Skip to main content

Guide....एक अनुभव !!


GUIDE... एक अनुभव  !!


लीकडेच फेसबुकवरील 'पुस्तकप्रेमी' ह्या ग्रुपवर एका पुस्तकाच्या भाषांतरावर लिहून आले आणि लगेचच त्यातून स्फूर्ती घेऊन मी २६३ पृष्ठांचे मूळ इंग्रजी पुस्तक माझ्या मोबाईलवरच वाचून काढले. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील सुप्रसिद्ध साहित्यिक कै. आर. के. नारायण यांची १९५८ मध्ये प्रकाशित झालेली आणि गाजलेली ' THE GUIDE ' ही कादंबरी !! जणू काही देव आनंद आणि वहिदाचा 'गाईड ' हा ह्या कादंबरीवर बेतलेला चित्रपट बघण्याची ही पूर्वतयारीच होय. पण खरं म्हणजे कादंबरी मला इतकी आवडलीय कि आता सिनेमा बघणे हे फक्त उपचार म्हणून बाकी होते. परंतु चित्रपट पाहिल्यावर मात्र  'चार चांद लागले' असं वाटलं !!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तामिळनाडूतील कल्पित मालगुडी शहरात ही कथा घडते. गुगलवरून कळलं की प्रस्तुत लेखकाच्या अनेक साहित्यकृतींमध्ये  मालगुडी टाऊन, शरयू नदी आणि मेम्पी जंगल यांचा उल्लेख आहे. आश्चर्य म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी  काल्पनिक आहेत.(जरी असं म्हणतात कि मालगुडीचं नंतर म्हैसूर झाले). कादंबरीत राजू गाईड, रोझी (उर्फ नलिनी) आणि तिचा नवरा मार्को ही प्रमुख पात्रे योजलेली आहेत. 'पात्रे' आहेत असं म्हणण्यापेक्षा 'वृत्ती' आहेत. स्ट्रीटस्मार्ट राजुच्या तारुण्यसुलभ बऱ्या-वाईट वृत्ती, निष्णात नृत्यांगना रोझीची कलासक्ती आणि साधेपणा, एककल्ली मार्कोची टोकाला गेलेली स्वयंकेंद्री वृत्ती, कुटुंबातील परंपरेचा दुराभिमान, पैसे आणि असुरक्षितता यांमुळे माणसाला सुचणारी विपरीत बुद्धी, विविध स्तरातील आणि परिस्थितील स्त्रियांची मानसिकता, सामुदायिक अज्ञानातून होणारे समाजाचे अध:पतन अशा विविध प्रवृत्तींचे दर्शन प्रस्तुत लेखकाने अत्यंत कौशल्याने आणि संयतपणे घडवले आहे. अलीकडे मी अंधाधुन, आपला मानूस, नाम शबाना ह्यासारखे बरेच नवीन सिनेमे बघितले, ज्यामध्ये तरुण पिढीतील प्रेक्षक खेचण्यासाठी विनाकारण गुंतागुंत ( twist & turns) दाखवलेली आहे. यामुळे मूळ कथानकाला काहीही अर्थ राहत नाही. अशा प्रकारचे कुठलेही अनैसर्गिक गिमिक प्रस्तुत लेखकाला वापरावे लागले नाहीत. कारण मूळ कथेत चांगलाच 'दम' आहे. पात्रांच्या नैसर्गिक वृत्ती -प्रवृत्तीतून कथा आकार घेत जाते. परिस्थिती बदलल्यावर विकारी मनामुळे माणसांच्या वृत्ती देखील कशा बदलतात ह्यावर लेखकाने वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. वानगीदाखल उदाहरणेच द्यायची असतील तर  मार्कोचे पुस्तक छापून आल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर रोझीच्या मनात त्याच्याविषयी सकारात्मक विचार येऊ लागले किंवा पैसे हातात खेळू लागल्यावर राजू  व्यसनाच्या आहारी गेला / तसेच तुरुंगात गेल्यावर त्याचे कैदी म्हणून असलेले वर्तन एखाद्या सात्विक सज्जनासारखे होते. ह्यामुळे कादंबरी नुसतीच चित्तवेधक नाही, तर प्रसंगी उदबोधक देखील झाली आहे.  ह्या कादंबरीकाराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता, ज्याचा कथा परिणामकारकपणे गुंफण्यासाठी आणि चित्रित करण्यासाठी खूप उपयोग झाला आहे. सामान्य लोक जी सृष्टी डोळ्याने पाहत असतात किंवा अनुभवत असतात, तीच कादंबरीकारही पाहत असतो. पण 'जे न देखे रवी, ते देखे कवी' ह्या उक्तीप्रमाणे त्याला मात्र आपल्याला जे दिसत नाही ते दिसत असते.  जे त्याच्या प्रतिभाशाली मन:चक्षुला दिसतं, ते परिणामकारक शब्दात वाचकाच्या समोर तो उभे करतो ( कुमार गंधर्वांना असाच प्रत्येक राग गाण्याआधी  दिसायचा). वाचकाला लेखक आधी वास्तवात नेतो, ज्यामुळे वाचक प्रमुख व्यक्तिरेखेशी आणि कथानकाशी  तादात्म्य पावू शकतो. त्याशिवाय 'ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले' ही प्रक्रिया होत नाही. आणि मग काल्पनिक कथेचं आपल्या लेखणीरूपी कुंचल्याने तो चित्रण करतो.

 'राजू गाईड' हा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरी सुरु होते ती नुकतीच २ वर्षांची सजा तुरुंगातून भोगून आलेल्या आणि भविष्याच्या चिंतेने विमनस्क अवस्थेत असलेल्या राजू नावाच्या एका तरुणापासून. आपल्या मूळ गावापासून थोड्या दूर अंतरावर जुनाट देवळाच्या ओसरीवर बसून हा अंतर्मुख झालेला तरुण कुणालाही नाही 'न' म्हणण्याच्या आपल्या स्वभावामुळे आणि हजर-जबाबीपणामुळे त्याच्या नकळत 'स्वामी' किंवा आजकालच्या जमान्यातील 'बाबा' होण्यापर्यंत लोटला जातो. एका गावकऱ्याचा कौटुंबिक प्रश्न त्याच्याकडून अपघाताने सोडवला जातो काय आणि हा हा म्हणता ते गावच त्याला नको असलेले  'स्वामिपद' देऊ करते. असे करता करता एके दिवस गावावर कोरड्या दुष्काळाचे संकट आलेले असते. ते  निवारण्यासाठी समजुतीच्या अपघाताने स्वामीजींवर उपोषण जवळजवळ लादले जाते.  विधिलिखितामुळे कि काय किंवा सर्व पाश तुटल्यामुळे कि काय, पण हे पद जबरदस्तीने निभावताना त्याच्या मनात अचानक परोपकारी (Philanthropic) विचार येऊ लागतात. मनात आलेली सद्भावना समाजासाठी अर्पित केली जाते. १२ दिवसांच्या उपोषणामुळे अर्थातच स्वामीजींची अखेरची घडी समीप  येते. आणि शेवटी स्वामीजींनी केलेल्या प्रार्थनेमुळे पर्जन्यराज प्रसन्न झाल्याची ग्वाही त्यांच्याकडूनच देववून कादंबरी संपते. पुस्तकाची सांगता अशी असली, तरी त्याआधीचा  राजू गाईडचा जीवनपट लेखकाने 'फ्लॅशबॅक' पद्धतीने, पण मोठ्याच कौशल्याने उलगडून दाखवला आहे. जवळ जवळ सगळे पुस्तक ह्या जीवनपटानेच व्यापले आहे. त्याचं निरागस लहानपण, त्यातून आलेले संस्कार, त्याने चालवलेले वडिलांचे छोटे दुकान, हरहुन्नरी 'राजू गाईड' म्हणून त्याने मिळविलेले नांव, त्यातूनच निर्माण झालेली राजू-रोझी यांची रहस्यमय प्रेमकथा, अथक परिश्रमाने त्याने रोझीला मिळवून दिलेले 'नांव', त्याच्याच दुर्बुद्धीमुळे त्याला घडलेला तुरुंगवास आणि सरते शेवटी त्याच्या प्रारब्धात असणारं 'स्वामिपद' असा हा विविधांगी पट आहे.

आता ह्या कथेमधल्या मला तीव्रतेने जाणवलेल्या काही गोष्टी !! पुस्तकातील version नुसार, मार्को हा कितीही हुशार असला, तरी त्याने रोझीकडे आपली जोडीदार म्हणून नाही, तर फक्त उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिलंय. रोटी, कपडा, मकान ह्या तीन गोष्टी बायकोला दिल्या, कि नवऱ्याची इतिकर्तव्यता संपते अशा टोकाच्या मताचा तो होता ( Male chauvinism !!). पुरातन गुंफांचा (Caves) अभ्यास सोडल्यास त्याच्या आयुष्यात कशालाही प्राधान्य नव्हते. सहजीवन ह्या कल्पनेने त्याला कधी शिवलंही नसावं. रोझीला पहिल्यांदा बघताना राजुची अवस्था ' लव्ह ऍट फर्स्ट साईट' अशीच होती. त्याचे उमदे वय पाहता ही गोष्ट नैसर्गिक होती. महाभारतातील पराशरांसारखा ऋषी जर बघताक्षणी मत्स्यगंधेच्या प्रेमात पडला, तर इथे यत्कश्चित राजुची काय कथा ??  कितीतरी देखणे तरुण आपल्या गद्धेपंचविशीत रोझीने पहिले असतील.  परंतु इथे रोझी-मार्कोच्या सततच्या संघर्षामुळे राजु-रोझीच्या प्रेमाला बहर यायला पूरक माध्यम मिळाले. पण राजुने हे मात्र अचूक हेरलं होतं की रोझी ही अत्यंत वरच्या दर्जाची नृत्यांगना आहे. अत्युच्च प्रतीची कला सर्व सामान्य रसिकालाही भुरळ पाडते. आणि तो तिला 'नांव' मिळवून द्यायचे वचन देतो. एका अर्थी तो तिचा 'GUIDE' होतो. (This 'promise' itself provides enough material for book and movie). मार्कोच्या बेफिकीर आणि उर्मट वृत्तीमुळे रोझी तिची निखळ प्रशंसा करणाऱ्या उमद्या आणि सकृत दर्शनी प्रामाणिक असणाऱ्या राजुकडे आकर्षित झाली नसती तरच नवल !!  अर्थात, त्यांच्या तारा जुळल्या. राजुला काही नृत्यकलेचे फार ज्ञान नव्हते. तसे असते, तर नंतरच्या कथानकातही ते पुन्हा पुन्हा दिसत राहिले असते आणि त्यांच्या प्रेमाचा शेवटही राजुच्या चुकानंतरही कदाचित गोड़च झाला असता.  कलेचे मार्केटिंग करण्यासाठी लागणारी गुणवत्ता राजुकडे नक्कीच होती. पण ह्या सगळ्याचे इंधन होते ते मात्र रोझीवरील त्याचे निर्व्याज प्रेम !!

'अती तेथे माती' हा निसर्ग नियमच आहे. अहो कुठल्याही झाडाला वाढीसाठी पाणी किती घालायचे हे देखील ठरलेले असते. तो हिशेब बिघडला, कि सगळं बिघडतं. रोझी (उर्फ नलिनी) - राजू ह्या जोडीला एव्हढे अमाप यश मिळाले, की त्यांना दोघांनाही एकमेकांना द्यायला वेळच मिळेना.[Raju said -"Where was Nalini in all this..?? Away out of sight. She spent a great deal of her day in her rehearsal hall with her musicians". ( Page 205) ]. नलिनीला उच्च वर्गात वावरण्याचे धडे राजू देत असे. पण देवदासी वर्गातून आलेल्या नलिनीच्या ते डोक्यावरून जात. नलिनीला ह्या सगळ्या धावपळीचा आणि करिष्म्याचा उबग आला होता. ती पार थकून गेली होती. तिला ह्या सगळ्यातून मुक्तता हवीशी वाटू लागली होती. सेलेब्रिटीचे जीवन तिला नकोसे वाटू लागले होते. [Nalini asked Raju - "Is there no way to stay more simply..??"( page 209)]. त्यातच, राजु पत्ते -जुगार, मद्यपानात रंगू लागला. त्याच्या हातून दोन अक्षम्य चुकाही झाल्या ( To err is human...!! ). मार्कोचे छापून आलेले पुस्तक त्याने रोझीपासून लपवून ठेवले. तसेच एका लीगल कागदपत्रावर त्याने रोझीची बनावट सही केली. रोझीचा नूर पालटायला एव्हढे पुरेसे होते. वास्तविक राजुने forge केलेली रोझीची सही ही पैशाच्या लोभाने नाही, तर मार्कोच्या पुनरागमनाच्या भीतीने केली होती; ती देखील मद्याचा अंमल असताना.  (पुस्तकापेक्षा हा नाजूक मुद्दा चित्रपटाने जास्त चांगला हाताळलाय). थोडक्यात म्हणजे रोझीच्या सहजीवनाची वाट मार्कोने आपल्या जुलमी एकसत्ताक प्रवृत्तीमुळे लावली, तर अप्रत्यक्षपणे इथे नलीनीच्या सहजीवनाची वाट तिला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीमुळे आणि धकाधकीच्या व्यस्त जीवनामुळे लागली. 

एक गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे की ही कादंबरी १९५८ सालची आहे. त्याकाळी लेखकाने पुस्तकात 'live in relationship' ची संकल्पना मांडली आहे. ही मोठीच धाडसाची गोष्ट आहे. पुस्तक खपेल कि नाही ही खंत करत ते बसले नाहीत. किंवा जे लोकांना आवडेल तेच आपण लिहिले पाहिजे असा विचारही त्यांनी केला नाही. त्यांनी कल्पिलेल्या पात्रांच्या वृत्तिप्रवृत्तींशी ते प्रामाणिक राहिले. आणि म्हणूनच त्यांची ही साहित्यकृती आपल्याला भावते. मसाला निर्माण करण्यासाठी त्यांनी कुठेही 'विकृती' दाखवलेली नाही. 'लिव्ह इन' ची कल्पना देखील पुस्तकात  अगदी सहज आलेली आहे. नवऱ्यापुढे हतबल झालेल्या रोझीचा तो प्रतिसाद आहे.

In the preface of the English book, Michael Gora makes a very humorous comment about Raju guide. He writes. " By the end of 12th day, Raju himself becomes a tourist attraction". This is a typical British humor....as subtle as it can.. !!😆



आता 'गाईड' ह्या चित्रपटाविषयी ............

देव आनंद आणि विजय आनंद यांनी 'लिव्ह इन' हा विषय असलेली ही कादंबरी उचलून धरून त्या काळात ( १९६५) असा चित्रपट करण्याचे धाडस दाखवले. एके काळी गाजलेल्या ह्या चित्रपटाविषयी तोंडात बोट घालायला लावेल असे statistics मला गुगलवर मिळाले. एका माणसाने हा सिनेमा ७०० वेळा पाहिला म्हणे. काही जण ५० वेळा वगैरे पाहणारे त्यामुळे किरकोळीत निघाले. ह्या चित्रपटाला ९ वेगवेगळी नॅशनल लेव्हल पारितोषिके प्राप्त झाली होती. यु ट्यूबवर हा सिनेमा १२ लाख वेळा पाहिला गेलाय.

पुस्तकातील काही प्रसंग आणि स्थळे ही  चित्रपट बघताना मनात जास्त कोरली गेली हे खरे. उदा. राजुचे घर, राजुच्या मामाने रोझी प्रकरणावरून त्याची काढलेली खरडपट्टी, रोझी-राजू यामध्ये झालेले वितंडवाद, जुनाट देवळाचा राजुने घेतलेला आसरा, गावात पाऊस पडावा यासाठी स्वामींनी पर्जन्यराजाची भाकलेली अतीव करुणा वगैरे.
गमतीची गोष्ट म्हणजे पुस्तक वाचताना राजू गाईड म्हणून माझ्यासमोर सारखे देवानंदच येत होते. एकदम परफेक्ट कास्ट आहे  !! देव आनंद यांनी राजू गाईडची भूमिका उत्तम साकारली आहे. ट्रॅव्हल गाईडकडे एक प्रकारचा उत्साह आणि light-heartedness लागतो.  तसेच टुरिस्टच्या समोर आदबशीर राहावे लागते. हे सगळं त्यांनी छान दाखवलंय. रोमँटिक तर ते होतेच. त्यासाठी त्यांना फार वेगळं काही करावं लागलं नसावं. 😆 पण नंतरच्या भागात देव आनंद जेव्हा स्वामी बनवले जातात , तेव्हा त्यांच्याच 'हरे राम हरे कृष्ण' चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी फार सिनेमे बघत नाही म्हणून असेल कदाचित, पण अध्येमध्ये देव आनंद यांची डायलॉग डिलिव्हरी ऐकल्यावर मला interpreter असता तर बरे झाले असते अस वाटलं. ते काही असलं तरी, देव आनंद यांनी भूमिकेला चांगला न्याय दिला आहे, ज्यासाठी त्यांना १९६७ सालचे सर्वोत्तम अभिनयाचे Filmfare award मिळाले. देव आनंद हे एके काळी माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक होते....  as a romantic hero !!

आता ज्या अभिनेत्रीचं वर्णन रेंदेव्हू फेम सिमी गरेवाल यांनी "Her beauty and elegance redefines femininity !!" असं केलंय, त्या वहिदा रेहमान यांच्याविषयी थोडंसं..................

मूळ कादंबरी ही राजू गाईडच्या भोवती गुंफलेली आहे, परंतु सिनेमा मात्र रोझी उर्फ नलिनी ह्या व्यक्तिरेखेभोवतीच नकळत गुंफला गेला आहे असेच म्हणावं लागेल. ही आहे माध्यमाची महती !! रोझी ते नलिनी हा चित्रपटाचा प्रवास जवळजवळ ६० टक्के सिनेमा व्यापून आहे. शिवाय  गाईडमधून संगीत काढलं तर काय होईल, याची नुसती कल्पना करा म्हणजे मी काय म्हणतोय हे कळेल. जवळ जवळ ४ गाण्यांमध्ये अत्युच्च प्रकारचं संगीत आणि वहिदाजींचं डोळ्याचं पारणं फेडणारं नृत्य आहे.  म्हणजेच  रोझीचे काम करणाऱ्या वहिदाजींची कामगिरी ही किती महत्वाची होती हे वेगळं सांगायची गरज नाही. एखाद्या व्यक्तीचा यशाचा विशिष्ट मार्ग असतो, तसा गाईड सिनेमाचा पण होता. आपण बघतो तो 'गाईड' तयार होण्यापूर्वी अनेक स्थित्यंतरे झाली. मी अलीकडेच असं वाचलं कि राज खोसला ह्यांच्याबरोबर असलेल्या कुरबुरीमुळे वहिदानं हा रोल सुरवातीला नाकारला होता. तसेच चेतन आनंदच्या मनात प्रिया राजवंशला हा रोल द्यायचा होता. पण देवसाहेबांच्या दृष्टीनं नृत्यकलेच्या नैपुण्यामुळे वहिदा रहमानच ह्या रोलसाठी  निश्चित झालेली होती. त्यामुळे कुणाचंच काहीच चाललं नाही. I think Dev Saab exactly knew how it is going to be !! वहिदाजींनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलंय की हा गाईड सिनेमा होईस्तोवर त्यांना नृत्याची संधीच कधी चित्रपटात मिळाली नव्हती.आणि वहिदाजींनी ह्या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर मात्र रसिकांनी प्रत्येक चित्रपटात त्याचं एक तरी नृत्य पाहिजेच अशी मागणी सुरु केली. अभिनयातही वहिदाजींनी कमाल केली आहे. मार्कोशी झालेल्या असंख्य भांडणामुळे खचलेली रोझी, 'आजकल जीने कि तमन्ना है' ह्या गाण्याच्या वेळीचा तिचा अल्लडपणा, Caves मधील संघर्षाच्या वेळी तिने दाखवलेला दुर्गेचा अवतार ,नंतरच्या काळात राजुपासुन दुरावलेली नलिनी ह्या सगळ्या प्रसंगांना साजेसा आणि परिणामकारक अभिनय वहिदा रेहमान यांनी केला आहे. ह्या सगळ्या कामगिरीबद्दल त्यांना १४ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये त्या वर्षाची सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पारितोषिक मिळाले. सिनेमात वहिदाजी खरोखरंच किती सुंदर दिसतात याची एक झलक म्हणून मी सिनेमा पाहत असताना एक स्क्रिनशॉट घेतलाय तो मुद्दाम इथे दिला आहे.

गाईड ह्या चित्रपटाचा सगळ्यात महत्वाचा हायलाईट म्हणजे त्यातील एकाहून एक अप्रतिम गाणी. मी कुठेतरी वाचलं की संगीत द्यायची जबाबदारी कै. सचिन देव बर्मन ह्यांनी स्वीकारली आणि ते खूप आजारी पडले. चित्रपटाचे निर्माते स्वतः देव आनंद हे बर्मनदा पूर्ण बरे होईस्तोवर थांबले आणि मग सर्व गाणी पूर्ण झाली.  सगळीच गाणी चांगली आहेत, पण मला आवडलेले सगळ्यात आवडते गाणे म्हणजे गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेले  ' मोसे छल किये जाये ' !! बनावट सहीच्या आरोपाखाली राजुला इन्स्पेक्टर अटक करायला येतात आणि रोझीला राजुचे हे कृत्य कळल्यामुळे त्याला अनुसरून हे गाणं अगदी मोक्याच्या जागी घातलं आहे (.... सैय्या बेईमान !!). कलात्मक नजरेने चित्रपटाचे मूल्यमापन केल्यास हे गाणं म्हणजे ह्या चित्रपटाचा उत्कर्ष बिंदू ठरेल ( 'शेवटी चमत्कार होऊन पाऊस पडतो' हा नाही...  ). किती योग एकत्र आलेत ह्या गाण्यात ते बघा .... चित्रपटाचा टर्निंग पॉईंट, त्या क्षणाविषयी नलिनीच्या मनांत उमटलेला राजूविषयीचा तिरस्कार, त्याला अनुरूप काव्य, उपशास्त्रीय पण गुंगी आणणारी बर्मनदांची खमाज-झिंझोटीतली चाल, नलिनीचे (वहिदाचे) बेफाम नृत्य आणि 'मोसे छल' ह्या गाण्याला लागून घेतलेले  'क्या से क्या हो गया ' हे राजुचे परिणामकारक जोड-गाणे !! आणखी काय पाहिजे खऱ्या रसिकाला ?? दुग्धशर्करा योग देखील यापुढे फिका पडेल. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण ह्या गाण्याला संतूरवादनाचे बादशाह पद्मविभूषण कै. पं. शिवकुमार शर्मा यांनी तबला वाजवला आहे. त्यावेळी ते बर्मनदांच्या ताफ्यात म्युझिशिअन होते. जून २००६ च्या OUTLOOK मध्ये तर छापून आलं होत कि ऑल टाइम्स टॉप 20 गाण्यांमध्ये गाईड चित्रपटातली तीन गाणी होती. सिनिअर बर्मनदांनी गाठलेलं हे सुवर्णशिखरच  म्हणावं लागेल.

सिनेमातले मला सगळ्यात आवडलेले दोन संवाद म्हणजे - १) मेमफी गुंफेमध्ये मार्कोच्या जुलमी वागणुकीला रोझीने दिलेले आव्हान आणि २)'पिया तोसे ' ह्या गाण्यानंतर घरात घेण्यासाठी राजुने रोझीचा केलेला अविस्मरणीय लटका अनुनय !! पहिल्या संवादात रोझीने स्वतःची तुलना गुंफेमधील दगडी मूर्तींशी केलेली आहे. ती पुन्हा पुन्हा म्हणते " एकेक मूर्ती तुम्हे चिलला चिलला कर कहेगी; मार्को, मै  जिना चाहती हुं , मार्को, मै  जिना चाहती हुं " अनावर झालेला संताप वाहिदनं मार्कोला फैलावर घेऊन व्यक्त केलाय आणि त्याला ती सोडूनही गेली. दुसऱ्या संवादात देव आनंद यांनी केलेली डायलॉग डिलिव्हरी केवळ तेच करू जाणोत. किंवा दिन ढल जाए ह्या गाण्याआधीचा मद्य ग्लास मध्ये ओतताना देव आनंद  यांच्या तोंडी असलेला डायलॉग "जिंदगी तो एक नशा है दोस्त, जब चढता है तो क्या आलम रहता है, लेकिन जब उतरता है ..... " आणि त्याचं टायमिंग जबरदस्त आहे. अर्थात ह्या सगळ्याचे श्रेय  कै विजय आनंद ( उर्फ गोल्डी ) यांचेही आहे.  त्यांनी ह्या चित्रपटातील संवादही लिहिले आणि  दिग्दर्शनही केलं होतं. Goldie was a director of very high repute and calibre !!

आता एक नकारात्मक पण महत्वाचा मुद्दा.....

पुस्तक आणि चित्रपट यामध्ये मला जाणवलेली सगळ्यात मोठी विसंगती म्हणजे चित्रपटात योजलेली मार्कोची महत्वाची व्यक्तिरेखा (cast). चित्रपटात रोझीचे लग्न ह्या पन्नाशीतल्या वयस्कर मार्कोशी लावले आहे. कदाचित रोझी ही देवदासींची मुलगी असल्याने तिला चॉईस नाही, असे दाखवुन प्रेक्षकांची उगीचच सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न असावा. चित्रपटात दाखवलेल्या version प्रमाणे मार्कोने रोझीकडे आपली जोडीदार म्हणून म्हणून कधीच पाहिलं नाही,व त्याला कारणही तसेच पण समाजाला न सांगता येण्यासारखे होते. त्याने लग्न केले होते ते आपल्यातील कमतरता लोकांना कळू नये म्हणून. अर्थात रोझीला हे गौप्य कळायला वेळ लागला नाही . पुस्तकात वयाचा उल्लेख जरी नसला, तरी जी तडफ मार्कोने दाखवलेली आहे, ती व्यक्ती तिशीच्या पुढची वाटत नाही. शिवाय पुस्तकात मार्को हा एककल्ली दाखवला असला, तरी चित्रपटात दाखवलाय तसा तो बदफैली दाखवलेला नाही. तो dignified दाखवलेला आहे  आणि त्यामुळेच पुढील काळात रोझीला त्याच्याविषयी वाटलेली सकारात्मकता ही थोडीतरी समर्थनीय ठरते, अन्यथा नाही. चित्रपट पाहताना मात्र जेव्हा नलिनीला पुन्हा मार्कोची आठवण येते, तेव्हा तिची कीव करावीशी वाटते.  I sincerely feel that as a matter of principle, movies should not distort the originality of the important characters in novel.

काय योग आहे पहा. आता माझे वय ५९ आहे. इतक्या वर्षात मला हा चित्रपट पाहण्याचा योग नाही आला. कारण ईश्वराच्या मनात काही  वेगळंच असावं; तो म्हणत असावा की ह्याला नुसता सिनेमा नाही दाखवायचा, तर गाईड नावाचा एक जिवंत 'अनुभव' द्यायचा. त्यासाठी मला आधी पुस्तक वाचायला लावले. पुरेसे औत्सुक्य मनात जागृत केले. मला जणू काही 'चातक'च बनवले आणि मग सिनेमा दाखवून माझे मनोविश्व पूर्ण व्यापून टाकले. एका अर्थी आठवडाभर मी ' गाईड' जगलो असेच म्हणावं लागेल.

ह्यानिमित्त मालगुडीतील पर्यटकांचा 'गाईड', नलीनीचा 'गाईड' आणि स्वामीभक्तांचा 'गाईड' असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत एव्हरग्रीन हिरो म्हणून गाजलेल्या कै. देव आनंद यांना माझा मानाचा मुजरा !! 🙏
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऋणनिर्देश   :  माझे साहित्यातले किंवा चित्रपटांबद्दलचे ज्ञान अगदीच तोकडे आहे. त्यामुळे मी जे काही लिहिलंय, ते फक्त पुस्तक आणि चित्रपट याबद्दलचे रसग्रहण आहे (समीक्षा नाही ). माझ्या स्वतःचे ह्या विषयीचे प्रामाणिक आकलन आणि आवडी निवडीतली सापेक्षताही ह्या लघुलेखात प्रतिबिंबित झालेली आहे. पण हा ब्लॉग चांगला होण्यासाठी मला साहित्य सिने क्षेत्रातील चोखंदळ रसिक मुंबईच्या डॉ. सौ सुषमा शिरोडकर आणि दुबईच्या सौ मिताली कोरडे यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळे माझ्या 'गाईड' या अनुभवाला पूर्तता आली असे मी समजतो.  त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.  🙏
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Comments

  1. रसग्रहण आवडले. एकूणच संपूर्ण ब्लॉग छान शब्दांकित केला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  2. कादंबरी आणि सिनेमा यांचे उत्कृष्ट रसग्रहण. खूप सुंदर.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  3. खूप छान रसग्रहण!

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  4. खूप छान रसग्रहण. कादंबरी आणि चित्रपटातील वेगळेपण खूप छान मांडलं आहे. उत्कर्ष बिंदू अगदी चपखल...👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  5. लेखन शैली नेहमीप्रमाणेच ओघवती! गाईड हा चित्रपट एक वेगळा अनुभवच आहे. ब्लॉग वाचताना परत सगळा डोळ्यासमोर तरळून गेला. हे लिखाणाच वैशिष्ट्य आहे अस मला वाटलं!

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  6. व्वा!! अतिशय ओघवतं आणि परिपूर्ण विश्लेषण ! पुन्हा एकदा Guide चित्रपटच पाहिला!

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! खूपच विलंबाने उत्तर देत आहे, त्याबद्दल क्षमस्व 🙏 मुद्दाम लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !!

      Delete

Post a Comment