श्रीमान
योगी ...रसग्रहण - भाग १
त्याचं
असं झालं .....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
अगदी
शालेय जीवनापासून 'इतिहास' हा काही माझा
आवडता विषय नाही. त्यामुळे
अशा काही विषयावर मी
लिहिणे अस्वाभाविक होते. इतिहासाविषयी किती काळजीपूर्वक अभ्यास
करून लिहावे लागते ह्याची मला थोडीफार कल्पना
होती . परंतु कुरुंदकरांची प्रस्तावना वाचल्यावर मला त्याचा आवाका
अधिक कळला असं म्हणता
येईल. अर्थात ज्यांना जबाबदारीने लिहायचे असेल त्या लेखकांसाठीच
नीती नियम लागू असतात
(कारण मूळ इतिहासच स्वतःला
आणि परिणामी राजकारणासाठी सोयीचा होईल इतका बदलण्यापर्यंत
अलीकडे काही लोकांची मजल
गेली आहे, असं ऐकून
आहे ). त्यामुळे शिवाजीराजांच्या इतिहासाला आणि प्रतिमेला इजा
पोहोचेल, असं मी काहीही
लिहिणार नाहीये. ह्याचा अर्थ मी स्पष्टवक्तेपणा
अजिबात सोडलाय असं मुळीच नाही
. पण त्यांच्या संदर्भात ह्या लेखात जिथे जिथे म्हणून इतिहासाचे उल्लेख आले आहेत, त्यांचा संदर्भ मात्र फक्त आणि फक्त 'श्रीमान योगी' ही कादंबरीच असणार आहे. कमी अभ्यासाचा दोष पत्करून हे आत्ता सांगणे आवश्यक वाटते.
ऐतिहासिक
कादंबरी लिहिणे हे एक मोठ्ठे
शिवधनुष्य असते. जरी लेखकाला कादंबरीची
कथावस्तू आयती मिळालेली असते
हे खरं आहे, तरी अशा कादंबरीला आवश्यक
असणारे असंख्य संदर्भ ग्रंथ, सनावळी, ठिकठिकाणची तत्कालीन भौगोलिक आणि राजकीय स्थिती,
पात्रांच्या भेटींची ठिकाणे, त्यावेळचे दंडक/प्रथा/रीतिरिवाज,
शस्त्रास्त्रांची तसेच किल्ल्यांची माहिती,
ऐतिहासिक साहित्यातील नोंदी अशा एक ना
अनेक गोष्टींचा अमर्याद अभ्यास लेखकाला करावा लागतो. पुन्हा कादंबरीतील मुख्य पात्रांचे भक्त समाजात वावरत
असतात, त्यांना दुखावून चालत नाही. चरित्रनायका
विषयीचे एखादे कटू सत्य त्यांना
पचनी पडेलच असे नाही. त्यातून
राजकीय वादळे पण निर्माण होऊ
शकतात, हे आपण अनेक
वेळा पाहतो. त्यामुळे तेही तारतम्य कादंबरीकाराला
ठेवावे लागते. हा सगळा पसारा
एव्हढा मोठा असतो, कि
कादंबरी संदर्भात लेखकाची प्रतिभा आणि निर्मिती (creativity) राहिली बाजूला,
आणि आपण काहीतरी भलतेच
काम करतो आहोत की
काय असेही लेखकाला वाटू शकते. (विश्वास
पाटलांसारख्या एखाद्या ऐतिहासिक कादंबरीकाराला हा प्रश्न मुलाखतीत
विचारला पाहिजे). समजा जे काही
चरित्र नायकाबद्दल मी अजूनपर्यंत वाचलंय,
त्यावरून एक बरी-वाईट
प्रतिमा माझ्या मनात तयार होत
असते. ती प्रतिमा चांगली
असेल तर, ललित वाङ्मय
निर्मिती होताना थोडे झुकते माप
चरित्रनायकाच्या पारड्यात पडू शकते. आणि
या उलट झाले, तर
चारित्र्यहननाचा धोका तर गुन्हासदृश
होऊ शकतो. कुरुंदकर नेमकं हेच म्हणतायत. त्यामुळे कादंबरीकाराच्या निर्मितिक्षमते बरोबरच त्याचा इतिहासाचा अभ्यास, तपशीलाची अचुकता, कालानुक्रम आणि वरती वर्णिलेल्या
विविध गोष्टी ह्यामध्ये त्याने किती लक्ष घातले
आहे, हा आणखी एक
निकष ऐतिहासिक कलासाहित्याचे 'मूल्यमापन' करताना आपण लावला पाहिजे.
मला जिथे जिथे हे
महत्वाचे मूल्य कादंबरी वाचताना जाणवले, त्याचा वेगळा उल्लेख मी श्रेयोर्पण म्हणून मुद्दाम केला आहे. ह्या
पुस्तकाच्या शेवटी जवळ जवळ १५०
मराठी इंग्रजी पुस्तकांची संदर्भसूची 'सांगाती' ह्या शीर्षकाखाली दिली
आहे. ह्यावरून कादंबरीकार कै. रणजित देसाई
यांनी घेतलेल्या अचाट मेहेनतीचा अंदाज
वाचकांना येतो. त्यांनी गुरुतुल्य कुरुंदकरांच्या प्रस्तावनेचे बरेचसे आज्ञापालन केले असावे.
असे असले, तरी ह्या कादंबरीत मला सगळ्यात जास्त भावल्या त्या म्हणजे विविध व्यक्तिरेखा !! वानगीदाखल एका उदाहरणाने हे स्पष्ट करतो. शिवाजीराजे आग्र्याला औरंगजेबाला भेटायला निघाले होते, तेव्हा निरोप घेताना तीन वेगवेगळ्या स्त्रियांनी दिलेल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. राजे युवराजांसह आग्र्याला औरंगजेबाच्या गुहेत जाणार ह्या नुसत्या कल्पनेनेच जिजाबाई घायाळ झाल्या होत्या. राजांनी पुतळाबाईंना विचारलं कि तुझ्यासाठी काय आणु ?? त्यावर त्या डोळ्यात अश्रू आणून उत्तरल्या " आपण सुखरूप यावं !!". जेव्हा राजांनी सोयराबाईंना तोच प्रश्न विचारला , तेव्हा त्यांनी उत्तर दिले " उत्तरेला अत्तरं चांगली मिळतात म्हणे. सवड झाली तर आणावीत ". संवादातून आणि कृतीतून व्यक्तींमधील हे वेगळेपण लेखकाला दाखवायचं असतं. त्यातून त्या त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो, विचार समजतात. लेखक किती संवेदनशील आणि प्रतिभावान आहे हे त्यावरून आपल्याला जाणवते. ह्या सगळ्यातून व्यक्तिरेखा (Character) साकारली जाते. आपण ती कशी साकारू पाहतोय ह्याचे भान लेखकाला असते. त्यातले सातत्य लेखकाला शेवटपर्यंत टिकवावे लागते. (नायकाचा इतिहास गंभीर, पण नायक मात्र हलकाफुलका विनोदी असं होत नाही. हसरे दुःखचा अपवाद सोडा ). व्यक्तिरेखेची खऱ्या इतिहासाशी घट्ट नाळ हवी. ह्याविषयी मी बऱ्याच प्रमाणात लिहिणार आहे, कारण शिवरायांच्या पराक्रमाने ओथंबलेल्या इतिहासाबरोबर, ह्यातील विविध 'व्यक्तिरेखा' हा देखील ह्या कादंबरीचा आत्मा आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं, तर माझा स्वतःचा पिंड कलाकाराचा असल्याने प्रथम दर्शनी मी श्रीमानयोगी कडे एक कलावस्तू म्हणून बघतो; ऐतिहासिक पुस्तक म्हणून नाही. एक सामान्य वाचक म्हणून जे जे ललित सौन्दर्य मला कादंबरीतून टिपता आले, ते पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पुस्तकात ज्या प्रमुख व्यक्तिरेखा लेखकाने विविध प्रसंगात साकारल्या म्हणण्यापेक्षा रंगविल्या आहेत आणि मला भावल्या, उमगल्या आहेत, त्याविषयी मी लिहिता झालो. माझा मानस भरभरून लिहिण्याचा असला, तरी मी स्वतःवर थोडा अंकुश ठेवला आहे. जिथे गरज आहे, तिथे त्या त्या प्रसंगाचे संदर्भ मी दिले आहेत. नमन मोठे असल्याने एक घडाभर तेल पुरले नाही, तरी क्षमस्व !!
इथे लेख सुरु होतो ....
शिवाजीराजे समजदार आणि निर्णयक्षम होईपर्यंत
राज्यकारभारात त्यांच्या मातोश्री जिजाबाईंचा प्रभाव जास्त दिसतो. कारण याच काळात
शहाजीराजे आदिलशाहीच्या नोकरीत बंगलोरला होते. ज्यामुळे जिजाबाईंना शहाजीराजांना मिळालेल्या जहागिरीचा राज्यकारभार चालविण्याचे अवघड काम अतिशय
जबाबदारीने पाहावे लागले. त्यामुळे याच काळात जिजाबाईंचे
गुणविशेष परिस्थितीनुसार आणि विविध प्रसंगानुरूप
जास्त दृगोच्चर होतात. अगदी पहिल्याच प्रकरणात
३ महिन्याच्या गरोदर असलेल्या आणि प्रवासातील घोडदौडीने दमले-भागलेल्या जिजाबाईंशी
शहाजीराजांनी केलेले संभाषण त्यांच्याविषयी अनुदार विचार मनात यावेत इतके
संतापजनक आहेत. "आपण सुखरूप, तर आम्ही सुखरूप..." असे म्हणणाऱ्या शहाजींनी
पतीव्रता जिजाऊंवर उफाळून येऊन जाधव-भोसले
घराण्यांच्या सूडवैराचे खापर भर रस्त्यात
भेटल्या भेटल्याच जिजाऊंच्या वडिलांवर फोडले. त्यांच्या तब्येतीची चौकशी तर राहोच, पण
अनेक महिन्यांनी आपल्या पत्नीशी आडगावी भेट झाल्यावर शहाजीराजेन्नी
केलेला हा संवाद खरोखरच
अशोभनीय वाटतो. जिजाऊंच्या इच्छेविरुद्ध शहाजी मोठ्या शंभूबाळाला (शिवाजीच्या मोठ्या भावाला ) आपल्याबरोबर बंगलोरला घेऊन गेले; का
.. तर त्यांना आपल्या बळकट पंखांखाली तयार
करण्यासाठी.
Theoretically correct decision..!! एखाद्या
राजासदृश असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलामध्ये पराक्रमाची महत्वाकांक्षा बाळगणे हे काही अस्वाभाविक
नाही. पण ते साध्य
करण्यासाठी पत्नीकडे किंवा तिच्या मताकडे सर्वस्वी दुर्लक्ष करण्याची गरज वाटत नाही.
( किंबहुना बायका जास्त प्रॅक्टिकल असतात अश्या मताचा मी आहे). पतीचा
विरह कसाबसा जिजाऊंनी अंगवळणी पाडला होता. आपला पती शूर
आणि पराक्रमी योद्धा आहे ह्या नेणिवेतील
सुखावणाऱ्या भावनेपलीकडे जिजाऊंना शहाजीने नेमके काय सुख दिले
?असे मात्र वाचकाला वाटू शकते. आता
तर शंभूबाळही त्यांच्यापासून दूर निघाला. पुन्हा
कधी दिसेल, न दिसेल... !! जिजाऊ
त्यांना डोळे भरून पाहत
होत्या. पण डोळे भरताच
शंभूराजेंचे तेही रूप अस्पष्ट
झाले. ( लेखकाची सूक्ष्म कल्पना आहे ही...).
शिवनेरीवरून जिजाऊंचा निरोप घेताना वडील लखुजी जाधव यांनी लेकीला दिलेला "देवीकृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल, कि जे जन्म जन्मांतरीचे पांग फेडील" हा आशीर्वाद पुढे येणाऱ्या भविष्य काळाबद्दल बरच काही सांगून जातो. जिजाऊंना खाण्यापिण्याचे डोहाळे नव्हते; पण वाटायचं कि घोड्यावरून दौड करावी, कमरेला तलवार लटकवावी. इथे त्यांच्यातील वीरस्त्री तर दिसतेच दिसते, पण पोटात वाढणारा गर्भही आधीच काहीतरी सांगू पाहतोय. असे संवाद आणि प्रसंग कादंबरीकार खुबीने पेरून वाचकांच्या मनात उत्कंठा निर्माण करतो आणि वाचक नकळत कथानकात गुंतत जातो (भले प्रत्यक्ष इतिहासाशी त्याचा संबंध असेल नसेलही). शूरांच्या वाट्यालाच संकटे जातात, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. जिजाऊंच्या वाट्याला संकटे पाचवीलाच पुजलेली असत. त्या गर्भार असतानाच त्यांचे वडील दगाफटक्याने मारले गेले. पण निश्चयी वृत्तीने पोटातील बाळासाठी त्या पुन्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या. इतिहास काही बाबतीत बोलका असतो, पण काही गोष्टी मात्र तो अनुल्लेखित ठेवतो. उदा. इतिहास तुम्हाला जिजाऊंच्या पोटी गुणी बाळ कसा जन्माला आला त्याच्या सनावळी आणि त्याने केलेल्या अपरिमित पराक्रमांबद्दल भरभरून सांगतो; पण जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजे चाकरीसाठी बंगलोरला होते, मोठा मुलगा त्यांच्यापासून दुरावल्यासारखाच होता, स्वतःच्या वडिलांच्या खानदानाचेच आपल्या सासरच्या मुळाशी वैर , त्यांच्या वडिलांची झालेली हत्या, दुसऱ्यांदा दिवस गेलेले .. , राहण्याचे ठिकाण... ना धड सासर ना धड माहेर, सगळीकडे पुण्यात असलेला दुष्काळ....आणि यामुळे जिजाऊंना झालेल्या हाल, अपेष्टा, यातना, मानसिक क्लेश ह्याबद्दल इतिहास फार काही सांगत नाही, कारण ह्या गोष्टी दस्तऐवजात नोंद केलेल्या नसतात. असतातच असे नाही . विविध गोष्टींवरून त्याचा फक्त अदमास लावता येतो . पण श्रीमान योगीमध्ये हे 'बिटवीन द लाईन्स' भरण्याचं काम कादंबरीकाराने कल्पनेच्या पलीकडे केलं आहे. एव्हढेच नव्हे तर ह्या कालावधीनंतर तब्बल ४०० वर्षांनी जन्म घेतलेल्या आपल्यासारख्या वाचकांसाठी त्यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने इतिहास जिवंत केला. कै. रणजित देसाई यांचे हे आपल्यावर मोठ्ठे उपकार आहेत. वर उल्लेखिल्याप्रमाणे शिवाजीराजे जिजाऊंच्या उदरी असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनात कितीतरी वाईट गोष्टी घडल्या. पण राजे जन्मल्यावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जिजाऊंचे आयुष्य उजळून टाकले. (नशिबाचे कधी त्रैराशिक नसते..!!). कारण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जिजाऊं नेहमीच सकारात्मक राहिल्या. हीच गोष्ट श्रीकृष्ण जन्माच्या बाबतीतही लागू होते. आजकाल negativity आणि positivityचे पेव फुटले आहे. त्याची पुस्तके वाचण्यापेक्षा महापुरुषांचे चरित्र वाचून आपल्याला बरंच काही घेण्यासारखे आहे.
प्रसूत झाल्यावर शास्त्रीबुवांकडून आपल्या बाळाविषयीचे भाकीत ऐकण्यासाठी जिजाऊ उत्सुक होत्या. बाळाचे नावसुद्धा त्या सासूबाईंना विचारून ठेवतात. वडिलांनी जाण्यापूर्वी बोललेला देवीचा नवस त्या फेडतात. जिजाऊंसारख्या वीरमातेला सुद्धा सर्वसामान्य स्त्रीसारख्या भावना होत्या, हे वाचून जिजाऊ नकळत आपल्या जवळच्या होऊन जातात. एकंदरच ज्येष्ठांविषयी आदरभाव आणि आदब जिजाऊंच्या वागण्याबोलण्यात जाणवते.
शहाजीराजे शिवबा बाळाला भेटायला शिवनेरीवर येणार म्हटल्यावर गडावर खूप घाई गडबड सुरु होते. जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नाही. शहाजीराजांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी चांगली वस्त्रे ल्याली होती आणि दागदागिनेही घातले होते. एव्हढेच काय, तर कुठल्याही प्रेमळ पत्नीप्रमाणे त्या पतीदर्शनासाठी अधीर होऊन खूप आधी तटावर जाऊन प्रतीक्षा करीत बसल्या होत्या. यावरून अध्येमध्ये लक्ष्मीबाई आणि उमाबाई त्यांची थट्टामस्करीही करीत होत्या, हे वाचून गंमत वाटली. जिजाऊंच्या आयुष्यातील हे काही फुंकर घालणारे क्षण !!
वरती उल्लेख केल्याप्रमाणे ह्याच काळात पुणे मुलुखात दुष्काळ पडला होता. लेखकाने मुलुखात पडलेल्या दुष्काळाचं केलेलं वर्णन वाचून अक्षरशः काळजाला घरं पडतात. ते म्हणतात "माणसांनीच काय, पण पक्षांनी सुद्धा मुलुख सोडला होता. राहिली होती ती फक्त घारी आणि गिधाडे !! " ..... (ती तरी कशासाठी...??... 'तर जमिनीवर ठिकठिकाणी दिसणाऱ्या मृत भुकबळींचे आणि जनावरांचे भक्षण करण्यासाठी......' हे भीषण वास्तव इथे अध्याहृत आहे. इथे थोड्या शब्दात योग्य तो परिणाम साधण्याची लेखकाची ताकद जाणवते). जुन्नरचा दुष्काळ उग्र स्वरूप धारण करून होता. पण अखेर वरुण राजा प्रसन्न झाला आणि पावसाला सुरुवात झाली. शेती होऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली. पण शेती करण्यासाठी माणसेच जागेवर नव्हती. कारण गाव विस्थापित झाल्यासारखेच होते. जुन्नरची उरलेली निम्मी वस्ती गडावरच होती. जिजाऊंनी निर्णय दिला " गड खाली करूयात. आपण सगळे खाली जाऊ. माणसे येईपर्यंत आपणच त्यांची शेती पेरून घेऊ". त्या स्वतः शिवबा दादोजींसहित गडाखाली वस्तीला आल्या. ह्या त्यांच्या निर्णयाने दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येऊ लागली. सर्वत्र उत्साह संचारला. नीट विचार केला, तर जिजाऊंनी घेतलेला हा महत्वाचा निर्णय कुठल्याही मोठ्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला लाजवेल एव्हढ्या उच्च प्रतीचा होता. ह्यामध्ये निर्णयक्षमता तर दिसतेच, पण नेतृत्वगुण (Leadership), दूरदृष्टी, आत्मविश्वास, विचारातील स्वच्छता, रयतेप्रती प्रेम, स्वार्थत्याग, जबाबदारीची जाणीव, कष्टाळूपणा आणि निर्णयाची अंमलबजावणी (execution) इतके सगळे गुणविशेष दृगोच्चर होतात. विरोधाभास असा आहे , कि शहाजीराजांच्या नशीबी एव्हढी गुणसंपन्न, धाडसी पत्नी होती. पण त्यांना मात्र तिचे फारसे कौतुक होते, असे कादंबरीवरून दिसत नाही. कुरुंदकर देखील ह्याच मताचे होते असं वाटलं. नाही म्हणायला जिजाबाईंनी शिवाजीराजांना 'घडविल्याची' कबुली शाहजीराजेंनी त्यांच्या वयाची साठी उलटल्यानंतर जिजाबाईंशी जेव्हा भेट झाली तेव्हा मोकळ्या मनाने दिली आहे. (In contrast, शिवाजीराजांच्या नशीबी मात्र कर्तृत्ववान पत्नी असण्याचं भाग्य नव्हते, व तसे त्यांनी एके ठिकाणी बोलूनही दाखवले आहे. दात आहेत तिथे दाणे नाहीत ... ही म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. म्हणूनच कि काय, भोसले राजघराण्यातील कर्तृत्ववान राणीची स्वप्नं राजांनी आपली सून येसूबाई हिच्यामध्ये पाहिली). कादंबरीकारांनी साकारलेल्या जिजाबाई ह्या शिवाजीराजांच्या फक्त माता नसून गुरु, शिक्षिका, मार्गदर्शक, संप्रेरक, समुपदेशक, रयतेच्या मायबाप, आधारवड असं बरंच काही होत्या. जिथे जिथे राजे आपल्या धोरणांविषयी साशंक झाले, तिथे तिथे ह्या मातेने त्यांना खंबीरपणे हितोपदेश केला ( प्रसंगी आदेशही दिला ). एका ठिकाणी त्या राजांना सांगतायत " राजे , मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिम्मत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देव्हाऱ्यात देव , तशी मनांत निष्ठा -हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही , हे लक्षात ठेवा." जिथे जिथे स्वकीयांच्या शत्रुत्वाचा धोका उत्पन्न झाला , तिथे ह्या मातेने राजांना सबुरीचं धोरण स्वीकारायचा सल्ला दिला. (उदाहरणार्थ सईचे वडील आणि आदिलशाहीच्या सेवेत असलेले मुधोजिराव निंबाळकर यांनी गैरसमज करून जावयाविरुद्ध मावळात चिथावणी द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्याशी वैर न घेता, त्यांना आपलेसे करून घ्या असा सल्ला जिजाऊंनी दिला). जावळीच्या कृष्णराव मोरे ह्यांची गर्दन मारल्याबद्दल जिजाऊंनी मुद्दाम गडावर येऊन राजांना जाब विचारला आणि त्यांची चूक नजरेस आणून दिली. एक अपवाद म्हणून कि काय, पण विजापूर दरबारी शहाजीराजांचा घात करणाऱ्या बाजी घोरपड्यांविषयी मात्र त्या सूडभावना बाळगून होत्या. राजांनी स्वराज्याला धोका उत्पन्न करणाऱ्या घोरपड्यांना जीवे मारून आपल्या आईला शांत केले.
मोबाईल : ९८३३६१०८७५
विकास जी, रसग्रहणाचा पहिला भाग वाचायला उशीरच झाला. त्याबद्दल क्षमस्व...
ReplyDeleteश्रीमान योगी लिहिण्याचं शिवधनुष्य उचलावं ते रणजित देसाईंसारख्या सिद्धहस्त लेखकानेच
शिवाजी महाराज हा केवळ राजकारण अथवा आदराचे विषय नसून तो जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्यातला ऐतिहासिक औपचारिकपणा बाजूला करत तो आपल्या मनाच्या अगदी जवळ आणून ठेवणे याला वाचकांच्या दृष्टीने फार महत्व आहे. ते देसाईंना साध्य झालेलं आहे. तुम्ही ते बरोबर ओळखले आहे आणि ते रसग्रहणात जाणवतं. आपणही महाराजांच्या जवळच आहोत, प्रत्यक्ष त्यांना बघत आहोत, त्यांच्या मस्तीत सहभागी आहोत अशी जाणिव वाचकाला सतत होत राहाते. सिद्दी जौहर च्या वेढ्यातून सुटका करून घेण्याच्या प्रसंगात तर मला हे सतत वाटतं की मी तिथेच आहे.
तुम्हीही अगदी तशाच भावनेतून हे लिहिलं आहे कारण जे बारकावे तुम्ही टिपले आहेत ते त्या समरसतेशिवाय शक्य होणार नाही..
एवढ्या मोठ्या ग्ंथाचंं सार काढणे ही सुद्धा अवघड गोष्टच आहे.... ती करत असतांना त्याविषयीचं तुमचं भाष्य ही ओघाने आलं आहे....
सुरेख...
दुसरा भागही लवकरच वाचतो आता.....
मी केलेल्या वरील पोस्टमध्ये टायपो चूक आहे....
ReplyDeleteत्यातील 'मस्तीत' हा शब्द 'मसलतीत' असा वाचावा