Skip to main content

इंग्रजी भाषेचे अमेरिकन उच्चारण..!!




इंग्रजी भाषेचे अमेरिकन उच्चारण ... एक प्रहसन !!


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"The American has no language; he has a dialect, slang, provincialism, accent and so forth...."-Joseph Rudyard Kipling                                                                                                          
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वास्तविक कुठल्याही परकीय किंवा स्वदेशीय भाषेवर मी काही अधिकाराने लिहावे, असे भाषाप्रभुत्व माझ्याजवळ खचितच नाही. प्रभुत्व तर सोडूनच द्या, पण मराठी भाषेतील शुद्ध लेखनाचे नियम पाळणेसुद्धा मला RTO चे  किंवा ISO 9००० चे नियम पाळण्याइतकेच कठीण वाटते. (कदाचित ह्याची प्रचिती आपणास हा लेख वाचून येईलही). एव्हढेच काय, पण काळाच्या उपसर्गाने किंवा संसर्गाने म्हणा,  माझ्या बोली मराठीत इंग्रजी भाषेची इतकी भेसळ झाली आहे, की आता त्याची चायनीज भेळ व्हायची वेळ आलेय. हल्ली आम्ही सहलीसाठी न जाता आऊटिंगला जातो. किंवा नोकरीसाठी अर्ज न करता apply करतो. घरांना रिअल इस्टेट म्हणू लागले आहेत लोक. कोणी चुकून सदनिका म्हटले, तर आपल्याला बम्पर जातो वगैरे वगैरे .... !!

चाळीस वर्षांपूर्वी एकदा बारावीच्या सहामाही परीक्षेत मला केवळ अपघाताने पूर्ण वर्गात मराठी विषयात सगळ्यात जास्त मार्क मिळाले, तेव्हा मानसिक धक्का म्हणजे काय असतो, ह्याचा अनुभव मी घेतला. माझ्या वर्गातील हुशार हुशार मुलांचे मराठी इतके वाईट असेल असं वाटलं नव्हतं मला. (उद्या भारतीय संघातल्या के. एल. राहुलने शतक मारले आणि बाकी कोणीच धावा काढल्या नाहीत, तर आपल्याला काय वाटेल ?? नेमकी तीच स्थिती आमच्या गोगटे सरांची झाली असावी). बरं, हे काय कमी होतं, म्हणून माझा पेपर वर्गात फिरवला गेला (हायर मराठीत 'सर्क्युलेट' असं म्हणायचंय मला 😆). मला आणखीनच ओशाळल्यासारखे झाले. कारण माझ्या उत्तरपत्रिकेत पहिल्याच ओळीमध्ये मी मोठी घोडचूक केल्याचे मला नक्की माहित होतं. शेवटी कितीही काही झालं, तरी आपण पेपर काय दर्जाचा लिहिलाय, हे ज्याला त्याला माहित असतंच ना हो. वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळाले, म्हणजे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मी कमी चुका केल्या होत्या एव्हढाच त्याचा अर्थ होता. विषय हायर मराठी असला, तरी माझ्या भाषेचा दर्जा बेताचाच होता. तात्पर्य काय, तर नाडी नसलेला पायजमा सांभाळतात तसे माझे मराठी मी आत्तापर्यंत कसेबसे सांभाळत आलो आहे, तर बाकीच्या भाषांवर टीका करणारा मी कोण ?? आणि जर मराठीची ही स्थिती, तर माझ्या इंग्रजी भाषेची काय असेल ?? ( मोज, बोटे मोज ...... ह्या चालीवर  त्रैराशिक पद्धतीने काढलेले उत्तर फारसे उत्साहवर्धक नक्कीच नाही). माझे इंग्रजी बिघडविण्याचे मुख्य काम इंग्रजीत क्रिकेट कॉमेंटरी करणाऱ्या मराठी खेळाडूंनी केलंय, असं माझं वैयक्तिक संशोधन सांगते.😆

ते जे काही असेल ते असो , परंतु १९९६ मध्ये मी अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल टाकल्यावर माझ्या इंग्रजी भाषेची लेखीव, वाचिव आणि ऐकीव लख्तरे क्षणार्धात अक्षरशः वेशीवर टांगली जाणार, असं वाटण्यापर्यंत मजल गेली . त्याचं असं झालं .....


क्लीव्हलँड एअरपोर्टवर आम्हाला न्यायला आलेल्या अमेरिकन ड्रायव्हरचे  पहिलेच इंग्रजी वाक्य मला कळायच्या
आत माझ्या कानावरून गेले सुद्धा .... ते अजिबात अर्थ ना कळता ! आमचे बुजुर्ग सांगायचे, १९५८ साली भारतात आलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिज टीममधील कर्दनकाळ गोलंदाज वेस्ली हॉल ह्याचे पहिल्या सहा मधील पाच चेंडू असेच फलंदाजांच्या पाठून किंवा पुढून कळायच्या आत विकेटकिपरकडे जात असत म्हणे. यष्टी उडाली तर मात्र आवाजामुळे कळायचे. ह्या ड्रायव्हरच्या पहिल्याच चेंडूने पुढे २ महिने माझे अमेरिकेत काय होणार ह्याची चुणूक दाखविली होती.

लहानपणापासून आम्हाला विजय मर्चंट घराण्याच्या इंग्रजीची सवय होती ( म्हणजे विशिंग अरे व्वा टु यू वगैरे...) . म्हणजे प्रत्येक इंग्रजी अक्षर तबल्याच्या बोलासारखे वाजले पाहिजे. अमेरिकन माणूस कितीही हार्ड स्पोकन असला, तरी तो सॉफ्ट स्पोकन वाटावा असे त्याचे उच्चार. ( म्हणजे बंदिशी करताना आमचे वागयेयकार 'निर्लज्ज' म्हणायचं असेल तर ब्रजभाषेत 'भयो निरलज' म्हणतात तसे...!! ह्याचा फायदा असा आहे कि, ज्याला निर्लज्ज म्हटलंय त्याला फार वाईट वाटत नाही😆कृष्णाला उद्देशून असेल, तर ते मात्र लाडाने असते). असो ! मी प्रयत्नांच्या बाबतील एकदम चेंगट माणूस आहे. मला आवडणाऱ्या काही गाण्यांतील लताबाईंच्या गळ्यातून गेलेल्या कित्येक मुश्किल जागा मी नीट कळाव्यात म्हणून मी पंचवीसदा ऐकलेल्या आहेत. हा माझा गुण इथे उपयोगी ठरला आणि अमेरिकन माणसाच्या इंग्रजीचा थोडा का होईना,  प्रकाश माझ्या डोक्यात हळूहळू पडू लागला. त्यातले काही कवडसे खाली टाकत आहे ......

नाही म्हटले तरी आपल्या भारतीयांवर ब्रिटिश साहेबाच्या इंग्रजीचा अंमल आहे. इंग्लिश माणसाला 'हॅलो' खूप प्यार, तर अमेरिकन माणूस हाऊयूडुई म्हणजे How are you doing??-असे विचारतो. ह्यातला 'are' ह्या शब्दाचा उच्चार केलाच तर जीभ तोंडामध्ये लोंबकळत ठेवून करावा लागतो आणि शेवटचा 'इंग' सायलेंट असतो हे इंगीत माझ्या लगेच लक्षात आलं. सगळे शब्द कापडात गुंडाळून हा प्रश्न आपल्या अंगावर फेकल्यासारखं वाटतं. अमेरिकेत पहिले पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येक दिवस माझ्यासाठी वेगळा होता हे खरे. पण How are you doing?? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना पहिल्या दोन तीन वेळा "माझं खरंच कसं चाललंय ??" ह्यावर मी सिरिअसली विचार केल्याचेही स्मरते. एव्हढेच नव्हे, पण यानंतर , How are you this morning वगैरे प्रहरा प्रहराला आणि जाता येता कंपनीतल्या अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा त्यातला औपचारिकपणा मला लक्षात आला. आणि मी अँम डुईंग फाईन, अँम डुईंग ग्रेट, अँम डुईंग वंडरफूल, किंवा नॉट बॅड नॉट बॅड, कूड बी बेटर  अशी वेगवेगळी उत्तरे मोठ्या चुणचुणीतपणे  जाता येता  फेकू लागलो. ( when you are in Rome, behave like Romans..... नाही का ?? ). ते काही असो , पण आमच्या भारतात लिफ्टमध्ये जमलेले ५-६ लोक नुकतेच आयुर्वेदिक (ते पण कोठा साफ करण्याचे ) औषध घेतल्यासारखे मुखडे करून एकमेकाला repel करतात, त्यापेक्षा मला हे हाऊयूडुई छान  वाटले.

संवादी अमेरिकन इंग्रजीमध्ये  अतिशय भावलेल्या दोन जागा  म्हणजे 'O OK ' आणि आपण काही सांगितल्यावर अमेरिकन तरुणीने  म्हटलेलं 'हं  हं' !! 'O OK' मधला पहिला O हा आश्चर्य दर्शवतो आणि OK हा त्याचे विसर्जन करतो. समोरच्याला काहीच प्रतिक्रिया द्यायची नसेल, तर हे O OK खूप उपयोगी आहे, असं माझ्या लक्षात आलं. तसंच दुसऱ्याचं गाऱ्हाणं आपल्याला गंभीरपणे आणि बराच वेळ ऐकायचं असेल तरीही हे O OK उपयोगी असतं. दुसरा काही सांगू लागला कि आपल्या मताची पिंक टाकून लगेच त्याचा संवादभंग (आणि वेळप्रसंगी तेजोभंग देखील... ) करण्याची इथली पद्धत नाही. तसं बघायला गेलं तर,अस्सल, मुरलेला आणि इरसाल पुणेकरसुद्धा दुसऱ्याचे ऐकताना सारखं सारखं 'sर् ' म्हणतो.  ह्यात 'र् ' सायलेंट आहे बरं का ?.  पण ह्या ''sर्'चा अर्थ-  "बाबा रे किंवा वत्सा, तू सांगतोयस ते माझ्या दृष्टीनं अगदी क्षुल्लक आहे. मी तुझ्यापेक्षा पुष्कळ पावसाळे बघितलेत"
एव्हढाच होतो. ( मला वाटतं पुलंची 'जनार्दन नारो ' ही व्यक्तिरेखा अशाच कुठल्यातरी प्रवृत्तीवर बेतलेली आहे, ती उगीच नाही).  असो ! आता हे अमेरिकन ललनेचं अनुनासिक 'हं हं' किनई खूपच मोहक आहे बरं का. एरवी डॅशिंग वाटणारी अमेरिकन बाई सुद्धा हे  'हं हं' अगदी माधुरी दीक्षितच्या मार्दवतेने उच्चारते. दुसऱ्याचे बोलणे नीट ऐकून घ्यायचे हा त्यांचा मोठ्ठा गुण इथे आपल्याला घेण्यासारखा आहे.

एक थोडेसे घाबरवून टाकणारे वाक्य मी तिथे २० वर्षांपूर्वी ऐकले ( जे आता सर्रास किंवा उठसुठ आपल्याकडे सुद्धा वापरतात) ते म्हणजे ....take care !!  अमेरिकेत ट्रम्प , मेक्सिकोची भिंत, यु. एस. डेट क्रायसिस आणि थोडासा दहशतवाद हे सोडल्यास तसे काळजी करण्यासारखे काही नाही. पण दुसर्या राष्ट्राला काळजी लावण्यासारखे उपदव्याप मात्र  हे राष्ट्र सातत्याने करत राहिले आहे. त्यामुळे त्यांनी उच्चारलेले हे वाक्य आपण नेहमीच गांभीर्याने घ्यावे. संभाषण संपवायला सुद्धा हे 'टेक केअर' खूप उपयोगी आहे. हल्ली व्हाट्सअपवर  ह्याला TC म्हणतात. ( आमच्या वेळी तिकिट चेकरला TC म्हणायचे).  पण एव्हढे हे दुसऱ्याची काळजी करणारे लोक वैतागले की मात्र "आय डोण्ट केअर" असेही बिनदिक्कतपणे म्हणतात. कुणालाही फोन केला की तिकडून विचारणा होते कि  "whats up  ?? " . एका अमेरिकन मित्राला मी एकदा गमतीने  म्हणालो "am going up !! ". ( ह्याचा व्हाट्सअपशी काही संबंध नाही.). हॉटेलमध्ये रात्री वेक-अप कॉल लावला की ऑपरेटर म्हणते you are off किंवा you are set . हे माझ्या डोक्यात 'सेट' होईपर्यंत मी काही दिवस 'off ' होतो हे खरं आहे. तसेच वेकअप वेळेनंतर आपल्याला दाबायला लागणारी हॅश की म्हणजे (#) हे बटण आहे, हे कळायला मला त्यावेळी २ दिवस लागले होते. आताच्या जमान्यात व्होडाफोनवाले Consumers आपला बॅलन्स तपासण्यासाठी उठसुठ हॅश की दाबण्याची प्रॅक्टिस देतात.

भाषाशास्त्रात एक औच्चारिक ध्वनिविचार म्हणून असतो. अमेरिकन इंग्रजीमधील हा विचार थोडाफार चिंतनीय ( आणि चिंताजनकही...!!) आहे. आनेस्टली सांगतो कि कॉफीला काफी , Fast ला फॅस्ट, हॉटला हाट, बॉटमला बाडम, स्कॉटला स्काट, नॉर्थला नार्थ हे ऐकल्यावर भारतातील खेड्यातील लोकांना ही भाषा लवकर येईल असे वाटते. आमच्या नून्गमबक्कमचा चहावाला पोऱ्या 'तंबी' देखील कॉफीला कापी असे म्हणत असे.  तुमचा विश्वास  बसणार नाही, पण कॉफी ह्या शब्दाचा उच्चार कसा करावा ह्या संदर्भात दीड मिनिटाचा एक व्हिडिओ पाहिलाय मी. आता AND ह्या शब्दाचा उच्चार ईsऍssssण्ड हे ऐकल्यावर माझी "क्या बात है" अशी दाद गेली . नेमका हाच ध्वनिविचार आपल्या मराठी शिव्यांमध्ये आहे असे वाटते.  ते काही असलं, तरी इंग्लिश माणसापेक्षा मला अमेरिकन माणसाशी संवाद करायला अधिक आवडतं. They are quite expressive and upright, when they want to put positive things across. However, negative things they put across rather diplomatically. इंग्लिश साहेब मात्र  कुठलेही वाक्य राजकारणात बुडवूनच पुढे टाकतो असं आपल्याला उगीचच वाटत राहतं. चिरूट ओढणारा मुत्सद्दी चर्चिल हा अजूनही भुतासारखा आपल्या मानेवर बसलाय कि काय असं वाटतं. 🎩

"तुम्ही यायची जरुरी नाही " हे वाक्य इंग्लिश साहेब " You need not come" असं म्हणेल; पण अमेरिकन माणूस "You don't need to come" असं  टाकेल.  अमेरिकन बॉस मात्र "  I think  we will manage on our own" असे diplomatically आपल्या  सहकार्याला सांगेल. ( डिप्लोमसीचे भाषांतर 'मुत्सद्देगिरी' हे पटत नाही बुवा !!).  भारतीय बॉस असेल तर " You better not come " असे वाक्य आणखीनच दाहक करून आपल्या सहकार्याला गारद करेल. ह्या मंडळींना जेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसतं किंवा द्यायचं नसतं , तेव्हा " आय डो णो " ( डो आणि णो हे दोन्ही शब्द एकाच मात्रेत घ्यायचेत इथे ) किंवा "मे बी मे नॉट बी" अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तुम्हाला वाटेला  लावतात. काम फत्ते झाल्यावर मात्र अंगठा दाखवतात . हे मी २० वर्षांपूर्वीचे निरीक्षण लिहितोय . अलीकडे WA आंगठे दाखवणाऱ्यांचे प्रमाण हे भारतातसुद्धा प्रमाणाबाहेर वाढलंय. अगदी अंगुठा छाप लोक देखील अँड्रॉइड वरून 👍 हा ईमोजी सर्र्रास वापरतात. ( ठेंगा ह्या अर्थी वापरल्या जाणाऱ्या अंगठ्याचा इथे काही संबंध नाही). 

तसंच 'without' हा शब्द अमेरिकन लोकांना अजिबात कळत नाही. तर इंग्लिश साहेबाला आणि भारतीयांना  सुद्धा हा शब्द जीव कि प्राण !! They can not do 'without' this word at all. अमेरिकेत फळांच्या रसाची ऑर्डर देताना without  ice सांगूनही सुरवातीला अनेक वेटर्सनी  नको इतके आईस क्यूब घालून मला गारठवुन टाकले होते. मग "NO ICE" असे कॅपिटल मध्ये सांगितल्यावर साधा रस येऊ लागला. तसेच अन्न गरम करण्याला Warm the food हे ऐकल्यावर मला गलबलून आले. American warmth चा हा एक नमुना ! अशा कूकच्या हातची कढत आमटी देखील वाटी खाली न ठेवता मी गटागटा प्यायलो असतो . ह्या Warmचा उच्चार मात्र वॉर्म असा करायचाय. ( वार्म नाही 😲).  Worm ह्या शब्दाचा उच्चार मात्र वर्म असा करायचाय.

काही ठिकाणी अमेरिकन माणूस एकदम पिघलून जातो बघा. माझ्या एका
अमेरिकन मित्राबरोबर मी New York vs Cleveland अशा बेसबॉल मॅचला एकदा गेलोतो (म्हणजे Yankees vs Indians). तेव्हा पहिली धाव घेतल्याबरोबरच एका हातात बिअरचा मग 🍺 सांभाळणाऱ्या आमच्या कर्मिट वॉलने " आssल राs यs ट " अशी लांबलचक दाद दिली ( म्हणजे All right !! ). एव्हढी सुंदर मींड त्याच्या गळ्यातून ऐकल्यावर ह्याला आपले शास्त्रीय संगीत शिकवले पाहिजे असा दुष्ट हेतू देखील माझ्या मनात येऊन गेला. नन्तर त्याने रेस्टॉरंटमध्ये काढू नये तो विषय माझ्याजवळ काढला; तो  म्हणजे बेसबॉल vs क्रिकेट !!  अमेरिकन माणसाला क्रिकेटमधील बारीकसारीक खाचा खोचा शिकवणं, हे  'ढ' विद्यार्थ्याला गणित शिकविण्याइतकेच कठीण आहे. बेसबॉल ह्या खेळातील बॉल टाकणाऱ्या खेळाडूला ते लोक पिचर म्हणतात. पण आश्चर्य म्हणजे नांव पिचर असून तो बॉल 'पिच' कधीच करत नाही; सगळे बॉल तो फुल टॉस टाकतो. (निर्बुद्धपणा आहे शुद्ध हा ! ). एव्हढी जिथे बेसिक गोष्टीचीच गल्लत आहे, तिथे त्यांना लेग स्पिन, ऑफ स्पिन, चेंडू ऑफ द पिच कसा वळतो हे समजावून सांगणे किती अवघड आहे  ह्याची कल्पनाच केलेली बरी.
Bagpiper Baintley (L), Vikas, Kermit(R) at
Ohio Scottish Festival, Cleveland

ह्याच कर्मीटचा Baintley नावाचा मुलगा इंटरनॅशनल बॅगपाइपर आहे. त्याच्या बँडचा एक शो देखील मी OHIO SCOTTISH फेस्टिवलमध्ये पाहिला. तो lead musician असल्याने त्याच्याबरोबर सहज बोलता बोलता विषय निघाला, तेव्हा आम्ही हिंदुस्थानी लोक कॉन्सर्ट मध्ये शेवटचा राग भैरवी वाजवतो असे  सांगितल्यावर, त्याने "O OK you mean to say "cleaning up melody" असे म्हणून भारतीय शास्त्रीय संगीताची धिंडच काढली.

इथल्या लोकांशी संवाद साधताना मला आणखी काही खाच खळगे आणि स्पीड ब्रेकर्स लागले. एकदा मी development हा शब्द दहा वेळा उच्चारुनही समोरच्या अमेरिकन माणसाला कळला  नाही. नंतर  साक्षात्कार झाल्यासारखे तो मला म्हणाला "ओह, यू  मिन टू से डीव्हॅलपमेन्ट ". ह्या काही उच्चारण्याच्या टिपिकल गोष्टी तिथे आहेत. दोन स्वरांच्या मध्ये आलेल्या व्यंजनांचा उच्चार ते व्यंजनावर जास्त जोर देऊन करतात. उदाहरणार्थ american किंवा aluminum ह्यांचा उच्चार ते अम्मेरिकन किंवा अल्लूमिनम असा करतात. अनेक इंग्रजी शब्दांची स्पेलिंगे अमेरिकेत सोपी केली आहेत उदा. catalog - catalogue, Color - colour, labor - labour, tire - tyre वगैरे. शिवाय दोन स्वरांमध्ये आलेल्या tt चा उच्चार ट असा ना करता ते साधारण ड सारखा करतात . उदा . daughter ला डाडर, matter (मॅडर ), Bottom( बाडम ),  butter (बडर)  .....🙆 

लोक पाणी वाचवतात, पैसे वाचवतात , इलेक्ट्रिसिटी वाचवतात हे मी समजू शकतो. पण इथे US मध्ये लोक शब्द वाचवतात, तेव्हा मला खूप चीड येते.  बोलताना किंवा लिहिताना असंख्य शब्द वाचवण्याचे काम अमेरिकेत 'Cool ' आणि ' Awesome ' ह्या दोन शब्दांनी केलाय. तुमचा विश्वास बसणार नाही पण माझ्या साडेचार  हजार शब्दांच्या लेखावर एका अमेरिकन मराठी मित्राने ' Cool ' असा अभिप्राय दिला. बरेच वाक्प्रचार अमेरिकन लोकांनी जगाला बहाल केले आहेत. उदा. Passing the buck, Full of crap, Total rip-off, heads up, total wreck वगैरे. हे सगळं ऐकून घाबरण्याचे कारण नाही. मी असं ऐकलंय कि फक्त अमेरिकन इंग्रजी शिकण्यासाठी  Mastering the American accent- Barron's Guide  असे एक  पुस्तकही बाजारात उपलब्ध आहे.

आता जरा जिव्हाळ्याचा विषय ..... म्हणजे ब्लॅडर आणि पोट साफ करण्याच्या जागा ... !! Rest Room हा शब्द अमेरिकेतला बरं का !! ह्याला भारतीयांसारखे इंग्लिश लोक देखील आत्ताआत्तापर्यंत टॉयलेट म्हणत होते. किंबहुना अमेरिकन लोक आणि ब्रिटिश लोक ह्यांच्यात ''ह्या' विषयावर बऱ्यापैकी मतभेद आहे. मला एका अमेरिकन माणसाने सांगितले कि खूपच घाईची लागली, तरच आम्ही 'टॉयलेट'ला जायचंय असं म्हणतो ". माझा एक भाऊ ह्याला Lavatory असे पूर्वी म्हणत असे. आता हा शब्द फार कुठे बघायला मिळत नाही. आता नवश्रीमंत भारतीय लोक वॉशरूम वगैरे म्हणू लागले आहेत. अमेरिकेत वॉशरूम हा शब्द अजिबात वापरत नाहीत, असे माझ्या अमेरिकेत २५ वर्षे राहिलेल्या माझ्या मामेभावाने अलीकडेच मला सांगितले. एव्हढेच नव्हे तर ह्या विषयावर आणखी थोडे ज्ञान दिले. तो म्हणतो कि सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनालयाला रेस्ट रूम्स असेच म्हणतात . तर एखाद्याच्या घरी 'त्याच' गोष्टीला बाथरूम म्हणतात. ते काही असलं, तरी ह्या संज्ञांच्या मथळ्याखाली ज्या काही अवाढव्य खोल्या अमेरिकेत असतात, त्यात जाऊन कोणी रेस्ट घेत नाही ही विसंगतीसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. (वॉश मात्र करत असावेत अशी आशेला जागा आहे 😄). तसेच १९९६ साली मी US ला गेलोतो तेव्हा मला बुचकळ्यात टाकणारा आणखी एक शब्द म्हणजे 'बडी '. बडी म्हणजे मित्र !! तो कोणत्या संदर्भात तसेच कोणी वापरलाय, त्यावर त्याचा भावार्थ ठरतो. व्यवसायासंदर्भात उगीचच समोरच्याला बडी म्हटलं, तर तो मस्का लावण्याचा प्रयत्न आहे असं जरूर समजावं. पण आपल्या खास मित्राला मात्र आपण 'बडी' कधीही म्हणू शकतो. तसेच डॅलसमध्ये राहणारा माझा मित्र मला सांगतो कि न्यूयॉर्कमध्ये बरेच दिवस राहिलेली व्यक्ती जर डॅलस-ह्युस्टनला आली, तर त्या व्यक्तीची बोलीभाषा प्रांतानुरूप जरा वेगळी असते.  तुमचा विश्वास बसणार नाही पण कॅनडा हे राष्ट्र अमेरिकेच्या अगदी लगत वसले असून कॅनडीयन लोकांनाही अमेरिकन ऍक्सेंट समजायला जड जातो.  लेखाच्या सुरवातीला रुडयार्ड किपलिंगनी हेच म्हटलंय. चालायचंच !! आपल्याकडे नाही का TV सिरिअलमधल्या  मसालेवाल्या राधिकाच्या जुन्या सासवेचे मराठी ऐकून आपलं डोकं दुखत ...??, तोच प्रकार ! (मला नागपुरी मराठी खूप आवडते. पण ह्या गुरुनाथ सुभेदारची आई छापील नागपुरी बोलते).

असो ! अमे-रिका हे एक अमे-झिंग राष्ट्र आहे ह्यात शंका नाही. ह्या देशात आमचे पंचवीसेक तरी मित्र नुसते अमेरिकानाइज्ड  झालेत असे नव्हे, तर स्थायिक झाल्यागतच आहेत. २०  वर्षांपूर्वीच कॅलिफोर्नियात राहणाऱ्या आमच्या एका मित्राच्या अस्सल मराठमोळ्या पत्नीने Voice Mail वर ठेवलेला अस्सल अमेरिकन ऍक्सेंटमधील मेसेज  मी  ऐकला आणि तेव्हापासून मला तिकडील समस्त मित्रांविषयी वाटणारी सगळी चिंता कायमची मिटली ..........!!

ता. क. : ह्या लेखासंदर्भात डॅलसमधील माझे परम-मित्र मोरेश दामले आणि वॉशिंग्टनस्थित माझे मामेभाऊ श्री. सत्यव्रत पुरोहित यांचे मला विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार !!🙏 






******************************************************************************************











Comments

  1. अप्रतिम!!!कितीतरी वेळा उत्स्फूर्त आणि खूप हसले.मना पासून पटलं.तंबी ला हे English जमेल ,cleaning melody🙆
    Wash room , तुला दिसलेल्या मिंडा ,शास्रीय शिकवायचा दुष्ट हेतु😂😂I could visualise the crooked expression. Ammazing ani awesome Rashtra

    ReplyDelete

Post a Comment