एक संपृक्त नाट्यानुभव...सं. ताजमहाल.. !!
आजवर महाराष्ट्रातील रसिकांनी पौराणिक कथांवर आधारित सं. सौभद्र, मत्स्यगंधा, विद्याहरण यांसारखी अनेक
संगीत नाटके पाहीली. पण ऐतिहासिक नाटक व तेही मुबलक नाट्यसंगीत असलेले निदान मला तरी कदाचित प्रथमच बघायला बघायला मिळाले. हे शक्य झाले ठाण्याचे रसिक संशोधक डॉ. विद्याधर ओक यांच्या लेखणीमुळे !! दहा एक वर्षांपूर्वी त्यांनी जगातले १० वे आश्चर्य मानल्या गेलेल्या ताजमहाल ह्या शुभ्र संगमरवरातील ऐतिहासिक वास्तूसंदर्भात एक मूलभूत संशोधन पूर्ण केले, ज्यामध्ये मोगल बादशाह शाहजहान याने ताजमहाल ही देखणी इमारत बांधली नसून ती ३०० वर्षांपूर्वीच शिवमंदिर असलेल्या एका राजवाड्याच्या स्वरूपात बांधली गेली होती आणि नंतर इस्लामला अनुकूल त्यामध्ये पुष्कळ बदल करण्यात आले, ह्या खळबळजनक सत्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेमके हेच सत्य ( किंवा मध्यवर्ती कल्पना) मुळाशी ठेवून डॉक्टरांनी संगीत ताजमहाल हे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाटक लिहिले आहे. ११ पारितोषिकांसहीत राज्य नाटयस्पर्धेत घवघवीत यश मिळविणाऱ्या ह्या नाटकाचा देखणा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे पाहण्याचा भाग्ययोग मला काल ( १ नोव्हेम्बर २०२३) आला.
इथे मध्यंतर घेण्याची सूचकता दिग्दर्शकाला झाली हे उत्तमच झाले. कारण दुसरा आणि शेवटचा अंक गोहर्-भवानी यांची मोहब्बत, त्यातून बादशहाच्या मनात निर्माण होणारा (किंवा मुळातच खदखदणारा) हिंदू मुस्लीम द्वेष, असफखान -औरंगजेब यांचे विषारी सल्ले आणि सरते शेवटी क्रौर्याचा रक्तरंजित उद्रेक ह्या क्रमाने नाटक उत्कर्षबिंदूला पोहोचते. ह्या नाट्याचा शेवट शाहजहानला झालेल्या अतीव दुःख, निष्फळता आणि पश्चात्तापाच्या भावनेने होतो. असे असले तरी नाटकाचा शेवट मी न लिहिणेच पसंद करेन, कारण अखिल रसिक प्रेक्षकांनी तो स्वतः नाटक बघून अनुभवावा असं मला वाटतं.
लेखकाने विविध प्रसंगात अतिशय कौशल्याने 'नाट्य' पेरले आहे, जसे जन्मात:च मातृशोक झालेली ‘गौहर’
ही अर्भकावस्थेत दाखविणे, मुमताजच्या कब्रस्थानासाठी जमीन मिळविण्याचे नाट्य, मानसिंगचा राजवाडा मिळविण्यासाठी बादशाहाच्याच पदरी वर्षानुवर्षे सेवेत असणाऱ्या इमानदार राणा जयसिंगवर केलेली जबरदस्ती, कलाप्रेमी शहाजहानने खूष होऊन भवानीला दिलेले राजगायक पद, त्याच्या गायनावर लुब्ध होऊन त्याच्यावर जडलेली तरुण गोहरची मोहोब्बत, काहीही करून त्यांना विलग करण्यासाठी बादशहाने असफखन व औरंगजेब यांच्याशी केलेली खलबते इत्यादी. तसेच मुस्लिम (अथवा मोगल) राजांची बेगडी नीति आणि धार्मिक मूल्ये देखील लेखकाने खुबीने वेळोवेळी उघडी केली आहेत. उदा. कब्रस्थनासाठी लागणारी भूमी सौजन्याने घ्यावी ही कुराणात सांगितलेली अट ( परंतु नंतर सोयीस्करपणे ह्या तत्वाशी केलेली प्रतारणा), गुलाबशी प्रेमसंबंध असणारा बादशाह दुसरीकडे बेगमला दिलेला शब्द पाळतो, कुराण आणि अल्लाहचा सारखा उदघोष करणाऱ्या असफखानाने केवळ मुलीच्या असुरक्षिततेच्या भावनेतून गुलाबला दिलेली जलसमाधी, स्वतःची मुलगी हात छाटून घ्यायला तयार असतानाही दिलेल्या शब्दातून मागे न हटणाऱ्या बादशाहची अमानुष कूटनीती इत्यादी.
ह्या नाटकाचे संगीत दिग्दर्शन देखील स्वतः उत्तम हार्मोनियमवादक असणाऱ्या डॉ ओक यांनी स्वतः केले आहे. मला सर्व पदांच्या चाली आवडल्या. विशेष करून दाक्षिणात्य नाटकप्रिया थाटातील नांदी, बागेश्री-अडाना-शहान्याची डुब दिलेला जुगलबंदी स्वरूपातील दरबारी तराणा , मुलतानी, बसंत बहार,
धानी भिमपलास, मिश्र भैरवी मधील चाली खूप आकर्षक होत्या. तालातील वेगवेगळी आघातस्थाने पेरलेला
जुगलबंदीचा
दरबारी तराणा अगदी सर्वसामान्य श्रोत्यांकडून सुद्धा दाद घेऊन गेला. पदांच्या अर्थपूर्ण काव्यरचनाही डॉक्टरांच्याच होत्या. नाटकाचे लेखक, पद्यरचनाकार
आणि संगीत दिग्दर्शक एकच व्यक्ती असणे हा दुग्धशर्करा योग कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यानंतर डॉ.
विद्याधर ओकांच्या रूपात मराठी रंगभूमीच्या इतिहासात तब्बल १३८ वर्षांनी येतोय, ही मोठी घटना आहे.
संगीत ताजमहाल ह्या नाटकाचे ‘कास्टिंग’ फार उत्तम झाले आहे. प्रायोगिक रंगमंचावर नाटक करताना कास्टिंगच्या संदर्भात खूप मर्यादा येतात. कारण हौशी कलाकारांची संख्या मर्यादित असते. आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या परिचयाची असेल ( उदा औरंगजेब , शहाजहान ), तर काम आणखी कठीण होते. आवाजापासून ते कलाकाराच्या चणीपर्यंत जुळवून घ्यावे लागते. संगीत नाटक असेल तर अडचणी आणखीनच वाढतात. कलाकार चांगला गाणारा असला, तरी त्याची कास्ट विशिष्ट व्यक्तिरेखेशी जुळणारी असेलच असे नाही. ( पूर्वी केवळ उत्तम गाण्यासाठी एखाद्या गायक नटाच्या दिसण्यातील वैचित्र्याकडे प्रेक्षक नजर-अंदाज करीत). त्या दृष्टीनें मी ह्या नाटकाच्या कास्टिंगला शंभरात ८० मार्क देईन. सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम वठविल्या आहेत
आसफखान (विजय जोशी ) आणि औरंगजेब ( अनिकेत आपटे ) यांच्या डोळ्यात तर मला मोगल क्रौर्याची चमकही दिसली ( जी कोणे एके काळी कै. प्रभाकर पणशीकर आणि वसंतरावांच्या डोळ्यात मी बघितली होती ). लाल खान , भवानी आणि गौहर ह्या तिघांची गायक नट-नटी म्हणून केलेली कामगिरी नजरेत भरण्यासारखी होती. काही गाण्यांमध्ये हरकती देखील होत्या. आपली व्यक्तिरेखा सांभाळून स्टेजवर उभे राहून त्या घेणे ही काही आसान गोष्ट नाही. शिवाय नाटकात गाण्यातली आवाजी आणि गद्यही सांभाळावे लागते. त्यामुळे हे सर्व शिवधनुष्याइतकं अवजड काम आहे. ह्या सगळ्यासाठी मी दिग्दर्शक श्री मनोहर जोशी यांचे नक्कीच अभिनंदन करेन. मोठ्या स्टेजवरील सहज वावर, बारीक सारीक हालचाली, संवादफेक, टाईमिंग आणि अभिनय ह्या संदर्भात त्यांनी ह्या गुणी कलाकारांना उत्तम मार्गदर्शन केले आहे. ड्रेपरी , प्रकाश योजना आणि विविध प्रसंगांचे सेट्स हे देखील प्रेक्षणीय व परिणामकारक होते. ह्यामुळे प्रेक्षक नाटकाशी लवकर एकरूप होतो हे निश्चित !! संगीत नाटकाचे आयोजन महाकर्म कठीण असते. नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, कलाकारांचा प्रवास इत्यादी असंख्य गोष्टी असतात. ह्या सर्वांचे श्रेय सूत्रधार श्री श्रीनिवास जोशी यांना द्यावे लागेल. आता संगीतसाथ संगतकारांबद्दल दोन शब्द....!! ऑर्गनवादकाला सांभाळाव्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे गाणाऱ्यांच्या पट्ट्या , विशिष्ट जागांवर द्यावा लागणारा खर्ज स्वरांचा भरणा आणि गाणे सुरु होण्याआधी गायकाला द्यावा लागणार लीड !! ह्या सर्व कसोटींमध्ये तरुण वादक आणि डॉक्टर ओकांचा चिपळूण येथे राहणारा शागीर्द अमित ओक पुरेपूर उतरला. तसेच तरुण तबला वादक प्रथमेश शहाणे यांच्या डौलदार ठेक्याने आणि लग्ग्यांमुळे सगळी पदे उत्तम झाली. एकंदर पाहता, खल्वायन रत्नागिरी ने निर्मिती केलेल्या ह्या नाटकाचा कालचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला , असेच मी म्हणेन. प्रेक्षकांनी मात्र अजून उपस्थित राहून खूप प्रतिसाद देणे आवश्यक आहे. तरच महाराष्ट्राची शान असणाऱ्या संगीत नाट्यकलेला खऱ्या अर्थाने उजाळा मिळेल. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा !!
विकास कात्रे , ठाणे
(ता : ०२. ११.२०२३)
***************************** oooooooooo *******************************
Wow! Got to see it next time I visit
ReplyDelete