‘सं. मीरा मधुरा’ नाटकाचा रसास्वाद…!
"मी लिहिलेलं माझं सर्वात आवडतं नाटक 'मीरा...मधुरा' !! नाट्यरूपानं रंगमंचावर प्रकट झालेलं ते एक मधुर भावकाव्य आहे .... "- कै. प्रा. वसंत कानेटकर
२ महिन्यांपूर्वी मी पुण्याच्या सौ. शैला मुकुंद यांनी लिहिलेलं कै.पं. जितेंद्र अभिषेकी यांचं सुंदर चरित्र वाचलं. ते वाचताना बुवांनी संगीत दिलेली 'हे बंध रेशमाचे' आणि 'मीरा मधुरा' ही संगीत नाटके मी पाहू शकलो नाही ह्याची खंत लागून राहिली. पण स्वतः कानेटकरच म्हणाले होते कि "काही नाटकं रंगमंचावर प्रयोग करण्यासाठी नसतातच. ती एकांतात बसून वाचावीत आणि मनाच्या रंगमंचावर रंगत असलेलीच पाहावीत. म्हणून मीरा मधुरा मला जास्त आवडते ". असं म्हणून जणू काही त्यांनी माझ्या मनावर एक प्रकारची फुंकराचं घातली. मात्र आपण हे नाटक आपल्याला निदान वाचायला तरी हवं असंही वाटलं. म्हणून तिरीमिरीने मी लायब्ररीतून पुस्तक आणलं आणि हे नाटक खरोखरच मनाच्या रंगमंचावर पाहिलं , अनुभवलं. त्यातील मीरा आणि भोजराजाचे डायलॉग पुन्हा पुन्हा वाचले, अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली गाणी पुन्हा पुन्हा ऐकली आणि आनंदात न्हाऊन निघालो. त्यामुळे ह्या सुंदर नाटकावर मी काही लिहिलं नाही तरच नवल .... !!
मीरा आणि भोजराजाची ऐतिहासिक कथा वाचकांच्या कदाचित परिचयाची असेल. तरी ह्या नाटकाचं कथानकथोडक्यात सांगतो. मेवाडचे युवराज भोजराज हे राजस्थानातील मेडत्याला राहणाऱ्या मीरेच्या कृष्णभक्तीची, लावण्याची आणि काव्यप्रतिभेची कीर्ती ऐकून खूप प्रभावित झालेले होते. एक दिवस थोड्याफार उतावीळ मनस्थितीत स्वतःची ओळख लपवून तिचे दर्शन घेण्यासाठी ते मेडत्याला येतात. मीराबाईचे ठाकूरजींशी ( म्हणजे खुद्द श्रीकृष्णाशी ) जे काही अतींद्रिय (transcendental) नातं होतं, त्यानुसार कृष्णाशी झालेल्या अदृश्य संवादामुळे मीरा ह्या दोघांनाही कुणीही काहीही न सांगता आधीच ओळखते. एव्हढेच नव्हे, तर मागोमाग राजकुलातील भोजराजांचे अजूनही काही नातेवाईक येणार आहेत असेही ती भाकीत करते, ज्याची कल्पना खुद्द युवराजांनाही नसते. हा चमत्कार पाहून भोजराज व साथीदार कालिया दोघेही अचंबित होतात. (इथे आपल्याला अद्भुत रस जाणवतो). अदृश्य असलेल्या कृष्णाकडून श्रवणातीत ध्वनीलहरींद्वारे सगळी बित्तंबातमी मीरेकडे पोचत असते. अर्थातच मीरेशी विवाह करण्याचा भोजराजाचा अंतस्थ हेतूदेखील तिला खुद्द युवराजांनी सांगण्याच्या आधीच कळलेला असतो. कुलकन्येच्या (अर्थात महाराणीच्या) निवडीचे सगळे राजकुलातील निकष आणि रीतिरिवाज
हे
झालं कथानक!! 'नाटक' हे एक असं माध्यम आहे, कि जे 'कथानक'
नाट्यमयतेने प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचं काम करते. नाटकाचे
संवाद हे वेगळ्या पद्धतीने
लिहावे लागतात, कारण कलाकार श्रोत्यांपासून
खूप लांब असतो. श्रोत्यांवर
प्रभाव पडण्यासाठी नाटकाची भाषा थोडी वेगळी
म्हणजे जोशपूर्ण, अलंकारिक आणि नाट्यपूर्ण असावीच
लागते. हे काही बंधन
किंवा अट नाही. उलट
'नाटक' हे माध्यम नाटककाराच्या
प्रतिभेला साद घालतं, अभिव्यक्तीचं
आवाहन देतं. सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक/नाटककार कै. वसंतराव
कानेटकरांनी ह्या नाटकातील नाट्य
कसे कुशलतेने फुलवले आहे ह्याची काही
उदाहरणे वानगीदाखल पाहुयात...
कुठल्याही प्रियकराला
प्रेयसी प्रथमच भेटणे हा दोघांच्याही दृष्टीने
हुरहूर लावणारा असाधारण गोड क्षण असतो. प्रथमदर्शनी
मीरेने त्याला कसं भेटावं, हे
सांगताना भोजराज त्याचा साथीदार मित्र कालीयाला म्हणतो " अरे, अस्मानात काळेकभिन्न
बादल गडगडून एकमेकांवर तुटून पडावेत, कडकडून विद्युल्लतेचं डोळे दिपविणारं नृत्य
आणि धुवांधार पावसातून चिंब भिजत तिनं
यावं ". ह्या एका वाक्यात
कानेटकर काय काय दाखवून जातायत पहा .... एकतर वरील वाक्य
आणि अपेक्षा भोजराजासारख्या रजपुतालाच शोभणाऱ्या आहेत. मेण्यातून नाजूकपणे बाहेर पडणारी उपवर कन्या त्याला
अपेक्षित नाही. लेखकाने 'ढग'
हा शब्द न वापरता
'बादल' हा नादमय शब्द
योजला आहे (आमच्या शास्त्रीय
संगीतात रचनाकार जशी नादमय शब्दांची
योजना करतो, ज्यामुळे रचनेतील छंद कायम राहतो
). तसेच
वीज न म्हणता ते 'विद्युल्लता' म्हणतायत. आणि भोजराजाच्या रसिकतेचा कळस
म्हणजे 'चिंब भिजलेली ओलेती मीरा त्याला प्रथमदर्शनी अपेक्षित आहे. ‘आनंद सुधा बरसे’
या नंद रागातील रामदास
कामत यांच्या प्रसिद्ध नाट्यगीताची ही पार्श्वभूमी कळल्यामुळे
या गीताची खुमारी अधिक वाढली.
ह्याच्या परस्पर विरोधी भूमिका म्हणजे .. राजघराण्यातील स्त्रीया, राण्या आणि कुलकन्या यांच्या संदर्भातील शिष्टाचार सांगताना भोजराजाचे बंधू विक्रमजीत म्हणतात की शिसोदे वंशातल्या कुलकन्येच्या नखावरली मेंदी सूर्यकिरणांनाही दिसत नाही. (थोडक्यात तिला सोनेरी पिंजऱ्यात ठेवलेले असते). हे फक्त प्रजेला दाखवायला बरं का. खरं म्हणजे ह्या घराण्यातील बरेचसे राजपुरुष १५-२० राण्या बाळगून होते. शिवाय दाई दास्या आणखी वेगळ्याच. पुरुषांना काही बंधनं नाहीत , जी काही आहेत ती बंधने स्त्रियांना आहेत ... मग ती महाराणी का असेना !!ह्या पार्श्वभूमीवर काही जणांनी मीरेच्या ह्या बंडखोरीला 'स्त्री मुक्तीचा पहिला हुंकार' असं संबोधलें आहे. दुसरे म्हणजे विक्रमजीत हा राणी कर्मावतीचा म्हणजे भोजराजाच्या आईचा नसलेला मुलगा. ह्या दोघांनी राजसिंहासनाच्या लोभापायी भोजराजावर खूप अन्याय केला होता. असो!) भोजराजासारखा रसिक आणि कवीमनाचा माणूस ह्या रणधुरंधर पण सकृतदर्शनी कर्मठ वाटणाऱ्या घराण्यात कसा जन्मला, हे एक आश्चर्यच आहे. कमलपुष्पाप्रमाणे ‘रसिकता’ ही देखील कुठे उगवेल सांगता येत नाही. सत्वगुणांनी युक्त असलेली मीरा ही उत्तम कवयित्री, सुरेल गायिका,योगिनी आणि नृत्यांगना देखील होती. नाट्यरसाचा परिपोष करण्यासाठी मीरा आणि भोजराजा यांच्यातील एक संवाद कानेटकरांनी पान १६ वर टाकला आहे. " युवराज , हा कृष्ण म्हणतो आहे कि जर आपण मला वरलेत, तर तुमच्या घराण्याची इज्जत .... वंशाची सगळी प्रतिष्ठा उन्मळून पडेल ... धुळीला मिळेल". एका परीने सगळ्यांचे सगळेच माहित असलेला श्रीकृष्ण अप्रत्यक्षपणे मीरेबाबत भोजराजाला सावधच करतो आहे . कारण कृष्णापासून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ देखील लपून राहत नाही. (सुविख्यात लेखिका अरुणाताई ढेरे लिखित कृष्णाकिनारा ह्या पुस्तकातील राधा, द्रौपदी आणि कुंतीने कृष्णाला ह्या संदर्भात विचारलेले वेगवेगळे बौद्धिक प्रश्न ह्या प्रसंगी आठवले). तसेच एके ठिकाणी कृष्णाची बासुरी ऐकून मीरा बेभान होऊन गाणं गात नृत्य करते आणि बेहोष होऊन मंदिराच्या पायरीवर कोसळते. (भक्तीची परिसीमा आणि नाट्य). नेमके ह्याच क्षणी राजकुलातील भोजराजाचे नातलग अचानक दत्त म्हणून हजर होतात (नाट्य )- पान नंबर १७. कुठे विक्रमजिताची कुलकन्येविषयीच्या अपेक्षा आणि कुठे हे मीरेचे जराही भान नसलेले उघड्यावरील नृत्य !! इथे विरोधाभासातून लेखकाने नाट्य निर्मिले आहे. अशा अनेक प्रसंगातून आणि भाषेतून ठिकठिकाणी आपल्याला लेखकाची प्रतिभा जाणवत राहते.
अजून
एक नाट्यमय प्रसंग ...
मीरेच्या बेताल वागण्यामुळे, भोजराजाचे आप्तेष्ट आणि दरबारचे मंत्री यांनी जेव्हा दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव भोजराजापुढे ठेवला, तेव्हा मला अगदी हुबेहूब मीरेसारखीच दुसरी उपवर दुहिता असेल तर तिच्याशी नक्की विवाह करायला आवडेल, असे भोजराज म्हणतो. (अप्रत्यक्षपणे त्याचा हा नकारच असतो,हे सुज्ञास सांगणे न लगे ). त्याला अपेक्षित असलेल्या सौभाग्यकांक्षिणीचे निकष तो एका अप्रतिम नाट्यपदातून सांगतो. हे नाट्यपद मी पूर्वी कितीतरी वेळा ऐकले आहे. पण नाटक वाचताना कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी संपूर्ण मालकंस हा रागात बेमालूमपणे बांधलेल्या आणि रामदास कामत यांनी बरहुकूम गायलेल्या ह्या पदाची उत्कटता आज खऱ्या अर्थाने माझ्या प्रत्ययास आली. ह्या सर्वांमुळे मीरेवर असणाऱ्या भोजराजाच्या उत्कट प्रेमाचा मला तर हा उत्कर्षबिंदूच वाटतो. हे पद मला आपल्या रसास्वादासाठी मुद्दाम इथे उद्धृत करावेसे वाटते.…..
अशी
सखी सहचरी प्रणयिनी, शिवसुंदर मोहिनी ..
वरीन
मी तीच जन्मजोगिणी II
अंतरा
वीज
कडाडे नयनी एका, दिठीत दुसऱ्या शरद चंद्रिका,
सूर
जिचे मज जाळीत जाती. आणि फुले कमलीनी II
संपूर्ण मालकंस हा खरं म्हणजे अनवट राग !! ( कशाळकर गुरुजींनी आम्हां सर्व विद्यार्थ्यांकडून तो अगदी छान घोटून घेतला आहे. त्यामुळे त्यातील सौंदर्याचा आस्वाद कितीतरी वेळा तो गाऊन वेगवेगळ्या तऱ्हेने घेता येतो). अशा अवघड रागात अनाघाती अंगाने झपतालात अप्रतिम चाल बांधून ती पॉप्युलर करणाऱ्या अभिषेकीबुवांना संगीतातील वास्तू विशारदतज्ज्ञच म्हटलं पाहिजे. खरं म्हणजे ह्या गाण्यात उत्तम संगीत आणि साहित्याचा एव्हढा गुणसमुच्चय आहे, कि त्यावर एक वेगळा ब्लॉग लिहून होईल. पण हा मोह मी आवरता घेतोय, कारण अन्यथा लेख उगीचच लांबेल.
स्वप्नात पाहिले जे ते राहू देत स्वप्नी या गौड मल्हार रागातील गाजलेल्या गाण्याची पार्श्वभूमीसुद्धा अतिशय रंजक आहे. मीराबाई आपल्याला पडलेले स्वप्न तिची सखी माधवी हिला सांगत असते कि स्वप्नामध्ये तिचे लग्न ठाकूरजींशी म्हणजे कृष्णाची लागलेले आहे . हा संवाद गुप्तपणे ऐकणाऱ्या कवीमनाच्या भोजराजाला इथे काव्यपंक्ती सुचतात ‘तु जे स्वप्नात पाहिले आहेस, ते स्वप्नातच राहू दे. पण माझे मला मिळावे. म्हणजे मीरेची प्राप्ती मात्र कृष्णाला नव्हे, तर मला स्वतःला होऊ दे’. ह्या नाटकातील काही प्रसिद्ध नाट्यपदे अभिषेकी बुवांनी काही रागांच्या जुन्या बंदिशींवर आधारित बेतली आहेत ( ज्या त्यांना स्वरराज छोटा गंधर्व यांनी सांगितलेल्या होत्या - अभिषेकी चरित्र ).
तसेच एरी
मै तो प्रेमदिवाणी, मेरा दर्द न जाने कोय ह्या मीराबाईच्या प्रसिद्ध
काव्यरचनेचा संदर्भ हे नाटक वाचल्यावर
अधिक भावतो.
ह्या
नाटकातून कानेटकरांच्या लेखनाचे आणखी कितीतरी पैलू
वाचकाच्या प्रत्ययाला येतात. प्रस्तावनेत
कानेटकर म्हणतात "लेखनाला हात घालण्यापूर्वीच मला
हेही उमजत होते की, अध्यात्मिक तपस्या व थोर कवित्व
याचा थोडा तरी स्पर्श
घडल्याविना या तरल भूमीवर
झेप घेणे धोक्याचे आहे". प्रत्येक कलाकाराला आपल्याला अभिप्रेत असलेल्या कलाकृतीचा कॅनवास किती मोठा आहे, ह्याची पूर्व कल्पना स्वतःला असावी लागते.
त्यांच्या लेखनाची मला जाणवलेली निवडक वैशिष्ट्ये पुढे नमूद करत आहे. भोजराजाची
तात्विक आणि वैचारिक खोली दाखवताना
त्यांच्या तोंडी एक वाक्य कानिटकरांनी
टाकलेलं आहे; ते म्हणजे
"वेदांत जाणला तर तुलाही कळेल
की प्रत्येक आत्म्याचं परमात्म्याची लग्न लागलेलं असतं".
काही ठिकाणी वक्रोक्ती वापरली आहे. उदा. कृष्ण
हा देव असला, तरी
सवतीमत्सर भावामुळे भोजराजाला मात्र तो खलनायकाप्रमाणे भासतो
आहे. त्यामुळे " कलियुगात या देवाचं देवपण
सुद्धा संपुष्टात आल्यासारखं वाटतं " असे भोजराज ठिके
ठिकाणी म्हणतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मोठ्या लेखकांकडे विविध क्लुप्त्या असतात. कानिटकरांनी पहिल्या अंकात (जो थोडा खेळीमेळीचा
आहे ) नर्म विनोद सुद्धा
काही ठिकाणी पेरला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे
खचितच मनोरंजन होते. जसे, एके ठिकाणी
भोजराज मीरेला म्हणतात "ठाकुरजींनी माझा मित्र असलेल्या
कालियात जसा ‘पेंद्या’ पाहिला,
तसा मला पाहून त्यांना
‘कालीया’चा (नागाचा) तर भास होत
नाही ना..??" असं म्हणून ते
खळाळून हसतात. कानेटकर यांनी भोजराज आणि कालिया यांच्या
तोंडी उत्तमोत्तम शेरोशायरी टाकली आहे. कालिया भोजराजांना
मीरेविषयी सावध करताना सांगतो
कि 'अस्मानाच्या कुशीतले बादल धरतीवर भाळले,
तरी जमीन-अस्मानाची कधी
भेट कधीच होत नाही'.
तसेच "समयींवर झेप घेऊन त्या
पतंगाचे जळले पंख ....मीरा
म्हणे ज्योतीला कधी कळेल का
या भाजण्यातला डंख..??" वाह , काय सुंदर काव्य
आहे...!! दुसऱ्या अंकामध्ये एका ठिकाणी पाऊस पडत असताना पाठीमागून
येऊन भोजराज मीरेचे डोळे झाकतो, त्यावेळी
ती म्हणते "ओळखणार कशी कोण आहे
ते ? डोळ्यांवर तर उघडलेत हस्तांचे
मेघ..". इथे लेखकाने श्लेष
अलंकाराची योजना केली आहे. हस्त
हे पावसाचे नक्षत्र तर असतेच आणि
हस्त शब्दाचा अर्थ म्हणजे हात
देखील होतो, जो इथे अभिप्रेत आहे. जात जाता लेखक
कृष्णाच्या तोंडून भगवद्गीतेचे सार सांगून जातात.
कृष्ण मीरेला म्हणतो "मीरा, इतक्या सरळपणानं मागितल्याबरोबर माणसांनी आपलं 'मी'पण मला अर्पण केलं असतं, तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप मला कशाला करावा लागला असता..??”.
हे नाटक तीव्र चढ-उताराचे म्हणजे एक रोलर-कोस्टर राईड आहे. पहिल्या अंकात काही खेळीमेळीचे प्रसंग, मीरेची कृष्णभक्ती, भोजराजाचे मीरेवरील उत्कट प्रेम, त्याने केलेला तिचा अनुनय आणि विवाहास राजघराण्याने नाईलाजाने दिलेली अनुमती दाखविली आहे. तर दुसऱ्या अंकावर भोजराजाला आलेल्या विफलतेचे सावट आहे. मीरेला संसारासारख्या लौकिक गोष्टीत रस नाही, तर युद्धवीर भोजराजाला कृष्णभक्ती सारख्या पारलौकिक गोष्टीत रस नाही; असा हा एकंदर विचित्र तिढा होता. जसजसे नाटक पुढे जाते, तसे नाटकाचे गांभीर्य देखील वाढत जाते. दुसरा अंक संपताना मीराबाई आणि भोजराजा या दोघांच्याही नशिबात आलेल्या वैफल्यतेमुळे दोघांनी केलेला विलाप दाखविला आहे. तिसऱ्या अंकात मीरा-माधवी-कालिया यांच्यातील थोडीफार थट्टामस्करी, जोखमीच्या युद्धावर निघालेल्या भोजराजा - मीरेमधील तात्पुरता समेट, भोजराजांच्या अटीचे मीरेच्या हातून नकळत घडलेले उल्लंघन आणि मीरेचे वृन्दावनास प्रस्थान असा शेवट आहे. मीरा वृंदावनात गेल्यावर श्यामसुंदरची मुर्ती स्वतःच्या हाताने बनवणार असून, जिचा चेहरा मात्र हुबेहूब भोजराजांसारखा असणार आहे, असा तिने भोजराजाला शब्द दिला. अप्रत्यक्षपणे मीरेचेही नवऱ्यावर किती प्रेम असते ते निसटत्या क्षणी लेखक (किंवा subtly) दाखवतात. कानेटकरांनी ह्या नाटकात मीरा अत्यंत कुशाग्र बुद्धीची दाखविली आहे. आपलं सगळ्यांचंच कृष्णाशी नातं कसं जोडलं गेलंय, हे ती अत्यंत चतुराईने भोजराजाला पटवून देते. ( पान ४३). तसंच प्रतिवाद करताना गौतम बुद्धाचे उदाहरण देऊन शाश्वत-अशाश्वताची कल्पना भोजराजांच्या भगिनी उदादेवींना मुत्सद्दीपणाने समजावून सांगते (पान ५३). अनन्यसाधारण भक्तीचे महत्व सांगताना एके ठिकाणी मीरा मर्मभेदी वक्तव्य करते ... " ध्यास घ्यावा जीव कुरवंडून टाकावा, तेव्हाच असला स्पर्श लाभतो. एरवी ओंजळीतून गंगामाई प्रगट झाली, तरी तीर्थ घेताना तळवा कोरडाच राहायचा". शेवटच्या भेटीत लेखक सर्वांनाच एक महत्वाचा आशयघन संदेश मीरेच्या तोंडून देऊन जातात. मीरा म्हणते "नुसते एकमेकांवर प्रेम असून चालत नाही, तर दोघांच्या मनोवृत्ती सारख्या असाव्या लागतात, तरच संसार सुखाचा होतो"
विकास ज कात्रे , ठाणे
भ्रमण ध्वनी : ९८३३६१०८७५
संदर्भ:
सं. मीरा मधुरा - लेखक: प्रा. वसंत कानेटकर
अभिषेकी चरित्र ( राजहंस प्रकाशन ), लेखिका - शैला मुकुंद
मीराबाई लेख - ले: जयश्री नातू , प्रसाद मासिक - मार्च २०२५ अंक
************00000**************
सुंदर !
ReplyDeleteThank you Rajoo..!!
Delete