सरवर कृष्णासमान.... !!
'ये विविध भारती की विग्यापन प्रसारण सेवा है !!' हे प्रांजळ वाक्य अलीकडे ऐकू येत नाही. त्या मागोमाग लागणाऱ्या रब रब रब रब रबेक्स, दातो और मसुडो को धो डालनेवाला डाबर का लाल दंतमंजन, प्रकाशचं माक्याचं आयुर्वेदिक तेल, हिरो मॅजेस्टिक मोपेड, हमाssरा बजाज वगैरे जाहिराती पण आता ऐकू येत नाहीत. कारण रेडिओ आता विस्मृतीत गेला आहे. नाही म्हणायला अमीन सयानीचे 'बिनाका गीतमाला', कामगारसभेची रेडिओवरील ट्यून, दूरदर्शनची ट्यून वगैरे व्हाट्सअपवर पोस्ट करून सामुदायिकपणे डोळ्यांतून टिपे गाळून नॉस्टाल्जिक हळहळ व्यक्त करण्याचा कार्यक्रम अधूनमधून होत असतो. आता आकाशवाणीच्या मराठी चॅनेलचे नांव 'अस्मिता' ठेवले असले, तरी मराठी रसिकांची रेडिओविषयीची 'अस्मिता' किंवा तळमळ केव्हाच लोप पावली आहे. "कालाय तस्मै नम:" हेच खरं !! अर्थात हे एकेकाळी ६० पैशांत मसाला डोसा खाणाऱ्या पन्नाशीच्या वरच्या पिढीबद्दल मी बोलतोय. (नवीन पिढीला तर हे काही माहीतच नाही. कारण जन्माला येतानाच ते मोबाईल हातात घेऊन आलेत. रेडिओ, पेजर, टेप रेकॉर्डर, Floppy आणि ट्रान्सिस्टर बघायला त्यांना कदाचित राजा केळकर वस्तुसंग्रहालयात जावं लागेल ).
ते कशाला, अगदी आत्ता-आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंटपेजची मजा चाखत होतो. तीही आताशा मिळेनाशी झालेय. पूर्वी आमची दिवसाची सुरुवात 'मंगलप्रभात' ने व्हायची; अलीकडे ती ' मंगलप्रभात लोढा'ने होते. फ्रंट पेजवर 'लोढामध्ये तुम्ही फ्लॅट घेतल्यास कुटुंबशैलीची मजा तुम्ही कशी चाखू शकता', याची अक्षयकुमारने केलेली संपूर्ण पानभर ऍड बघावी लागते. आतले दुसरे पान ( म्हणजे पूर्वाश्रमीचे पहिले पान !😀) उघडेपर्यंत हेडलाईन वाचायला ताणली गेलेली आपली उत्सुकता बऱ्यापैकी विरलेली असते. त्यावर उपाय म्हणून मी वाफाळलेल्या चहाचा एक घोट घेतो. अगदी 'आदत से मजबूर' म्हणून पहिले पान उलगडून आतल्या पेजवरची आपण हेड-लाईन वाचतो. पण हेडलाईन्सचे स्वरूप बदललेले असते. आता इथे निरव मोदीची 'निरवानिरव' किंवा विजय मल्ल्याचे लोकार्पण का प्रत्यार्पण, इस्राएलने पॅलेस्टाईन विरुद्ध संगिनी रोखल्याचे चित्र, वगैरे बातम्या असतात. किंवा निर्मलाताईंनी आपल्यासारख्यांना वाचताही येणार नाही इतकी शून्ये असलेली 'रक्कम' बँकांना रिलीफ पॅकेज म्हणून दिलेली असते. सगळे जग म्हणजे एक 'बिझिनेस' झाल्याचा हा परिणाम !! जीवनातली साधी साधी 'सुखं' सुद्धा आपल्याला 'डिजिटल-कम-जाहिरात' युगातील विश्व-यज्ञामध्ये समिधांसारखी त्यागावी लागतात. हे त्यागण्याची तयारी नसणाऱ्यांना 'प्रतिगामी' किंवा 'आऊट-डेटेड' म्हणून लेबल लावले जाते. पण तुम्ही डिजिटल युगावर प्रेम करत असाल, तर मात्र असली दुःखे कुरवाळण्याची तुम्हाला गरज पडत नाही..... ( OLD SAYING: When in Rome, do as Romans do..!!)...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१९८० मध्ये मी इंजिनीरिंगला असताना एक दिवस आमच्यापर्यंत बातमी येऊन थडकली कि इन्स्टिटयूटमध्ये एक मोठ्ठा रशियन कॉम्पुटर आलाय आणि तो मेन बिल्डिंगमध्ये बेसमेंटला ठेवलाय. त्याचे नाव EC 1030. काही कळायच्या आंत आम्हाला Fortran 77 आणि Fortran 04 ह्या लँग्वेजेस (संगणकाच्या भाषा) पण कोळून पाजल्या गेल्या. (भाषा हे संवादाचे माध्यम असते ह्यावरील माझा विश्वास तेव्हापासून उडाला). एक दिवस कायसासा DO Loop (डू लूप ) आणि GO TO (गोटू) वाला एक प्रोग्रॅम लिहून 'कार्ड पंचिंग'ला दिला.(बारीक बारीक खिडक्या असलेले पंचिंग कार्ड !! आमची Windows ची सुरवात अशी बारीक बारीक खिडक्यांपासून झाली आहे. आता मात्र Windows हा काहीही करण्यासाठीचा 'महादरवाजा झालाय). हल्ली प्रोग्रामिंगमध्ये हे GO TO वापरणाऱ्या लोकांना आदिमानव समजले जाते " असे माझे संगणक क्षेत्रातील
आमच्या वेळी वहीला नोटबुक म्हणायचे. हल्ली लॅपटॉपला 'लॅपटॉप' म्हणणे डाऊन मार्केट समजले जाते. त्याला नोटबुक म्हणतात. (आता दिवस बदललेत. आमच्या काळात कम्प्युटरला PC म्हणायचे. तरुणाईच्या भाषेत मात्र PC म्हणजे प्रियांका चोप्रा !! तसेच आत्ता कुठे आम्ही DP बदलायला शिकलोय, तर माझा मुलगा म्हणतो DP म्हणजे दीपिका पदुकोण 😇). असो !! नवीन लॅपटॉप आणि मोबाईल आल्यावर त्याची प्रतिष्ठापना (Set-up) करणे हे मला कधीही जमलेले नाही. लॅपटॉप आणि मोबाईल मॉडेल कितीही नवीन असलं, तरी माझा मुलगा ते Set-up विनासायास करतो. त्याला सगळं कसं काय बुवा माहित असतं, ही मोठी अचंबित करणारी गोष्ट आहे. ही नवीन पिढी अभिमन्यूसारखे आईच्या उदरात असताना डिजिटल technologyचा अभ्यास करीत असावी बहुतेक. तरी बरंय कि शेवटच्या एक दोन नोकऱ्यांमुळे निदान ईमेल, वर्ड आणि एक्सेल इथपर्यंत तरी मी मजल मारू शकलोय. अन्यथा 'कम्प्युटर निरक्षर' ह्या पदवीला मी प्राप्त झालो असतो. नाही म्हणायला, यु ट्यूब ब्रॉडकास्टींग आणि ऑडिओ क्लिप कट करण्यासाठी audacity software वापरण्याची क्षमता (किंवा ऑडॅसिटी) मी अध्येमध्ये दाखवतो. (पण माझी ही प्रगती 'गरज ही शोधाची जननी आहे ' ह्या उक्तीखाली येऊ शकेल). नवीन घेतलेला लॅपटॉप वर्षभर निमूट चालतो. नंतर तो रंग दाखवायला सुरवात करतो. नवीन विकत घ्यायच्या वेळी वर्षभरापूर्वी रिलीज झालेले लॅपटॉप मॉडेल घेणे हे आता मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे अखेर 'किंमत' हा मध्यमवर्गीय निकष बाजूला ठेऊन, नकोत इतकी features असलेला एखादा महागडा लॅपटॉप घरी येतो आणि अगदी M S office, ईमेल सारख्या प्राथमिक गरजांसाठी तो वापरला जातो. कुठल्याश्या एका भारतीय अहवालात म्हटले आहे कि भारतातल्या व्यक्तीचे सरासरी आयुर्मान वय वर्षे ६८ ते ७० आहे. कुत्रा हा प्राणी १० वर्षांनी म्हातारा होतो म्हणे. ह्याच चालीवर म्हणायचे झाले, तर लॅपटॉपचे सरासरी आयुर्मान फार फार तर २ वर्षे असावे. तो ३ वर्षे चालवला असे सांगितले, तर तरुण मंडळी भुवया उंचावून तुमच्याकडे बघतात. आता माझ्या लॅपटॉपला तब्बल ३ वर्षे होऊन गेली आहेत, तरीही HP वाल्यांना खिजवून मी तो अजूनही वापरतो आहे. ह्यामध्ये पैसे वाचविण्याचाच माझा हेतू आहे असे मानण्याचं कारण नाही. ( आणि तसे करायला मी सदाशिव पेठेतला तर्कट ज्येष्ठ नागरिकही नाही ). एकंदरच माझ्या डोक्याने असे घेतले आहे कि इलेक्ट्रॉनिक गॅजेट निदान ४ वर्षे तरी वापरले पाहिजे. आणि दुसऱ्याला impress करण्यासाठी पहिली सुरळीत चालणारी वस्तू टाकून 'नवी' विकत घेणे माझ्या स्वभावात नाही. ( ह्यामध्ये वस्तूविषयी मला वाटणाऱ्या ममत्वाची भावनादेखील थोडीशी असावी ). पण लॅपटॉप जुना झाल्यामुळे क्वचित हँग देखील होतो. कधीतरी त्याची 'हँगिंग गार्डन' देखील होते. पण मी स्पर्धात्मक जगातून निवृत्ती घेतल्यामुळे फार फिकीर करत नाही. ह्या सगळ्या भानगडीत एकदा तर माझा लॅपटॉप क्रॅश होणार होता (म्हणे) . ( हल्ली हे 'क्रश' आणि 'क्रॅश'चं फारच फॅड आहे बुवा !!). मी HP कंपनीला 'टुकटुक ' करून, लॅपटॉपची क्रॅश झालेली हार्ड डिस्क बदलून पाचशे रुपयात माझा बंद पडलेला लॅपटॉप पूर्ववत चालू केला. अर्थात Factory Reset अवस्थेत !! थोडा वेळ माझा मेंदू 'रीसेट' झाल्याचा भास झाला. पण मग सवय झाली. Adaptation (किंवा अनुकूलन) हे मनुष्य प्राण्याचे महत्वाचे बलस्थान आहे. (अर्थात लॅपटॉपमधील माझ्या महत्वाच्या गोष्टींचा मी १५ दिवस आधीच बॅकअप घेतल्याने गंडांतरच टळले म्हणायचे. पण ही 'अंदर कि बात' आपल्याजवळच ठेवायची आपण). तरी सुद्धा माझे नित्याचे बँकेचे व्यवहार, संगीत , you tube , ब्लॉग, प्रसंगी शेअर मार्केट ह्यासाठी तो चांगली सर्व्हिस देतोय. माझे काही तज्ञ् मित्र सांगतात की लॅपटॉप जसजसा १ वर्षांनी जुना होईल, तशी त्याची कार्यक्षमता कशी कमी होईल याकरिता मुद्दाम अपडेट्स दिली जातात. आपल्या कॉम्प्युटरचा फास हळूहळू आवळला जात असतो. एक प्रकारे ग्राहकाला नवीन लॅपटॉप आणि त्याची विविध सॉफ्टवेअर्स पुन्हा खरेदी करायला हे आंतरराष्ट्रीय विक्रेते निष्कारण चिथावणी देतात. हे एक प्रकारचे षडयंत्रच आहे म्हणा ना !!
आता लॅपटॉप वापरताना होणाऱ्या गमती जमती बघुयात. ...
माझ्यात आणि माझ्या 3 वर्षे जुन्या लॅपटॉप मध्ये एक साम्य दिसते. मी सकाळी उठल्यावर जागृतावस्थेत यायला मला लागणारा वेळ आणि कम्प्युटर बूट व्हायला लागणारा वेळ हा सारखाच आहे. मी निदान चहा पिऊन तरी ताजातवाना होतो. कम्प्युटरला तोही चॉईस नाही. 'बूट' व्हायला खूपच वेळ लागला, तर Work from home करणाऱ्या माझ्या मुलाला मी लगेच पाचारण करतो. एखादी गाय जशी फक्त मालकालाच दूध देते, तसा आमचा लॅपटॉप बरेच वेळा माझ्या मुलालाच रेस्पॉन्ड करतो, हा अनुभव मी कित्येक वेळा घेतलाय. गोगलगायीच्या मंद गतीने चालणारा माझा कॉम्प्युटर बघून माझा मुलगा म्हणतो "निदान १०० GB तरी डेटा उडवा, म्हणजे नीट चालेल तुमचा कम्प्युटर". 🙆 (खरं म्हणजे हा तोडगा मानवाला देखील लागू आहे. वाईट स्मृती डोक्यातून उडवल्या तर आपले जीवन किती सुंदर होईल नाही का ??).
एकसारखे लॅपटॉपचे सिस्टीम अपडेट्स घ्यायला लावून हे विक्रेते आपल्याला अक्षरशः काव आणतात. मोठे अपडेट घेतल्यावर दुसऱ्या दिवशी माझा लॅपटॉप उघडायला नेहमीच अर्धा तास तरी लागतो. एकदा इंटरनेट स्लो चालते, एकदा लॅपटॉप स्लो चालतो, एकदा गूगल क्रोम स्लो चालते. पण एका वेळी सगळे काम करीत नाहीत. (हे थोडेसे भारतीय क्रिकेटसारखे आहे. विराट खेळला, तर अजिंक्य खेळत नाही, अजिंक्य खेळला तर रोहित खेळत नाही....😀) एकदा माझ्या एका मित्राच्या Microsoft मध्ये काम करणाऱ्या मुलाला मी 'अपडेट्स' जरा कमी करा असाही विनंतीवजा अर्ज दिला होता. एव्हढेच काय, नंतर यापुढे अपडेट्स घ्यायचीच नाहीत असा मी एकदा चंग बांधला. हे ५-६ वेळा मला यशस्वीपणे करता आलं देखील. पण सरतेशेवटी माइक्रोसॉफ्टवाल्यांचा बांध फुटला आणि एके दिवशी लॅपटॉप सुरु करताच तब्बल १२ तास चालणारे अपडेट घ्यायला स्वतः हूनच घ्यायला त्यांनी सुरु केले. १२ तास माझा कॉम्प्युटर कोमात होता. किंबहुना तो सुरु होणार कि नाही अशीही शंका मनात येऊन गेली. (मी थोडा त्याला हलवूनही पाहिला😀). एकंदर काय...... 'आयुर्विम्याला पर्याय नाही' ह्या चालीवर 'अपडेट्स घेण्यास पर्याय नाही'. इन्स्टॉल करणे, अपडेट्स घेणे , बॅक-अप घेणे ह्या सगळ्या आन्हिकांची तुलना मला आपल्या धार्मिक विधींशी करण्याचा मला मोह आवरत नाही. लॅपटॉप इन्स्टॉल किंवा सेट अप करणे म्हणजे वास्तुशांत, बूट करणे म्हणजे नित्यपूजा, अपडेट घेणे म्हणजे एकादष्णी, अँटीव्हायरस म्हणजे काल-सर्प-दोष पूजा आणि दर ३ महिन्यांनी बॅकअप घेणे म्हणजे सत्यनारायपण घालणे असे मी समजतो. पुरेसे डिजिटल पुण्य पदरात पडून घ्यायचे असेल, तर ही सगळी क्रियाकर्मे करणे क्रमप्राप्तच आहे.
आता जरा मोबाईलकडे मोर्चा वळवूया. परवा गणेशोत्सवात एक व्यंगचित्र पाहिले. मखरात बसलेले गणराया जरा
वैतागूनच समोरच्या सोफ्यावर मोबाईल बघत बसलेल्या कुटुंबातल्या तिघांना म्हणतायत कि मी ह्यांच्या घरात येऊन मला ३ दिवस झाले, पण ह्यांचं लक्षच माझ्याकडे जात नाही. अतिशय बोलके व्यंगचित्र होते हे !! आता साक्षात गणरायांना देखील आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ( बाजूच्या व्यंगचित्रात तर यापुढील स्टेज दाखविली आहे......🙆). गणेशोत्सवाच्या वेळी गणपती संदर्भात गाणी लावावीत म्हणून मी सहज मोबाईलवर गुगल सर्च दिला, तर गुगलने मला एक result 'गणपती स्टेटस ' असा दाखवला होता , तो वाचून मला हसू आवरेना.😄 साक्षात परमेश्वराने आपला 'स्टेटस' रोज बदलला, तर आपल्या सगळ्यांचेच एकंदर काय होईल ह्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. दारूने काहीजणांनाच व्यसन लावले. पण मोबाईलने मात्र आबालवृद्धांना व्यसन लावले आहे. ह्याची मुख्य कारणे अनुक्रमे व्हाट्सअप, instagram, गेम्स आणि फेसबुक ही आहेत . कोणे एके काळी साधे पोस्ट कार्ड देखील न लिहिणारे लोक ह्या डिजिटल क्रांतीच्या युगात WA वर मोठमोठाले निबंध लिहितात. अर्थात व्हाट्सएप्प हे निरूपयोगी माध्यम आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण त्याचा सकारात्मक उपयोग व्हावा असं वाटतं. जिथे काहीतरी मजकूर लिहिणे अनिवार्य आहे, तिथे मात्र काही लोक नुसते अंगठे किंवा इमोजी दाखवतात. लिहायची इच्छा असून type करत नाहीत त्याला काही उपाय नाही .काही लोक हॉकीमधल्या सेंटर फॉरवर्ड सारखे इकडून तिकडे पोस्ट फॉरवर्ड करत असतात. अतीज्येष्ठ नागरिकांना मात्र स्वतःचे वय आणि दुखणी विसरायला हे चांगलं औषध असावे. आमच्या ओळखीतले एक दोन ज्येष्ठ मित्र मला ३१ डिसेम्बरला आणि दिवाळीत एक ब्ल्यू लाईन पाठवतात. दीपावली शुभेच्छा घेण्यासाठी ही ब्लु line कबड्डीत टच करतात तशी मी टच केली आणि मोबाईलवर एकदम फटाकेच वाजायला लागले. पन्नाशीतील मध्यमवयीन गृहिणीसुद्धा 'सखी चैतन्याचा झरा',' फॅमिली कट्टा', 'माझे माहेर' वगैरे सारखे ग्रुप्स बनवून आहेत आणि प्रसंगी किचनमधून बाहेर येऊन पदराला हात पुसून मध्ये मध्ये WA वर काय आलंय म्हणून मोबाईल बघत असतात. ते कशाला, अगदी साडी खरेदीसुद्धा मैत्रिणीला किंवा बहिणीला साडीचा फोटो पाठवून होते. ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे पुरातन ग्रंथ सुद्धा कुठल्यातरी क्लाउडवर वस्ती करून असतात. महाभारतात कृष्णाला अर्जुनाबरोबर फालतूमध्ये वेळ फुकट घालविल्याचे दुःख होत असेल. कारण आजकाल झूमवर गीतेचे अर्थ लावण्याचे कार्यक्रम सुरु आहे.
हल्ली पूर्वीसारखा फोटो धुवायचा खर्च नसल्याने, काही झाले कि लोक मोबाईलवर फोटो काढण्याचा सपाटा लावतात. मग समोरची व्यक्ती फोटोजेनिक असे दे किंवा नसू दे. किंबहुना मोबाईल विकत घेताना मोबाईल किती मेगापिक्सेल (MP) कॅमेरा आहे, हे आधी पहिले जाते. ह्या मोबाईल कॅमेरांमुळे कोडॅक कंपनीचे दिवाळे वाजले. आता ही कंपनी फक्त Case Study म्हणून व्यवस्थापकीय विद्यापीठांमध्ये दिसते. पूर्वी कोडॅकच्या एका रोल मध्ये जेमतेम ३६ फोटो निघायचे. (जर ४० निघाले, तर चितळ्यांनी वजनापेक्षा २ बाकरवड्या जास्त घातल्यावर जो आनंद होईल तसा आम्हाला व्हायचा). कधी एकदा सावंत फोटो स्टुडिओमधून फोटोचा अल्बम प्रिंट करून येतोय असे व्हायचे. तिथपर्यंत आम्ही 'सावंत को आने दो ...' हे हिंदी गाणे म्हणत बसायचो😆. आता फोटो प्रिंटिंग फक्त लग्नात करतात, त्यामुळे फोटो develop करायला लागणारे सिल्वर ब्रोमाइड हे रसायन तयार करणारी कंपनी पण एव्हाना झोपली असावी. अल्बम घरी आणल्यावर एकत्र बघायचो आणि त्यावर प्रत्येकाची कॉमेंटरी असायची. आता छोट्या स्क्रीनच्या मोबाईलवर फोटो एकत्र बघता येत नाहीत. ( हल्ली मोबाईल TV वर कास्ट करता येतो म्हणा ). एव्हढेच नव्हे, तर एकदा काढलेले फोटो लॅपटॉपवर डाउनलोड देखील होतातच असे नाही. एकदा बघून झाल्यावर फक्त ५% लोक ते पुन्हा बघत असावेत. हल्लीच्या जमान्यात तात्कालिकतेला खूप महत्व आहे. (अगदी फूड देखील इन्स्टंट मिळते). पण फोटो काढण्याचा स्टंट झालाच पाहिजे. सेल्फी काढण्याचे पण एक वेड बोकाळले आहे. त्यात नक्कीच नावीन्य आहे पण टिकणारे समाधान आहे का, हे तपासून बघावे लागेल. ( ह्यापूर्वी आपण सेल्फी कधी काढला होता हे जरा काढणाऱ्याला विचारून बघा , म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल ). एकदा काढलेले फोटो WA वर दणादण पाठवले, कि पैसा वसूल होतो. फोटो काढताना एक 'पावटींग' नावाचा प्रकार लोक करतात. मोनोटोनि ब्रेक करणे सोडून ह्यात काय मिळतं, हे मला खरंच कळत नाही. जाहिरातबाजीमुळे वैचित्र्याला उधाण आले आहे. कारण त्यामुळे impact होतो म्हणे !! मी १९८० मध्ये IIT त असताना एक IMPACT नावाचा स्पर्धात्मक कार्यक्रम विद्यार्थी करायचे त्याचे थिम हेच होते . चित्रविचित्र पेहेराव, विकृत हावभाव स्टेजवर येऊन करायचे आणि IMPACT मिळतो का तो बघायचा,असा हा कार्यक्रम असे. जणू काही आजच्या जमान्यातल्या जाहिरातबाजीची कुणकुण त्यावेळीच विद्यार्थ्यांना लागली नसेल ..??
मोबाईल वापरताना ऑटो करेक्ट नावाचे प्रसंगी 'उपयोगी' पण क्वचित 'घातक' असे टूल असते. नोकरीत असताना एकदा एका बड्या ब्रिटिश अधिकाऱ्याला मी लिहिलेली (घाईघाईत टाईप केलेली) ईमेल मी auto-correct मारली तीही माझ्या नावासहित, तेव्हा काय गहजब झाला ते अजूनही मला आठवते. कारण माझ्या नावाचे पूर्ण स्वरूप बदलून त्याला व्हिएतनामी नावांसारखे रूप आले होते. त्या अधिकाऱ्याला 'ही ईमेल कोणाची आहे ' हे केवळ माझ्या email ID मुळेच कळले. हे पत्र प्रिंट काढून मी गम्मत म्हणून अजूनही संग्रही ठेवले आहे. विशेष करून मराठी/हिंदी टायपिंग करताना मोबाईलने दिलेल्या suggestions घेण्याबाबत फारच सावधगिरी बाळगावी लागते. एकदा 'भजनी' हा शब्द लिहीत असताना 'भाजणी' हा पहिला option आला. किती हा विरोधाभास !! मी एकदा हिंदीत कामनाए शब्द लिहायला गेलो, तर कमनीय हा शब्द option आला. ( मोबाईलने निदान माझ्या वयाची तरी चाड ठेवायला हरकत नव्हती 😅). मी ‘वहिनींना’ असा शब्द टाईप करताना मला वाहिनींना, बहिणींना, विहिणींना असे ३ options आले. असो....कधी कधी तर आपला क्लीन बोल्ड उडेल असे options दाखवतात. त्याने भरपूर मनोरंजन होते. माझा मुलगा swipe key board वापरून ज्या पद्धतीने मोबाईलवर मेसेज टाईप करतो, ते पाहिल्यावर मी ऍनिमिक माणसासारखा पांढरा फटक पडलो. एकंदर काय, ही डिजिटल टेक्नॉलॉजि बेसावधपणे तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगू शकत नाही.
फेसबुकचे तंत्र जरा वेगळे आहे. मी फेसबुक का जॉईन केले ...ह्या प्रश्नाचे उत्तर मला खरंच देता येणार नाही. मी फार कुणाला Friend request न पाठवताही फेसबुकवर माझे चारशेच्या घरांत मित्र आहेत. वेळे अभावी म्हणा , पण मी FB वर जवळ जवळ नसतोच. ( हे वाचल्यावर काही अंतर्ज्ञानी मंडळींनी माझे वय एव्हाना जाणलेच असेलच😃). माझे ह्या माध्यमांशी काही वैर नाही. पण मी ते मॅनेज करू शकत नाही. ह्या माध्यमांचा Constructive वापर व्हावा असं मात्र मला वाटतं. आपण मुंबई वरून बंगलोरला जाण्याचे नकाशे पाठवून किंवा वाढदिवसाला बायकोला केक भरवण्याचे फोटो पाठवून सगळ्यांच्या timeline उगीचच भरून टाकू नये, एव्हढच मला म्हणायचंय. असो! "व्हाट्सएप वर १५०० मित्र , पण गल्लीत विचारत नाही कुत्रं..!!" अशी एक म्हणसुद्धा रूढ झाली आहे. तसे मात्र आपले होऊ नये..... !!
मोबाईलने apps च्या बाबतीत मात्र लॅपटॉपला मागे टाकले आहे. व्हाट्सएप्प पासून अगदी किचन रेसिपि पर्यंत सगळी उपयुक्त apps मोबाईलच्या 'प्ले स्टोअर'मध्ये उपलब्ध आहेत. OLA UBER ने काळ्या पिवळ्या जुनाट टॅक्सींची आणि प्रायव्हेट टॅक्सींची सद्दी संपवली. (अर्थात कधी कधी बिझी अव्हर्सच्या वेळी ठाण्याहून दादरला OLA च्या ऐवजी विमानाने जाणे स्वस्त पडू शकते😜 ). मी संगीतातील असल्यामुळे बरेच उपयोगी Music apps वापरतो. करोनामध्ये सगळ्यात उपयोगी ठरलेली app म्हणजे Gpay !! अगदी बिडीवाला सुद्धा Gpay ने पैसे घेत असावा. त्यामुळे पैसे देण्याचे काम सोपे तर झालेच, पण करोनाची रिस्कही कमी झाली. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन prime मुळे आपण घरी झोपूनही चांगले सिनेमे पाहू शकतो. ZOMATO आणि SWIGGY ह्याविषयी माझी एकच तक्रार आहे. फक्त त्यांच्या डिलिव्हरी boys नी दुचाक्या जरा बेताने चालवाव्यात. अध्यात्मिक ऍप्स , गाण्यांचे ऍप्स, शेअर मार्केट apps, मटा -लोकसत्तेचे ऍप्स, कथांचे ऍप्स, टीव्ही चॅनेल्सचे ऍप्स, परदेशात मित्रांशी वा नातेवाईकांशी मोफत बोलण्याचे ( टोटोक , टिकटॉक , टकटक वगैरे ) ऍप्स अशा एक ना अनेक सुविधा सुपीक डोक्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी आपल्याला ह्या दगदगीच्या जीवनात देऊ केल्या आहेत , त्याचा आपण फायदा करून घेतलाच पाहिजे. ह्या दृष्टीने APPS हा मोबाईलचा कळसाध्याय ठरला आहे.
एकंदरच माझे आणि जाहिरातींचे लहानपणापासून कधीही पटलेले नाही. विको वज्रदंती आणि विको टर्मरिक ह्या दोन्हीमध्येही बरोब्बर'अठारा जडी बुटियां' कश्या ...? एकतरी कमजास्त असायला हवी ना ? असले विचित्र प्रश्न माझ्या बालमनाला तेव्हाही पडायचे. ह्या इंटरनेटमुळे तर जाहिरातबाजी कल्पनेपलीकडे बोकाळली आहे. इतकी, कि हल्ली आम्ही जाहिरातींच्यामध्ये कार्यक्रम बघण्याची प्रॅक्टिस करतोय. क्रिकेट मॅच बघताना तर अतीच होतं. ओव्हर संपली कि जाहिरात, विकेट गेली कि जाहिरात, ड्रिंक्स आली कि जाहिरात, फिल्डिंग लावताना जाहिरात, DRS appeal असलं कि जाहिरात. भारत खेळत असेल तर एकंदरच मॅच दाखवण्याचा हा धंदा सोनी स्पोर्ट्सला एकदम फायदेशीर जातो. कारण प्रत्येक सेशन मध्ये ३-४ विकेट देण्याचा आम्हाला छंदच जडला आहे, त्यामुळे जाहिरातींचा revenue तुफान आहे. बरं, कुणी कसली जाहिरात करावी ह्याला काहीही धरबंध नाही. म्युच्युअल फंडाची जाहिरात रोहित शर्मा करतो.?? " मी त्याला म्हटलं "बाबा रे, आमचे फ्रँकलिनमध्ये अडकलेले पैसे देतोयस का तू ??". CEAT टायरची जाहिरात करणाऱ्या विराट कोहलीने इंडियाचा 'टायर बर्स्ट' होऊ नये म्हणून काय योजना आखलेय ?? मिस्टर इंडिया अनिल कपूर पोट साफ करण्याच्या कुठल्याशा चूर्णाची जाहिरात करतोय (आणि एकीकडे बेसुमार चिकन पण खातोय !!). काही कळायला मार्ग नाही. हे जाहिरातवाले लोक आचरटपणाची सीमा बाळगतील तर शपथ ! परवा साईबाबांच्या आरतीच्या ऑनलाईन Text मध्ये तीन जाहिराती होत्या ..... कापलेल्या माशाची, एक दागिन्यांची आणि तिसरी रेमंड रिअलिटीची !! अध्यात्म आणि भौतिकता यांची इतकी सुरेख सांगड कुणी घातली नसावी. परवा मी एक जाहिरात पाहिली "घर घेण्याची सुवर्णसंधी !! हाकेच्या अंतरावर १५ लाखात घर ...." ( तळटीप: फक्त 'हाक' घराच्या जवळ जाऊन मारायची आहे). तर एका Odonil air freshnerच्या जाहिरातीत एक बाई ओडोनीलच्या सुगंधी वासामुळे बाथरूममध्येच बसून राहावेसे वाटते असं म्हणते. ("वाटल्यास ओडोनीलची एक वडी हॉलमध्ये ठेव ग बाई आणि तिथे बस....🙏" , असा निरोप मी पाठवला आहे तिला ). करोनाच्या काळात आम्हाला औषधे घरी मागवायची सवय लागली आहे. त्याचे पैसे कोरिअरवाल्याला द्यायच्या आधीच मेडिसिन्स मिळाल्यावर मी हल्ली औषधाचे खोके घेऊन
अलीकडे माझं पुस्तक-वाचन खूप कमी झालंय हे खरंय. पण नुसत्या एका गुगल सर्चने आपल्याला पाहिजे त्या विषयांवरील पाहिजे तेव्हढे literature आज आपल्याला घरबसल्या वाचता येते, जे एरवी नुसते मिळविण्यासाठी आपल्याला कदाचित ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी लावावी लागली असती. तसेच त्या त्या विषयावरील माहितीपूर्वक YouTube बघता येतात. मग तो एखादा आंतरराष्ट्रीय घडामोडीचा विषय असो, राजकारणाचा विषय असो, चित्रपटावर चर्चा असो, अध्यात्मिक प्रवचन असो, व्यवस्थापकीय विषय असो किंवा मान:शास्त्रीय विषय असो. ह्यामुळे निश्चितपणे आपल्या ज्ञानकक्षा रुंदावतात. तसेच योग्य त्या व्यक्तीशी हे सर्व शेअर देखील करू शकतो. गुगल सर्चचे तीन महत्वाचे फायदे आहेत. १) ही सर्व्हिस तूर्तास तरी विनामूल्य आहे. २) तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट अतिशय intelligently तुम्हाला सर्च दाखवतो. एरवी पुस्तकांची पानेच्या पाने आपल्याला हव्या असलेली गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला पाहावी लागली असती ३) जवळपासच्या आणखी काही उपयुक्त लिंक्स देखील तुम्हाला गुगल सर्च आपणहून देते. शास्त्रीय संगीतातील मला आवडणारे नवे जुने कलाकार मी तासन्तास ऐकत बसतो. त्यामुळे आपल्यावर खूप सुरेल संस्कार होतात. हे मी आपल्याला खात्रीने सांगतो. (अर्थात गुरुमुखी विद्येला हा पर्याय नाही हे नक्की !). तसेच मला हव्या असलेल्या बंदिशी देखील मी कित्येक वेळा Youtube वरून आणि स्वरगंगा ह्या वेबसाइटवरून बसवतो. पूर्वीच्या काळी एखादी बंदिश हवी असेल, तर बिचार्या शिष्याला त्या त्या गुरुमागून किंवा गवयामागून भटकावे लागे. डिजिटल क्रांतीचा संगीताला आणि पर्यायाने आपल्याला झालेला हा केव्हढा मोठ्ठा फायदा आहे, नाही का ?? माझ्या मुलतानी रागावरच्या लेखात मी निदान १०-१५ वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या मुलतानीचा उल्लेख केला आहे. ते बसल्या जागी केवळ Youtube मुळे ऐकणे शक्य झाले. ते कशाला, पण ब्लॉग लिहिण्यासाठी मी डायरेक्ट ऑनलाईन टायपिंग करू शकतो. त्यामुळे खाडाखोड करावी लागत नाही. (अक्षरही सुवाच्य येते 😃). तसंच आपण लिहिलेलं सगळं एका ठिकाणी save करता येणं शक्य आहे. काही कारणांमुळे पूर्वी मिस केलेले कितीतरी सिनेमे, नाटके मी मोबाईलवर पाहू शकलो. २०१४ मध्ये नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मी लगेच जर कुठली गोष्ट केली असेल, तर दिड महिन्यात ४० जुने चित्रपट मी पाहिले. शाम बेनेगल , गोविंद निहलानी, नासिरुद्दीन शाह , स्मिता पाटील , शबाना , ओम पुरी , गिरीश कर्नाड वगैरे थोर व्यक्तींनी साकारलेले हे चित्रपट होते. एव्हढेच काय पण मोबाईलवर असल्यामुळे ह्या चित्रपटातील काही दृश्ये देखील मी डायलॉग्ससाठी, अभिनयासाठी किंवा गाण्यांसाठी पुन्हा पुन्हा पाहू शकलो. हे पूर्वी शक्य होतं का ..?? ह्यामुळे चित्रपटाची कलाकृती किती 'मोठी' होती ह्याचेही चांगले आकलन होते. करोनाच्या दीड वर्षांच्या काळात मी जवळ जवळ ८० नवीन -जुने चित्रपट बघितले. गाईड आणि ट्रेन टू पाकिस्तान सारख्या चित्रपटांचे तर मी मूळ पुस्तकही online वाचू शकलो. परमेश्वराने दोन हातांनी द्यायचं ठरवलं आहे. तुम्ही बघा काय घ्यायचं ते. हल्ली सर्व सिनेमांमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाची सिनेमॅटोग्राफी केली जाते, तीही डिजिटल टेक्नॉलॉजिमुळेच. तसेच Sound ह्याविषयावरील तंत्रज्ञानही तितकेच पुढे गेले आहे. त्यामुळे चांगले चित्रपट पाहायला खूप मजा येते. काही चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांसाठी मी माझी स्वतःची यु ट्यूब लायब्ररी बनविली आहे. त्यावर क्लिक करून मला पाहिजे तेव्हा मी ते गाणे मनसोक्त पाहून पून:प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. नेट बँकिंगमुळे आपली सर्वांची किती सोय झालेय याचा हिशेब करता येणार नाही. ( करोनाच्या दिवसात तर अधिकच !! ) अर्थात ह्या नेट बँकिंगमुळे आपल्याला महाराष्ट्र बँकेचा जिव्हाळा मात्र अनुभवता येत नाही. (ह्या जिव्हाळ्यापोटीच तुम्हाला ह्या बँकेत अर्धा तास थांबल्याशिवाय एके काळी पर्याय नव्हता😀). कुठलंही नवीन gadget आपण विकत घेतलं, तर त्याचे installation आणि troubleshooting तुम्हाला वेबवर मिळू शकते. हल्ली वेगवेगळ्या विषयांवरची ट्रेनिंग किंवा वर्कशॉप्स असतात, जी आपण घरबसल्या अटेंड करू शकतो. Self development साठी ह्या खूप उपयुक्त सुविधा आहेत. एका अर्थी इंटरनेट ,मोबाईल आणि संगणक ह्या माध्यमांचा हा constructive उपयोग आहे असं मला वाटतं. वैद्यकीय शास्त्राच्याही खूप उपयोगी वेबसाईट्स आहेत. गेले वर्षभर मला चित्रकलेचा छंद लागला आहे. त्यासाठी मला लागणारी चित्रे तसेच demos मुबलक प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ज्याचा मी स्वतःच्या प्रगतीसाठी खूप फायदा करून घेतला आहे .फेसबुकवर पुस्तकप्रेमी , शास्त्रीय संगीत, पैंटिंग्जचे खूप छान छान ग्रुप्स आहेत, ते मी जॉईन केलेत. विकिपीडियावर आपल्याला बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींची, प्रसंगांची, घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळते. सिमी गरेवालच्या Rendezvous ह्या कार्यक्रमात अतिशय सुंदर मुलाखतींचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांची महाभारतावर, भागवतावर, रामायणावर माहितीपूर्ण प्रवचने आहेत. अशा एक ना अनेक गोष्टी महाजालावर आपल्यासाठी हात जोडून उभ्या आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगतो, Sky is the limit !! हे सर्व निर्माण करणाऱ्या अखिल विश्वातील समस्त संगणक शास्त्रज्ञ, उद्योजक, व्यवस्थापक आणि अभियंत्यांना आपण त्रिवार सलाम ठोकलाच पाहिजे.🙏🙏🙏
अर्थात, आपण कलियुगात असल्यामुळे जिथे वरदान आहे तिथे कुठेतरी शापही असणारच !! हॅकींग, दुसऱ्याच्या अकाउंटमधले पैसे परस्पर लंपास करणे, सायबर अटॅक, डिजिटल माध्यमातून चुकीची माहिती किंवा अपप्रचार करणे, पॉर्न , सततच्या मोबाईल वापरामुळे व्यसनाधीन होणे, डोळ्यांचे अनारोग्य, शारीरिक चलनवलन कमी होणे इत्यादी गैरवाजवी गोष्टी फैलावत आहेत. डिजिटल माध्यमे वापरणाऱ्यांनी ह्याबाबत सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. माध्यमांमधले काय घ्यायचे आणि काय नाही हे कळलं नाही, तर परिणाम उलट होऊ शकतो . तरी सावधान .... !!
वरील लेखात मी फक्त सर्वसामान्य जीवनात मला आलेले ह्या टेक्नॉलॉजिचे वैयक्तिक अनुभव नमूद केले आहेत. डिजिटल टेक्नॉलॉजिचा वापर फक्त नित्य जीवनात नाही, तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. संरक्षण खाते, अवकाश संशोधन संस्था, intelligence , वैद्यकीय रोगचिकित्सा आणि उपचार पद्धती यांसारख्या अनेक क्षेत्रात डिजिटल टेक्नॉलॉजिचा वापर चालू आहे. फेस डिटेक्शन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, IOT ह्यासारख्या अनेक आधुनिक शाखांमध्ये संशोधनाला नुसता हुत आला आहे. परदेशात काही कारखान्यांमध्ये अजिबात मानवी श्रम न वापरता फक्त रोबो वापरून उत्पादन काढले जाते. मला कोणीतरी सांगितले कि हल्ली राजीनामा द्यायलाही कंपनीत जावे लागत नाही. त्यासाठी एक वेगळे पोर्टल असते म्हणे. (हल्ली हा पोर्टलपणा फारच वाढत चालला आहे एकंदरीत. पुढील काही वर्षांत कदाचित ड्रायव्हर शिवाय गाड्या चालविल्या जातील. भारतात सध्या इस्राएलने विकसित केलेले पेगासस स्पायवेअर वापरून देशातील काही अतिविशिष्ट व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचा संकल्प सरकारने केल्यामुळे गदारोळ उठला आहे. (काही राजकीय लोकांची खूपच तंतरली आहे असं ऐकतोय). आजच मी skull mapping ह्या विषयावरील एक ब्रसेल्स एअरपोर्टबद्दल क्लिप पाहिली. एका पेंटिंगमध्ये चित्रित केलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक व्यक्ती चित्रापासून विलग होते आणि पेंटिंगच्या बाहेर पडून सगळीकडे विहार करते. असे ही क्लिप दाखवते. ह्यासाठी अत्यंत प्रगत अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. थोडक्यात काय, डिजिटल टेक्नॉलॉजिमुळे ज्ञानाच्या शाखा आणि कक्षा अधिकाधिक रुंदावत चालल्या आहेत. ह्या क्रांतीमुळे आपल्या जीवनात विलक्षण वेगाने होणारे बदल आपण रोज अनुभवत आहोत.
प्रगतीची वाट दिसत असेल तर, प्रत्येकाला परवडेल अशा डिजिटल माध्यमांना आपण दोन हातांनी सकारात्मक मानसिकतेने स्वीकारायला काय हरकत आहे ...??
विकास जगन्नाथ कात्रे , ठाणे
मोबाईल: ९८३३६१०८७५
विशेष आभार : ह्या विषयावरील माझे मर्यादित ज्ञान लक्षात घेता, लिखाणासंदर्भात योग्यायोग्यतेचे मार्गदर्शन माझा मुलगा विभव याने केले. त्याने काही ठिकाणी केलेल्या सूचना मी लेखांत अंतर्भूत केल्या आहेत. माझे उद्योजक मित्र आणि संगणक तज्ञ् श्री किरण आंबर्डेकर यांचेही मदतीबद्दल आभार !!
00000******00000
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteधन्यवाद !!
DeleteEnjoyed reading this.
ReplyDeleteधन्यवाद !!
DeleteVikassinh
DeleteYou have done Sinhavlokan of last almost 30 YEARS in APT Words
Great
CHANGE IS INEVITABLE
Khup Chan lihila aahe ha lekh
Shreeram
Thank you much Swativeera !! Ambadnya...🙏
Deleteविकास केवळ अप्रतिम लेख, प्रत्येक गोष्टीचे अप्रतिम, अभ्यासपूर्ण लेखन, तुझ्या स्मरण शक्तीला सलाम.
ReplyDeleteथॅंक्यु शिरीष !!
Deleteसुंदर लिखाण!
ReplyDeleteअप्रतिम,सुंदर,परिपूर्ण लेख,उपमादि अलंकार व नरम विनोदाच्या फोडणीने लेख अत्यंत खुमासदार व दिलखुलास झाल्याने वाचनीय झाला आहे. असेच लिहीत रहा,मनःपूर्वक शुभेच्छा ,जय गजानन🙏👍
ReplyDeleteअतिशय सुंदर. असाच कायम लिहीत रहा, शुभेच्छा
ReplyDeleteथॅंक्यु जान्हवी !!
Delete