Skip to main content

कवीमनाचे बंदिशकार..… गुरुवर्य विनायकबुवा काळे



              कवीमनाचे बंदिशकार..… गुरुवर्य विनायकबुवा काळे      
   
 ***********************************************************    
आज २३ जानेवारी २०१८, म्हणजे आमचे गुरुजी कै. पं. विनायकबुवा काळे यांची १०२ वी जयंती !! त्यानिमित्त हा त्यांच्यावरील मी लिहिलेला लेख माझ्या ''कवडसे'' या ब्लॉगमध्ये समाविष्ट करण्यास आनंद होत आहे -  विकास कात्रे 
***********************************************************


साधारण १९८० चा सुमार असेल. मी तेव्हा आय. आय. टी.मध्ये बी. टेक. करीत होतो . माझे चुलत बंधु  श्री. सुधीर कात्रे यांच्याकडून मी ठाण्याच्या काळेसरांचे नाव ऐकले होते (कारण ते सरांकडे गाणे शिकत असत).  त्या जमान्यांत रेडीओवर चांगल्या कलाकारांचे सोलो पेटीवादन लागत असे. ते ऐकता ऐकता  मला पेटी शिकण्याची मनांत इच्छा निर्माण झाल्यामुळे, क्लासची विचारणा करण्यासाठी दर सेमेस्टरनंतरच्या सुट्टीत मी काळेसरांकडे (नारायणभुवनमध्ये) मी जात असे.  पण सरांचा क्लास सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत बिझी असायचा त्यामुळे प्रवेश मिळणे अवघड होते. दरम्यान, मी रेडीओवरील ‘संगीतसरिता’ या कार्यक्रमावरून आणि एकदोन पेटीच्या कॅसेट्सवरून घरी स्वतःचे स्वतः धडे पेटीवर गिरवीत होतो. त्यामुळे थोडे थोडे रागज्ञान होवू लागले. मे १९८२ ला मी नेहेमीप्रमाणेच क्लासची चौकशी करण्यासाठी सरांकडे गेलो.  सर म्हणाले “ अजून जागा खाली झाली नाही क्लासमध्ये ”. मग त्या दिवशी  मी आपणहून एक तोडीतली गत ( जी मी घरीच बसविलेली होती.. )  सरांच्या परवानगीने त्यांना १० मिनिटे वाजवून दाखविली. सरांना ती आवडली असावी कारण ते म्हणाले " पुढल्या शनिवारपासून या तुम्ही क्लासला ".  अशा रीतीने माझे रीतसर संवादिनीचे शिक्षण काळेसरांकडे सुरु झाले ………

खरं म्हणजे काळेसर जास्त करून गायनच शिकवीत असत. पण त्यांचे संवादिनीचेदेखील काही विद्यार्थी होते. काळे सरांचे अत्यंत जमलेले ‘एकल’ पेटीवादन मला नुकतेच सरस्वती शाळेत ऐकायला मिळाले होते (त्यावेळी ते ६६ वर्षांचे होते). ते ऐकल्यावर मी जवळ जवळ निश्चितच केले कि मला चांगलं शिकून याच पद्धतीने वादन करायचंय . त्यांनी प्रकाशला ( सरांचे जेष्ठ शिष्य श्री प्रकाश चिटणीस ) तर चांगले तयार केले होते. त्याबरोबरच सर्वश्री विवेक दातार (RiyaazPal चे जनक आणि Multiple रीडबोर्ड पेटीचे प्रणेते), उल्हास माउसकर, विलास बापट अशी काही मंडळी शिकायला येत. 

काळेसरांचे पेटीवादन मला खूप आवडत असे. स्वतः उत्तम ख्यालगायक असल्याने त्यांच्या वादनावर गायकीचा खूप प्रभाव होता. स्टेजवर क्वचित कधीतरी सोलो वाजवीत तेव्हा आम्हा सर्वांना पर्वणीच वाटे . ‘पांढरा सफेद कडक इस्त्रीचा झब्बा पायजमा , त्यावर रुबाबदार नेहरू जाकीट, सोनेरी काडीचा चष्मा आणि समोर त्यांना आवडणारी ‘पेटी’ असे त्यांचे सुभग दर्शन आकृष्ट करणारे असे, ते अगदी त्यांच्या वयाच्या पंच्याऐंशी पर्यंत !! त्यांनी कधीही पेटीचे स्वर सुटे सुटे वाजविले नाहीत. (सुरुवातीला क्लासमध्ये सुटे सुटे स्वर वाजविले कि मला म्हणायचे " सोवळं नेसून काय वाजवता ??").   त्यांचा मात्र  नेहमीच २-३ बोटांचा टच असायचा तोही अगदी एकजीव झालेला. ‘नर नर’ पॅरिस रीड्सच्या पेटीवरचे त्यांचे वादन अत्यंत स्थिर आणि गोड असायचे.  प्रत्येक स्वराकृतीत एक विचार असायचा. कधीही कटनोट्स किंवा उगीचच चाळा म्हणून काही वाजविणार नाहीत . कधी यमनमधला विलंबित एकतालातला ख्याल वाजवीत, मधुवंतीत छोटी चीज वाजवीत, तर कधी मिश्रपिलू ठुमरीच वाजवितील. पण ते वाजविताना आम्ही सगळेच तल्लीन व्हायचो.  

काळेसरांकडे गेल्यावर साथसंगत करताना काळी १, का २, का ४, का ५, आणि पां ६ या पट्ट्यांचे चांगले बेअरिंग आले. (तेव्हा सोलो मात्र मी ‘काळी २’ मध्येच वाजवीत असे). विलंबित आवर्तन भरण्याचे तंत्रही मला उत्तम अवगत झाले. (कालांतराने मी स्वतः रीतसर गाणेदेखील शिकल्यामुळे आणि पं. कान्हेरे यांच्याकडे गेल्यापासून माझ्या साथसंगतीला वेगळी डूब मिळाली). अनेक गुरुबंधू आणि भगिनींबरोबर साथसंगत करण्याचा योग गुरुपौर्णिमेला यायचा. सरांची गुरुपौर्णिमा तर अगदी दृष्ट लागेल इतकी छान व्हायची. ३ दिवस चालायची (गुरुपौर्णिमेची रात्र, नंतरची शनिवार रात्र आणि पुढला पूर्ण रविवार). सत्तर-ऐंशी विद्यार्थी जमेल तितकी तयारी करून काही ना काही सादर करायचे. Seasoned विद्यार्थी सोडल्यास जवळ जवळ सगळ्यांकडून सर कुठला ना कुठला राग आधी बसवून घ्यायचे. मी आणि विवेक दातार खूप वेळा सरांच्या सांगण्यावरून आयत्या वेळी पेटीची जुगलबंदी सादर करायचो. एकदा खास आम्हां दोघांसाठी सरांनी झिंझोटी रागाशी साधर्म्य असलेल्या ‘कौस्तुभ’ रागात एक 'गत' तयार केली होती. हि गत म्हणजे सरांच्या बंदिशकारीचा एक आगळा वेगळा नमुनाच आहे. काळे सरांना अभिप्रेत असलेल्या ‘एकल’ संवादिनीवादनाचे पुरेपूर प्रतिबिंब ह्या रचनेत आहे. याची कथा विवेकच्या लिखाणात आलीच आहे. आम्ही या उत्सवाची अगदी “सवाई गंधर्व” महोत्सवासारखी वाट पाहायचो. आता हे सगळे मंतरलेले दिवस भूतकाळात गेले आहेत. फ़क़्त आठवणींना उजाळा द्यायचा इतकेच !! एखाद दुसऱ्या वर्षाचा अपवाद सोडला तर त्यानंतर शिक्षण आणि नोकरी सांभाळून मी सलग दहाएक वर्षे (म्हणजे १९९२ पर्यंत ) काळे सरांकडे पेटीवादन शिकलो आणि बऱ्यापैकी प्रगती केली. छोटे छोटे सोलोचे कार्यक्रम, चांगल्या गायक गायिकांबरोबर साथसंगत आणि संगीतविषयाशी उत्तम मैत्री या काळात झाली. एकंदर मी पेटीवादनात खूप रमलो होतो .

 (१९९३) एक दिवस काय झालं पण अचानक मी सरांना म्हटलं " गुरुजी , तुम्ही मला एक ‘बडा ख्याल’ शिकविता  का ?". सर म्हणाले "अहो कात्रे , तुम्ही पेटीवाले आहात. तुम्ही ख्याल शिकून काय करणार ??" पण मी आग्रहच धरला . शेवटी  त्यांना म्हटलं कि "मी तुम्हाला एक द्रुत बंदिश म्हणून दाखवतो. जर आवडली, तरच तुम्ही मोठा ख्याल शिकवा ". कसेबसे ते तयार झाले . मग मी 'अब ना सतावो बालमवा' हि त्यांचीच अहिर भैरवातली बंदिश अगदी तानांसहित म्हणून दाखविली. गुरुजी खूष झाले (आणि "तुम्ही गाऊ शकता हे मला कधी सांगितले नाहीत या आधी " अशी नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केली). लगेच त्यांनी मला ' सपना जागी श्याम ' हा  विलंबित एकतालातील सुंदर ख्याल मला शिकविला आणि आपलं रचनाभांडार माझ्यासाठी कायमचं खुलं केलं !!
त्यानंतर पुढे १० वर्षे मी अगदी मनापासून त्यांच्याकडे गाणं शिकलो. प्रत्येक शिकवणीचा अनुभव वेगळा असायचा. पहिला अहिर भैरवचा ख्याल शिकतानाच ‘याजसाठी केला होता अट्टाहास...’ असं वाटलं. बुवांचा बडा ख्याल शिकविण्याची पद्धत खूप अनोखी होती . आधी ते संपूर्ण ख्याल लिहावयास सांगायचे.  शब्द खूप महत्वाचे असतात आणि त्याचे उच्चारण सुध्दा महत्वाचे. तसेच प्रत्येक शब्दाचे मात्रेगणित स्थानपण तितकेच महत्वाचे हि त्यांची शिकवण होती .  शब्द आणि स्वराबरोबर विराम देखील तितकाच महत्वाचा. त्यामुळे विलंबित ख्याल शिकविताना ते विद्यार्थ्याकडून २-३ मात्रांचे छोटे छोटे भाग करून बसवून घ्यायचे. नंतर एकसंध संपूर्ण ओळ बसवून नंतर लगेच बरेच वेळा म्हणून घ्यायचे. आणखी विशेष म्हणजे गुरुजी स्वतः तबला वाजवून शिकवायचे. मी कधीही त्यांना तबल्याचे मशीन वापरताना पहिले नाही. विलंबित ठेके स्वतः वाजवून त्याबरोबर गाऊन विद्यार्थ्याला शिकविणे हि अत्यंत अवघड आणि दुर्मिळ कला त्यांना अवगत होती. गुरुजी त्यांचे समाधान होईपर्यंत शिकविलेली बंदिश विद्यार्थ्याकडून म्हणून घ्यायचे. अर्ध्या किंवा पाव मात्रेचा फरकही त्यांना चालायचा नाही. कसेतरी करून एकदा विलंबित एकतालाचा १२ मात्रांचा हिशेब ‘आs उs’  करून मिटवायचा हे त्यांना मान्य नव्हते .  बंदिशीतील प्रत्येक शब्द, त्यातील सौंदर्य विद्यार्थ्याला समजेपर्यंत न कंटाळता स्वतः म्हणून दाखवायचे. वेगवेगळ्या प्रकारचे  विद्यार्थी शिकायला येत.  त्यामुळे काही विद्यार्थ्यांना तर गुरुजी  विलंबित ख्यालाची सरगम देखील लिहून द्यायचे. एवढेच  काय, पण सादरीकरणासाठी विलंबित आलाप तानादेखील लिहून द्यायचे. हे बघितल्यावर दस्तूरखुद्द स्व. रामभाऊ मराठ्यांनी एकदा आश्चर्य व्यक्त केले होते. (ख्यालगायन कठीण वाटणाऱ्या गायकांनासुध्दा शास्त्रीय संगीताच्या जवळ आणण्याचा सरांचा हा ‘भगिरथ प्रयत्न’ होता असं मला वाटतं).  साधारण दोनएकशे बंदिशी त्यांनी मला शिकविल्या; ज्यामुळे मला कुठल्याही बंदिशींकडे बघण्याची एक ‘नजर’ आली. काळेसरांचे विलंबित ख्याल म्हटल्यामुळे लय, ताल, मात्रा याचा विद्यार्थ्यांना चांगला अंदाज यायचा. पण मग होतं काय, कि कधीकधी पारंपारिक बंदिशी काही गवयी वेगवेगळ्या पद्धतीने आणि विस्कळीत पद्धतीने म्हणतात ते लगेच जाणविते. 

काळेसर बंदिशी का करू लागले याची एक गंमतशीर कथा ते गुरुपौर्णिमेला सांगायचे. कुठलीशी एक पारंपारिक बंदिश एक खांसाहेब गात होते . श्रोतृवृन्दात सर बंदिशीचा अन्वयार्थ लावत होते. सगळ्या बंदिशीचा अर्थ लागला पण त्यातील 'निरपत ' या शब्दाचा मात्र अर्थ लागला नाही त्यामुळे सर एकदम बेचैन होते.  अखेरीस बरेच दिवसांनी अर्थाला अनुसरून, 'निरपत ' हा ‘नृपती’ ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा असा साक्षात्कार सरांना झाला व  कोडे सुटले. आणि… अंगी निसर्गतःच वाग्येयवृत्ती आणि प्रतिभा असलेल्या ‘विनायकराव काळ्यां’नी बंदिशी करायला सुरुवात केली. छंदाचे रुपांतर व्यासंगांत झाले.  नवनवीन बंदिशी होत गेल्या. गुरुजी स्वतःहि बंदिशीं कार्यक्रमात पेश करीत.  त्याला वाहवा मिळत गेली. त्या काळांत कै. विनायकबुवा पटवर्धन यांसारख्या बुजुर्गांनी देखील सरांच्या बंदिशींना दाद दिली होती.  सरांनी त्यांच्या सगळ्या बंदिशीं आपल्या विद्यार्थ्यांना शिकविल्या त्यामुळे त्या सतत गायला गेल्या (निदान चाळीसएक वर्षे !!). 

गुरुजींचे ६० ते ७० टक्के विलंबित ख्याल एकतालामध्ये आहेत. याचे कारण माझ्या मते त्यांची स्वतःची गायकी (आलापी) जास्त स्वरप्रधान होती किंवा किराण्याच्या अंगाची होती हे असावे. विलंबित एकतालाची लय कमी ठेवता येत असल्यामुळे या तालांत स्वरांचा भरणा आणि रागाचा परिपोष मनसोक्त करता येतो. द्रुत बंदिशी मात्र तीन तालांत अधिक आहेत. कदाचित जलद लयीत विषय किंवा कल्पना मांडायला १६ मात्रांचा हा जास्त लांबीचा ताल अधिक कामी येत असावा.  यमन, बिहाग, बागेश्री, भूप, मालकौंस, मारवा, पूरिया, देस, भैरव, अहिर भैरव, ललत, मधुवंती, तोडी, जोग, दरबारी, पुरिया धनाश्री, पुरिया कल्याण अशा प्रमुख रागांमध्ये तर गुरुजींच्या बंदिशी आहेतच पण देवगिरी बिलावल, भैरव बहार, बसंत मुखारी, भटियार, सरस्वती, श्याम कल्याण, पटदीप, गोरख कल्याण, किरवाणी अशा वेगळ्या आणि सेकंड लाईन रागांमध्येहि बुवांच्या सुंदर बंदिशी आहेत. गुरुजींच्या बंदिशी वेगवेगळ्या विषयांवरील आहेत. काही पौराणिक कथांवर आधारित, काही देवदेवतांवर , काही शृंगारिक, काही भंजनात्मक , काही तत्वज्ञानपर , काही प्रासंगिक, काही काल्पनिक, काही विराण्या तर काही वर्णनात्मक !!  बंदिशी  वेगवेगळ्या तालांमध्ये आणि लयींमध्ये आहेत. अगदी द्रुत झुम्रऱ्यातदेखील आहेत. विलंबित बंदिशी या तालाचे खंडात्मक स्वरूप लक्षात घेवून झाल्या आहेत. साधारणपणे, ‘अस्ताई’मध्ये बुवा विषय किंवा कल्पना मांडतात . नुसता विषयच नाही तर रागाचे स्वरूपदेखील मांडतात. त्यामुळे गाणाऱ्याच्या मनांत त्या रागाचा एक कॅनवास निर्माण होतो आणि रागाचा विस्तार  करण्यासही बंदिश पुढे सहाय्यभूत होते. अंतऱ्यात ते मूळ विषयाची अथवा कल्पनेची पूर्तता, निराकरण  किंवा Climax करून  बंदिश पूर्ण करतात.  सरांच्या काही निवडक बंदिशींविषयी आता थोडेसे विस्ताराने पाहुया.….
सुरुवातीला आपण विलंबित एकतालांतील बंदिशींचा उहापोह करू आणि त्यासाठी प्रथम अहिर भैरवचीच बंदिश घेऊ,  म्हणजे सरांचा  एकंदरच बंदिशीबद्दलचा विचार मला थोडाफार आपल्यापर्यंत साधारण तरी पोचविता  येईल :

राग - अहिर भैरव (ताल -विलंबित १ ताल )
सपनाs जागी श्याsम , मु हुs रत  साs वरी ,
मन मेरो मोहलs ई I 
  अंतरा 
मुरलीs धs र, नटनागर 
सुंदर मुगुटधाs री II 

पहिली गोष्ट म्हणजे या बंदिशींत बुवांनी अहिर भैरवातील योग्य त्या स्वरांवर ठेहेराव ठेवला आहे (तोही विशेष करून आकार आणि इकारावर ) . उदा . ‘श्या’ या जोडाक्षरावर सम ठेविली आहे ज्याचा स्वर आहे कोमल रिषभ. ह्या अक्षराचा ठेहराव पुढे साधारण ३ मात्रा आहे, कि ज्यामुळे अहिर भैरव रागाचा स्थायीभाव अधोरेखित होतो. हाच रिषभावरील ठेहराव आलापी करताना  गाणाऱ्याला अंतर्मुख करतो.  ‘मुहुरत’ शब्दातील पहिली तीन  अक्षरे ‘अनाघाती’ आहेत ज्यामुळे तालाची आणि लयीची मजा घेता येते.  शेवटचे  'त ' हे अक्षर 'तीं' या ५ व्या मात्रेवर पडून अनाघात संपतो. पुढे एकतालांतील ‘ना ना कत’ या मात्रां ‘साsवरी ह्या शब्दांतून हुबेहूब ध्वनित होतात. यातले ‘री’ हे अक्षर ‘मध्यम’वर आहे जो या रागातील वादी स्वर आहे. पुढचे ‘मन मेरो मोहलई’ हे शब्द ‘म प ध नि’ हे स्वर योग्य त्या प्रमाणात घेवून मग आरोही आणि अवरोही अहिर भैरव पूर्ण होतो. अर्थांत इथेच चीजेच्या मुखड्याची चाहूल लागते (ज्याला शास्त्रीय परिभाषेत 'आमद ' असे म्हणतात). एकंदर रचना, 'आमद’ आणि चीजेचा मुखडा हे सर्व सुसंगत असल्यामुळे सुप्रसिद्ध मर्मज्ञ पं. बबनराव हळदणकर यांनी त्यांच्या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे रागाच्या वातावरणाची एकात्मता उत्कट होते.  हे सगळं एखादी ‘गोष्ट’ सांगतात त्या पद्धतीने होत असतं पण लयीच्या आणि तालाच्या अंगानं.  बंदिशीच्या एका आवर्तनातच ‘अहिर भैरव’ नावाची एक सुंदर आणि भव्य संगीतमय वास्तू तुमच्यापुढे उभी राहते.  (तालयोगी पं . तळवलकरांच्या शब्दांत ) ज्याला पसाऱ्याची गायकी करायची आहे त्याला बंदिशीचा मुखडा आणि ताल खूप अनुकूल आहे . ज्याला बोलबनाव करायचे असतील त्यासाठी अतिशय प्रासादिक आणि नादमय शब्द योजना आहे. हे ‘सगळे’ आधी ठरवून बंदिशीची निर्मिती करता येत नाही हे जरी खरं असलं, तरी बुवांचे संगीताचे संस्कार आणि विचार किती प्रगल्भ आणि खोलवर होते याचा आपल्याला अंदाज येतो. ते एक असामान्य वाग्येयकार असल्यामुळे त्यांच्या रचनाकौशल्याचे फक्त शब्दांतून वर्णन करणे अशक्य आहे. फार फार तर आपण त्यांच्या काही खास बंदिशींची थोडीशी सौन्दर्यमीमांसा करू शकतो. स्वतः गुरुजींनी हि सौन्दर्यतत्वे चिरफाड करून कधीही सांगितली नाहीत. ते फक्त काम करीत राहिले. पण एखादी जागा ते पुन्हा पुन्हा म्हणून दाखवायचे किंवा विद्यार्थ्याकडून म्हणून घ्यायचे तेव्हा त्यातले सौंदर्य कुठे दडलंय ते कळायचं. त्यांच्या कामाची महती आणि व्याप्ती रसिकांपर्यंत पोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे इतकेच !!

काळेसरांनी मला विलंबित एकतालांत अहिर भैरव, यमन, पूर्वा कल्याण, भूप, दुर्गा, मुलतानी, चारुकेशी, वसंत मुखारी, दरबारी, पुरिया धनाश्री, कलावती, बागेश्री, मिया कि तोडी, गुजरी तोडी अशा अनेक रागांमध्ये बंदिशी शिकविल्या होत्या. विलंबित एकतालांत  भूप मधील 'सोहे जटा ', बागेश्रीतील 'का रे डार लियो ', पुरिया धनाश्रीतील "ये रामनाम कि ", दरबारीतील "येही रजा ", जोग मधील 'म्हारे अंगनुवा ", देसमधील 'काहे लराई ', गुजरी तोडीतील ' बादरुवा जा ', बसंत मुखारीतील ' रैना रंगीली ' असे एक ना अनेक ख्याल बुवांनी शिकविले. एक राग घेतला कि किमान दीड दोन महिने चालायचा. ( आणि एकदा तो शिकला म्हणजे पुन्हा पुन्हा आयुष्यात येतच राहतो.) बऱ्याचशा  एकतालांतील ख्यालांना द्रुत त्रितालांची किंवा एकतालाची जोडही आहे. जसे बागेश्रीमधील  ' येरी मोरी न मानली ', पुरिया धनाश्रीत 'झन झनन', दरबारीत 'तू करीम रहिम ', जोगमध्ये 'झुलना को झुलाय ' वगैरे. यमनमधील ‘मानले मोरा पिssया’(१ ताल), या विलंबित ख्यालांबरोबरच मला 'गुंदेला गुंदेला,  झूमे झूमे आणि कन्हैय्याssने ह्या एकापेक्षा एक  वेगळ्या बंदिशीदेखील शिकविल्या. 

सर होते तेव्हा माझा रियाझ जास्त व्हायचा हे निश्चित पण अजूनही मी जमेल तसा रियाझ करतो;  विशेष करून रागाचा आणि बंदिशींचा आस्वाद घेण्यासाठी !! मी ‘परसगंधा’मधून नटभैरव, गौड मल्हार, भटियार, भैरव- बहार, जोगकौन्स, गौड सारंग, देवगिरी , रागेश्री , ललत , देसी  यांसारख्या रागांच्या बंदिशी शिकलो. माझं ‘गाणं’ पुढे नेण्यासाठी  आता माझा मार्गदर्शक असतो 'परसगंधा'ची रेकॉर्डिंगज  !! अतिशय दूरदृष्टीने सरांनी आपल्या बंदिशी विद्यार्थ्यांसाठी खूप वर्षांपूर्वी 'परसगंधा’ या नावानं ध्वनीमुद्रित करून ठेवल्या होती. अगदी दुबईला ९ वर्षे असतानाही  'परसगंधा'च्या रेकॉर्डिंगजनी माझी सोबत केली. हा अमुल्य ठेवा मला ‘भेट’ देण्याचे मोठे काम रामनाथन कुटुंबीयानी केले त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !! दुसरे असे कि जिथपर्यन्त आपल्याला एखाद्या रागाचे साधारण आकलन होत नाही, तिथपर्यंत त्यातील विलंबित ख्याल घेवून आपण काय करणार ?? पुलंसारख्या रसिकाग्रणीनी एका ठिकाणी म्हटलंय कि "अहो बंदिशी शिकून जर गाणं आलं असतं तर मी नसतो का अल्लादियाखांसाहेब झालो असतो आत्तापर्यन्त ?? त्यामुळे राग नीट समजल्याशिवाय आणि भावल्याशिवाय शक्यतो मी बंदिश शिकण्याच्या भानगडीत पडत नाही. राग समजणे म्हणजे त्याचे फक्त व्याकरण समजणे असे मी मानत नाही. रागाचे भावविश्व आणि व्याप्ती समजणे महत्वाचे !! एखादा राग खरंच आपल्यावर प्रसन्न झाला तर तो रात्रंदिवस आपल्या डोक्यावर अगदी भूतासारखा बसतो. यमन , बागेश्री, गौड मल्हार, अल्हैय्या, नटभैरव, जौनपुरी, तोडी, भैरव बहार, बहादुरी तोडी, मीरा मल्हार अशा अनेक रागांनी मला असा 'गोड ' त्रास दिलेला आहे. आणि त्यावेळी मी अनुभवलेला आनंद 'चिरंतन' आहे. असो !!
बुवांच्या ‘असाधारण’ बंदिशकारीचा प्रत्यय मला पूर्वा कल्याण राग शिकताना आला. बुवांनी नेहेमीप्रमाणे बंदिशीचे शब्द आधी सांगितले आणि मी त्यातले काव्य वाचून अक्षरशः हरखून गेलो. विलंबित एकतालातील हि बंदिश अशी आहे  :
                                                                    राग: पूर्वा कल्याण 
अस्ताई
रघोssबीर की, छब दिखलाई ,
जपत मुsख , प्रभू केss नाम I 
 अंतरा 
हृदय विदाsरन, चकित भई जानकी 
हनुमंssत, जपत  प्रभू के नाम II

अर्थ जाणकारांच्या लक्षांत आलाच असेल. रामायणातील सीतामाईने हनुमंतांना दिलेल्या मोत्याच्या माळेच्या  सुप्रसिद्ध कथेला बंदिशींत  गुंफून एक प्रकारे रामनामाची महतीदेखील सांगितली आहे. हि बंदिश अशी काही जमलेली आहे कि ती मला शिकविल्या दिवशी घरी जाताजाताच तालासहीत पाठ झाली ( १९९९). सहसा विलंबित बंदिश बसायला एक दोन तरी सिटींग लागतात. पुढल्या क्लासच्या वेळी मी सरांना अस्ताई अचूक म्हणून दाखविली याचे त्यांना आश्चर्य वाटले. (पण याचे शंभर टक्के श्रेय मला नाही तर बंदिशीला आहे). मी सरांना म्हटलं कि “हि बंदिश म्हणजे १००० मि. ग्रॅमची गोळी आहे त्यामुळे लगेच लागू पडली”. अत्यंत वरच्या दर्जाचे काव्य, पूर्वा कल्याण रागाची सगळी लक्षणे आणि भाव , नादमय आणि लयबध्द शब्दयोजना, खाली भरीच्या जागांचे शब्दांवरील वजन अशांसारख्या अनेक उत्तम लक्षणांनी युक्त असलेली हि बंदिश गाणाऱ्याला अगदी सहज प्रोत्साहित करते. मला चांगलं आठवतंय कि हि बंदिश अध्यात्मिक असल्यामुळे ती शिकल्यानंतर लगेच उत्साहाच्या भरांत हि भक्तिपूर्ण बंदिश मी सद्गुरु अनिरूद्धांना म्हणून दाखविली होती आणि त्यांना ती खूप आवडलीही (त्याचा एक वेगळाच किस्सा आहे ).   

सरस्वती हा एक माझा आवडता राग !! हा राग 'विकल मन' या नाट्यगीताच्या रूपाने (जी मुळची बंदिश आहे) माझ्यापर्यंत आला. गुरुजींच्या शिष्योत्तमा सौ. विदुला भागवत यांच्याबरोबर पेटीची साथसंगत करत असताना त्यांनी हा राग काही वेळा म्हटल्याचे मला स्मरते (Early Eightees). विदुलाताई काळेसरांचा 'कजरा अखियन ' हा बडा ख्याल म्हणायच्या. माझे एक पुण्याचे मित्र श्री. अतुल केसकर हे देखील हा राग सतारीवर छान वाजवायचे  किंबहुना त्यामुळेच ह्या रागाबद्दल मनांत एक कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर एकदा काळेगुरुजींनी या रागांत विलंबित झपतालात एक गत पेटीसाठी बांधून मला दिली. ह्या पद्धतीची पेटीची विलंबित गत शोधून सुध्दा सापडणार नाही.  It is purely KALE Guruji school !! १९९३ मध्ये कै इंदिराबाई खाडिलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाप्रित्यर्थ मी हा राग सोलो पेटीवादनांत पुण्यात सादर केला होता, तेव्हा या वैशिष्ट्यपूर्ण रचनेविषयी अनेक उपस्थितांनी मला विचारले. नीर, गाठ, उकल या पद्धतीने गोष्ट सांगावी अशी ही ‘गत’ आहे. रागांतले ‘गांभीर्य’ आणि पेटीतली ‘तरलता’ याचा सुरेल संगम बुवांनी या रचनेत साधला आहे. नंतर ४-५ वर्षांनी गुरुजींनी मला 'भूलभूल्लैय्याs ' ही विलंबित एकतालातील बंदिश गायला शिकविली. या बंदिशीतील अस्ताई अंतऱ्यात श्रीकृष्णाविषयी गोपिकांनी केलेल्या तक्रारी सांगितल्या आहेत. सूर ‘तक्रारीचा’ असला तरी तो ‘गोड आणि सुरेल’च आहे आणि बुवांनी तो छान टिपला आहे. हि लांबलचक बंदिश एकतालाच्या १२ मात्रांत व्यवस्थित म्हणणे हे मोठे कौशल्ल्यपूर्ण काम आहे. थोडेसे गाफील राहिल्यास गाडी रूळावरून घसरायला वेळ नाही. ( मी या बंदिशीला गमतीने दीड मीटरची बंदिश म्हणतो). कन्हैय्याच्या खोडयांचे असं समर्पक वर्णन बुवांनी ब्रजभाषेत केलंय कि श्रद्धेने हि बंदिश म्हटली तर ‘आपण वृंदावनात तर नाही ना ??’ असा भास आपल्याला होतो. ह्याला जोड म्हणून बुवांनी ‘मानत नाss’ हि अफलातून द्रुत बंदिश शिकविली. या बंदिशीचा  अंतरा मोठाच विस्मयकारक आहे. अंतऱ्याच्या चारही ओळी चार वेगवेगळ्या तालांच्या वजनाच्या असून ( १६+१२+१०+७= ४५ ) त्याला पुढे ‘मानत’ च्या 3 मात्रा जोडून ‘तीन ताला’ची तीन आवर्तने पूर्ण होतात आणि ‘नाss’ वर सम येते. खरं म्हणजे हीच बंदिश एक ‘भूलभूल्लैय्या’ आहे असं म्हटल्यास योग्य ठरेल. या रागातल्या बुवांच्या आणखी २ बंदिशी म्हणजे 'नजरिया पिया … ' आणि 'ये तो रंगीला रंग जमाई साजन '. या देखील खूप वेगवेगळ्या साच्यातील आहेत. विद्यार्थ्यांचे लाड पुरविण्यासाठी बुवांनी 'उदानी दानी तानरे s ' हा आडा चौतालातील तराणादेखील सरस्वती रागांत बांधला. (पुढे रशीदखान यांची ध्वनीफित ऐकल्यावर माझी 'सरस्वती'ची भक्ती अधिकच दृढ झाली. !!)
विलंबित झपतालाची मजा काय असते हे मला गुरुजींनी 'बिहाग’ मधली 'भजन बिना' हि बंदिश शिकविली तेव्हा समजले .  या बंदिशीत बुवांनी असा काही बिहाग पकडलाय कि पुछिये मत !! बिहागमधली सा ग s s रे सा  ही मींड, प ग म ग s , सा॑ s s पधम्प गम s  ह्यांसारख्या  विशिष्ट स्वरसंगती, षड्ज गंधार पंचमावर पुरेसा ठहराव, आणि ओळ संपल्यावर दुधातल्या सायीसारखी वर येणारी 'आमद' अशा अनेक पैलूंनी सजलेली हि बंदिश !! हि बंदिश गुरुजींनी माझ्याकडून अशी काही बसवून घेतली कि त्यानंतर झपतालातील इतर असंख्य बंदिशींचेसुध्दा मला सहज आकलन होत गेले.  अशा अनेक मौल्यवान गोष्टी  गुरु आपल्या आयुष्यात आणून आपले जीवन समृद्ध करतो आणि त्याची जाण प्रत्येक शिष्याला असायला  हवी.  झपतालातील या चीजेच्या मी इतक्या प्रेमात पडलो कि पूण्याच्या संस्कारभारतीच्या कार्यक्रमात मी हि चीज पेटीवर जमून वाजविल्याचे मला स्मरते (1993). ती पेटीवर वाजविण्यासाठीदेखील मला खूप योग्य  वाटली  आणि त्यामुळे बिहाग चांगलाच रंगला (ह्या कार्यक्रमाला श्री.चित्तरंजन कोल्हटकर आले होते) . योग्य पद्धतीने म्हटल्यास , हि बन्दिशच गवयाकडून बिहाग राग गाउन घेईल.

झपतालाच्या ह्याच विलंबित लयीमध्ये बुवांनी सालगवराली , जोगकौंस , गौडसारंग, नायकी कानडा, देस, गोरख कल्याण अशांसारख्या वेगवेगळ्या रागांत छान बंदिशी बांधल्या आहेत . जोगकौंसमधील ‘सुघर बरपायो’ , गौड सारंगातील ‘कजरा कारे’ आणि नायकी कानडातील ‘मेरो पिsया’ ह्यातर अजरामर रचना आहेतच . पण मैफिलीत हेच राग दुसरा item म्हणून सादर करायचे असतील तर गायकांनी  या झपतालातील रचना काळे गुरुजींच्या एखादया शिष्याकडून जरूर शिकून घ्याव्यात . (अर्थांत ह्याच रागांमध्ये बुवांनी विलंबित एकतालामध्येही चीजा बांधल्या आहेत हे वेगळे सांगायला नको.) विदुला भागवतांचा रेडियोवरील ‘सालगवराली’ ऐकून कै. सी. आर. व्यासांनी गुरुजींना लगेच बंदिश आणि गाणे आवडल्याचा फोन केल्याचे मला स्मरते. व्यासबुवा स्वतः मोठे बंदिशकार होते हे रसिकांना माहीतच आहे . अतिविलंबित झपतालामध्येही सरांनी "मौंदर बाजे …" हा बागेश्रीतील बडा ख्याल रचला होता. (हा Zaptaal शिकविला तेव्हा खरोखरच मी zap झालो होतो). सुरुवातीला तालाचा काही अंदाजच येईना कारण त्याआधी एवढ्या  संथ लयीत झपतालात मी कधीच ख्याल ऐकला नव्हता . मलाच काय, पण ह्या ख्यालाला लागणारा ठेका चांगल्या तबलजीला सुद्धा पकडणे अवघड जाते  हा माझा अनुभव आहे. दोन मात्रांतील आस टिकविणे आणि भरणा करणे अशी दोन आव्हाने यामध्ये तबलजीला पेलावी लागतात.  या बंदिशीत बुवांनी श्रीराम अयोध्येत येत असतानाचे अप्रतिम वर्णन केले आहे. मिरदंग ( मृदंग ), बीन , चंदन सिंचन यांसारख्या प्रासादिक शब्दांची योजना आणि ‘संथ लयीचा कमाल  अंदाज’ हि ह्या बंदिशीची वैशिष्ट्ये म्हणता येतील. काही विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नसेल पण "बरसो रिमझिम मेहरुवा " हि बागेश्रीतील द्रुत बंदिश   "मौंदर बाजे …" ची जोड आहे, ज्यामध्ये बुवांनी रामचंद्रजी अयोध्येत येतानाचेच पण एकदम वेगळ्या शब्दांत केलेलं वर्णन आहे. मधुवंतीतल्या "मानली सुनी बतियां, अहिर भैरवातील 'लगी राम कि लगन ', आणि भैरवीतल्या " मत जैय्यो जमुना "  या झपतालातील बंदिशींची लय हि ‘मध्यलय’ म्हणावी लागेल .  म्हणजेच  नीट पाहिलं तर, झपतालाच्या कमीतकमी तीन लयींमध्ये बुवांच्या वेगवेगळ्या रंगढंगाच्या बंदिशी आहेत. बुवांचे रचनाकौशल्य अमर्याद होते  !!

रूपकमधल्या बुवांच्या बऱ्याचश्या बंदिशी विलंबित लयीतल्या आहेत. त्या जास्त करून शब्द आणि अर्थप्रधान आहेत. (किंबहुना कुठलीही 'अर्थहीन ' बंदिश सरांनी कधीही केलेली नाही). या सर्वच रूपकमधल्या बंदिशी अप्रतिम आहेत . त्या शब्दप्रधान असल्यामुळे विशेष करून बोलबनावाला एकदम पोषक आहेत . उदा . भूप मधील " गाये वरदराज " , पटदीपमधील ‘कमल फूल लियो’ , देस मधील 'घन गरज बाजे ', दुर्गातील " सखी री सुनली मोरी ", देवगिरीतील " मेरो मन लागी ", देसी तोडीतील " सजन बिन रैन "वगैरे.  झपताल आणि  रुपकसारख्या छोट्या तालांतील काही बंदिशी तर ८ ते १५ या वयोगटांतील मुलांना देखील म्हणण्यासारख्या आहेत हे विशेष. किंबहुना लहान मुलांचे गाणे सरांना खूप आवडायचे कारण  मुले सांगितल्याबरहुकूम काहीही फेरफार न करता बंदिश म्हणत. काळेसर 'संगीत अलंकार' केलेल्या आणि 'एम. फिल.' केलेल्या विद्यार्थ्यांनाही गाणे शिकवायचे. त्यांचा मोठेपणा हा कि एवढी विद्वत्ता असूनही ते ५ वर्षांच्या मुलांनाही अगदी सुरुवातीपासून शिकवायचे.  असो !  रूपकमध्येच माझ्या पुण्यातील संस्कारभारतीच्या कार्यक्रमासाठी सरांनी ‘बसंत’ रागामध्ये एक पेटीसाठी ‘गत’ बनविली होती. बुवांचा रूपकचा अंदाज काय होता हे त्यावरून कळते. यामध्ये बुवांनी तारसप्तकातील 'रे ' वर सम ठेवली आहे. याविषयी एका चांगल्या गवयाने माझ्याकडे “अहोआश्चर्य” व्यक्त केले होते आणि ती सम 'सा' वरच कशी पाहिजे होती ते मला सांगितले. परंपरेशी अथवा रूढीशी अतिनिष्ठा असल्यावर अशा ‘वेगळ्या’ गोष्टी खटकू शकतात. सदर गवयाने comment करण्यापूर्वी माझ्याकडून सगळी बंदिश म्हणून घ्यायला हवी होती म्हणजे त्यांना काळेबुवांच्या बुद्धीचे तेज आणि विचार कळला असता.  हार्मोनियमसारख्या वाद्यावर बसंतसारखा राग चार ओळींमध्ये इतक्या समर्पकपणे ( आणि तोही विलंबित रुपकमध्ये ) कुणी मांडलेला मी तरी अजूनपर्यंत ऐकलेला नाही .  बुवांच्या रूपकमधल्या शिघ्रकवित्वाचाहि मी साक्षीदार आहे . एकदा एका गुरुपौर्णिमेची सांगता करताना त्यांनी आयत्या वेळी ‘कबीर भैरव’ रागांत "विधाता परमेशा " हि बंदिश स्वतः रचून सादर केली होती.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सरांच्या गौड मल्हारमधल्या द्रुत बंदिशीची आठवण झाली नाही तरच नवल !!
गौड मल्हार
मुरली तेरी जडजाड जानू राधिका, 
ऐसी लकडी बनी सुघड ,
षडज रिषभ गंधार मध्यम पंचम धैवत निषाद सुsर I
अंतरा 
मुरली काहे करे गुमान तू ,
रतन जडित ना सोना चांदी ,
हरी करतल धन भाग तू मानू II

ह्या बंदिशींत सरांनी राधेला बासरीविषयी वाटणारा 'संवतीमत्सर'भाव कल्पिला आहे. राधा ही ‘कृष्णा’च्या हातातील बासरीला उद्देशून म्हणते आहे “हे मुरली, तुझी सगळी जडण घडण मी पूर्णपणे जाणते. तू फक्त एक लाकडापासून बनविलेली सुबक वस्तू आहेस कि ज्यांत सप्तसूर आहेत. तू उगाच कशाला घमेंड करतेस?? तुझ्यांत काय असे विशेष आहे ?? ना रत्न, ना सोने किंवा चांदी. तू हरीच्या हातांत आहेस हेच तुझं नशीब समज”. काय सुंदर कल्पनाविलास आहे !!! आठव्या मात्रेपासून सुरु होणाऱ्या या बंदिशीमध्ये बासरीतील सप्तसुरांचे प्रयोजन साधून बुवांनी गौडमल्हारातील सात आरोही स्वर एखादया खलित्याच्या गुंडाळीसारखे उलगडून दाखविण्याचं अजब रचनाकौशल्य दाखविले आहे. षड्ज रिषभ प्रत्येकी ३ मात्रांचे आणि बाकी सगळे सूर प्रत्येकी ४ मात्रांचे आहेत. सगळे स्वर म्हणून होईस्तोवर त्रितालाची २ आवर्तने पूर्ण  होतात. गाणाऱ्याच्या दमश्वासाची कसोटी लागते हि ओळ म्हणताना. शास्त्रीय संगीत आणि काव्य यांचा हा परिपाक आहे. काळेगुरुजींची हि FLAG-SHIP बंदिश आहे असे म्हणता येईल. 

ह्या गौड मल्हार मध्येच सरांनी विलंबित एकतालात बांधलेली भक्तिपूर्ण बंदिश देखील विलक्षण आहे. 

हे साईयां , तुम पर वारू तनमन ,
इतनी अरज मानियें  I 

तेरो बिना कछु नां सुहाए ,
टेर सुन ले मेरी अब तू  II 

इथे तसेच मानियें ह्या शब्दावर त्यांनी एक छान 'पुकार' ठेवली आहे, ती देखील गौडमल्हार युक्त म प धs ध नि प ग प म sss ग रे ग s रेसा ही स्वराकृती योजून.  माझे आत्ताचे गुरुजी पं अरुण कशाळकर यांना मी ह्यातील स्थायी ऐकविल्यावर , ते म्हणाले कि ही पूर्ण बंदिशच 'पुकार' ह्या संज्ञेला पात्र आहे. 

इथे देखील एकतालाच्या प्रत्येक मात्रे मात्रेवर बुवांनी काही ना काही जागा ठेवलेली आहे. विलंबित तालांमधील प्रत्येक मात्रेचे भान ( अथवा bearing ) ही काळे सरांनी त्यांच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली अमूल्य आणि आयुष्यभर पुरणारी  देणगीच आहे. 

उत्तम बंदिशकार वेगवेगळ्या बंदिशींमध्ये वेगवेगळ्या खुब्या योजतो; नव्हे, तो त्याच्या प्रतिभेचा भाग असतो. स्थायीमध्ये ‘गर्वोक्ती’ आणि अंतऱ्यामध्ये ‘शारण्यभाव’ असा एक गंमतशीर contrast बुवांनी काही बंदिशींत वापरला आहे. याचे पहिले उदाहरण म्हणजे राग 'मयुर बिहाग' मधील बंदिश. प्रथम थोडे या रागाविषयी. या रागाची संकल्पना काळेसरांचीच आहे. मारूबिहागांतील रिषभ धैवत हे स्वर अत्यल्प आणि वक्री पद्धतीने घेतल्यावर 'मयुर बिहाग' राग होतो. ( अजिबांत घेतले नाहीत तर अमृतवर्षिनी राग होतो ). तसेच ‘प नि सा ग s सा ग s s सा’ आणि ‘ग म् प नि प नि s s प’ या विशिष्ट स्वराकृती 'मयुर बिहाग’च्या रागनिर्देशक आहेत. या रागातील द्रुत बंदिशींत रचनाकारांनी गर्वोक्तीने म्हटले आहे ' मेरी जबान मेरी तान, सूर कि शान… '. पण याच चिजेच्या अंतऱ्यात ' कर पाये सूर-समुंदर कैसे गुरु बिन ' असे म्हणून ते गुरुला शरण जातात. अशाच प्रकारची दुसरी बंदिश ही राग गुणक्रीमध्ये आहे. गुणक्री रागांतील 'गुनियन  के दरबार ' ह्या बंदिशीत अस्ताईत ‘दिखलाऊ तान, ताल, सूरकी अजब झनकारी’ अशी गर्वोक्ती ते सांगतात, तर अंतऱ्यात 'हुं तो मानू मैं मेहेरुबानी उनके शान की ' असे म्हणून तानसेन आणि बैजूबावरा यांना शरण जातात.  बैराडी रागांत गुरुजींची  एक छान बंदिश आहे ." अतर सो गंध , गंध सो अतर "!!  यामध्ये त्यांनी अत्तर-सुगंध, गुण-गुणी, भक्त-भाव ह्या जोड्यांतील  तुलनात्मक श्रेष्ठतेबद्दल रसिकांना पेच टाकला आहे आणि शेवटच्या ओळीत  जोडीतील ‘दोन्ही’ गोष्टी जेव्हा एकरूप होतात तेव्हा परमानंद होतो ' असे म्हणुन स्वतःच तो ‘पेच’ सोडविला आहे . त्यांची यमनमधील 'येकी तानसेन बाकी कानसेन' हि एकतालांतील भंजनात्मक बंदिश तानसेन आणि कानसेन यांची महती रसिकांना पटवते पण ‘मानसेन’ मंडळीना चांगलीच कोपरखळी मारते . यमनमधल्याच ‘झूsमे झूsमे जा s’ ह्या गुरुजींच्या बंदिशीमधल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळीतील 'तोरी बरस परस दरस ' हा  अर्थपूर्ण ‘अनुप्रास’ ऐकायला खूप सुंदर वाटतो. छोटया छोटया पण किती मनोरंजक गोष्टी आहेत ह्या !!

 मैफिलीत नेहमीपेक्षा वेगळ्या तालांतील रचना बरेच वेळा रंग मारून जातात . हे अचूक हेरून काळे बुवांनी अनेक वेगवेगळ्या तालांत बंदिशी करून ठेवल्या आहेत. विलंबित आड्या चौतालांत गावती,  हंसध्वनी  आणि झुम्रऱ्यात यमन-मालकौंस तर तिलवाडयांत गौड सारंग रागांमध्ये सुरेख रचना आहेत.  हल्लीच्या काळांत  द्रुत- झुम्रऱ्यात चीज मिळणे दुरापास्त आहे . पण याच द्रुत झुम्रऱ्यातील काळेबुवांची "साचो ताल सुर बहार " हि चीज चांगलीच गाजली.  अगदी माझ्या आठवणीत, कै गजाननबुवा जोशींसारखे बंदिशकार गायकदेखील आग्रहाने हि  बंदिश श्री. वासुदेव जोशींसारख्या  काळे बुवांच्या जेष्ठ आणि गुणी शिष्यगायकाकडून मुद्दाम म्हणून घ्यायचे. द्रुत आड्या चौतालातील काही खटकेबाज बंदिशी बुवांनी अगदी क्लुप्तीने काही विद्यार्थ्यांना शिकविल्या होत्या . त्यातील मला आठवतात त्या  दरबारी, छायानट रागांतील बंदिशी. मयुर बिहाग प्रमाणेच 'मालन' या रागाची निर्मिती काळे सरांची आहे. त्याचे सोपे वर्णन म्हणजे ' हंसध्वनीतील शुद्ध निषाद काढून त्या ऐवजी कोमल निषाद योजून केलेला राग’. सरांनी मांडलेल्या संकल्पनेप्रमाणे हा राग आणि त्यातील बंदिशी म्हणणाऱ्या फक्त दोनच गायिका विद्यार्थीवर्गांत होत्या . त्या  म्हणजे ह्या वेबसाईटच्या निर्मात्या सौ . रंजिनी रामनाथन ओक आणि त्यांच्या मातोश्री डॉ. सौ. लीला रामनाथन !! (या दोघींचीही सरांवर निस्सीम भक्ती होती.).  गुरुजींच्या अनेक बंदिशी आपल्या असंख्य विद्यार्थिनींना देवून त्यांचा  प्रसार करण्याचे कार्य सौ विदुलाताई भागवत यांनी गेली २५ वर्षे उत्तमपणे केले आहे . तसेच सौ.  प्रतिभा गोरे, श्री. शिरीष पाटणकर , सौ. वीणा महाजन (दापोली ) या शिष्यांनी सुद्धा त्यांच्या बंदिशींचा प्रसार केला आहे . सरांच्या निर्मितीअध्यायांत आणि खजिन्यांत वेगळ्या रंगाच्या ठुमऱ्या, तराणे, ख्यालनुमे, चतरंग आणि भक्तीसंगीत देखील होते. माझ्याकडून सरांनी खमाजमधील 'चित्त चुरियो घनश्याम ' हि ठुमरी इतकी व्यवस्थित बसवून घेतली कि त्यानंतर मला १४ मात्राच्या दीपचंदीचा कधीही बाऊ वाटला नाही.  तराण्यांची तर त्यांनी सौ लीला रामनाथन यांची ध्वनिफीत मुद्रित केली होती. आमच्या घरी बुवांच्या बंदिशी एकदम पॉप्युलर आहेत ( म्हणजे अगदी आजीपासून नातवापर्यंत !! ). रेडीओवर किंवा टी व्हीवर एखादे परिचित गाणे किंवा गायन- वादन लागले तर लगेच , घरातले लोक “विकास, हे 'म्हारी ननदिsया’ सारखे आहे का किंवा 'अब ना  सताsओ ' सारखे आहे का?” वगैरे विचारीत. माझ्या पत्नीला गुरुजींच्या बंदिशीतील काव्य खूप भावते . तोडीतली 'धातगिन धा ' हि बंदिश तर माझ्या मुलाला इतकी आवडत असे कि , तो ३-४ वर्षाचा असताना त्याने Fancy Dress स्पर्धेंत खांसाहेबांचा पेहेराव करून ती शाळेच्या Gatheringला  म्हटली होती. 
वयाच्या अठराव्या वर्षी सुरु झालेल्या गेल्या ३५ वर्षाच्या माझ्या संगीतव्यासंगांतील जवळ जवळ २० वर्षे काळेसरांकडील अध्ययनाची आहेत. संगीत हा माझ्या आयुष्याचा व्यावसायिक नसला तरी अविभाज्य भाग आहे हे नक्की आणि या गोष्टीचे मोठे श्रेय काळेसरांचे आहे व त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांनी मला शास्त्रीय संगीताच्या रम्य दुनियेत आणले आणि रमवले. संगीताचे बीज ‘दैवी’ असते हे जितके खरे तितकेच त्या बीजाला योग्य त्या प्रमाणात खतपाणी मिळणे आवश्यक असते ते माझ्या बाबतीत काळेबुवांकडे घडले. त्यांनी विद्या तर मला दिलीच पण संगीताकडे बघण्याची मला नजरही दिली. मी आता कुठल्याही गुरूकडे शिकलो, तरी काळेबुवांनी घातलेले Foundation मी विसरू शकत नाही . किंबहुना, त्यामुळेच  नवीन मिळणाऱ्या तालमीकडे मी अधिक डोळसपणे पाहू शकतो व विनासायास विद्याग्रहणहि करू शकतो.  गेली बारा वर्षे मी सुप्रसिद्ध संवादिनी आणि ऑर्गनवादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे पेटीवादनाचे  advanced Lessons घेतोय.  त्याने माझ्या  वादनांत  निश्चितपणे लक्षणीय प्रगती झालेय. तसेच, अलीकडेच पाच सहा महिन्यांपूर्वी मी ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अरुण कशाळकर  यांच्याकडे गाणं शिकायला सुरवात केली आहे. केवळ 
सद्गुरु कृपेनेच मला हे तीनही महान गुरु मिळाले असे मी मानतो. 

काळेबुवांच्याच बंदिशीतील दोन ओळी इथे लेखाच्या सांगतेसाठी उधृत कराव्याश्या वाटतांत…

                                                       " ढुंढे मन सूर, ताल , 
                                                         सरस राग, सरस गानहि , 
                                                         कर पाये सूर समुंदर कैसे गुरूबिन II "     
                            
                                                                II   गुरवे नमः II

लेखक: श्री . विकास ज. कात्रे 
 मोबाईल क्र . ९८३३६ १०८७५,
इमेल  : vikas_katre@rediffmail.com

Comments