Skip to main content

स्मरणरंजनाचे मोती....!! Nostalgia*


स्मरणरंजनाचे मोती....!! (Nostalgia)



तराव्या शतकात स्वित्झर्लंडच्या सोल्जर्सबद्दल (मर्सेनेरीज) एका डॉक्टरला एक विचित्र गोष्ट दिसली. दुसऱ्या देशात  युद्धावर असताना ह्या सोल्जर्सना थकवा, निद्रानाश, हृदयाचे ठोके, अपचन, ताप यांसारखे आजार होऊ लागले.  बरेच उपाय करून लक्षणे कमीच होईनात. अखेर सैनिकांना त्यांच्या सेवेतून मुक्त करून सोडण्यात आले व त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशांतील घरी परत जावे लागले. हा 'होमसिकनेस'चा प्रकार होता. तत्कालीन डॉक्टरांनी सैनिकांच्या या मानसिक अवस्थेचे नाव 'नॉस्टॅल्जिया' असे ठेवले  ....... (In Greek, "Nostos" for homecoming and and Algos for pain or longing). डॉक्टरांनी याचा निष्कर्ष असा काढला की औदासिन्यजवळचा (डिप्रेशन) असा हा एक रोग असावा.  कालांतराने, नॉस्टॅल्जियाचा 'होमसिकनेस' हा अर्थ जाऊन 'भूतकाळाची तीव्र इच्छा' असा घेतला जाऊ लागला.  गेल्या काही वर्षांत 'नॉस्टॅल्जिया' हा एक आनंददायी अनुभव म्हणून पाहीला जात आहे............. 
_______________________________________________________________________________

                                                  दिल वही लौटना चाहता है, 
                                             जहां दुबार जाना मुमकिन नहीं ... 
                                                    बचपन, मासुमियत, 
                                                   पुराना घर, पुराने दोस्त... 
                                                             क्योंकी, 
                                                   उम्र चाहे जितनी भी हो 
                                                   सुना है, दिल पर कभी 
                                                      झुर्रियां नहीं पडती ... 

                                                                           - गुलझार 🖋️

नॉस्टॅल्जिया म्हणजे मराठीत 'स्मरणरंजन' !!
स्मरणरंजन आणि स्मृती (आठवणी) ह्यातला फरक समजून घेतला पाहिजे. ज्या 'स्मृती' आपल्याला पुन्हा पुन्हा अनुभवाव्या असं वाटतं, त्याच स्मृती 'स्मरणरंजन' ह्या संज्ञेला पात्र होतात. हा लेख लिहीत असताना मी Nostalgia ह्या विषयावर थोडे अवांतर वाचन केले. वाचनात असे आले कि साधारण १५ ते ३० वय असतानाचे बरेच क्षण आणि प्रसंग स्मरणरंजनात समाविष्ट होतात. माझ्या बाबतीत ही रेंज वयाची  ते १८ वर्षे आहे. काय बरं कारण असेल ?? मला वाटत माझे  १८ वर्षांपर्यन्तचे आयुष्य हे मुक्तछंदासारखे बऱ्यापैकी स्वातंत्र्य असणारे, निखळ आनंदाचे आणि अजिबात जबाबदारी नसणारे होते. ह्याचे श्रेय अर्थातच माझ्या आईवडिलांना !! त्यानंतरचे आयुष्य मात्र अकॅडेमिक, नोकरी , विवाहबंधन ( इति गृहस्थाश्रम ), मुलाची आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी अशा गोष्टींमुळे अंमळ थोडेसे तणावपूर्ण गेलं आहे.  त्यामुळे विविध अनुभवाच्या आणि आनंदाच्या फाईल्स जरी मेंदूत तयार झाल्या असतील, तरी त्यांची impressions इतकी खोल नसावीत  आणि परिणामी नंतरच्या आयुष्यात त्या नीट recall होत नसाव्यात. पण माझ्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत, त्याच्या निवडक आठवणी मात्र तिशीनंतरच्या सुद्धा आहेत. माझ्या बाबतीत असे re-live करण्यासारखे क्षण हे 'खेळणे, सहजीवन (togetherness), गाणे आणि खाणे' ह्या विषयांशी निगडित आहेत. असो !! ही ह्या विषयाची थोडी theoretical बाजू आहे. त्यात आपण शिरणार नाहीयोत. इच्छुकांनी ह्याचा जरूर अभ्यास करावा. माझा तो प्रांत नाहीमी फक्त आज स्मरणरंजनाचा निखळ आनंद घेणार आहे आणि जमल्यास वाचकांना देऊ पाहणार आहे.  पण त्यातले काही निवडक मोतीच मी आज इथे वेचणारे.......   

१) आजोळची माया ....!!  

आर. के. नारायण यांच्या प्रसिद्ध 'THE GUIDE ' ह्या कादंबरीत त्यांनी राजू गाईडच्या तोंडी बैलगाडीचे वर्णन टाकले आहे. सुरेख इंग्रजीत केलेले ते वर्णन वाचून मी डायरेक्ट आमच्या आजोळी म्हणजे सोनवड्यात पोचलो आणि मला गावातले नावाजलेले गाडीवान बाबुकाका टिकेकर यांच्या बैलगाडीची नितांत आठवण झाली. "I enjoyed the smell of the straw in the cart " हे कादंबरीतले वाक्य वाचून बाबुकाकांच्या गाडीत खास प्रवाश्यांना बसण्यासाठी अंथरलेल्या पेंढ्याचा वास (कि सुगंध ?) माझ्या नाकात घुसला. 'स्मरणरंजन' होs ..... दुसरं काय ?? सोनवडे-संगमेश्वर हा रस्ता ५ मैलाचा !! हुंबैला परत जाण्यासाठी देवरुख-मुंबई गाडी (यष्टी) साधारण सकाळी ८ वाजता संगमेश्वरला यायची. ती गाठण्यासाठी पहाटे साडेचारला सोनवड्यातून बैलगाडीने निघावे लागे. त्याआधी आम्हाला पहाटे ३ वाजता उठावे लागे. प्रवासातले 'समर प्रसंग' टाळण्यासाठी मग बळेबळेच प्रातर्विधी आटोपण्यासाठी आम्हां छोट्यांना पिटाळीत. आदल्या दिवशी रात्रीच आमसुले, कुळथाचे पीठ, एखादा फणस, आंबे-फणसाची साटे, अमृत कोकम, पावटे, घरचे तांदूळ असा कोकणी मेवा आमची प्रेमळ आजी माझ्या आईकडे सुपूर्त करीत असे.मुंबईहून आणलेल्या ट्रंकेत ते सगळं पूर्ण मावेपर्यंत कोंबणे हा एक झोपण्यापूर्वीचा सोपस्कार असे. (कधीकधी ट्रंकेची कडी नीट लागावी, म्हणून मला त्या कचकून भरलेल्या ट्रंकेवर बसवीत. ताईला नाही हं ...ती खूप मानी होती). त्यात 'कमु' (म्हणजे माझी आई) दुसऱ्या दिवशी परत जाणार म्हणून एखाद्या दीक्षित काकू कंदील आणि दिल घेऊन निरोप द्यायला यायच्या. बाबुकाका अलार्म लावल्यासारखे आपली बैलगाडी घेऊन अंगणापासून ५० मीटरवर असलेल्या बेड्यात बरोब्बर साडेचारला हजर होत. ( 'बेडे' म्हणजे फेन्सिंग किंवा कुंपणाचे आडवे बांबू लावून कमीतकमी खर्चात केलेले सिक्युरिटी गेट ! एक टांग बांबूच्या वरून पलीकडच्या दगडावर टाकल्याशिवाय हे ओलांडता येत नसे). पण बाहेर अजून मिट्ट काळोख असल्याने गाडी आलेली मात्र आम्हाला दिसत नसे. बाबुकाकांच्या 'ओss नानीs' अशा पांढरी चार मधल्या मींडयुक्त हाळीमुळे ते कळायचे.  एका अर्थी अंधार असायचा ते बरेच होते, कारण त्यामुळे आम्हाला निरोप देताना आजी स्वतःच्या डोळ्यातीळ अश्रू पदर लावून पुसायची तेही जेमतेमच दिसे. 'दृष्टिसुख' सोडून कुठलीही चैन (comfort) नसणाऱ्या ह्या बैलगाडीचा मुख्य विशेष म्हणजे तिला जुंफलेले तुकतुकीत कांतीचे देखणे बैल !!  त्यांचे सौंदर्य आणि सौष्ठव म्हणजे सलमान खान आणि अक्षयकुमार यांच्या तोडीचे होते. आमच्या दादामामाने त्याने लिहिलेल्या कथेत वयात आलेल्या 'बाजीराव' ह्या बैलाचे वर्णन बाबुकाकांच्या बैलजोडीला शोभेसे आहे. ( "शेपटी पायघोळ. पुरी उंची . महिरपी कंसासारखी टोकदार शिंगं नि चांगले पायलीएव्हढे वशिंड. झाडाच्या खोडासारखी गर्दन"- कथा 'बाजीराव'- कै. श्री. ल. पुरोहित). परंतु हे दोन्ही बैल मध्यम गटातले (बँटम वेट) होते. तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूमध्ये असतात तसले आडदांड सांड नव्हेत. बाबुकाकांच्या बैलांनी फार फार तर शेतात जोत धरले असेल. पण ते कर्मयोगी होते; नंदीबैल नव्हते. गावात यष्टी यायच्या आधी सोनवड्यात डांबरी सडक नव्हती. लाल माती असली, तरी सगळं रस्ता खडबडीतच असे. तरी हे दोन्ही पट्ठे निमूट पुढे वाटचाल करीत. खडबडीत रस्त्यावर देखील ते इतके लयबद्ध चालायचे, कि त्यांच्या गळ्यातली पितळी घुंगुरांची माळ अगदी 'छंदा'त वाजायची. त्यांना चाबकाचे फटके मारले कि मला बाबुकाकांचा खूप राग यायचा. (फक्त मी सर्वसामान्य मानव असल्याने त्याचे वळ माझ्या पाठीवर कधी उठले नाहीत). बाबुकाकांच्या चाबकाला साथसंगत होती ती त्यांच्या संस्कृतोद्भव मराठीची, अर्थात आकाराने संपणाऱ्या आणि बैलांना वाहिलेल्या शिव्या ओव्यांची !! कधी कधी आजी संगमेश्वरास सोडायला यायची. (कारण तिला माधवाकडे म्हणजे तिच्या सक्ख्या भावाकडे जायचे असायचे). आजी बैलगाडीत बसली, की म्हातारपणामुळे विशविशीत झालेल्या तिच्या कानाच्या पाळ्या हादऱ्यांमुळे हलत. सगळ्यांचेच बोलणे कंपयुक्त असे. बाबुकाकांची एकीकडे चाललेली 'अंतूबर्वे' धर्तीची राजकीय कॉमेंटरी गंमतशीर असायची. पण बैलगाडीत एकंदर माहोल बनलेला असे. एकीकडे परत जाताना वाईटही वाटे. एकदा तर सुट्टीत थोडासा आजीचा रोष पत्करून मी आणि ताईने एका कुत्र्याच्या पिल्लाशी आम्ही गट्टी जमवली होती. कहर म्हणजे गावातून निघताना आमच्या बैलगाडीच्या मागून ते येऊ लागले. आमचा नाद सोडून परत फिरण्यापूर्वी ते जवळजवळ मैलभर चालले असावे. असा असतो लळा !! निस्वार्थी प्रेम जनावराला लवकर कळते. बरेच वेळा आजोबा (म्हणजे माझ्या आईचे काका) हे एका हातात काठी घेऊन पायताण कराकरा वाजवीत बैलगाडीच्या मागून पायपीट करत दोनेक मैलांपर्यंत सहज यायचे. कारण अर्थातच बैलगाडीत बसायला आणखी जागाच नसे. वयाची 'साठी' केव्हाच ओलांडलेली असेल त्यांनी. म्हणजे शरीरातल्या काही ना काही वेदना सुरु झाल्याच असतील कि. पण त्याची कुठेच वाच्यता नाही. कारण सगळेच पुतणे, पुतण्या आणि नातवंडे याच्यापुढे त्यांना बाकी सर्व दुय्यम वाटे.  सोनवड्याचा (खडबडीत) मेन रस्ता संपला आणि गाडी मुचरीकडे वळली, कि उतारावर बाबुकाका अशी काही गाडी घुमवीत कि बैल उधळलेत असा भास होई. संपूर्ण प्रवासातला हा मोठ्ठा 'क्लायमॅक्स' असे. आता बाबूकाकाही गेले, आमचे आजी-आजोबाही गेले, ते बैलही गेले. बाबुकाकांचा एक मुलगा एस टी मध्ये कंडक्टर झाला. गावातील काहींनी शिक्षणासाठी तर काहींनी रोजीरोटीसाठी मुंबईकडे धाव घेतली. आणि गाव बऱ्यापैकी ओस पडले. तथाकथित आधुनिकतेमुळे एव्हाना गावातील स्निग्धताही संपली असावी. नाही म्हणायला माझा मामेभाऊ किरण ह्याने हुन्नर दाखवून आजीचे घर पुन्हा नव्याने बांधले आहे, ज्याचे नाव आहे 'नानीचे घर' !!

घराला घरपण आणण्यासाठी (आणि 'पुरोहित' कुटुंबाला वर आणण्यासाठी) स्वाभिमानी आजीने अपरिमित काबाड कष्ट केले. त्यामुळे ह्या घराला 'नानीचे घर' ह्यापेक्षा समर्पक नांव नाही. शहाजहानच्या बेगमला जसा ताजमहाल पाहता आला नाही, तसे आजीलाही 'नानीचे घर' पाहता आले नाही. आजीचे नाव 'सरस्वती' होते. तिच्या नावाला शोभेल अशी तिची बुद्धी अतिशय तल्लख होती. आजीकडे आम्ही नातवंडांनी अनेक वेळा उन्हाळ्याची सुट्टी मोठ्या आनंदात घालविली आहे. अजूनही लाकडी चुलीचा धूर नाकात गेला कि सगळ्या आठवणी ताज्या होतात. आजीच्या स्वच्छ सारवलेल्या लंब-आयताकृती स्वयंपाकघरात दगडी पायरीवर बसून सकाळचा चहा घेतानाचा आनंद 'वाह ताज'मध्ये नाही. चहाच्या बरोबर आजी आणि आमची आई ह्यांच्या खास जिव्हाळ्याच्या गोष्टी असत. काही आम्हां मुलांना समजणाऱ्या आणि काही न समजणाऱ्या !! मूडमध्ये असली, कि आजी मला लाडाने 'विका' म्हणायची (म्हणूनच मी सेल्स मध्ये गेलो कि काय ??😀). मी थोडा मोठा झाल्यावर माझ्याकडून काही नकला पण करून घ्यायची. आजीचा बोलण्याचा आवाज चांगला खणखणीत आणि जव्हारीदार होता, त्यामुळे चौसुपी मोठ्या घरात सुद्धा तिचे बोलणे सगळीकडे ऐकू जायचे. हा आवाजाचा गुणधर्म आईमार्फत माझ्याकडे आलाय. मला एक अविवाहित मामा होता, त्याचे नाव मधुमामा !!. त्याच्याकडे कुठल्याही विषयावर  एक्स्पर्ट कॉमेंटरीची जबाबदारी असायची. त्याच्या आवाजात काही वेगळीच harmonics आणि एक कोकणी 'हेल' होती, ज्यामुळे घरातले वातावरण 'सिद्ध' होई. तुकारामाच्या दुकानावर जाऊन रोज वर्तमानपत्रातील शब्दांनशब्द वाचल्यामुळे मोरारजीभाईंच्या शिवांबूपासून इंदिरेच्या आणिबाणीपर्यंत बित्तम्बातमी त्याच्याकडे असायची.  लाकडी जुन्या फडताळामध्ये अतिशय मर्यादित साधन सामुग्रीमधूनही केलेला आजीचा स्वयंपाक अतिशय चविष्ट असायचा. मी तर काही वेळा आमटी चक्क वाटीने प्यायल्याचे मला आठवते. वालाची उसळ, भाजणीचे वडे, उकडगरे, मोदक, गऱ्यांची कढि, फणसाची सांदणे, आठलाची भाजी अशा तिच्या अनेक कोकणी सिग्नेचर दिशेस होत्या. आमच्या आजोबांना खूप उशिरा अंघोळीला जायची सवय होती. आणि इकडे आजीने काहीतरी फर्मास जेवायला केलेलं असे त्याचा घमघमाट सुटलेला असे. कधी एकदा आजोबांची अंघोळ-पूजा होतेय असं व्हायचं आम्हाला. आम्ही मुले जेवण झाल्यावर खरकटी केळीची पाने बाहेरच्या गोठयातील म्हशीला मोठ्या उत्साहात घालायचो. हे सुख ' बनाना लीफ' रेस्टॉरंट मध्ये जाऊन मिळेल का ...?? मोठमोठे उर्दू कवी म्हणतात तसे मी म्हणतो "वो भी एक जमाना था ... "

आजीने झाडावरचे रातांबे काढायला शंकर गुरवाला बोलावल्यावर आम्हाला अंदाज यायचा की अमृत कोकमाची ही तयारी आहे. मागल्या पडवीत आजीला अमृत कोकम तयार करताना प्रत्यक्ष बघणं म्हणजे पं. रविशंकरांचा 'गुजरी तोडी'चा रियाज खाजगी ऐकण्यासारखे होते. फणसाची सांदणे करताना पण असाच उत्सव असायचा घरात. एकीकडे आजी आणि आई वेताच्या घोळण्यात बरके गरे गाळीत असायचे आणि दुसरीकडे आम्ही भावंडे गरे खाण्यात मग्न असायचो. चारखंडे अर्थातच गोठ्यातील म्हशीला !! आमच्या अंगणात आणि मागील पडवीकडे दोन फणस होते. एकाची चव आंबटगोड, तर दुसरा मिठ्ठास !! झाडावरून फणस उतरविण्याचा एक कार्यक्रम असे. (माझी सक्खी बहीण सौ विद्याताई हिने आजीने सुरु केलेली उकडीचे मोदक आणि फणसाची सांदणे करण्याची परंपरा आजही राखली आहे). तसेच जांभळाची 'बी' अजूनही माझ्या पायाखाली आली की आमच्या अंगणातले जांभळाचे झाड आठवते. साठीनंतरही एखाद्या सर्कशीतल्या खेळीयाप्रमाणे आजोबा सरसर झाडावर चढून जांभळे काढत. आमचे आजोबा (म्हणजे माझ्या आईचे काका!!) घरातील देवाची पूजा करायचे ते मोठे बघण्यासारखे असे. ते अंघोळीला जायच्या वेळेला आम्हाला एक छोटी परडी द्यायचे आणि आमच्याच आवारातल्या भिकूकाकांच्या घराच्या चौथाऱ्यावर असलेली जास्वंदी, तुळस, बोगनवे, कर्दळ, तगर आदी फुले वेचून आणायला सांगत. मग अंघोळीहून आल्यावर खाली पाटावर बसून 'नीर गाठ उकल' पद्धतीने पूजा करीत. मध्यान्हीच्या वेळी त्या खोलीत एका पारदर्शक कौलाच्या झरोक्यातून एक छान कवडसा  बरोब्बर पूजेच्या ठिकाणी येई. आजोबांच्या बाजूला पूजा होईपर्यंत आम्ही दोघं भावंडे बसायचो.  देवतार्जनात काही पितळ्याचे देव , काही फ्रेम्स , शाळीग्राम वगैरे असत. मध्येच 'हा कोणता देव आहे 'वगैरे प्रश्न मी विचारायचो. त्याची ते कौतुकाने आणि हसत उत्तरे देत. ज्या पद्धतीने ते सुंदर पूजा  करीत त्यावरून  ब्रह्मचारी असणाऱ्या आणि आयुष्यभर पांढरे स्वच्छ धोतर-बंडी घालणाऱ्या ह्या माझ्या आजोबांचा aesthetic sense चांगला असावा असे वाटते. ( ह्या पूजेतल्या जास्वंदीच्या फुलावरून मला एक अध्यात्मिक अनुभव आला आहे. पण तो मी विस्ताराने माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर लिहिला आहे). आजोबा आजींनी आम्हाला खूप माया दिली. This all still makes me nostalgic..!! 


२) गिरगांव :

लहानपणाची माझी १४ वर्षे मराठी माणसाच्या गिरगांवात गेल्येयत. शिरावर अजिबात जबाबदारी नसल्याने 'बालपणीचा काळ सुखाचा' ही उक्ती मी पुरेपूर अनुभवली. त्यामुळे ह्या काळातील स्मरणरंजनाचे असंख्य मोती वेचता येतील. गिरगावातील आयुष्य म्हणजे अनेकविध उत्सवांची जणू काही मालिकाच आहे असे मला वाटे. चाळीतला गणेशोत्सव, गिरगांव चौपाटीचे गणपती विसर्जन, गोकुळाष्टमीत बाळगोपाळांना धुंद करणारा कच्छीबाजा, थरांचे राजकारण सुरु होण्यापूर्वीची दहीहंडी, दिवाळीत बाबांनी घरी केलेला षटकोनी कंदील, होळीचा निदान १ मजला वर जाईल एव्हढा होम आणि त्यानिमित्त मारलेल्या बोंबा, बालेनृत्य (जाकडी), कोकणातले खेळे, १०० तास सायकल चालवायचे विक्रम,  काळ्या रामाचे देऊळ, रामनवमीचा सुंठवडा, चैत्रात द्रोणातून मिळालेली आंबेडाळ, नवरात्रात अष्टमीला फुटलेले घागरींचे पेव, असे एक ना अनेक उत्सव मी अगदी मनस्वीपणे अनुभवले आहेत.  शाळेतुन घरी परतताना आईला न सांगता मुगभाटात खाल्लेला साखरेचा गुलाबी कापूस आणि रंगीत बर्फाचा गोळा, (यश ज्वेलरचे मालक) उदय पोवळेच्या घरचा वाढदिवसाचा मेगाकेक, होल-टोन्ड दुधाच्या बाटल्या पुरवणारी निळी दुधकेंद्रे, दारासिंग-माईटी मंगोलच्या फ्री स्टाईल कुस्त्यांच्या पाट्या, रॉक्सीला असंख्य दिवस चाललेले आराधना आणि कटी पतंग, धूमकेतूसारखे मध्येच फुटलेले हुतूतूचे पेव, वर्गात शाळेकडून पहिल्याच दिवशी मिळालेल्या नव्या कोऱ्या वह्यांचा वास, तसेच बॉंबे बुक डेपोत केलेली नवीन पाठ्यपुस्तके -त्यांचा वास  आणि नंतर त्यांना घातलेली कव्हरे, मॉडर्न हाँटेलात मिळणारा अजब खरवस, कोनातली जायफळ घातलेली कॉफी, भाजी आणणारे वसईवाले, रात्रीची जेवणे झाली कि येणारा कुल्फीवाला, खानदानी  गवयासारखे कानाला हात लावून ओरडणारे कल्हईवाले, भांडीवाल्या बोहारणी, कापूस पिंजणारे, साहित्य संघ, मॅजेस्टिक ऑपेरा हाउस थेटरे, स्वतःच्या (आणि इतरांच्या) जीवाची परवा ना करता पकडलेल्या पतंगांची चळटेंबे आणि वीरकरची घरगुती थाळी, चाळीत लाकडी यंत्र चालवून केलेली सार्वजनिक आईसक्रीम पार्टी, श्रावणात आई पुजायची ते जिवतीचे पिवळे लाल कागद, नागपंचमीचे कडबू, हरितालिकेच्या छोट्या सखी पार्वती, आय पी एल ला लाजवेल असे गल्ली क्रिकेट, लगोर्या, सागर ड्रेसेस मधली माझ्या बाबा-सूटची खरेदी, शाळेच्या युनिफॉर्म रेनकोटची खरेदी, नवलकर-दंडवते-वाजपेयींच्या निवडणूक प्रचारसभा, मवाली बेवडे लोकांचा रोजचा राडा, चाळींमधली प्रेमी युगुले अशा भूतकाळात नेणाऱ्या एक ना अनेक गोष्टी गिरगावशी निगडित आहेत, ज्या  nostalgic करणाऱ्या आहेत.   किती लिहिणार मी ?? (एक दीडशे पानी पुस्तक होईल).

तरीही एके काळी near to my heart असलेले काही विषय मी इथे विस्तृतपणे लिहिणार आहे..... !

३) चिकित्सकचे दिवस ... !!

पाचवीत जाताना आमच्या झावबावाडीतल्या शिशुविहार शाळेतून गिरगावातल्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कुल ह्या शाळेत मी प्रवेश घेतला. ही शाळा आर्यन हायस्कुलप्रमाणेच हुशार विद्यार्थ्यांची शाळा म्हणून मुंबईत प्रसिद्ध होती. दोन तीन वर्षे आधी ह्या शाळेतली सुलभा शेट्ये आणि सुधीर शेट्ये ही स्कॉलर भावंडे सलग दोन वर्षे एस. एस. सी. बोर्डात पहिली आली होती. तेव्हापासून तर शाळेची 'शेअर व्हॅल्यू' खूपच वर गेली. त्यामुळे ह्या शाळेत गेल्यापासून मला उगीचच "आजपासून आपण 'हुशार' झालो आहोत" असे वाटू लागले. प्रत्येक यत्तेच्या ५ तुकड्या होत्या. प्रत्येक तुकडीत हुशार आणि सामान्य मुलांचे एक अजब मिश्रण असायचे. हुशार मुलांचा सामान्य विद्यार्थ्यांवर प्रभाव पडून त्यांचा विकास होईल असा एक 'भाबडा आशावाद' ह्यामध्ये होता.  भाबडा अशा कारणाने की सामान्य मुलांच्या संगतीने हुशार हुशार मुले 'सामान्य' झालेली देखील मी 'हेची डोळा' पाहिली होती. सहावीत माझ्या शेजारी मुद्दाम एक सो कॉल्ड 'ढ' विद्यार्थिनी बसविली होती. ती बुद्धीने तशी बरी  होती, पण केवळ योगायोगाने तिच्या आडनावात 'ढ' हे अक्षर होते. प्रत्येक वर्गात मुलामुलींचेही एक मिश्रण होते. ९ वीत जाईपर्यंत निवडक मुलांचे हे नुसते 'मिश्रण' न रहाता काही रासायनिक संयुगेही तयार झाली होती. झावबावाडीतील शिशुविहार प्राथमिक शाळेत असताना आपण विद्यार्थीदशेत आहोत असे मला वाटे. ते चिकित्सकमध्ये गेल्यावर एकदम बदलले. विद्यार्थी म्हणून माझा self -esteem चांगलाच वाढला. माझ्या आईवडिलांनी आमच्यासाठी केलेल्या असंख्य चांगल्या गोष्टीली एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हां दोघांना उत्तम शाळेत घातलं. माझी मोठी बहीण 'विद्याताई' ही पाठारे प्रभूंच्या कमळाबाई हायस्कुलमध्ये होती.  माझी शाळा गिरगावातील असल्याने आमच्या वर्गात टपोरी मुलेही होती. पण त्यांच्या टपोरीपणालाही एक वळण होते. कारण  टीव्ही ह्या राक्षसाचा अजून जन्म झाला नव्हता. ही मुले वर्गातल्या मुलींची छेडवगैरे काढत नसत. पण आपापल्या गल्लीत भामटेगिरी करीत. माझ्या वर्गात काही मुले मेट्रो-धोबीतलाव वरून बसने शाळेत यायची. त्यांचे बसचे तिकीट (विशेष करून मुलींचे) त्यांच्या घड्याळाच्या पट्ट्यात सुरनळी करून अडकवलेले असे. त्याचे मला फार कौतुक होते. योगायोगाने कि काय माहिती नाही, पण ह्या बसने येणाऱ्या मुलांचे युनिफॉर्म टेरिकॉटचे असायचे. त्यांच्याकडे सॅन्डविचची टेबल टेनिस रॅकेट असायची. ही मुले मला 'प्रिव्हिलेजेड' वाटायची. पण त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीच आढ्यता नव्हती. ह्यातील काही मुलांशी माझी दोस्ती असल्याने, ती मुले आमच्या चाळीतल्या घरी येऊन माझ्या आईच्या हातची पोळीभाजी देखील खाऊन गेले आहेत. ( त्यातील एक दोस्त म्हणजे अलीकडेच अकाली निवर्तलेले ठाण्यातील माझे मित्र डॉ. सुनील नलावडे ). शाळेत ऍडमिशन घेतल्यावर मी बहुधा लगेच सेटल झालो असणार. कारण पाचवीत हुशार मुलांच्या वर्गातदेखील माझा चक्क दुसरा नंबर आला. (परीक्षेच्या आधी आमच्या घरी माझी अभ्यासातील टंगळमंगळ लक्षात आल्यामुळे बऱ्याच ठिणग्या पडल्या... पण ते वेगळे !! माझ्या 'पाचवीला' पुजलेला अभ्यास मला अजिबात आवडत नसे 😆). पण एक सांगतो कि हे छोटेसे यश माझा अभ्यासातला आत्मविश्वास वाढायला भविष्यात कारणीभूत झाले. 

खरं सांगू का, उत्तम शाळा पुष्कळ असतीलही. पण शाळा म्हटल्यावर 'चिकित्सक' सारखी दुसरी शाळा नाही असे मला अजूनही वाटते. नव्हे सर्व दृष्टीने होतीच ती तशी. हाफ व्हाईट रंगाची सुरेख इमारत,  शिसवी पॉलिश  केलेले नेटके भव्य प्रवेशद्वार, रुंद जिने, यु आकाराच्या इमारतीत सामावलेले सुंदर पटांगण, त्याला लागून टेबल टेनिस रूम, प्रशस्थ वर्ग आणि बाके, प्रत्येकाला बाकाच्या खाली दप्तर ठेवायला असलेली जागा, त्या काळात सुंदर सिरॅमिक टाईल्स असलेली महाकाय गच्ची, सुसज्ज वागळे हॉल, ड्रॉईंगसाठी स्वतंत्र वर्ग, हस्तव्यवसायासाठी वेगळा वर्ग, MA MSc-STC केलेले विद्वान शिक्षक, रघु -आत्माराम इत्यादी अदबशीर आणि प्रेमळ शिपाई, अद्ययावत प्रयोग शाळा, प्रशस्थ टीचर्स रुम, १० पैशात बटाटेवडा देणारे कँटीन आणि ह्या सगळ्या कोंदणात शोभतील, बसतील अशी एकाहून एक छान मुले !! मी नववीत असताना माझ्या वर्गातील काही हुशार मुलांमध्ये मला तर भावी वसंत कानेटकर, इरावती कर्वे, कुसुमाग्रज वगैरे थोर मंडळी मला दिसत. आम्ही तीन चार मुलांनी मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी एक विवक्षित जागा निवडली होती, जिथे कुणीही फिरकायचं नाही. गच्चीच्या दुसऱ्या एन्ट्रन्सला एक कायम बंद असलेला दरवाजा होता. त्याला लागून एक जिना होता. तिथे आम्ही
डबा खायचो. ( This was height of 'privacy' but a complete
betrayal with hygiene!! ). 

वरती वर्णिलेल्या शालेय श्रीमंतीला शोभून दिसतील आणि तोलून धरतील असे आमचे मुख्याध्यापक होते. त्यांचे नाव गुरुवर्य श्री वासुदेव शंकर नाबर !! उत्तम शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पुरस्काराचे ते मानकरी होते. त्यांनी भौतिकशास्त्राची दहावीची पाठ्य पुस्तकेही लिहिलेली होती. मुलांना न ओरडता आदरयुक्त जरब कशी वाटेल, हे नाबर सरांकडूनच शिकावे. अभावाने दिसणारा माझा खट्याळपणाही सरांनी २-३ वेळा खुबीने पकडला होता. ते आता ९२ वर्षाचे आहेत. अलीकडेच मी त्यांना भेटायला माहीमच्या घरी गेलो होतो. पण चुकून त्यांच्या विश्रांतीच्या वेळेला गेल्यामुळे भेट झालीच नाही. (योगायोग असा कि त्यांचा धाकटा मुलगा संतोष हा IIT मधला माझा मित्र. मी त्याच्या घरी न्यू जर्सीला राहूनही आलोय). ५ वी ते ९ वी ही चारही वर्षे माझी शाळा सकाळी ७ वाजता असायची. पहाटे ६ वाजता मंगलप्रभात सुरु झाल्यावर मी उठायचो. कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांबरोबर माझा ब्रेकफास्ट व्हायचा. १५ मिनिटात शाळेत पोचायचो. सातवी आणि आठवीत असताना आम्हाला चंद्रगिरी बाई क्लास टीचर होत्या. त्यांचा मी लाडका विद्यार्थी होतो. शाळेच्या वार्षिक अंकासाठी आम्ही काही मुले अनेक वेळा त्यांच्या ठाकूरद्वारच्या घरी जायचो. योगायोग असा कि त्यांनी काही वर्षांपूर्वी साहित्य संघाला दोन लाखाची देणगी देऊन पाचव्या मजल्यावर एक हॉल बांधून घेतला, तिथेच काही संगीतसंस्थांतर्फे माझा दोन वेळा सोलो हार्मोनियमवादनाचा कार्यक्रम झाला. दुर्दैवाने बाई चारेक वर्षांपूर्वीच निवर्तल्याचं कळलं, त्यामुळे भेट झालीच नाही. वाईट वाटलं ऐकून!😢 आमचे ड्रॉईंगचे जोशीसर पण मला खूप आवडायचे. एकदम तरुण होते. मला इंटरमिजिएटला भारणे पारितोषिकासहित चांगली ग्रेड मिळाल्यामुळे मी त्यांचा लाडका विद्यार्थी झालो होतो. इतर विद्यार्थ्यांना शेडींग करून दाखवणे किंवा शिकवणे, वस्तुचित्रांसाठी सेट लावणे वगैरे कामे माझ्यावर ते सोपवायचे. तसेच रंगपेट्यां ठेवलेले मोठठे पेटारे आणि त्याच्या चाव्याही त्यांनी माझ्याकडे दिल्या होत्या. This indeed was a privilege !!तसेच अधेमध्ये मला ते त्यांच्या चित्रकार मित्रांकडे घेऊन जायचे (बहुधा संस्कार करण्यासाठी असावे. मी चित्रकलेत करिअर करावी असे त्यांना वाटत असावे). पण १९७५ साली आम्ही गिरगांवातून ठाण्याला आल्यामुळे माझा चित्रकलेचा रस्ता तिथेच थांबला आणि खुरटला.😢  रेगे मॅडम, नार्वेकर मॅडम, पालकर मॅडम आणि दिवाडकर मॅडम ह्या आणखी काही माझ्या आवडत्या शिक्षिका !!चिकित्सकने आम्हा विद्यार्थ्यांना भौतीक विश्वात ठामपणे उभे राहण्यासाठी जे काही लागतं ते सर्व काही दिलंच, पण त्याशिवाय आजही re-live करावेसे वाटतील, असे शालेय जीवनातले मौलिक क्षणही दिले.  त्याबद्दल मी ह्या विद्यामंदिराचा  कायमचा ऋणी आहे !!🙏

४) क्रिकेटचे गारुड... !!

हल्ली क्रिकेटमध्ये बॅटिंग पेक्षा बेटींगच जास्त असते. हे बेटिंग आणि मॅच फिक्सिंग शिरायच्या आधी, मला क्रिकेट खूप आवडायचे. त्यामुळे ह्या विषयात स्मरणरंजन करायला खूप जागा आहे. लहानपणी आम्ही गिरगांवात राहायला असल्याने रबरी बॉल, चिंध्यांचा बॉल, ड्युबचा बॉल , टेनिसचा बॉल, जम्बो आईसस्क्रीमचा पोकळ बॉल आणि लेदर बॉल अशा विविध प्रकारच्या चेंडूंनी मी क्रिकेट खेळलो. किंबहुना गिरगांवात बालपण घालवलेल्या सगळ्याच माझ्या बरोबरच्या मुलांना हा अनुभव होता. तिथे वाड्यां-वाड्यांमधले गल्लीतले सामने रणजी ट्रॉफीपेक्षा जास्त रंगत. हिरोगिरी करायला तरुणांसाठी 'क्रिकेट' हा एक मान्यताप्राप्त खेळ होता. क्रिकेट मॅचसाठी मात्र टेनिसचा बॉल असे. आमच्या काळातील जवळ जवळ सगळे कसोटीपटू ह्या टेनिसच्या बॉलने खेळलेले आहेत. अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या रामनाथ पारकरच्या नावावर टेनिसच्या चेंडूवर केलेलं शतक आहे. ( त्याच्या शतकाचे हे

off the 'record'  कोणालाही माहिती नाही). मी बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करत असे. माझ्या क्रिकेटची हाताबाहेर गेलेली आवड बघून आई वडिलांना आपला मुलगा भविष्यात नक्की काय करणारे पुढे, ह्याविषयी चिंता लागून राहिली होती. पण मला आठवतंय कि नवीन बॅट-बॉल घ्यायचा माझा हट्ट एक दिवस आईने पुरवला. (मुख्य म्हणजे वर्गात पहिला दुसरा नंबर यायची अट न घालता !! ). मला चांगलं आठवतंय कि साधारण संध्याकाळी ५ वाजता आम्ही Genuine Willow असे लिहिलेली बॅट घेऊन आलो आणि नंतर मी पुढले दोन तास एकटाच आमच्या घरासमोर अंधार पडेपर्यंत खेळत होतो. त्यामुळे सगळ्या जन्तेला कळलं कि विकासने नवीन बॅट णलेय म्हणून. त्याचा परिणाम एव्हढाच झाला, कि रोज खाली खेळायला माझी बॅट-बॉलच मला घेऊन जावे लागे. अजूनही कुठेही गल्ली क्रिकेट बघितलं, कि माझं लहानपण डोळ्यापुढून तरळून जाते. नंतर मी ९ वीत असताना माझ्या वर्गात काही एलिट मुलांना मुंबई जिमखान्यावर जाऊन सिझनच्या चेंडूने क्रिकेट खेळण्याची हुक्की आली. त्यातला एक जण खरोखरच चांगली मिडीयम पेस बॉलिंग करीत असे आणि तो शाळेला रेप्रेझेन्ट करी. मलाही एक दिवस खेळायला यायचा आग्रह झाला. वास्तविक लेदर चेंडूने खेळताना ग्लोव्हज, पॅड्स, शुज, abdomen guard असा kit असल्याशिवाय खेळु नये. पण माझ्याकडे ह्यातले काहीच नसल्याने मी गेलो तसाच. मला ह्या मुलांनी पॅड्स दिली होती. पण मी मुर्खासारखा शूज न घालता बेअर फुटेड  बॅटिंगला गेलो.  राजीवचे २ चेंडू मी नीट खेळलो. पण तिसरा यॉर्कर सरळ येऊन पायाच्या अंगठ्यावर पडला आणि अक्षरशः रक्ताची चिळकांडी उडाली. अशा रीतीने  भविष्यातील एका उमद्या क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट मुकले... 😂

आमच्या लहानपणी कुठलीही टीम भारतात आली, की काही विशिष्ट प्रकारच्या टॉफीज दुकानदार विक्रीसाठी ठेवीत. चोकोलेटच्या रॅपरमध्ये अगदी छोटा (१ सेमी X १.५ सेमी) सफेद कागदाचा आयताकृती स्टिकर ठेवलेला असे. गम्मत अशी कि तो कागद जरासा ओला केला, की कुठल्यातरी गाजलेल्या कसोटी क्रिकेटवीराचा फोटो प्रिंट व्हायचा. आपल्याला कुणाचा फोटो लागणार ही उत्सुकता आणि आनंद असे. ह्या मखलाशीमुळे माझ्यासारखी सरळ मार्गी पोरेही टॉफ्या खाऊ लागली.  माझ्या माहितीत काही जणांच्या शहरात हे गंमतवजा फ्याड नव्हते. ( रावळगावच्या हे गावीही नव्हतं). एक दोन वर्ष आम्ही ह्या जादूची खूप मजा लुटलेय. बोर्डे, वाडेकर, कुंदरन, सुर्ती, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, पतौडी, टोनी लुईस, ग्रेग, ब्रेअर्ली, ऍलन नॉट अशा अनेक खेळाडूंचे फोटो मला प्रिंट केल्याचे आजही स्मरते. एकदा आमच्या चाळीतल्या एका कमळाकर नावाच्या समंजस तरुणाने मला ब्रेबॉर्नला रणजी ट्रॉफी फायनल बघायला नेतो, अशी ऑफर दिली. त्याने डायरेक्ट माझ्या आईची परवानगीच काढली. मी तर एका पायावर तयार होतोच.  मॅच होती मुंबई विरुद्ध बंगाल अशी ( साल १९६९). बंगालचा कप्तान समीर चक्रवर्ती होता. डावखुऱ्या दिलीप दोशीने अजून कसोटी पदार्पणही केलेले नव्हते. बंगालमध्ये अंबर रॉय नावाचा कसोटीवीरही होता. गोपाळ बोस ओपन करायचा ( त्याची आडवी बॅट आणि उंच फटकारे बघून, त्याने टेनिसच्या चेंडूने खेळावे अशी टिप्पण्णी त्यावेळचे स्पष्टवक्ते ( कि आचरट  ?? ) कॉमेंटेटर बॉबी तल्यारखान यांनी केली होती). अशोक मंकडचे गाजलेले नर्व्हस नाईंटी प्रकरण मला हेचि डोळा बघायला मिळाले. तो ९९ ला आऊट झाला. वाडेकरने शतक ठोकले, गावस्कर, दुराणी , वाडेकर, सुधीर नाईक, शिवलकर , सोलकर असे बरेच कसोटीवीर बघून डोळ्याचं पारणं फिटलं. मी त्यानंतर जेव्हा जेव्हा ब्रेबॉर्न वानखेडेवर गेलो, तेव्हा ५० वर्षांपूर्वी मी पाहिलेल्या मॅचची क्षणचित्रे डोळ्यापुढून तरळून जातात. आज कितीही HD चॅनेल वरच्या मॅचेस बघितल्या, तरी ह्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेल्या आगळ्यावेगळ्या मॅचचे महत्व अनन्य साधारण आहे. 

आम्ही ठाकूरद्वारला राहायला असल्यामुळे आम्हाला बॉंबे जिमखाना, हिंदू जिमखाना, पारसी जिमखाना हे खूप जवळ होते. हल्ली एखाद्या सामान्य कसोटीवीराला हॅन्डशेक अंतरावरून बघायचे असेल, तर जीवाचे रान करावे लागते. आमच्या शाळेत अचानक बातमी यायची
कि हिंदू जिमखान्याला मफतलाल विरुद्ध स्टेट बँक मॅच आहे . कि लगेच आम्ही शाळा सुटल्यावर एक राउंड जिमखान्याच्या मारून यायचो आणि आमचे सगळे हिरो ( विश्वनाथ, मंकड, सोलकर, सरदेसाई ) वगैरे लोक किरकोळीत दृष्टीला पडायचे. तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही कि एकदा आम्ही बाउंड्रीच्या बाहेर उभे असताना सुनील गावस्कर आमच्यापासून २ फुटावर फिल्डिंग करत होता. कारण जिमखान्या स्टॅन्ड वगैरे नव्हते . यु हॅव टू स्टॅन्ड आउट साईड द बाउंड्री अँड वॉच द क्रिकेट! ( See the photo). १९७४ ला आपल्याकडे विंडीज लोक आले होते. तेव्हा लॉईड किंवा तत्सम बलाढ्य फलंदाजांचा एक सोपा झेल जगातले सगळ्यात भारी  2 क्षेत्ररक्षक ( हा पुणेरी वाक्प्रचार आहे... )  ब्रिजेश पटेल आणि सोलकर यांनी एकमेकांवर आपटून कसा सोडला, ह्याची कथा आम्ही दस्तुरखुद्द एकनाथ सोलकरडून गप्पा मारतात तशी चार फुटांवरून ऐकली. ते स्वतः ही कथा रमाकांत देसाई यांना सांगत होते. कथा सांगता सांगता एकनाथ विड्याच्या पानाचे मोट्ठे पुडके कसे बाळगतो हेही कळलं. हा  विडा काही 'कलकत्ता मिठा' नसावा. त्याने घातलेल्या मफतलालच्या रंगेबिरंगी शर्टाला लाजवेल इतका पानाचा विडा रंगला होता ; आणि गप्पाही.... !! हल्लीचा 'युवी' एका ओव्हर मध्ये भले सहा षटकार ठोकू देत , पण ७३ साली दुराणीने फर्माईश म्हणून मारलेल्या २  सिक्सर्स आम्हाला स्मरणरंजनाचा आनंद देतात, हे खरं आहे.  Nostalgic moments have no comparison...!!


५) पहिली स्काय स्क्रॅपर .... 

हा लेख लिहीत असतानाच माझ्या कानावर बातमी आली कि ताडदेवच्या प्रसिद्ध उषा किरण बिल्डिंगला आग

लागली आणि बरेच नुकसान झाले आहे. वाईट वाटलं!! एके काळी मुंबईतली ही पहिली स्कायस्क्रॅपर ( १९६०-६३) !! त्या काळी सगळ्यांनाच ह्या बिल्डिंगचे विशेष आकर्षण होते. ६५-७० च्या काळात कुठल्याही जवळपासच्या  एरियात जाणं झालं, तर बसमधून किंवा ट्रेनमधून खिडकीत येऊन ही बिल्डिंग आम्ही बघणारच. आम्हाला ६६ नंबरच्या बसने मावशीकडे परळला (व्हाया सात रस्ता) जाताना ही बिल्डिंग लांबून बघण्याचा योग यायचा, पण सर्कशीतला वाघ बघतो तसे लांबून...!!. (अशी वदंता होती कि अभिनेत्री वैजयंतीमाला ह्या बिल्डिंगमध्ये राहायची). त्यानंतर परमेश्वरकृपेने ११३ मजली ओरिजिनल WTC (1996), शिकागोचा Sears Towers (1996), १६० मजली बुर्ज खलिफा टॉवर (2012) अशा एकाहून एक उंच इमारती आतून बघण्याचा योग आला, पण बाहेरून बघितलेल्या आकाशी रंगाच्या उषा किरण बिल्डिंगचे मनातले स्थान अजूनही अढळ आहे. हा विलक्षण विरोधाभास आहे.  मी वर म्हटल्याप्रमाणे नॉस्टॅल्जिक गोष्टींची तुलना कशाशीच होत नाही हेच खरे .... !!


६) बरसन लागी रे...!! 

मला शास्त्रीय संगीताची खरी आवड १९८० साली लागली असे म्हणता येईल. त्यामुळे सुरवातीच्या काळात प्रत्यक्ष ऐकलेल्या उत्तम कलाकारांच्या मैफिलीतील रागांच्या बाबतीत तर असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, कि आजही ते स्मरणरंजनाचा आनंद देतील. किशोरीताईंचा हुसैनी तोडी व मीरा मल्हार, अत्ताच निवर्तलेल्या संगीत मार्तंड जसराजजींचे गोरख कल्याण व जोग राग (१९९२-IIT), अभिषेकी बुवांचा जोगकौन्स ( १९८० ठाणे), भीमसेनजींचा सवाईला गेलेला रामकली (१९८२), वसंतरावांचा 'छेडो ना छेडो' वाला बिहाग ( गडकरी, ठाणे), परवीन सुलतानाचा गुजरी तोडी ( सवाई , १९९२), मालिनीताईंचा मारवा ( ठाणे ), बिरजू महाराज -झाकीर जुगलबंदी ( १९८१ IIT ), उल्हास कशाळकरांचा बसंत बहार ( २००१, ठाणे ) गंगुबाईंचा अवाढव्य पुरिया धनाश्री ( २००० औंध), शाहेदभाईंचा श्याम कल्याण (२००१ ठाणे), पं. चिमोटे-बिहाग ( १९९०-छबिलदास) अशा एक ना अनेक मैफिली डोक्यात कोरलेल्या आहेत.  ह्यापैकी एका अविस्मरणीय मैफिली विषयी मी थोडंसं विस्ताराने लिहिणार आहे. 


मला वाटतं १९८१ची गोष्ट असेल. नुकतेच रिटायर झालेले माझे माननीय मित्र (निवृत्तएअर मार्शल श्री अरुण गरुड (प्रभाकर) तेव्हा फ्लाईट लेफ्टनंट वगैरे असावेत. मी वीसेक वर्षांचा असेन आणि IIT त शिकत होतो. एकदा  प्रभाकर सुट्टीवर आले असताना ते मला पार्ले टिळक विद्यालयात असलेल्या एका पावसाळी मैफिलीला घेऊन गेले होते. मैफिल होती श्रीमती प्रभाताई अत्रे यांची !! प्रभाताईंचं कलावतीमधलं 'तन मन धन तो पेवारु' अजूनही रसिकांच्या मनात पिंगा घालत होतं. त्यामुळे अर्थातच शाळेचे प्रेक्षागृह पॅक झाले होते. बाहेर पाऊस 'मी' म्हणत
होता. आम्ही दोघं ओल्या छत्र्या बाहेरच्या बालदीत ठेवून कसेबसे हॉलमध्ये  शिरलो. पार्लेकर आणि मुंबईकरांच्या रसिकत्वाचा दरवळ प्रेक्षागृहात भरून राहिला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्कंठतेचं तेज आणि चातकाची तृष्णा दाटलेली स्पष्ट दिसत होती. प्रथम सोज्वळतेचे प्रतीक असलेल्या प्रभाताईंचे सुभग दर्शन झाले. साक्षात हातात वीणा घेतलेली शारदादेवीच !! हाफ व्हाईट साडी आणि वीतभर 'मरून' रंगाच्या काठांची त्यांनी परिधान केलेली खानदानी साडी ही जणू त्यांच्या गायनशैलीचे प्रतीक असावी असेच वाटत आले आहे मला. प्रभाताईंच्या गाण्यात कधीही क्षुद्रालंकार किंवा उछरुंकळपणा  मी आजतगायत ऐकलेला नाही. त्यांचं गाणं अविकारी आहे !! त्यांचं गाणं एखाद्या हिरव्यागर्द टुमदार गावातून शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखं आहे, जिच्या काठावर जाऊन तृषित गानरसिकांनी ओंजळीने गाणं प्यावं तसं !! वर्षा ऋतूमुळे प्रभाताईं आज फक्त वेगवेगळे मल्हार गाणार होत्या. सुरुवात मिया मल्हारने झाली. नंतर त्या गौड मल्हार आणि शेवटी सूर मल्हार गायल्या. मागोमाग असे ३ मोट्ठे मल्हार गाणे किती अवघड आहे हे मला आता कळते आहे. मिया मल्हारमध्ये कोमल गंधार, अल्प धैवत ; तर गौड मल्हारात शुद्ध गंधार,अल्प धैवत आणि सूरमल्हारमध्ये तर धैवताचे अनन्यसाधारण महत्व हे लागोपाठ भान ठेऊन गायचे आणि शिवाय रंग जमवायचा म्हणजे अवघडच. गायकाच्या तन्मयतेची ती कसोटीच असते.  बाहेर पाऊस धो धो पडत होता आणि इथे गोड गळ्याच्या प्रभाताईंनी अशी काही मैफिल जमवली होती, कि जणू काही हा पाऊस त्या मैफिलीचा अविभाज्य भाग बनलेला होता (Unity कि काहीतरी म्हणतात ना तसं !!).  साडेतीन तास त्यांनी अक्षरशः सुरांची बरसात केली श्रोत्यांवर. साथसंगत होती अनंत राणे आणि दीपक नेरुरकर यांची !! मैफिल संपली तेव्हा दुपारचा दिड वाजला होता. मनावर 'स्वरांचं ओलेपण' आणि कपड्यांवर 'पावसाचं ओलेपण' अशा अलौकिक अवस्थेत आम्ही एका रेस्टॉरंटवर पोहोचलो.  प्रभाकर मला छान हॉटेलात जेवणासाठी घेऊन आला होता. तिथे जेवताना जे काही 'टोमॅटो सूप' आम्ही प्यायलो, तसे सूप मी नंतर कधीही प्यायल्याने मला स्मरत नाही. (कदाचित त्या दिवशी गाण्यापासून खाण्यापर्यंत सगळंच मंतरलेलं असावं !!). तेव्हापासून मैफिलीत कुठल्याही गवयाने मल्हार गायला कि मला प्रत्येक वेळी ह्या मैफिलीची आठवण होतेच होते. एव्हढेच काय, त्यानंतर मी कितीतरी मल्हार ऐकले, पण मी जेव्हा मैफिलीत मिया मल्हार संवादिनीवर वाजवतो तेव्हा प्रभाताईंचीच 'बरसन लागी रे ' ही द्रुत बंदिशच वाजवणं पसंद करतो आणि प्रभाताईंच्या ह्या अविस्मरणीय मैफिलीचा स्मरणरंजनाचा आनंद घेतो. (त्याचा पुरावा 'YouTube' वर उपलब्ध आहे.  Raaga Miyan Ki Malhar- Part 2). अशी अविस्मरणीय मैफिल मला दिल्याबद्दल एअर मार्शल गरुड यांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच !!

७) पूर्णब्रम्ह : माझा एव्हढा लांबलचक लेख वाचून तुम्हाला आता भूक लागली असावी. त्यामुळे आता आपण खाण्यापिण्याच्या स्मरणरंजनाचे काही मोजके किस्से पाहुयात ..... 

आमच्या लहानपणी, घरात इडली सांबार वगैरे करण्याची प्रथा नव्हती. ID ब्रॅण्डचा इडली आटासुद्धा मिळत नव्हता. कारण उडुपी हॉटेले आजच्या इतकी फोफावली नव्हती.  तसेच अत्तासारखं उठसुठ हॉटेलात जायची पण प्रथा
नव्हती. आम्ही साठी-सहामाशी हॉटेलात जायचो.  तर अशा पार्श्वभूमीवर मी ७ वी यत्तेत असताना एकदा आमच्या वर्गातील 'दिनेश' नावाच्या अमीर मुलाने मला मधल्या सुट्टीत गिरगावातील एका उडुप्याकडे नेऊन चमचमीत इडली सांबार खाऊ घातले. मला ते खूप आवडल्याचेही स्मरते. नव्याची नवलाई त्यात होती !! त्यानंतर मी किमान हजारेक वेळा तरी सांबार खाल्ले असेल. ( अहो, मी मद्रासला ३ वर्षे राहिलेला माणूस आहे. तिथे सांबारने आंघोळ करायचे शिल्लक होते बाकी ). पण त्या पहिल्या सांबाराची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. मी हे कसे छाती ठोक पणे म्हणू शकतो ??? तर ऐका आता..... . पुण्यातील एका संस्थेने २०१८ साली माझ्या पेटीवादनाचा कार्यक्रम ठेवला होता. संस्थेचे संस्थापक आणि माझे मित्र श्री. उदय नानिवडेकर यांच्या घरी मी राहायला होतो. सकाळी नाश्त्याला संयमीवहिनींनी झकास इडली सांबर केले होते. तुमचा विश्वास बसणार नाही पण पहिला चमचा उष्टवल्यावर मी मेंटली डायरेक्ट गिरगावात पोचलो. वहिनींनी केलेल्या सांबाराची चव हि थेट मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेल्या उडप्याच्या सांबाराशी तंतोतंत मिळती जुळती होती. मी त्यांना तसे सांगितले देखील. आपला मेंदू इतक्या सूक्ष्म गोष्टी सुद्धा कुपीत साठवून ठेवतो, त्याची कमाल वाटली.  

कोकणात गेल्यावर बरेच वेळा आमची आजी आम्हा मुलांना दूध गुळ पोहे द्यायची. हल्ली 'दूध पोहे' ही आपल्याकडे जवळजवळ विस्मृतीत गेलेली गोष्ट आहे. मला कधीतरी ब्रेकफास्टला दूधपोहे खायचा इसाळ येतो. त्याचा उगम माझ्या लहानपणात असावा. पण त्यामध्ये आम्ही पितांबरीचा सेंद्रिय गूळ घालतो. खरं म्हणजे तो दूधात लगेच विरघळतो आणि गोडपणाही देतो. पण कोकणातल्यासारखी मज्जा येत नाही खाताना, हे खरे. मग त्यात काय काय नसतं बरं ...? पहिली गोष्ट म्हणजे आजीच्या प्रेमाचा Essence त्यात नसतो. (पत्नीने दिले तर मात्र त्यातही 'प्रेमाचा' अंश असतो हां ...... उगीच कुणाचा गैरसमज नको 😜). शिवाय आजीकडे हे पोहे आम्ही कल्हई लावलेल्या पितळ्याच्या वाटीत घेऊन खायचो.  आज खिश्याची कल्हई केली, तरी पितळ्याची वाटी मिळणे अवघड आहे. आजीने दिलेल्या दूधपोह्यासारखे बारीक गुळाचे खडे मध्ये मध्ये दाताखाली येत नाहीत. आणि अर्थातच बसायला जमीन गोमयाने सारवलेली नसते. (पुलंनी खाण्याचा आसनाशी कसा संबंध आहे ह्याची किमान ५ उदाहरणे दिली आहेत).  त्यामुळे अर्थातच स्मरणरंजन प्रक्रिया (Nostalgic process) पूर्ण होत नाही.  एखाद्या पेंटिंगसारखे हे एक काँपोझिशन असते. सगळ्या पदार्थांची लिज्जत वाढवायला वेलदोडे आणि जायफळे पूर्ण पडत नाहीत. त्यासाठी आणखी कशाची तरी आवश्यकता असते........!!
(Food is indeed a necessity for us to survive. How we feel when consuming food depends on the memories associated with strong emotions. The feeling of nostalgia is not just about the taste of food. It’s more of what particular experiences happened when we ate that specific food during that certain moment. It also brings us different emotions, which we will not forget for a long time- Ref: Ornotopia.com)

एखादी नॉस्टेल्जिक गोष्ट तुम्हाला किती टोकापर्यंत घेऊन जाते बघा. आम्ही चौघे मित्र ( forced bachelors) दुबईतील बॉंबे मसाला रेस्टॉरंमध्ये बरेच वेळा जायचो, ते तिथली डाल-खिचडी खायला. तिथे एक स्टिर्ड होता. तो इतके प्रेमाने आम्हाला जेवण वाढायचा आणि आम्हीही त्याला अगदी घसघशीत टीप द्यायचो. डाल खिचडी बरोबर तो एका स्टेनलेस स्टीलच्या छोट्याश्या वाटीत घट्ट दही द्यायचा. गरम खिचडी आणि थंड दही असे हे कॉन्ट्रास्ट मॅचिंग होते. ते माझ्या इतकं लक्षात राहिलं, कि ठाण्याला आल्यावर मी हिला तशा छोट्या वाट्या विकत घ्यायला लावल्या. आमच्याकडे मुगाच्या डाळीची खिचडी केली कि त्याच्याबरोबर ह्या वाटीत मी दही घेऊन एक स्मरणरंजन साजरे करतो. म्हणजे आम्ही चौघेही पुन्हा जेवायला बसलोय असं वाटतं....... !!

नॉस्टॅल्जिक फिलिंगमध्ये काही वैयक्तिक संवेदनांचा भाग असतो.  याचं एक प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण मी देतो. एका मे महिन्यात आंब्याचा सिझन होता. आणि  माझ्या पत्नीने जेवणात फणसाचे सांदणही केले होते. जेवणाचे भरलेले ताट पुढे आले, ज्यामध्ये आंब्याच्या फोडी आणि सांदण एकाच वेळी होते. क्षणभर आधी कशाचा आस्वाद घ्यावा अशा द्विधा मनःस्थितीत मी पडलो. पण मात्र लगेच दोघांपैकी आधी सांदणाची चव चाखली ( फळांच्या राजाची नाही ). याचे कारण सांदणामुळे मला थेट माझ्या आजीची आठवण झाली. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा मुलांसाठी ४-५ तास खपून आजी अफलातून सांदणे बनवायची. कोकणातली ही डेलिकसी आहे. केवळ आजीने घातलेल्या प्रेमामुळेच सांदणानी आंब्यावर विजय मिळविला आणि मला नॉस्टॅल्जिक केले .

खाण्याजेवणाचे असे कितीतरी स्मरणरंजनाचे अनुभव सांगता येतील. 

आता ह्या लेखातला शेवटचा किस्सा .... 

८) एक ममत्वाची कहाणी :

अलीकडेच आम्ही जुनी जागा कायमची सोडली, म्हणजे विकली. तिकडून काही जुन्या गोष्टी नवीन जागेत आल्या, त्या नव्याने पाहताना एक वेगळाच आनंद झाला. त्यात बरीच जुनी पत्रे मिळाली (अशी पत्रे, कि मी 'शिवाजी महाराज' असतो, तर ती सगळी हस्तलिखिते कुठल्या तरी ४० व्या पिढीतल्या मावळ्याने राजा केळकर संग्रहालयात वेगळे दालन करून ठेवली असती 😝). त्यात मी माझ्या आई वडिलांना लिहिलेले एक मनोरंजक पत्र सापडले. २४ नोव्हेंबर 1990 ह्या तारखेचे आहे. म्हणजे आम्ही पुण्याला एरंडवण्यात राहत होतो तेव्हाचं आहे. बरंच काय काय लिहिलंय. पण एका छान गोष्टीचा उल्लेख आहे त्यात. तो वाचून मी nostalgic झालो. पत्र लिहिले त्याच्या आधी 2 आठवडेच माझे बरेच वर्षांचे एक स्वप्न १८ वर्षांनी मी पूर्ण केले होते. माझ्या घरी त्या काळी गाजलेला Philips 739 Amplifier Cassette deck मी घरी आणला होता. 

त्याचं असं झालं.....

साधारण सत्तर बहात्तर साल असेल. एकदा आम्ही आमच्या मन्यामामाकडे बांद्रा येथे गेलो होतो. मामा हिल रोडला New talkies जवळ रिझर्व्ह बँक कॉलनीत राहायचा. खूप एलिट एरिया होता. जिकडे गेल्यावर 'आपण म्हणजे अगदीच हॅं हॅं आहोत" असं वाटतं ना त्याला मी elite एरिया म्हणतो. (असं वाटणं म्हणजे self esteem कमी असल्याचे लक्षण आहे. आम्ही तेव्हा गिरगावातील चाळीत राहायचो). आमच्या मामाकडे नुकतीच नेल्को कंपनीची स्टीरिओ म्युझिक सिस्टिम आणली होती. आमच्या मामा-मामीला classicalची खूप आवड. त्यामुळे ४० आणि २0 मिनिटांच्या छान छान LP/EPs त्याच्याकडे होत्या. भीमसेन, कुमार, जसराज, सैगल हे त्यातले मुख्य कलाकार. मला वाटत तलत मेहमूद, सलमा आगाच्या रेकॉर्डही होत्या. ह्या 'हाय फाय' दिसणाऱ्या उपकरणाबरोबर पूर्ण बिल्डिंगला हादरवणारे 2 मोठठे स्पीकर्स पण होते. अर्थात मामा मामीचा सगळ्यात मोठ्ठा घेण्यासारखा गुण म्हणजे 'निगुती आणि संयम' ! त्यामुळे बिल्डिंग कधीच हादरली नाही. ही सिस्टीम लावताना देखील मामा अगदी अदबीने आणि gracefully लावे. विशेष करून तो ज्या नाजूकपणे 'स्टायलस' उचलून रेकॉर्डवर ठेवी, ते दृश्यही पाहण्यासारखे असायचे. आउटपुट लेव्हलचे लुकलुकणारे हिरवे दिवे बघताना मौज वाटे. बॅलन्स, बास, ट्रेबलचे इफेक्ट अनुभवताना पण अद्भुत वाटे. 'स्टिरिओ-फोनिक साउंड' म्हणजे काय ते नव्यानेच कळले.  त्यात डाव्या स्पीकरमध्ये गायकाचा आवाज, उजव्यात तबला अशा गमती जमती पण होत्या. अगदी समोर बसून मैफिल ऐकल्याचा भास होई. भीमसेनजींच्या आवाजातील जव्हार,अल्लारखां साहेबांच्या तबल्याची 'लव', जसराजजींचा स्वर्गीय सूर, अप्पासाहेबांची मंजुळ साथसंगत आणि रविशंकरांच्या सतारीची 'चिकारी' मी प्रथमच अनुभवत होतो.  हे उपकरण म्हणजे नव्याची नवलाई होतीच; पण 'जी म्या ब्रम्ह पाहीलेच्या' तोडीची होती !! तिथून पुढे चारपाच वर्षांनी हेच उपकरण माझ्या मावसभावाकडेही आले आणि माझा अनुभव गहिरा होत गेला. पण असं एकदा ऐकून थोडेच कान निवणार ...?? संपृक्ती यायला खूप अवकाश होता अजून. तेव्हा काही मला त्ताइतकी संगीताची आवड नव्हती. पण क्लासिकलचे प्रथमसंस्कार ह्या अँप्लिफायरने, म्हणजे एका अर्थाने माझ्या मामाने आणि मावसभावाने केले असं म्हणता येईल. भव्यदिव्य माणसे जवळून पाहिली, कि आपल्यात आपोआप बदल होतो तसं झालं. शास्त्रीय संगीतातल्या आत्म्याने मला खुणावले होते. पण ते तितकंच राहिलं थोडे दिवस. इथे कुठंतरी ह्या वस्तूने मात्र मनात घर केलं होतं, एव्हढं नक्की पुढे एक तप लोटलं. मला अधिकृतपणे शास्त्रीय संगीत शिकून आता ८ वर्षे झाली होती. तबकड्यांचा जमाना जाऊन आता कॅसेटचे युग अवतरले होते. माझ्या डोक्यात आले कि आपल्याकडे चांगला स्टिरिओ कॅसेट डेक पाहिजेच. नोकरीमुळे हातात थोडेफार पैसे खेळू लागल्याने घरात मैफिल ऐकण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात आणावे असे वाटू लागले. "आले कात्र्यांचा मना, तिथे कोणाचे चालेना" असं माझी पत्नी म्हणते ते शंभर टक्के खरं आहे. थोडासा चक्रमपणा सुद्धा असू शकतो हा. अशा चक्रमपणाचे अनेक विक्रम माझ्या नावावर नोंदले गेले आहेत. ह्या स्वभावाला मराठीत 'मनस्वी' असा शब्द आहे. मनस्वीपणा जेव्हा 'विवेक' सोडतो, तेव्हा तो चक्रमपणाचे रूप घेतो.  माझा 'विकास' साधण्यासाठी मी थोडासा 'विवेक' सोडायचे ठरवले होते. 

मी त्यावेळी नोकरीला फिलिप्स कंपनीत असल्याने मला 'फिलिप्स' ब्रँडचे फारच प्रेम होते. एके दिवशी प्लॅन करून कामावरून येताना नारायण पेठेतल्या फिलिप्सचे ऑडिओ डीलर पुणतांबेकर यांच्या शोरूममध्ये शिरलो. छोट्या वॉकमनपासून 'पॉवर हाऊस' पर्यंत बरीच सारी मॉडेल्स छान सजावटीत मांडलेली होती. पुणेरी दुकानदारांनी पृच्छा केली " काय पाहिजे ??". मी म्हटलं अँप्लिफायरवाली म्युझिक सिस्टीम बघायचेय. त्यांनी मला २ मॉडेल्स दाखवली; एक डबल कॅसेट अँप्लिडेक आणि दुसरा सिंगल कॅसेट अँप्लिडेक. मी आधी किंमत विचारलीच नाही. मला जास्त साउंड क्वालिटीशी 'देणं घेणं' होतं. त्यांनी काही कमर्शिअल कॅसेट्स वाजवून दाखवल्या. आउटपुट क्वालिटी एकदम कम्माल होती.  माझ्याकडे जसराजजींची शुद्ध सारंगाची स्टिरिओ रेकॉर्डेड कॅसेट बॅगमध्ये होती, ती त्यांना लावायला सांगितली. ७३९ चा आवाज ऐकला आणि मला 'युरेक्का'चं फिलिंग आलं. स्वप्नपूर्तीची घटीका जवळ आली होती. मग किंमत विचारली ??  आणि कळलं कि माझ्या मासिक पगारापेक्षाही किंमत जास्त होती. पण 'लव्ह ऍट फर्स्ट साईट'ची प्रक्रिया होऊन गेली होती.  मी निश्चय
केला कि हीच सिस्टीम आपण घ्यायची. पण निर्णय देण्यापूर्वी मी त्यांना सांगितलं कि ह्या कॅसेटची पूर्ण एक बाजू मला इथे ऐकू द्याल का ?? आश्चर्य म्हणजे दुकानदार पुणेरी असले, तरी त्यांनी माझी विनंती लगेच मान्य केली. एव्हढेच काय , त्यांनी तो अँप्लिडेक उचलून आतल्या एका छोट्या रूममध्ये नेऊन ठेवला आणि माझी कॅसेट लावली. एक खुर्ची दिली बसायला. मी पूर्ण ४५ मिनिटे कॅसेट ऐकली. सगळी ऑपरेशन्स समजून घेतली..... आणि चेकबुक काढले. माझ्या हौशीखातर मी माझे 'मध्यमवर्गीय बजेट' निदान पन्नास टक्क्यांनी वाढवले होते. हौसेला मोल नाही म्हणतात ते खोटं नाही. 

त्यानंतर तब्बल १२ ते १५ वर्षे मी हा अँप्लिडेक मनसोक्त वापरला. अगदी कटाक्षाने मी त्यावर फक्त SONY आणि TDK कंपनीच्या स्टिरिओ रेकॉर्डेड कॅसेट्स लावत असे. क्वचित एखादी कमर्शिअल कॅसेट् लावली असेल नसेल. अगदी पुलंच्या अलुरकरने काढलेल्या कॅसेट्ससुद्धा मी कधी त्यावर लावल्या  नाहीत. त्यासाठी वेगळा २ इन १ माझ्याकडे होता. मी ह्या आयुधाची खूप काळजी घेत असे. हायड्रॉलिक मेकॅनिझमवर उघडझाप करणारा कॅसेटचा स्लॉट मी कधीही खाडकन उघडला नाही. त्याचे शटर बाहेर येताना मी मागे सपोर्टसाठी हात धरीत असे, कारण अर्थातच ते खूप नाजूक होते. दर २ आठवड्यांनी मी काळजीपूर्वक हेड स्वच्छ करीत असे. अगदी क्वचितच मी हा अँप्लिडेक रेकॉर्डिंगसाठी वापरला. पुण्यात असताना १९९३ मध्ये माझ्या पहिल्या सोलो पेटीवादनाच्या वेळी मी तो साउंड सिस्टीम म्हणून आणि रेकॉर्डिंगसाठी वापरला होता. स्पिकर्सच्या दणदणीत आणि हाय क्वालिटी साऊंडमुळे अर्थातच कार्यक्रम परिणामकारक झाला.  जसराजजी, भीमसेन, मालिनीताई , परवीनजी, वीणाताई, अमीरखांसाहेब, बडे गुलाम, रशीद खान, पं रविशंकर अशा सगळ्यांच्या रेकॉर्डेड मैफिली घरी बसून ऐकता आल्या आणि खऱ्या अर्थाने इतकी तृप्ती आली, की आता दोन लाखाची सिस्टीम उपलब्ध असली, तरीही मी ती घेणार नाही. यालाच 'संपूर्ण समाधान' असे गुरुवर्य वामनराव पै म्हणत असावेत. 

अलीकडे मी बरेचसे शास्त्रीय संगीत ऐकतोय ते फक्त गायनाच्या अभ्यासासाठीच !! त्यासाठी फार हाय क्वालिटी साउंड नसला तरी चालतो. ( असला तर उत्तमच). पण एक जमाना होता कि स्वतःच्याच धुंदीत तासनतास ह्या अँप्लिडेकवर संगीताचा निखळ आनंद मी मनमुरादपणे लुटलाय. २००५ मध्ये दुबईला जाताना मात्र मी हा डेक नेला नव्हता. त्यामुळे  १५-२० वर्षे झाल्यावर थोडेफार प्रॉब्लेम्स येऊ लागले. ते देखील काही drives मध्ये. कारण रबर बेल्ट्स जुने झाल्यावर कडक होतात. मला बऱ्याच जणांनी हा रिपेअर होणार नाही आता असं सांगितलं. तर काहींनी तर OLX वर विकून टाक असं सांगितलं. पण मी ह्या रिपेअर क्षेत्रातला एक 'होमी भाभा' शोधून काढला. त्यांचं नाव श्री. गिरी..!! त्यांनी हा डेक अविरत श्रम घेऊन पुन्हा चालू करून दिला. तब्बल २७ वर्षांनी आमच्या नवीन जागेत मी नव्याने त्याची प्रतिष्ठापना केली आहे.  मला मनाने अडकवणाऱ्या व्यक्तींबद्दल मी ह्या ब्लॉगवर लिहिलं आहेच. पण एखाद्या वस्तूमध्ये एव्हढा जीव अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ह्यालाच 'ममत्व' म्हणतात का हो ...??

------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजून कितीतरी गोष्टींनी मी नॉस्टॅल्जिक होतो. तुमच्यासारखाच कोलगेट, लिरील, फेव्हिक्विक, विको टर्मरिकच्या जाहिरातींनी, वनिता मंडळाच्या ट्यूनमुळे, 'पुन्हा प्रपंच'ने, इंदुमती काळ्यांच्या बातम्यांमुळे, सुहासिनीबाईंच्या सूत्र संचालनामुळे, अमीन सयानीच्या बुधवारच्या बिनाका गीतमालेने, ब्लॅक अँड व्हाईट छायागीतने, तबस्तुमजींच्या फुल खिलेमुळे, सुरेश खरेंच्या गजऱ्यामुळे मी पुन्हा एकदा जुन्या जमान्यात जातो. काळे बुवांची गुरुपौर्णिमा मी तब्बल २० वर्षे अटेंड केली होती. त्यामुळे आजही त्यांनी रचलेले शारदास्तवन कानी पडले, कि हटकून पहिल्या रांगेत बसलेल्या बुवांचा कृतार्थ चेहरा नजरेसमोर येतो. तसेच आम्हा पतिपत्नींची १९८९ ची मंतरलेली माउंट अबू व्हिझिट, आमच्या विभवचे लाघवी बालपण , १९८२चा गाजलेला सवाई, माझे बंगलोरचे दिवस १९८६-८८, IIT मधले होस्टेलचे दिवस, अशा एक ना अनेक गोष्टींनी माझे आयुष्य आनंददायी झाले, ते विसरणे शक्य आहे का ??
  
Famous Czech writer Milan Kundera says "Without a past, we are all children, to be grown up is to have memory". 

मराठीच्या गाढ्या प्राध्यापिका, उत्तम समीक्षक आणि माझ्या जेष्ठ गुरुभगिनी विदुषी डॉ. विजयाताई टिळक ह्या त्यांच्या पुस्तकात मार्मिकपणे लिहितात "जीवनाची पाळेमुळे भूतकाळात रुजलेली नसतील, तर सर्व जीवन संदर्भही होईल, कारण शेवटी मानवी संस्कृती म्हणजे अनंत संदर्भांचा समुच्चय !! सुसंकृत माणूस म्हणून जगणं ह्याचा अर्थ आल्हाददायक संस्मरणं जोपासत जगणं. ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही  प्रकारचा का होईना, पण आनंद दिला, त्यांची आठवण ठेऊन जगायला मनात कृतज्ञता असावी लागते.  हा केवळ नॉस्टाल्जिआ किंवा स्मृतिविलास नव्हे". ह्या चार वाक्यात त्या मोठे तत्वज्ञान सांगून गेल्यायत. माझ्या 'कवडसे' ह्या ब्लॉगमध्ये एखाद  दुसऱ्या विनोदी लेखांचा अपवाद सोडल्यास, बाकी सगळे लेख लिहिण्याच्या प्रपंचाचे २ मुख्य हेतू आहेत  १) जमेल तितके कलासौंदर्य तसेच व्यक्तीविशेष टिपत जाणं आणि २) श्रेयोर्पण आणि कृतज्ञता व्यक्त करणं.  माझ्या ह्या ब्लॉगमधील १६ व्या लेखाचेही शीर्षक जरी 'स्मरणरंजन' हे असले, तरी ते करताना जाणवणारी कृतज्ञताही जमेल तिथे मी व्यक्त केली आहे. असे केल्याने मला जे मिळाले ते म्हणजे .......'आत्मिक समाधान !!🙏

विकास कात्रे, ठाणे 
मो : ९८३३६१०८७५

ता. क. : 
१) ह्या लेखाला हातभार लावल्याबद्दल माझ्या भगिनी सौ. मुग्धा पाध्ये ( विद्याताई) आणि माझे मित्र श्री अमूल पंडित यांचे मनापासून आभार !! 🙏🙏

2) जवळ जवळ प्रत्येक लेखासंदर्भात लेखनाच्या योग्यायोग्यतेचे मार्गदर्शन माझी पत्नी सौ सुचित्रा ही आनंदाने करत आली आहे, ज्याचे श्रेय तिला दिलेच पाहिजे. 









Comments

  1. लेखन भट्टी छानच जमली आहे. असेच लिहित रहा. अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. एव्हढा मोठा लेख असूनही तो पूर्ण वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  2. नेहमीप्रमाणे लेख खूप छान झाला आहे. आमच्या लहानपणी जेव्हा जेव्हा आजी जुन्या आठवणीत रमायची तेव्हा वाटायचं कि ही कोकणातून कधी बाहेर पडलीच नाही. पण आता लक्षात येत कि nostalgia हा प्रत्येकाला येतोच आणि memory lane आवश्यक आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मंजिरीताई, एव्हढा मोठा लेख असूनही तो पूर्ण वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!

      Delete

Post a Comment