्षण मानले जाणारा विशाल भालप्रदेश, तरतरीत नाक, त्यावर शोभून दिसणारी रिमलेस चष्म्याची सोनेरी फ्रेम आणि मुख्य म्हणजे पूर्ण खोलीला व्यापून टाकणारा त्यांचा ऑरा (Aura), असे त्यांचे थोडक्यात वर्णन होईल. माझ्यावर थोडेसे दडपण होतेच. वैयक्तिक पातळीवर मला वागण्या-बोलण्यात 'पारदर्शकता' आवडते. त्यामुळे सुरवातीलाच आत्तापर्यंत मी केलेल्या गाण्या-वादनाच्या व्यासंगाविषयी सगळं काही त्यांच्या कानावर घातलं. मी किती पाण्यात आहे, हे तर त्यांना माझं वादन ऐकून कळणारच होतं. पण ते वेगळं. मुळात आपल्याकडे शिकू इच्छिणारा हा विद्यार्थी मेहेनती आहे,  हे त्यांना कळणे मला महत्वाचे वाटले. त्यांनी सगळं निमूट ऐकून घेतलं.  म्हणाले "ठीक आहे!". तसे ते मितभाषी आहेत आणि 'संभाषणचतुर' तर अजिबातच नाहीत.  तसं बघायला गेलं तर त्यांची आणि माझी ही खऱ्या अर्थी आमनेसामने पहिलीच  भेट होती. एव्हढं मात्र मी त्यांना म्हटलं कि मला स्वतःच्या आनंदासाठी शिकायचंय. स्टेजवर वाजवलंच पाहिजे, असा काही माझा आग्रह नाही. त्यावर ते लगेच म्हणाले" छे छेsss, मग मी मुळीच शिकवणार नाही. तुम्ही घरी कोपऱ्यात बसून वाजवणार, त्याचा मला काय फायदा ??".सुरवातीलाच डॉ. लागूंसारखी त्यांच्या डोळ्यातील जरब बघून हा एक 'ज्वालामुखी' असावा असंही मला वाटलं होतं. मगाशी तो 'निद्रिस्त ' वाटला होता, पण आता मात्र हळूहळू 'जागृत ' वाटू लागला.  पण जे काही असेल त्याला आज सामोरं जायचं मी ठरवूनच आलो होतो. म्हणाले आधी "आपण जेवुन घेऊयात".  मी म्हटलं चला जाऊया बाहेर जेवायला. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी स्वतःच जेवण बनवायला सुरुवात केली. मला धक्काच बसला. स्वयंपाकातलं बरंच काही त्यांना करता येतं, हे समजलं. आमटी-भाताचं चवदार जेवण झालं. पहिल्याच भेटीत गुरूने स्वतः बनवलेलं जेवण (कि प्रसाद..???) कितीशा शिष्यांच्या नशिबात असतं ???

ह्या रुचकर मध्यंतरानंतर त्यांनी दोन सुबक पेट्या गवसणीतुन बाहेर काढल्या. अत्यंत सुरेल आणि गंधार ट्यून करून तंतोतंत जुळवलेल्या; अगदी धाग्याचा सुद्धा फरक नाही. म्हणाले वाजवायला सुरुवात करा. मला जरा टेन्शनच आले. एव्हढ्या कीर्तिवंत संवादिनीवादकाच्या समोर मी पहिल्यांदाच वाजवणार होतो. अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत माझी वादनाची स्केल काळी होती. पण आज मात्र मला सफेद चार मध्ये वाजवायला लागणार होतं. पेटीवर स्केलप्रमाणे की- बोर्ड वरील हात टाकण्याची पद्धत, बोटांच्या हालचाली आणि वापर बदलतो. त्यामुळे जरा पंचाईतच होती. वेळ जरी दुपारी एकची होती, मला त्या क्षणी जे सुचलं ते वाजवायला घेतलं.  काळेबुवांची बसंत मूखारी रागातील 'सपना से बना जिया मोरा' ही सुंदर बंदिश मी १० मिनिटे त्यांना जमेल तशी वाजवून दाखवली. मी वाजवलेल्या मुखारीतल्या षड्ज, कोमल रिषभ, गंधारमुळे कि काय, पण बुवांचा काहीतरी मूड लागल्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसू लागल्या. त्यांनी पांढरी चार मध्ये नीट तानपुरा लावला आणि अहीर भैरव सुरु केला. मला जे जमेल ते फॉलो  करायला सांगितलं. अगदी पहिल्या षडजाच्या लगावापासूनच त्यांचे वाजविण्याचे तंत्र खूपच वेगळे आहे, हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही. वादन अतिशय सुरेल, विचारातील स्वच्छता, हातातील नखरा, वाद्यावरील नजाकत तसेच प्रभुत्व, आत्मविश्वास, उपज अंग आणि प्रत्येक स्वराकृतीतील वेगळेपणा ह्यामुळे काही मिनिटातच ते वादन मला एखाद्या परिकथेतील स्वप्ननगरीत घेऊन गेले. सुरवातीला नजाकतदार आलापी आणि नंतर लयकारीचे हेलकावे तसेच दाणेदार स्वच्छ सपाट तानांची आतषबाजी ह्या सगळ्यामुळे बुवांच्या नॅन्सी कॉलनीतल्या त्या जागेत एकदम माहोल बनून राहिला. इतकं मनस्वी पेटीवादन मी प्रथमच ऐकत होतो. आपण शोधात असलेला हाच तो 'गुरु' ह्याचा साक्षत्कार झाला.  अर्थातच, इथे शिकण्याचा निश्चय झाला. (अण्णा दळवींचे मनोमन मी आभार मानले). दुसरी पेटी घेऊन मी समोर बसलो होतो. त्यांचं जे काही पेटीवर चाललं होतं, त्यातलं आपल्या हातातून फार काही निघणार नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे निदान आयती चालून आलेली 'मंत्रमुग्धावस्था' तरी  पुरेपूर अनुभवण्याचं मी ठरवलं. पहिलीच शिकवणी सलग अडीच तास चालली. आम्हाला दोघांनाही बैठक सोडून उठायला अवघड गेले. सकाळी साडेदहाला मी आलो होतो, पण संध्याकाळी साडेचारला मी तिथुन बाहेर पडलो. भारावलेल्या अवस्थेमुळे बोरिवलीहून ठाणे कधी आले तेच कळलं नाही. डोक्यात पहिल्या ट्युशनच्या अहिर भैरवाने थैमान घातले होते आणि एकीकडे गुरुजींचा सफेद चारमध्ये पाण्यासारखा फिरणारा हात दिसे. माझ्या डोक्यातील बंद असलेली कुठलीतरी झडप उघडली असावी, असा भास झाला. मी पूर्णपणे नादावलो होतो. घरी पोचल्यावर कसाबसा चहा घेऊन लगेच लहान मुलासारखी आधी पेटी काढली आणि डोक्यातील 'अहिर भैरव'रुपी वादळाला वाट मोकळी करून दिली. यथेच्छ दोन तास पेटी वाजवून काढली आणि तसा फोनही गुरुजींना केला. ते फक्त हसले..... !!

त्यानंतर नियमितपणे मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. याआधी मी ठाण्याच्या कै. विनायकबुवा काळे ह्यांच्याकडे जवळ जवळ दहा वर्षे  पेटीवादन आणि नंतर ख्यालगायन शिकलो असल्याने माझ्या वादनात थोडा गायकी अंगाचा प्रभाव असावा. पण दुसरीकडे इंस्ट्रुमेंटल अंग कमी होते, असेही म्हणता येईल. नाही म्हणायला कै गोविंदराव पटवर्धन, कै. मनोहरजी चिमोटे ह्यांच्या कॅसेट्स वरून थोडेफार कित्ते मी गिरवले होते( सुरवातीच्या काळात कुठल्या कलाकाराला अनुकरण चुकलंय ??) पण काही केल्या माझ्या वादनाची 'मूस' तयार होईनाकान्हेरें गुरुजींकडे जायला  लागल्यावर वाद्याच्या अंगानेही बरीच काही अभिव्यक्ती होऊ शकते, हे लक्षांत आलं. अण्णांनी केलेल्या भाकिताप्रमाणे माझे वादन गतिमान होऊ लागले. संवादिनी हे वाद्य हाताला किती वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रतिसाद देऊ शकते ते हळूहळू कळू लागलं. त्यामुळे मी त्यांच्या संवादिनीशैलीत स्वतःला चिंब भिजवून घायचं ठरवलं. प्रत्येक शिकवणीत असं वाटायचं, कि आपल्याला नेमकं हेच हवंय. तेव्हा मी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जबाबदारीच्या पदावर असल्याने कामामध्ये खूपच व्यस्त असायचो. नोकरीनिमित्त टुरिंग बरंच होतं. पण कुठल्याही परिस्थितीत रविवारी मी बुवांकडे जायचोच. जमेल तसे ह्या नवीन वादनशैलीचे संस्कार मी हातावर आणि मेंदूवर करून घेतले. अगदी दाढी करताना सुद्धा मी ट्युशनची कॅसेट ऑन करून ऐकत असे. छोटे छोटे वेळेचे स्लॉट हेरून तेव्हा मी बुवांच्या वादनाचे श्रवण श्रद्धेने करीत असे. आत्ता केलं नाही, तर पुन्हा केव्हा करणार हा प्रश्न होताच. कारण मी चाळीशी नुकतीच पार केली होती.  'सफेद चार' ह्या पट्टीची वेगळी मेहेनत असायची. बुवांची बाराच्या बाराही पट्ट्यांवर कमांड होती.  ती त्यांच्या ऑर्गन वादनातून आणि साथ संगतीतून दिसतेच. त्यांचे एकल वादन क्लिष्ट नव्हते पण अवघड मात्र होते. पण आकर्षित करणाऱ्या ह्या फेदर-टच वादनशैलीमुळे, ती आत्मसात करण्यासाठी लागणारे कष्ट कधी जाणवलेच नाहीत.

पुढच्याच शिकवणीत त्यांनी भीमपलास सुरु केला. मुखडा थेट कुमारजींच्या पद्धतीने ..!!  (प नी सा ग सारेसा ). मध्यलय तीन तालात १५ व्या  मात्रेवर सुरु होणारा आणि कुमारजींच्याच तडफेने समेवर येणार मुखडा. ऐकायला छान वाटत होता, पण मी जरा गोंधळून विचारलं " ह्या मुखड्याला साजेशी आलापी पेटीवर होईल का ??".  बुवा म्हणाले माझ्याबरोबर चला तुम्ही. पुढे पाऊण तास त्यांनी हाच मुखडा खुलवून दाखवला. सारं कसं आनंदाने चाललं होतं. बुवा जी काही गत, मुखडा, बंदिश वाजवायला घेतात,  त्यातील सगळी सौंदर्यस्थळे आणि मात्रेगत स्वरस्थाने त्यांच्या पक्की लक्षात असतात. त्यात कुणी शिष्यानं वाजविताना बदल केला,तर ते त्वरित त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा वाजवून दाखवतात. २००२ पासून सोळा वर्षांच्या मोठ्या कालावधीत माझ्या गुरुजींशी असंख्य गाठीभेटी झाल्या. बरेच वेळा शिकण्याच्या निमित्ताने, तर कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने. प्रत्येक भेटीचे वैशिष्ट्य वेगळे, राग वेगळा, अनुराग वेगळा, मूड वेगळा आणि तालीमही वेगळी !! यमन , बिहाग , भैरव , अहिर भैरव, नटभैरव, चारुकेशी, पुरिया कल्याण, पुरिया धनाश्री, मुलतानी, पटदीप असे नेहमीचे ऐकण्यातले राग तर झालेच, पण हार्मोनियमवादनासाठी अवघड जाणाऱ्या रागांची तालीमही बुवांकडून मिळाली. जसे कि बिलासखानी तोडी, श्री, पूर्वी, छायानट, नट केदार इत्यादी. हार्मोनियमवर हे राग बुवांना एव्हढे अवगत कसे ह्यावर मी विचार केला. त्याचे उत्तर फार कठीण नाही. कित्येक मोठ्या मोठ्या गवयांना बुवांनी अगणित वेळा साथसंगत केली, ती अतिशय जाणीवपूर्वक. एकीकडे व्यवसाय जपून त्यांनी अभ्यासही केला.  सगळं चांगलं ऐकलेलं आणि वाजविलेलं संगीत त्यांनी मनात साठवून ठेवलं. स्वतंत्र बुद्धीनं विचार, चिंतन आणि मनन केलं. ते सगळं आता एखाद्या कारंजाप्रमाणे बाहेर येतंय. बुवांनी कुठेच त्याला अटकाव केलेला नाही. हातात बेड्या घालून त्यांनी कधीच वाजवलं नाही.

त्यांच्या जोडरागांच्या निर्मितीचा उगम ह्यातच असावा. असेच एकदा गुरुजींकडे ट्युशनच्या वेळी मी जरा आतल्या खोलीत कुठलीशी कॅसेट आणण्यासाठी गेलो होतो. बाहेर येतोय, तोवर बुवांनी कुठल्यातरी नवीन जोड रागाची मांडणी  पेटीवर सुरु केली होती. एकदम वेगळी आणि गोड सुरावट !! नंतर मी विचारलं तेव्हा म्हणाले कि " ह्या रागातील बंदिशीचा मुखडा मला रामभाऊ मराठे ह्यांच्या एका मैफिलीचा वेळी ग्रीन रूम मध्ये सुचला होता. नंतर काहीच पुढं झालं नाही त्याचं. अचानक आज पुन्हा तोच मुखडा डोक्यात आला. दुसरी ओळ आणि अंतरा देखील झाला ". हा होता यमनी मांड !! ह्या झपतालातील बंदिशीत एक विशिष्ट कान्हेरे टच आहे आणि त्यामुळे बंदिश एकदम वेगळ्या ढंगाची वाटते. यमनी मांड बरोबरच अनेक जोडराग बुवा अतिशय उत्साहाने वाजवतात. उदा . बहुलश्री, केदार भाटियार, हिंडोल बहार, गोरखकौन्स, बसंती कंस, भिन्न कंस वगैरे. (भिन्न कंस हा त्यांनी निर्मिलेला राग तर जोगकंस सारखा मोठा राग आहे). जोडरागात एक खास जोडबिंदू किंवा सांधा असतो, तो कृत्रिमपणे न दाखवता दोन विरुद्ध प्रकृतीच्या रागांच्या संवादाने दाखवायचा असतो, असे तत्व ते सांगतात. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कथाकथनकार कै. व. पु. काळे यांच्या प्रत्येक कथानकाची मूळ कल्पना जशी चमकदार असायची, तद्वतच कान्हेरेबुवांच्या जोडरागातील कल्पना चमकदार असतात. ह्या जोडरागांच्या प्रेमाचे श्रेय ते त्यांचे एक गुरु स्व. रामभाऊ मराठे ह्यांना देतात.


आता बुवांच्या वादनातील वैशिष्टये काय काय आहेत त्याबद्दल थोडेसे !! कान्हेरेंबुवांच्या संवादिनीवादनाची उंची अधोरेखित करण्यासाठी एकल संवादिनीवादनाचा अगदी संक्षिप्त धांडोळा घ्यावा लागेल. साधारण १९८० साली माझे गुरुजी कै. विनायकबुवा काळे ह्यांनी गुरुपौर्णिमेच्या एका कार्यक्रमात पेटीवर यमन रागातीलहारवा मोरा रे’ हा ख्याल वाजवला होता. हे माझ्या आयुष्यात मी ऐकलेले पहिले सोलो वादन !! पण ह्या वादनाचा प्रभाव एव्हढा होता कि पुढे मी काळेबुवांकडे वीसेक वर्षे संवादिनी वादन आणि ख्यालगायन शिकलो.  त्या काळी रेडिओवर सकाळी ११. ३० ला कधीतरी शास्त्रीय हार्मोनियम वादन लागत असे. ते मी बहुतेक चुकता ऐकत असे. कारण महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रामध्ये आकाशवाणीची त्या दिवशीची दिनदर्शिका यायचीह्यामध्ये कै. पं. शिवराम, कै गोविंदराव पटवर्धन, कै तुलसीदास बोरकर, कै बबनराव मांजरेकर, कै  मनोहर ओटावकर, कै दशरथ पुजारी, कै वासंती म्हापसेकर, पं. विश्वनाथ कान्हेरे अशा एकाहून एक गुणी वादकांचे वादन मला ऐकायला मिळाले. वेळेला अनुसरून किंवा काय, पण ह्यामध्ये बरेच वेळा सारंगचे प्रकार, मधुवंती, क्वचित अहिर भैरव, तोडी , रामकली ह्यापेक्षा वेगळे राग ऐकायला मिळाले नाहीत. शिवाय वादनाचा आकृतिबंध ठरलेला असे. बहुतांशी विलंबित एकताल असे आणि मग एखादी द्रुत बंदिशवादनात खूप नेटकेपणा असे, पण मुक्तपणा (स्वैरपणा नव्हे हं...!!) अजिबात नसे. वादन काहीतरी अभ्यासक्रमातलं आहे असे वाटे. (अभिव्यक्तीसाठी कलाकाराला स्वातंत्र्य लागते हे रेडिओवाल्यांना माहिती होते कि नाही देव जाणे...) सहसा पेटी खर्ज-नराची असे. पण हे कार्यक्रम मला संवादिनीची आवड लावायला पुरेसे होते, कारण मला संवादिनीच्या सुराचे आकर्षण होते . आमच्या डिपार्टमेंट अभ्यासिकेचे ग्रंथपाल श्री. शेरीकर ह्यांनी माझी पेटीवादनाची आवड लक्षात आल्यावर मला कौतुकाने त्यांच्या भांडुपच्या घरी नेऊन एकदा HMV कंपनीने काढलेल्या साताठ जुन्या जमान्यातील साडेसात मिनिटांच्या हार्मोनियमवादनाच्या रेकॉर्ड्स ऐकवल्या. त्यामध्ये स्व. गोविंदराव टेंबे, पी. मधुकरजी, विठ्ठलराव कोरगावकर, हरनाम सिंग आणि झरीन दारूवाला ह्यांच्या रेकॉर्ड्स होत्या. ह्या सर्व रेकॉर्ड्समध्ये एक उडती गत घेऊन ती अलंकारीक पद्धतीने ( जास्त  करून acrobatic करून ) खुलविण्याची पद्धत होती. हात मात्र सगळ्यांचेच पेटीवर भलतेच तयार होते. नंतर कॅसेटच्या जमान्यात मी घेतलेल्या पहिल्या तीन कॅसेट्स म्हणजे कै गोविंदराव पटवर्धन, स्व. पु. ल. देशपांडे  आणि कै मनोहरजी चिमोटे ह्यांच्या !! ह्यामध्ये गोविंदरावांच्या वादनाचा बाज उडताच होतापण त्यांचे वादन रेशमी होते. चिमोटेजींचे वादन मला खूप वेगळं वाटलं. त्यांनी पहिला सूर  लावल्यानंतर  हे वादन सहज दीड दोन तास तरी चालेल ह्याची खात्री पटे. पुलंनी पेटीतल्या नखऱ्याचा मनमुराद आस्वाद घेतला आणि सर्वसामान्य श्रोत्यांना नाट्यगीतांचा खूप आनंद दिला.

आपल्या महाराष्ट्रात नर-नराची पेटी रुजलेय (जिचा आवाज जरा फिमेलीश असतो). गेल्या चाळीस-पन्नास वर्षात कै. कुमार गंधर्व, पी. मधुकरजी, चिमोटेजी, कान्हेरेजी, बोरकर गुरुजी, वाणी काका, मैती काका ह्यांच्या गंधार ट्युनिंगच्या ज्ञानामुळे आणि पुढाकारामुळे संवादिनी 'सुरेल' झालेय  हे नक्की. संगीतज्ञ आणि संवादिनीवादक डॉ. विद्याधर ओकांच्या २२ श्रुतींच्या मेलोडियममुळे तर ती अधिक श्रवणरम्य झालेय. पण ही झाली वाद्याची तांत्रिक प्रगती. एकल हार्मोनियमवादकांनी अजूनही ह्या वाद्यावर अधिक प्रगल्भ सांगीतिक आशय मांडण्याची आवश्यकता वाटते. अजून सुद्धा साचेबंद एकल हार्मोनियमवादन बरंच ऐकायला मिळते. ह्याचं कारण Performance anxiety असू शकतं. शिवाय संवादिनीची भाषा 'न' कळणे हे देखील आहे. कदाचित  संवादिनी ह्या वाद्याच्या उत्क्रांतीची ही एक अवस्था असेल. ह्या पार्श्वभूमीवर कान्हेरेबुवांच्या वादनाचे मूल्यमापन करावे लागेल. कान्हेरेबुवांना संवादिनीची भाषा पूर्ण अवगत आहे. असामान्य प्रतिभाशक्ती आणि धाडस यांबरोबरच त्यांच्याकडे संगीतातली सौंदर्यदृष्टी  देखील आहे. त्यामुळे त्यांचे वादन परिणामकारक होते.  वाद्याचे अंग आणि गायकी अंग ह्याचा उत्तम संगम त्यांच्या  वादनात आहे. पण गायकी अंगाने वाजवतो असा त्यांचा कधी अविर्भावही नसतो (प्रयत्न मात्र असतो). किंबहुना हार्मोनियम हे वाद्य कसे हाताळावे ह्याचा ते स्वतः एक वस्तुपाठच आहेत. एक ज्येष्ठ आणि गुणी हार्मोनियमवादक श्री राजेंद्र वैशंपायन म्हणतात “कान्हेरेबुवां संवादिनीच्या सुराला जी ट्रीटमेंट देतात आणि जो टोन त्यांच्या वादनात आहे, तो इतर संवादिनीवादकांसाठी एक आदर्शवत आहे”. पट्ट्यांवरील दाब, कुठे विराम (Pause) घ्यायचा, कुठे सपाट स्वराकृती घ्यायची, भाता सोडल्यावर काय वाजलं पाहिजे, भरल्यावर काय वाजलं पाहिजे ह्यासंदर्भात त्यांचे विचार ऐकण्यासारखे आहेत. तालावर विलक्षण हुकमत आहे. त्यांच्या वादनशैलीत Originality आहे. 

मुश्किल बात पेटीवर खूप कमी ऐकायला मिळते. हार्मोनियम हे वाद्य सुलभ असल्याने, जे सोपे असेल  ते वाजविण्याकडेच वादकाचा कल असतो. हार्मोनियमची पट्टी काय बिचारी ....दाबल्यावर तिला वाजावेच लागते. त्यामुळे बोटाला येईल तेही वाजविण्याची सवय एखाद्याला लागू शकते. वादनातील विचार मागे पडतो. मग हातातून मुश्किल बात निघणे आणखीच दूर.  त्यासाठी खूप आणि जाणीवपूर्वक ऐकावं लागतं, चिंतन व्हावं लागतं त्यानुसार मेहेनतही करावी लागते. हार्मोनियमवादकांच्या काही टिपिकल पारंपरिक किंवा Perennial समस्या आहेत. पेटीवर जरा हात फिरायला लागला, कि गवई त्यांना साथीला घेऊन जातात. गवयाला फक्त साथीदाराने फॉलो करणेच अभिप्रेत असते. त्याच्या वादनात फार काही विचार अपेक्षित नसतो. किंबहुना तसा काही  विचार साथीदाराच्या वादनात दिसलाच, तर तो गायलेल्या गाण्याशी विसंगतही ठरू शकतो. साथीचे वादन सोलोच्या दिशेने झुकू शकते. एकदा साथसंगत चांगली जमू लागली, कि पेटीवाले बिझी होतात. आता तर विचार करायला वेळही मिळत नाही. सोलोच्या  रियाजाला तर नाहीच नाही. परिणामी सोलोवादन अपूर्णच राहते.  संवादिनी साथसंगत आणि एकलवादन ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत आणि त्याचे पोषण करण्यासाठी लागणारा रियाज देखील वेगळ्या प्रकारचा आहे. ( त्यावर परत कधीतरी वेगळे लिहुयात.) साथसंगतीसाठी सर्व पट्ट्यांमध्ये वाजवायची तयारी, उत्तम श्रवणशक्ती, orchestration चे तारतम्य किंवा सेन्स, टीमवर्क असे काही गुण अत्यावश्यक आहेत. सोलो वादनात परिपक्व संगीत विचार, सौंदर्यदृष्टी, प्लॅनिंग, बिनतोड मेहेनत आणि वादनातील विचार आणि नैपुण्य अशा सर्व गोष्टींचा मिलाफ असावा लागतो.  अर्थात नुसत्या सोलोवादनाने चरितार्थ चालविणे शक्य होणार नाही हेही तितकेच सत्य आहे. (....कदाचित 'अच्छे दिन' आल्यावर शक्य होईलही! 😆) पण कान्हेरेबुवा ह्या सगळ्याला अपवाद ठरले. त्यांनी दोन-चार हजार मैफिलींना तसेच संगीत नाटकांना साथ तर केलीच, पण सोलोवादनाचा विचारही खूप लवकर केला आणि त्यासाठी लागणारी वेगळी मेहेनत त्यांनी केली (आणि अजूनही करतात). आजचे त्यांचे परिपक्व संवादिनीवादन हे त्याचंच फळ आहे.

हिंदुस्थानी संगीतातील षड्ज-मध्यम , षड्ज-पंचम ह्या संवादी जोड्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. हेच तत्व असलेल्या निषाद-गंधार, मध्यम-निषाद अश्यासारख्या विविध रागातील जोड्या बुवांच्या हातातून अगदी सहजपणे आणि वायुवेगाने जातात.  त्या कृत्रिमतेने वाजवता मैफिलीत ते ते राग वाजविताना नैसर्गिकपणे त्यांना स्फुरलेल्या असतात, हे महत्वाचे. कुठल्याही मात्रेवरून उठून ते अर्थवाही सांगीतिक आशय निर्माण करू शकतातमग ती लयकारी असो किंवा तान असो. विशेष करून तानांचे टायमिंग तर एकदम सचिन तेंडुलकर सारखे !! तिन्ही सप्तक व्यापणाऱ्या एकाहून एक सपाट ताना हे एक बुवांच्या वादनाचे वैशिष्ट्य आहे. जरी संवादिनी हे सुलभ वाद्य असले, तरी अशा सपाट ताना खास टायमिंगने वेगवेगळ्या तालांच्या आणि  मात्रांच्या कोंदणांमध्ये वाजविता येणे, हे सिद्धी असण्याचे लक्षण आहे. (ह्यावर शॉर्ट कट म्हणून कित्येक पेटीवाले दोनदोन तीनतीन स्वरांचे पलटे वाजवतात. इथे वादकांचा क्लास बदलतो असं माझं मत आहे). बुवांच्या संगीत विचारांत आणि हातात तिळमात्र पुसटपणा नाही.

कान्हेरेबुवांचे वादन अतिशय वैविध्यपूर्ण तसेच प्रयोगशील देखील आहे आणि त्यात एक प्रकारचा ताजेपणा आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ते उपज अंगाने वादन करतात. एखाद्याला स्वप्ने पडतात ना, तशा त्यांना नवनवीन स्वरकल्पना सुचतात. मग तो एखादा नवीन राग असेल, एखादी गत असेल किंवा एखादी उपज असेल. डोक्यात आलेले सांगीतिक विचार ते प्रत्यक्षात उतरवू शकतात. कधी कधी मात्र ते जरुरीपेक्षा जास्त extempore वाजवतात असं मला वाटतं. पण तो स्वभावाचा भाग असावा. वानगीदाखल ह्याची काही उदाहरणे देता येतील. २००४ मध्ये आम्ही सगळ्यांचे लाडके हार्मोनियम-तंत्रज्ञ् कै माधवराव वाणी यांचा अमृत महोत्सव ठाण्यात साजरा केला होता. कै. भाई गायतोंडे, कै. अण्णा दळवी, सौ. अर्चनाताई अशी मंडळी ह्याला उपस्थित होती. त्यानिमित्ताने कान्हेरेबुवांचे वादन झाले. त्यांनी राग निवडला होता मारू बिहाग ! वाणीकाकांचे स्वयंभू- गंधार-कौशल्य ( तथा गंधार-ट्युनिंग ) हे त्या दिवशीचे 'प्रयोजन’ मानून बुवांनी शुद्ध गंधाराला प्राधान्य देत हा राग सादर केला. असाच एक किस्सा फेब्रुवारी २००५ मध्ये 'सूरसंवाद' संवादिनी संमेलनातील आहे. संमेलनाची सांगता कान्हेरेंजींच्या वादनाने होणार होती. आम्हा सर्वच शिष्यांना उत्सुकता होती कि आज गुरुजी काय ऐकवणार ह्याची. म्हणून आम्ही ग्रीनरुम मध्ये धडक मारली. तिथे चारुदत्त फडक्यांच्या तबला साथीत गुरुजींची छायानट रागात लयकारी चालू होती. आम्हाला वाटलं आज छान आणि वेगळं ऐकायला मिळणार. पण स्टेजवर आल्यावर बुवांनी जय जयवंती राग सुरु केला. अर्थात ही देखील आम्हाला पर्वणीच होती. कलाकृतीतला ताजेपणा हा देखील श्रोत्यांना खूप आनंद देऊन जातो. अगदी अलीकडे एका कार्यक्रमात बुवांची ओळख करून द्यायची जबाबदारी माझ्यावर आली. मी त्यांना स्टेजवर जायच्या आधी काय वाजवणार असं विचारलं. ते म्हणाले " श्याम कल्याण !". मला बुवांचा चांगला परिचय असल्याने ओळख करून दिल्यावर तिथूनच मी पुन्हा विचारलं,... आणि  पूर्वीचा राग बदलून आता "राग-पूर्वी" झाला होता. हा बदल ५ मिनिटांच्या अवधीत झाला होता. एव्हढा आयत्या वेळी राग बदलूनदेखील बुवांनी न भूतो न भविष्यती असा 'पुर्वीं राग वाजवला. ह्याला म्हणतात सिद्धहस्त पेटीवादक... !!

आता थोडे पंडितजींच्या साथसंगतीविषयी ! साथसंगत करताना कान्हेरेंजिंचे पहिले दर्शन मला चाळीस वर्षांपूर्वी ठाण्यात ब्राह्मण सेवा संघात कै. जितेंद्र अभिषेकींबरोबर झाले. बुवांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्याबरोबरच कान्हेरेंजिंचे सादरणीय व्यक्तिमत्वदेखील माझ्या मनावर ठसा उमटवून गेले ( अगदी त्यांनी त्यावेळी घातलेल्या चॉकलेटी पट्ट्याच्या चौकोनी ब्रास डायलच्या घड्याळासहीत !!) बुवांनी गायलेले "कीतक दिन" हे सूरदासांचे भजन त्यांनी अगदी सहीन सही पेटीवर वाजवल्याचे अजूनही स्मरते. सुरेशदादांनी म्हटल्याप्रमाणे कान्हेरेंची साथ गवयाच्या अगदी गळ्याला चिकटून असते. ते साथीला असले की मैफिलीचा रंग वेगळाच असतो हे खरं !! पेटीची आस आणि वादनातील आशय असा एक सुरेल संगम त्यांच्या साथीतून आपल्याला ऐकायला मिळतो. ह्या क्षेत्रातील त्यांचे नांव एव्हढे मोठे आहे कि कितीतरी चांगल्या प्रथितयश गायकांनी "तुम्ही कान्हेरेंचे शिष्य आहेत ना, मग काही काळजी नाही " असे मला सांगून साथ संगतीला घेतले. (जबाबदारी निभावण्यासाठी  मला अंमळ जरा जास्तीच चांगले वाजवावे लागले हे वेगळे सांगायची गरज नाही 😄). स्वतः उत्तम साथसंगत करणारे कान्हेरेबुवा आपला विद्यार्थी कशी साथ करतो हे पाहायला उत्सुक असतात. मी त्यांच्याकडे नवखा विद्यार्थी असताना ( २००३ मध्ये )  एका प्रख्यात गायकाबरोबर एका खाजगी मैफिलीत साथीला बसलो होतो. मैफिल सकाळची होती आणि भूपाल तोडी सुरु होता. कार्यक्रम सुरु होतोय न होतोय, तोच कान्हेरेंनी टी-शर्ट-जीन्स अशा अनौपचारिक पेहेरावात तिथे एन्ट्री मारली. इथपर्यंत ठीक आहे हो . पण, माझ्यापासून अर्ध्या फूट अंतरावर येऊन बसले. ह्यामुळे मी एकदम कॉन्शस झालो आणि माझा वाजवायचा व्हॉल्युम कमी झाला. त्यांनी मला मोठ्याने वाजवायची खूण केली. नंतर मध्यंतरात  माझी जरा शाळापण घेतली,  की " असे कसे रे तुम्ही सगळे..?? गुरु आल्यानंतर तुमचा वाजवायचा उत्साह कमी झाला पाहिजे कि जास्त ??" पण मी कसाबसा निभावलो, कारण कार्यक्रम संपताना ह्या कन्नड गायकाने कान्हेरेंना अस्सल धारवाडी भाषेत सांगितलं " हे तुमचं शिष्य चांगलं वाजवतंय हंsss  !!" मला पुलंच्या रावसाहेबांची आठवण झाली. 😅





पेटीवादकाची साथ कशी असली पाहिजे, ह्यावर २००४ साली कर्नाटक संघात झालेल्या संवादिनी संमेलनात एक चर्चा सत्र आयोजित केले होते. रंगमंचावर सूत्र संचालक कै दत्त मारुलकर, पं . सुरेश तळवलकर , पं. अजय पोहनकर अशी दिग्गज मंडळी होती. " पेटीवादक साथ करताना गायकी समजून घेत नाहीत" असे सरसकट जनरल मत पं. पोहनकर यांनी मांडले. ह्यासंदर्भात साथीच्या requirements नक्की काय आहेत ह्यावर बराच उहापोह आणि वादंग झाला. पण निर्णय काहीच होईना. मग प्रसंगावधानी सुरेशदादांनी एक शक्कल काढली, कि "आपण कान्हेरेंना स्टेजवर बोलावू.  तुम्ही एक ख्याल म्हणायला सुरवात करा आणि आपण बघू काय होतं ते". स्वतः आयोजक असलेले कान्हेरेंजी थोड्या नाईलाजानेच स्टेजवर आले आणि तणावपूर्ण वातावरणात 'टायब्रेकर ओव्हर' टाकली गेली. गोड गळ्याच्या पं. पोहनकरांनी गुजरी तोडी रागात एक विलंबित आवर्तन मोठ्या नजाकतीनं भरलं आणि कान्हेरेंना पेटीवर वाजवायला सोडलं . त्यांनी अक्ख्या विलंबित तालाचे आवर्तन असं काही बेमालूम वाजवून सम गाठली, की पोहनकरांनी जाहीरपणे सांगितलं कि विश्वनाथची गोष्टच वेगळी !!


ऑर्गनवादन हे बुवांकडंच आणखी एक मोठ्ठ दालन ! निदान दोनेक हजार नाटकांना त्यांनी ऑर्गन साथ दिली आहे. नाट्यसंगीताच्या कार्यक्रंमांना बुवांची ऑर्गनसाथ म्हणजे पर्वणीच असते. तयार कलाकारांचं गाणं ते वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतात. आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहित करत साथसंगत करतात. बुवांचे  ऑर्गनसंगत करण्याचे तंत्र अतिशय वेगळे, परिणामकारक, दुर्मिळ आणि अवघड आहे. उजव्या हातांनी शब्द, हरकती आणि चाल ते वाजवतात ; तर डाव्या हाताने योग्य स्वरांना आणि शब्दांना कॉर्ड्स देऊन उठाव देतात. ह्यासाठी वादकाकडे उत्तम सौंदर्य दृष्टी पाहिजे, जी गुरुजींकडे अमाप आहे. शब्दोच्चारांप्रमाणे त्यांच्या ऑर्गनच्या पट्ट्या बोलतात. मी पहिल्यांदा कान्हेरे गुरुजींचा ऑर्गन ऐकला, त्याची आठवण आज देखील ताजी आहे. साधारण २००४ मध्ये असेल !! गुरुजींनी स्टुडिओमध्ये एक 'रंग अभिषेक 'नावाची CD रेकॉर्ड करून घेतली. ह्यामध्ये त्यांनी अभिषेकी बुवांनी स्वरबद्ध केलेली आठ वेगवेगळी पदे व अभंग ऑर्गन वर वाजवले होते. तबल्यावर अर्थातच नाट्यपदे वाजविण्यात निष्णात असलेले धनंजय पुराणिक. एका ट्युशनच्या वेळी त्यांनी ही CD मला ऐकायला दिली. अर्थातच मी घरी येऊन लगेच सिस्टीमवर लावली. ते अप्रतिम वादन ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. एव्हढ्यात गुरुजींचा फोन आला. त्या अनुकंपनीय अवस्थेत मी नीट बोलूही शकलो नाही. मी नंतर फोन करतो एव्हढेच मी म्हटले आणि फोन ठेऊन दिला. त्यानंतर अनेक वेळा अजीर्ण होईल इतके त्यांचे ऑर्गनवादन मी ऐकले. एकदा तर साहित्य संघाचा भला मोठ्ठा कडक चाव्यांचा ऑर्गन माझ्या घरी आणला होता. शिकण्यासाठी !! एक दोन दिवस कान्हेरे बुवा माझ्या घरी राहिले होते. तेव्हा एक अनौपचारिक कार्यक्रमही आमच्या घरी झाला.   अभिषेकी बुवा , ज्योस्नाबाई भोळे, रामभाऊ मराठे , छोटा गंधर्व , अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी बुवा ऑर्गनवर जाग्या करतात, पण मूळ गाण्याला त्यांच्या हातातील टचेस मुळे एक नवेच परिमाण मिळते ह्याचा अनुभव आम्ही कित्येकदा घेतलाय. मी एव्हढंच म्हणेन कि बुवांसारखा ऑर्गनवादक नाही !!


कान्हेरेबुवांचे वादन किती inspiring आहे, हे मी वर लिहिलेच आहे. एखादा विद्यार्थी नवशिका असेल, तर त्याला स्वतःला वाजवता येईपर्यंत गुरुजी तो पलटा सोपा करून वाजवून दाखवतात. तर उत्तम हात फिरणाऱ्या विद्यार्थ्याला उच्च प्रतीचं कसं वाजविता येईल याचे प्रात्यक्षिक  दाखवतात. गुरुजींबरोबर दुसरी पेटी घेऊन त्यांना follow करणे हे जितकं आनंददायी आहे, तितकंच अवघडही आहे. त्यांच्या हातून सहजपणे निघालेल्या स्वराकृती काही वेळा नीट उकल करून घेऊन मगच वाजवाव्या लागतात. पूर्वीचे खेळाडू असं सांगत, कि कै विजय मर्चंट हे जेव्हा फलंदाजी करायचे , तेव्हा दुसऱ्या एंडला उभ्या असलेल्या फलंदाजाला प्रतिस्पर्धी गोलंदाजी खेळणे खूप सोपं वाटायचं. पण प्रत्यक्ष जेव्हा त्याची खेळण्याची वेळ येई , तेव्हा तोच गोलंदाज खेळणं किती कठीण आहे हे त्याला कळायचं. तोच प्रकार इथे आहे. कधी कधी गुरुजी पूर्ण भरात असताना असं काही मुश्किल वाजवून जातात, कि शिष्याला नुसता एक सूर धरून बसण्याची वेळ येते. आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला सुचलेली एखादी बंदिश ते वाजविण्यासाठी स्वतःच्या मैफिलीत मोकळेपणाने समाविष्ट करतात.  एकदा एका जोड रागाची सुरावट मला अचानक सुचली. मी लगेच ती गुरुजींना ऐकवली. ( रागाचे नांव आम्ही दोघांनी श्री भाटियार असे ठेवले होते)  गुरुजींनी एका आठवड्यातच ह्या रागात दोन बंदिशी बांधून ठाण्यातील एका मोठ्या कार्यक्रमात हा राग वाजवला व माझे नाव सांगून कौतुकही केले. पुलंच्या भाषेत सांगायचं तर "मी सुखाने अगदी महिरलो ....!!
गेल्या काही वर्षात कान्हेरे गुरुजींनी अनेक विद्यार्थी तयार केले आहेत. सर्वश्री निखिल सरपोतदार, केवळ कावळे, दत्तराज सुर्लेकर, आदिनाथ पाटकर, ओंकार अग्निहोत्री, अनंत जोशी आणि अगदी अलीकडच्या काळातील हर्षल काटदरे ही त्यातील काही निवडक नांवे !! ह्यापैकी कोणाचेही वादन ऐकले तरी हा कान्हेरेंचा विद्यार्थी आहे हे समजायला वेळ लागणार नाही. मी धरून ही सगळी मंडळी अतिशय नशीबवान आहेत,  कारण एव्हढे उच्च स्तरावरील वादन करणारे गुरुजी आम्हाला लाभले. कलेचा स्रोत हा नेहमीच ईश्वरी असतो आणि ती कला देण्यासाठी परमेश्वराने नियुक्ती  केलेली असते "गुरु" ह्या असाधारण आणि सिद्ध व्यक्तीची ! 

अनेक वेळा एकलवादनाच्या कार्यक्रमात स्वतःची ओळख करून देण्यासाठी माझ्याकडून write-up मागितला जातो. ह्यामध्ये मी आवर्जून लिहितो कि संवादिनवादनाचे 'उच्च शिक्षण' मी पं. विश्वनाथ कान्हेरे ह्यांच्याकडे घेतले आहे. ह्यावर मी थोडं लिहायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे ही 'आत्मप्रौढी नाही. बुवांचं वादन इतर वादनांपासून कसं वेगळं आहे, हे मी वरती जागोजागी विशद केलंच आहे.  उच्च शिक्षण म्हणजे काय हो  ?? जे अधिक माहिती देणारं आहे, त्याला उच्च शिक्षण आपण म्हणायचं का ?? माहिती ही अध्ययनाला आवश्यक असतेच. पण माहिती म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान हे साक्षात्कारी असावं. जे शिक्षण विद्यार्थ्याला अधिक उच्च स्तरावर आणि खोलवर विचार करायला लावतं, ते उच्च शिक्षण असं मी मानतो. पण त्यासाठी विद्यार्थ्यांला अध्ययनाची आस लागते, हेही  खरं. मला ती होती आणि म्हणूनच मला चाळीशी ओलांडल्यावर सुद्धा आणखी कुठंतरी शिकायला जावंसं वाटलंमात्र त्यासाठी कुणीतरी अधिकारी गुरु मिळाला तरच मी शिकायला जाणार होतो हेही खरे. सद्गुरूकृपेनं अशा असामान्य गुरुची व्यवस्था माझ्यासाठी अण्णां दळवींनी केलीमींड आणि गमक नसलेल्या वाद्यामधील इन्टरेस्ट तब्बल चाळीस वर्षे टिकून राहणे ही काही साधी गोष्ट नाही. इतकि वर्षे हे वाद्य वाजवूनही आपण अजूनही त्यामध्ये लक्षणीय प्रगती करू ही 'ज्योत' माझ्यामध्ये तेवत ठेवण्याचं काम कान्हेरेबुवांनी केलंय, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. बऱ्याच एकलवादनाच्या कार्यक्रमांनंतर मला बऱ्या-वाईट प्रतिक्रिया येतात. चांगल्या प्रतिक्रिया आल्या कि कोणाला छान नाही वाटणार ?? पण मला सगळ्यात मोठठी दाद आली ती आमच्या सुधीरकडून......एकदा माझे वादन ऐकल्यावर तो एव्हढंच म्हणाला ….."विकास, कान्हेरे छान झिरपलेत तुझ्या हातात.... ”

                                                                   II गुरवे नम:II 🙏

                                                                                                      ता क : फोटो सौजन्य श्री. कृष्णा परब 

********************************************************************************


Comments

  1. वाह सुंदर लिहिलं आहे. बुवांच्या वादनाचं फार सुंदर विश्लेषण केलं आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. नावडीकरजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार 🙏

      Delete
  2. विकास, कान्हेरे बुवा तर वंदनीय आहेतच पण तुझी मेहनत आणि लगन ग्रेट..सर्व शिष्यांना सुजाण विद्याग्रहणासाठी मार्गदर्शक ठरेल असा लेख,,..अभिनंदन... अनिल घाटे

    ReplyDelete
    Replies
    1. अनिलजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  3. Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  4. विकास जी नमस्कार मी निरंजन गोडबोले, रत्नागिरी असतो.
    खूपच सुंदर लेख लिहिला आहे आपण
    गुरुजींचा सहवास मला प्रचंड लाभला आहे असे गुरू मिळणं हे भाग्यातच असावं लागतं आणि ते मला मिळालं. असे गुरू असूनही सध्या माझ्या व्यावसायिक व्यापामुळे मला त्यांचाकडे गेली 2 वर्षे शिक्षणासाठी जाता नाही आलं , याबद्दल मी स्वतःला कम नशिबी समजतो, गुरूजींचं अतोनात प्रेम, माया, राग या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत.
    आपल्या गुरुची कृपादृष्टी कशी असते याचा प्रत्यय मला अनेकवेळा संवादिनी वादन करताना येत असतो . खरच असे गुरू परत कधीच होणे नाही , धन्यवाद!!! परत एकदा तुमचं अभिनंदन या छान लेखा बद्दल, आज डोळ्यातून पाणी आलं लेख वाचताना

    ReplyDelete
    Replies
    1. निरंजनजी, आपल्यासारख्या गुरुजींच्या शिष्यांनी हा लेख वाचल्यामुळे माझे लिखाण सार्थकी लागले. आपण संवादिनीचे अनुसंधान चालू ठेवावे. पुढे कधीतरी असही होईल कि तुम्हाला ह्या कलेला भरपूर वेळ देता येईल ( जसा मी आज देऊ शकतो ). ह्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोकणात गुरुपौर्णिमा झाली , तर आपली नक्की भेट होईल . प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!

      Delete
    2. नक्की भेटू आपण, गुरुपौर्णिमा कोकणातच होणार आहे

      Delete
  5. Khoop sundar vishleshan kele aahe raaga che ani Kanhere Gurujin che. Tumcha mahanati la ani gurugina Namaskar.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. आज फुरसत मध्ये वाचले. पं कान्हेरे बुवांचे वादनातील सौंदर्य स्थळे या मनोगता मधून तितकीच सुंदर ऊतरली आहेत. Refreshing to read such quality write up.
    योग

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !! योग, ह्या निमित्ताने बुवांची पेटी UK आणि US मध्ये पोचली. माझ्या ब्लॉगमध्ये आता माझ्या तिन्ही गुरुजींविषयी लेख आहेत, ह्याचे समाधान वाटते.

      Delete
  8. वा ! विकासजी, आपल्या गुरूंचं, पं.कान्हेरेबुवांचं फार सुंदर, वेधक शब्दचित्र तुम्ही या लेखात तुमच्या खास शैलीत रेखाटलं आहे. यांत बुवांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू तुम्ही सहज उलगडत गेलात.
    त्यांचं साथीचं वाजवणं आणि एकल वाजवणं, त्यांची प्रयोगशीलता, वादनांतील नवा विचार, त्यांच्या वादनातील ताजेपणा, त्यांचं अॉरगन वादनावरील असामान्य प्रभुत्व. तुम्ही बुवा डोळ्यासमोर उभे केलेत माणुस म्हणून, असामान्य योग्यता असलेला कलावंत म्हणून आणि काळजीपूर्वक मूर्ती घडविणा-या मूर्तीकारासारखे शिष्य घडविणारा आचार्य किंवा गुरू म्हणून. त्यांचा शिष्य म्हणवुन घेताना तुम्हाला वाटणारा गौरव, अभिमान आणि त्यांनी जे ज्ञान पदरात घातलं त्याबद्दल वाटणारी कृतज्ञताही लेखातून सहज जाणवते. तुमच्या ठिकाणी असलेली अफाट स्मरणशक्ती, हार्मोनियम वादनातील तुमचं वादातीत कौशल्य, तुमचं संगीताचं ज्ञान या सा-यांमुळे हा लेख खूप छान उतरला आहे. माहितीपूर्ण झाला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कविराज श्रीपादजी,
      आपण तन्मयतेने लेख वाचून अतिशय संवेदनशीलतेने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लेख लिहिण्याचे सार्थक वाटते. आभारासाठी शब्द नाहीत ...!!

      Delete
    2. वाह विकासजी अत्यन्त सुरेल पणे आपण गुरुमहिमेची जी बंदिश मांडलीत ती आवडली. उच्च शिक्षण म्हणजे काय ह्यावर तुम्ही मांडलेलं मत आवडलं मनापासून ! शास्त्र सम्मत, शास्त्र सुसंगत, शास्त्र विसंगत, अशी अनेक मते मतांतरे संगीत क्षेत्रात वावरत आहेत पण व्यापक दृष्टिकोन ठेवून संगीत साधनेत मग्न असलेले आपल्यासारखे साधक, त्यांची मते ऐकणे वाचणे हे रसिकांना आनंददायीच आपला हा लेखन आणि चिंतन प्रवास त्यातले अनुभव भावले मनाला !

      Delete
    3. प्रा. आशिष विलेकर,
      तुम्ही स्वतः प्राध्यापक , चित्रकार , कवी ,composer अशा वेगवेगळ्या गोष्टींचे रसायन असल्याने तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप समाधान झाले. माझा लेखनाचा उत्साह देखील वाढला. मनापासून धन्यवाद !!

      Delete
  9. Vikas beautifully written on Pt.Kanhere Guruji.i am also always in touch with him for last so many years.

    ReplyDelete
    Replies
    1. शिरीष, Thank you much !! मला कल्पना आहे कि तुला ह्या लेखातल्या बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्यायत

      Delete
  10. Nice Written on pt,kanhere guruji

    ReplyDelete
  11. Krishna parab Nice Written on pt,V kanhare Guruji

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you much Krishnaji for response and Guruji's photo !!

      Delete
  12. विकासजी या अप्रतिम लेखाबाबत लिहीण्यासाठी शब्दरचनेला कुठुन कशी सुरुवात करावी तेच सुचत नाही.ग्रेट

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंतजी, एव्हढा मोठा लेख वाचल्याबद्दल मनापासून आभार !! तुम्ही कान्हेरेबुवांना खूप जवळून अनेक वर्षे पाहिलंय. मला खात्री आहे कि तुम्ही ह्यातील बऱ्याच गोष्टी स्वतः अनुभवल्या असतील.

      Delete
    2. सुंदर लेख!संगीत,स्वभाव,अनुभव बारकाव्यांसहित छान उतरलेत. लगन कौतुकास्पदच!!समसमासंयोगाचाआनंद दोघांना!!

      Delete

Post a Comment