श्रीमानयोगी रसग्रहण ...भाग -२
साधारण १६३६ चा सुमार असावा. पुणे मुलूख स्थिर झाला. पण दक्षिणेत निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी न डगमगता स्वतः फौज उभारली; आणि मोंगलांशी सामना दिला. कादंबरीकार लिहितात "एका जहागीरदाराने नवा बंडावा उभारून मोंगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळच !!". शहाजीराजांच्या शौर्यगुणांची यावरून आपल्याला कल्पना येते. प्रस्तावनेत कुरुंदकर लिहितात "निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोंगलांशी लढावे, त्यांना दक्षिणेत येऊ देऊ नये ह्या धोरणाचे आरंभकर्ते शहाजीराजे होते. "बंगळूरला संभाजी (शिवाजीचे मोठे बंधू) आणि पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वागणुकीमध्ये योजनाबद्धता व एकसारखेपणा दिसतो, त्याचे कारण मागे शहाजींची पार्श्वभूमी व त्यांच्या तालमीत तयार झालेले सरदार व कारभारी हे आहे". दादोजी कोंडदेव हे त्यापैकीच एक !! ह्यावरून शहाजीराजांमधील संघबांधणी , नेतृत्व आदी आणखी काही गुणविशेषांची कल्पना येईल. त्यांच्या संपूर्ण कार्याची महती समजण्यासाठी त्यांचा पूर्ण इतिहास अभ्यासावा लागेल.
शाळेमध्ये असताना परीक्षेत 'दादोजी कोंडदेव' यांच्यावरील ४ मार्कांचा प्रश्न सोडवून आपण स्वतःची सुटका करून घेतो. परंतु हे व्यक्तिमत्व आभाळाएव्हढे मोठे होते. ते इतिहासाचे शालेय पुस्तक आपल्याला सांगेलच असे नाही . पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांनी दूरदृष्टीने आपले निकटवर्तीय, विश्वासू आणि अनुभवी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती केली होती. ते एकीकडे आपल्या पंखाखाली शिवबांनाही तयार करीत होते आणि एकीकडे जिजाऊंनाही कारभारात मार्गदर्शन करीत. एकदा विजापूरचे राजकारण समजावून देताना ते जिजाऊंना सांगतात.."राणीसाहेब, राजकारण हे एक पदरी नसतं. अनेक पदरी असतं." ह्यावरून ते राजकारणात किती मुरब्बी होते हे आपल्या लक्षात येईल. पुण्याची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट लावता आली, ह्याचे श्रेय स्वतः जिजाबाई दादोजींना देत. शहाजीराजे विजापूरच्या चाकरीत असताना, त्यांना जहागिरीत मिळालेल्या पुण्यातील लाल महाल (जिथे १६६३ मध्ये राजांकडून शायिस्तेखानाची बोटे छाटली गेली) हा जिजाऊंच्या आणि दादोजी कोंडदेव ह्यांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला. उद्ध्वस्त पुण्यामध्ये विटकरांच्या ढिगाऱ्याखाली शिवबांना सापडलेल्या गणपतीच्या अभंग मूर्तीसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याची आज्ञा जिजाऊंनी दिली. हाच तो पुण्याचा मानाचा प्रसिद्ध कसबा गणपती ! (पण विकिपीडियामध्ये याचे श्रेय दोघांनाही दिलेले नाही. कोत्या मनोवृत्तीने आपला इतिहास बदलणाऱ्या समाजकंटकांची कीव करावीशी वाटते). जिजाऊ-दादोजी यांनी दुष्काळाने आणि मोंगलांच्या आक्रमणामुळे भुईसपाट झालेले पुणे पुन्हा उभे केले, ह्या खात्रीलायक माहितीला श्रीमानयोगी कादंबरीने उजाळा दिला आहे.
जिजाऊंनी शिवबाचे लग्न मुधोळकरांच्या सई ह्या ८-९ वर्षांच्या मुलीबरोबर ठरवले. (आजच्या काळात हे जरा विचित्र वाटेल. पण त्या काळी लग्नें अशी ओळखीतूनच आणि खूप लहान वयात होत; अनुरूपमधून नाहीत😂). जिजाऊंना हे लग्न बेताने आणि कमी खर्चात करायचे होते. पण नजीकच्या काळात जास्त लोकसंग्रह करण्यासाठी दादोजींनी हे लग्न थाटामाटात करावे असा मौलिक सल्ला त्यांना दिला आणि जिजाऊंनी तो मानला. ह्यावरून दादोजींना किती दूरदृष्टी होती, हे आपल्या लक्षात येतं. 'टीम बिल्डिंग'मध्ये हा नावाप्रमाणे 'दादा' माणूस होता. समारंभाची एव्हढी शाही तयारी केली होती, पण आयत्या वेळी खुद्द वरपिता शहाजीराजे व थोरला भाऊ संभाजीराजे शिवबाच्या लग्नाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे अर्थातच जिजाऊ नाराज झाल्या. पण ह्याचे शल्य बाजूला ठेऊन त्या परत लग्नघाईत मिसळल्या. (आजच्या काळात आपण अशा 'संयमशील' वरमातेची कल्पना तरी करू शकतो का ??).
जणू काही वनवास संपल्यागत तब्बल ११ वर्षांनी शिवबा, जिजाबाई आणि दादोजी यांचं बंगलोरला शहाजीराजेंकडे जाणं झालं. आगमन स्थळी पोहोचल्यावर आईच्या सांगण्यावरून शिवबांनी वडिलांना मुजरा न करता त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले (संस्कार!). बंगलोर फिरता फिरता काही इंग्रज लोक तिथे बघायला मिळाले. चौकस असलेल्या शिवबांनी लगेच मोठ्या भावाकडे पृच्छा केली, कि "हे गोरे लोक कोण आहेत ? इथे का आलेत ?? व्यापार करायला फिरंग्यांना त्यांचा मुलुख नाही का ..??". १२-१३ वर्षांच्या शिवबांच्या बुद्धीचे तेज, अस्मिता आणि स्वराज्यभक्ती ह्या एका उदाहरणावरून दिसते. अशा छोट्यामोठ्या गोष्टीतून, प्रसंगांतून रणजित देसाईंनी कादंबरीतील सर्व व्यक्तिरेखा मोठ्या ताकदीने उभ्या केल्या आहेत. असामान्य बुद्धी आणि धिटाई असणारे शिवबा अल्पकाळातच शहाजीराजांचे फार लाडके झाले. ते स्वतः बाहेर निघाले कि बरोबर शिवबांना घेऊन जात. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत. एव्हढेच काय, पण ह्या इंग्रज व्यापाऱ्यांकडून एक हलकीशी बंदूक पण खरेदी करून त्यांनी शिवबाला घेऊन दिली (आणि ती कशी चालवायची ह्याचे शिक्षणही दिले ). "शिवबा जन्माला आले आणि आयुष्यातील वणवण संपली" अशी शहाजीराजेंची श्रद्धा होती .
जशा जिजाबाईंना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, तशा शहाजीराजांना देखील लागल्या. पण त्याचे स्वरूप जास्त राजकीय होते. स्वतःचा मुलगा स्वराज्याचा पाठपुरावा करतोय म्हटल्यावर आदिलशहाचा नेहमीच शहाजीवर संशय होता, की त्याची शिवाजीला आतून फुस होती. त्याची झळ सातत्याने शहाजीराजांना लागे. अशा प्रकारचे स्पष्ट विधान राजगडावर ते एकदा आले असताना त्यांनी शिवाजीराजे मोठे झाल्यावर केलेही होते. आदिलशहाच्या पदरी असलेल्या अफझलसारख्या सेनापतींना शहाजीराजां सारख्या पराक्रमी सरदाराबद्दल असुयाही वाटत होती. त्याचा त्रास आणखी वेगळा. असो !!
अगदी मोजक्या शब्दात लेखकाने शहाजीराजेंची दैनंदिनी सांगितली आहे; ती अशी ... " शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्यसंपन्न असे. स्नान, पूजाअर्चा काव्यचर्चा, आयुधघराची पाहणी, लष्कर तपासणी, बागबगीचे, रात्री नाचरंग , नृत्यगायन, शृंगार यांत शहाजीराजांचे दिवस जात. मोहीम आणि मृगया (शिकार) सोडली, तर दिनक्रम हाच असे. अनेक सरदार, मानकरी, शास्त्री वाड्यावर भेटायला येत". पण शहाजीराजांच्या वाड्यावर पुण्यासारखे मावळे येत नाहीत हे लक्षात आल्यावर छोटे शिवबा जिजाऊंना विचारतात "ज्या राजाच्या घरी प्रजा जायला भिते, तो राजा कसला..??" लहान मुले स्पष्टवक्ती असतील तर पालकांचे नेहमीच कठीण होते. लहानपणी शिवबांनी विचारलेला हा बालप्रश्न मोठ्यांना तरी सुचेल का ??😀अखेर बंगलोरच्या मुक्कामात नाचमहालात रात्री शिवबा आणि त्यांचे बंधू गाणे पाहायला गेल्याचे एक निमित्त झाले आणि जिजाबाईंनी शिवबासहित बंगलोरहून काढता पाय घेतला.
अर्थात बंगलोरला असताना रणनीतीच्या बाबतीत काही मोजके संस्कार शहाजीराजेंनी शिवबांवर त्या वर्ष दीड वर्षाच्या काळात जाणीवपूर्वक केले. त्यातील महत्वाचा म्हणजे "राजाकडे मोठ्या घोडदळाचे ऐश्वर्य असेल, तरच त्यांचं राज्य अभेद्य राहतं". हे तत्व शिवबांनी अगदी शेवटपर्यंत अमलात आणले. (पराक्रमाच्या काळात शिवाजीराजांच्या स्वतःच्या पागेत ४०००० घोडे होते आणि त्यांच्याकडे दीड लाखाचं घोडदळ होतं, असं विद्वान इतिहास संशोधक आणि अभ्यासक कै. निनाद बेडेकर यांनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते). शिवाजीराजांना नुसत्या रयतेचीच नाही, तर आपल्या पागेत बाळगलेल्या अश्र्वांची सुद्धा खूप काळजी असायची. उदा ... एकदा उन्हातून लांबून घोडीवरून रपेट करून आल्यावर त्यांनी मोतद्दाराला "हिला पागेत नेऊन चांगली पुसून काढा. दम गेल्याखेरिज वैरण देऊ नका." अशी सूचना दिली. एकदा विश्वास नावाचा राजांचा लाडका घोडा खूप आजारी पडला. लगेच राजे त्याला भेटायला पागेमध्ये गेले. औषधोपचार चालू होतेच; पण राजे विश्वासबरोबर रात्रभर उपाशीपोटी बसून होते. सतत त्याच्या अंगावरून हात फिरवीत होते. शेवटी म्लान झालेला विश्वास पहाटेला स्वतःहून उभा राहिला, तेव्हा कुठे राजांचा जीव भांड्यात पडला. राजांचा मोती नावाचा पण लाडका घोडा होता. तो बाळ संभाजीला देताना राजे म्हणतात " पागेत जनावर बांधून आपलं काम होत नाही. त्याला तसंच प्रेम द्यावं लागतं. पाहिलंत ना, आम्हाला पाहताच कसा दौडत आला तो ?? आम्ही जेव्हा एकटे स्वार असतो, तेव्हा आम्ही घोड्याबरोबर बोलतो". हे काय 'प्रेमाचे अद्वैत' असेल ह्याची कल्पना करू शकतो आपण.
शिवाजीराजांच्या कुंडलीत वडिलांकडून या ना त्या कारणाने अप्रत्यक्षपणे त्रास होण्याचा योग असावा. (अर्थात त्याविषयी राजांची तक्रार नव्हती). नेहमी बंगलोरला स्थायिक असलेले शहाजीराजे शिवबांपासून कायम दूरच राहिले; त्यामुळे स्वतःच्या पंखाखाली शिवबांना तयार करणे ( grooming) तर राहोच , पण राजनीतीच्या संदर्भात देखील त्यांचे काही मार्गदर्शन महाराजांना लाभलेच नाही. राजांना पितृछाया जवळजवळ न लाभल्यासारखीच होती. (शिवाजीराजे आणि शहाजीराजे पुण्यात एकत्र असते, तर इतिहास पूर्णपणे बदलून कदाचित स्वराज्याची स्थापना खूप लवकर झाली असती. पण इतिहासात 'जर तर'ला स्थान नसते). बंगलोर मुक्कामात शहाजीराजेंनी शिवबाची दुसरी सोयरीक स्वतःच्या हौशीखातर मोहित्यांच्या सोयराशी जुळवून आणली. शाही थाटामाटात हा विवाह झाला. शिवबाच्या पहिल्या लग्नानंतर लगेचच ठरवलेले हे लग्न फार काही जिजाऊंच्या पसंतीस नव्हते. (पुढे ह्या सोयरेनेच राजांचा आत्मा कणाकणाने कुरतडून त्यांचे आयुष्य कमी केले. शिवाजीराजे गेल्यावर ह्याच मोठ्या राणीने संभाजीराजांविरुद्ध फितुरीचे राजकारण शिजवून त्यांचा घात केला). असो !! शहाजीराजांनी बंगलोरला असताना दुसरे लग्न केले होते (तुकाबाईंशी); पण पुण्याला असलेल्या जिजाबाईंना ही बातमी काही दिवसांनी आणि दुसऱ्याच कोणाच्या मार्फत कळली. ( त्या काळी राजे लोकांच्यात अशा गोष्टी सर्रास चालत म्हणे, त्यामुळे आपली बोलतीच बंद !)!😷तुकाबाईचा स्वभाव काही चांगला नसावा, असे एक दोन उदाहरणांवरून दिसते. जिजाऊंनी बंगलोर सोडण्यात तुकाबाईंच्या सवतीमत्सराचा देखील वाटा होता. ह्या तुकाबाईंकडून झालेल्या एका मुलग्याने (एकोजीराजे) राजांविरुद्ध दंड थोपटून नंतरच्या काळात अनेक अडथळे उत्पन्न केले. शहाजीराजे आदिलशाहकडे नोकरीला असल्याने शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धोरण आखताना नेहमीच ताक फुंकून प्यावे लागले. त्यांचा हात दगडाखाली असल्यासारखाच होता. "पारतंत्र्य स्वीकारल्यामुळे स्वतःच्या पित्याला आदिलशाही दरबारात मानखंडनेचा त्रास सहन करावा लागतो, हे राजांना कायमचे शल्य होते". - कै. प्रा. शिवाजीराव भोसले. ह्याचा उल्लेख पुढे येतच राहील. सुरतेच्या लुटीसारखा मोठा पराक्रम करून आनंदाचा जल्लोष राजगडावर साजरा करण्याचे छोटे स्वप्न बाळगणाऱ्या शिवाजीराजांना गडावर आल्याआल्याच पितृशोकाची बातमी मिळाली..... त्या दुःखात ते आणि जिजाऊ आकंठ बुडून गेले. राजे तेव्हा ३४ वर्षांचे होते. शहाजीराजे पर्व इथे संपले !!
न्यायनिवाड्याचेही शिक्षण राजांना दादोजी आणि जिजाऊंकडून वेळोवेळी मिळतच होते. त्यामुळे रयतेत त्यांच्याविषयी आदर तर वाढलाच, पण राज्यातील कारभारावर त्यांना चांगले नियंत्रण मिळविता आले. एकदा मुलुखातून फेरी मारताना रांझाच्या पाटलाने तरुण पोरीवर बलात्कार केल्याचे समोर आले. सदरेवर पंचनामा झाला. राजांनी येसाजींकडून गुन्ह्याची शहानिशा करून घेतली आणि पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. राजांचा हा निर्णय ऐकल्यावर गुरुवर्य दादोजींना कृतकृत्य वाटले. स्त्रियांवरील अत्याचार थांबविण्याचा विडा उचलणाऱ्या शिवाजीराजांनी थोड्याच दिवसात असल्या गुन्हेगारांवर दहशत बसविली. हल्ली ह्युमन रिसोर्सचे खूपच पीक आले आहे. महाराजांचे HR skill आणि माणसांची पारख किती चांगली होती ह्याचे एक उदाहरण पहा .... एकदा जंगलात ३ लांडग्यांशी नुसत्या काठीने सामना करून एक भीमा नावाचा फाटका इसम राजांना भेटायला आला. भीमाने एका लांडग्याची शेपटी कापून 'पुरावा' म्हणून रीतसर दाखवायला आणली होती (दादोजींची एक rewarding/incentive scheme होती. गावातील लांडग्यांना जो मारील, त्याने त्याची शेपटी कापून त्यांना आणून दाखवली, तर ते त्याला इनाम देत असत). भीमाला इनाम तर मिळालेच, पण राजांनी त्याची वेगळी मुलाखत घेतली. त्यातून भीमाला तलवार, जंबिया, चाकू, सुरे याविषयी उत्तम माहिती असल्याचे निदर्शनाला आले/ त्याचा लोहारकीचा धंदा असल्याचेही कळले. लागलीच राजांनी त्याला गडावरच लोहारशाळा काढून दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा राजे लढाईला जात, तेव्हा तेव्हा हा भीमा लागतील तशा तलवारी वगैरे दिलेल्या वेळेत बनवून देत असे. रोहिडेश्वराच्या मोहिमेसाठी लागणारी तलवारी, भाले, बर्च्या इत्यादी शस्त्रसामुग्री चार लोहारांनी रात्र रात्र राबून कमी वेळात उपलब्ध केल्याबद्दल भीमा लोहाराला स्वतःच्या हातचं सोन्याचे कडं राजांनी दिले आणि चौघात वाटून घ्यायला सांगितले. त्यावर भीमा मोठ्या श्रद्धेने उत्तरला.."तुमच्या हातचं कडं मोडणार काय आम्ही?? पूजेलाच राहील ते....! "रोहिडेश्वर किल्ल्याच्या मोहिमेवर आपल्याला नेण्याची गळ ह्या भीमा लोहाराने राजांना घातली. एव्हढेच नव्हे तर, किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर झालेल्या सशस्त्र चकमकीत शत्रुपक्षाच्या २ रक्षकांना गारदही केले. राजांनी वेगवेगळ्या कामांसाठी पारखलेल्या व्यक्ती किती योग्य आणि निष्ठावंत होत्या, ह्याचे हे एक छोटेसे उदाहरण ! ह्या दृष्टीने बाजी प्रभू , बाजी पासलकर आणि तानाजी मालुसरे हे तर निव्वळ हिरे होते असे म्हणता येईल. असो! राजापूरच्या लुटीच्या वेळी बाळाजी आवजींचे नुसते हस्ताक्षर पाहून राजांनी त्याला आपल्या दफ्तरी बाळगण्याची शिफारस केली. (राजांचे कारभारात किती बारीक लक्ष होते पाहा). जसजसा स्वराज्याचा मुलुख वाढू लागला, तशी राजांना आपल्या आरमाराची गरज भासू लागली होती. संरक्षण सर्व बाजूंनी हवे. (एके ठिकाणी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी 'सावधानते'च्या बाबतीत शिवाजीराजांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली आहे ) राजांना मालवणच्या जवळ कुडते बेटाजवळ समुद्रात दुरून एक खडक दिसला. तिथल्या कोळी आणि काही सहकाऱ्यांनी ह्या खडकाची सर्व माहिती राजांना दिली ( Communication and initiative). वर्णनावरून राजांना ही जागा आपल्या आरमार तळासाठी योग्य वाटली. राजांनी त्वरेने भूमीपूजन केले. मालवणात येऊन राजांनी पाथरवट, लोहार, कामाठी, कोळी वगैरे ३००० कामगार गोळा केले आणि जलदुर्ग बांधायला सुरवातही केली (१६६४). ह्याच जलदुर्गाचे नांव 'सिंधुदुर्ग' !!
शिवाजीराजांच्या दूरदृष्टीला आणि निर्णयक्षमतेला सीमा नव्हती. राजे १५-२० वर्षांचे असताना त्यांची बरोबरीच्या मावळ्यांशी तर मैत्री होतीच, पण साठीमधल्या थोर मंडळींशी पण त्यांची दोस्ती होत असे. उत्तम संवाद कौशल्य आणि पुरेशी परिपक्वता याशिवाय हे शक्य नाही. ज्येष्ठांचे आशीर्वाद राजांना नेहमीच महत्त्वाचे वाटत आले. कुठला किल्ला सर करायला किती फौज लागेल, घोडदळ किती लागेल, मोहिमेचे नेतृत्व कुणाला द्यायचे ह्याचे उत्तम ज्ञान राजांना होते. आपल्या फौजेमध्ये असलेल्या मावळ्यांमध्ये आणि सरदारांमध्ये कुणाची बलस्थानं काय आहेत आणि कमजोरी काय आहे (SWOT analysis) ह्याची इत्यंभूत माहिती राजांना होती. अफजलखानाला सामोरे जाताना स्वतःचा अंगरक्षक म्हणून संभाजी कावजीची निवड, खानाकडे पाठविण्यासाठी आपला वकील म्हणून डिप्लोमॅट गोपीनाथ पंत यांची निवड राजांनी स्वतः केली होती. महाराज स्वतः खानाचे पारिपत्य करत असताना दोघांनीही आपापली कामगिरी कौतुकाच्या पलीकडे पार पाडली, हे वेगळं सांगायला नको.
एक दिवस राजे मांसाहेबांना सांगून रोहिडेश्वराला निघाले. जेव्हा राजे नाचणीला येसाजीकडे आणि नंतर बाजी पासलकरांकडे उतरले, तेव्हा अश्वपथकाचा शिधा जिजाऊंनी वेगळा काढून दिला होता, का तर गरिबाला भुर्दंड नको म्हणून. जगाच्या पाठीवर किती राजमाता आणि राजे एव्हढा गरीबाचा विचार करताना दिसतात .. ?? वाटेतच एका गावात वाघ धुमाकूळ घालीत होता म्हणून राजांनी मोठ्या धाडसाने शिकार केली. गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती, पण परवानगीशिवाय राजांनी केलेली ही शिकार दादोजींपंतांची काळजी वाढवून गेली. ते जिजाऊंकडे व्यक्त झाले. राजांनी त्यांची मनापासून क्षमा मागितली.
आता थोडे दादोजींविषयी !! एकदा शिवापूरला सहज फिरता फिरता महाराजांच्या आमराईतील झाडावरील खाली आलेला एक आंबा धन्याला (म्हणजे शहाजीराजांना) न विचारता तोडला, म्हणून दादोजी घरी येऊन स्वतःचे हात तलवारीने तोडायला निघाले होते. जिजाऊंमुळे पुढील अनर्थ टळला. दादोजींच्या प्रामाणिकपणाची ही परिसीमा होती. शंकराच्या पिंडीसमोर स्वराज्याची शपथ घेऊन माँसाहेब आणि दादोजींना न सांगता राजांनी आदिलशहाच्या रोहिडेश्वरावर स्वारी करून गड जिंकून घेतला. विजयवार्ता राजगडावर आल्यावर, ही गोष्ट दादोजींना फार लागून राहिली. कारण हा किल्ला घेणे म्हणजे ज्यांच्या चाकरीत शहाजीराजे होते, त्या विजापूरकरांच्या शेपटीवर पाय देण्यासारखे होते. त्यातील धोका ते ओळखून होते. राजांचे लहान वय पाहता अशी कुरापत काढणे दादोजींच्या दृष्टीने अजिबात योग्य नव्हते. राजे आणि दादोजी यांच्यात थोडीफार शाब्दिक चकमकही उडाली. पण थोड्याच वेळात दादोजींची समजूत पटली. ते उदगारले " कुणीतरी हे करायलाच हवे होते".
शिवाजीराजे स्वराज्याच्या धोरणाचा पाठपुरावा करू लागल्यानंतर दादोजी आणि राजे यांच्या विचारसरणीतील फरक (किंवा दरी) जाणवू लागण्याइतका मोठा होत गेला. (पुरोगामी आणि प्रतिगामी यांचा वाद फार प्राचीन काळापासून आहे. अशाच दोन टोकाच्या आदर्शवादांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सं.संन्यस्तखङग लिहिले). जहागिरी सांभाळण्यात दादोजींची हयात गेली; तर राजांची महत्वाकांक्षा आकाशाला गवसणी घालण्याची होती. नुसती जहागिरी राखण्यात त्यांना तथ्य वाटत नव्हते. हिंदू स्वराज्याचं रोपटं त्यांनी लावलं होतं, त्याचा त्यांना वटवृक्ष झालेला बघायचा होता. सगळी पावले त्या दृष्टीने उचलली जात होती. आधी दक्षिण काबीज करून मग त्यांना मोगलांना पराभूत करून उत्तरेला झेंडे लावायचे होते. (आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं तर स्वराज्य प्रोजेक्ट 'Fast track' वर होते). अशा वेळी शत्रूकडून धोका असतोच. तो दादोजींना दिवस रात्र ग्रासत होता. एरवी बंगलोरला असणाऱ्या शहाजीराजेंनी त्यांच्यावर पुणे जहागिरी, जिजाऊ आणि शिवबा यांची जबाबदारी देऊन मोठ्या विश्वासाने पाठविले होते. आदिलशाहीशी आगळीक केल्यामुळे राजांना काही दगा फटका झाला असता, तर त्याचा ठपका दादोजींवर आला असता. नेमके हेच त्यांना नको होते. वयही अशा प्रकारचे तणाव झेपण्याचे राहिले नाही. परिणामी दादोजींची तब्येत बिघडत गेली. दादोजी निरवानिरवीचं बोलताना एकदा राजांना म्हणाले. "आम्ही जुनी माणसं डबक्यासारखी, उन्हाच्या भीतीने आटत जाणं एव्हढच ठाऊक असतं. तुमची धाव आमच्याजवळ नाही. राजे, रंगीत कपड्यांना मळ सोसतो; पण श्वेत वस्त्र परिधान केलं, तर त्याला एव्हढा डागही खपत नाही". दादोजींची असहाय्य परिपक्वता किती मोजक्या आणि भावगर्भित शब्दांत कादंबरीकार दाखवून गेले आहेत !! दादोजींनी आत्महत्या केली किंवा नाही ह्या बाबतीत इतिहासकारांमध्ये अजूनही मतमतांतरे आहेत. स्वतःचा पुत्र मानलेल्या शिवाजीराजांच्या मांडीवर डोकं ठेवून अखेर दादोजींनी प्राण सोडला. राजांनी फक्त पहिले ३ गड घेतल्यावर दादोजींचे निधन झालेले आहे ( १६४७). त्यावेळी राजे फक्त १७ वर्षांचे होते.
( ९८३३६१०८७५)
(यापुढील भाग अजून महिन्याभराने .... )
अतिसुंदर!!
ReplyDeleteराजू , तुला खूप धन्यवाद !!
Delete