पर्व .... एक मंथन !!
"साहित्यकृतीचे
मूलद्रव्य
मानवी भाव-भावना , आशा-आकांक्षा, सुख -दुःख हेच असतं; इतिहासाचा तपशील नव्हे" - एस. एल. भैरप्पा
"महाभारत आपलं
आपणच समजून घ्यायचं असतं . त्याचा अन्वयार्थ आपणच लावायचा असतो . त्यासाठी संदर्भग्रंथ नाहीत, तर मनन आणि
चिंतन आवश्यक असते " - ज्येष्ठ विचारवंत कै. दाजीशास्त्री पणशीकर
पर्व ह्या महाभारतावरील कादंबरीत नेमके काय असेल, हे भैरप्पांच्या वरील वाक्यातून लक्षांत येतं. मला नेमक्या त्या मूलद्रव्यातच रस आहे. ह्या मूलद्रव्यांचा संयोग घडवून भैरप्पांनी महाभारतावरचे असे काही
कादंबरीचा पहिला प्रवेश मद्रदेशाचा राजा शल्य आणि त्याची नात हिरण्यवती यांच्या लाडिक संवादाने होतो. शल्याचे वय ८४ आहे. कौरव पांडवांच्या युद्धाचे वेध लागले आहेत. पण सध्यातरी तो जुन्या आठवणींतच गढलेला आहे. स्वगताच्या स्वरूपात त्या एकेक करून लेखकाच्या कागदावर उतरल्या आहेत. त्याला आपली बहीण माद्री हिच्या लग्नाच्या वेळची ५० वर्षांपूर्वीची आठवण येते. मद्रदेशाच्या स्त्रिया म्हणे सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध होत्या. इकडे कुरुराज्यातल्या पांडूराजाला कुंतीबरोबर लग्न होऊन ३ वर्षे होऊनही अपत्ययोग नव्हता. त्याची वैद्यकीय कारणमीमांसा करायला राजे लोकांना वेळ कुठला असायला ?? त्यांना नेहमी वंशवाढीची पडलेली असायची. परिणामी कुरुराज्याचे सर्वेसर्वा अशी ख्याती असलेले भीष्म पितामह हे स्वतः शल्य राजाच्या बहिणीला प्रचंड कन्याशुल्काच्या (रिव्हर्स हुंडा ) मोबदल्यात मागणी घालायला शल्याकडे येतात आणि त्याला बळी पडून बिचार्या माद्रीचा विवाह पांडूराजाशी होतो. तिला विचारून तो मुळीच झालेला नाही. अगदी वाईट भाषेत सांगायचं, तर माद्रीची राजमार्गाने सोफिस्टिकेटेड विक्री झाली. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची बीजे पुराणकाळापासून कशी खोल रुजलेली आहेत ह्याचे हे एक पौराणिक उदाहरण !! तसेच दोन घराण्यांनी नातेसंबंध जोडले खरे, पण ह्या विवाहानंतर एकदाही भीष्म शल्याच्या घरी फिरकले सुद्धा नाहीत. सगळ्या कृतींना अवघा स्वार्थ चिकटलेला ! माद्री देखील कधीही माहेरी नाही आली (पण भावावरील तिचा राग निदान समजण्यासारखा आहे). एव्हढेच नव्हे, तर ह्या घटनेनंतर तब्बल ५० वर्षांनी शल्यराजाला आता स्वतःची नात हिरण्यवती हिच्या लग्नाचे डोहाळे लागले आहेत ( कारण एखाद्या राजघराण्यातून असेच पुन्हा 'कन्याशुल्क' मिळेल). सगळा महाभारत स्वार्थाने ओतप्रोत कसा भरलेला आहे, ह्याची कुणकुण लागली.
कौरव आणि पांडव ह्यांमध्ये होऊ घातलेल्या महायुद्धात आपल्या बाजूनी लढण्यासाठी दोन्ही गटातील बडी धेंडे आजूबाजूच्या राजांना वळविण्याच्या उद्योगात होते. खरं म्हणजे शल्यराजा पांडवांकडून लढायला तयार झाला होता. पण सुशर्म आणि दुःशासन यांनी त्याच्या मनात विष कालवून त्याला कौरवांच्या बाजूने लढण्यास प्रवृत्त केले. माणसांची योग्य परीक्षा नसल्यावर आणि सारासार विवेकबुद्धी नसल्यावर काय होते, ते यावरून दिसते. पुढे विषय येईलच, पण शल्यराजाला ह्याचा पश्चात्ताप होऊन आपण चूक केल्याचे 'शल्य' शेवटपर्यंत डाचत राहिले. एका प्रसंगी हे त्याने पांडवांना बोलूनही दाखविले. किंबहुना माद्रीपुत्र नकुल आणि भीष्माने ह्याविषयी पांडव -कौरवांच्या भर सभेत शल्याला छेडले, तेव्हा दुःशासनाकडून त्याला खोटी माहिती मिळाल्याचे उघड झाले . पण आता खूप उशीर झाला होता. दुर्योधनाने शल्याचे हस्तिनावतीत असं काही आदरातिथ्य केलं होतं, कि त्याला बाजू बदलणं अवघड गेलं. शिवाय भीष्म पितामह ज्या बाजूने लढणार, त्या बाजूने मी असणार असा त्याचा नूर होता. (सुरवातीला त्याला सेनापतिपद ऑफर करण्यात आलं होतं, पण भीष्मांसाठी त्याने ते सोडलं म्हणे). महत्वाचे निर्णय कसे घेऊ नयेत हे शल्याच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे . दूरदेशातून एव्हढा फौजफाटा घेऊन आलेल्या शल्यमामाला दुर्योधनाने कर्णाच्या रथाचे सारथ्य करण्याची दुय्यम दर्जाची जबाबदारी सोपवून नाराज केले. ह्यावर उतारा (antidote) म्हणून युधिष्ठिराने शल्यमामाला सारथ्य करताना कर्णाचा तेजोभंग करण्याचे सुचविले. आणि तसे त्याने केल्याचे उल्लेख काही ठिकाणी माझ्या वाचनात यापूर्वी आलेत (राधेय कादंबरी - रणजित देसाई ). कौरव पराभवाच्या छायेत असताना आणि द्रोण-कर्ण पडल्यावर अखेरच्या क्षणी शल्यराजावर सेनापतीपदाची अवघड जबाबदारी टाकण्यात आली. आश्चर्य म्हणजे शल्याचा मृत्यू युधिष्ठिराच्या हातूनच झाला. एरवी धर्माचरणाचे ओझे वाहणाऱ्या युधिष्ठिराला स्वतःच्या मामाला मारताना काहीच त्रास झाला नसेल ..?? कृष्णाने युधिष्ठिराला गीता सांगितल्याचे ऐकिबात नाही. किंबहुना का कोण जाणे, पण श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांचा संवाद माझ्या अल्प वाचनात कधीही आजपर्यंत आलेला नाही. तरीही आप्तेष्ठांवर शस्त्र चालविताना अर्जुनाला झाला, तसा त्रास त्याला कशावरून झाला नसेल ..??
भैरप्पा कुठलीही व्यक्तिरेखा रंगवताना प्रसंगाचा यथायोग्य उपयोग करतात. त्यासाठी प्रमुख व्यक्तिरेखा प्रसंगात असतेच असं नाही. जसे कादंबरीची सुरुवात शल्य आणि त्याची नात हिरण्यवती यांच्या संवादाने झाली, ज्यामध्ये युद्धाच्या नैतिक-अनैतिकते संबंधी शल्याचे आणि त्याच्या मुलाचे विचार समजले, माद्रीच्या लग्नाची कहाणी समजली. यामुळे आपल्या मनात कित्येक वर्षे कोरल्या गेलेल्या कथेला दळ येतो. शेवटी पात्रांच्या विविध विचारांतून आणि कृतीतूनच इतिहास घडत असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. भैरप्पा कादंबरीच्या माध्यमातून बारीक सारीक घटनांतून त्याचे दर्शन वाचकांना घडवतात. असाच एके ठिकाणी द्रौपदी आणि प्रतिविंध्यच्या (धर्मराजाचा मुलगा) संवादातून त्यांनी पांडवांच्या आचार-विचारप्रणाली संदर्भात आणि द्रौपदीचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तसेच विविध ठिकाणी तिची झालेली तगमग, घुसमट यावर प्रकाश टाकला आहे. जेव्हा प्रतिविन्ध्य स्वतःच्या आईला ( म्हणजे द्रौपदीला) 'आर्य धर्म' म्हणजे काय ? असं विचारतो; तेव्हा द्रौपदी त्याचे उत्तर " आर्य धर्म म्हणजे शिकार, मद्यपान, स्त्री लंपटपणा आणि जुगार" असे उपहासाने देते. ह्यातील प्रत्येक दुर्गुणाचे द्रौपदी पुढे स्पष्टीकरणही देते . म्हणजे ते खोटं असण्याची पण शक्यता नाही. ह्यावरून धुतल्या तांदळासारख्या मानल्या गेलेल्या पांडवांचे द्रौपदीने अनुभवलेले वर्तन कसे असेल आणि द्रौपदीला त्याचा किती त्रास झाला असेल ह्याची साधारण कल्पना येते .
लग्नानंतर पाच पांडवांबरोबर सलग ५ सुहाग राती झाल्यावर, सहाव्या रात्री कुंती अतिशय चाणाक्षपणे द्रौपदीला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देते.... " पाचही जणांवर काया-वाचा- मनानं सारखं प्रेम करायला हवंस तू. ते तुझं व्रत आहे". हा एकांगी उपदेश आठवून एका स्वगतात द्रौपदी म्हणते "काया आणि वाचा ह्या बाबतीत सारखेपणा ठीक आहे. पण मनाचा बलिष्ठ गुणधर्म सासवेला माहिती नाही का..?? मन कुणाच्या हातातलं असतं का ??". कुंतीने (पर्यायाने म्हणायचं तर समाजाने ) हा द्रौपदीवर केलेला अन्यायच नव्हे का ..?? विशेषतः अर्जुन आणि द्रौपदी हे फक्त पती-पत्नी नव्हते, तर एकमेकांचे सखा आणि सखी होते, ह्याची जाणीव दोघांनाही होती. ह्याचे हृद्य दर्शन भैरप्पांनी दोघांच्याही संवादांतून आणि स्वगतातून वाचकांना घडविले आहे. खरं म्हणजे पाच पांडवांपैकी द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम भीमाचे होते. पण ते त्याला व्यक्त करता येत नसे. जैविक दृष्टया इंद्राचा पुत्र असलेला अर्जुन हा जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धारी म्हणून नावलौकिक मिळविलेला, चतुर , देखणा , प्रेमाची भाषा जाणणारा , कुठल्याही स्त्रीला संमोहित करण्याची कला असलेला, रसिक असा होता. उदाहरणच द्यायचे तर... - द्वारकेकडे जाताना आकाशात पडलेलं टिपूर चांदणं रथ थांबवून पहात रहावे, असे अर्जुनाला वाटले. हा रजोगुण किंवा रसिकता भीमामध्ये नाही आणि हे द्रौपदीने अर्जुनाबरोबरच्या एकांतात वारंवार अनुभवले होते. तसेच एकमेकांसाठी अगदी अपेक्षांनुरूपही होते. दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नसे. विशेष करून द्रौपदीला प्रत्येक नवऱ्याचा सहवास दर चार वर्षांनी घडण्याची कुंतीची संकल्पना अमलात आणण्याची योजना दोघांनाही जीवघेणी ठरली. तरीही केवळ पाचही भावांची एकजूट कायम राखण्यासाठी द्रौपदीने स्वतःच्या तन-मनाची ससेहोलपट होऊ दिली. हा तिने पांडवांसाठी आणि परिणामी राज्यासाठी केलेला खूप मोठा त्याग आहे. ('आज्ञापालन ' आणि 'दिलेला शब्द पाळणे' हा देखील द्रौपदीचा खूप मोठा गुण इथे दृगोच्चर होतो ). सुरवातीला घालून दिलेल्या नियमाप्रमाणे रोज एक याप्रमाणे पाच महाकाय पतींशी शय्यासोबत आणि दर वर्षी एका मुलाला जन्म देणं, ह्यामुळे १८ व्या वर्षीचा द्रौपदीचा तारुण्याचा उत्साह २४ व्या वर्षापर्यंत पार ओसरून गेला, असे द्रौपदी स्वतः म्हणते. एका स्त्रीकडे पाच पुरुषांइतकी शक्ती असल्याचे कुंतीने तिला सांगितले होते म्हणे. ते कसे खोटे व स्वार्थी होते ह्याचा प्रत्यय द्रौपदीने घेतला आणि कुंतीला दोषही दिला. एवढेच नव्हे तर इथे भैरप्पांनी द्रौपदीच्या तोंडी मर्मभेदी वाक्य टाकले आहे. द्रौपदी म्हणते की " कुंतीची अपत्ये ही नियोगाने झाली असल्यामुळे तिला दांपत्य जीवनाचा तसा अनुभव नव्हताच म्हणा ". (अर्थात हे तिचे स्वगत आहे, म्हणून बरे). दुसरे म्हणजे स्त्रियांना संम्मोहित करण्यात कुशल असणाऱ्या अर्जुनाने द्रौपदीखेरीज उलुपी, चित्रांगदा आणि सुभद्रा ह्या स्त्रियांशी लग्न केलेच. भीमानेही हिडिंबेशी विवाह केला. ह्यामुळे द्रौपदीच्या स्त्री-मनाचा किती जळफळाट झाला असेल, याची आपण कल्पना केलेली बरी. कुंतीच्या सुपीक डोक्यातून निघालेले ‘व्रतपालन’ द्रौपदीसाठी एकतर्फीच ठरले.
आता थोडं अर्जुनाविषयी ..!! द्रोणाचार्य आणि अर्जुन ही गुरुशिष्यांची सर्वात आदर्श जोडी म्हटली जाते . गुरूला आपली कीर्ती वृद्धिंगत करणारा शिष्य हवा असतो. द्रोणाचार्यांनी आपली सगळी धनुर्विद्या अर्जुनाला दिली, आणि खरोखरच आपल्या गुरूंची इच्छा ह्या असामान्य शिष्याने पूर्ण केली. .... पण !! इथे भैरप्पांनी अगदी वेगळ्या गोष्टीकडे अंगुलीनिर्देश केला आहे. कुठल्याही कलेत किंवा कौशल्यात पारंगत झालेल्या व्यक्तीची महत्वाकांक्षा वाढत जाते. आणि ती सात्विकच रहाते असं नाही. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही किंमत द्यायची त्या व्यक्तीची तयारी असते. धनुर्विद्येत पारंगत असलेल्या अर्जुनाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा होती (असं भैरप्पा मानतात ). त्यावेळी ऑलिम्पिकसारखी स्पर्धा नव्हती, जिथे त्याला आपले कौशल्य दाखवून स्वतःसाठी नाव आणि प्रसिद्धी मिळविता आली असती. नाही म्हणायला ह्याच विद्येमुळे अर्जुनाने द्रौपदी - स्वयंवर जिंकले. पण त्याला स्वतःला आजपर्यंतचा सर्वोत्तम धनुर्धारी म्हणून अमर व्हायचे होते. त्यासाठी 'हे' महायुद्ध व्हावे अशी इच्छा अर्जुन एके ठिकाणी व्यक्त करतोय. (सहज मनात आले, की आजवर निर्माण केलेली अण्वस्त्रे जगावर डागण्यासाठी आसुसलेले ट्रम्प , किम जॉन्ग आणि पुतिन हे ह्यापेक्षा काय वेगळे आहेत?? फक्त अर्जुनाच्या मनात त्यांच्यासारखा साम्राज्यवाद नसावा). परंतु आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मोठा नरसंहार घडावा असं त्याला वाटतं, हे मोठे आश्चर्य आहे. आता बघा, कृष्णाने भगवदगीता सांगण्यासाठी अर्जुनाची निवड केली होती. म्हणजे त्यातल्या त्यात हातात धरण्यासारखा असामान्य क्षत्रिय 'अर्जुन' हा आहे असे आपण मानायला हरकत नाही. पण त्याचीच जर अशी राक्षसी महत्वाकांक्षा असेल , तर महाभारतातील बाकीच्या क्षत्रियांची काय मनोवृत्ती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अर्जुनाची वैय्यक्तिक महत्वाकांक्षा name & fame मिळविण्याची आहे. अर्जुनाच्या ह्या स्वगताच्या संदर्भात लागून उमा कुलकर्णी यांच्या अनुवादात एक सुंदर वाक्य आलंय "आकांक्षा-परवशतेत बुडालेल्या अर्जुनाने डोळे मिटून घेतले". (भले भैरप्पांनी अशा आशयाचे वाक्य मूळ कन्नड कादंबरीत घातले असेलही, पण उमाताईंनी वापरलेल्या आकांक्षा-परवशता ह्या जोड शब्दाला तोड नाही. त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे). ज्येष्ठ पत्रकार श्री दिनकर गांगल एका मुलाखतीत म्हणतात की मराठी माणूस वैयक्तिक उत्कर्षाच्या मागे आहे, सामाजिक प्रगतीच्या नाही; त्याची मला आठवण झाली. भारताचा स्कोअर काहीही असो...काही जणांना कोहलीची सेंच्युरी झाली, की कृतकृत्य वाटते. ही देखील मानसिकता काही वेगळी नाही. (मला आशा आहे कि अर्जुनाची 'वैयक्तिक महत्वाकांक्षा' हा फक्त लेखकाचा कल्पनाविलास आहे). गमतीचा भाग असा की युद्ध व्हावे म्हणून एव्हढी धनुष्याला धार काढून बसलेला अर्जुन, पण युद्धात स्वजन आणि गुरुजन शत्रुपक्षात पाहिल्यावर धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले. मानवतेचा स्फुल्लिंग अजूनही त्याच्यात जागृत होता, असा सकारात्मक अर्थ आपण घेऊया. धर्म - अधर्माच्या अर्जुनाच्या कल्पना अस्पष्ट होत्या असं म्हणावं लागेल. द्युतात युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावले, तेव्हाही अर्जुनाचे भाबडे धर्मज्ञान दृष्टोत्पत्तीस आले. बकासुराचा आणि जरासंघाचा वध देखील भीमाने अधर्माने केला असे त्याचे मत होते. ह्या संदर्भात "सुदैव पाठीशी असेल, तर अधर्म केला, तरी यश मिळतं हेच खरं!" हे वाक्य अर्जुनाच्या तोंडी लेखकाने घातलं आहे(पान २७१). क्षत्रिय योध्याला असे विचार अशोभनीय आहेत. अर्जुन अज्ञातवासात असताना एक वर्ष बृहन्नडेच्या रूपात वावरत असल्यामुळे त्याच्या मानसिकतेत आणि विचारांत स्त्रीचा अंश आला असे काही विद्वतजन मानतात. इथे अर्जुनाला "उत्तिष्ठ उद्धस्व भारतः " असे कृष्ण सांगतो आणि युद्धाला प्रवृत्त करतो.
इथपर्यंत
ठीक आहे. पण शास्त्रानुसार स्वजनांची आणि गुरुजनांची हत्या केल्याचे पातक अर्जुनाच्या
किंवा अन्य पांडवांच्या नावे लागत नाही का..?? ह्याचे तात्विक उत्तर बहुधा भगवद्गीतेत
कृष्णाने दिले असावे. ( माझा काही गीतेचा अभ्यास नाही ). शिवाय हा साक्षात भगवंताने
केलेला उपदेश असल्यामुळे अर्जुनाला पाप लागण्याचा प्रश्न उरत नाही, असा एक दुसरा युक्तिवाद
करता येतो. पण महाभारत वाचताना असे मात्र जाणवले कि कृष्ण हा स्वतः 'परमात्मा' किंवा ‘ईश्वरस्वरूप’ होता हे महाभारतातील
कुठल्याही व्यक्तीला फारसे जाणवले नसावे. आता बघा स्वतः राजसभेत येऊन कृष्ण सगळ्यांच्या
उपस्थितीत कर्णाला देखील कळकळीने सांगतो आहे, की दुर्योधनाची त्याच्याशी झालेली मैत्री
ही खूप वरवरची आहे. (आणि तू पांडवांचा ज्येष्ठ भ्राता आहेस , त्यामुळे तू पांडवांकडून
लढ असेही तो युद्धाच्या थोडे दिवस आधी कर्णाला सांगतो). कर्णाला खरं म्हणजे हे पटलं
आहे, पण त्याला ही कल्पना नाही, की हा उपदेश आपल्याला खुद्द ‘परमात्मा’ करतोय. नाहीतर
त्याने कृष्णाचा सल्ला मानला नसता का..?? किंबहूना महाभारतामध्ये कुठलीही व्यक्ती
"ईश्वरकृपेने अमुक झालं..." असं देखील म्हणताना दिसत नाही. ‘प्रारब्ध’ आणि
पुनर्जन्म ह्या संकल्पनाही शिखंडीचे एक उदाहरण सोडल्यास कुठेही महाभारतामध्ये आढळत नाही. (शाप आणि उ:शाप
यांचे मात्र खूप महत्व महाभारतात दिसते. उदा . पांडूला किदम्ब ऋषींनी दिलेला शाप ,
परशुराम ऋषींनी कर्णाला दिलेला शाप, अंबेने भीष्माला दिलेला शाप इतकेच काय पण युद्धाअखेर
गांधारीने कृष्णाला दिलेला शाप वगैरे). का बरं असं ?? ईश्वर, प्रारब्ध, क्रियमाण, संचित कर्म, पाप, पुण्य ह्या संकल्पना फक्त कलियुगासाठी
आहेत का ?? दुसरे असे, की "युद्ध टाळा
" असं कृष्ण कळकळीने सगळ्यांना समजावून सांगतो आहे. पण कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत
नाही. याचे मुख्य कारण म्हणजे 'कृष्ण हा परमात्मा आहे' ह्याचे ‘ज्ञान’ कोणालाच नाही.
अध्यात्म विवेचनात पारंगत असलेल्या डॉ. सौ धनश्रीजी लेले सांगतात की "भगवद्गीतेत १०
व्या अध्यायापर्यंत अर्जुन देखील कृष्णाला परमात्मा समजत नाही. सरते शेवटी त्यामुळे
११ व्या अध्यायात कृष्ण त्याला विश्वरूपदर्शन घडवतो". ह्यापुढे भक्तियोग येतो अशीही पुष्टी त्यांनी जोडली . पुढे कृष्णाचा सल्ला न मानण्याचा
प्रश्नच उरत नाही.
ह्या कादंबरीत द्रौपदीच्या मागोमाग मनात व्यक्तिरेखा ठसते ती कुंतीची !! भैरप्पा कुंतीचे चरित्र बरेचसे फ्लॅशबॅकच्या आणि स्वगताच्या स्वरूपात आपल्याला सांगून गेले आहेत. कुंती ही यदुवंशाच्या शुरसेनाची मुलगी; परंतु कुंतिभोज राजाला दत्तक गेलेली. वासुदेवाची बहीण असल्यामुळे कृष्णाची ती आत्या लागते. ह्या कादंबरीमध्ये कुंतीच्या चरित्राची सुरवात कुंतिभोजाकडे दुर्वास ऋषी मुक्कामाला येतात तेव्हापासून आहे. त्यांच्या सेवेत वेड्या वयातल्या (वय वर्ष १५) कुंतीला पाचारण करण्यात आले होते. कुंतीची वृत्ती सेवाभावी असल्याने तिने त्यांची मनोभावे सेवा केली. परंतु मातृत्वाच्या काहीश्या बालिश कुतूहलातून तिला दुर्वास ऋषींकडून तेजस्वी पुत्राची प्राप्ती होते. हाच तो कानिन पुत्र कर्ण ! ( सूर्यपुत्र कर्णाच्या जन्माची दंतकथा अन्यत्र वेगळी सांगितली जाते. पण भैरप्पा हे बरेचसे वास्तववादी असल्याने त्यांनी पुराणातली दुर्वास मुनींची कथा स्वीकारलेली दिसते). लग्नाआधी पुत्रप्राप्ती झाल्यामुळे कुंतिभोजाच्या आज्ञेवरून कुंतीला तिच्या बाळाचा त्याग करावा लागतो . कुंतीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही पहिली भयंकर घटना; जी आयुष्यभर भुतासारखी तिच्या मानेवर वेळोवेळी बसली. कर्णालाही त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागले. कुरुवंशाची पट्टराणी होण्याचे आमिष दाखवून कुंतीचे लग्न पांडूराजाशी लावून दिले गेले. ( मध्यस्थ अर्थातच भीष्म पितामह !!) कुरुराज्याचे ऐश्वर्य वाढण्यासाठी बरोबर गाड्या भरून धन दौलतही दिली होती कुंतिभोजाने. एक योद्धा आणि राजपुत्र ह्या दृष्टीने पांडूचे व्यक्तिमत्व आकर्षकच होते. परंतु पांडूराजाच्या शारीरिक न्यून्यतेमुळे कुंतीचे वैवाहिक जीवन अतिशय दुःखदायक, त्राग्याचे आणि विफलतेचे गेले. परिणामी कुंतीला पांडूराजाकडून अपत्यप्राप्ती झालीच नाही. वर लिहिल्याप्रमाणे कुरुवंश वाढविण्यासाठी पांडूराजाचे लग्न माद्रीशी करून दिलं जातं. पण त्यामुळे देखील काहीच साधले नाही. पांडू निपुत्रिकच राहिला. कुंती पांडुला त्याने तिला दिलेल्या वाईट वागणुकीविषयी क्षमा करते आणि एखाद्या आदर्श पतिव्रतेसारखी त्याच्याबरोबर तपश्चर्येसाठी हिमालयात जायला तयार होते. एवढेच काय, तर स्त्रीत्वाच्या आणि आशा निराशेच्या भयंकर आंदोलनातून जाऊनही कुंतीने पांडुराजाची वंश वाढीची अपेक्षा नेहमीच प्रफुल्लित ठेवली. ही एक त्यागाची अनन्य साधारण पातळी आहे. पांडूच्या दोन्ही समदुःखी बायका कुंती आणि माद्री यांची दिलजमाई होते आणि दोघीही त्याच्याबरोबर हिमालयात जातात. एवढेच नव्हे तर हिमालयात असताना ह्या वंश वाढीच्या फंदातूनच पांडूच्या सुपीक डोक्यात नियोगाची कल्पना निघाली. परंतु इकडे देखील त्याने जी काही वचने कुंतीकडून घेतली ती अमानुष नसली, तरी कुंतीसाठी टोकाची सत्वपरीक्षा घेणारी होती (अग्नीवर पाणी फेकण्याचीच ती क्रिया). कुंती दिलेल्या सर्व वचनांना जागली. कुंतीच्या असामान्य पातिव्रत्याची ही एक खुणच ठरली. हिमालया पलीकडील देवलोकात राहणाऱ्या धर्माधिकारी, देवलोकांच्या सैन्यदलाच्या प्रमुख मरुतदेव आणि इंद्रदेव ह्यांच्याकडून नियोगाने कुंतीला पुत्रप्राप्ती होते. अनुक्रमे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन अशी त्यांची नावे !! पितृबीजातून ह्या तिघांकडे जे यायचे ते गुण आलेच. कुंतीच्या आयुष्यात कलाटणी देणारी ही दुसरी घटना. ह्याच पद्धतीने अश्विनीकुमारांकडून माद्रीलाही नकुल आणि सहदेव हे पुत्र झाले. परंतु हिमालयातच (ऋषींनी दिलेल्या शापामुळे) पांडूराजाचे देहावसान झाले आणि माद्री त्याच्याबरोबर सती गेली. अर्थातच पाचही मुलांची जबाबदारी एकट्या कुंतीवर पडली; जी तिने फार कर्तबगारीने निभावली. वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी वैधव्य आलेल्या कुंतीने आपली पाचही वेगवेगळ्या वृत्तीची मुले महापराक्रमी होईपर्यंत त्यांचे पालन पोषण-संस्करण-संवर्धन-शिक्षण केले, हे तिच्या असामान्यत्वाचे दुसरे लक्षण.!!
पांडवांच्या जन्माचा विषय निघालाच आहे, तर त्यावर माझ्या मनात त्याविषयी आलेले विचार आपल्या नजरेस आणावेसे वाटतात. नियोगाने झालेला पहिला मुलगा युधिष्ठिर हा हाडापेराने सामान्य होता. त्यामुळे पांडुराजाला आता बलिष्ठ मुलाची निकड भासू लागली. कारण असा मुलगाच क्षत्रिय वंशाला किर्ती देऊ शकेल असे त्याला वाटले. (माणसाच्या लालसेला काही सीमा नाही. शिवाय कुरूराज्याच्या सत्तेची अभिलाषा देखील होतीच. भवरजाल मनही ललचावत...असं विनायकबुवा काळे गुरुजी एका बंदिशीत म्हणून गेलेत ते काही खोटे नाही). तपश्चर्येला म्हणून हिमालयात आलेला पांडूराजा प्रत्यक्षात काय करत होता हे बघण्यासारखे आहे. याबद्दल आपण त्याला दोष द्यायचा की ह्या पद्धतीने ५ मुले (अर्थात पांडव) जन्माला घातल्याबद्दल त्याचे कौतुक करायचे, ते आपल्याला कळेनासे होते. की हे सर्व ईश्वरप्रणीत होते...?? पांडूराजाला ईश्वरामार्फत विशिष्ट बुद्धिस्फुरण तर होत नव्हते..?? कदाचित पांडुराजाचे ‘वंध्यत्व’ ही देखील ईश्वरेच्छा म्हणायची का?? कारण त्याच्या स्वतःच्या बीजापोटी आलेली मुले कशावरून पांडवांइतकी पराक्रमी झाली असती...?? असे झाले असते, तर सगळा महाभारत बदलला असता. असा विचार ८० व्या वर्षी कायम नदीवर बसून भूतकाळावर चिंतन करणाऱ्या कुंतीने कधी केला का ??
दुसरे असे कि धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही सगळी मुले नियोगातून जन्मलेली....ती देखील देवलोकांकडून !! ह्यातच त्यांचे असामान्यत्व जाणवते. (म्हणूनच ‘आरण्यक’ ह्या मतकरींच्या नाटकात पांडवांना दिव्यशक्तीची मुले असे युयुत्सुने संबोधले आहे). अर्जुनाच्या जन्माची कथा तर सांगते, की त्याचा खरा पिता इंद्रदेव नियोगाआधी पांडुकडे भाकित करतो की धृतराष्ट्र पुत्र आणि पांडुपुत्र यांचे निश्चितपणे युद्ध होणार; ज्यासाठी त्याला बलिष्ठ पुत्राची आवश्यकता आहे. ह्याचा अर्थ पांडवांचा जन्म हा देवांच्या इच्छेनेच झाला असा निष्कर्ष आपण काढू शकतो का ??. पांडूची सत्ता-अभिलाषा आणि कुंतीची समर्थ गर्भधारणशक्ती ही फक्त त्यासाठी आवश्यक असणारी pre-requisites आहेत. हे सगळं मला fascinating वाटतं.
कुंतीच्या बाबतीत आणखी दोन टिपण्णी कराव्याश्या वाटतात. कुंती द्रौपदीला सांगते कि तू पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार कर. मी कुंतीच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा हा निर्णय योग्य होता असं वाटतं. (जरी द्रौपदीसाठी तो अन्यायकारक होता). विदुषी इरावती कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे "अगदी तोलून , मोजून मापून पाहिले तर प्रत्येक व्यावहारिक कृत्यामध्ये काहीतरी दोषास्पद असतेच" (युगान्त-पान १८१). अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरातून जिंकून आणले असले, तरी द्रौपदीच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे बाकी चारही भावांना तिची अभिलाषा निर्माण झाली होती. असे म्हणतात कि तिच्यावर हक्क सांगताना हे भाऊ आपापसात अक्षरशः हिंस्त्र पद्धतीने भांडले ( क्षत्रिय वृत्ती काही ठिकाणी घातक ठरते ). पाचही भावांनी निदान राज्यासाठी तरी एकत्र राहिलेच पाहिजे ही कुंतीची खूणगाठ होती आणि त्या बाबतीत ती नेहमीच दुराग्रही राहीली. त्यामुळेच तिने द्रौपदीवर आपला अन्यायकारक निर्णय लादला आणि बऱ्यापैकी यशस्वी करून दाखविला. मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचे तर There is nothing like right decision. Sometimes you have to take the decision and make it right. कुंतीची बुद्धी निश्चयात्मक होती. अन्यथा ह्या आणीबाणीच्या समस्येवर कोण तोडगा काढणार होते ..?? अजून एक गोष्ट......कर्णाच्या जन्माबाबत कृष्णाने खुद्द कर्णाकडे पर्दाफाश केला. कारण कर्णाने धर्मयुद्धात पांडवांच्या बाजूने लढावे असा त्याचा आग्रह होता. ( Bcz perhaps he did not consider Karna as a sinner). पण ह्या पर्दाफाशामुळे कुंतीला खूप मानसिक त्रास झाला आणि तिने कृष्णाला खूप दूषणे दिली. अज्ञानापोटी का होईना, पण कुंतीने याच जन्मात केलेल्या पातकाची ही मिळालेली सजा तर नव्हती ??.
आता इतिहास तथा पुराणाला छेद देणारी एक गोष्ट ….!! सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू तर युद्धात मारला गेलाच. पण द्रौपदीची ५ तरुण मुलेही अश्वत्थाम्याने मारली. शेवटची एकमेव आशा गर्भार असलेली उत्तरा होती. पण तिचेही अखेर miscarriage झाले,असे कादंबरीत दाखविले आहे.. परिणामी पांडवांचा वंश पुढे टिकून कसा राहणार, असा प्रश्न उपस्थित झाला. पर्व कादंबरीत असा उल्लेख आला आहे कि महायुद्ध संपल्यावर कुंती द्रौपदीला नव्याने पुत्र देण्यासाठी विनवित होती. विचार करा द्रौपदीचे वय काय असेल ?? आणि मनस्थिती ..?? आत्तापर्यंत एव्हढी आदरणीय आणि संयमशील असलेल्या कुंतीकडून ही अपेक्षा आहे ..?? एरवी आभाळाएव्हढ्या उंचीची महाभारतातील पात्रे एका क्षणात सर्वसामान्य होऊन जातात, असे तर भैरप्पांना सुचवायचे असेल का यातून ..?? अशाच वृत्तींमुळे द्वापारयुगातून कलियुगाकडे संक्रमण झाले का..???( पण हा देखील भैरप्पा यांचा कल्पनाविलास आहे असं मला वाटतं )
(विशेष टिपण्णी : उत्तरेच्या पोटातील गर्भाचे ब्रह्म्हास्त्रापासून रक्षण करण्याचे कृष्णाने केलेले अलौकिक कार्य भैरप्पांच्या कादंबरीत दुर्दैवाने दिसत नाही. किंबहुना पान ७७३ वर हा गर्भ गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एका अर्थी परीक्षिताचा जन्मच झाला नाही, असं म्हणायचं आहे का त्यांना ..?? मला वाटतं हा त्यांचा प्रस्थापित पुराण बदलणारा कल्पनाविलास मात्र टीकेला पात्र आहे. किंबहुना परिक्षित म्हणजे 'सर्व बाजूंनी रक्षित' असा अर्थ धनश्रीताई सांगतात ... ).
एव्हढी एके काळची कुरुराज्यातली पट्टराणी कुंती, पण धर्मराजाच्या मूर्खपणापायी तिला साडेतेरा वर्षे विदुराच्या घरी राहावे लागले. किती हे दुर्दैव !! But all said and done, I guess Kunti was a character larger than life..!!
खरं म्हणजे युयुधान, सात्यकी, नंदक, अभिर यांच्यातील संवादाला लेखकाने अंमळ थोडे पाल्हाळ लावून अनेक पाने खर्ची घातल्यासारखे वाटले (कादंबरी थांबल्यासारखीच वाटली). अर्थात लेखकाची स्वतःची म्हणून एक आवड असूच शकते. शिवाय मी म्हणेन कि अन्यत्र कुठे न लिहिलेल्या गोष्टी त्यांनी व्यापक स्वरूपात ह्या कादंबरीत अंतर्भूत केल्या आहेत. बहुधा कृष्णाचे द्वारकेमधील साध्या गावकऱ्यांमधील वर्तन कसे संतुलित होते, हे त्यांना वाचकाला दाखवून द्यायचे असेल. पण इथेही भैरप्पा तुम्हाला विचार करायला लावतात. "राज्य उभारणं आणि राज्य करणं ही क्षत्रियांची खोडच आहे. हवं तर व्यवसाय आहे म्हण. जिथपर्यंत क्षत्रिय ही जात आहे, तिथपर्यंत युद्ध होतच राहणार". हा पान ३७४ वरील संवाद सत्यक आणि युयुधान ह्या पिता-पुत्रातील आहे, जो मानवी वृत्तीवर वाचकाला विचार करायला भाग पाडतो. वेगवेगळे प्रश्न पडतात आपल्याला. क्षत्रियत्व ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे का ?? DNA responsible ?? आज आपल्या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांमध्ये क्षत्रिय जास्त आहेत का..?? ब्राह्मण काय करतायत नक्की...की फक्त सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करतायत ?? वगैरे वगैरे. (कदाचित न बोलायच्या गोष्टी आहेत ह्या). मथुरेवर जरासंधाकडून आक्रमण झाल्यावर कृष्णाने मथुरेतील लोकांसहित सर्व काही द्वारकेला हलविले. नव्हे नवी द्वारकाच वसविली. म्हणजे त्याचे नेतृत्व काय दर्जाचे असेल, हे लक्षांत घेण्यासारखे आहे. तरीही काही गोष्टींमुळे (उदा. अर्जुन -सुभद्रा विवाह, पांडवांची जन्मकथा वगैरे ) द्वारकेत दोन गट होतेच. खुद्द भगवंतालाही राजकारण चुकले नाही. सात्यकी वगैरे मंडळींचा एक गट पांडवांकडून, तर कृतवर्मा वगैरे लोक कौरवांकडून लढले. बलराम तटस्थ राहिला. एकांगी विचार करणारा आणि गर्विष्ठ बलराम हा hard liner होता. त्यामुळे त्याला कृष्णनीती कधी समजलीच नाही. (षडरिपूंचा अंमल जास्त झाला, कि भगवंताची करणी समजणे कठीण जाते). ह्या कादंबरीत बलराम आणि कृष्ण यांच्यातील नात्यावर भैरप्पांनी वेगळाच प्रकाश टाकला आहे. बलरामाने रुक्मिणीच्या भावाला प्रद्युम्नच्या लग्नात मारले आणि कृष्णाची बाजू खूप अवघड करून ठेवली. बलरामाला कृष्णाविषयी मत्सरही होता. शिवाय बरेच वेळा कृष्ण अन्य राज्याच्या राजकारणात किंवा युद्धात गुंतला असल्यामुळे द्वारकेतील लोकांना बलरामच आपला नेता वाटत असे. थोरला भाऊ असल्यामुळे कृष्णाला काही ठिकाणी बोटचेपे धोरण स्वीकारावे लागले आहे. असो !! युयुधान प्रकरण जवळ जवळ ९० पाने चाललं. त्यातून कंसजन्म-वध, जरासंध-वध अशा अनेक कथा समजल्या. युयुधान सात्यकी हा द्वारकेचा यादव होता. कृष्णाच्या नात्यातील होता. आणि त्याच्या लहानपणापासून कृष्णाच्या सान्निध्यात असायचा. त्याच्यावर अवघ्या १५ - १६ व्या वर्षी मथुरेहून द्वारकेला झालेल्या स्थलांतराच्या वेळी कृष्णाने पूर्ण ताफ्यावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपविली होती. तरीही उग्रसेनच्या गावी गेलेला असताना त्याला कंसाच्या लहानपणीची कथा समजल्यामुळे कंसवधाबद्दल (कृष्णाबद्दल) त्याच्या मनात बुद्धिभेद झाला. ज्यामुळे पांडवांच्या बाजूने लढायचे की नाही अशा द्विधा मनस्थितीत तो होता. बहुतेक कृष्णाने त्याची समजूत काढली असावी, कारण अखेर तो पांडवांच्या बाजूने लढला, असे पुराण सांगते.
आता थोडे कृष्णाविषयी ... !! इथे काही कृष्णाचे चरित्र वगैरे लिहायचे मनात नाही. ते न संपणारं आहे . पण पर्वमध्ये लेखकाने कृष्णाला कितीसं पकडलंय एव्हढेच लिहिणार आहे. कादंबरीतून कृष्णाचे काही गुण दृगोच्चर झाले आहेत ... १) योग्य ठिकाणी मदतीला धावून जाणे: - पांडवांना त्याने वेळोवेळी केलेली मदत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्याविषयी कितीही लिहिलं तरी कमीच पडेल. कंसाला आणि शिशुपालाला स्वतः मारून त्याने सर्वसामान्यांची सुटका केली. तसेच भीमाकरवे जरासंधाला मारले. नरकासुराच्या तावडीतून सोडविलेल्या स्त्रियांशी (परित्यक्ता) लग्न करून त्यांच्या जीवनात आनंद आणला. अशी अजूनही काही उदाहरणे देता येतील. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे करताना त्याची धर्म आणि न्याय्यबुद्धी शाबूत होती. अधर्माला त्याने कधीही पाठिंबा दिला नाही. किंबहुना अधर्माचा बिमोड करायचा हेच कृष्णाचे ध्येय होते. २) कृष्ण उत्तम वकील होता : अर्जुनाला ज्या पद्धतीने सुभद्रेचे अपहरण करण्यास त्याने भाग पाडले, ती कथा ह्या दृष्टीने वाचनीय आहे. तसेच कुंती आणि कर्ण यांचा समेट घडवून आणण्यासाठी त्याने केलेला युक्तिवाद बिनतोड आहे. फक्त कर्ण दुर्योधनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचा फायदा पांडवांना झाला नाही. ३) नेतृत्वगुण आणि सततची सावधानता : - दुर्योधन त्याला अटक करणार होता, त्यावेळी बरोबर गुप्त अंगरक्षक असल्यामुळेच तो वाचला. तसेच मथुरेवर चाल करून येणाऱ्या जरासंधाच्या तावडीतून सगळ्यांची सुटका व्हावी म्हणून स्वतः वाईटपणा घेऊन सगळ्यांनी द्वारकेस पलायन करावे हा गनिमी कावा कृष्णाचा होता. अन्यथा जरासंधाचे सैन्य इतके महाप्रचंड होते, कि संपूर्ण मथुरा त्याच्या भक्ष्यस्थानी पडली असती. ह्यामध्ये कृष्णाची नुसती सावधानता नाही, तर मोठ्ठा नेतृत्वगुण देखील दिसतो. सावधानतेच्या बाबतीत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी शिवाजी महाराजांची तुलना कृष्णाशी केली आहे, यातच सगळे आले. ४) थोरा मोठ्यांबद्दल आदर : कृष्णाने थोरामोठ्यांबद्दल कुठेही अनादर केलेला दिसत नाही ( मग ते धृतराष्ट्र - गांधारी का असेनात!!). त्याच्या तोंडी शत्रूविषयीदेखील कुठे अनुदार उदगार आपल्याला दिसत नाहीत. कुठेही वल्गना नाहीत . जे काही असेल ते कृतीत दिसायचे. ५) उत्तम निरीक्षण शक्ती : महाभारतातील जवळ जवळ प्रत्येक पात्राचे अणु रेणू कृष्ण जाणत होता, आणि त्याप्रमाणेच तो राजनीती - व्यूह आखीत असे ( तसं बघायला गेलं तर भगवंताला काय अशक्य असतं ??). ६) चाणाक्ष :जरासंधाच्या वधाच्या वेळी "भीम आणि अर्जुन दोघंही मोठे धैर्यशील.....पण त्यांना शत्रूचं नेमकं मर्म हरण्याची बुद्धी मात्र नाही". हे वाक्य कृष्णाच्या तोंडी घालून भैरप्पांनी त्यांच्या ह्या तिन्ही नायकांची व्यक्तिरेखा अधिक स्पष्ट केली आहे. ७)उत्तम मानस शास्त्रज्ञ : जेव्हा कृष्ण कर्णाला पांडवांचा ज्येष्ठ भ्राता होऊन नवीन माणूस व्हायला सांगतो, तेव्हा बाकी सर्व सूतसंस्कार, पांडवांचे वैमनस्य वगैरे सर्व काही त्याला विसरायला कसे होईल किंवा शक्य आहे, हे 'तार्किक' कृष्ण कर्णाला सांगत आहे (पान ४१०). (भैरप्पांचा देखील मानसशास्त्राचा अभ्यास असावा).
कृष्ण स्वतः परमात्मा असल्याचे अगदी थोडेच दाखले ह्या कादंबरीत मिळतात..
- द्युतात लावलेल्या द्रौपदीचे लज्जारक्षण
- शिखंडी हा अंबेचा पुनर्जन्म आहे हे कृष्णाला कसे माहिती..??
आता थोडे भैरप्पा यांच्या लेखनाविषयी !!
भैरप्पा
महाभारतातील कोण कुठली व्यक्ती
असली, तरी तिला आपल्या
प्रतिभेने एक प्रकारचे वलय
प्राप्त करून देतात. त्याचा
व्यवसाय, वय, गाव, आई
वडील ह्या गोष्टींना संवादात
गुंफून वाचकाशी त्या व्यक्तीचा एक
प्रकारचा बंध निर्माण होतो.
(आपल्याला नाही का प्रवास
करताना एखादी छान व्यक्ती भेटते
आणि थोड्याच वेळात आपल्याशी जवळीक निर्माण करते... तसेच). नावेवरील
आयात केलेला माल उतरविणारा २०
वर्षाचा क्रतु आणि युयधान ह्या
दोघांचा असाच एक संवाद
आहे (पान ३४९). हा
क्रतु म्हणजे धृतीचा मुलगा. धृती ह्या स्त्रीला
अनेक स्त्रियांसारखे दरोडेखोरांपासून कृष्णाने मुक्त केले होते. कृष्णाने
कुठे कुठे काय काय
करून ठेवले होते हे कदाचित
लेखकाला अप्रत्यक्षपणे सांगायचे असावे. हा एक कृष्णचरित्राचा
भाग होऊ शकतो. बलराम
- युयुधान , सत्यक - युयुधान, कुंती - प्रतिविन्ध्य, सारथी - भीम , सारथी- अर्जुन अशा अनेक संवादातून
लेखक तुमच्यापर्यंत कथानक , व्यक्तिरेखा आणि त्यांचे विचार
पोचवितात. स्वभावातील
सूक्ष्म छटा ओळखून कथा
रंजक कशी करायची ह्याची
विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. अशाच प्रकारे
सुभद्रेचा 'स्त्री-हट्ट' एका ठिकाणी ते
व्यक्त करतात. द्वारकेला जाताना १२ रथांचा ताफा
अर्जुनाच्या बरोबर असतो आणि एवढ्या
रथांची आपल्याला काही जरूर नाही
असे अर्ध्या प्रवासात गेल्यावर अर्जुनाला जाणवते. त्यामुळे तो सारथ्याला
सांगतो कि फक्त दोन
रथ ठेवा आणि बाकीचे
परत पाठवून द्या. परंतु सुभद्रा माहेरी जात असल्याकारणाने तिला
बहुसंख्य स्त्री वर्गासारखी थोडी मिरवायची हौस
असावी. त्यामुळे ती अर्जुनाला विरोध
करते आणि म्हणते "राजकुमाराबरोबर
फक्त दोन रथ..?? तसं
नाही चालणार. सगळे रथ आपण
घेऊन जाऊया द्वारकेला". असं वास्तवाचं दर्शन
भैरप्पा कादंबरीमध्ये गुंफून वाचकाला कादंबरीत गुंगवून ठेवतात.
धृतराष्ट्र
आणि विदुर हे अनुक्रमे अंबिका
आणि दासी परिश्रमा ह्यांचे
नियोगाने जन्माला आलेले पुत्र !! बीजकर्ता दुसरे तिसरे कोणीही नसून कृष्णद्वैपायन व्यासच
होत, हे आपल्याला माहिती
आहे. परंतु व्यासांना नमस्कार करताना धृतराष्ट्र तिऱ्हाईताला नमस्कार करावा तसा करतो. परंतु
दासीपुत्र विदुर मात्र व्यासांचे पाय प्रेमाने घट्ट
पकडून ठेवतो. असे का..?? ह्याची
जी काही कारणमीमांसा भैरप्पांनी
केली आहे, ती थक्क
करणारी आणि वाचनीय आहे.
नित्य व्यावहारिक तपशिलातही बारीक लक्ष घालताना भैरप्पा
कुठे पोचतील काही नेम नाही.
एका वेगळ्या स्तरावर नेणारे हे व्यासांचे स्वगत
आहे. पण हे करताना
त्यांनी स्नेहाचे आणि प्रेमाचे महत्व
देखील अधोरेखित केले आहे. ( पान
५५५). एखादी भावना किंवा वृत्तीचा परिपोष करण्यासाठी भैरप्पा अक्षरशः टोक गाठतात. जरासंधाच्या क्रौर्याची पातळी नजरेस आणण्यासाठी ते लिहितात की
नगार्यावर त्याने मारलेल्या माणसांचे कातडे ताणून बसवले होते. एवढेच काय, पण पुढे
ते म्हणतात की ( जनावराच्या चामड्यासारखी कंपनशक्ती
नसणारे) हे नगारे 'डग
डग ' असे वाजत. बीभत्सरसाचे आणखी एक उदाहरण …..नागसेनेने युद्धात मारावायचे बाण सर्पाच्या
विषामध्ये बुडवून
ठेवले होते. ते
बाण पांडवांच्या सैनिकांना लागल्यामुळे त्यांचा मृत्यू तर ओढवलाच; पण
मृत्यूनंतर शरीरही काळे निळे पडले;
एवढेच नव्हे तर या प्रेतांवर
ताव मारणाऱ्या गिधाडांनाही त्या विषाची बाधा
होऊन त्यांचा मृत्यू ओढवला. Bhairappa indeed exploits his
creative liberty here.
भैरप्पांनी केलेले महायुद्धाचे किंवा महायुद्धाच्या तयारीचे वर्णन थरकाप ऊडवणारे आणि वास्तववादी आहे. महासेनापतीपद भूषविणाऱ्या भीष्म पितामह यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या १२० वर्षांच्या महानुभवाची साक्ष देणारे वाटतात. उदा. चढाई आधी कोण करणार या प्रश्नाचं उत्तर देताना "कौरव निश्चितपणे करणार नाहीत", असा निर्णय त्यांनी दिला. तसेच या निर्णयावर प्रतिप्रश्न करणाऱ्या कर्णाला त्याची जागा दाखवून गप्प केले. याचा अर्थ भीष्माच्या मनात पांडवांवर चढाई करण्याचे नव्हते. ( खरं सांगायचं तर , 'यांजसाठी केला होता का वंशवृद्धीचा अट्टाहास?' अशी त्यांच्या मनाची स्थिती असणार. अशा प्रकारचे युद्ध होणे ही त्यांच्यासाठी शोकांतिका होती). युद्धाच्या सुरवातीलाच कौरवांच्या सैन्यामध्ये घबराटीचे वातावरण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दुर्योधनाला आणि द्रोणांना बोलावून ज्यां सैनिकांना लढायची भीती वाटते आहे, त्यांना परत पाठवून द्यायची व्यवस्था केली, कारण सैन्यात घबराटीचे वातावरण काय कामाचे..?? ह्यासाठी सगळीकडे आसमंतात दवंडी पिटण्यात आली. दवंडी काही साधीसुधी नव्हती. जमलेल्या योध्यांच्या मनातील द्विधा मनस्थितीला तिने वाचा फोडली. काही सैनिक स्वतः न लढताच परतही गेले. युयुत्सु सारख्या उत्तम अश्वपरीक्षा असलेल्या दासीपुत्र योध्याच्या मनात त्यामुळे बुद्धिभेद उत्पन्न होऊन तो कौरवांच्या भर छावणीतून निघून पांडवांसाठी लढण्यास उद्युक्त झाला. असो !!वेळ पडल्यास महाराजा दुर्योधनाचाही यथोचित पाणउतारा भीष्म योग्यायोग्यतेचे भान ठेवून करतात. बोलणं देखील अगदी मोजकं आणि नेमकं !! हे सर्व निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाची झलक दाखवतात. (पूर्णपणे त्यांच्या वडिलांनी वाढविल्यामुळे भीष्मांच्या ठायी 'भय' म्हणून काहीही नव्हते). भैरप्पांनी ह्या अभूतपूर्व महायुद्धाचे केलेले वर्णन अंगावर काटा आणणारे आणि कल्पनातीत आहे. युद्धाच्या शेवटच्या काही दिवसात सैनिकांना खायची प्यायची सुद्धा मोताद झाली. हातात तलवार, धनुष्यादी अस्त्रे घ्यायची तरी ताकद हवी ना..?? I think only adrenaline was enabling the soldiers to fight a war. खुद्द धृतराष्ट्राच्या राजवाड्यात देखील शेवटचे ३-४ दिवस चूल पेटली नाही म्हणे. एक विचार शिवून गेला मनाला. धर्मासाठी हे महायुद्ध घडवून आणले गेले असं मानलं, तर सगळं बेचिराख झाल्यावर तथाकथित धर्माचा उपभोग घ्यायला शिल्लकच कोण होतं. ?? (आणि असलेच, तर ते मोजके लोक फक्त हस्तिनावतीत). बाकीच्या प्रांतातील, राष्ट्रातील ( ज्या भूमीवर युद्ध घडले नाही) तिथल्या प्रजेला ह्या महायुद्धाचा काय फायदा झाला..?? की ह्यालाच 'जगबुडी' म्हणतात ?? जवळ जवळ सर्वच योद्धे मेले, म्हणजे त्यांच्या सर्वांच्या मृत्यूचा हा एकत्रित दुर्भाग्ययोग होता का..?? पाप-पुण्याचा हिशेब केल्यास सगळ्यां पापी माणसांच्या पापाचा घडा एकाच वेळी भरला का..?? मला वाटतं हा विषय The Celestine Prophesy ह्या पुस्तकात आलेला आहे. पुण्यवान योध्यांना वीरमरण आले असे गृहीत धरुयात.
पर्व कादंबरीमध्ये भैरप्पा एखाद्या पात्राच्या तोंडून तत्वज्ञान सांगून जातात...मग ते युद्धतत्व का असेना. कृष्ण अर्जुनाला प्रतिज्ञा आणि ध्येय यातील फरक समजावून सांगतो.... "प्रतिज्ञेला पूर्ततेची अट असते; ध्येयाला ती नसते". तसेच एके ठिकाणी दुर्योधन म्हणतो "राज्याबाहेरील शत्रू नसेल, तर राज्यात एकता तरी कशी राहणार...??"हे खूप आशयगर्भ वाक्य आहे. एके ठिकाणी भीम म्हणतो शत्रूच्या व्यूहाला प्रतिसाद देण्यापेक्षा आपल्याला अनुकूल होईल, अशा रीतीने युद्धाची परिस्थिती आपण वळवून घेतली पाहिजे. भैरप्पांच्या ( आणि अनुवादक उमाताई कुलकर्णींच्या ) भाषाप्रभुत्वाला तोड नाही ... भैरप्पांचे दर्जेदार संवाद, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि उपमा अलंकार वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात. एके ठिकाणी ते काय लिहितात पहा ... " कुंती नदीच्या पात्रात पावलं बुडवून बसली होती. छोटे मासे तिच्या नितळ पावलांचे चावे घेत होते". का नाही प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणार ?? अर्जुन मध्यरात्री प्रवास करत असताना ते लिहितात "घोड्यांची शुभ्रता ओळखू येईल एवढं चांदणं पसरलं होतं". अर्जुन त्याच्या एका बायकोविषयी म्हणतो "चित्रांगदा - स्वीकार करणं हा तिच्या स्वभावाचा स्थायी गुण होता; अर्पण करणं हा नव्हे !". नुसत्या कल्पनेनं माणसाचं दुःख आणि संकटं वाढत जातात. याविषयी मोजून ४ शब्दात कुंती म्हणते " न दिसणारं भूत आकाशाला व्यापून राहतं". जेव्हा कृष्ण कर्णाला दुर्योधनाच्या मैत्रीची परीक्षा घेण्यास सुचवितो , तेव्हा "स्नेह ही काय परीक्षा घ्यायची वस्तू आहे ?? अतिशय नाजूक किंचित हयगयीने फुटून जाणाऱ्या दुधाची परीक्षा घेणे योग्य आहे का..??" - असा विचार कर्णाच्या मनात येतो. तसेच गांधारीचे एक सुंदर वाक्य आहे ..""कृष्णा, भ्रमात जी शक्ती आहे, ती वास्तवात असते का..??"
ह्या
लेखाच्या सुरवातीला द्रौपदी, कुंती आणि माद्री यांच्यावर किती प्रकारे अन्याय झाला
ते आपण बघितले. ह्या स्त्रिया सहन करत राहिल्या. महाभारतातील स्त्रियांवरील अन्यायाची
आणखी काही ठळक उदाहरणे देता येतील:
-
अंबा, अंबिका आणि अंबालिकेवर भीष्माने लादलेला नियोगाचा प्रयोग; ज्यातून धृतराष्ट्र , पांडू आणि विदुराचा जन्म झाला .
-
सत्यवतीकडून पराशर ऋषींनी ८ वर्षाच्या मुलाला (व्यासाला) स्वतःबरोबर घेऊन जाणे
-
धृतराष्ट्र महाराज, पांडूराजा, अंगदेशाचा राजा कर्ण ह्या सगळ्यांच्या सेवेत अनेक दास्या
होत्या. राजाकडून त्याची सेवा करणाऱ्या दास्याना मिळणारी वागणूक फार काही चांगली नसे.
आंधळ्या धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी १४ पुत्र हे त्याची पत्नी गांधारीचे होते
. बाकी ८६ पुत्र त्याच्या सेवेत असणाऱ्या दास्यांचे होते. पांडवांकडून लढणाऱ्या युयुत्सु
सोडून बाकी ९९ पुत्र युद्धात मारले गेले. त्यांच्या मातांना किती पुत्रशोक झाला असेल
याची कल्पना केलेली बरी.
-
महायुद्ध चालू असताना मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या सैनिकांना पुरविलेल्या दासींचे भवितव्य
किती कठीण असणार ह्याची कोणाला कल्पना येणार..?? दुर्योधन महाराजापुढे कुणाचे शहाणपण
आहे..???
स्त्रियांवर
होणारा अन्याय हा खूप जुन्या काळापासून आहे हे पुन्हा एकदा महाभारतावरून समजते. मत्स्यगंधेची
कहाणी सर्वश्रुत आहे . तिच्याकडे आकर्षित होऊन
पराशर ऋषींना कानींन पुत्र होतो. पण आठ वर्षांनी परत येऊन (त्याला आईकडे न ठेवता),
ते स्वतः बरोबर वेदाभ्यासासाठी घेऊन जातात. ( तेव्हाच्या धर्म कल्पनेनुसार क्षेत्रापेक्षा बीजाला प्राधान्य दिले
गेले). हेतू चांगला असला, तरी हा त्या आईवर आणि मुलावर अन्याय नाही का ?? वाईटात चांगले
म्हणजे तो मुलगा खूप चांगला वेदाभ्यास करतो आणि पुढे वेदव्यास म्हणून प्रसिद्ध होतो.
कोणी असेही म्हणू शकतं, की जर सत्यवतीकडेच मुलगा ठेवला असता, तर वेदव्यास निर्माण झाले असते का आणि महाभारत तरी लिहिला गेला असता
का..?? असाच एक जरतरचा यक्षप्रश्न माझ्या मनात येतो, की गांधारीने डोळे झाकलेच नसते,
तर तिने डोळसपणे कौरवांना वाढवले असते का..??
त्यामुळे कुरुक्षेत्र टळले असते का ?? कि कदाचित अधिक तीव्र झाले असते ?? तसेच द्रौपदीने बाकीच्या चौघांची बायको व्हायला नकार दिला असता तर..?? कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली नसती तर ??
कादंबरी वाचताना एक गोष्ट जाणवली की महाभारतातील दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांवर लेखकाने फार अख्यान लावलेले दिसत नाही. कुंती-कृष्ण संवाद, तसेच कुंती-कर्ण भेट ! या दोन्ही प्रसंगांवर इतर कादंबरीकारांनी भरपूर लिहिलं आहे. पण भैरप्पां मनस्वी साहित्यिक आहेत. मळलेली वाट ते चोखाळतीलच असे नाही. तसा ३-४ पानांचा संवाद आहे कुंती आणि कर्णाचा सूतघाटावर झालेला, जो वाचनीय आहे (पान ४१६). पण कर्ण कुंतीला एक मार्मिक प्रश्न विचारून निरुत्तर करतो. कर्ण कुंतीचा राग करत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे, जी मनाला भावली. तसेच काही प्रसिद्ध दंतकथांचा उल्लेख या कादंबरीमध्ये आढळला नाही. उदा. 'अश्वत्थामा गेला', अशी वावडी युद्धात उठवली गेली होती, ज्यामुळे द्रोणाचार्य एकदम निष्प्रभ झाले. ह्याचा उल्लेख नाही. कर्णाचा रथ मातीत रुतून बसतो आणि त्याचा फायदा उठवायला कृष्ण सांगतो हा महत्त्वाचा प्रसंग भैरप्पांनी का टाळला असावा..?? तसेच शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह नक्की कधी निवर्तले याचा कादंबरीत नंतर काहीच उल्लेख नाही. त्याविषयी आपापसात कुणाचा संवाद नाही हे खटकते. युद्ध आपल्या बाजूने खेळावे म्हणून भीम घटोत्काच्याला विनंती करायला जातो खरा. पण त्यानंतर त्यांचा दोघांचा काय संवाद होतो यावर काहीच लिहिले गेले नाही; त्यामुळे भेट अर्धवट वाटली. मला खूप कुतूहल होते. धर्मराजाची व्यक्तिरेखाही मनात नीट ठसली नाही. तो चित्रपटातला पाहुणा कलाकार वाटला.
अर्थात महाभारत, त्यातील पात्रे , त्यांच्या जन्मकथा -कृती, त्यावेळची सामाजिक स्थिती, बारीकसारीक धागेदोरे हे सर्व मिळून महासागर आहे. एक लेखक त्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळेच तो अनेक गुणवंत लेखक, अभ्यासक आणि विद्वत्जनांना आकर्षून घेतो. मी अगदी सामान्य वाचक आहे. पर्व ह्या ७७६ पानी रसपूर्ण कादंबरीतून लेखकाने महाभारताविषयी माझी संवेदना वाढविली, ज्यामुळे माझे यापुढील वाचन अर्थपूर्ण होईल. त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. उमा कुलकर्णी यांनी केलेला कादंबरीचा अप्रतिम अनुवाद मराठी वाचकाला श्रीमंत करणारा आहे. त्यांनाही खूप धन्यवाद !!
भ्रमणध्वनी: ९८३३६१०८७५
खूप छान कत्रेसाहेब
ReplyDeleteखूप धन्यवाद प्रसन्नदादा..🙏🙏
ReplyDelete