Skip to main content

द किचन क्विन...!!



किचन क्विन...!! 





साधारण पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दुबईतील आमचे मित्र मिनार-मिताली कोरडे यांनी आम्हां दोघांना मोठ्या अगत्याने घरी जेवायला बोलावलं होतं. हे दांपत्य अत्यंत रसिक आणि सौंदर्यदृष्टी असलेलेदोघंही कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमाला जाताना काय ल्यावं, कसा पेहेराव असावा, कुठलं अत्तर लावावं, कसे वागावे, कसे बोलावे याची परिपूर्ण माहिती असलेले.  दोघांचेही Etiquette आणि मधुर बोलणे तर par excellence !! मिताली ही अतिशय सुगरण आहे, हे आम्ही फक्त मिनारच्या तोंडून ऐकून होतो. पण त्याची खरोखरची प्रचिती आम्हां दोघांनाही त्या दिवशी आली. माझ्या काही मित्रांना धक्का बसेल पण, सी.के.पी. पद्धतीने परंतु तरीही शंभर टक्के शाकाहारी स्वयंपाक  तिने बनवला होता. अतिशय चविष्ट बिरडं आणि सरोबरीनं सुका मेवा घातलेली  खीर हे त्यातले highlights होते. हे दोन्ही पदार्थ एव्हढ्या निगुतीने आणि सरंजामी बनवलेले मी खरंच त्यापूर्वी खाल्ले नव्हते. काय काय वंजने घातली होती पूर्ण स्वयंपाकात ! संगीताच्या भाषेत सांगायचं तर मींड, गमक आणि घसीट यांनी युक्त असलेली ग्वाल्हेर आग्र्याची भरीव गायकी ऐकल्यासारखं वाटलं. अर्थातच मी 'ओ' येईस्तोवर जेवलो त्या दिवशी ( खरं म्हणजे माझ्या वयाला हे काही फार शोभनीय वर्तन नव्हते). मग गप्पा सुरु झाल्या. आम्ही दोघंही मिनारचं छान लावलेलं घर पाहत होतो. जागोजागी दोघांचीही सौंदर्यदृष्टी प्रतीत होत होती. मग किचनमध्ये आलो. अत्यंत टापटीप आणि स्वच्छ किचन होतं. एव्हढा 'चार ठाव' स्वयंपाक केल्यावरसुद्धा स्वयंपाकघर स्वच्छ कसं ठेवायचं, हे फक्त मितालीच जाणे. अचानक किचनच्या ओट्यावर लावलेल्या एका छोट्या आकर्षक फ्रेमकडे माझं लक्ष वेधलं गेलं. त्यावर लिहिलं होतं "I am the Queen of this kitchen..... I reign Supreme. If you disagree.... you starve !!" मला ही १०० टक्के सत्य सांगणारी पण थोडीशी धमकीवजा फ्रेम खूपच आवडली होती ( मुद्दाम तिचा फोटोही दिलाय इथे...). ह्यावरूनच एक छान कल्पना सुचली आणि माझी सुगरण पत्नी सौ. सुचित्रा हिच्यावर हा आगळा वेगळा लेख मी लिहायला घेतला ...... ज्याचं टायटल आहे........ "THE KITCHEN QUEEN !!" 

इथे लेख सुरु होतोय .... 

एखाद्याच्या आयुष्यातील विद्यार्थीदशा संपतच नाही. माझ्या आयुष्यांत वेगवेगळ्या विद्यार्थीदशा अगदी दशावतारासारख्या आल्या. मॉन्टेसरी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, इंजीनिअरिंग, नंतरच्या नोकऱ्या- अशा त्या "दहा दशा" !! आणि आता सध्या चालू असलेली अकरावी 'दशा'. हिंदू धर्मात 'अकरा' ह्या आकड्याचं एकंदरच खूप महत्व आहे. गायत्री मंत्र अकरा वेळा म्हटला जातो, देवाला प्रदक्षिणा अकरा घालतात; एव्हढेच काय पण अगदी परवा परवा पर्यंत (म्हणजे रुपयाचं पूर्ण अवमूल्यन व्हायच्या आधी) आपण पाकिटात घालून एखाद्याला अकरा रुपये द्यायचो. न्यूमरॉलॉजिमध्ये तर अकरा ह्या आकड्याला 'मास्टर नंबर' म्हणतात. तर ही माझी अकराव्वी दशा खूप मोट्ठी ठरणार आहे अशी चिन्हे दिसतायत. या सर्व दशांमध्ये 'साम्यस्थळ' म्हणजे माझं प्रत्येक दशेतलं 'शिकणं'लहानपणापासून माझं संगीतशिक्षण तर अव्याहत चालू आहेच आणि पुढेही राहील, कारण विषय आवडीचा आहे नंsss.  पण ह्या नवीन दशेत आमच्या सौंच्या पाकशास्त्र कलेचे जवळून दर्शन घडण्याचा योग आहे आणि त्यांतही मी काही ना काही शिकतोच आहेह्या विषयातील माझे स्वैच्छिक शिक्षण किंवा सीमित आकलन हाच ह्या लेखाचा प्रमुख आधार असणार आहेमी नवऱ्याच्या भूमिकेतून लिहीत असल्याने हा लेख समस्त नवरे मंडळींना वाचनीय होईल, असा माझा प्रयत्न आणि समजही आहे.  

आपणा सगळ्यांना माहिती आहे कि रसोई घराची सुरवात उत्तम भाजीखरेदीशिवाय होऊ शकत नाही. अलीकडे मी माझ्या पत्नीबरोबर आठवड्यातून निदान  वेळा भाजीमार्केटमध्ये जायला लागलोय. संसार हा दोघांचा असतो हे अनुभवण्याचाही हा एक मौका असतो. माझा रोल मुख्यत्वेकरून तिला कंपनी देणेभाजीचे पैसे देणे आणि नंतर रिक्षेपर्यंत किंवा गाडीपर्यंत आठवड्याच्या भाजीची थोडीफार हमाली असा असला, तरी हा पाऊणेक तासाचा सेशन माझ्यासाठी अनेक वेळा मनोरंजनाचा आणि ज्ञानसंवर्धनाचा ठरतो. मुळातच बायकांची मानसिकता ही आपापल्या नवऱ्याला काहींना काही शिकविण्यासाठीच घडविलेली असते, असं माझं म्हणणं आहे (जे माझ्या इतके वर्षांच्या निरीक्षणावर आधारित आहे). त्यांत माझी पत्नी ही हाडाची 'शिक्षिका' आहेत्यामुळे आमची प्रत्येक सब्जीमंडी फेरी ही माझ्यासाठी  एक ट्युटोरिअल असतं. त्यातून मी किती शिकतो किंवा शिकेन हे सांगणं कठीण आहे. कारण ह्या क्षेत्रातला माझ्याकडे असलेला टॅलेंट 'शून्यआहे. असं असलं तरीही खरंच सांगतो, हिच्या बरोबर भाजीमार्केटमध्ये जायला मी आजकाल उत्सुक असतो. कारण मी त्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदललायपत्नीबरोबर मंडईत जाणे हे नवीन पिढीच्या भाषेत सांगायचं झालंतर मी मुळीच डाऊन मार्केट वगैरे समजत नाही. एकतर भाजीमार्केटमधली रंगेबिरंंगी आणि हिरवीगार ताजी भाजी बघून कुणाच्याही डोळ्याचे पारणे फिटते. शिवाय मंडईत गेल्यावर माझ्यातला रिसीविंग ट्रान्समीटर मी एकदम 'ऑन'  करतो आणि सगळं कसं छान दिसायला आणि वाटायला लागतंह्यालाच हल्ली पॉसिटीव्हिटी वगैरे म्हणतात ना हो ?? . 

२९ वर्षांपूर्वी, माझ्याशी लग्न केल्यामुळे माझी पत्नी सौ. सुचित्रा ही मुळातच व्यवहारचतुर आहे, असे म्हणण्यात माझे काहीच नुकसान नाही. (किंबहुना अशा गोड गैरसमजावर अनेक नवरे उभे आयुष्य काढतात). आमच्या हिने त्यावेळी दाखवलेल्या 'चातुर्या'चा स्तर मात्र इतक्या वर्षात अधिक उंचावलाय असेही माझे म्हणणे आहे. परंतु त्यातील फक्त रसोईच्या क्षेत्रातील तिची हुशारी मी कौतुकाने आज आपणासमोर मांडणार आहेसुरवात मंडईपासूनच करूयात.  पहिली गोष्ट म्हणजे माझ्या पत्नीला भाजी घेण्याचा अतोनात शौक आहे. (म्हणजे थोडे obsession आहे म्हणा ना...). भरपूर भाजी ऑलरेडी घेतलेली असली, तरी भाजीची गाडी रस्त्यात दिसली कि ती हमखास थांबणारचज्या सराईतपणे माझी पत्नी मंडईत वावरते आणि उत्तम भाजी अगदी रास्त भावांत घेते, ते फारच पाहण्यासारखे असतेते नेमके कसेहे पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक भाजीगणिक बोलावे लागेल

सगळ्यांत सोकावलेली फळभाजी आपण आधी घेऊ; ती आहे 'कोबी'. सगळ्या भाज्यांमध्ये facial करणारी भाजी म्हणजे कोबी. इतकी तुकतुकीत कांती कुठल्याही भाजीची नसतेमंडईत सहजपणे फिरायचे असेल, तर  एक स्वतंत्र परिभाषा (किंवा parlance..) वापरावी लागते. म्हणजे बघा,
कोबीचा किनई कांदा असतो. मेथीची पेंडी अथवा जूडी असते, तर आल्याचा आकडा (किंवा पंजा) असतो. घावनाच्या काकडीला तवस म्हणतातफरसबीला दुसरे नांव 'फरशी' असे आहे.  डेक आणि देठ यातला फरक तुम्हाला माहित आहे का ??  अहो हे तर काहीच नाही. चवळीच्या शेंगांचा बोका असतो म्हणे ...!! (हा शब्द जास्त सातारा सांगली परिसरात बोकाळलाय...). पण ही परिभाषा भाजीवाल्याबरोबर वापरली, म्हणजे गिऱ्हाईक वरच्या दर्जाचे किंवा माहीतगार आहे, हे भाजीवाले बरोब्बर ओळखतात. (नाहीतर आलेल्या गिऱ्हाईकाला ''गिऱ्हाईक'' बनविण्यास फार वेळ लागत  नाही).  तर मी काय म्हणत होतोक़िकोबी’ !  ढोबळ मानाने यांत पांढरा आणि हिरवा असे प्रकार आहेत. 'मंडई करिक्युलम' मधील एक महत्वाचा धडा म्हणजे पांढरा कोबी कधीही आणायचा नाही, तर हिरवा आणायचा. हा धडा नवरे लोकांच्या नक्की अंगवळणी पडण्यासारखा आहे खरा. पण कोबी बाहेरून बघून त्याच्या आत असलेला दांडोरा मोठा आहे का लहान आहे, हे अंतर्ज्ञानी असल्याशिवाय कळेल, असं मला तरी वाटत नाहीपण आमच्या हिला मात्र ते लगेच कळतं. किंबहुना "ह्या दांडोऱ्याचा कसला भाव लावता ??" असे भाजीवाल्याला विचारून हिने किलोला पाच रुपयेप्रमाणे भाव कमी केला, तेव्हा मी हिच्या हातातल्या कोबीपेक्षा पांढराफटक पडलो. (पूर्ण आयुष्य मार्केटिंगमध्ये घालवून negotiationचा हा धडा मी शिकलोच नव्हतो ). 'कोबी'चा कांदा मोठा असला, तर तो भाजीवाल्याकडून 'ही' स्वतःला हवा तेव्हढाच कापून घेते. त्यासाठी "आम्ही दोघंच घरी असल्याने आम्हाला फार भाजी लागत नाही" हा selling point ती वापरते. पण तिला 'नाही' म्हणण्याची कोणाची टाप नसतेप्रत्येक वेळी कोबीची भाजी घेताना मी कटकट करू नये, म्हणून  पोटाच्या आरोग्यासाठी कोबी खाणे किती आवश्यक आहे, हे भर मंडईत दोन भाजीवाल्यांमधील अंतर कापताना निम्मे वेळा सांगण्यात येतेपण ते काही असो, आमचीहीघरी आणलेल्या कुठल्याही भाजीचं सोनं करते. कोबीची पीठ पेरून, डाळ-शेंगदाणे प्रसंगी मटार-बटाटा घालून बेमालूम भाजी करते. कोबीची फोडणी घालून पचडी करते. एव्हढेच काय, पण तव्यावरची शिंगुळी आणि तळलेल्या टिकिया सुद्धा करते. शिंगुळी हा पदार्थ देशावरचा. अनेक डाळीची पीठे एकत्र कालवून त्यात बारीक किसलेला कोबी तिखटमिठासहित घालतात आणि मग दहा रुपयाच्या नाण्याएव्हढे, पण जरा जाडसर तुकडे तव्यावर लाल होईस्तोवर परतले जातात. ही साईड डिश आहेत्याला काही लोक 'पैसे'ही म्हणतात. ( ज्याला पैसे खायला आवडत नाहीत, त्याने अंमळ शिंगुळीच खावी 😆). परवा अशीच हीने शिंगुळी केली होती. खूप टेस्टी लागली म्हणून विचारले कि ही कसली आहे..?? तर ती होती कोबीतील वेगळ्या काढून ठेवलेल्या दांडोऱ्याची !! हे ऐकल्यावर मी चक्रावलोच. दांडोऱ्याचा असा कोणी सदुपयोग करेल असं वाटलं नव्हतं. पण आमच्या हिला किनई पिंडात ब्रह्मांड दिसतंएव्हढेच नव्हे, तर फ्लावर आणि कोबीच्या दांडोऱ्यात किती व्हिटॅमिन्स असतात त्याची  वैद्यकीय माहिती पण मला मिळालीस्त्री ही क्षणाची पत्नी  अनंत काळची माता वगैरे असू द्या बापडो, पण ती कुटुंबासाठी रोजची गृहिणी, डॉक्टर, समुपदेशक, डाएटिशिअन आणखी बरंच काही असते, ह्याचा अनुभव आम्ही रोज घेत असतो.  

मॅडमचा मंडईतील वावर अत्यंत सराईतपणे चालू असतो. भेंडीची पारख करताना ती बिनधास्त एखादी भेंडी मोडून वगैरे बघते. भेंडी 'जुनअसली, तर ती पुन्हा टोपलीत टाकून तशीच पुढे निघून जाते. एकदा असं झाल्यावर भाजीवाला " भेंSडी गवारी... " असं रागानं बोलल्याचं मी स्वतः ऐकलंय. पण ताईंना त्याचं काही नाही. 'भेंडी नेहमी कोवळीच आणायची' हा  माझा takeaway होतापडवळ घेताना नेहमी जाड घेता लांब सडक (किंवा well maintained ) घायचे असतेदुधी मात्र पडवळासारखी फिगरमध्ये असायची गरज नाही. तिचा व्यास साधारण इंच असावा.  कोथिंबिरीत पण म्हणे गावठी आणि विलायती असा फरक आहे. मला वाटलं हा फरक दुसऱ्या कुठेतरी लागू होतो. ( कृपया गैरसमज नको. मी दोन्ही घेत नाही😁). एक 'कतरी' कोथिंबीर पण असतेपार्सेली आणि कोथिंबीर ह्या जुळ्या भगिनींमधील फरक तुम्ही ओळखलात, तर qualifying exam पास झालात असे समजा. ( हे खास नवरे लोकांसाठी लिहितोय). चुकून घरी पार्सेली घेऊन आलात, तर बायकोचा सात्विक संताप होऊ शकतो आणि संध्याकाळी कारल्याची भाजी खावी लागेलतसे झालेच, तर तुम्हाला अधीसूचना येईलच. कारण पाण्यात भिजवून ठेवलेल्या कारल्याचे काप  पिळण्यासाठी तुमच्याकडेच येतील. ते निमूट पिळा. तसे केल्यास सात्विक संताप कमी होऊ शकतो. ("मला माहिती नव्हते कि कडवटपणा कमी होण्यासाठी हा उपाय चांगला आहेवगैरे फालतू विनोद करू नका उगीच. 😂शिक्षेत वाढ होईल......). खरं सांगायचं तर,  I am winner both ways . कारण आमची 'ही' उत्तम सुगरण असल्यामुळे कारल्याची भाजीसुद्धा उत्तमच करते. पंचामृती रस कारतं, भरलं कारतं, पीठ पेरून, कमी तेलावर परतून 'काचऱ्या', अशा विविध प्रकाराच्या कारल्याच्या चवदार भाज्या मला खायला मिळतातएव्हढेच काय, पण कारल्याचं फर्मास लोणचेही ती करतेम्हणजे 'कारले' खाणे हि माझ्यासाठी मात्र अजिबात शिक्षा नाहीअसो.  

नवरे मंडळींसाठी पुढला धडा .... ! मार्केटातून  'काकडी' आणताना ती पांढरी आणता, नेहमी हिरवट  कोवळी काकडी आणावी. भाजी घरी घेऊन आल्यावर, देव करो आणि काकडी कोचवण्याची वेळ तुमच्यावर येवो. (बायका एव्हढ्या काही दुष्ट नसतात). पण बायकोचा मुड वेगळा असेल, तर किमानपक्षी काकडी टोकाला कडू आहे का, हे ती तुम्हाला कधीही विचारू शकते. सावध राहाही फक्त काकडीची प्राथमिक चाचणी नसून तुमचीही असू शकतेअशा वेळी तुम्हाला प्रांजळ मत द्यावे लागेलतुमच्यावर नशीब अगदीच रुसले असेल, तर काकडी तुम्हाला कडू लागणार नाही, पण तिला मात्र लागेल. कारण ती एक तरी टोक खाऊन बघणारच आहे हे लक्षात घ्या. (पुलंनी म्हटल्याप्रमाणे ह्याला 'जल-शृंखला' योग असे म्हणतात). एकंदरच, स्वयंपाकाच्या बाबतीत नवऱ्यावर किती अवलंबून राहावे, ह्या बाबतीत बायका सावध असतातबायकांइतकी resource management कोणालाही येत नसते. पण काही झाले तरी 'टोकाची' भूमिका अशा वेळी घेऊ नकाहा सल्ला मी तुम्हाला इथे देईन. म्हणजे चवीवरून वाद घालत बसू नकाटोकाची भूमिका घेतल्यास गोष्टी कडू होऊ शकतात हा धडा 'काकडी'सारखी भाजी इथे शिकवून जाते

गवार, पापडी, फरसबी ह्या अशा काही routine भाज्या आहेत, की स्वयंपाक करताना काहीही केले तरी त्या फार उंची गाठू शकत नाहीत. भोपळी मिरची आणि ह्या तीन चार भाज्या नवरे लोकांच्या ऑफिस डब्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेतघोसावळे ही भाजी extempore किंवा आयत्या वेळी घेण्याची आहे. भाजी घेताना 'भजी' खाण्याची तलफ आली, तर नवरा कितीही दोडका असला तरी पत्नी ही भाजी विकत घेऊ शकते😂 एक हलव्याचा अपवाद (आणि सुंदर रंग) सोडल्यास 'गाजर' ह्या भाजीत तसं आवडण्यासारखं काही नाही. पण ह्या गाजर का हलव्यामुळे 'गाजरा'ला बॉलिवूडमध्ये खूप डिमांड आहे. यु नो व्हॉट आय मिन ...?? कुठलीही स्वप्नपूर्ती होण्याआधी 'गाजरे' खायचा option सगळ्यांनाच उपलब्ध आहे. बाकीच्यांनी गाजर ही भाजी 'A' जीवनसत्वासाठी खावीअसं आमच्या सौंचं मत आहेकाही वेळा उदात्त हेतू ठेवून भाज्या खाव्या लागतात. अपिल नाहीगाजरांमध्ये गावठी आणि बंगलोरी असेही दोन प्रकार आहेत. (जाऊ दे, गोदावरी-कावेरी वाद नको उगीच). 'आत्ता कुठे कात्रे मंडईतून घरी परत येतायतहे सोसायटीतील लोकांना कळण्यासाठी 
पिशवीतुन  बाहेर डोकावणाऱ्या 'शेवग्याच्या शेंगाह्या भाजीचे बाकीही विवक्षित उपयोग आहेत हे खरेशेवग्याच्या शेंगा किंवा डांबे आमटीत घातले की त्याचा स्वाद काही अजब असतोदाक्षिणात्य लोक सांबारात सुद्धा ह्या शेंगा घालतात. पण 'चमचा' संस्कृतीवाले त्या खाऊ शकत नाहीत. मधुमेहासाठी देखील चांगली भाजी आहे ही.  टॉमॅटो ह्या फळभाजीत विकत घेताना फार काही चुकीला वाव नाही . हल्ली लालबुंद घट्ट टोमॅटो भाजीवाल्यांकडे छान मिळतात. सगळ्या मंडईत आणि स्वयंपाक घरात  रंग मारणारी हि भाजी आहे. यासंदर्भात आमची 'ही' लग्नापूर्वीचा एक गमतीदार किस्सा नेहमी मला सांगते, तो लिहावासा वाटतो. एके दिवशी हिच्या वडिलांनी गरीब म्हाताऱ्या भाजीवाल्याकडून १७ किलो टोमॅटो घरी आणले (त्याला मदत म्हणून). आता एव्हढ्या टोमॅटोचं करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला. सुचित्रा आणि तिच्या मातोश्री म्हणाल्या आपण 'सॉस' करूयात. मग काय, पदर (कि ओढणी?) खोचून एकदाचे मोठ्या प्रमाणावर 'केचप' तयार झाले. वडिलांनी बाजारातून एकाच साईझच्या बाटल्या आणल्या. त्यात ते भरून शनिवार पेठेतल्या शेजारपाजारच्या प्रत्येक घरी एकेक बाटली दिली गेली. (हा किस्सा सातारचा आहे हं , पुण्याचा नाही. उगीच गैरसमज नको .... ). हा किस्सा ऐकल्यावर मी हिला म्हटलं, प्रत्येक बाटलीवर एक brand name पण चिकटवता आलं असतं ... 'टोमटो सोस' !!!😂😂

काही फळभाज्या घेतल्यावर, आता आम्ही पालेभाजीच्या दालनात आलेलो असतोमंडईमधल्या पालेभाजीच्या त्या पसाऱ्यातून आमची 'ही' अचूकपणे एका चांगल्या पालकाच्या जुडीची निवड करते. पालेभाजीची जुडी घेताना ती मध्येच उघडून पाहावी म्हणजे ती शिळी आहे कि ताजी आहे हे लगेच समजतं म्हणे. (मारून मुटकून भाजी आणायला जाणाऱ्यांचे हे काम नाही , बरं का .... ). चुकून मला पालेभाजी आणायला सांगितले, तर "पालक कधी फताड्या पानांचा आणायचा नाही हं " असं ही खराउन सांगते. 'मला भाजीतलं फारसं काही कळत नाही' हे गुपित 'फताड्या' हा शब्द सांगून जातो, हे फक्त मला आणि एखाद्या मानसोपचार तज्ञालाच फक्त कळेलतसेच मेथी नेहमीच कोवळी आणावी. पुढे टोकावर फुले फुटलेली आणू नये असाही एक धडापालेभाजी मार्केटातून आणल्यावर अगदी वेल्क्रोच्या Mega Bags मध्ये ठेवली नाही, तरी  फ्रिजमध्ये ठेवताना नेहमीच एखाद्या पिशवीत ठेवावी, नाहीतर कुजतेहा धडा देखील एकदा तोंडघशी पडल्यावरच मी शिकलो (म्हणजे सायकल शिकताना होते तसे .. ). भाजीच्या अळूचे सिलेक्शन करताना भाजीवाल्याला " हे अळू खाजरं नाहीये नं ??" असा धाडसी सवाल फक्त 'ही' करू जाणे. तोही बिचारा गीतेवर हात ठेवल्यासारखे करत "नाही हो ताई " असे विनयशील उत्तर देतो. 'फताड्या' ह्या शब्दावरून आठवलं.  मराठी भाषा समृद्ध करण्यात आपल्या गृहिणींचा खूप मोठा वाटा आहे, असं मला मनापासून वाटतं. गृहिणी जेव्हा स्वयंपाकघरात असतेतेव्हा तर तिच्यावर सरस्वतीचा अक्षरशः वरदहस्त असतो. तिथलं मराठी खूप ऐकण्यासारखं असतं. उदा. पोळी ही डागळलेली असावीपालेभाजी मुरजली, भाकरीला पदर सुटला म्हणजे छानअदमोरं दहीपदार्थाला लागणारे वंजन, अळूचा उंडा, भाकरीची चवडमऊसुत खिचडी, अनारसे हसले आणि लाडू बसले वगैरे कित्येक उदाहरणे देता येतील. शेंगदाण्यांची फोलकटं, भाताचे मुदाळे, चकलीचा सोर्या,  सोलाटणे ( म्हणजे साले काढण्याचे निर्जीव यंत्र..........😃). मला सांगा कि खरपूस, चमचमीत आणि खमंग ह्या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात हो ?? बहुसंख्य आंग्लाळलेली मंडळी ह्याला delicious असे म्हणून गुंडाळतील, हे तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. तसेच खुसखुशीत, अरळ, कणीदार यांना इंग्रजीत प्रतिशब्द आहेत का ?? मराठी खाद्यसंस्कृती तर श्रीमंत आहेच, पण मराठी भाषासंस्कृती देखील तिच्या अनुषंगाने किती समृद्ध होते, ते एखादी सुगरण तुम्हाला सहजपणे दाखवून देईल

बुचकुली, मुठी आणि चिमटी इत्यादी स्वयंपाकात नियमितपणे लागणारी मापे ही तर MKS किंवा CGS सिस्टीमने स्वीकारावीत असे मी ताबडतोब सुचवणार आहे. यासाठी supporting म्हणून "दोन माणसांना दोन बुचकुल्यांचे पोहे पुरतात किंवा दोन मुठीचा भात पुरतो" एव्हढे त्या मेट्रिक सिस्टीमच्या अधिकाऱ्याला सांगितले तरी पुरेसे आहे. किचनमध्ये सगळ्या गोष्टी ग्रॅममध्ये मोजून गृहिणी घ्यायला लागली, तर ते अज्ञानमूलक तर होईलच, पण शिवाय आजचा स्वयंपाक उद्या तयार होईलमैफिलीत समेकडे वाटचाल करणाऱ्या गवयाचा अंदाज आणि वांगे-बटाट्याची पंचामृती भाजी करणाऱ्या गृहिणीचा तिखट-मीठ-गूळ-चिंच प्रमाणाचा अंदाज हा एकाच तोलामोलाचा आहेमला वाटतं गृहिणींच्या श्रेणींची विभागणी ही  सामान्यमध्यम आणि उत्तम अशा श्रेणींत करता येईल. सामान्य गृहिणीची मजल ही आमटी, भात, पिठले, कोशिंबीर, कढी, बटाटा भाजीउसळआणखी दोन चार भाज्या, फार तर खीर, उप्पीट इथपर्यंतच असते. काही नवीन पदार्थ बनवायचा म्हटला कि तिला घाम फुटतो. मध्यम श्रेणीतील गृहिणी आणखी काही भाज्या , वेगवेगळ्या उसळी, इडली डोसा , बटाटे वडे, भजी, पुरण, सुप, खीर इतपत स्वयंपाक करू शकतात. उच्च श्रेणीतील गृहिणीला हे सर्व येतं असतंच. पण याहीपेक्षा जास्त आणि काही कल्पनातीत पदार्थ करता येतात . उदा. फणसाची भाजी , केळफुलाची भाजी, पुरणपोळी, उकडीचे मोदक, सुरळीच्या वड्या, वेगवेगळ्या चटण्या ( हिरव्या टोमॅटोची, सुरणाची, पडवळच्या बियांची, दोडक्याच्या शिरांची ), वेगवेगळ्या टिकीया, पंजाबी डिशेसअळू वड्या, नारळाच्या वड्या, मुग हलवा, गुलाबजाम, खरवस, वेगवेगळ्या खिरी, नारळीभात, साखर भात, पुडिंग्स, कुकीज, केक्स, पिझा, वेगवेगळी सॅलड्स, पेये वगैरेमुख्य म्हणजे उच्च श्रेणीतील सुगरणीने केलेल्या बहुसंख्य पदार्थांची चव अत्युकृष्ट असतेच असते

श्रेणी कुठलीही असली, तरी मी सगळ्यांनाच अन्नपूर्णा मानतो. 'अन्नपूर्णा' ही देवता आहेतिला पार्वतीचा अवतारही मानण्यात येते. तिचे देवत्व आणि शक्ती कुठल्या गृहिणीमध्ये आणि कधी प्रगट होईल काही सांगता येणार नाही. किती पदार्थ करता येतात, त्यावर ते अवलंबून नाही. फारसा स्वयंपाक न येणाऱ्या एका गृहिणीने एकदा अशी काही वांगे-बटाटा भाजी केली होती कि पूछो मत !!पंचेचाळीस वर्षांपूर्वी माझ्या पणजी आजीने आम्ही तिला भेटायला गेलो असता, जाता जाता जो काही कढी-वरण-भाताचा स्वयंपाक केला होता, त्याची रुची स्वाद आजही माझ्या जिभेवर आहेतसेच माझ्या आजोळी चाळीस वर्षांपूर्वी फडताळातील मर्यादित सामुग्री वापरून आजीने केलेला स्वयंपाक कमालीचा स्वादिष्ट असेमाझी आई ही किराण्या घराण्यातील गायकांसारखी होती. तिचे ठरलेले पंचवीसेक कोकणी पदार्थ होते, ते ती उत्तम करीत असे. डाळिंबी उसळ, फणसाची भाजी, गरम मसाल्याची आमटी, सर्व प्रकारच्या उसळी, लोणची, मोरावळा, सुधारस, मोकळ भाजणी, खारातली मिरची, वेगवेगळी थालीपीठे, तांदळाचे आयते, काकडीची घावने, आंबोळ्या, उपासाचे पदार्थ, डाळीची धिरडी नारळी भात, साखरभात, बासुंदी, फणसाची सांदणे , सगळ्या प्रकारच्या खिरी, पुरणपोळ्या अशी तिच्या पदार्थांची यादी बऱ्यापैकी मोठी होतीउकडीचे मोदक तर तिच्याइतके सुंदर मी आत्तापर्यंत खाल्लेले नाहीत. मोदकाची पारी अत्यंत नाजूक आणि मोदक अतिशय सुबक!! (बाबांनी तिला लग्नात दिलेली लाल किरमिजी रंगाच्या खड्याची अंगठी तिच्या नाजूक बोटांत मोदकाची  पारी करताना अधिक शोभून दिसे). आईच्या करण्यात खूप टापटीपपणा आणि निगुती होती. पण पंजाबी वगैरे पदार्थ करायला ती कधी गेली नाहीअसो. एका वेळी घरी पस्तीस चाळीस माणसांचा उत्तम स्वयंपाक करणाऱ्या सुगरणीही मी पाहिल्यायतहॅट्स ऑफ टू देम !!

माझी पत्नी सौ सुचित्रा ही मुळची देशावरची. त्यामुळे देशावरचे पदार्थ तिला आधीपासूनच येत होतेतिच्या वयाच्या ११ व्या वर्षीपासूनच ती उत्तम भाकऱ्या करीत असेअर्थातच पुढच्या -१० वर्षांत तिला पूर्ण स्वयंपाक करता येऊ लागलानंतर नवनवीन पदार्थ शिकून ती एक अनुभवसंपन्न सुगरण झाली.  तिच्यामुळे मला चकोल्या, शिंगुळी, सांडग्यांची आमटी, गोळ्यांचे सांबार, ठिकरीची कढी, तेलातल्या भरल्या मिरच्या, डाळमेथ्या, कोथिंबिरीच्या करंज्या, सुरळीच्या वड्यामेथीच्या मिरच्या, डाळीच्या पिठाच्या मिरच्या, चिंचगुळाची चटणी, पाटवड्या, रताळ्याच्या गोड चकत्या, वऱ्याच्या तांदळाचा साखरभातरंजन असे काही खास देशावरचे पदार्थ खायला मिळालेअर्थात याचे श्रेय सुचित्राच्या मातोश्री सौ. कमलताई खंडकर यांचे आहे. आजही स्वयंपाकघरात काय शिजतंय याचा थांगपत्ता कोणालाही लागू देता आणि बोलून 'चार ठाव' आणि पंचपक्वान्नी स्वयंपाक कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना ( सौ सुचित्रा सौ मिनू ) उत्तम तालीम देऊन पाकशास्त्रात प्रवीण केलं आहे.  आमचे लग्न झाल्यावर सुचित्रानं डाळिंबी उसळ, गरम मसाल्याची आमटी, कडव्या वालाची उसळ, फणसाची भाजी, उकडीचे मोदक, फणसाची सांदणे, आंब्याचे करमणे वगैरे कोकणी पदार्थही माझ्या आईकडून शिकून घेतले. ( इथे मला तीन घराण्यांचे गाणे शिकलेल्या गजाननबुवांची आठवण झाली ). आकलन शक्ती उत्तम असल्याने जिथे जाईल तिथून काही ना काही नवीन पदार्थ ती शिकून घेतेच. एकदा कोकणात गेली असता शेजारच्या लिलाकाकूंकडून करवंदाचं लोणचंही तिनं शिकून घेतलं आणि घरी लगेच करून पाहिलं. वर उल्लेख केलेल्या मितालीनं तिला कुकीज शिकवल्या. रेस्टॉरंट्स मध्ये serve केलेले पिना कोलाडा सारखे soft drink सुद्धा सुचित्रा घरी करते. दुबईतल्या गोविंदा रेस्टॉरंट्मध्ये अनुभवलेलं पुदिन्याचं वेलकम ड्रिंक तिनं एका प्रयत्नात जसंच्या तसं बनवलं. एव्हढेच काय, स्वतःच्या मातोश्रींकडून चकलीची रेसिपी शिकून घेतली आणि आमच्या परिचयाच्या ठाण्याच्या एका मावशींना शिकविली. ह्या मावशींनी काढलेल्या उमाशारदा प्रॉडक्ट्सतर्फे संपूर्ण ठाणे शहरात पॉप्युलर झाली आहेदिवाळीमध्ये या चकलीचा खप २५० किलो इतका असतो

स्वयंपाक करताना पदार्थ उत्तम होण्यासाठी, पाकशास्त्राचा उत्तम सेन्स असावा लागतो. कुठल्याही पदार्थाला उत्तम चव येण्यासाठी एक सुवर्णमध्य साधावा लागतो.  "कोठुनी आणिले गोडपण ...??" असा प्रश्न तो पदार्थ खाणाऱ्याला पडतो, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात ते उगीच नाही......

           सुवासेची निवती प्राण
           
तृप्त चक्षू आणि घ्राण
           
कोठून आणिले गोडपण
                 
काही कळेना

(स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंत:करण आनंदित झाले पाहिजे. डोळे आणि नाक तृप्त झाले पाहिजे. या पदार्थांची चव इतकी छान असावी की इतकी सुंदर चव कशी आली असा खाणार्याला प्रश् पडला पाहिजे. स्वयंपाक असा असावा की, जणु काही अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम असते.)

आमच्या 'ही'ला चवीचा तो सुवर्णमध्य उत्तम साधलाय, मग पदार्थ कुठलाही असोतिने स्वतः TV च्या एका फूड चॅनेल मध्ये भाग घ्यावा, असं नेहमीच मला वाटत आलंय

किचनमधला हिचा GK खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. उदा. डाळिंब फोडण्याची सोपी पद्धत , तेल जास्त घातले कि लोणचे जास्त टिकते, दूध नासू नये म्हणून करायचे उपाय, अंड उकळताना ते फुटू नये म्हणून पाण्यात थोडे मीठ टाकणे, पदार्थांचे चविष्ट recycling, नारळाच्या तेलाचे औषधी गुणधर्म इत्यादी अशा एक ना अनेक गोष्टीं तिच्या ज्ञानभंडारात आहेतढोकळा, इडली, डोसा यांचे पीठ चांगले फरमेंट होण्यासाठी त्यांत सोललेला कांदा कापुन ठेवावालसणीची पाकळी सोलताना त्यावर  हलक्या हाताने एक घाव घातला, तर 'साले' लगेच निघतातअशा अनेक ट्रिक्स तिच्याकडे आहेत. (अर्थात पुरुषांपेक्षा बायका 'साले' चांगली काढू शकतात हे समस्त नवरे कम्युनिटीला पटायला हरकत नाही.). आमची 'ही' खाद्यपदार्थांच्या बाबतीत काही व्यावहारिक किंवा आर्थिक  मुद्द्यांविषयी सुद्धा खूप सतर्क असते. एकदा तिने 'कल्याण भेळ' वाला आपल्याला कसा लुटतो, ते रेड़ीमेड ड्राय मिक्सचा खर्च किती येतो आणि पॅकची किंमत याचा हिशेब करून मला पुराव्यासहित पटवून दिले. त्या दिवसापासून आम्ही कानाला खडा लावला. एक वेळ "डोंबिवली भेळ" घरी आणून खाऊ, पण "कल्याण भेळ" कधीही खाणार नाही, असा निश्चय केलाहिची नजर इतकी तयार आहे, कि कुठल्याही पॅकवरची expiry date तिला १० फुटावरूनही दिसते.  गृहिणी ही घरातील सगळ्यात प्रयोगशील आणि व्यवहारकुशल व्यक्ती असते.   मला आठवतंयएके दिवशी फ्रिजमध्ये ठेवूनही मेथी खराब झाली ( हिच्या भाषेत म्हणजे मुरजली..... ). त्यावर उपाय म्हणून हिने ती मेथी थंड लिंबू पाण्यात थोडा वेळ घालून ठेवली आणि त्यासरशी तो पाला एकदम फुलून आला आणि मेथीची फर्मास भाजी झालीदोन्ही हातांनी एकाच वेळी डाळिंब्या सोलण्याची आमच्या बाबांची परंपरा आमच्या हिने चालू ठेवलेयरताळे लवकर किसायचे कॉमन सेन्स टेक्निक हिच्याकडून शिकण्यासारखे आहे. रताळे किसणीला perpendicular ना धरता, ते थोडे तिरके धरल्यास किसलेला भाग एलिप्टिकल किंवा लंबगोलाकार होतो जास्त क्षेत्रफळ किसणीला एक्सपोज होऊन ते लवकर किसले जाते. आता हा इंजिनीरिंग फंडा आहे कि कॉमन सेन्स फंडा आहे हे तुम्हीच ठरवा. बारीक बारीक गोष्टी असतात. आमच्याकडे मिक्सरने ताक करत नाहीत. 'रवी' नावाचे प्राचीन साधन त्यासाठी वापरले जाते. बहुतेक ताक हीच करते. पण क्वचित कधी जास्त पदार्थ करून थकवा आला असेल तर ह्या कामासाठी मला बोलावले जाते. मग पहिली सूचना-कम- शास्त्र शिकविले जाते- "कमीत कमी शंभर वळसे झाले पाहिजेत". वैतागून मी ताकाचा फेस गंजातून बाहेर पडेल ह्या बेताने दणादण ताक करतो. (आमच्या पूर्वजांचे आडनांव 'वळसे-पाटील' तर नाही ना, असा एक विचारही मनात येऊन जातो 😆). तसेच उपमा, पोहे  वगैरे करताना उलथण्याची दिशा नीट धरली नाही, तर पदार्थाची कशी वाट लागते हेही शिक्षण मिळते कधीकधी.   एकदा आमच्याकडील स्वयंपाकाच्या ओट्यावरून खालच्या ड्रॉवर्समध्ये लिकेज होत होते. लिकेजचा उगम मिळत नव्हता . लगेच हिने पोटॅशिअम परमॅंगनेटचे थोडे पाणी ओट्यावर टाकण्याची कल्पना सुचविली. खालच्या पांढऱ्या रंगाच्या drawers मध्ये लगेचच लिकेजचा उगम जांभळ्या रंगात दिसून आलामला वाटतं हिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त practical बुद्धी आहे.


विद्यार्थी कितीही 'असला तरी हाडाच्या  शिक्षिकेचे त्याच्यावरील प्रयोग चालूच राहतातएकदा 
आमच्या घरी पाहुणे येणार होतेतेव्हा हिने कढईत तळायला घेतलेल्या पुऱ्या कढईतलेच तेल त्यावर विशिष्ट पद्धतीने टाकून ( कि झाऱ्याने उडवून ) त्या कशा फुगवता येतातते मला शिकविण्याचा 
अयशस्वी प्रयोग केलामी आचमनासारखे पुऱ्यांवर तेल टाकत होतोत्यामुळे पुरी माझ्यावर रुसलीपण फुगली मात्र नाहीबरेच वेळा घरी पाहुणे येणार असतीलतर महत्वाच्या पदार्थांच्या Quality controlचे काम माझ्याकडे असतेमला हे काम चांगलं जमतंअसं हिचं मत आहेमात्र त्यावेळी 
माझ्या हातातले काम बाजूला ठेवून मला किचन मध्ये बोलावले जाते. अर्थात ते बरोबरही आहेअसं म्हणतात कि एकदा पदार्थ पूर्ण शिजला कि त्यात गूळ घालून उपयोग होत नाही).



कधी कधी जेवताना काही वैद्यकीय उपदेशहि मिळतात. उदा . फ्रिजमधले थंड दही खाण्यापेक्षा बाहेर ठेवलेले सामान्य तापमानाचे दही खावे म्हणजे त्यातील प्रोबियॉटिक बॅक्टेरिया पचनाला मदत करतात. गोड पदार्थ खाताना थोडे तूप खावे, म्हणजे इन्सुलिन निर्मितीला मदत होते साखरेच्या पचनाला मदत होते, समाधान देणारे सीरोटीनिन/डोपामाईन कशामुळे स्त्रवते, त्वचेसाठी कारळे  किंवा Niger seeds फोडणीत असणे वगैरे. "खरं म्हणजे आपला आहार एव्हढा सकस आहे, की कुठलाही निरोगी माणूस शंभर वर्षे सहज जगेल" वगैरे वाक्ये कधी कधी टाकली जातातही वाक्ये कोणासाठी आहेत, हे हुशार नवऱ्यांना सांगायची खरंच गरज आहे का..?? दीक्षित-दिवेकरांनी मात्र आमच्या घरात अजून अंग धरले नाहीये........... 😆

हिच्या बरोबर सकाळचा चहा घेण्यातला आनंद काही और आहे आणि तो मी सहसा चुकवत नाही. किंबहुना ती करते, तसा चहा फार कमी ठिकाणी मी घेतलाय. अतिशय रेकॉर्ड टाइममध्ये पाती चहा आणि आल्याने युक्त असलेला अत्यंत लिज्जतदार चहा ती करते. त्यासाठी आम्हाला ताज ब्रॅण्ड वापरायची गरज पडत नाहीतसेच चहा पिताना पेपरमधील महत्वाच्या बातम्या ती आधीच मला सांगते. (हा माझा बोनस असतो).  मला हिच्या हातचे काही सिग्नेचर पदार्थ खूप आवडतात. उदादुधी कोफ्ता, रशिअन सलाड, टोमॅटो सार, छोले मसाला, राजमा मसाला, दाल मखनी, बीसीबिळे अन्ना, चकोल्या अर्थात वरणफळ किंवा डाळ ढोकळी, पंचामृत, पाव भाजी, आंबेशिरा, सुरळीच्या वड्या, साबुदाणा खिचडी, रताळ्याचे पदार्थ, अळवाचे फदफदे, कोथिंबीर वड्या, अळू वड्या, फोडणी दिलेल्या ताकाचा मठ्ठा, नारळाच्या वड्या, कैरीची चटणी, बादशाही पुडिंग वगैरे बादशाही पुडिंग तर तिची flagship डिश आहे असं म्हणावं लागेल. Milkmade पासून बनवलेली ही डिश खरवसाची डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे. भरली भेंडी, भरले कारतेभरली मिरची, भरली वांगी वगैरे ही इतकी अफलातून करते, कि मला ते खाताना भरूनच येतेरंजन नावाची देशावरची एक चटणी तिने एक दोनदा घरी केली होती. ठाण्याच्या मामलेदार मिसळीच्या तोंडात मारेल, ती तिखट होती (....चटणी !!). ह्याचा काहीही अंदाज यायच्या आधीच मी जेव्हा चव घेतली, तेव्हा मी 'चांदोबा' पुस्तकातल्या वेताळासारखा छताला लटकू लागलो. खाणार्याचे नव्हे, तर बघणाऱ्यांचे मनोरंजन व्हावे ह्या हेतूने पदार्थाचे नांव 'रंजन' ठेवले असावेमजा अशी आहे कि खुद्द ही चटणी खाणाऱ्याचे मनोरंजन मात्र १०-१२ तासांनीच  होते 🙆. प्रवासाला निघताना पण आमच्याबरोबर  खाद्यपदार्थांची नुसती चंगळ असते.  तिखट - गोड सँडविचेस, बाकरवड्या , फरसाण, लाडू , अमूल मसाला ताक, RO चे पाणी  अशा वेगवेगळ्या गोष्टींची संदुकणी मॅडम करतात. त्यामुळे प्रवास सुसह्य आणि आनंददायी होतो. माझे मित्र तर हिला पॅन्ट्रीकारच म्हणतात. स्वतः अजिबात मांसाहार करणारी माझी पत्नी आमचा मुलगा  विभव याच्यासाठी घरी अंड्याच्या पदार्थांपासून ते ग्रेव्ही चिकन, मासे उत्तम बनवू शकते हे एक मोठे आश्चर्यच आहे. That also indicates how dedicated she is towards our family.

बाकीच्या बायकांनी केलेल्या पदार्थांची तारीफ देखील ती खुल्या दिलाने करते. नवीन रेसिपींवर चर्चा करणे हा शौकही तिला आहे. मुगाची डाळ कशाकशात घालता येईल, कोथिंबीर वडीत चण्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तर काय होते वगैरे चर्चा आमच्या घरी आलेल्या एखाद्या सुगरणीबरोबर रंगते. (अशा वेळी मी 'मूग' गिळून बसतो😁). तसेच दुसऱ्याला आपल्या सिग्नेचर रेसिपी देण्यातही ती कधी कुचराई करत नाही. बेचव किंवा पथ्याचा स्वयंपाक करणे मात्र अंमळ तिच्या जीवावर येते. त्यावरही तिचे लॉजिक खूप स्ट्रॉंग असते. तिचं म्हणणं आहे कि, पदार्थ चविष्ट असेल तरच शरीरातील लालोत्पादक ग्रंथींचे स्रवण secretion होते, ज्यामुळे खाणं पचायला मदतच होतेअसे असले, तरी माझ्या आई वडिलांसाठी तिने तब्बल २० वर्षे पत्थ्याचा स्वयंपाक केला. हा मोठाच त्याग आहे. पदार्थ पचण्यासाठी परंपरेने सांगितलेल्या काही टिप्स ती स्वयंपाकात जरूर वापरते. उदा. भजी करताना किंवा गवारीच्या भाजीत (वातहारक) ओवा वापरणे, भोपळ्यामध्ये तसेच तूरडाळीत मेथ्या वापरणे, पाचक ताकासाठी पुदिना वगैरेची चटणी घालणे इत्यादी. देशावरची असल्यामुळे हिचा दाण्याच्या कुटावर पहिल्यापासून फारच जीव. पातळ भाज्यांमध्ये दाण्याचे कुट घातल्यामुळे पदार्थाची घनता निश्चितच वाढते व रसाचे रूपांतर ग्रेव्हीत होते आणि स्वादही वाढतो. आमचे लग्न झाल्यानंतर ती एकदा कसलीशी खीर करत असताना, त्यातदेखील ही कूट घालणार कि काय, हे मी हळूच स्वयंपाकघरात डोकावून कुतूहलाने पाहिल्याचे स्मरते. पण एकंदरच हिच्या हाताला खूप चव असल्यामुळे आम्ही हा कूटप्रश्न सोडवायच्या कधीच भानगडीत पडलो नाही. स्वयंपाक कमालीच्या स्पीडने ती करते. संध्याकाळी बाहेर जाऊन घरी यायला उशीर झाला, तर पोळी-भात-भाजी-आमटीचा स्वयंपाक तिने २०-२५ मिनिटात केल्याचे मी अनेकवेळा विटनेस केलं आहे. आजकालच्या जमान्यात लागणारे SMART वर्किंग आणि multitasking ती करू शकते. ब्रेकफास्टसाठी रोज रोज पोहे उपमा करून कंटाळा येतो. ( खूपच कंटाळा आला असला, तर मी गमतीने नाष्टचर्य सुरु झाले असे म्हणतो). अशा वेळी, फार तर आमलेट, इडली डोसे, थालीपीठ,सॅन्डविच केले जातात. पण बाहेरून BF मागवण्याची कल्पना तिला फारशी रुचत नाही. तेव्हा एखाद वेळी खिशाला फोडणी देण्याऐवजी भाताला फोडणी देऊन आम्ही फो.भा. देखील खातो. घरी जर Guests जेवायला येणार असतील, तर कधी कधी किरकोळ कामांसाठी मला मदतीला बोलावले जाते. पण मग माझ्याकडूनही तशीच quicknessची अपेक्षा असतेमाझा कामाचा स्पीड बघून मग जाम प्रेशर मारले जातेपण छान छान पदार्थ खायचे असल्यामुळे, मला एव्हढा 'ट्रेड-ऑफ' चालण्यासारखा असतो

फक्त माझी पत्नीच मोठी सुगरण आहे असा काही माझा दावा नाही. अनेक उत्तमोत्तम स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया (आणि पुरुष) असतात. पण आपले सगळे आयुष्य ज्या खाद्यसंस्कृतीवर आणि जिच्यामुळे पोसलं गेलंय, त्या माझ्या पत्नीचे मोठेच ऋण माझ्यावर आहे. निदान त्याचे जमेल तितके श्रेय तिला द्यावे, ह्या ऋणनिर्देशासाठीच हा लेखाचा प्रपंच !! लेख खूप मोठा झालाय. त्यामुळे इथे थांबुयात.......

                                         अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।

                                          प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।15.14।।


भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायातील या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे पोटात वैश्वानराच्या रूपाने पेटलेल्या होमकुंडामध्ये आहुती देण्याचं काम जरी मी नित्य करत असलो, तरी ह्या 'यज्ञा'चे खरे श्रेय हे 'अन्नपूर्णा' असलेल्या माझ्या पत्नीचेच . . . . . . .जिला आणि अशा अनेक अन्नपूर्णांना माझे त्रिवार वंदन !!🙏🙏🙏

                                                      *************000**************



  
















Comments

  1. सौ.सुचित्राच्या पाककलेचे यथार्थ वर्णन केले आहे.व त्याचा प्रत्यय मला गेल्या एक वर्षापासून मी घेतला आहे.लेख फारच छान आहे.अशीच पाककला समृद्ध होत जावो हीच सदिच्छा.👌👌🙏

    ReplyDelete
    Replies
    1. केंजळे वाहिनी, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!

      Delete
  2. Loved this one :) Really does justice to the queen (and also makes me want to turn up to yours for a feast).

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Arnika, pl do come our home. Kaku will cook something special for you....

      Delete
  3. छान लेख आहे.

    ReplyDelete
  4. Ekdam top katre. Regards Rajan Vagal

    ReplyDelete
    Replies
    1. राजन दादा, मनापासून आभार !!

      Delete
  5. लेख वाचल्यावर लिखाणाबद्दल लेखकाचे कौतुक करावे किं लेखात लिहिलेल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या नावानेच तोंडाला पाणी सुटल्यामुळे ते बनविण्यात वाकबगार अशा सुगरणीचं कौतुक करावं असा प्रश्न पडला. खूपच चविष्ट लेख!!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !! भावना पोचल्या. ह्या लेखामागची प्रेरणा किंवा कारण हे माझ्या पत्नीचे अजोड पाकशास्त्रकौशल्य आहे. त्यामुळे तिचे कौतुक होणे अधिक महत्वाचे आणि उचित !!

      Delete
  6. अत्यंत सुंदर व उद्बोधक लेख. लेखाला अधुन मधुन विनोदाची किनार लाभलेली. हा लेख म्हणजे स्वयंपाकाचा encyclopaedia आहे. सुचित्रा वहिनींच्या पाककलेतील अनेक गुपितं विकासजींनी उघड केली आहेत. त्याचा अनुभवी ग्रुहिणींना देखील फायदा होईल. अर्थात कांही पतीदेवांना आता भाजी बाजारांत जावे लागेल व त्यांचे अद्न्यान उघड होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! मिसेस ना नक्की दाखवतो आपली प्रतिक्रिया. कृपया आपले नांव समजले तर आनंद द्विगुणित होईल....

      Delete
  7. खूप सुंदर लेख लिहिला आहे.वहिनींना एक पुस्तक रेसिपी चं लिहायला सांगा म्हणजे माझ्या सारखीला उपयोग होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! मिसेस ना नक्की दाखवतो आपली प्रतिक्रिया. कृपया आपले नांव समजले तर आनंद द्विगुणित होईल....

      Delete
  8. किती सुंदर लिहिले आहे तुम्ही विकास. बहुत बढिया। आता प्रत्यक्षानुभवाच्या संधीची वाट पहातेय...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! मिसेस ना नक्की दाखवतो आपली प्रतिक्रिया. कृपया आपले नांव समजले तर आनंद द्विगुणित होईल....

      Delete
  9. मला तुमच्या टेबल(वर) बसून सुचित्रा काकूच्या हातचं जेवायची इच्छा झाली!!��
    And that reminds me of my Kelvan.. जवळपास ३५ एक केळवणांपैकी तुमच्याकडचं केळवण स्पेशल होतं एकदम.. आणि लक्षात राहण्यासारखं .. मला गोड आवडत नसूनही बरोबर पाचही गोड पादार्थ अगदी शिताफीनं तिनं मला खायला घातले होते ..!
    तिचा स्वयंपाक टॉप असतोच पण ती ज्या प्रेमाने खायला घालते त्याला तोड नाहीये.. and that is her USP....विकास काका लेख कमाल लिहिला आहेस.. हॅट्स ऑफ टु यू !!

    ReplyDelete
    Replies
    1. नेहा, थँक्स प्रांजळ अभिप्रायाबद्दल!! तू कधीही ये घरी. काकू काहीतरी खिलवणारच ......

      Delete
  10. Hats off to you for the detailed description of the SABJI MANDAI. Also I appreciate your sincere acknowledgements towards Vahini's cooking capabilities. I'm in the same league of males having SUGRAN WIVES. I can very well understand your feelings.

    ReplyDelete
  11. Above comment from Dhananjay Kharwandikar.

    ReplyDelete
    Replies
    1. धनंजयजी,अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! कविता वहिनींच्या सुग्रणपणाची प्रचिती पुण्यात आल्यावर घेऊच ....

      Delete
  12. छान लेख. सौ सुचित्राच्या पाककौशल्याविषयी ऐकून आहे!! विनोदाचे अंग मस्त .

    ReplyDelete

Post a Comment