****************************************************
चाळीस एक वर्षांपूर्वी
आपल्याकडे 'समांतर सिनेमा'ची चळवळ सुरु
झाली होती, ज्यामध्ये सत्यजित रे, श्याम बेनेगल
, गोविंद निहलानी, मृणाल सेन, गिरीश कर्नाड वगैरे
निर्माते -दिग्दर्शक अग्रणी होते. हिंदी सिनेसृष्टीच्या एरवीच्या मनोरंजक अभिरुचीला छेद देऊन मानवी
स्वभावाचे, वृत्तींचे, सामाजिक जीवनाचे वास्तववादी
चित्रण ह्या सिनेमांमध्ये
असायचे. शेवट बहुधा रडकाच
असायचा. अंकुर, आक्रोश , चक्र, अर्धसत्य अशी तीस चाळीस
चित्रपटांची नावे सहज देता
येतील. ह्या चित्रपटांमधून गिरीश
कर्नाड, शबाना, स्मिता पाटील, ओम पुरी, नासिरुद्दीन
शाह वगैरे अभिनेते मंडळी एकदम प्रकाशझोतात आल्याचे
माझ्या पिढीतील मंडळींना तरी नक्की आठवत
असेल.
असाच
एक ‘वास्तववादी’ विषयावरचा 'कोर्ट' हा सिनेमा मी
एक महिन्यापूर्वी पाहिला ( ह्याला कारण होते त्यामध्ये
नारायण कांबळेंची भूमिका साकारणाऱ्या ‘वीरा साथीदार’ ह्या
कार्यकर्त्या अभिनेत्याचे अलीकडेच झालेले
आकस्मिक निधन !! ). २०१४ मध्ये हा
सिनेमा गाजला होता. एक प्रयोग म्हणून
लेखक दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा हट्टच होता कि एकही
सेलेब्रिटी अभिनेता न घेता चित्रपट
यशस्वी करून दाखवायचा. ह्या
प्रयोगात खरोखरच त्यांना घवघवीत यश मिळाले. कोर्टाची
पायरी 'न' चढताच कोर्टाचा
चांगलाच अनुभव ताम्हाणेंनी रसिकांना दिला. सप्टेंबर २०२० मध्ये करोनाच्या
काळात प्रकाशित झालेला ‘द डिसायपल’ हा असाच एक
(शास्त्रीय) संगीत दुनियेतील जुने - नवीन कठोर वास्तव
चित्रित करणारा मराठी चित्रपट आहे. ह्यामध्येही कुणीही
प्रसिद्ध नट-नट्या न
घेता, महाराष्ट्राच्या शास्त्रीय संगीत विश्वात आघाडीवर असणाऱ्या संगीत कलाकारांना अभिनयाची संधी देऊन ताम्हाणेनी
अजून एक धाडसी पाऊल
उचलले आहे. त्यामध्ये ते
यशस्वीही झाले आहेत. अलीकडे
नेटफ्लिक्सवर प्रकाशित झाला आणि हां
हां म्हणता व्हायरलही झाला. गेल्या वर्षी पॅरिसमधून पासलीभर पारितोषिके घेऊन येणाऱ्या ह्या
चित्रपटाला सध्या बऱ्या वाईट प्रतिक्रियांचा सामना
करावा लागत आहे. मी
काही सिनेमा क्षेत्रातला दर्दी नाही. पण एक रसिक
म्हणून हा चित्रपट बघताना
काही गोष्टी जाणवल्या, त्याबद्दल व्यक्त व्हावेसे वाटले……!!
ह्या
चित्रपटात बर्याचश्या गोष्टी खरोखरच प्रत्यक्ष घडल्या असाव्यात अशा पद्धतीने दाखविल्या
आहेत. त्या मला खूप
भावल्या. ओळखीचे अभिनेते नसल्यामुळे परिणाम अधिक साधलाय असेही
म्हणता येईल. चित्रपटातील मूळ व्यक्तिरेखाही कुणी
प्रसिद्ध नाहीत, हे पण एक
प्रकारे बरे झाले. ( नाहीतर
बाजीरावाच्या भूमिकेत रणबीरसिंगला बघताना किंवा अक्कलकोट स्वामींच्या भूमिकेत मोहन जोशी बघताना
काहींना त्रास झाला, तसा झाला असता.
सिनेमा बघितल्यानंतर ' ॐ
अभयदाता.... ' हा
स्वामींचा मंत्र म्हणताना कित्येक दिवस माझ्या मन:चक्षुसमोर समोर मोहन जोशींच
यायचे). चित्रित केलेले बरेचसे प्रसंग
शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या हल्लीच्या आणि पूर्वीच्या तरुणांना
कदाचित कमीअधिक प्रमाणात लागू होतील असे
प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. स्टेजवरील तसेच खाजगी मैफिली,
गायनाच्या स्पर्धा अगदी ज्या वातावरणात
होतात तशाच चित्रित केल्यायत.
जवळ जवळ प्रत्येक मैफिलीत
आपण स्वतः श्रोता म्हणून बसलो असून पुढे गायक काय
गाणार ह्याची आपल्याला उत्कंठा वाटणे , हीच त्याची पावती
आहे. ( मी स्वतः शास्त्रीय
गायनाचा विद्यार्थी असल्यामुळे लवकर ‘कनेक्ट’ झालो, असंही असेल कदाचित ).
इतर बरोबरीच्या कलाकारांविषयीची गॉसिप , शरदची दुकानातली झब्बा खरेदी , विनायक सरांची शिकवणी, Organisers attitude
and compulsions, मुकुंदजी
शरदला गाणे शिकवितानाचा प्रसंग,
ते चालू असताना घरामध्ये
गाऊनमधे सहज वावरणाऱ्या शरदच्या
मातोश्रींचा ‘सुट्टीच्या दिवशी शिकवणीला असणारा विरोध’, हे दृश्य अगदी
बेमालूम दाखवलंय. (नाहीतरी मुलाने किंवा मुलीने रियाज केलाच पाहिजे असे सांगणाऱ्या आया
फारश्या माझ्या बघण्यात नाहीत). डायनिंग टेबलवरचा नातू आणि आजी
यांचा संवाद, Franes च्या स्पर्धेतील जजेसची
नवटंकी, चमेली
फुलीच्या वेळी तबलजीची ‘निलाजरी’
नवटंकी आजच्या वास्तवाशी इमान राखणारी होती.
मुलाखतकार
बाईंनी केलेला 'मुकुंदजी’ ह्या शब्दाचा संस्कृतोद्भव उच्चार ऐकून मौज वाटली. पण असं
होतं बरंका ..!! (आमच्या माहितीत वक्तृत्व स्पर्धेला ‘जज्ज’ म्हणून आलेल्या एका सुशिक्षित
बाईंनी वक्तृत्व ह्या शब्दाचा उच्चार भाषणामध्ये 'वकृत्व' असा केलेला स्मरतो). दुर्दैवाने
ह्या उद्विग्न करणाऱ्या गोष्टी कित्येक चॅनेल्स वर आणि प्रत्यक्ष
नित्याने घडताना आपण पाहतो. हल्ली
संगीत शिकणाऱ्या काही मुलांचे आईवडील आणि त्यांचा उद्दामपणा,
Mediaच्या सवंगपणामुळे प्रामाणिक आणि सत्शील कलाकाराची
होणारी गळचेपी, त्यामुळे येणारे frustration आणि अस्थिरता चांगली
दाखवलेय. जीवघेण्या स्पर्धा-युगातील टेक्नोसॅव्ही शरदचे Youtube ब्राउजिंग, फ़ेसबुकचे लाईक्स आणि
कंमेंट्स एकदम 'realistic' दाखवलेत. सगळ्या मैफिलींमधील आणि प्रसंगातील पं.
अरुण द्रविड आणि आघाडीचे युवागायक
श्री आदित्य मोडक ह्यांचे गायन
समयोचित वाटले. नेहमी सुरात गाणाऱ्याला अपरिपक्व
गायकाचे सोंग आणताना ‘कण स्वर’ किंवा चढ्या सुरात गाणे’
हे सुद्धा कठीण जाते. पण
प्रसंगाला अनुसरून आदित्यने ते छान साधलंय.
शुद्ध सारंग ऐकताना त्याचा ‘खरा दर्जा’ दर्दी
लोकांना जाणवला असेल. पं. द्रविड यांनीही
विविध मैफिलीतील तुकड्यांत घराणेदार आणि तालिमबद्ध
गायकीचा नमुना सुरेख पेश करून चित्रपटातील
व्यक्तिरेखेला अभिप्रेत असलेले ‘गुरुत्व’ आणि त्याला साजेसा
'बोज' चांगला व्यक्त केलाय. बुजुर्ग विदुषी माईंचा प्लेबॅक देणाऱ्या आणि अलीकडेच निवर्तलेल्या कै.
सुमित्रा भावेंचा कंपयुक्त आवाज हा देखील
ह्या सिनेमचा USP आहे. त्यांच्या उपदेशात
बरंच काही घेण्यासारखं आणि
शिकण्यासारखं आहे. हे सगळे
साधण्यासाठी बारीक निरीक्षणही हवे आणि ते
प्रसंग उभे करण्यासाठी उत्तम
दिग्दर्शन आणि screenplayer देखील हवा. ह्याचे
श्रेय द्रविड सरांखेरीज दिग्दर्शक ताम्हाणे, तसेच संगीत दिग्दर्शक
पं अनिश प्रधान यांनाही
जाते. शास्त्रीय संगीताच्या प्रांतात आणखी एक सर्रास
आढळणारी गोष्ट सिनेमात चांगली दाखवलेय. म्युझिक कलेक्टर ‘राजन जोशी’ !! त्यांच्याकडे
खूप collection तर आहेच, पण
खूप किस्सेही आहेत. पूर्वीच्या बुजुर्ग गवयांची सगळी अंडीपिल्ली त्यांना
माहित असतात. (रागाचे आरोह अवरोह सोडून
त्यांना सगळं माहिती असतं
). वेळप्रसंगी अब्दुल करीम खां सारख्यांनी
पण त्यांच्याकडून संगीताचे धडे घ्यावेत असा
त्यांचा अविर्भाव आणि एकंदर आत्मविश्वास
असतो. गेल्या ४० वर्षांत असे
भुरटे संगीत-अज्ञ मी पुष्कळ
पाहिलेत. चैतन्य
ताम्हाणे यांनी शास्त्रीय संगीताच्या परिघातील ह्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास वर्षभर अभ्यास केला आणि मग
चित्रपट बनवायला घेतला. ही त्यांची passion ह्या
सिनेमात दिसतेच. चित्रपटाला कमर्शिअल वास अजिबात येत
नाही. किंबहुना चित्रपटाला ‘वास्तवदर्शी’ करण्यासाठी काही ठिकाणी नको
इतके धाडसही त्यांनी केले आहे. हे
सगळं पाहिल्यावर असं वाटलं कि
जर कुणाला वास्तवदर्शी मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर तो चैतन्य
ताम्हाणे आणि गोम्बर प्रभूतींचा पाहावा असे मी सांगेन.
चैतन्य ताम्हाणे आणि टीमचे हार्दिक अभिनंदन !!
आता
ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने मी काही निवडक गोष्टी एक प्रेक्षक म्हणून आणि एक शास्त्रीय
संगीतातील अनुभवी-विद्यार्थी कलाकार म्हणून
जरा परखडपणे मांडणार आहे.
सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात आणि विद्यार्थीदशेत असतानाच शरद इतर कलाकारांवर टीका करतो. सर्वसाधारणपणे ही सवय अजिबात चांगली तर नाहीच, पण स्वतः शरदच्या प्रगतीसाठी खूप मारक आहे. (When you point finger towards others, your 3 fingers are pointing towards you ). पण सध्या हा जनरल ट्रेंड आहे, हे दाखविण्याचा ताम्हाणेंचा हेतू असावा. आंघोळ घालण्यापासून गुरुजींची एव्हढी सेवा शरद करतोय, पण त्याचे गुरुजी नीट तालीम देताना काही दिसत नाहीत. ( शिवाय गुरुजींचे हात पाय दाबणारे शिष्य आज मिळतील..?? खूप जुन्या जमान्यातले हे दृश्य आजच्या जमान्याला ठिगळ लावल्यासारखे सिनेमा melodramatic करण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखवले आहे का.??) एका शिकवणीत गुरुजी शरदला म्हणतात कि “ विचार अस्थिर आहेत”. अर्थातच त्यामुळे गाण्यावर विपरीत परिणाम होणार हे ओघाने आलेच. पण त्यातून बाहेर कसं पडायचं, हे मात्र ते कुठे सांगताना दिसत नाहीत. आणि शरदही ते विचारत नाही. तो फक्त कुढत बसतो. त्याच्यावर बाहेरील जीवघेण्या स्पर्धेचा, आर्थिक असुरक्षिततेचाही परिणाम एकीकडे होत असतो. गुरुजींना हे सगळं माहित नाही का ..?? ह्या अगदी ऐरणीच्या मुद्द्यावर गुरुजी शरदला का मार्गदर्शन करू शकत नाहीत ?? ह्याचे कारण म्हणजे गुरु आणि शिष्यांमध्ये असलेली भली मोठी कम्युनिकेशन गॅप !! दुर्दैवाने ह्या वाईट पायंड्याला मोठी परंपरा आहे. ह्या गोष्टीला गुरूच्या कलेपेक्षा त्याच्याबद्दल शिष्यांना वाटणारा भीतीयुक्त आदर कारणीभूत आहे. आणि मग दंतकथांना ऊत येतो. कुठल्यातरी शिष्याला तान येत नाही म्हणून गुरूने पहिल्या मजल्यावरून खाली ढकलले. गुरूने कोणाच्या तरी डोक्यात तंबोरा घातला वगैरे वगैरे . (वारेमाप फिया घेणारे काही ‘सांदीपनी’ मात्र असं काहीही करत नाहीत. ते क्लास चालवत राहतात !!). मनुष्य प्रवृत्तीची ही दोन टोकेच नाहीत का ??
टॅक्सीतील
‘गुरुजी- शरद’ संवाद ऐकताना वाटलं कि गुरुजी काळाप्रमाणे पुढे सरकायलाच तयार नाहीत.
ते अजून त्यांच्या वेळचीच फुटपट्टी आजच्या जमान्याला लावतायत. नव्या पिढीचे आकलन आणि
धाडस निसर्ग-नियमाप्रमाणे मागील पिढीपेक्षा
जास्त आहे, हे त्यांना उमगलंय का ..?? किंवा ते मान्य करतात का ..?? नवीन पिढीला मिळणारे
गाण्याचे exposure पूर्वी पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आज नुसता Raag Bhairav असा
सर्च द्या , तुम्हाला किमान शंभर वेगवेगळे
भैरव गायलेले मिळतील. पूर्वी ही सुविधा होती का ?? नवीन पिढीला गाणं किती सुंदर आणि
(सहज नसले) तरी मेहेनतीने 'साध्य' होण्यासारखे आहे हे प्रात्यक्षिकाने दाखविण्याची
गरज आहे. तरच शिष्य मेहेनत करेल. आणि त्याच्या गाण्यात खोली येईल. अवघड रागातले खाच
खळगे जरूर शिकवले जावेत, पण गाणं किती अवघड
आहे हे सांगत बसले ( तेही without demo), तर शिष्याची प्रगती कुंठित होण्याची भीती
जास्त आहे. अर्थात गुरुजींचा कारखाना मात्र चांगला चालेल ...!! गणित विषयाचे विद्वान
कमी नाहीत आपल्याकडे. पण गणित सोपे करून सांगणाऱ्या शिक्षकांना मी मानतो. एका प्रसंगात
शरदचे गाणे अगदी लॅपटॉपवर ऐकून गुरु-शिष्य त्याचा पंचनामा पण एकत्र बसून करतात. ( हल्लीच्या
काळात ही दुर्लभ घटना आहे !! ). पण सगळ्यावर गुरुजींचे उत्तर एकच ..."रियाज कर
!!" वरपांगी बघता हे खरंही आहे, पण शिष्याला
कसला रियाज करायचा ह्याची दिशा नको का मिळायला ?? नुसती ढोर मेहेनत करून गाणं येईल
का ..?? म्हणजेच आल्वार घराण्याच्या ह्या विनायकराव गुरुजींमुळे आपल्याला गाणं येईल
अशी शरदची निव्वळ श्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा नाही का ?? आणि अंधश्रद्धेने गायनकला
कधीच साध्य होणार नाही. पं. कुमार गंधर्वांसारख्या
क्रांतिकारक गवयाने सांगून ठेवलंय कि "डोळस परिश्रम करा. नुसती गधा-मेहेनत करू
नका ". पहिली ५ वर्षे गाणं नीट शिकल्यावर (अर्थात विशी ओलांडल्यावर) विद्यार्थ्याला
गुरुकडे आपली प्रगती समाधानकारक चालली आहे
कि नाही ह्याचा अंदाज यायला हरकत नाही. गुरुजी स्वतःच्या स्वार्थासाठी शरदला
अंधारात ठेवतायत, असं तर सिनेमाला project करायचं नाही ना ...?? नसेल, तर 'तालीम' नीट
दाखवायला हवी होती असं मी म्हणेन. ( उदा. स्वरांचं काम कसं होतं, लयीचं काम कसं होतं
, बोल कसे करतात वगैरे ). कारण आपल्या शास्त्रीय संगीताचा हा गाभा आहे. गुरुजींची एखादी
मैफिल कमी दाखविली असती तरी चाललं असतं. जे काही दाखवलंय , त्यावरून ' सगळे गुरुजी
असेच असतात आणि त्यांच्या तालमी अशाच असतात' अशी बघणार्याची कल्पना होते. हे खूप घातक
आहे. ( wrong takeaway !! )
चित्रपटातील काही गोष्टी खटकल्या ( किंवा मला कळल्या नसाव्यात ). पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातला कुर्ता घेणारा शरद एक लाख रुपयाची मोटरबाइक काही अर्थार्जन व्हायच्या आधीच चालवतोय, हे बरोबर आहे का ..?? शरदच्या आईचे नंतर कुठेही दर्शन नाही. ( शरद देखील तिच्याशी फक्त फोनवर आहे. शास्त्रीय संगीत येण्यासाठी आई वडिलांना अंतरावे लागते ?? ). शरदचे वडील ‘मुकुंदजी’ हे त्यांच्या गाण्यावरून फार तालीम घेतलेले शिष्य वाटत नाहीत. (शरद पण एके ठिकाणी तसंच म्हणतोय की बाबांचं गाणं ठीकच होतं. गोष्टी मात्र मजेदार होत्या त्यांच्याकडे). माई तर शरदला म्हणतायत "तुझा बाप हा एक कमकुवत शिष्य होता. त्याला कुणी सांगितलंच नाही कि पुस्तके छापून प्रतिभावान कलाकार बनता येत नाही". माईंनी का सांगितलं नाही हे मुकुंदजीना ..?? म्हणजे communication गॅप आहेच ना पुन्हा ?? शिष्याच्या मुलासाठी हा रेकॉर्डिंग स्पूल बनवून ठेवला होता माईंनी ..?? हे अशक्य कोटीतलं वाटतं. एरवी वास्तववादी असणाऱ्या ताम्हाणेंना हे fiction टाकावेसे वाटले ह्याचे आश्चर्य वाटते. एक अत्यंत महत्वाचा संदेश देताना माई म्हणतात "तंत्र हे सत्याच्या शोधासाठी लागणारे साधन आहे. तपस्येमध्ये सापडलेल्या सत्याला सामोरं जायला धाडस लागतं. कारण सत्य हे बरेच वेळा कुरूप असतं". अरेच्चा , म्हणजे तपस्येनंतर हाती लागणारं संगीत कुरूप असतं ?? आणि कुरूप असलं तर मग ते संगीत कसलं ??? इथे खूप विसंगती आहे आणि ती खटकते. पण त्यामुळे एक takeaway आपल्याला नक्की मिळतो कि प्रत्यक्षात संगीताच्या विद्यार्थ्याने कुणाचं, किती आणि काय ऐकावं ह्या बाबतीत सतर्क राहायला हवं. सगळं चांगलं चांगलं श्रवण करावं , भरपूर डोळस परिश्रम घ्यावेत. राजन जोशींच्या दंतकथांपेक्षा स्वतःच्या अनुभूतीला महत्व द्यावं. संगीत हाच स्वतः एक मोठ्ठा 'गुरु' असतो, हे संगीताची आराधना करणार्याने कधीही विसरू नये.
ह्या
चित्रपटाला कथावस्तू अशी नाही. म्हटले
तर बायोपिकही नाही. एखादा चित्रकार कॅनवासचा खालचा भाग न रंगवताच
सोडतो, तसा चित्रपटाचा शेवट
ताम्हाणें सोडतात. 'कोर्ट' सिनेमातही तसंच केलं होतं.
ह्यामधील त्यांचा विचार मला कळला नाही. शेवट
बघितल्यावर एखाद्या तरुणाला शास्त्रीय संगीतात करिअर करायची असेल, तर त्याने हा
चित्रपट पाहावा कि नाही, ह्याचे
उत्तर देणे अवघड आहे.
कारण चित्रपट वास्तववादी असला, तरी निगेटिव्हिटीने भरलेला
आहे. एखाद्या स्टार्ट अप करणाऱ्या तरुणालाही
असंख्य अडथळे पार करावे लागतात.
तद्वतच शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या तरुण पिढीलाही अनेक
संकटांचा सामना करावा लागतो. फक्त अडचणीचे स्वरूप
वेगळे असते आणि संगीत
हे भावनेशी जास्त संलग्न असल्याने त्या अधिक गुंतागुंतीच्या
असतात असे फार तर
म्हणता येईल. ब्लॅक आणि व्हाईटमध्ये काहीच
नसतं. त्यामुळे कलाकाराचं स्वतःचं जजमेंट अगदी पणाला लागतं.
त्यासाठी प्रत्येक कलाकार काय दृष्टिकोन ठेवतो
ह्यावर त्याची पुढची वाटचाल ठरणार असते. काहीजण गुणवत्तेपेक्षा तुलनात्मक दृष्टिकोन ठेवतात, काहीजण पैशाला महत्व देतात , तर काही टाळ्यांना
महत्व देतात. काही जण वैफल्यग्रस्त
होऊन हा मार्ग कायमसाठी
सोडतात. स्वर-लयीचं लेणं जो वरून घेऊन आला असेल,
त्याच्यासाठी आपले शास्त्रीय संगीत म्हणजे न संपणाऱ्या आनंदाचा एक कुंभच आहे. त्याला
अर्थार्जनाचे साधन करून त्यातील आनंदाला तिलांजली द्यायची का, हे ज्याने त्याने ठरवावे.
लोकप्रियता मिळविणे आणि संगीतातील आनंद लुटणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवानं
संपूर्ण चित्रपटात 'गाणं’ हा आनंदाचा स्रोत
आहे, ह्याविषयी गुरुजींचं आणि माईंचं काहीही
भाष्य तर नाहीच, पण
स्वतः गुरुजी, शरद धरून सगळेच
‘गाणं’ गाताना देखील सुतकी चेहरे करून आहेत. असला
ध्यास काय कामाचा ...???
विकास
जगन्नाथ कात्रे , ठाणे
मोबाईल:
९८३३६१०८७५
00000******00000
वा काका गुणदोषांचा सुंदर समतोल साधत या चित्रपटाचे छान विश्लेषण केले आहे तुम्ही। तुमचे ब्लॉग नेहमीच अभ्यासपूर्ण आणि तेवढेच मनाला आनंद देणारे असतात। खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू😊👍
ReplyDeleteअश्विनी केशवन ☺
ReplyDeleteवास्तववादी चित्रपटाचे समीक्षण अधिक वास्तववादी केले आहे.मला चित्रपट बघण्याची उत्कंठा आहे पण निश्चितच श्री विकास यांना संगीत व गायन विश्वातील अनुभव व अनुभुती आहे हे यावरुन कळते.
ReplyDeleteनेहमप्रमाणेच उत्तम परीक्षण केलं आहे. भाषाशैली स्पष्ट आणी प्रामाणिक वाटते. परीक्षण वाचून चित्रपट नक्कीच पहावसा. वाटतो... Infact ह्यावेळी तो वेगळ्या दृष्टीने पाहिला जाईल. 👌🙏
ReplyDeleteआपली परखडपणे मांडलेली मते माला खूप आवडली... प्रत्येक क्षेत्रात दोष आहेत ते स्वीकारून आपल्याला पुढे जावे लागते आणि काळानुरूप बदलावे लागते हे शास्त्रीय संगतीतकराला कळलेच पाहिजे...झापडे लावल्यासारखे लोकानी त्या picture मधल्या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे दुजोरा देऊ नये...
ReplyDeleteI agree with your perfect observations and views.
ReplyDeleteउत्तम रसग्रहण...
ReplyDeleteअगदी नेमक्या शब्दांत रसग्रहण केलं आहे. सिनेमा पाहिल्यावर, आम्हाला जाणवलेले सगळे मुद्दे ह्या लेखात उतरले आहेत.
ReplyDeleteशुभेच्छा आणि धन्यवाद.
कविता-धनंजय
मला हा चित्रपट अतिशय फालतू वाटला
ReplyDeleteअतिशय उत्तम आणि मेजक्या शब्दात रसग्रहण.
ReplyDeleteस्वतःची मतेही उत्तम आणि परखड.
खूपच छान लिहिलं आहे. मला स्वतः ला सुद्धा चित्रपट negative जास्त वाटला.
ReplyDeleteखरंच खूप सुंदर विश्लेषण
ReplyDelete