मातृदेवो भव ...!!
साधारण १९७४ साल असावे ! आम्ही गिरगांवात झावबावाडीत राहायचो. मी इयत्ता आठवीत आणि माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी असणारी विद्याताई इयत्ता ९ वीत शिकत होती. आमच्या घरी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं चाललंय हे जाणवत होतं. पण नक्की समजत नव्हतं काय ते. सलग दोन तीन दिवस बाबा कामावरून उशिरा येत होते आणि घरी आल्यावर साधारण A-1 size चा मोठ्ठा पेपर लाल कोब्याच्या जमिनीवर ठेवून आईला काहीतरी काटकोन चौकोनाचे ड्रॉईंग समजावून सांगत होते. (ह्याला 'अमोनिया प्रिंट' म्हणतात हे नंतर कळले). आम्हाला कुतूहल वाटले. मग उमजले कि बाबा रोज कामावरून डायरेक्ट ठाण्याच्या एका बिल्डरला भेटायला जात. आणि त्या मोठ्या कागदावर होता, तो म्हणजे एका नव्या होऊ घातलेल्या बिल्डिंगचा layout !! ठाण्याच्या प्रसिद्ध भास्कर कॉलनीत होणाऱ्या एका नवीन Real estate स्कीममध्ये फ्लॅट घेण्यात त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता. त्या आर्किटेक्ट्चे नांव श्री. भोजने असे होते, हे देखील मला चांगले आठवते. हॉलची स्क्वेअरफूट क्षेत्रफळ मापे काय, बाथरूममधील अद्ययावत फिटिंग्स काय, डक्टिंग, बाल्कनीं, मेन डोअर वगैरे शब्द पहिल्यांदाच कानावर पडत होते. ह्या सगळ्याची पार्श्वभूमी अशी होती ......गिरगावात झावबाच्या वाडीत 'मंच्छाराम काकुभाई' नावाच्या एका मारवाडी मालकाच्या एक मजली कौलारू चाळीत आम्ही राहायचो. व्हिक्टोरिया नं २०३ च्या चालीवर सांगायचं तर, आम्ही बिल्डिंग नं १४-सी मध्ये राहायचो. आमच्या खोलीचे माप गुज्जू -मारवाड्यांच्या भाषेत म्हणजे मोटामोटीमध्ये १७ फूट X १० फूट असे होते. ह्या उभ्या आयताकृती खोलीतील निदान १५ टक्के भाग किचनचा बैठा ओटा आणि त्याला उजवीकडे लागून असलेल्या मोरीने व्यापला होता. ह्या बैठ्या ओट्यावर १९७० पर्यंत आई स्टोव्हवर स्वयंपाक करीत असे. ओटा आणि मोरी यामध्ये पार्टीशन म्हणून एक कट्टा होता, ज्यावर पिण्याच्या पाण्याचा माठ व नळ असलेले पितळ्याचे छोटे पिंप ठेवलेले होते. मोरीलाच लागून एक १८ बालदयाचं मोठ्ठ पितळ्याचं ठोके असलेलं पिंप होतं. (ते लवकर रिकामं झालेलं बघण्यात आम्हाला इंटरेस्ट होता. कारण नन्तर रिकाम्या पिंपात तोंड घालून काहीतरी बोलल्यावर प्रतिध्वनी कसा येतो, ते ऐकण्यात आम्हाला खूप मौज वाटायची). ह्या पिंपापासून ३ फूट वरती एका फळीवर छोटेसे देवतार्जन होते. ह्यामध्ये वल्लभ अवतार आणि आईने टिटवाळ्याहून आणलेली गणपतीची तसबीर ठेवली होती, ज्यांची कडी निगाह आईबाबांच्या संसारावर होती. नित्यपूजा बरेच वेळा आईच करीत असे. देवांना हळदकुंकू लावल्यावर स्वतःलाही छोटे कुंकू लावून घ्यायची आईची सवय होती. उरलेल्या भागात एक मजबूत लोखंडी कॉट आणि 'डबल-डेकर' बससारखे एक कपाट किंवा फडताळ ठेवलेले होते. ह्यातील दरवाजे असलेल्या मधल्या छोट्या बंद कप्यात दूधदुभते आणि क्वचित काही टिकणारे पदार्थ, त्यावरील उघड्या कप्प्यात चिनी मातीच्या- आमसूल-मीठ वगैरेंच्या बरण्या आणि उघड्या डेकवर आम्हा मुलांच्या औषधांच्या छोट्या बाटल्या ठेवलेल्या असत, धान्याचे डबे सगळ्यात खालच्या कप्प्यात असत. (ह्यातला डालडाचा मोठा आणि छोटा डबा मी कुणीही न शिकविलेल्या तबल्याची प्रॅक्टिस करायला वापरायचो 😆). उरलेल्या ९० स्क्वेअर फूट जागेत आम्हा चौघांचा वावर असे. कॅरम किंवा पत्ते खेळणं, अभ्यास, पर्वचा, बाबांचा व्यायाम, (प्रसंगी आम्हाला क्वचित मिळणारे १४ वे रत्न), झोपणे हे सगळे इव्हेंट्स एव्हड्या छोट्याश्या जागेत घडायचे. त्यातही सो-कॉल्ड पार्टीशन म्हणून खोलीच्या मधोमध एक पडदा होता. कुणी पाव्हणा आला कि आम्ही तो अर्धा लावीत असू. पॅगोडासारखे निमुळते होत गेलेले 'सिलिंग' हे पंखा लटकवलेल्या मधल्या आडव्या भालाच्याही खूप वर होते, पण तिथे कौले आणि अंधारात न दिसणारी कोळिष्टके होती. ही जागा आमच्या रामभाऊ काकांची होती आणि ती त्यांनी मालकाकडून पागडी तत्वावर घेतली होती. ( त्यामुळे काकांनी दरवाज्यावर R. T. KATRE अशी त्यांच्या नावाची स्टायलिश नेमप्लेट झोकात लावलेली होती). चाळीच्या मूळ मालकाचा धोतर टोपी पहनणारा एक 'भैय्या' आमचे दरमहा भाड्याचे १७ रुपये वसूल करायला पावती पुस्तक घेऊन नेहमी महिन्याच्या पहिल्या रविवारी यायचा. 'सचोटी' हा मुख्य सद्गुण असणाऱ्या आमच्या बाबांकडून त्याचे भाडे नेहमीच वेळेवर चुकते होत असे. 'सतरा रुपये' हे भाडे ६५-७०च्या काळात अजिबात कमी नव्हते. ( त्या काळांत कधीतरी म्हणे एकदा माझ्या आईने पोस्टातून दहा रुपये काढून आणले होते, यावरून एकंदर अंदाज लागतो ..... सगळ्याचाच !!). आम्ही मुले मोठी झाल्यावर, आपल्या डोक्यावर एक हक्काचे छप्पर पाहिजे ही जाणीव प्रथम दूरदर्शी आईने बाबांना करून दिली असावी. त्यामुळे अशा ह्या सामान्य 'नेपथ्य' असलेल्या रंगमंचावर अचानक फ्लॅट घेण्याचे नाटक रंगू लागले. अमोनिया प्रिंट जमिनीवर ठेवून आईबाबांच्या अशा दोन तीन बैठकीसुद्धा झाल्या. मला आठवते त्याप्रमाणे हा ४५० स्क्वे. फूटचा फ्लॅट असावा. हा फ्लॅट फक्त कागदावरच असल्याने आईने ठाण्याला जाऊन तो बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण आम्ही जिथे रहात होतो, त्या मापदंडावर आम्ही हुरळून जायला कुठलाही फ्लॅट पुरेसा होता. ठाणे-डोंबिवलीतले बिल्डर्स हे मध्यमवर्गाची स्वतःच्या मालकीच्या जागेची 'स्वप्ने' पूर्ण करण्यास कटिबद्ध होते ना .... !! असो. पण एकंदरच हे 'नवीन फ्लॅट' प्रकरण आता ऐरणीवर आले होते. आता आर्थिक व्यवहारावर चर्चा 'अडली' होती. एक दिवस असेच बाबा उशिरा घरी आले आणि आईला ह्या जागेसंदर्भात बिल्डरने दिलेला प्रस्ताव सांगू लागले. तो ऐकून आई खूप चिडली आणि तिने बाबांवर शब्दांची AK ४७ रिकामी केली. (वेळ आली कि हे शस्त्र ती चांगले चालवीत असे 😀 ). मला वाटत बाबांनी व्यवहार खूप जास्त किमतीला फायनल करून दोनेक हजार ऍडव्हान्स देखील भरला होता. मुलीचे शिक्षण-लग्न, मुलाचे शिक्षण-लग्न, कर्जाचे हप्ते , इतर सुविधा, आजारपणे, निवृत्तीनंतरची तरतूद ह्याविषयी आईने बाबांना कडक शब्दात जाणीव करून दिली असावी आणि हा 'अव्यवहारी' सौदा मोडावा, असे साकडे घातले. ही चर्चा वादळी पण निर्णायक होती. झाsss.. लं !! आईने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बिचार्या बाबांनी सौदा कॅन्सल केला. खरं तर कोकणातल्या आडगावातून मुंबईत आलेल्या आमच्या आईला जागा खरेदी-विक्रीतले काय कळत असेल ?? पण 'हुरळून जाणे' हा गुण माझ्या आईवडिलांमध्ये अजिबात नव्हता. They always remained grounded till their end ! आईने बाबांची 'अर्धांगिनी' म्हणून व्यवहार-चातुर्य दाखवले होते आणि कदाचित पुढे होणारा आर्थिक ओढाताणीचा अनर्थ पूर्णपणे टाळला. आमची आई किती दूरदर्शी, धोरणी आणि सद्सद विवेकबुद्धीची होती हे सांगण्यास एव्हढे एक उदाहरण पुरेसे आहे. (आश्चर्य म्हणजे पुढे वर्षभरातच ह्याच स्कीमच्या बाजूच्या इमारतीत बाबांनी निम्म्या पैशात एक 'सेल्फ कंटेन्ड' जागा घेतली, जिथे आम्ही चौघंही अगदी आनंदात राहिलो ). पहिला ओनरशिपचा फ्लॅट घ्यायचे आमचे स्वप्न त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे १९८७ मध्ये पूर्ण झाले. तिथपर्यंत बऱ्याचश्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आई-बाबांनी जिद्दीने आणि कर्तव्यनिष्ठेने पूर्ण केल्या होत्या. २००७ पर्यंत ह्या एकाचे ३ फ्लॅट झालेले पाहण्याचं भाग्यही आईला लाभलं, ही एक सुखावह गोष्ट आहे.
आमच्या आईचे व्यक्तिमत्व नीट उलगडण्यासाठी तिच्या पूर्वाश्रमीची थोडी माहिती इथे देणे आवश्यक वाटते. लग्न होईस्तोवर म्हणजे वयाच्या २४ वर्षांपर्यंत आई संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे ह्या कोकणातील आड-गावी राहत होती. आमचा दादामामा, लिलूमावशी, आई, मधुमामा आणि सगळ्यात लहान मनोहरमामा अशी ही भावंडांची उतरती भांजणी होती. गावात शाळा फक्त ७ वी म्हणजे (व्हर्नाक्युलर फायनल) पर्यंतच होती, त्यामुळे तिचे सुरवातीचे शिक्षण 'व्हफा'पर्यंत होऊन तिथेच थांबले. आडगावातल्या शाळेत असून असून किती विद्वान शिक्षक असणार ..?? (एका आईच्या शिक्षकाने 'चमचा' ह्या शब्दाची विभक्ती 'चा' ह्या अक्षराला प्रत्यय मानून 'षष्ठी' आहे असे सांगितले होते. शिक्षकाची ही परीक्षा साक्षात आमच्या दादामामाने आईकरवे गम्मत बघायला घेतली होती, असे विश्वसनीय गोटातून कळते 😆). तिच्या वयाच्या साधारण विसाव्या वर्षी तिचे वडील ऍनिमियाच्या विकाराने गेले. अर्थात कुटुंबाची सगळी जबाबदारी भावंडात सगळ्यात थोरल्या असलेल्या मोठ्या दादामामावर आली. लिलूमावशीचे लग्न होऊन आता सातेक वर्षे झाली होती. तिला दोन मुलगेही होते. कोकणातले आयुष्य हे कितीही काही म्हटले तरी चाकोरीबद्ध आणि कष्टदायकच !! पण त्यामुळे तिथे राहून चांगले शिक्षण घेऊन व्यक्तिमत्वाचा विकास घडणे तसे सर्वथैव अशक्य होते. दादामामा, मावशी आणि मन्यामामा ही बुद्धिमान मंडळी स्वकर्तृत्वाने आपली सर्वांगीण प्रगती करू शकले, ते स्वतःचे घर सोडल्यावरच !! (कै. मधुमामाने कधीच घर सोडले नाही, त्यामुळे अर्थातच त्याची प्रगती केव्हाच झाली नाही). आईच्या बाबतीत 'घर सुटणे' एकाच गोष्टीमुळे शक्य होते ...ते म्हणजे 'विवाह' करणे !! आई २३ वर्षांची झाल्यावर कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी म्हणा, किंवा परंपरेमुळे म्हणा, पण तिच्यासाठी वरसंशोधन सुरु झाले. एके काळी वेटलिफ्टिंगचा छंद असलेल्या आमच्या बाबांची तब्येत आणि व्यक्तिमत्व चांगले होते. पण आर्थिक बाजू ही 'कमकुवत' म्हणता येईल अशीच होती. (त्याची कारणेही तशीच होती, जी मी बाबांवरील लेखात उद्धृत केली आहेत). बाबांशी तिचं लग्न १६ मे १९५९ रोजी गिरगावातील संतीणबाईंच्या मठात पार पडले. वरती वर्णन केलेल्या छोट्या घरात (खोलीत) आईचा गृहप्रवेश झाला आणि तिचे संसाररूपी 'अग्निदिव्य' सुरु झाले. बाबांच्या आणि आईच्या वयात ७ वर्षांचे अंतर होते. बाबांची मिळकत ही अतीअल्प नसली तरी जेव्हढ्यास तेव्हढीच होती. हौशीमौजीच्या तर नाहीच, पण उण्या-अधिक खर्चास देखील जागा नव्हती. त्यात पुढल्या ८ महिन्यातच सातोळ्या आणि जेमतेम ३. ४५ पौंड वजनाच्या कन्येचा ( म्हणजे ताईचा ) जन्म झाला. ही नवजात मुलगी म्हणे अक्षरशः दीड फुटी छोट्या बाहुलीसारखी अतीनाजूक दिसायची, इतकी कि अन्य कोणी तिला हात लावायलाही धजावत नसे. तिची सगळी शुश्रूषा कापसाने करावी लागे. ती रडल्याचा आवाजही नुकत्याच जन्म घेतलेल्या मांजरीच्या पिल्लासारखा अगदी क्षीण येत असे. ( हल्ली incubator मध्ये काय करतात कोणास ठाऊक, पण ही सुविधा पूर्वी नव्हती. त्यामुळे ते काम शून्य उपलब्धीयांमध्ये आईला करावे लागले होते). मांगलवाडीतले धन्वन्तरी आमचे फॅमिली डॉक्टर शंकर विष्णू जोगळेकर आणि गिरगांवातले बालरोगतज्ज्ञ डॉ. संझगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या ग्रेट आईने हे पोस्ट-डॉक्टरेट प्रोजेक्ट तडीला नेले. मुलीचे नांव 'विद्या' ठेवले. गिरगावातल्या सगळ्या चाळी अगदी एकमेकाला लागून होत्या. बाकी कुणी नसेल कदाचित, पण आमच्या खिडकीच्या समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या जेष्ठ आणि श्रेष्ठ पुरोहितीणबाईंनी मात्र आईला ह्या चिमुकल्या जीवाची शुश्रूषा करताना रोज पहिले होते. "अगं, तू तिची 'आई' नसतीस, तर विद्या हाताशी लागली नसती " असे कौतुकपर उद्गार त्यानंतर कितीतरी वेळा त्यांनी आमच्यासमोर काढले होते, ह्यावरून अंदाज करा काय परिस्थिती असेल ती !! कुठल्याही आईचे म्हणून जे असते ते नैसर्गिक अपत्यप्रेम, कर्तव्यनिष्ठा, विलक्षण चिकाटी, डॉक्टरांवरील श्रद्धा, कुठलीही गोष्ट निगुतीनं करण्याची क्षमता आणि बाबांचा भक्कम आधार ह्या बळांवर हे सर्व निभावून गेलं. पण ....... ताई सव्वा वर्षांची झाली नाही, तोच ह्या पृथ्वीतलावर 'मी' प्रगट झालो. आता मात्र आईची 'डबल पी. एच. डी.' सुरू झाली.... !!😓
मुले मोठी कधी होतात ते कधीकधी आई वडिलांनाही समजत नाही. पण आमच्या आईला नक्की समजले असेल, कारण आम्ही दोघे आळीपाळीने काही ना काही आजारपण काढायचो. सुदैवाने झावबाच्या वाडीत आमच्या चाळीपासून १०० मीटरवरच शिशुविहार नावाची शाळा होती, तिथे आम्ही दोघं जाऊ लागलो. ताई माझ्यापुढे एक यत्ता होती. कधीकधी मी शाळेत रडारड केली कि मला शिक्षक ताईच्या वर्गात नेऊन बसवत. हा उद्योग अगदी मी चौथीत जाईपर्यंत चालू होता. बहुधा आईने ही standing instruction शिक्षकांना दिलेली होती. चौथी यत्तेपर्यंत माझा वाढदिवस साजरा करायची आईची एक आगळीवेगळी पद्धत होती. एक तर त्या दिवशी वर्गात वाटायला पेन्सिल, रबर , चॉकलेट वगैरे माझ्याबरोबर दिलेले असायचे. ते वर्गात गेल्याबरोबर आधी शिक्षकाच्या स्वाधीन करायचे. ( पोरांचा काय भरवसा ..??). नंतर वर्ग चालू असताना शिक्षकांना सांगून आई मला लवकर शाळेतून घरी न्यायला यायची. आणि मग 'प्रिन्स ऑफ वेल्स' भर वर्गातून सर्व वर्गाकडे एक कटाक्ष टाकून मोठ्या ऐटीनं बाहेर निघून जायचे. 'मज्जा आहे बुवा एका माणसाची' अशा नजरेने सगळा वर्ग माझ्याकडे पाहत असे. मला तेव्हा ह्या गोष्टीचे फार अप्रूप वाटायचे. (हल्लीच्या केक कापण्यात हा 'थरार' नसतो !!). आईने नाक्यावरच्या पणशीकरकडून कुठली तरी बर्फी वगैरे आणलेली असायची माझ्यासाठी. आणि घरी गोडधोड केलेलं असायचं ते वेगळंच !! रविवार असेल, तर ठाकूरद्वारच्या सागर ड्रेसेसमधून मला आईच्या आवडीचा लेटेस्ट 'बाबासुट' मिळायचा.
आई मुळातच शिस्तप्रिय होती, जी तिच्या वागण्याबोलण्यातून नेहमीच दिसायची. पण म्हणून घरातल्या बाकींच्यांसाठी तिने उगीचच कधीही शिस्तीचा बडगा दाखवला नाही. कुठलीही गोष्ट तिने insincerely, उडत उडत, घिसाडघाईने किंवा भोंगळपणे केली नाही. प्रत्येक करावी लागणारी गोष्ट हि काही तिच्या आवडीचीच असेल असं मुळीच नव्हतं. अजिबात दिरंगाई न करता वेळच्या वेळेला कामे करणे हे तिचे एक वैशिष्ट्य होते. गिरगावात असताना एक तर पाणी भरण्यासाठी प्रत्येकालाच पहाटे ५ वाजता उठावे लागे. घरात नळ यायच्या आधी तर कॉमन नळावरून पाणी भरावे लागे. पाणी जायच्या आधी आपल्याला दिवसभर पुरेल इतके पाणी मिळणे हे महाकर्म कठीण होते. मला वाटत आम्ही चौथी पाचवीत गेल्यावर प्रत्येकाच्या घरात नळ आले, (पाणी सकाळी फक्त २ तासच येई). मग बाहेर ठेवलेली पिंपे भरण्यासाठी लांबलचक तोट्या आल्या. संडासही इतर चाळींसारखे कॉमन होते. शाळेच्या बाबतीत आमची ताई नशीबवान होती . तिला कधीच सकाळची शाळा नव्हती. माझ्या बाबतीत 'सकाळची शाळा' फक्त पाचवीला नाही, तर ५ वी ते ९ वीला पुजली होती. मी गिरगावातल्या चिकित्सक हायस्कुलचा विद्यार्थी !! ( ह्या शाळेविषयी मी विस्ताराने आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय ) सकाळी ७ वाजता मला शाळेत सोडायला बाबा यायचे. तर भर दुपारी आणायला आई यायची. डबा बहुतेक न्यायचोच शाळेत. पण क्वचित कधी नाही नेला, तर आई शाळेच्या कँटीनमध्ये काहीतरी खायला ५ किंवा १० पैसे पॉकेट मनी द्यायची (आमच्या वेळी पॉकेट मनीची क्रेझ नव्हती).
आईच्या संदर्भातल्या माझ्या शालेय जीवनातील काही निवडक आणि मनात ठसलेल्या आठवणी आहेत. पहिली हकीकत मी पाचवीत असतानाची आहे, जी ह्या जन्मात तरी मी कधीही विसरणार नाही. माझी वार्षिक परीक्षा होती. हिंदीचा पेपर होता दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी आईने माझा अभ्यास कुठपर्यंत आलाय ह्याची जरा चाचपणी केली आणि तिच्या लक्षात आलं कि मला काहीही येत नाहीये. परीक्षेपूर्वीचे माझे ह्या विषयातले अज्ञान बघून ती स्तिमित झाली. मग आधी मी आईचा सपाटून मार खाल्ला. आईने पूर्ण पुस्तक पहिल्या धड्यापासून मला शिकवायला सुरु केले. (अजूनही त्या पुस्तकातले धडे मला आठवतायत. उदा . चुडीवाले बाबा, पेड कि गवाही , 'मेरा छाता' ही कविता वगैरे😀). मला वाटतं एव्हढ्या प्रचंड स्केलवर मार खाण्याची माझी पहिलीच वेळ असावी ती. त्यामुळे मी अर्धा मानसिक धक्क्यात होतो. एकीकडे ओक्सबोक्शी रडत मी अभ्यास करायला सुरवात केली. रात्री खूप उशिरापर्यंत युद्धपातळीवर माझा अभ्यास चालू होता. दुसऱ्या दिवशी पेपर सोप्पा गेला आणि मी हसत घरी आलो. आता इंग्रजीची बारी होती. त्यामुळे माझा ताबा आता बाबांनी घेतला. त्यांच्याकडूनही मी एखाद्दी पट्टी खाल्ली असावी. आजचा दिवस म्हणजे कालच्या दिवसाची पुनरावृत्ती होती, फक्त न रडता. ह्या विषयाचा पेपरही सोपा गेला. इतिहास वगैरे बाकीच्या विषयांचे काय पानिपत झाले होते मला आत्ता काही आठवत नाहीये. पण result आणायला आई गेली होती. ती घरी आली आणि result ऐकून मी उडालोच एकदम. माझा वर्गात चक्क २ रा नंबर आला होता, आणि तो देखील माझ्या वर्गात हुशार हुशार मुले असूनही !! पण एव्हढे नक्की, कि पाचवीतून सहावीत मी जाण्याचे संपूर्ण श्रेय आई बाबांचेच होते. एकदा आई बाबांचा माझ्याविषयीचा एक संवाद मी चोरून ऐकलं होता. बाबा आईला सांगत होते कि "विकासचं grasping चांगलं आहे, पण अभ्यास काहीही करत नाही". त्यांचे हे विधान आणि reading तंतोतंत खरे होते. माझ्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात मी जिथे जिथे अभ्यास केला, तिथे मला उत्तमच यश मिळाले. एरवी काय झालं, त्याविषयी मी न बोलणेच बरे.... !! (आमची ताई माझ्या मानाने अभ्यासात खूपच सिन्सिअर होती).
याच ओघात काही गोष्टी लिहाव्याश्या वाटतात. आमच्या घरी आय. आय. टी. मध्ये शिकणारे काही विद्यार्थी thesis typing च्या संदर्भात बाबांना भेटायला आमच्या घरी यायचे. ही चांगल्या घरातली जोशी, भिडे, जोगळेकर वगैरे हुशार हुशार मुलं आपला अतीसामान्य ( कदाचित गरिबीतला.. ) संसार बघून काय म्हणत असतील ?? असा विचार आईच्या मनाला कित्येक वेळा येऊन जाई आणि तिला खूप वाईट वाटे. तिने एकदा Innocently बाबांना विचारले कि " आपल्या विकासला मिळेल का हो आय. आय. टी. मध्ये ऍडमिशन ..??". हा प्रश्न विचारल्यावर बाबांचे उत्तर असे... " मूर्ख आहेस का तू ?? तुला काहीही कल्पना नाही IIT म्हणजे काय असतं ते. इथे फक्त हुशारांतल्या हुशार मुलांनाच फक्त प्रवेश मिळतो. आपले चिरंजीव त्याच्या जवळपास देखील नाहीयेत". आई खट्टू झाली. १९७९ मध्ये मला खरंच जेव्हा IIT त प्रवेश मिळाला, तेव्हा ह्या माउलीचे निदान एक तरी स्वप्न पूर्ण करण्याचे मला समाधान लाभले, असं मला वाटून गेलं. स्वतःच्या वर्तमानाची सदैव चिंता असणाऱ्या सोनवड्यातल्या शंकरभाऊंनी केमळ्याच्या घरात राहणाऱ्या आमच्या आईला म्हणे कधीतरी तिचे भविष्य सांगितले होते कि "कमू, तू मोठेपणी गाडीतून फिरणार....!!". हे भाकीत देखील ईश्वरकृपेनं पुढे खरे झाल्यामुळे 'शंकरभाऊंना नक्कीच ज्योतिष कळत असणार' असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. 😆
चिकित्सक शाळा आणि आमचे राहते घर यामधील अंतर दीड दोन किलोमीटर तरी असावे. मी वर लिहिल्याप्रमाणे मला शाळेतून घरी नेण्यासाठी बिचारी आई भर उन्हातून दुपारी १२ ला शाळेत यायची. (तिला ह्यामुळे होणाऱ्या कष्टांची जाणीव तेव्हा मला मुळीच नव्हती.). शाळा सुटल्यानंतर आमच्या शाळेच्या मुख्य प्रवेशदारातून मुलांचा अक्षरशः लोंढा बाहेर पडायचा. लठ्ठालट्ठीत स्वतःचे दप्तर सुद्धा सांभाळणे अवघड जायचे. एकदा ह्या गर्दीतून बाहेर पडताना माझ्या पायात काहीतरी साखळीसारखे अडकले असं वाटलं. म्हणून बाहेर आल्यावर पाहतो, तो चक्क एक सोन्याचा नेकलेस होता. मी आईला दाखवला तो लगेच. त्याच पावली आई मला आमच्या उपमुख्याध्यापिका म्हात्रे मॅडम ह्यांच्याकडे घेऊन गेली आणि त्यांच्याकडे तो deposit केला. आमची आई किती सचोटीची होती हे ह्यावरून लक्षात येईल. ( काय असेल ते असो, पण माझ्या आईच्या गळ्यात कधीच नेकलेस पडला नाही, हे इथे लिहिणे अप्रस्तुत होणार नाही ). 😢
मी वर लिहिल्याप्रमाणे आईचे आयुष्य लग्नानंतरही कष्टदायकच होते. पहाटे ५ ला पाणी भरायला उठावे लागे. सकाळच्या चहानंतर बाबांचा आणि माझा डबा व्हायचा. त्यानंतर स्वतःचे सगळे आवरून आई बाकीचे जेवण करीत असे, कारण ताईची शाळा सकाळी ११ ची होती. ती जेवून शाळेत जायची. ते झाल्यावर आई मला शाळेतून आणायला येई (सातवीपर्यंत). आमच्याकडे गिरगावात आंध्रकडचे कोंगाटी लोक धुण्याभांड्याला होते. त्यांची नावे गंगा, लिंगा, पोशा, लक्ष्मी अशी दोन अक्षरी असत. खोल्या लहान असल्यामुळे धुण्याभांड्याचे व्यवहार बाहेर चालत. कधीकधी मजल्यावरच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात(??) चालत. तिथे काय दर्जाची स्वच्छता असेल, ते देवच जाणे. त्यामुळे आई रोजच्या वापरात घेताना प्रत्येक भांडे, ताट , वाटी आधी धुवून घ्यायची ( ते देखील घरात साठवलेल्या पाण्याने ). म्हणजे घरचे आरोग्य राखणे करणे हे खूपच मोठे challenge होते. विचार केला तर आहे, नाहीतर काहीच नाही. ह्या सगळ्या असुविधांविषयी आईने कधीही ब्र काढलेला ऐकिबात नाही. जे आलंय वाट्याला ते निमूट स्वीकारायचे असे तिचे तत्वज्ञान असावे. आमची आई इतक्या टापटिपीची होती, कि मोलकरणीसाठी ती मुळातच भांडी rinse करूनच ठेवायची. त्यावरून आम्ही तिची कधीकधी चेष्टाही करायचो. धुण्याचे कपडे सगळ्यांसाठी असलेल्या कॉमन गॅलरीत निदान बारा पंधरा फूट वर असलेल्या दांड्यांवर वाळत घातले जायचे. ते वाळत घालण्यासाठी हल्ली पार्किंगला असते तशी जागा प्रत्येक खोलीसाठी गॅलरीत आरक्षित केलेली असे. (आता सगळ्यांकडे वॉशिंग मशीन आली).आईला जेवणातले किंवा खायचे पदार्थ मोजूनमापून करावे लागत. कारण घरात त्या काळी क्वचितच फ्रिज असे. त्यामुळे उरवड क्वचितच असे. तरीही कधीही कुठलीही गोष्ट आम्हाला कमी पडली नाही. आमच्यासाठी आई बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकोलेट, कोको आणायची. (आईचे लक्ष नसताना डबा उघडून ड्रिंकिंग चॉकोलेटची पावडर खाताना जेव्हढी मजा यायची, तेव्हढी दुधात घालून पिताना यायची नाही😅). कोको बहुतेक महाग असावा, त्यामुळे तो कधी अतिआग्रह झाला कि मगच मिळायचा. दुपारी एक वाजता आम्ही शाळेतून घरी आल्यावर जेवायचो. सगळ्या दैनंदिनीत आईला विरंगुळा म्हणजे आमचा फिलिप्सचा ट्रान्सिस्टर होता. पहाटे सुमन कल्याणपूर यांचे प्रभू सोमनाथा, साडे सहाला कुमार-वसुंधराबाईंचे नैन घट घट किंवा लताबाईंचे माई माणो सुकाणामा, दुपारी कामगार सभा, मग बाजारभाव ( बाळ जांभेकर -वसई पापडी😀), मग वनिता मंडळातला ताई-माईंचा आत्या-सुधाचा संवाद, संध्याकाळी करड्या आवाजात सुद्धा नरवणे किंवा इंदुमती काळे बातम्या द्यायच्या, त्यानंतर पुन्हा प्रपंच !! ह्या रेडिओमुळे रोजचा प्रपंच करण्यासाठी आई ताजी तवानी राहायची. वयाच्या पन्नाशीपर्यंत आईने 'मला झेपत नाही ' वगैरे सूर कधीही लावल्याचे ऐकिवात नाही. ती तब्येतीची कुठलीही कुरबुर न करता सतत कार्यरत होती.
गिरगावात असेपर्यंत वर्षातून एकदा आमचे सर्व घर वरपासून खालपर्यंत झाडून स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असे . त्या दिवशी बाबा ऑफिसमधल्या एखाद्या शिपायाला वेगळे पैसे देऊन मदतीला बोलावत. आई आणि बाबा एकमेकांना झेपणारी कामे वाटून घेत. बाबा वर माळ्यावर चढून कौलांपासून सगळं झाडायचे. ( माळा म्हणजे जुने-पुराणे वस्तू संग्रहालय !!). आम्ही भावंडे लिंबूटिंबूची कामे करायचो. आम्हा दोघांच्या दृष्टीने हा मौजेचा दिवस असायचा. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत घर झाडून पूर्ण स्वच्छ होई . नंतर आई अर्ध्या तासात कांदा बटाट्याचा रस्सा आणि भाताचा बेत करी, ज्याची गोडी एरवीपेक्षा अवीट असायची. ( कारण मेहेनतीमुळे प्रचंड भूकही लागलेली असे). नंतरची ठाण्याची सर्व घरे ही मोठी आणि मुदलातच स्वच्छ असल्याने ह्या 'घर झाडणी'च्या वार्षिक कार्यक्रमाला आम्ही कायमचे मुकलो. असो ! अध्येमध्ये आई-बाबा आम्हाला जपानी गार्डनला ( स. का. पाटील उद्यान) किंवा चौपाटीला घेऊन जायचे. क्वचित कधी नाटक सिनेमालाही आम्ही सगळे जायचो. बहुदा आमच्या वाढदिवसाच्या आधी किंवा दिवाळीच्या आधी आम्हां मुलांसाठी एक ड्रेस खरेदीचा मोठा कार्यक्रम असे. कधी कधी ठाकूरद्वारच्या 'सागर ड्रेसेस' मध्ये किंवा धूतपापेश्वर बिल्डिंगमधल्या ड्रेसलँड स्टोअरमध्ये मला 'बाबा सूट' तर ताईला फ्रॉक खरेदी असे, त्याचे अप्रूप अजूनही आहे. 'बाबासूट' ही संज्ञा गेल्या ३०-४० वर्षात ड्रेस विक्रेते वापरत नाहीत. (तसेच 'जर्किन' हा शब्द देखील कालबाह्य झाल्याचे दिसते). हे सगळे ड्रेस त्या वेळचे Best in their own kind असे असत, हे महत्वाचे. पण ड्रेसचे सिलेक्शन मातोश्रींचे असे हे नक्की. आमच्या आईला कपड्यांसाठी एक विशेष नजर देवाने बहाल केलेली होती. एकदम चुन चुनके कपडे आणायची ती आम्हाला. लहानपणी आम्ही दोघंही भावंडे आलटून पालटून तापाने आजारी पडायचो. तेव्हा आमची आई ज्या प्रेमाने शुश्रूषा करायची, ती आठवून आजही मी हळवा होतो. माझा ताप तर बरेच वेळा कपाळावर थंड पाण्याच्या घड्या घातल्याशिवाय किंवा icebag ठेवल्याशिवाय उतरायचा नाही. किंबहुना ताप उतरल्याशिवाय आई झोपायचीच नाही. रात्री उशिरापर्यंत तो उद्योग आईच करायची. मऊ भात आणि साबुदाण्याची लापशी यांचा २ दिवस मारा असायचा. पेशंटला काय खावंसं वाटतं, ते बनवण्याचा तिचा प्रयत्न असे. केलेला पदार्थ आम्ही संपवेपर्यंत ती आमच्या जवळ बसून असायची. पहिले दोन दिवस कोमट पाण्याने अंग पुसून काढायची. मंगलवाडीत डॉक्टरांकडे घेऊन जायचे कामही तीच करीत असे. When it came to patient care, Aai was uncomparable!! ती किती प्रेमळ आणि संवेदनशील होती, ते तेव्हाच कळायचं !! पण गिरगावात ती स्वतः मात्र आजारी पडल्याचे आम्ही कधीही पाहिलेले नाही. मला वाटतं तिला आजारी पडायलाही वेळ नव्हता. नाही म्हणायला ठाण्याला राहायला आल्यावर तिने 'खूप कंबर दुखतेय' अशी एकदा तक्रार केली होती. तेव्हा तिला अस्थिरोगतज्द्न्य डॉ. चारी यांनी काहीही औषध न देता शलभासन आणि भुजंगासन अशी आसने नियमित करायला सांगितली होती. ती आईने न चुकता जवळजवळ २५ वर्षे केली. त्यामुळे ह्या बाबतीत तिला एका नव्या पैशाचेही औषध लागले नाही. (नंतर नंतर त्यामध्ये आणखी काही योगासनांची भर पडली). नियमितपणा हा आमच्या आईबाबांचा गुणविशेष होता.
आमच्या चाळीत नीतिमत्तेच्या दृष्टीने वातावरण तसे सवंग होते. खरं म्हणजे सगळे बिऱ्हाडकरू ब्राह्मणच होते. पण त्यातले काही छंदी फंदी होते. त्यामुळेच कि काय, पण चाळीत निवडक बायकांव्यतिरिक्त आई फारशी कुणाशी बोलत नसे. सार्वजनिक हरतालिकेचा समारंभ पहिल्या मजल्यावर होत असे, त्याला मात्र ती जाई. त्यावेळी तिला लग्नात घातलेली अबोली रंगाची आणि हिरव्या काठांची साडी ती नेसत असे. सार्वजनिक गणपतीचा प्रसाद सर्वांना पुरेल इतका ती एकदा बनवून देत असे ( गोडाचा शिरा किंवा शेंगदाण्याची उसळ वगैरे ). पण आरतीसाठी ती खोलीच्या दरवाजातच उभी राही. स्टेजवरील कार्यक्रम देखील दरवाजातूनच बघे. खरं म्हणजे मनोरंजनाच्या कार्यक्रमात माझा आणि ताईचा काही ना काही सहभाग असायचा. पण तिने कधीही पुढे पुढे केले नाही , कारण ते तिच्या स्वभावातच नव्हते. ती चाळीत कुणाच्या घरी जाऊन गप्पा मारतेय, हे दृश्य मी प्रयत्न करूनही डोळ्यापुढे आणू शकत नाही. आमच्या घरी TV नसताना आई कुणाकडे तो बघायला गेल्याचेही ऐकिवात नाही. ती आपला आब राखून असे. आई आस्तिक होती. देवाची नित्यपूजा ती करीत असे. पण सारखी 'देव देव' करीत नसे. कुठल्याही सदगुरुची भक्ती ती करीत नसे किंवा पोथ्यापुराणे देखील तिने कधी वाचल्याचे ऐकिवात नाही. (माझ्या आग्रहास्तव एकदा ती अनिरुद्धबापूंच्या प्रवचनाला बांद्रयाला आली होती. मी देखील तिला फार भरीला घातले नाही. (Spirituality is a personal preference..!!) श्रावणामध्ये जिवंतिकेचा हिरवा पिवळा कागद भिंतीवर लावून ती पूजन करीत असे. कारण ते मुलांसाठी आहे अशी तिची श्रद्धा होती. नेहमीच मनोभावे केलेली ही आईची पूजा मात्र 'फळली' अशी माझी धारणा आहे. आम्हा दोघा भावंडांची जी काही उन्नत्ती किंवा प्रगती आत्तापर्यंत झालेय, त्यापेक्षा फार काही अपेक्षा आईची देखील नसावी. काही रिक्षेवाले स्वतःच्या रिक्षेच्या मागे 'आईची पुण्याई....!! ' असे का लिहितात ते मी आता समजू शकतो. तसेच श्रावणात घरी सवाशिणीला जेवायला बोलावीत असे. ( त्यावेळचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. माधवबुवा आठल्ये यांच्या पत्नी किंवा ३८ नंबरच्या चाळीत राहणारे दशग्रंथी करंबेळकर गुरुजी यांच्या पत्नी ह्या बहुतेक आमच्याकडे या कारणासाठी येत). पुराणातल्या कथा मात्र तिला चांगल्या परिचित होत्या. "एक गरीब ब्राम्हण होता ...." अशा वाक्याने सुरु होणाऱ्या कहाण्यांच्या स्वरूपात आम्हाला लहानपणी त्या सांगत असे. गणेशोत्सवात गिरगांवातले सगळे मोट्ठे गणपती ती आम्हा मुलांना मुद्दाम नेऊन दाखवीत असे. दिवाळीतली रंगावली प्रदर्शनही नेऊन दाखवी. कुठलाच सण आईने कधीही वायंडा दवडला नाही. मकर संक्रांतीला गुळाच्या पोळ्या, होळीत पुरणपोळ्या, श्रावणात हमखास कडबू , नारळी पौर्णिमेला नारळी भात आषाढीला उपासाचा चौफेर फराळ आणि गणपतीत मोदक असायचे. दिवाळीचा सगळा फराळ आई घरी करीत असे. आईमुळे प्रत्येक सणाला फेस्टीव्हिटी यायची. मकर संक्रांतीच्या आधी आई स्वतः माझ्याबरोबर नाक्यावर येऊन मला २ पतंग आणि मांजा घेऊन द्यायची. (नंतर तेच पतंग उडविण्यासाठी आमच्या बिल्डिंगच्या कौलावर चढून मी तिच्या गळ्याला तात लावीत असे. 😢). माझ्या लहानपणी मी पुष्कळ वेळा आईच्या गळ्याला तात लावलेला आहे. (त्या उलट आमची ताई स्वतःला खूप सांभाळून असायची ). पूर्वी कपडे लटकावण्यासाठी लोखंडी हुक्स भिंतीत मारलेले असायचे. मी साधारण ९-१० वर्षांचा होतो. आई क्लासला गेली होती. घरात फक्त मी आणि ताईच होतो. आई घरी नसताना काहीतरी मूर्खसारखे खेळ करताना ह्यातला एक हुक सरळ माझ्या हनुवटीमध्ये घुसला. ( फार लिहीत नाही यावर, कारण खूप भीतीदायक आहे हे !! देवानेच तारले मला आणि .... आईलासुद्धा !! ). मी ८ वीत असताना स्काउटच्या कॅम्पला माथेरानला गेलो होतो. तिथे एका वर्गातल्या मुलाशी माझी खूप मारामारी झाली, त्यात एका अणकुचीदार टोक असलेल्या बॅगेवर मी पडल्यामुळे माझे पायाचे ढोपर फाटले. कॅम्पहुन घरी आल्यावर आम्ही त्याच पावली जोगळेकर डॉक्टरांकडे जाऊन पायाला टाके घालून आलो. अजूनही हे त्रास विनाकारण आई वडिलांना दिल्याबद्दल मी माझे कान पकडतो .
आई गिरगावात फार कुणाकडे जात नसे. नातलगांमध्ये मुगभाटात राहणारे आमचे जयामामा-मामी, मंदामावशी ह्या मामेभावंडांकडे, विजयाताई अंतरकर, ओळकर काका आणि तिच्या क्लासमधल्या आंग्रे वाडीतल्या २-३ मैत्रिणी ह्याव्यतिरिक्त कुठेही ती जात नसे. दोन्ही मामांकडे ( उरण आणि बांद्रा ) आणि लिलू मावशीकडे शिवडीला मात्र आमचे बरेच वेळा जाणे होई. तिघांकडेही आम्हां मुलांचे भरपूर लाड झालेले आहेत. विजुमामीच्या हुशारीचे , लिलूमावशीच्या कर्तृत्वाचे आणि सुमनमामीच्या शौर्याचे आई नेहमीच कौतुक करीत असे. कै. लिलूमावशीचा अकाली मृत्यू आईच्या अंतर्मनात उतरायला पूर्ण वर्ष लागले होते. कुर्ल्याला दत्ताकाकांकडेही अधूनमधून आमचे जाणे होई. सातारची आत्या, डोंबिवलीच्या आमच्या दिगंबरकाकांशी आणि पुण्याला स्थायिक असलेला बाबांचा सख्खा भाचा सदशिवदादा यांच्याशीही आईबाबांचे अत्यंत सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध होते . त्यामुळे त्यांच्याकडेही आमचे जाणे-येणे व्हायचे. सासरच्या सगळ्या वरिष्ठ व्यक्तींबद्दल आईला योग्य तो आदर होता. तिच्याकडून कुणाचाही अभावानेसुद्धा अनादर झालेला मला आठवत नाही. बाबांच्या सगळ्या नातलगांना तिने आपलं मानलं. कधीतरी आम्ही आईची मैत्रीण कै विनया शिरगावकर ( उर्फ बेबीमावशी) हिच्याकडे चेंबूरला जायचो, पण क्वचितच. ही आईची अगदी लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण !! सोनावड्यात ह्या दोघी एकत्र खेळलेल्या. बेबी मावशी पहिल्यापासूनच एकदम डॅशिंग, तर आमची आई नेहमीच चुकुरलेली. ह्यामुळे दोघी एकमेकांना चांगलं compliment करायच्या. आम्ही ठाण्याला आणि बेबीमावशी मुलुंडला साधारण एकाच वेळी राहायला आल्याने दोघींचे संबंध शेवटपर्यंत उत्तम राहिले. बेबीमावशीचे सगळेच कुटुंब आम्हां तिघांसारखेच (मी, सुचित्रा आणि विभव ) गेली कित्येक वर्षे अनिरुद्ध बापूंना follow करणारे आहे. त्यामुळे अजूनही तिचे मुलगे- सुना यांचे आणि आमचे संबंध अगदी घरच्यासारखेच आहेत हे विशेष !! ( काहीतरी वेगळा योग आहे हा... ). सुरवातीला बाबांच्या बेताच्या परिस्थितीमुळे आणि नंतर माझ्या ऑफिसच्या कामाच्या व्यग्रतेमुळे आईला फारसे पर्यटन करता आलेले नाही, याबद्दल मला नेहमीच सल राहिला. गणपती पुळे, टिटवाळा, माथेरान, अलिबाग, पाली , पुणे, सातारा , महाबळेश्वर, कोल्हापूर, इटारसी, भोपाळ, बंगलोर-म्हैसूर ह्या व्यतिरिक्त आईला कुठेही पर्यटन घडलेले नाही.
घरी आलेल्या अतिथीचे स्वागत आईने नेहमीच अगत्याने आणि कर्तव्यबुद्धीने केले. ( फोन नसल्याने , त्यावेळचे सगळेच
पाहुणे
हे
'तिथी'
न
सांगताच यायचे
😀). गिरगांवात आमच्याकडे जागा
कमी
असल्याने मुळातच
पाहुणे
कमी
येत.
राहायला तर
जवळ
जवळ
नाहीतच.
सकाळी
कधी
ताईची
एखादी
शाळेतली मैत्रीण यायची,
तर
दुपारी
कधी
(माझ्यासारखे बावळट
असणारे)
माझे
मित्र
विजारीतून अर्धा
शर्ट
बाहेर
आलेल्या युनिफॉर्ममध्ये डायरेक्ट शाळेतून घरी
खेळायला येत.
वेळ
पडल्यास त्यांचे जेवणखाण देखील
आई
प्रेमाने करीत
असे.
बाबांच्या मित्रांमध्ये कधी
रविवारी काकडीचे तवस
घेऊन
गाऊनवाले दांडेकर यायचे,
कधी
इंग्लिश कंपनीत
झब्बालेंगा घालून
जाणारे
आणि
दोन
भुवयांच्या मध्ये
शेंदराची चिरी
लावलेले बाळू
ओळकर
यायचे,
कधी
सारखे
तोंडाने फिनिश
म्हणणारे 'रुईकर'
यायचे.
ह्या
सगळ्यांचे उत्तम
आगत
स्वागत
चहा
पोहे
वगैरे
करून
आई
करायची.
तेव्हा
कोणाकडे फोन
करून
जायचा
जमाना
नव्हता.
त्या
काळी
मावशी,
मामा
फॅमिली
सरप्राईझ visit वर यायचे,
तेव्हा
आनंदाने घरात
एकच
जल्लोष
व्हायचा. कधीकधी
जवळच
रिझर्व्ह बँकेत
मोठ्ठा
ऑफिसर
असलेला
आमचा
Great मन्यामामा संध्याकाळी आम्हाला भेटायला यायचा.
(त्याच्या brief caseचा चॉईस
एकदम
बेश्ट
असायचा).
भाऊबीजेला बरेच
वेळा
दोन्ही
मामा
यायचे.
त्यामुळे आमच्या
घरात
एकदम
फेस्टिव्ह मुड
असायचा.
कधी
कधी
रव्याच्या लाडवांची पुरचुंडी घेऊन
आमची
पणजी
आजी
देखील
मुगभाटातून हळूहळू एकटी चालत
येत
असे.
मग
आजी
आणि
नातीच्या छान
गप्पा
होत.
दत्ताकाका पण
व्ही.
टी.
ला
कामाला
असल्याने तेही
एखाद्या संध्याकाळी चक्कर
टाकायचे. (पण
दत्त
म्हणून
नाही
हं
... ). आमचे
मोठे
काका-काकू (म्हणजे खोलीचे
खरे
मालक...
) हे
तेव्हा
इटारसीला राहायला होते.
ते
मात्र
सुट्टीवर ८-१५ दिवस राहायला येत.
पण
आल्यावर त्यांच्या मुंबईत
सगळीकडे visits लागलेल्या असतं.
सगळ्या
कात्रे
कुटात
आमचे
मोठे
काका
अगदी
रुबाबदार होते.
रॉयल
काम
होतं
त्यांचं !!( त्यांनी तोंडातून कधीही
एकही
शब्द
ब्र
न
काढता बाबांना जवळ जवळ १७
वर्षे
आपली
जागा
विनाशुल्क राहायला देऊन
आम्हाला आजन्म
उपकृत
करून
ठेवलय🙏
).
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या आठवणीत आम्ही दोघं ६-७ वर्षांचे असल्यापासून आईबरोबर दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी (म्हणजे सोनवड्यास) जायचो. त्यावेळी आमची आजी (आईची आई ) आणि आजोबा (म्हणजे आईचे काका ) आमचे कसे कसे लाड करायचे ते मी ' स्मरणरंजनाचे मोती' ह्या माझ्या लेखात सविस्तर लिहिले आहे. त्याची पुनरुक्ती इथे करण्याची गरज वाटत नाही. माझ्या आईचे माहेरचे नांव 'कमल' होते. त्यामुळे तिला सगळे गाव कमुताई म्हणून ओळखे. लग्न झाल्यानंतरही आईची नाळ माहेरशी (सोनवड्याशी) अगदी घट्ट होती.
त्यामुळे आम्हालाही आजोळची माया खूप मिळाली. सोनवड्याला आम्ही आलो कि आई नकळत पुन्हा तिकडची होऊन जायची. तिच्या पायाखालच्या वाटाही अंमळ थोड्या झिजल्या असल्या, तरी अजुनी तशाच होत्या. काही मोजके अपवाद सोडता बरेचसे गांव पूर्वीसारखेच होते. फुंकणीने फुंकून पेटविण्याच्या मातीच्या चुलीवर आई सराईतपणे स्वयंपाक करायची. (म्हणजे Chef आजी असायची. पण Asst Chef आई असायची). माहेरपणाला घरी आलेय म्हणून नुसतं बसून खाईन असं कधीही आईने केलं नाही. मागच्या अंगणातील चुलीवर उकळत ठेवलेले अंघोळीच्या पाण्याचे कढत आधणाचं जड 'तपेलं' किंवा 'सतेलं' ती बिनदिक्कत फडक्यानं उचलून बालदीत उपडी करे. शेणाने अंगण आणि घरातल्या जमिनी सारवण्यात पण ती वाकबगार होती. आई निरोगी होती. खरं सांगायचं तर वयाच्या ४५-५० वर्षांपर्यंत आईच्या नखी रोग नव्हता. कष्टांची सवय माहेरी आणि सासरी दोन्हीकडे होती. आमची विद्याताई सांगते कि वेळ पडल्यास आजीला मदत म्हणून आई गोठ्यातल्या म्हशीचे दूध देखील काढत असे. (ही गोष्ट सवय नसलेल्या माणसाला अतिशय अवघड आणि धाडसाची आहे). लग्नाच्या आधी तर शेतात लावणी लावण्यापासून सगळी कामे तिने केलेली होती. उन्हाळ्यात गावातली नदी आणि विहिरी आटायच्या. त्यामुळे पाण्याचा तुटवडा असायचा. नदी आमच्या घरापासून निदान दोन तीनशे मीटर तरी लांब होती. प्रसंगी तिथून मी आईला पाणी भरलेली कळशी आणताना पाहिलेले आहे. सुरवातीला कित्येक वर्षे आमच्या परसात विहीर नव्हतीच. त्यावेळी बाजूच्या गोपुनानांच्या किंवा शंकरभाऊंच्या विहिरीतून पाण्याने भरलेल्या कळश्या घरातील मोठी माणसे भरून आणीत; अर्थात त्यामध्ये आईचाही मोठ्ठा सहभाग असायचा.काळसावळा पण तरतरीत शंकर गुरव, पित्यासमान जेष्ठ असणारे बाबूकाका गुरव, आवडीअक्का, शितूअक्का ही एरवी श्रमाची कामे करणारी गुरव-वाडीतली गडी माणसे (गावाच्या परिभाषेत 'पैरी माणसे'') देखील कमूताईंना मुद्दाम भेटायला येत. "ओss कमुताईs" अशी शंकरची हाळी आमच्या घराचे बेडे ओलांडतानाच यायची. त्याची हाक खूप musical वाटायची !! दुपारचे जेवण झाल्यावर आवडीअक्का आणि आमच्या आजीने अडकित्त्याने कातरलेली सुपारी तोंडातील एखाद्या वाचलेल्या दाढेखाली धरून (आणि कुडुम कुडुम वाजवून ) गप्पा सुरु केल्या, कि किमान तास दीड तास तरी बैठक रंगणार हे आम्हाला समजायचे. ( मी गुरववाडीत कधी गेलो नाही. पण सोनवड्यातल्या ह्या सगळ्यांची आठवण आली कि मला माडगूळकरांच्या बनगरवाडीतल्या अंजी, आयबु , दादू आणि बालट्या ह्या व्यक्तिरेखांची आठवण होते ) कमुताईंना गुरव-वाडीतल्या ह्या मंडळींची (किंवा who's who) कौटुंबिक माहिती देखील खूप होती, त्यामुळे कुणाची अगदी हैराणगत जरी असली, तरी चर्चा पुढे रंगायचीच. कमरेला विळा लटकवलेला शंकर गुरव दुसऱ्या दिवशी कमूताईंसाठी झाडावरून फणस उतरवायचा वायदा करी. आम्ही हुंबैहुन आणलेली विड्याची पाने 'लावायला' कधी शिरू मास्तर, पाटील डाक्टर, बंडूदादा पित्रे येत आणि पुढच्या पडवीत आजोबांबरोबर गप्पांचा फड जमवीत. ( जणू काही अंतू बर्व्याचा दरबारच !!). Golden days indeed..!!
संध्याकाळी आईबरोबर तर कधी आजोबांबरोबर आम्ही मुले गावात पसाऱ्याला जायचो. त्याची मुख्य ठिकाणे म्हणजे जांभ्या दगडाचे विठोबाचे देऊळ, त्याच्या समोर असलेले शाळेचे लाल मातीचे पटान्गण, दगडी पायऱ्या असलेले तुकाराम सनगऱ्याचे दुकान, घडघडी नदी, त्यापलीकडचा चिंचेचा पार आणि एस टी जाण्यासाठी केलेल्या डांबरी रस्त्याच्या पलीकडचा छोटासा डोंगर!! हल्लीच्या आधुनिक भाषेत सांगायचं तर स्वतःचे coordinatesविसरायला होतील, अशी ही ठिकाणे होती. शाळेच्या पटांगणात एक बकुळीचे झाड होते. त्याची फुले वेचताना आई अक्षरशः हरखून जायची. माहेरपणाचे तेज त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर झळकत असे. तिच्या हालचालींत कमालीचा सराईतपणा असे. सकाळ-संध्याकाळ आईची आम्हा मुलांना ताकीद असायची, ती म्हणजे ... "वईमध्ये आणि करंदाच्या जाळीत हात घालायचा नाही हं ". आमच्यासारखीच प्रत्येक घरात उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले राह्यला आलेली असायची, त्यांच्याबरोबर रात्रदिवस खेळणं हाच आमचा उद्योग असे. गावातील ( पित्रे , टिकेकर, दीक्षित, पुरोहित, भोपटकर) आदी काही निवडक कुटुंबांबरोबर आमच्या आजीचा पूर्वापार घरोबा होता, त्यांच्याकडे आई आम्हाला घेऊन जाई. आम्हा मुलांसाठी तिकडे काहीं ना काही कौतुकाचा खाऊ मिळेच. आज 'कमू येणार भेटायला' म्हणून शेजारच्या लिलाकाकू, दीक्षितकाकू, देवळातल्या ताई, दुर्गामावशी पण वाट पाहत असायच्या. कोकणातले अगत्य आणि माया अनुभवायला मिळायची. त्यांच्या गप्पा ऐकल्यावर सगळ्या सोनवड्याची बित्तम्बातमी आम्हाला मिळायची. गावातली खास गुपिते कमूताईंच्या अगदी जवळ जाऊन ठेवणीतल्या आवाजात सांगितली जात. ह्या सगळ्या आजांना माझ्या आईशी दिलखुलास गप्पा मारायला आवडायचे ह्यामध्येच माझ्या आईचा मोठेपणा दडलेला आहे असं मला वाटतं. शहरात राहून चार पैसे हातात खेळू लागले कि बायकामाणसांच्या वागण्याबोलण्यात लगेच परकेपणा येतो .......आमच्या आईचं तसं नव्हतं !!
गावातली पालखी, घडघडी नदीतली रहाटकोंड फुटल्यावर होणारा हाहा:कार, लग्नसराईत नेहमीच तासेवाजन्त्र्याच्या बुंध्यात असणारा आमचा दादामामा, कुणी जेवायला घरी बोलावले कि मेल्याहून मेल्यासारखी होणारी आमची आई, मन्यामामाच्या लहानपणीच्या आठवणी, मधुमामाने (उर्फ मास्तरांनी) नाहक सोडलेली शाळेची नोकरी, दीक्षित काकूंनी केलेली बनू आणि कमूची तुलना, शेजारच्या भिकूकाकांनी ठेवलेले अंगवस्त्र, बाबुकाका दीक्षितांचे साठाव्या वर्षी Overnight लागलेलं सरप्राईज लग्न, कपी आणि कपिला गाय यातील फरक न कळल्यामुळे उडालेला एका कीर्तनकाराचा गोंधळ, इब्लिस गोपाळमास्तरांच्या गरीब जावयाच्या गोष्टी, राधाकाकूंच्या बाळकृष्णदादांचे मांडीत डग्गा ठेवून केलेले तबलावादन. अनंत पुरोहित ह्यांचे विनोदी गर्भादान, वडील गेले तेव्हा विकृत गावकऱ्यांनी लपून केलेली मिट्ट काळोखातील कोल्हेकुई, एका कुठल्याश्या अर्क म्हातारीची दादामामाने जिरवलेली खोड, अशा एक ना अनेक सोनवड्याच्या मनोरंजक कहाण्या माझी आई आमच्या मोठेपणी देखील सांगायची. आमच्या लहानपणी शौर्याचा आदर्श हा भगतसिंग नाही, तर सोनवड्याचा गोविंद गोसावी होता. त्याच्या शौर्याच्या कथा आईने आमच्या मनावर इतक्या बिंबवल्या होत्या, कि विचारू नका. हा मनुष्य सोनवी आणि घडघडी नदीला पूर आलेला असताना भोवऱ्यात उडी टाकायचा, बिळात हात घालून साप बाहेर काढून मारायचा वगैरे. ह्याचे स्लिव्हलेस बंडी आणि लंगोटी घातलेले सुभग दर्शन आम्हाला एकदाच झाले होते. पण त्यानंतर तरुण वयातच हा शूरवीर उंच झाडावर चढण्याचे धाडस करताना मेला, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटले. ह्या सगळ्या आजोळच्या 'सत्यकथा' आमच्या आईच्या जाण्याबरोबरच विरल्या. मला वाटतं ह्या गोष्टी आम्हाला सांगून आई तिच्या लहानपणीचे स्मरणरंजन करीत असे.
संगमेश्वरजवळच माभळ्यात राहणाऱ्या तिच्या सख्ख्या मामांचे आणि मामींचे देखील आईला विशेष प्रेम होते. दर सोनावड्याच्या मुक्कामात आमची चक्कर माभळ्यात असायचीच. अगदी काही नाही तर दुसऱ्या दिवशी रत्नागिरी ठाणे भिवंडी ही एस टी बस पकडायला तरी आम्ही आदल्या दिवशी तरी त्यांच्याकडे मुक्कामाला जायचोच. आमचे मामाआजोबा म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचलेले !!. मला त्यांच्यामध्ये आणि लाल बहादूर शास्त्रींमध्ये खूप साम्य वाटायचे. मनापासून काही श्रवण करताना शेवटची तीन बोटे मुडपून तर्जनी गालावर ठेवण्याची त्यांची ढब देखील शास्त्रीन्सारखीच होती. एव्हढा शांतपणा आणि कदाचित विरक्ती मी आतापर्यंत कुठेही पाहिलेली नाही. एव्हढे करून कर्तव्याला ते कधीही चुकले नाहीत. ह्या तिघांच्या घरगुती गप्पा ऐकायला खूप मजा यायची. नंतर नंतर हे दोघे सातारला श्रीराम मामाकडे आल्यावर तिथेही आमच्या भेटीगाठी झाल्या आहेत काही वेळा. त्यामुळे श्रीराम मामा-मामी यांचे आणि आमचेही खूप जिव्हाळ्याचे संबंध राहिले आणि अजूनही आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही १९७५ साली गिरगांवातून ठाण्याला थोड्या मोठ्या जागेत राहिला आलो खरे, पण दैवयोग काही वेगळाच होता. बाबांना ठाण्याची हवा अजिबात मानवली नाही. आम्ही मे महिन्यात राहायला आलो आणि जुलै मध्ये बाबांना दम्याच्या विकाराचा त्रास जोरात सुरु झाला. साधारण पहाटे ५ च्या सुमारास त्यांना त्रास सुरु व्हायचा. ते बिचारे आम्हाला त्रास नको म्हणून कोणालाच उठवायचे नाहीत. पण त्यांना लागलेल्या श्वासाने सगळ्यांना ६ पर्यंत जाग यायचीच. माझा सकाळी ७ वाजता क्लास असायचा. मी उठल्याबरोबर लगेच डॉक्टर वैद्यांना सव्वा सहाला घरी घेऊन यायचो. डेरिफायलिनचे इंजेक्शन दिले जायचे. बाबांचा श्वास आटोक्यात यायचा आणि मग मी क्लासला जात असे. हा त्रास बाबांना ४ महिने झाला आणि त्यांचे वजन १६० पौंड वरून ११० पौंडावर आले. हे खरोखरच मोठे गंडांतर होते बाबांवर !! बाबांची तब्येत व्यायामाची असल्यानेच ते ह्या आक्रमणातून तरले. अर्थात ईश्वरकृपा तर आहेच !!. पण आई ह्या सगळ्या प्रकाराने अगदी हादरून गेली. ( 'धनी असावा वाघावानी...' अशी कुठल्याही सौभाग्यवतीची अपेक्षा असणारच. पण तिला आता सुरुंग लागला होता .. ). सुदैवाने वर्षभरात आम्हांला एक चांगले आयुर्वेदिक वैद्य भेटले. त्यांनी बाबांची नाडीपरीक्षा करून औषध आणि पथ्ये लिहून दिली. खाण्याजेवणातली बाबांची सगळी पथ्ये आईने अतिशय काटेखोरपणे अमलात आणली. आणि बाबा पुन्हा एकदा नव्या दमाने नोकरीसाठी उभे राहिले. त्यांची साठवून ठेवलेली ६ महिन्यांची PL संपली होती. त्यांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढण्याचे काम मानसकर वैद्य आणि आईने केले होते. पण आईला वास्तवाने कठोर दर्शन दिले होते. ही पुढे येऊ घातलेल्या कुठल्या संकटाची चाहूल तर नाही ना, अशी पाल तिच्या मनात चुकचुकली असावी. तिने वेळ न दवडता मुलुंडला ४-५ ट्युशन्स धरल्या. सुदैवाने पुढे ३-४ वर्षात विद्याताई बी. कॉम. होऊन रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागली. मलाही इंजिनीरिंगला ऍडमिशन मिळाली होती. ह्यामुळे आईबाबांच्या डोक्यावरचा बराच ताण कमी झाला असावा. बिचार्या ताईने स्वतःची काहीही हौस मौज न करता तिच्या लग्नाचे सगळे पैसे उभे केले. १९८३ साली उत्तम स्थळ मिळून तिचे लग्न झाले. तिच्या जन्मानंतर जी काही शुश्रूषा आईच्या हातून घडली होती, त्याचे तिने एका परीने पांग फेडले असं म्हणता येईल. पण ह्या ८ वर्षात बाबांच्या आजारपणामुळे आईबाबांना खूप ताणतणाव सोसावे लागले, कारण दर पावसाळ्यात बाबांना थोडा का होईना, पण दम्याचा त्रास व्हायचाच. १९८४ मध्ये मला इंजिनीरिंगची डिग्री मिळाली आणि मी नोकरीला लागलो.
तत्पूर्वी १९८३ मध्ये वर्तमानपत्रात एक जाहीरात आली होती. त्यामध्ये ज्या महिलांना external BA करायचं असेल , त्यांच्यासाठी मो. ह. विद्यालयात विशेष वर्ग चालू होणार होते. आईचे लक्ष ह्या जाहिरातीने वेधले. शिक्षणाची ज्योत अजूनही तिच्या मनात तेवत असणार. SSC झाल्यावर थोडे किलकिले झालेले शिक्षणाचे दार तिला पूर्ण उघडायचे होते. तिने बाबांना आणि मला विचारून ह्या वर्गांसाठी प्रवेश घेतला. आम्हाला तिच्या जिगरीचे कौतुक वाटले. हे क्लासेस घेणार होते शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले वि. रा.परांजपे सर ( म्हणजे खासदार कै प्रकाश परांजपे यांचे वडील!). सौ. विद्याताई फॉर्म भरायला आईबरोबर गेली होती. पहिला क्लास अटेंड केल्यावर आईने BA (मराठी) पूर्ण करण्याचा चंगच बांधला. आता घरात लहान मूल वगैरे नव्हते. ताईचे लग्न नुकतेच झालेले होते. मी होस्टेलला असायचो. बाबा रिटायर व्हायला अजून ६ वर्षे अवकाश होता. आई घरी एकटीच असल्याने तिला एक वेळ घालवण्याचे चांगले साधन हवेच होते. पण वेळ जाण्यासाठी एखादी गृहिणी BA करेल का ..?? ह्या अभ्यासक्रमात भाषाशास्त्र, काव्यशास्त्र असे काही क्लिष्ट विषय होते. पण आई मोठ्या चिकाटीने ते शिकली. मला वाटतं अण्णाभाऊ साठ्यांची 'फकिरा' ही कादंबरी अभ्यासासाठी होती. सिलॅबसमध्ये असलेलं जगन्नाथ पंडितांचे 'गंगालहरी'चे भाषांतर तिला आमच्या विद्याताईनेच समजावून सांगितले होते. ह्या वयात तिला क्लासला जाणाऱ्या आणि जवळ राहणाऱ्या काही मैत्रिणीही मिळाल्या होत्या. सलग ३ वर्षाच्या मेहनतीनंतर आमची आई वयाच्या ५१ व्या वर्षी आई BA झाली. पुष्कळ वर्षांपासूनचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. तिची learning curve खाली यायला लागल्यानंतर हा पराक्रम तिने केला होता, म्हणून ते जास्त कौतुकास्पद होते. मी, बाबा आणि ताईने कौतुक केले. पण अन्य जनांकडूनही ते झाले असते तर चार चांद लागले असते. (त्यासाठी तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती चांगली लागते. आईची तशी नव्हती, हे आमच्या एक निकटवर्ती विदुषी डॉ. विजयाताई टिळक यांनी तिची पत्रिका दाखवल्यावर मला सांगितले. हा लेख ९५ टक्के लिहून झाल्यावर मला कुठेतरी बासनात असलेली आईची पत्रिका मिळाली. ती मी व्हाट्सएप्पवर त्वरित टिळक काकूंना पाठवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काकूंनी १५ मिनिटात जे पत्रिकेचे रिडींग केले, त्यातील ८५ टक्के निष्कर्ष ह्या लेखांत मौजुद आहेत. काकू म्हणतात "तिच्या पत्रिकेवर शनी, राहू आणि केतूची नजर होती. नाहीतर ह्या पत्रिकेत पंचमहायोग होता ....). आईला बुद्धी चांगली होती. फक्त संधी न मिळाल्याने तिला पैलू पडले नव्हते. पण BA झाल्याने तिला एक कायमचे समाधान मिळालं होतं.
आईचे मराठी वाचन चांगल्यापैकी होते. ययाती, मृत्युंजय ,स्वामी, बंध-अनुबंध ,स्नेहांकिता, आहे मनोहर तरी, हृदयस्थ, दीपस्तंभ, किरण बेदींचं 'आय डेअर', मालतीबाई बेडेकर यांचे साहित्य अशी मराठीतली अनेक उत्तमोत्तम पुस्तके तिने वाचलेली होती. आईची बोलण्याची भाषा अलंकारिक नव्हती. पण बोलताना अनेक कोकणी म्हणी आणि वाक्प्रचार ती सहजपणे वापरायची. ह्यातील काही निवडक मी मुद्दाम इथे उद्धृत करतो आहे :
"लाखे लीपडा मणी नाही, लंकेची पार्वती, रामा शिवा गोविंदा , बासनात गुंडाळून ठेवलंय , घमशन , मानेची माती खाणे ,अदमास पंचे, मेणचटलेले , तर्कट्या , वायंडा जाणे , अवकलनी काय आहे , मूग गिळून बसणे , तोंडाला कुत्रं बांधलंय, एखादी बाई मलपतेय , भलतुकडी , डोक्याला काणेर करणे , शुभ बोल रे नाऱ्या, आकरमाशी, प्राण कंठाशी आणणे, सोमन्या बुरंबाडासनं जाऊन आला, नोकाला रे नोकाला, टेकीला येणे , कैदाशिण, तोंडाला कुत्रं बांधलय, घायकुतील येणे, मंत्रचळ्या (fetish), उमाऱ्या पामाऱ्याने बोलणे, निकरंगीला येणे, हेलिलवाणा, लग्न नाही झाले म्हणजे मांडवाखालून गेली नाही का ??, देखल्या देवा दंडवत, माझ्याशी हाय ते राजाशी नाय, दार्ष्टास दैवत भिते, पहिल्या घोवा तूच बरा, हकाबका होणे, नथीतून बार मारणे, लाजेने चुर होणे, खेळ खंडोबा होणे, पाचावर धारण बसणे, पाचवीच्या घुघऱ्या खाणे , लाघवी असणे , चावरे बोकरे होणे, सगळं मुसळ केरात, दर्या में खसखस, टाके ढिले होणे, ये रे माझ्या मागल्या, वेळेवर वेळ आणि शिमग्यावर खेळ, द्रव्यनिशी मोकळा, रिकामा न्हावी.... , अधेल्यावर धोपटा कोणीही घालेल , कुची रोटी-कुची लंगोटी , नारे नाचवणे.... वगैरे " !!
आणखी देखील पुष्कळ आहेत.( ह्यामध्ये काही अर्वाच्य कोकणी म्हणी नाहीयेत हे चतुर मंडळींना समजले असेल 😅). वरील सर्व म्हणी सर्रास वापरणारी व्यक्ती कोकणातील आहे हे सांगावे लागेल का ..??
आईला संगीताचीही चांगली आवड होती. जुनी लताबाईंची गाणी ( जशी 'हृदयी जागा , गंगा जमुना, प्रतिमा उरी धरोनि .... ) आई गोड स्वरात म्हणत असे. तिच्यामुळेच मला ह्या गाण्यांचे एक्सपोजर मिळाले. त्यामुळेच कि काय, पण १९८४ मध्ये अशा २४ गाण्यांचा कार्यक्रम मी दोन उत्तम गाणाऱ्या स्थानिक गायिकांना घेऊन आय. आय. टी. त केला होता ( जो 'हाऊसफुल' गेला ). तसेच पेटीवादनाची आवडही आईनेच मला लावली. ८०-८१ च्या काळात रेडिओवरील सोलो हार्मोनिअम वादनाचे कार्यक्रम ती मला ऐकवीत असे. पेटीबरोबर मला गाण्याचेही चांगले आहे हे तिने ३०-३२ वर्षांपूर्वीच सांगितले होते. (Which eventually became true !!) शास्त्रीय संगीतात तिचे सगळ्यात आवडते गायक पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं जसराज !! त्यांच्या ३-४ प्रत्यक्ष मैफिलीना मी आई-बाबांना घेऊन गेलो होतो. आम्हां दोन्ही भावंडांकडे आलेले संगीत हे आईकडून आहे हे वेगळे सांगायची जरूर नाही. दुर्दैवाने ती लवकर गेल्यामुळे माझ्या पेटीवादनाचा एकही कार्यक्रम आई ऐकू शकली नाही.😢 तिचे आवडते वक्ते म्हणजे पुलं (तिचं दैवत) , प्रा. शिवाजीराव भोसले, कवी शंकर वैद्य, कवी मंगेश पाडगावकर, सुरेशशास्त्री शेवडे आणि आवडते अभिनेते/अभिनेत्री प्रभाकर पणशीकर, सतीश दुभाषी, डॉ लागू, भक्ती बर्वे, डॉ काशिनाथ घाणेकर. निवृत्तीनंतर आईबाबांनी नौपाड्यातील एक सिनिअर सिटीझन क्लब जॉईन केला होता. तिथे ती दोघंही आवडीने जात. आमची आई तर काही लिहिण्याच्या बोलण्याच्या स्पर्धेतही भाग घ्यायची. तिची काही हस्तलिखिते आणि पत्रे मी अजूनही जपून ठेवली आहेत. त्यामध्ये तिची श्रद्धास्थाने आणि अनुभवाने तयार झालेले व्यावहारिक तत्वज्ञान वाचायला मिळते.
पाकशास्त्राच्या दुनियेत माझी आई ही किराण्या घराण्यातील गायकांसारखी होती........!!
माझी आई कधीही आणि कुणाशीही खोटं बोलली नाही. त्यामुळे वेळ आली, तरी सत्य लपवणे तिला कधीच जमले नाही. थोडीशी स्पष्टवक्तीही म्हणता येईल. ( खरेपणा हा सर्वच पुरोहितांचा सद्गुण होता. पण सुनीताबाईंनी म्हटल्याप्रमाणे "स्पष्टवक्तेपणा हा सद्गुण आणि दुर्गुण ह्यांच्या सरहद्दीवर वस्तीला असतो" ). आई खूप प्रेमळ व संवेदनशील होती, पण थोडीफार रागीटही देखील होती. आईचा स्वभाव फार मानी नव्हता, पण स्वाभिमानी मात्र होता. (हे फक्त माझे निरीक्षण सांगते. बाकीच्यांचे मत वेगळे असू शकते !! ). अध्येमध्ये आईचा थोडाफार वादावादी करण्याचाही स्वभाव होता. After her age of 50, she never used to take anything lying down. (Perhaps she became more confident than before.....!!) तिच्याकडे संवाद साधण्याची कला नव्हती. त्यातून क्वचित पेचप्रसंग निर्माण होई. प्रसंगी मला किंवा बाबांना intervene करावे लागे. पण ह्यातली कुठलीच गोष्ट तिने स्वतःच्या कर्तव्यदक्षतेच्या आड येऊ दिली नाही. मी भास्कर कॉलनीत आई बाबांबरोबर राहायला होतो, तेव्हा मला एकदाही असे स्मरत नाही कि, आई कधी माझ्या आधी जेवलेय. तिने घरात कुठलाही पदार्थ स्वतःला आवडतो म्हणून कधी केला नाही. ह्यावरून तिच्या निस्वार्थी स्वभावाची कल्पना यावी ....... !!
मी नोकरीला लागल्यावर माझा सहवास आईला पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही. शिक्षणासाठी मी ५ वर्षे पवईला हॉस्टेलला राहायला होतो ( १९७९-१९८४). फक्त विकेंड आणि सुट्टीच्या वेळी घरी असायचो. नंतर २ वर्षे मी नोकरीनिमित्त मद्रास-बंगलोर येथे होतो ( १९८६-१९८८). डिसेंबर १९८८ मध्ये आईला रेल्वेचा ब्रिज चढताना थोडा श्वास लागला आणि निदानात mild angina निघाला. त्यावेळी अँजिओप्लास्टीचे फ्याड नव्हते. गोळ्यांवरच निभावले. पण आमची आई आजारपणाला खूप घाबरायची, त्यामुळे तिला ह्या काळात नैराश्याने ग्रासले. निदान ३-४ महिने कॉटवर ती बसून असायची. तेव्हा ती ५३ वर्षांची होती. मी कंपनीकडून ताबडतोब मुंबईला ट्रान्स्फर करून घेतली . ह्या काळात सातारची माझी सक्खी आत्या आमच्याकडे मदतीला धावून आली. तसेच माझी मावशीही आईला बूस्ट करायला आठवडाभर घरी राहायला आली होती. जवळच राहणारी माझी सख्खी चुलत बहीण 'मेघा' ही सातत्याने आमच्या घरी पोळ्या-भाकऱ्या करायला येऊन जायची. आमच्या मनोहरमामाचा पण भक्कम आधार आम्हाला होता. स्वतःच्या व्यापातून वेळ काढून मुद्दाम अंधेरीहून तो आईला भेटायला ठाण्याला येत असे. ह्या सर्वांचे उपकार मला विसरणे शक्य नाही. त्या काळात depression हा शब्द देखील कुणाला माहित नव्हता. त्यामुळे नीट उपाय देखील होऊ शकला नव्हता. माझे लग्न झाल्यावर १९९०-९१-९२ मध्ये आम्ही नोकरीनिमित्त पुण्याला होतो. तेव्हा आईबाबा येऊन जाऊन असायचे. २००४ आईबाबा माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायला आले. पण २००५ मध्ये मी दीर्घ मुदतीसाठी दुबईला गेलो आणि तिथून आईचे नष्टचर्य सुरु झाले (आणि पर्यायाने आमचे...). २००६ मध्ये तिला Lymphoma च्या आजाराने गाठले. रोगाचे निदान व्हायला खूप विलंब लागला. मी दुबईला होतो. जेव्हा ही धक्कादायक बातमी मला कळली, तेव्हा मी संध्याकाळी walk घेत होतो. बातमी ऐकून २ मिनिटे माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि मी एका ठिकाणी जाऊन बसलो. अर्थात लगेच emergency रजा घेऊन ठाण्याला आलो. आईला काय झालंय हे कुणी तिला सांगितलं नव्हतं, कारण ती खूप घाबरट आणि संवेदनशील होती. ते काम वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मला करावं लागलं. रोगाचे नाव ऐकल्यावर आई कोसळली, पण १ दिवसात सावरली. ६ केमो द्याव्या लागल्या. By GOD's grace, we could give her best of the available treatment. मी इथे नसल्याने हे सर्व अग्निदिव्य अतिशय धैर्याने माझी पत्नी सुचित्राने पार पाडलं. प्रत्येक केमोला माझी बहीण विद्याताई हातातले काम टाकून पुण्याहून मुद्दाम यायची. विशेष करून आईच्या मनोधैर्यासाठी ताईचा खूप उपयोग झाला. सुचित्रालाही खूप मदत झाली. ती इथे आईजवळ असताना तिच्या १८ वर्षाच्या मुलीने (अमृताने) त्यांचे सर्व घर सांभाळले. तसेच ताईच्या मिस्टरांचाही तिला खूप सपोर्ट मिळाला. एका परीनं बघायला गेलो तर आईने माझ्याकडून direct सेवा करून घेतली नाही. पण मी काय करेन, अशी सेवा स्वतःचे देहभान विसरून सुचित्रानं व ताईनं केली आणि आईला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. (ह्या जन्मी माझ्या पत्नीचे हे मोठेच ऋण माझ्यावर आहे). हे झाल्यावर जेमतेम ६ महिने झाले नाहीत, तोच जूलै २००७ मध्ये एका मोठ्या ऑपरेशनचे निमित्त होऊन बाबा निवर्तले. आईला हा प्रचंड धक्का होता. मी बरेच वेळा तिला आणि पत्नी-मुलगा यांना भेटायला दर ३ महिन्यांनी यायचो. या दरम्यान आईचा सहवास सुचित्रा आणि विभवला खूप घडला. त्यामुळे काही आईविषयीच्या गोष्टी मला माहिती नाहीत, पण त्या आई सुचित्राला नि:संकोचपणे सगळं सांगायची. तिच्या सांगण्यावरून मी तिला एक छोटी पेटीही आणली होती. म्हणजे तिला पेटी धरून गावेसेही वाटत होते. (अजून एक अधुरे स्वप्न !!) आईला Little Champions चे पंचक आवडायचे म्हणून त्याची एक DVD पण मी आणून दिली होती. साधारण बरी झाल्यावर ती २ महिने ताईकडे पुण्याला राहायला गेली होती. ती काय सांगेल ते ताई खायला जेवायला करायची. तेव्हढेच ताईला समाधान मिळाले. कारण पुढे काही वेगळंच वाढून ठेवलेलं होतं ..... दीड वर्ष बरं गेलं आणि आईला कॅन्सरचा relapse आला. हे केव्हातरी पुन्हा उद्भवणार ह्याची मला अटकळ होतीच. पुन्हा एकदा युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. ही फक्त आईचीच नाही तर माझ्या पत्नीचीही सत्व परीक्षा होती. यावेळी जुपीटरला जाऊन रेडिएशन पण द्यावी लागली. आई भित्री असल्याने 'रेडिएशन झोन' मध्ये सुचित्रा डॉक्टरांसोबत आईला काचेतून दिसेल अशा बेताने बसायची. PET स्कॅन असेल तर २८ किलोचे चिलखत घालून बसावे लागे. एक दिवस आमच्या घरी मी मुद्दाम आईबरोबर तिच्याच बेडवर झोपून तासभर गप्पा मारल्या. आम्ही दोघंही थोडा वेळ भावविवश झालो होतो. आमच्या हातून जी काही अल्प सेवा घडत होती, त्याबद्दल पूर्ण समाधानी असल्याचे ती म्हणाली). पण यावेळी स्प्रेड बरेच ठिकाणी होता. आईचा मृत्यू लांबणीवर टाकणे एव्हढेच सगळ्यांचे ध्येय होते. असे असले तरी, आईची जगण्याची इच्छा अबाधित होती. मला वाटतं तिला नातवंडांची पुढची प्रगती बघायची असावी. पण किडन्या काम करेनाश्या झाल्या. शेवटच्या संग्रामासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायच्या दिवशी ऍम्ब्युलन्समध्ये असताना आईने विद्याताईला प्रश्न विचारला " विद्या, मी ह्यातून बाहेर पडेन का गं ??". म्हणजे तिची बिजिगीषु वृत्ती अजून शाबूत होती. पण दुर्दैवाने त्याच दिवशी १७ डिसेंबर २००९ रोजी रात्री एका निसटत्या क्षणी वयाच्या ७४ व्या वर्षी आईचे प्राणोत्क्रमण झाले. तेव्हा जवळ फक्त मी होतो. जाताना कुठल्याही प्रकारचे हुं किंवा चुं न करता ती शांतपणे गेली. मला आयुष्यात प्रथमच इतके निराधार वाटले.......!!
ह्या माझ्या मत्प्रिय आईला माझे कोटी कोटी प्रणाम !!🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸
ले : विकास जगन्नाथ कात्रे , ठाणे
भ्रमणध्वनी : ९८३३६१०८७५
*************************************************************************************************************************************************
विशेष आभार : हा लेख सर्व दृष्टीने पूर्ण होण्यासाठी माझी बहीण सौ. मुग्धा पाध्ये (विद्याताई) हिचा, माझे मामा श्री मनोहर पुरोहित आणि विजूमामी यांचा खूप हातभार लागला. कलासाहित्यातील माझ्या मार्गदर्शिका आणि उत्प्रेरक विदुषी प्राध्यापिका डॉ. विजया टिळक यांनी नेहमीप्रमाणेच लेखनाच्या योग्यायोग्यतेविषयी केलेलं मार्गदर्शन अत्यंत बहुमोल आहे. मुझिकॉलॉजिस्ट सौ. माधवी कौलगी यांनी ५ मिनिटात ४ फोटोंचे कोलाज करून माझं काम अधिक सोपं केलं. ब्लॉगच्या संदर्भात माझ्या पत्नीचे आणि मुलगा विभव यांचे सहकार्य मला नेहमीच लाभते. ह्या सगळ्यांचे मनापासून आभार !! 🙏
*************************************************************************************************************************************************
7.
अप्रतिम लेखन,विकास as always.
ReplyDeleteलेख मोठा असुन ही flow अबाधित राहीलाय.
तुझ्या sketches सारखेच detailing असलेले समर्पक शब्दाकृतीपुर्ण सुंदर शब्दचित्र रेखाटले आहेस...असे वर्णन करेन मी.
आईच्या कलाकृतींचा कोलाज करुन, माझा खारीचा वाटा देऊ शकले याबद्दल मीच तुझे आभार मानते.
This is the best of all कवडसे So far.
🙏🌷🙏
माधवी, त्वरित दिलेल्या प्रांजळ अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद !! Your collage work was a priceless help.....
Deleteकाका, लेख नेहमप्रमाणेच अप्रतिम लिहीला आहेस. तुझ्या ह्या detailed article मार्फत मला धाकट्या काकुचे अनेक पैलू समजले. मी लहान असताना माझ्या आई ने अनेक वेळा लोकांना (तिच्या माहेरी व मैत्रिणींना) काकु ने लग्नानंतर BA पूर्ण केले हे सांगितल्याचे आठवते. आई ची पण ती आवडती होती. आमचं कुटुंब आणि धाकटे काका - काकू एकाच चाळीत राहत असल्यामुळे अमचा चांगला संपर्क होता . आई सांगते की माझ्या धाकट्या बहिणीचा जन्म झाल्यावर आई hospital मधुन घरी आल्यावर धाकट्या काकु कडून रोज संध्याकाळी वेगवेगळा नाश्ता यायचा. आई ला जेवल्यावर ताक प्यायची सवय व आवड म्हणून धाकटी काकु तिला अपल्या रोजच्या जेवणातले ताक थोडे कोमट करून देत . पहिल्या मजल्यावरील कधी काकुच्या घरी आई चा काही निरोप सांगायला गेल्यावर काकु नेहमी काहीतरी हातावर घाली... Most of the time it used to be some form of sweet... कधी गाजराची वडी, कधी सुंठेची वडी तर कधी ओल्या नारळाची वडी. काकु चे one room kitchen घर फोटो काढण्यासारखे होते ... कॉटवरची चादर देखील इस्त्रिकेल्यागत असायची . धाकटी काकु was known for her tidiness and straightforward nature. तीला कऱ्हाडे community बद्दल विशेष अभिमान होता . कौन बनेगा करोडपती मध्ये हर्षवर्धन नवाथे हा पहिला करोडपती झाल्यावर जेव्हा आम्हाला काकु ठाण्यातील स्वीट कॉर्नर जवळ भेटली होती तेव्हा तिने माझ्या आई चा हात हाती घेऊन अभिनंदन केले होते व हसत कौतुकाने म्हणाली होती "शैला ... आपला क्रहाडा आला ग "..माझ्या स्मरणात धाकट्या काकुचा सुंदर नाजूक चेहरा लक्षात आहे.. नंतरच्या काळात तिच्या आजारपणात मी आई बरोबर मुद्दाम तिला बघायला गेले न्हवते.... मला तिची अवस्था / रूप बघवल नसतं 😟. त्यामुळे माझ्या स्मरणात अमच्या धाकट्या काकुचे सुंदर रूप च आहे ... तिच्या तोंडी अनेकवेळा येणारे शब्द म्हणजे अगो बाई, कमाल आहे व असे म्हणताना ती तोंडावर हात घेई . ऑफ व्हाईट रंगला ती half white म्हणे ... तिचा कलकत्ता साडी collection , सणासुदीला puresilk साडी collection चांगले च स्मरणात आहे. शक्यतो हलके रंग... सोबर डिझाईन अवडे. आज ती जरी नसली तरी तिचे आशीर्वाद सदैव तिच्या कुटुंबियांवर आहेत. तिला भावपूर्ण आदरांजली 🙏🌸.
ReplyDelete