चहा

माझी दिवसातली सगळ्यात आवडती वेळ म्हणजे सकाळी ७.३०-८.०० वाजताची, जेव्हा मी पत्नीबरोबर तिने केलेला फर्मास चहा घेतो. छोटा गंधर्व म्हणतात तसे बाहेर 'पक्षी मधुर शब्द करीती' अर्थात पक्षांचे कूजन चालू असते. कोणी आपल्या साखरझोपेतून उठो वा न उठो, सूर्याने आपली किरणे फाकवुन सृष्टीत चैतन्य निर्माण केलेलेच असते. करोना येण्यापूर्वी म. टा. वर नजर टाकायची पण सवय होती. ही सवय कै गोविंदराव तळवलकर संपादक होते तेव्हापासूनची आहे. Habits are die-hard !! मग अनिरुद्ध बापूंचा 'प्रत्यक्ष' हा पेपर वाचायचा. हा सगळा कार्यक्रम अर्धा तास तरी सहज चालतो. माझी बॅटरी चार्ज व्हायला एव्हढे पुरेसे असते. चहा मात्र 'ही' मला अगदी हवा तसा करते. म्हणजे नक्की कसा ते पाहुयात. दूध घालण्यापूर्वी भरपूर उकळून जवळजवळ काळपट लाल किंवा लालसर काळा झालेला चहा मला स्वतःला आवडतो. शक्यतो ठेचून घातलेले आले त्यात असेल तर 'चार चांद' लागले. माझी पत्नी मूडमध्ये असली तर 'गवती चहा' देखील कातरून चहात घालते. ह्या अशा अतरंगी चहा उकळण्याने त्याची ऍसिडिटी वाढते हे मलाही माहिते. पण ती उतरवायला बरोबर थोड्याफार कुकीज असतातच. अलीकडेच मी 'चार दिवस प्रेमाचे' हे मनोरंजक नाटक पहिले. त्यात नवरा म्हणतो " कॉफी कशी, गॅसवरून डायरेक्ट नरड्यात उतरली पाहिजे ". यावर बायको उत्तर देते " हो का sss ?? मग नरडंच ठेवुयात गॅसवर"😅. यातली अतिशयोक्ती आणि विनोद सोडून द्या. पण यातल्या 'नवऱ्या'चं आणि माझं अगदी एकमत आहे. मध्यंतरी माझे साडू मला म्हणाले कि ते एकदा आसामला गेले असताना त्यांच्या एका 'असामी' मित्राने त्यांची खास चहा बनवण्याची पद्धत सांगितली. आसाम म्हणजे चहाची मक्काच !! मग तिथला मौलवी काय सांगतो, म्हणून मी कान टवकारून ऐकू लागलो . तर ते असे .... ''आधी पाणी पूर्ण उकळून गॅस घालवून टाकायचा आणि मग त्यात चहाची पत्ती टाकायची''. फुस्सssss!! मी म्हटलं जमणार नाही. चहा पुरेसा उकळल्याशिवाय मला किक नाही येणार. शेवटी तुमच्यावर जे संस्कार आहेत, त्याचा पगडा असतोच. एव्हढंच काय पण मला चहा खाली उतरवल्यावर साखर घातलेली देखील आवडत नाही. ती उकळतानाच घातली पाहिजे. माझी आई आधी चहा उकळवायची आणि त्या पातेल्यावर २-३ मिनिटे झाकण ठेवून द्यायची. ह्याला चहा मुरणे असे म्हणतात. आणि मग त्यामध्ये दूध घालायची. तेव्हा मला हे कधीच खटकलं नाही. पण आता नाही चालत.
पंचतारांकित हॉटेलात जो चहा देतात तो 'लाईट टी' किंवा 'डीप टी' देखील काहीही कामाचा नाही. (तो घेतल्यावर मीटिंगमध्ये मला हमखास झोप यायची). आधीच लाईट असलेला चहा त्यात milkarच्या २-३ टोपणातले थंड दूध घालून आणखी बेचव करायचा असतो. आणि त्यात थोडी 'किक' शिल्लक असेल, तर २ शुगर क्युब्स घालायचे ( आणि हा चहा पिऊन वानप्रस्थाश्रमात जायचे😆). मला चहा 'थंड' झालेला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा तो बेसिनमध्ये ओतून टाकणे मी पसंत करेन. १ तासाने पुन्हा गरम केलेला चहा देखील जरा वेगळाच लागतो. तसेच माइक्रोमध्ये कपासहीत गरम केलेला चहा मी नाही म्हणायला क्वचित घेतो, पण मला ते फारसे रुचत नाही. कारण चहामुळे जिभेला चटका बसतो, ते ठीकच आहे. पण मायक्रोत गरम केलेल्या कपामुळे मात्र आधी ओठांना चटका बसतो. आधी 'शिक्षा' आणि मग 'इच्छापूर्ती' असे हे विचित्र गणित आहे. थंड करून चहा पिणारे लोक 'चहा' का पितात तेच समजत नाही. ( डॉ. काशिनाथ घाणेकर अशा चहाला 'पिचकवणी' असा शब्द वापरत. हा खास कोकणी शब्द आहे. पण हा चहा विंगेत आमच्यासाठी खास नटसम्राटांनी मागविला असल्याने आम्हाला तो 'अमृततुल्य' वाटला. After all, Company matters!!).
कंपनीचा विषय निघालाय म्हणून आठवले. पूर्वी आम्ही 'SOCIETY' हा ब्रँड घ्यायचो. पण का कोण जाणे, ४ वर्षांपूर्वी नवीन 'सोसायटी'त राहायला आल्यावर हिने 'वाघ बकरी ' आणायला सुरवात केली. (ह्या ब्रँडचा आमच्या दोघांच्या स्वभावाशी दुरान्वयानेही संबंध नाही. कारण तसे असते, तर 'वाघीण-बकरा' असे लिहिणे योग्य झाले असते😜). मला 'वाघ बकरी' हा ब्रँड पसंद आहे. रेड लेबल आणि ब्लॅक लेबलकडे मी साधे पाहत सुद्धा नाही. LIPTON टी ओठाला सुद्धा मी लावत नाही. ताज चहाचा आणि माझा संबंध झाकीर हुसेनचा तबला ऐकण्यापुरताच आहे. Brookbond चा आणि माझा संबंध फक्त शेअर मार्केट पुरता आहे. असो ! काही जहाल लोक तर दूध न घालता तसाच चहा 'ब्लॅक टी' म्हणून पितात. माझ्या मित्राने एकदा खास लंडनहुन आणलेला ब्रिटिश चहा दिला होता. पण तो पूर्ण पॅक काही आम्ही दोघे संपवू शकलो नाही. इनर्ट गॅसचे वर्णन जसं 'टेस्टलेस ओडरलेस कलरलेस' करतात ना, तसा हा चहा होता. तसेच एकदा कूर्गला गेलोतो तिथल्या चहाच्या फॅक्टरीमधून आम्ही मुद्दाम चहाची पत्ती आणली होती. तो देखील आम्ही खूप ऍसिडिक असल्याने पूर्ण संपवू शकलो नाही. एअरपोर्टला फ्लाईट delay झाली तर, मी तिथल्या स्टॉलवर जाऊन सरबते किंवा ज्यूस घेण्यापेक्षा आईस-टी घेणे पसंद करतो. मसाला टी हि कल्पना मला मान्य आहे; पण तो बासुंदीसारखा असू नये. वेळ पडल्यास मी रस्त्यावरील गाडीवरचा चहा देखील आनंदाने घेतो. मुख्य म्हणजे तो खूप उकळलेला असतो. शिवाय तो चहावाला आधीच दूध घातलेला तो चहा ३-४ वेळा उतू जाईपर्यंत वर आणतो आणि नंतर भांगे सारखा २ फुटांवरून कपात ओततो ते दृश्य पाहायला मला फार मौज येते.
हल्ली तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा आलेत बाजारात, काही विचारू नका. मुख्यत्वेकरून ही सगळी ह्या डाएटवाल्यांची थेरं आहेत. मिंट ग्रीन टी , पीच डिटॉक्स , लेमनग्रास काय , ऍपल cinnaman काय ,एक ना अनेक फ्लेवर आहेत. ह्या चहांना 'चहाचा' सोडून बाकी सगळे फ्लेवर असतात. (मला वाटतं जयश्री टी. आणि मीना टी सोडून मी सगळ्या 'टीं 'चा विचार केलाय इथे 😜). मी दुबईला असताना माझे एक मित्र मला घरी नेऊन एक विशेष पंचामृती चहा माझ्यासाठी करायचे. मला आठवते कि त्यामध्ये ते डेट सिरप, मध आणि लिंबू घालायचे. एव्हढा चविष्ट चहा मी अन्यत्र कुठेही घेतलेला नाही. मी पूर्वी काही स्टील मर्चंट्सना भेटायला गोल देऊळ, मोहम्मद अली रोडला जायचो, तेव्हा स्टीलच्या छोट्याश्या ग्लासमधला तिथला खास कटिंग टी पण बराच घेतलाय. मुख्य म्हणजे दुसऱ्या छोट्या पातेल्यात उलट्या ग्लासमध्ये तो चहा आलेला असतो. तो ग्लास हाताला चटके न बसता, सुलटा करून चहा पिणे हे एक टेक्निक असते. म्हणजे चहासारख्या पदार्थात देखील आपले ( नव्हे आमचे ) किती 'चोचले' असतात हे जाणवते. पण हे वर्तन एका चहावाल्याच्या देशात नक्कीच शोभनीय आहे.....नाही का ??
त्यानंतर आम्ही गिरगावातून ठाण्यात राहायला आलो आणि माझी भेट आत्ता TJSB आहे ना, तिथल्या
गजानन वडापाववाल्याशी पडली. ती देखील माझ्या अकराव्वी बारावीतल्या मित्रांबरोबर!! मित्रांबरोबर वडापाव खाण्यातली गोडी ज्याची तोच जाणे. आम्हाला मिळणाऱ्या पॉकेटमनीमध्ये १५ पैशांचा वडापाव सहज यायचा. ह्या साक्षात गजाननाने भक्ताला दाखवलेला 'नैवेद्य' प्राशन करायचा आणि तेव्हढ्या इंधनावर आम्ही सगळे तलावपाळीला चार

पाच चकरा सहज लावायचो. दुर्दैवाने एके दिवशी तिथून 'गजानन' हलला आणि आम्ही सगळे 'आतून' हललो. त्यानंतर काही महिने विसर्जन केल्यासारखा हा 'गजानन' भूमिगत होता. आता ह्या गजाननाची प्रतिष्ठापना नव्याने विष्णूनगरमध्ये झाली आणि हां हां म्हणता त्याने पूर्वीसारखा जम बसवला. पूर्वी नुसतीच लसणाच्या चटणीची भुकटी देणाऱ्या ह्या महाभागाने आता स्पेशल पिवळ्या ओल्या चटणीची रेसिपी बनवली, जी आजतागायत कुठल्याही गृहिणीला बनवता आलेली नाही. अर्थात ही ओली चटणी घेण्यासाठी वर्तमानपत्रांच्या ऐवजी विशिष्ट प्रकारचे द्रोण आले. माझ्या मते त्याने वड्याचीही रेसिपी बदलली होती. पूर्वीसारखा तांबूस रंगाचा वडा न देता आता वड्यालाही 'पिवळा' रंग आला. वड्याबरोबर अतरंगी लोकांसाठी 'होश' उडवणारा हिरव्या मिरचीचा ठेचाही तो देऊ लागला. हे बेमालूम कॉम्बिनेशन गजाननवाला निदान २५-३० वर्षे तरी सहज विकतोय. विष्णुनगरमध्ये ट्राफिक जॅम करू शकेल इतकी वड्यातील दर्दी लोकांची गर्दी हे दुकान जमवते. त्याला ठाणेकरांची 'नाडीपरीक्षा' उत्तम झाली होती, हेच खरे !!
विष्णूनगर - घंटाळी परिसरातले वड्याचे दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजे 'श्रद्धा वडापाव' !! काय असेल ते असो, पण गजाननच्या तुलनेत श्रद्धाचा वडापाव मला चटक लावणारा मुळीच वाटत नाही. पण 'बायको' माझ्याबरोबर असताना प्रचंड खरेदीनंतर ( म्हणजे 'साडी' हे वेगळे सांगायला पाहिजे का..??) राम मारुती रोडच्या गर्दीतून वाट काढून त्रासलेल्या नवऱ्यांसाठी हा जॉईंट 'विरंगुळा' म्हणून नक्की छान आहे, असे मत इथे नोंदवण्याचे धाडस मी करतो. कॉलेजमध्ये गेल्यावर आणखी एका 'वडा रेसिपी'ने आम्हाला वेड लावले होते. तो म्हणजे 'कुंजविहार'चा वडा !! हॉटेलची स्वच्छता बाहेरून बघून जे हॉटेलात जातात, त्यांना ह्या वड्याची मजा कळणार नाही . (घरंदाज गायकी गर्वाने ऐकणाऱ्या लोकांना गजल कशाशी खातात ते कळत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे). स्टेशनच्या समोर असलेल्या ह्या हॉटेलने मुंबई लोकलच्या तीन गुणांशी इमान राखलंय. १. गर्दी : कायम गर्दी असलेलं हे हॉटेल आहे. त्याचे मुख्य कारण इथे मिळणारा स्पेशल 'वडा' हे आहे. २. तुम्ही ह्या हाटेलात शिरल्यावर जागा मिळणे, हे लोकलमध्ये बसायला जागा मिळण्याइतकेच दुरापास्त असते. त्यामुळे बसलेल्या लोकांना "सरकून घ्या" असे सांगून, चौथ्या सीटवर बसून वडा खाण्याची तयारी हवी. हे व्हाईट कॉलरवाल्यांचे काम निश्चितपणे नाही.(मी कधी गेलोच तर मुद्दाम निळा शर्ट घालून जातो)😅. ३. ह्याचे मेनूकार्ड लोकलवर स्टेन्सिल करून लावलेल्या कर्जत, अंबरनाथ लोकल्सच्या जीर्ण पिवळ्या बोर्डसारखे आहे. इथे पाव ही गोष्ट वड्याबरोबर नाही, तर मिसळीबरोबर जास्त चालते. इथे जास्त कौतुक आहे ते वड्याबरोबर बशीतून किंवा प्लेटमधून येणाऱ्या चिंच-गुळाच्या चटणीचे !! वड्याचा निदान ४० टक्के भाग जर ह्या चटणीत बुडालेला नसेल, तर तुम्हाला इथल्या वड्याची लिज्जतच कळणार नाही. हा 'बसंत-बहार' सारखा जोड राग आहे. इथे वड्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आता हे करोना प्रकरण संपल्यावर एकदा त्याचा जम्बो वडापाव खायचाय....खूप जाहिरात करतोय लेकाचा !! अजूनही ३-४ बटाटेवड्यांचे चांगले जॉईंट्स आहेत ठाण्यात. उदा. गोखले स्नॅक्स, कुलकर्णी वडासम्राट, राजमाता वडा पाव , दुर्गा स्नॅक्स , वगैरे. आमच्या गिरगावातल्या रहाळकरींण बाईंसारखा अगदी घरघुती वडा खायचा असेल, तर तुम्ही ए. के. जोशी हायस्कुलच्या गल्लीत शिरा. तिथे जोशी बाई नावाच्या सत्शील गृहिणी गाडीवरती स्वच्छ सामुग्री वापरून घरच्यासारखे वडे बनवतात. ह्यामध्ये सोडा नसतो हे विशेष नमूद करावे लागेल. फक्त चितळ्यांच्या दुकानासारखे इतरांची तंद्री लागलेली पहात ५ मिनिटे थांबावे लागेल😆.Good things take time...you see !!
आता जरा मुंबई-पुण्याकडे वळूयात.
छबिलदासचा वडा दादरमध्ये शोभून दिसतो. पण तो कधी चुकून ठाण्यात आला, तर त्याला न्यूनगंड येईल. तुम्ही नंतर मसाला दूध किंवा पियुष मागवणार असाल, तर दादरच्या पणशीकरकडे त्यांचा सात्विक बटाटेवडा जरूर आधी खायला हरकत नाही. चांगले कॉम्बिनेशन आहे. शिवाय आमचे आणि पणशीकरांचे पेढे, मसाला दूध, दुधी हलवा आणि पियुष ह्या विशेष गोष्टींमुळे खूप जुने संबंध आहेत. अगदी अलीकडच्या काळात मी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये एका कार्यक्रमाच्या मध्यंतरांत 'मयुरेश केटरर'चा बटाटेवडा खाल्ला तो खरोखरंच वाखाणण्यासारखा होता. कर्जतचा वडा चांगला का लागतो ह्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे कल्याण सोडल्यावर प्रवाश्यांना गाडी थांबून जीवसृष्टी बघायला मिळते ती एकदम कर्जतला. ( सॉरी, 'नेरळ' हे दिवाळीतल्या भाकड दिवसासारखे 'भाकड स्टेशन आहे असे मी मानतो. ज्यांची इथे फार्म हाऊसेस आहेत त्यांनी मला क्षमा करावी ). शिवाय कल्याण-कर्जत ह्या ४५ मिनिटांच्या प्रवासात आपल्या बाजूला बसलेले प्रवाशी आपल्याला विविध तऱ्हेने किती त्रास देतातायत, गॅंगवेमध्ये किती लोक उभे राहतायत, आपल्याला नको असेल तरी पुढचे लोक खिडकीची काच वर करतायत किंवा नाही, एकाच फॅमिलीतले ४-५ लोक घरी असल्यासारखे किती पटर पटर करतायत ह्या सगळ्याचा अंदाज कर्जत येईपर्यंत आपल्याला येतो. ह्यातील कुठल्याही एका संकटावर आपण कर्जतचा वडा खाऊन मात करू शकतो. थंडी असेल तर हा वडा जास्त खपतो. बटाटेवड्याची आपल्याला लागणारी चव ही स्थळ-काळ-वेळ- कंपनी ह्यावर अवलंबून असते. मुंबई-पुणे प्रवासात लागणारा दत्तवडा मला बरोबर रसिक कंपनी असेल, तरच आवडतो. कल्याणच्या मंडळींना फक्त 'खिडकीवडा'च जर आवडत असेल, तर 'देव त्यांचे कल्याण करो' एव्हढेच मी म्हणेन. तुमचे अगदीच ग्रह फिरले असतील, तर तुम्हाला उडप्याकडे जाऊन बटाटेवडा खावा लागेल. मुंबईत मी ही चूक करत नाही. पण कर्नाटकात गेलो कि सांबारचा नॉशिया घालवण्यासाठी आलू बोन्डा नावाचा विपरीत पदार्थ मी कधीतरी ऑर्डर करतो. आमच्याकडे आळशी माणसाला आळसबोन्डा का म्हणतात ते त्यामुळे कळलं. आलू बोन्डाबरोबर सांबार देणे हा बटाटेवड्याचा अपमान समजतो मी. असो !! वडापाव ह्या डिशला बाँबे बर्गर असं म्हणून काही आचरट 'पाववाल्या' लोकांनी हेवा वाटून सूड उगवलाय असं मला वाटते. पुण्यात जोशी वडेवाल्यांनी जागोजागी स्टॉल उघडलेत. पण त्यांच्या बटाटेवड्यावर पुणेकर खुश आहेत कि नाही, हे अजून अधिकृतपणे कळलेले नाही. अजून तरी ह्याला कुणी "जगात भारी" असं म्हटल्याचं ऐकिवात नाही. त्यातल्या त्यात पुण्यामध्ये बटाटेवडा खाण्याची वेळ माझ्यावर आलीच, तर मी टिळक रोडवरच्या बादशाही मध्ये जाईन. बाहेरचे आवरण केवळ आतील सारणाच्या लज्जारक्षणापुरते ठेवून केलेल्या ह्या बटाटेवड्याची चव आगळीवेगळी आहे. ह्याला मी सात्विक वडा म्हणतो. 'चटणी' म्हणून ताकात कालवलेला ठेचा दिला जातो इथे. अत्यंत निर्विकारपणे सर्विंग केले जाईल इथे. "खायचे असले तर खा, नाहीतर पळा" हा इथला पुणेरी खाक्या !!( ... 'फुटा' असे सौजन्याने म्हटलेले नाही). मी आत्तापर्यंत शेकडो ठिकाणी 'बटाटेवडा' हाणलाय. त्यामुळे माझी वड्याची 'चव' आता समृद्ध झालेय. ह्या अनुभवावर गीतेशप्पथ पण गर्वाने मी सांगू शकतो कि "बटाटेवड्याची हेडक्वार्टर ही आणखी कुणीकडे नसून ठाण्यातच आहे आणि आमची कोठेही शाखा नाही" !!😅
वर लिहिल्याप्रमाणे बटाटेवड्याची लिज्जत अधिक वाढविण्यासाठी रेसिपी व्यतिरिक्त वातावरण निर्मितीचाही खूप मोठ्ठा वाटा असतो. उदा. काळ वेळ स्थळ, कंपनी , भूक वगैरे. ह्या संदर्भात २ किस्से मी लिहिणारे इथे. माझा एके काळचा मित्र कै शेखर अभ्यंकर ( उर्फ तात्या ) ह्याने मला त्याची एक मनोरंजक कहाणी ह्या संदर्भात मला सांगितली होती . ती त्याच्याच शब्दात ऐका. "अरे विकास, मी पूर्वी दर वर्षी निदान एकदा तरी निर्जळी करायचो. पण गेल्या वर्षी जाम गोची कशी झाली ती ऐक. सकाळी सहा वाजता उठलो. ब्रशिंग वगैरे करून पेपर वाचत बसलो होतो. आईला माहिती होतं कि माझी आज निर्जळी आहे. त्यामुळे तिने स्वतः चहा करून घेतला आणि मला ऑफर करण्याचा प्रश्नच नव्हता. मी शांत होतो. नंतर १० वाजता तिने पोहेही करून घेतले . तेव्हाही मी एक आवंढा गिळून निमूटपणे माझी कामे करत होतो. दुपारी एक वाजेपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. माझी मीच पाठ थोपटली. म्हटलं च्यायला, जमणार आज आपली निर्जळी. दुपारच्या जेवणात भाजी माझ्या आवडीची नसल्याने तीही वेळ मी निभावली. मग कंटाळून चार वाजेपर्यंत झोप काढली. खरं सांगायचं तर पोटात कावळे ओरडत होते. म्हटलं च्यायला निदान पाणी तरी घ्यायला हवं होतं रे. पण आता केलाच आहे निश्चय, तर दामटूयात पुढे अजून. घरी डोकं भणभणायला लागलं. म्हणून त्याच सैरभैर अवस्थेत बाहेर पडून गोखले रोडला फिरायला आलो. मग ए. के. जोशी शाळेच्या गल्लीत शिरलो. इथेच मोट्ठी चूक झाली रे !! कारण पुढे शंभर मीटरच एक बटाटेवड्याची गाडी होती. त्याचा वास भसकन माझ्या नाकात शिरला आणि आता मात्र माझा बांध फुटला. मी म्हटलं निर्जळी वगैरे सगळं झूट आहे, आपल्याला पाहिजे ते खाणं हेच खरं जीवन ! सरळ त्या गाडीवर गेलो आणि एका मागोमाग एका गपागप दहा बारा वडे हाणले रे !! अरे , काय जीव शांत झालाय म्हणून सांगू ?? हा: हा: हा:ssss "( पुढे अर्ध्या मिनिटाचे रावण स्माईल ...😆😆😆😆.)
आपल्याकडे लग्नाच्या पंक्तीत देतात तो मिनी बटाटेवडा हा क्रिकेटमधल्या बाराव्या खेळाडूसारखा असतो. जर जेवणातले ३-४ पदार्थ बिघडले, तरच तो भाव खाऊन जातो. सहसा बटाटेवडे हे सकाळी न करता संध्याकाळच्या न्याहारीला केले, तर त्यांची लिज्जत अधिकांश वाढते. एकदा मी कंपनीच्या कामाला पुण्याला गेलो होतो. माझी सख्खी बहीण सौ विद्याताई पाध्ये ही निगडीला राहत असल्याने मी तिच्या घरी राहिलो होतो. माझे काम चाकण औद्योगिक वसाहतीत होते जे निगडीपासून किमान २० किलोमीटर आहे . म्हणून मी टॅक्सी केली. काम छानच झाले आणि सायंकाळी ६ वाजता अचानक बारीक पाऊस रिपरिपु लागला. परतीच्या प्रवासात आमची गाडी नेमकी एका बटाटेवड्याच्या स्टॉलवरून गेली. शेखरसारखाच माझ्याही नाकात वड्यांचा वास तपकिरीसारखा घुसला. त्या पावसाळी वातावरणात मला गाडीतून उतरून वडे खायची इच्छा अनावर झाली होती. पण चाकणच्या त्या स्टॉलचे कळकट्ट आरोग्य पाहता , मी इच्छा मारून टाकली आणि सरळ ताईच्या घरी आलो. संध्याकाळचे ७ वाजले होते. घरी पाय ठेवतोय, तोच काहीतरी तळण्याचा स्वाद दरवळत होता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या दिवशी रात्रीच्या जेवणात कुणीही न सांगता ताईने बटाटेवडेच केले होते. चाकणपासून आळंदी जवळ असल्यामुळे कि काय , माऊलीला सगळं कळलं होतं. हा अनुभव माझ्या अध्यात्मिक ब्लॉगवर मी लिहिणार आहे ..."जो जे वांछील तो ते लाहो ...!"- इति माऊली 🙏
अगदी लहानपणापासून गिरगांव चौपाटीवरच्या भैय्यांकडून ओली भेळ खात आल्यामुळे, मला सुकी भेळ ही कल्पना अजिबात मान्य नाही. अहो काय सांगू तुम्हाला ?? दीक्षित-दिवेकरांच्या आहारी गेलेले काही महाभाग आता तर आता "भेळ नको पण वजन आवर... " असं म्हणून नुसत्या चुरमुऱ्यांना ''भेळ'' मानू लागले आहेत. अस्सल मुंबईकराला भेळ-पुरी आवडते (नुसती भेळ नाही ). तसेच तो कारण नसताना भेळपुरीचा अव्हेर करून शेव-बटाटा-पुरी, पाणी पुरी , दहीपुरी, रगडा-पॅटिस असले derivatives किंवा चाट खाऊन आपला जीव रमवत नाही. त्याला तल्लफ आली, कि तो भेळपुरी खाल्ल्याशिवाय सेटल होत नाही. अर्थात, मी देखील अस्सल मुंबईकर असलो, तरी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या खाऊ गल्ल्यांत 'चाट'चा अंतर्भाव झाल्यामुळे आपली खाद्य संस्कृती अधिक समृद्ध झाली आहे असे मी मानतो.
आम्ही गिरगांवात असताना माझी आई तिच्या काही खास तरकीबी वापरून घरच्या घरी भेळ करीत असे. मला फार चिंच चालत नाही, म्हणून माझी पत्नी टोमॅटो केचप प्रमाणात वापरून छान भेळ बनवू शकते ( आम्ही हार्मोनियमवर मिंडेचा भास असाच निर्माण करतो ). हल्ली हळदीराम, कल्याण भेळ वगैरे वेगवेगळ्या ब्रॅंड्सची भेळीची रेडिमेड पाकिटे उपलब्ध आहेत. टपोरी लोक सोडून सगळ्यांनाच हल्ली उपलब्ध वेळ कमी असल्यामुळे ही 'रेडिमेड'ची इंडस्ट्री फोफावत आहे. त्याच्या आपण फार आहारी जाऊ नये असं मात्र वाटतं. आणि कुणी गेलंच आहारी तर ''जनरेशन गॅप''च्या नावाने बोटे मोडता येतातच. ते काहीही असो, भेळपुरी खाण्यातला आनंद मात्र कमी होता कामा नये. असो !!पुण्यामध्ये ओल्या भेळीत उकडलेला बटाटा न घालता, शेंगदाणा आणि जाडी शेव मात्र सरोबरीने घालतात ते मला पूर्ण अमान्य आहे. आणि to make the things worse, ही भेळ 'जगात भारी आहे' असे मानणाऱ्या पुण्यातल्या तरुण पिढीबरोबर खावी लागते. पण माझी पत्नी 'पुणेरी' नसली, तरी पुणे साईडची असल्याने ते मी कसबसं चालवून घेतलंय. माणसाला प्रारब्धापोटी काय काय त्रास सहन करावे लागतील हे खरंच सांगता येत नाही. माझा एक पुणेरी मित्र आहे बरं का. त्याचा माझा एक ठरलेला वाद नेहमी होतो. भेळ पुण्याची कि मुंबईची ?? बुद्धिबळ खेळताना डाव जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या नरड्यात प्रसंगी वझीर देतात, तसे मी लगेच त्याला सांगतो कि " एक वेळ मिसळ पुण्याची म्हटलंस तरी बेहत्तर, पण भेळपुरीचा जन्म मुंबापुरीतच झालाय ह्यावर कोणाचेच दुमत असू नये". अरे, कुठे शामभट्टाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत ...!! एक गोष्ट मात्र खाजगीतच सांगतो की ..... माझ्या मुंबईच्या अस्मितेचा कितीही आदर केला, गिरगावातले चौपाटीवरील भेळवाले नामशेष झाल्यानंतर आता उरलेला एकमेव authentic भेळवाला म्हणजे न्यू एक्सलसीअर टॉकीज समोरचे 'विठ्ठल भेळपुरी हाऊस' !! पण त्यासाठी फोर्टात कोण जाणार ?? एव्हढ्या कारणासाठी मी आता बिस्लेरीच्या पाण्यात बनवलेली आणि आपली इम्युनिटी कमी करणारी ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरची भेळ खातो. चांगली असते बरं का इथे भेळपुरी. कुठून धरून आणतो भैय्ये कुणास ठाऊक ... असो ! आता तर नवीन भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे- ती म्हणजे करोनानंतर जर गाडीवरचे सगळे भैय्ये पुन्हा पुन्हा हात धुवून जर भेळ करू लागले, तर ती भेळ खाण्याच्या लायकीची राहील का ...??😄🙆
माझ्याकडे मध्यंतरी 'मिसळ'ह्या विषयावर कुठल्याही रसिकाला हळवे करील अशी एक पोस्ट व्हाट्सएप्पवर आली. त्यातले काही मुद्दे मला खूप भावले, ते मी इथे उद्धृत करणार आहे. उदा. मिसळ खाणे एक आनंद सोहळा असतो. ....... मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. .......आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे. त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी........ आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी........ पावाचा छोटा तुकड़ा तोडून तो मिसळीमध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा अभिषेक जिभेवर करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात ! .......प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. त्यामुळे मिसळीचा विनयभंग होतो.😅" वगैरे वगैरे .. हा कुठल्यातरी अज्ञात रसिकाचा खूपच सुंदर लेख होता.
अलीकडेच ठाण्यातील सुप्रसिद्ध
मामलेदार मिसळीचे जनक
श्री लक्ष्मणराव मुर्डेश्वर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मामलेदारची मिसळ ही प्रसिद्ध आहे. मला वाटतं १९७८ मध्ये

जेव्हा मला मामलेदार कचेरीतुन डोमिसाईल सर्टिफिकेट हवे होते, तेव्हा ह्या मिसळीची चव मी प्रथम घेतली. तो 'बाका' प्रसंग माझ्या चांगला लक्षात आहे. खूप कमी जागा असलेले आणि थोडे अंधारलेले हे हॉटेल होते. (Overheads कमी करून गिर्हाईकाच्या over the head फटका कसा मारायचा ते ह्या हॉटेलाकडून शिकावे). गचंडी करून आम्ही मित्र बसलो होतो. आमची ऑर्डर यायच्या आधीच रश्याची तर्री असलेल्या एका मापाच्या स्टीलच्या डिश एकावर एक लावलेल्या होत्या, त्याकडे माझी सहज नजर गेली. . त्यातील वरच्या डिशमधील तर्रीचा रंग बघूनच मला वास्तवाचे भान आले. मग आमची ऑर्डर आली. ह्या भाऊगर्दीत मिसळ फार नीर-गाठ-उकल पद्धतीने किंवा निगुतीने खाता येणे अशक्य होते ( ते सगळं पुण्यात बरं का !!). पावाचा तुकडा मिसळीत बुडवून पहिला घास घेतला.... आणि अक्षरशः ४४० वोल्ट्सचा झटका बसला. 'इकडे तर मिरची पाहिजे, आणि इकडे तर तिखट लागते' अशी तक्रार करणाऱ्या मध्यमवर्गातला 'मी' .. पाणी प्यायल्याशिवाय कसा पुढे जाणार ?? चार जणांच्या छोट्याश्या टेबलवर १६ ग्लास ठेवले होते. त्यातला आपला कुठला आहे हे सांगणे नंतर अवघड होऊन जाते, कारण अर्धी मिसळ संपल्यावर आपले 'होश' पूर्णपणे उडालेले असतात.
मामलेदार मिसळ पुढ्यात येईपर्यंत तोंडाला पाणी सुटते आणि खाल्ल्यावर शरीरात जेव्हढी म्हणून रंध्रे आहेत तिथून घाम किंवा पाणी वाहू लागते. हा अनुभव ज्याने घेतला नसेल, तो अतिशय कमनशिबी!! तर अशी ही जालीम 'मिसळ', अनेक खाद्यरसिकांना अजूनही मोहात टाकते. त्यामुळेच कि काय, ठाण्या-मुंबई मध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आता franchise उघडल्या आहेत.
आमच्या ठाण्यात उत्तम मिसळ मिळत असली, तरी मी पुण्याची ह्या बाबतीतली मक्तेदारी मी मान्य करतो. पुणेकर कोण्या एकाच मिसळीवर प्रेम करीत बसत नाही. तो रसिक आहेच, पण अल्पसंतुष्ट नाही. तो सतत नव्याच्या शोधात असतो. ( आपण फक्त मिसळीबद्दल बोलतोय....गैरसमज नसावा 🙏). त्यामुळेच कि काय तो सतत उद्यमशीलतेला प्रोत्साहन देतो. अर्थात पुण्यामध्ये किमान पंचवीसेक तरी मिसळीचे जॉईंट मिळतील तुम्हाला . असे असले तरी पुणेकरांनी एकदा तरी मुंबई -ठाण्याच्या उकाड्यात येऊन माम्लेदारची मिसळ खाण्याचा अनुभव जरूर घ्यावा ( आम्ही नाही का दादरला सिद्धिविनायक असला, तरी रांजणगावच्या गणपतीचे दर्शन घ्यायला येत पुण्याला ???). मला मिसळीतले फार काही कळते असा माझा मुळीच दावा नाही. पण काही निवडक ठिकाणच्या मिसळी मी खाल्या आहेत आणि त्यातील विशेष आवडलेल्या जॉइंट्सविषयी मी थोडक्यात लिहिणार आहे इथे. माझ्या आयुष्यात पहिली मिसळ मी गिरगावातल्या वेलणकरकडे खाल्ली. तेव्हा माझे लहानपण असल्यामुळे मला ती आवडली होती एव्हढच आठवतंय. पण त्यानंतर मी एकदम २०१० मध्ये तिथेच गेलो. तेव्हा हे त्यांचे काम नाही असं मात्र वाटलं. नुसते पोहे, उसळ, फरसाण, कांदा एकत्र केले कि मिसळ होत नाही; त्याची एक रेसिपी असते हे काही हॉटेलवाल्यांना कळतच नाही. त्यातील खाद्यघटकांचे प्रमाण, तिखटपणा, घनता आणि दृश्य रंगरूप हे त्या रेसीपीचे आधारघटक आहेत. मामलेदारकडची मिसळ खाताना जे माझ्यासारखे लोक हैराण होतात, त्यांच्यासाठी मुर्डेश्वरांनीच 'आमंत्रण' नावाचे हॉटेल काढले आणि एक डिग्री कमी तिखटाची मिसळ उपलब्ध केली. आता 'आमंत्रण' हा ब्रँड झाला आहे. माझा मेव्हणा पुण्याहून ठाण्याला आला कि आमंत्रणची फेरी चुकवत नाही ह्यातच सारं काही आलं. मला मात्र नौपाड्यातली गोखले मिसळ सगळ्यात आवडते. कारण इथला तिखटपणा माझ्या पोटाला त्रास देत नाही. मला वाटतं मिसळ मिळणारे ठाण्यातले हे सगळ्यात स्वच्छ दुकान !! इथे कायम येणारे गिर्हाईक सहसा नौपाडा, घंटाळी, विष्णूनगर ह्या भागातले व्हाईट कॉलर लोक असतात. इथे मिसळीपाठोपाठ उतारा म्हणून 'पियुष' देखील मिळतो. नाही म्हणायला सुरुची मिसळने नौपाड्यातलं थोडं मार्केट मारलं आहे. साधारण १९९० मध्ये माझ्या प्रेमळ मावस सासर्यांनी मला कौतुकाने मुद्दाम सांस्कृतिक कोल्हापूर दाखवायला नेले होते. तेव्हा मला वांगी बोळातल्या कै. गोविंदराव टेंम्ब्यांच्या श्रुतीच्या पेटीबरोबर त्यांनी खासबागेतली पांढऱ्या आणि तांबड्या रश्श्याची मिसळही खिलवली होती. त्यानंतर चोरगे मिसळ खायचाही योग आला. चोरगे मिसळ आणि कावरे कोल्ड्रिंक्स यांचे काहीतरी साटे लोटे असावे.कारण मिसळ खाऊन झाल्यावर लोक कावऱ्यांकडे पडलेले असतात. कुणाच्या लक्षात आलंय कि नाही ते माहिती नाही, पण कोल्हापूरचे लोक मुद्दाम पुण्याला जाऊन कधीही मिसळ खात नसतात. पुलंच्या भाषेत सांगायचं तर त्यांना गुळाच्या ढेपेपासून रंकाळ्यापर्यंत कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान आहे. असो! आता पुण्याची दखल घेतल्याशिवाय मिसळीचे आख्यान पुरे होऊ शकत नाही. माझ्या आवडीचं पुण्यातलं उत्तम मिसळ मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'तुळशीबागेतली 'श्रीकृष्ण मिसळ' !! त्यांच्याइतके मिसळीचे स्वच्छ दुकान मी क्वचितच पहिले असेन. १९९०-९२ मध्ये पांढरी स्वच्छ बंडी घालून गल्ल्यावर बसलेले मालक श्रीकृष्ण जोशी हे जणू काही त्यांच्या हॉटेलच्या स्वच्छतेचे प्रतीक आहेत असे वाटे. इथे 'ब्राह्मणी मिसळ' मिळते असं मी गमतीने म्हणतो. (ह्या श्रीकृष्ण मिसळीत बटाटे पोहे असतात बरं का...!!). त्या खालोखाल मला कसब्यातली वैद्य मिसळ आवडते. वैद्यबुवांची खासियत अशी कि त्यांच्या हॉटेलच्या दर्शनी भागात एक काचेची शो-केस करून त्यात हॉटेलात येऊन विसरून गेलेल्या लोकांच्या वस्तू display केलेल्या असतात. सध्या पुण्यात काटाकिर मिसळीची क्रेझ आहे. ठाण्याच्या मामलेदारांची परवानगी काढून जायला पाहिजे एकदा ..... 😀
कोशिंबीर ( side-dish)
बाप रे बाप. कात्रे साहेब तुम्हांला ह्या बद्दल PhD नागी सरळ Dec द्यायला हवी. रोजचा taken for granted वाटणारा विषय किती रसाळ व सुंदर मांडलात. अभिनंदन.
ReplyDeleteउत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे...
Deleteमी अनुराधा मुजूमदार.
DeleteEk number sir... maja aali vachun
ReplyDeleteउत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..
Deleteमस्त
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे.
Deleteमज्जा आली.... वाचून आणि वाचता वाचता सगळे आठवून...
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..
DeleteDelete
Khup Chhan , vachtana Tondala Pani sutle.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteकाका, चोचल्यांनी चांगलच बंड पुकारल😅
ReplyDeleteतुमची खाद्यभ्रमंती खुपच आवडली । या खाद्य मुशाफीरीच्या भन्नाट अनुभवा बद्दल खुप धन्यवाद।😊👌
अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..
DeleteSure....Ashwini keshavan.
ReplyDeleteखूपच सुरेख लेख,प्रत्येक पदार्थ तपशीलासह वर्णन तुमचे निरीक्षण दर्शवितो, भाग 2 च्या प्रतीक्षेत. एक्स्पर्ट ओपिनियन साठी नवीन पदार्थ तुमच्या कडे पाठवायला हवा 😊
ReplyDeleteनमस्कार माधुरीजी,
Deleteमाझ्या लेखनाचा उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! खरं म्हणजे माझ्या नसणाऱ्या प्रांतात मी जरा लुडबुड केलीय. काही पदार्थ आणि अन्नपूर्णाच माझ्याकडून भाग २ लिहून घेतील असं दिसतंय. बघुयात केव्हा ते. महाराष्ट्रात खाद्य पदार्थांना काही तोटा नाही. येथे नवीन पदार्थ आनंदाने प्राशन केले जातील.....👍
लेख रिकाम्या पोटीच वाचला पण नुसतेच reading and imagining झाले. पोट भुकेने चांगलच कासावीस झाल. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि रंजकही!
ReplyDeleteमंजिरी, छान वाटलं तुमचा अभिप्राय वाचून !! ठाण्यात या अनुभव घ्यायला....
Deleteमित्रा विकास, किती सुरेख, समर्पक आणि अभ्यासू असे लिहिले आहेस. आता हे सगळे पदार्थ खाताना पहिली तुझी आठवण येईल.
ReplyDeleteउदय,
Deleteमनापासून धन्यवाद !! तुझ्यासारख्या लेखकाकडून पावती मिळाली की नक्कीच समाधान वाटते. कधीतरी ठाण्यात एकत्र जाऊ ह्यातल्या एखाद्या तरी जॉईंटवर.....
नेहमी प्रमाणे प्रभावशाली लिखाण .. प्रत्येक पदर्था बद्दल ची माहिती वाचताना पदार्थ तर डोळ्या समोर आलेच पण तोंडाला ही पाणी सुटले ... ठाण्याला बटाटे वड्यासाठी पहिला मान दिल्याबद्दल आनंद (अभिमान) वाटला... मी ह्या बाबतीत कदाचित biased झाले असेन.. शेवटी मी ही born and raised in ठाणे ना 😉.
ReplyDeleteअप्रतिम चोचलेगीरी. तुमच्या सारख्या खवैय्याने एकेका पदार्थाचे एकदम नजाकतीने वर्णन केले आहे
ReplyDelete