............................................................................................
ही १९८३ सालची, म्हणजे तब्बल ३७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा IIT पवईमध्ये चौथ्या वर्षात शिकत होतो. आमच्या कॅम्पसमध्ये अत्यंत कल्पकतेने बांधलेला एक लांबलचक कॉरिडॉर होता आणि अजूनही आहे. (आता त्याला इन्फिनिटी कॉरिडॉर म्हणतात). ह्या कॉरिडॉरच्या दुतर्फा वेगवेगळी डिपार्टमेंट्स होती. केमिकलच्या समोर जसे फिजिक्स होते, तसे एरोनॉटिकल समोर आमचे मेटलर्जी डिपार्टमेंट होते. एरोनॉटिकलच्या कोपऱ्यावरच कॉरिडॉरला लागूनच एक चहा-बिस्कीट देणारा छोटासा स्टॉल होता. तिथे सहसा एरॉनॉटिकल-मेटलर्जीचे विद्यार्थी, ह्युमॅनिटीजचा स्टाफ, PhD करणारे सिनिअर विद्यार्थी, किंवा दोन लेक्चर्सच्या मध्ये किक येण्यासाठी चहा घ्यायला येणारे विद्यार्थी कोंडाळे करून असायचे. एकदा मी आणि माझा एक मित्र इथे कटिंग चहा घेत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. अचानक माझी नजर जमिनीपासून कुणाचा हात पोचणार नाही, अशा १२ फुट उंचीवर भिंतीवर लावलेल्या जाहीरातीकडे वेधली गेली. ही जाहिरात होती एके काळचे थोर साहित्यिक आणि 'शांतता, बाईंडर, गिधाडे' यांसारखी विवादी विषयांवरील गाजलेली सामाजिक नाटके लिहिणारे सुप्रसिद्ध नाटककार कै. विजय तेंडुलकर यांच्या मुलाखती संदर्भात !! बहुदा 'सहित्यिक गप्पा' असे ह्या कार्यक्रमाचे शीर्षक असावे. मुलाखतीचे स्थळ: इलेक्ट्रिकलचे ऑडिटोरिअम होते आणि हा कार्यक्रम रविवारी असणार होता. तेंडुलकरांशी एव्हढ्या जवळून गप्पा म्हणजे मोट्ठीच पर्वणी होती. पण ह्या जाहिरातीतील अजून एका गोष्टीने मला आकृष्ट केले होते, ती म्हणजे त्या फ्लायरमध्ये असलेल्या एका मुसलमान म्हाताऱ्याचा 'ब्लॅक अँड व्हाइट' फोटो !! तो पाहील्याक्षणी मला अशी कळ येऊन गेली, की हा फोटो आपण ह्या वर्षी रांगोळी प्रदर्शनात काढायला किती छान आहे ??. ह्याची पार्श्वभूमी अशी, कि त्या आधी सलग ३ वर्षे मी ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात दिवाळीच्या रांगोळी प्रदर्शनात हिरीरीने भाग घेतला होता. आदल्या वर्षी म्हणजे १९८२ मध्ये तर मी डॉ. लागूंची रंगीत रांगोळी काढली होती. आणि विशेष म्हणजे खुद्द डॉक्टरसाहेबांनी ह्या प्रदर्शनाला भेट देऊन सगळ्यांचे कौतुक केले होते. दूरदर्शनवरील संध्याकाळच्या ७. ३०च्या बातम्यांत ह्या प्रदर्शनाची ध्वनिचित्र फितीसहीत बातमीही दाखवली होती. त्यामुळे ह्यावर्षीही माझे हौसले एकदम बुलंद होते. आणि..... हा दिलखेचक फोटो तर जणू काही परमेश्वरानेच माझ्यासाठी पाठवला होता... !!
योगायोगाने २ गोष्टी जवळ आल्या होत्या. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीचा साखरपुडा !! मनाशी खूणगाठ बांधली आणि ठरल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी मी IITत पोचलो. पण मुलाखतीला पोचण्यापूर्वी आधी लगबगीनं त्या स्टॉलवर गेलो. रविवार असल्याने स्टॉल बंदच होता आणि कॉरिडॉरमध्ये सगळे सामसूम होते. एरवी सुद्धा ह्या संस्थेतील बहुसंख्य मुले अभ्यासू असल्याने सुट्टीच्या दिवशी इकडं तिकडं करणारी नव्हती. आणि विकेंडला बरीचशी मुले घरीही जायची. एखाद्या सिनेमातल्या खलनायकाप्रमाणे मी मागे-पुढे कोणी नाही असे पाहून चक्क कॅन्टीनच्या सर्व्हिन्ग टेबलवर चढून ती सेलोटेपने भिंतीवर चिकटवलेली जाहिरात उचकून काढली आणि माझ्या शबनम बॅगमध्ये टाकली. ( काय उत्साह आहे पहा !! 🙆)तिथून सरळ इलेक्ट्रिकलला जाऊन तेंडुलकरांची मुलाखतही ऐकली. नेहमीच फ्रेंच कट का कसलीशी जोड-रागासारखी स्पेशल दाढी राखणारे तेंडुलकर शांत आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे होते. मला अजूनही आठवतंय, त्या दिवशी ते खादी करड्या मरून कलरचा गुरुशर्ट घालून आले होते. मुलाखत छानच रंगली आणि मी त्यानंतर रात्री मी सरळ होस्टेलवर गेलो.
बरोब्बर एक आठवड्याने माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. योगायोगाने नेमका तोच दिवस प्रदर्शनात रांगोळी काढायचा शेवटचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रदर्शन चालू होणार होते. खरं म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी संध्याकाळी तसे माझे घरी काही काम नव्हते. पण अशा महत्वाच्या मंगल दिवशी घरच्यांच्या आग्रहाखातर घरी राहणे क्रमप्राप्तच होते. आणि रांगोळी वगैरे काढण्याच्या माझ्या ह्या 'हट के' असलेल्या उद्योगाला सरळ परवानगी मिळालीच असती असं मला वाटलं नाही. बहिणीचा साखरपुडा छानच झाला. पण इथे ह्या मुस्लीम म्हाताऱ्याच्या फोटोने मला झपाटून टाकले होते ना, त्यामुळे त्याला रांगोळी स्वरूपात डोक्यावरून जमिनीवर उतरवणे भाग होते. (एकदा डोक्यात एखादी कल्पना आली कि ती अमलात येईपर्यंत तिचा पाठपुरावा करत राहणे ही माझी जुनी खोड आहे). शेवटी मी घरी लोणकढी थाप मारली ...." उद्या सोमवार असल्याने आमची weekly टेस्ट आहे आणि माझा अभ्यास झाला नाहीये, त्यामुळे आज रात्री आय आय टी मध्ये जावे लागेल". ही मात्रा बरोब्बर लागू पडली आणि निदान बाहेर पडण्याची परवानगी मिळाली. मी रात्रीचे जेवण आटोपून घरातून निघून थेट मो.ह. विद्यालयाच्या चकडबंद नव्हे तर 'हवाबंद' वर्गात दाखल झालो. दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा तशी बंदच होती. बाहेरून वारा किंवा धूळ वर्गात येऊन रांगोळ्या खराब होऊ नयेत यासाठी पुरेशी काळजी माजी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते घेत असत. आधी नांव दिल्यामुळे माझ्या रांगोळीसाठी एक स्लॉट राखून ठेवण्यात आला होता. त्या वेळचे नामवन्त आणि बुजुर्ग रांगोळीपटू श्री गुणवंत मांजरेकर हे न्यू इंग्लिश स्कुलला अर्धा वर्ग व्यापेल एव्हढी एक महाकाय रांगोळी दर वर्षी काढत. ती बघायला तुफान गर्दी व्हायची. माझ्यासाठी तर हे मोठेच प्रेरणास्थान होते. आमच्या मो ह च्या प्रदर्शनालाही उदंड प्रतिसाद मिळत असे. इथे श्रीरंग गायकवाड, विंचूरकर , प्रदीप पाटील, आमच्या वर्गातला चंद्रकांत साळवी असे कसलेले आणि व्यावसायिक रांगोळीपटू होते. गमतीची गोष्ट म्हणजे नेमका माझ्या बाजूची रांगोळी रेखाटणारा होता त्या वेळचा गाजलेला रांगोळीपटु श्रीरंग गायकवाड !! त्याने 'आयुष्याची दोन टोके' ही त्यावेळची गाजलेली रांगोळी काढायला सुरवातही केली होती. मी पोचेस्तोवर स्मिता पाटील, अमोल पालेकर, सुनील गावस्कर, आचार्य रजनीश अशा काही सुंदर रांगोळ्या आधीच रेखाटल्या गेल्या होत्या. माझा हा मुसलमान म्हातारा काही कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती, त्यामुळे रांगोळी उत्तम येणे गरजेचे होते. (नाहीतर तिला फारसा प्रतिसाद मिळाला नसता). पण खरं सांगायचं तर असं काही माझ्या डोक्यात तेव्हा नव्हतं बरं का . एकदा एखादा राग डोक्यात आला, कि तो गायल्याखेरीज आपल्याला चैन नसते. मग तो आपण किती चांगला म्हणतो, त्याची आपल्याला पर्वा नसते. ( Unburdening the creative baggage is intended here). तर तशी काहीशी मानसिक स्थिती होती माझी.
मी साधारण ४.५ फूट बाय ३.५ फूट आकाराचा मोठ्ठा ब्राऊन पेपर मला दिलेल्या जागेत बेताने खळ लावून व्यवस्थित चिकटवला. तो वाळल्यावर ६बी पेन्सिलीने स्केच काढायला सुरवात केली. सुदैवाने तेव्हा मला पेन्सिल स्केचिंगची सवय असल्यामुळे चित्र मनासारखे आले. पोट्रेटमध्ये जेव्हढे 'डिटेल्स' चेहऱ्यावर असतील तेव्हढे ते काढण्यासाठी उत्तम असते असा सर्वसाधारण नियम असतो. चेहऱ्यावर सुरकुत्या असणं हे चित्रकारासाठी 'कुरण' असतं !! अर्थात ते जसंच्या तसं काढणंही त्याच हिशेबात अवघड आणि कौशल्याचं असतं. म्हाताऱ्याच्या ह्या फोटोमध्ये चितारण्यासाठी एव्हढे डिटेल्स होते कि काढणार्याची दमछाक होईल. अर्थात हे मला माहित होतं आणि त्यामुळेच मी ह्या चित्राची निवड केली होती. पण माझ्या मनाने ते 'आवाहन' केव्हाच आणि स्वतःहून स्वीकारले असल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या होत गेल्या. पहिले आवाहन म्हाताऱ्याने डोक्याला गुंडाळलेल्या फेट्याचे होते. माझे object drawing जरा बरे असल्याने आणि माझी एलिमेंटरी-इंटरमीडिएट परीक्षांची ड्रेपरी शेडिंगची यादगारी अजून शिल्लक असल्याने, कापडावरील चुण्या,घड्या वगैरे मला नीट शेडींग देऊन काढता आल्या. 'रांगोळी' हे माध्यम शेडिंगसाठी पेन्सिल आणि चारकोलपेक्षाही मला नेहमीच जवळचे, लवचिक आणि सोपे वाटले. भीड चेपली आणि मी उत्साहाने चित्रातील म्हाताऱ्याच्या भालप्रदेशाकडे सरकलो. कपाळावरील लाईट इफेक्ट्समुळे हे हुबेहूब रेखाटणे खूप अवघड होते. विशेष करून कपाळावरील 'आठ्या' ह्या आडव्या गंधासारख्या न वाटता त्यांना 'स्किनचा 3D फील' येणे महत्वाचे होते. पण तेही प्रयत्नांती जमले. आज तकदीर माझ्यावर फिदा होते. कपाळावरील रिफ्लेक्टीव लाईट-शॅडो इफेक्ट्स नीट जमल्याने चित्र हळूहळू कंट्रोलमध्ये येतंय ही भावना द्दढ होऊ लागली. आता नाकडोळ्याचे खास आणि शार्प मुसलमानी फीचर्स रांगोळीतून दृगोच्चर होणे महत्वाचे होते. मूळ स्केच चांगले आल्याने हेही बऱ्यापैकी साधले गेले. वयोवृद्ध व्यक्तीचे डोळे हसताना थोडे 'किलकिले' अथवा 'मिचमिचे' होतात. ते जर नीट आले, तर तर पोर्ट्रेटमधले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थी साकार झाले असे म्हणता येते. एक प्रकारचा योगच असतो तो !! मी ह्या भागात अक्षरशः जीव ओतला आणि तासा दोन तासातच म्हातारा मिस्किलपणे हसून माझ्याकडे पाहू लागला. शेजारीच तन्मयतेने रांगोळी काढत असलेल्या गायकवाडचीही दाद आली. ही मोट्ठी पावती होती!! नंतरचे आव्हान दाढीचे केस गुंतवून काढण्याचे होते. ह्याने मात्र चांगलेच माझे घामटे काढले. माझ्याकडे आता फार फार तर २ तास होते. कारण ७ वाजता पवईला जायला निघायचे होते. पण दाढी 'मुसलमानी' असल्याने तो 'लूक' मला कसाबसा देता आला. ( दाढी अंमळ थोडीशी 'मुल्ला-मौलवी' स्टाईल आलेय हे खरंय, पण त्यामुळे म्हातार्याचे धर्मांतर मात्र झाले नाही 😆). आता 'इप्सित' चित्र मनासारखे साकार झाले होते. रांगोळीवर उंचवटे न येता फिनिशही छान आला होता. पहाटेचे ६ वाजले होते. आठ नऊ तास नॉनस्टॉप वाकून रांगोळी काढल्यामुळे अंग आता आंबून गेले होते. कशीबशी बॅकग्राउंड आणि बॉर्डर पूर्ण केली. एका पोऱ्याने स्टीलच्या ग्लासातून आणलेला refreshing चहा घेऊन ताजातवाना झालो आणि मी पवईचा रस्ता धरला.....
आय. आय. टी. पर्यंतचा पाऊण तासाचा सगळा प्रवास 'उन्मीलीत' अवस्थेत किंवा 'हँगओव्हर'मध्ये झाला. हॉस्टेलमध्ये शिरलो. रस्त्यात भेटलेला एक मित्र म्हणाला " काय रे कात्रे, आज एकदम खुश दिसतोयस.... ". कदाचित माझ्या वेडाला मोकळी वाट मिळाल्याने माझ्या चेहऱ्यावर विलसणारे समाधान त्याला कुठेतरी दिसले असावे." Students faces often take on a glow as they contact their creative energy"- Julia Cameron ( Author of The Artist's Way)
प्रदर्शनाच्या बाहेरच्या द्वारी प्रतिक्रियेसाठी एक वही ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 'ह्या' रांगोळीबद्दल बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया लिहून आल्या होत्या. ते ठीकच आहे. पण आपण काहीतरी विशेष कलात्मक करायचं ठरवलं आणि ते परमेश्वरकृपेने प्रत्यक्षात आल्यामुळे मला एक 'sense of achievement ' ची भावना आली होती हे अजूनही चांगलं आठवतंय. काही मुलखावेगळी 'वेडं' चांगली असतात आणि त्यांची 'फलश्रुती' चिरकाल मनांत टिकून राहते.......!!😊
विकास कात्रे, ठाणे
Cell: 9833610875
*********************************************************************************************
🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍
ReplyDeleteThanks Rishi !!
DeleteVikassinh Raangoli ani Lekh donhi Aapratim Khup chan Tanmaytene Rekhatleli Sundar Kalakruti Shreeram
ReplyDeleteHari Om Swativeera, utsaha vadhavnarya abhiprayabaddal manapasun abhar !!Shreeram Ambadnya Nathsamvidh !!
DeleteExcellent तुझे शब्दांकन फारच समर्पक आणी अप्रतिम आहे.thoroughly enjoyed going
ReplyDeletethrough
Shailesh, many thanks for sending encouraging abhipraya..!!
DeleteExcellent तुझे शब्दांकन फारच समर्पक आणी अप्रतिम आहे.thoroughly enjoyed going
ReplyDeletethrough
लेख छान. तुमची रांगोळी रेखाटताना तल्लीनता जाणवते.
ReplyDeleteरांगोळी अप्रतिम.
नमस्कार ! आपलं नाव कळलं नाही. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!
DeleteSunder Rangoli aani Apratim lekh.
ReplyDeleteAmbadnya and Nathsanvidh
Vikramsinh, Thanks for your response !! SHRIRAM AMBADNYA NATHSAMVIDH !!
Deleteप्रिय काका, तुझे लेख नेहमी च बोलके असतात... तुझी लिखाण शैली इतकी प्रभावी आहे की लेख वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते...त्यातून हा लेख तर खुद्द रांगोळी कलाकृती वर असल्यामुळे ..फोटो /चित्र ना पाहता च तू रेखाटलेल्या रांगोळी ची प्रतिमा डोळ्यासमोर आली असती ह्यात शंका नाही. तुला उत्तम रांगोळी ही काढता येते ���� ...क्या बात है.... लेखनाच्या माध्यमातून तुझे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कळते... तुझ्यातल्या कलाकाराला माझा नमस्कार ����. अवंती प्रभुदेसाई- कात्रे
ReplyDeleteतुमचे एक एक ब्लॉग म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आहेत. खरोखरच लेख वाचताना डोळ्यांसमोर जसाच्या तसा प्रसंग उभा राहतो. - मंजिरी प्रभुदेसाई
ReplyDelete