एस. एल. भैरप्पा लिखित "आवरण"
ह्या कादंबरीचे रसग्रहण
"विस्मरणाने सत्य
झाकोळून टाकणाऱ्या मायेला 'आवरण' म्हणतात !!"- डॉ. एस . एल. भैरप्पा
कादंबरीचे रसग्रहण लिहिताना कथानकाचा गोषवारा तरी निदान द्यावाच लागेल. पुस्तकातील सस्पेन्स जरा उघड केल्यासारखे होते. पण इलाज नाही. भैरप्पांच्या कादंबऱ्यांमध्ये कथानकाला एक प्रकारची खोलीहीअसते. २००९ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी आहे. कर्नाटकातील 'हंपी' ह्या एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीवर आधारित सरकारच्या हेरिटेज विभागातर्फे डॉक्युमेंटरी चित्रित होणार असते. राष्ट्रात मुलतत्ववाद उफाळून आल्याच्या काळात प्रेक्षकांच्या मनांत मुस्लिमविरोधी भावना निर्माण होऊ नयेत, ह्यासाठी हा प्रपंच होता. प्रत्येक सत्ताधारी हा प्रसार आणि प्रचार माध्यमातील आपले विशेष अधिकार वापरून सरकारची खुली किंवा छुपी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असे छोटे मोठे प्रकल्प हाती घेत असते. बहुधा ह्याला कुठलेच सरकार अपवाद नसावे. (अलीकडच्या काळात तर सरकारे निवडणुकीच्या २-३ महिने आधी विशिष्ट नेत्यांचे बायोपिक्स किंवा सरकारच्या एखाद्या संस्मरणीय सामाजिक कामगिरीवरील चित्रपट किंवा पुस्तके जनमताचा कौल आपल्याकडे वळविण्यासाठी मुद्दाम प्रदर्शित करतात, हे आपण नुकतेच पाहिले आहे ).
तर
ह्या 'हंपी' सिनेमाची स्टोरी, स्क्रिप्ट, दिग्दर्शन, स्क्रीन-प्ले रायटिंगची जबाबदारी
सिनेमासृष्टीतील एका मुस्लिम नामवंत
कलाकार दाम्पत्याकडे
दिलेली असते (हे देखील विशेषच !). त्यांचे नाव आमिर आणि रझिया. दोघंही सिनेमा क्षेत्रात काम करायचे. दोघांत
प्रेमाचा धागा निर्माण झाला.
पण धर्म वेगळे. त्यामुळे
दोघांच्याही कुटुंबियांकडून लग्नाला अपेक्षित विरोध झाला. नुसता कुटुंबीयांचा विरोध पत्करूनच नव्हे.... तर
रोष ओढवून आंतरधर्मीय विवाह केलेलं हे जोडपं !! कडव्या
आमिरने लक्ष्मीला धर्म बदलायला लावून
त्यांच्या धर्माप्रमाणे निकाह करायला लावला. लक्ष्मीची रझिया झाली. परंतु थोड्याच काळात धर्माने
प्रेमावर कुरघोडी केली आणि धर्माचे
नियम तथा बंधने पाळण्याबद्दल
दोघांमध्ये कलह होऊ लागले.
प्रत्येकाची स्वतःची बाजू होतीच. आमिरवर
धर्माचा पगडा, तर लक्ष्मीवर स्त्री-स्वातंत्र्याची अस्मिता सवार झाली होती.
थोडीशी तडजोड म्हणून ही
जोडी आमिरच्या आईवडिलांपासून वेगळी राहू लागली. हंपीच्या
मुक्कामात भग्न हिंदू देवळांचा
इतिहास जाणून घेण्याची रझियाला जिज्ञासा उत्पन्न झाली. ह्या जिज्ञासेपोटीच आमिर
आणि रझिया अंतरण्याची प्रक्रिया सुरु झाली. हिंदुस्थानातील
वेगवेगळ्या ठिकाणाची मंदिरे कोणी भग्न केली ह्यावर
दोघांत उहापोह सुरु झाला. परिणामी
हंपीतील भग्न नृसिंहमूर्ती, टिपू
सुलतानचा इतिहास, गोमांस-भक्षण अशा अनेक विषयांवर
तिचे आमीरशी खटके उडू लागले.
रझियाचं मत हळूहळू इस्लामच्या
विरोधात जात आहे, असा
संशय आमिरला येऊ लागला. खरं
म्हणजे तसं काहीच नव्हतं.
ती फक्त सत्य जाणून
घेऊ इच्छित होती.
पण जे सत्य ती
जाणून घेऊ इच्छित होती,
त्यावरील 'आवरण' कासवाच्या पाठीच्या कवच्यासारखे होते. हे
सत्यावरील 'आवरण' किती अभेद्य होते,
ह्याचा साक्षात्कार रझियाला वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत झाला. ह्याविषयीची
सखोल सामाजिक कादंबरी म्हणजे भैरप्पांचे हे वाचनीय पुस्तक 'आवरण'..!!
उत्तम
वाचक असलेल्या माझ्या पत्नीने
अनेक वर्षांपूर्वी भैरप्पांची काही पुस्तके वाचली
होती. त्यातील बऱ्याच गोष्टी तिला अजूनही आठवतात.
ती नेहमी म्हणते की भैरप्पा ज्या
काळात पुस्तके लिहितात, त्याच्या आजूबाजूच्या १५-२० वर्षांचा
सगळा सामाजिक पट तुमच्यापुढे उलगडतात.
ह्या कादंबरीतही त्यांनी २००८च्या आजूबाजूचा
कालखंड सत्याचा आधार घेत कथेच्या
आधारे उलगडून दाखविला आहे. २६. ११.
२००८ चे मुंबईतील सिरीअल
बॉम्बस्फोट आपण कधीच विसरणार
नाही. ते कोणी केले
आणि कुठल्या उद्देशाने केले, ह्यावर पुष्कळ ठिकाणी छापून येऊन गेले आहे.
कितीतरी यु ट्यूब्स आणि
चित्रपटही बनविले गेले. राष्ट्रात मुलतत्ववाद उफाळून आल्याच्या ह्या काळात ही कादंबरी
प्रकाशित करणारे भैरप्पा हे धर्मांध आमिर आणि सत्यप्रिय
लक्ष्मी (तथा रझिया) ह्यांच्या
प्रातिनिधिक संवादांतून आपल्याला बरंच काही सांगून
जातात. ह्यामुळे कादंबरी ही नुसती ललितलेखन
न राहता त्याचे सामाजिक मूल्यही वाढते. नुसती ह्यातील पात्रांची पार्श्वभूमी लक्षांत घेतली, तरी भैरप्पांनी उलगडलेला
सामाजिक पट किती विस्तीर्ण
आहे, हे आपणास कळेल.
कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील कालीनहळ्ळी
नावाचे गांव आणि तिथे
राहणारी लक्ष्मी गौडा ही क्रिएटिव्ह मुलगी,
तिचे बुद्धिमान कन्नडभाषीय वडील नरसिंहअप्पा गौडा,
अमेरिकेत शिकून आलेला पण कट्टर इस्लाम
धर्मीय असणारा तिचा मुलगा नझीर,
बंगलोरमधील मुस्लिम कुटुंबातील एक कलाकार तरुण
आमिर, स्वार्थासाठी सरकारच्या चुलीवर भाकऱ्या भाजून घेणारे, विलक्षण वाक्चातुर्य असणारे आणि
स्वतःला 'समाजवादी' म्हणविणारे बुद्धिजीवी वर्गातील पद्मविभूषण
प्रो. शास्त्री ( पान १४०), इंग्लंडातून
लग्न करून आणलेली त्यांची
आंग्ल पत्नी, सुमार बुद्धिमत्ता असणारी त्यांची मुलगी अरुणा अशी प्रमुख पात्रे
आहेत. लक्ष्मीच्या आंतरधर्मीय विवाहाला अप्पांनी खूप विरोध केला
होता. पण भैरप्पांच्याच शब्दांत
लिहायचे तर "प्रेमात बुडालेल्या प्रेमिकाने उच्चारलेल्या नुसत्या एखाद्या वाक्यात देखील हजारो संशोधकांनी मांडलेलं संशोधन नाकारण्याची शक्ती असते ". परिणामी, लक्ष्मीची सद्सद्विवेक बुद्धी गहाण पडली आणि
आमिरच्या प्रेमाला ती बळी पडली. ह्यामुळे अप्पा दुखावले गेले आणि त्यांनी
लक्ष्मीशी संबंध कायमचे संपविले.
यानंतर योगायोगाने नरसिंहअप्पांची गाठ बंगलोरच्या व्यंकटरामैय्या नावाच्या विद्वान व्यक्तीशी पडली. त्यांच्या शिफारशीवरून अप्पांनी पवित्र कुर्र्रआनचा कन्नड आणि इंग्रजी अनुवाद वाचला. वाचनाचा व्यासंग चालू ठेऊन मुसलमान आणि परदेशी इतिहासकारांनी लिहिलेले प्रवादींवरचे भरपूर साहित्य त्यांनी वाचले. जर्मन, फ्रेंच, इंग्लिश, जपानी आणि भारतीय विद्वानांची भरपूर ग्रंथसंपदा वाचली. अगदी विल ड्युरँड देखील वाचला. काय मिळवायचे होतं अप्पांना हे सगळं वाचून..?? तर त्यांना एक गंभीर कन्नड ग्रंथ लिहावयाचा होता ..... कुठल्या विषयावर ह्याचा साधारण अंदाजच आपण बांधू शकतो. पण त्या आधीच ही सारी ग्रंथसंपदा मागे ठेऊन ते वारले. (इंग्रजीचे फक्त जुजबीच ज्ञान असणाऱ्या अप्पांचे 'अजोड' वाचन हा लेखकाने लक्ष्मीला तसेच पर्यायाने वाचकाला दिलेला एक शॉक आहे. पण अशा अकल्पित गोष्टी घडूही शकतात. ह्यामुळे कादंबरीला कलाटणी मिळाली आहे). ह्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न पडतात ते असे .... १) अप्पांच्या ह्या गूढ आणि गाढ वाचनाचे पर्यवसन त्यांनी लक्ष्मीशी कायमचे संबंध तोडण्यात झाले का..?? २) एव्हढे वाचन करून इस्लाम धर्माकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला का ?? तो उदार झाला असेल, तर त्यांनी लक्ष्मी-आमिरला बोलावून नाते सांधले का नाही ?? ३) उलटपक्षी कदाचित ते अधिक कडवे गांधीवादी बनले असतील का ..?? ४) अप्पांचे प्रस्तुत विषयावर कादंबरी लिहिण्याचे स्वप्न तर लक्ष्मीने नंतर स्वतः कादंबरी लिहून पूर्ण केले नाही ?? ५) कि 'समाज प्रबोधन' हा हेतू ठेऊन, वाचकाला ह्या विशिष्ट धर्माविषयी सर्व गोष्टी कळाव्यात म्हणून देखील लेखकाने कदाचित हा प्रपंच केला असेल...??
अप्पांनी
ह्या धर्माबद्दल जे काही वाचले,
ते मात्र सजगतेने हे खरं, कारण
प्रत्येक पुस्तकाच्या पाना पानावर खुणा
आणि नोट्स होत्या. अप्पांच्या निधनानंतर लक्ष्मीने कालीनहळ्ळी गावालाच मुक्काम ठोकून अप्पांच्या अभ्यासिकेतील एकूण एक पुस्तके
वाचण्याचा सपाटा लावला. वेगवेगळे
ग्रंथ वाचून अप्पांचा घोर व्यासंग ती
स्वतः अनुभवीत होती, अधिक परिपक्व होत
होती. लक्ष्मीला ह्या पूस्तकांमधून इस्लामविषयीचे
सत्य हळूहळू उमगू लागले. ह्या
विषयावर एक कादंबरी देखील
तिने स्वतः लिहावयास घेतली. मोगल सत्ताधाऱ्यांच्या घृणास्पद
इतिहासाच्या नोंदी ह्या कादंबरीत आहेत.
‘आवरण’ कादंबरीच्या
६ व्या, ८ व्या, १३ व्या आणि
१४ व्या प्रकरणात हा
तपशील विस्ताराने आणि कथेच्या स्वरूपात आला
आहे. अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब यांनी हिंदू सरदार आणि त्यांच्या स्त्रियांना
बाटवून इतके अनन्वित अत्याचार
केल्याचे विदारक वर्णन वाचून मन थिजून गेले.
(कदाचित लेखकाचा अलिखित हेतू सफल झाला.
ह्या निमित्ताने भैरप्पा यांचा स्वतःचा वाचन व्यासंग किती
अपरिमित असावा, ह्याचाही अंदाज आला).
आता
थोडे भैरप्पांच्या लेखन शैलीविषयी बोलूयात…..
गावातल्या
एखाद्या व्यक्तीने चाकोरीबाहेरची गोष्ट केली कि त्याचा
लगेच बभ्रा होतो. अप्पांच्या निधनाची वार्ता ऐकून गावात आलेली लक्ष्मी ह्याला अपवाद नव्हती. आंतरधर्मीय लग्नानंतर तिने कित्येक वर्षांनी
गावात पाऊल ठेवले होते,
त्यामुळे जमलेल्या तुरळक गावकऱ्यांनी प्रथमदर्शनी तिच्याकडे डोळे विस्फारूनच पाहिले.
पन्नाशीच्या एका बाईने तिला
विचारले " तूच काय ती
जातीबाहेर गेलेली नरसिंहअप्पाची मुलगीsss ..??". जरी ह्या प्रश्नात
तिरस्कार नव्हता, पण तिची दुखरी
नस दाबली गेली होती. भैरप्पांचा
प्रत्येक महत्त्वाचा संवाद कुठल्या ना कुठल्या मानवी
भावनेने संपृक्त असतो. ह्या
प्रसंगातच त्यांनी लक्ष्मीच्या एका स्वगतातुन ती
किती सुसंस्कृत (डिग्निफाइड) होती ह्याचेही दर्शन
घडविले आहे (पान ३६).
"आपल्याकडील देवालये शत्रूंनी नाही, तर देऊळ बांधणाऱ्या
आपल्या श्रमिकांनीच विद्रोहामुळे नष्ट केली" असा
ऐकीव युक्तिवाद जेव्हा आमिरने मांडला, तेव्हा उत्तरादाखल " ते शक्य नाही
, कारण ही देवळं म्हणजे
श्रमिकांचे निव्वळ बांधकाम नव्हते, तर त्यांच्या श्रद्धा
आणि भक्तीची अभिव्यक्ती होती" असा बिनतोड प्रतिवाद
लक्ष्मी करते. हे वाचल्यावर भैरप्पांच्या
लेखनाची उंची (आणि पर्यायाने कादंबरीची
नायिका असलेल्या लक्ष्मीची बौद्धिक तसेच भावनिक पातळी) लगेच आपल्या ध्यानात
येते. तसेच
प्रसंगी ते असं काही
intense लिहून जातात कि वाचणाऱ्याला धडकीच
भरते. लक्ष्मीच्या लग्नाला केलेला अप्पांचा विरोध जेव्हा टोकाला जातो, तेव्हा ते तिला बजावतात
" तुझ्या पोटी जन्मणारे मुल
आपल्या देवालयाचा नाश करेल. इस्लाम
धर्मीय असलेले जहांगीर , शाहजहान हे हिंदू आयांच्या
पोटीच जन्मले होते. राज्यावर आल्यावर त्यांनी देवळे पाडली". अप्पांची ही तर्कसंगती थक्क
करणारी आहे. ह्यामध्ये राग,
विशिष्ट धर्माविषयीचा विखार, इतिहासाचा अभ्यास, मुलीविषयीची काळजी अशा अनेक भावनांच्या
छटा आहेत. एका ४ ओळीच्या
संवादात भैरप्पा अनेक भावनांचा एक
समुच्ययच दाखवतात.
स्वगत
(Monologue) हे लेखनातील अस्त्र भैरप्पा अतिशय प्रभावीपणे वापरतात. वानगीदाखल ह्या कादंबरीतील अनेक
स्वगतांपैकी दोन स्वगते मी
पुन्हा पुन्हा वाचायला सांगेन. १) हिंदू मंदिरांच्या
झालेल्या नासधुसीवरून आमिर आणि रझिया
यांच्यात झालेले तात्विक भांडण आणि त्यानंतर दोघं
एकत्र न झोपता दोन
वेगवेगळ्या खोल्यात झोपतात, त्यावेळी रझियाने स्वतःशीच केलेला संवाद (पान ९९). २)
बादशहाच्या जनानखान्यात असलेले देवगढ राज्याचे युवराज (ज्यांना जबरदस्तीनं हिजडा बनवले गेले होते ) आणि देवगढवरील
आक्रमणाच्या वेळी जोहार न
करू शकलेली त्यांची धर्मपत्नी शामला यांचा संवाद, व त्यावर युवराजांचे
स्वगत (पान १२४). गाईच्या
गोठ्यात झालेल्या गुप्तभेटीत युवराज्ञी शामलाने युवराजांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर
त्यांना बुचकळ्यात टाकते. त्यावरील स्वगतात ते म्हणतात कि
“स्त्रियांच्या मनाचा ठाव कुणाला लागलाय
??” भैरप्पांना जर हा अनुभव
आला असेल, तर आमच्यासारख्या सर्वसामान्य
पुरुषांचे काय ?? (पान १२७)
जसे जाता जाता लेखक मोगलांच्या इतिहासातील क्रौर्य पुराव्यासहीत वाचकांच्या नजरेस आणतात, तसेच अजून काही संवेदनाक्षम गोष्टी अप्रत्यक्षपणे वाचकांपर्यंत पोचवतात. सरकारने महान अकबर आणि राष्ट्रवीर टिपू ही दोन नाटके बसवून विविध ठिकाणी सादर करण्याचे काम आमिरला दिले आहे. म्हणजे आपल्याकडील सरकार हे माध्यम यंत्रणांचा उपयोग कसा आणि कशासाठी करते हे ह्यामध्ये अप्रत्यक्षपणे ध्वनित केले आहे. ही नाटके सादर करण्यात सरकारचा Hidden agenda काय असेल, हे २ वर्षांचे छोटे पोर सुद्धा सांगेल. (विशिष्ट समुदायाचा अनुनय करणारे हे सरकार कुणाचे असावे, हे देखील वेगळे सांगायला नको). आजपर्यंत भारतातील कित्येक निष्ठावंत समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक आपण पाहिले आहेत. पण काही जण स्वतः 'समाजवादी' असण्याचे बिरुद मिरवून बाहेरून परोपकारी मुखवटा पांघरून, आतून मात्र त्यांची स्वार्थी, कुटील आणि समाज विघातक कृत्ये चालू असतात.( अशा मंडळींचे उद्योग कसे चालतात, ते माहिती करून घेण्यासाठी सच्चीदानंद शेवडे यांचे 'डावी विषवल्ली' हे पुस्तक जरूर वाचावे). अशा ढोंगी मंडळींचा यथेच्छ पर्दाफाश भैरप्पांनी प्रो.शास्त्रींचे पात्र रंगवून केला आहे. ह्या स्त्री -लंपट गृहस्थाने कुठल्या का हेतूने होईना , पण कित्येक वर्षे लक्ष्मीला(उर्फ रझियाला) पाठिंबा दिला. पण ऐरणीच्या वेळी तो गुप्तता राखून चतुराईने काढून घेऊन घात केला. एव्हढेच नव्हे तर, सत्यप्रिय रझियाला सरकारने अटक करावी अशी व्यवस्था केली. पद्म पुरस्कार विभूषित असलेल्या ह्या व्यक्तीच्या आचार विचारातील विरोधाभास भैरप्पांनी येथे अधोरेखित केला आहे.
समाजविरोधी प्रवृत्तींवर लेखकाने जागोजागी नेमके बोट ठेवलेले दिसते.
भैरप्पा
एखादी गोष्ट कोणाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवतील काही नेम नाही.
मोगलसराईतील विश्वनाथ शर्मा ह्या एका जातीने
ब्राह्मण असलेल्या सायकल रिक्षावाल्याने लक्ष्मीला वाराणसीला सोडताना मोगलांनी, इंग्रजांनी आणि आता मतांचे
राजकारण करणाऱ्यांनी ब्राह्मणांचे उच्चाटन करण्याचा विडा कसा उचलला
आहे, ते एका छोट्या संवादरुपी
परिच्छेदात सांगितले आहे. सामाजिक पट उलगडण्याचे भैरप्पांचे
कसब केवळ अफलातून आहे
(Pg175). येणाऱ्या परिस्थितीनुसार माणसांच्या मनातील आस्तिक्य आणि नास्तिकत्व यांच्या
आंदोलनांनी निर्माण झालेली द्विधा मनस्थिती देखील युवराजांच्या व्यक्तिरेखेवरून लेखक आपल्यापर्यंत पोचवतात.
कादंबरी ही ललितलेखन प्रकारात
अंतर्भूत असल्याने लेखकाला खूप स्वातंत्र्य असते.
असे असले, तरी भैरप्पा उगीचच कृत्रिमपणे गोष्टी घडवून आणत नाहीत. त्यांनी
विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी घातलेले संवाद, वाक्य, शब्द अगदी तोलून
मापून आणि अर्थवाही असतात. त्या दृष्टीने मला
ते वास्तववादी वाटतात. ह्या कादंबरीचे कथानक
देखील वास्तववादी आहे. माणसाच्या मनाचा
अगदी तळ गाठण्याची भैरप्पांची
क्षमता आहे आणि ती
ते पुरेपूर वापरतात. कुठलाही संवाद ओढून ताणून लिहिलेला
तुम्हाला दिसणार नाही. ‘उत्तम निरीक्षण शक्ती’ हा देखील त्यांच्या
लेखनाचा गुणविशेष आहे. "गाडीमध्ये शेजारच्या सीटवर ठेवलेला रक्षाकलश लवंडणार नाही, अशा प्रकारे काथ्याने
नीट बांधला". लेखकाने उभं केलेलं वास्तव
कुठल्या स्तराला जातं बघा. (रक्षकलश
हाताळताना राखायचे अनन्यसाधारण पावित्र्य सांगताना, कोकणात किंवा गावाकडे वस्तू बांधायला दोरी नाही तर
काथ्या वापरतात, हे देखील त्यांच्या
नजरेतून सुटलेले नाही). हा असाधारण कादंबरीकार
एखाद्या प्रसंगाचे
वर्णन करताना कुठल्या कुठल्या बाबतीत लक्ष घालतो , ते
पाहून मन अचंबित होते.
एके ठिकाणी दिल्ली ते वाराणसी घोडदळाने
जाण्याचा मोंगलांच्या काळातील मार्ग (route ) सांगताना भैरप्पांनी वाटेत लागणाऱ्या चौदा एक स्थानकांचा
उल्लेख केला आहे. ह्यातील
बरीच गावे मी ऐकलेली सुद्धा नाहीत. वाचक कथानकात गुंतून
गेला नाही तरच नवल
..! मला तरी ह्याचं अप्रूप
वाटलं . समाजात रुतलेले जेंडर-बायस बारीक सारीक
गोष्टीतून भैरप्पा सहजपणे दाखवतात. उदा. " पुरुषांच्या दृष्टीनं पांढरे केस हे वृद्धत्वाचे
निदर्शक नाहीतच. बायकांचं तसं नसतं "(Pg २).
किंवा " ‘बेफिकिरी’ हेच पुरुषांचं नटणं
मुरडणं असतं का ?? स्त्रियांना
याचंच आकर्षण वाटतं का ??" अशी काही अर्थपूर्ण
वाक्ये वाचनात येतात आणि आपण भैरप्पांच्या
प्रेमात पडतो. प्रयोगशीलता हे भैरप्पांचं अजून
एक वैशिष्ट्य !! ‘आवरण’ ह्या कादंबरीत लक्ष्मीने
लिहिलेली एक वेगळी कादंबरी
अंतर्भूत आहे. हे gimmick मात्र
नाही. ह्यामधून मोंगलांच्या क्रौर्याचा, काशी विश्वेश्वराचे मंदिर
जमीनदोस्त करण्याचा आणि बाबरी
मस्जिदीचा इतिहास ते आपल्याला सांगतात.
ही कादंबरी म्हणजे लक्ष्मीचे मोगलांच्या आणि इस्लामच्या इतिहासावरील चिंतन आहे. तिच्यामध्ये उत्पन्न
झालेल्या विखाराचे ते प्रतीक आहे.
चांगला लेखक एक वेळ
स्वप्रतिभेने चांगली कादंबरी किंवा पुस्तक लिहिल. पण दुसऱ्याच्या भूमिकेत
जाऊन वेगळ्या विषयावर कादंबरी लिहिणे, हे आणखीनच अवघड
आहे. इथे भैरप्पांची प्रतिभा
गुणात्मक दृष्टीने काही
अंशी आणखी पुढे सरकली
आहे असंच मी म्हणेन.
(जरी हा प्रयोग मला
फारसा भावला नाही. एका कादंबरीतून दुसऱ्या
कादंबरीत जाताना वाचनात निर्माण झालेला 'छंद' तात्पुरता खंडित
होतो, असं मला वाटलं).
असो !
मूळ
कन्नड कादंबरीचा अप्रतिम मराठी अनुवाद सौ उमा कुलकर्णी
यांनी केला आहे. त्यांचे
मराठी भाषासौंदर्याचे आकलन आणि संस्कार ‘कमाल’
आहेत. त्यांच्या काही शब्दयोजना पाहिल्या कि वाचकाच्या हे
लगेच लक्षात येते. भावना आणि त्यांच्या छटा
दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्या त्या दर्जाने
पोहोचविणे हा भाषेचा मूळ
हेतू असतो. दात विचकणे , पाठ दुखणेच्या ऐवजी पाठीला
रग लागणे , सिगारेट ( पेटविणेच्या ऐवजी) शिलगविणें, भावनात्मक तादात्म्यता, शक्तिशालीच्या बदली ‘वीर्यवंत’
ह्यासारख्या शब्दयोजना आपल्याला त्या प्रसंगाजवळ घेऊन
जातात आणि कादंबरीचा दर्जाही
सांभाळतात. मला भैरप्पांच्या मंद्र
आणि आवरण ह्या कादंबऱ्या
आवडण्यामागे उमाताईंचा देखील सिंहाचा वाटा आहे. मंद्र
कादंबरीवरील माझ्या लेखातही ही गोष्ट मी
लिहिली होती. त्यांना शतशः धन्यवाद !!
ले: विकास कात्रे, ठाणे
भ्रमण ध्वनी: 9833610875
--------------------------------------------****00000****----------------------------------------
फार छान पुस्तक परीक्षण!!
ReplyDeleteकात्रे साहेबांनी पुस्तक वाचताना पूर्ण समरस होऊन वाचले आहे याची साक्ष म्हणजे हा लेख होय.
असे वाचक मिळणे ही लेखकांची गरज असते.
लेखकाची समरसता वाचकाने अनुभवणे म्हणजे "तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे" याची प्रचितीच असते.
शतेषु जयते शूरः सहस्रेषु च पण्डितः।
वक्ता दशासहस्रेषु दाता भवति वा न वा॥
या प्रसिद्ध सुभाषितांमध्ये
" वाचक एक लाखेशु" असे घालायला प्रत्यवाह नसावा.
धन्यवाद कात्रे साहेब
फार छान
नमस्कार प्रसन्नदादा, तुमची दाद अत्यंत सह्रदयतेने दिलेली, मर्मग्राहि, आणि माझा लेखन आणि वाचनाचा उत्साह वाढविणारी आहे. खूप खूप धन्यवाद..!! 🙏
Delete