Skip to main content

गानसरस्वतीची अविस्मरणीय मैफिल

गानसरस्वतीची अविस्मरणीय मैफिल

Photo credits: The Indian Express

पण जन्माला आल्याचे सार्थक वाटावे अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात कधीकधी घडतात. अशीच एक गोष्ट अलीकडे माझ्या आयुष्यात घडली. ती म्हणजे Living Legend गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांची अभूतपूर्व मैफिल !! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व श्रीमती प्रफुल्ला डहाणूकर  यांचे अलीकडेच दु:खद निधन झाले. किशोरीताई त्यांची जीवलग मैत्रीण ! प्रफुल्लाताईंना श्रध्दांजली म्हणून ताईंच्या सकाळच्या मैफिलीचे आयोजन दिनांक १३ एप्रिल २०१४ रोजी जहांगीर आर्ट मध्ये  केले होते. केवळ परमेश्वरकृपेने या मैफिलीला उपस्थित राहण्याचे अहोभाग्य मला लाभले . या स्वर्गीय मैफिलीबद्दल हा माझा छोटासा अनुभव … 

एक गोष्ट लेखाच्या सुरुवातीलाच नमूद करणे महत्वाचे आहे ती म्हणजे ही काही मैफिलीची समीक्षा नाही (आणि तो माझा प्रांतही नाही किंवा हेतूही नाही).  ह्या माझ्या लेखामध्ये माझी भूमिका निव्वळ आस्वादकाची  आहे.  त्यामुळे हे मैफिलीचे मी यथाशक्ती केलेले 'रसग्रहण’ आहे असे कदाचित म्हणता येईल.  रसग्रहण करण्यासाठी श्रोत्याची अथवा लेखकाची ग्रहणशक्ती खूप महत्वाची हे निश्चित !! पण त्याबरोबर इथे या प्रस्तुत लेखनामागचा माझा भाव देखील तितकाच महत्वाचा आहे असं वाटतं.  आत्तापर्यंत अशा प्रकारचे लिखाण माझ्याकडून झालेले नाही.  परंतु, विशेष करून ह्या मैफिलीबद्दल मात्र  खूप लिहावेसे वाटते आहे. जरी माझी अवस्था “गाऊ गुनन कैसें तुमरो, गुन नाही मोमे अब…..” ह्या गुनिदासांच्या मारूबिहाग मधील ओळींसारखी झाली आहे. तरीही आपल्या लाडक्या देवदेवतांचे गुणसंकीर्तन जसे आपण भक्तिभावाने करतो त्याच भावनेने हे माझे लेखन कागदावर उतरले आहे. (जसे “चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे….” ). कारण माझी सगळ्यांत आवडती गायिका आहे गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर आणि त्यांची अजूनपर्यंत मी ऐकलेली हि सगळ्यांत अभूतपूर्व मैफिल !!

मैफिल सकाळची असल्याकारणाने आज ताई काय  गाणार याची खूप उत्सुकता होती. आजपर्यंत त्यांनी अहिर भैरव, तोडी, ललत, बहादुरी तोडी, अल्हैय्या , जौनपुरी, भूप , बागेश्री , यमन, हंसध्वनी, कौसी कानडा, मल्हार यासारखे अनेक मोठे राग ऐकवून रसिकांना अगदी तृप्त केले आहे. आजच्या मैफिलींत अगदी तानपुरे आणि स्वरमंडल लावून झाले तरी त्या काय गाणार याचा काही अंदाज लागेना. आमची सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली आणि ताईंनी मी त्यांच्याकडून आजपर्यंत कधीही न ऐकलेला राग सुरु केला……..'हुसेनी तोडी'!! 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष सूचना :
१ ) या लेखांत कोमल स्वर दर्शविण्यासाठी ' की बोर्ड’ वर किंवा लिपीमध्ये योग्य चिन्ह उपलब्ध नसल्याने , हुसेनीतील कोमल निषाद व कोमल गांधार हे स्वर थोड्या फिक्या निळ्या अक्षराने  दाखविले आहेत याची नोंद घ्यावी. मंद्रातले स्वर अनुस्वाराने दाखविले आहेत.

२ ) प्रस्तुत मैफिलीचे रेकॉर्डिंग मिळणे अवघड आहे. परंतु, वाचकांस थोडाफार तरी अनुभव द्यावा, यासाठी ताईंच्या You Tube वरील याच रागांच्या २ hyper links मी खाली देत आहे. त्या क्लिक किंवा कट पेस्ट करून  आस्वाद घेणे सहज शक्य होईल.  

https://www.youtube.com/watch?v=pFlULl078Tc
https://www.youtube.com/watch?v=8bRj4U1IbRY&t=56s

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

हुसेनी तोडी  हा ‘अनवट’ किंवा अप्रचलित राग आहे. इतका, कि तो कधी साठीसहामाशी देखील ऐकायला मिळेल असे नाही.  काफी थाटाचा आणि ‘कोमल रिषभ विरहित’ तोडी हे याचे प्रमुख वैशिष्ट्य !! (विशेष म्हणजे नावांने तोडी असला तरी तो ‘तोडी’ थाटाचा नाही ) स्थूलमानाने,  अवघड रागांचे दोन प्रकार असतात्त : १) रागाचे भावविश्व समजण्यास कठीण असेल तर तो अवघड आहे असे मानण्यास हरकत नाही. नेमके याच कारणाने तो कमी गायला किंवा वाजविला जातो आणि अधिकच दुस्तर होतो. ( उदा. हेम कल्याण, रामगौरी, देवसाख, जयत कल्याण वगैरे) २) रागाचे व्याकरण किंवा चलन जर गाण्यास अवघड असेल तरी देखील तो अवघड मानला जातो.  परिणामी, अशा रागांमध्ये काळाच्या ओघांत काही मौलिक भर ( Value addition) होवून तो समृध्दहि होत नाही. तसेच तुरळक अपवाद सोडल्यास पुढील पिढीवर या रागाचे फार संस्कारही होत नाहीत. गाण्यापूर्वी अशा रागांची तालीम मिळणे किंवा घेणे खूप जरुरीचे असते आणि तालीम मिळाल्यानंतर देखील हा राग गाणाऱ्यावर प्रसन्न होईलच असे नाही. काही काही अनवट राग तर हयातभर केवळ एखाद्या बंदिशीवरच तरले आहेत कि काय असे वाटते. असो ! ‘हुसेनी तोडी’ हा राग पहिल्या प्रकारात मोडेल. त्याचे स्वतःचे असे भावविश्व समजणे खूप कठीण आहे. मला वाटतं यापूर्वी मी हा राग एक दोघांकडून   ऐकला होता. परंतु त्यामध्ये राग- भावाचा पूर्ण अभाव असून  फक्त रागाचे व्याकरण होते. अर्थातच त्यामुळे या रागाविषयी फारसे आकर्षण वाटले नाही आणि तो माझ्या विस्मृतीत गेला. माझ्या अल्प वाचनानुसार हा राग दोन प्रकारे गायला जातो. ताई गातात त्या प्रकारांत कोमल गंधार घेतांत.  दुसऱ्या प्रकारांत दोन्ही गंधारांचा  उपयोग करण्यात येतो. काही ग्रंथांत या रागाला मिश्र राग मानले आहे कारण त्यांत अनेक रागांच्या छटा आहेत. इतका अनवट राग आहे हा, पण किशोरीताईंनी अशा काही कलात्मकतेने आणि सहजतेने पेश  केला कि मैफिल ऐकताना जणू काही त्या उपस्थित रसिकांना आपल्याबरोबर घेवून प्रेमाने अलिबाबाची हिऱ्यामाणकांची गुहाच दाखविताहेत असं वाटत होतं. प्रत्येक स्वराकृती अतिशय  सौंदर्यपूर्ण,  सुरेल, आखीव रेखीव , आसपूर्ण आणि मधुर भावाने ओथंबलेली !!     
अगदी पहिल्या आलापापासूनच (धंमंपंनिंssss साsss ) ’ हुसेनी तोडी’ रागाचे भावविश्व उलगडून दाखविण्यास ताईंनी सुरुवात केली.  अशा वेळी ऐकणाऱ्याला व्याकरणाचा विसर पडतो व ते स्वाभाविकच आहे. (केवळ जिज्ञासा किंवा अभ्यासापोटी मी या रागाकडे व्याकरणाच्या किंवा अभ्यासाच्या भिंगातून मध्ये मध्ये पहात होतो. असे केल्याने नवीन राग नीट लक्षात राहतो असा माझा अनुभव आहे). रागाच्या भावाविषयी व प्रत्येक स्वरलगावाविषयी ताई कमालीच्या संवेदनाशील आहेत. हि संवेदनशीलता त्यांनी आयुष्यभर एक महत्वाचे "सांगीतिक मूल्य " म्हणून जपली आहे व त्यामुळे त्यांच्या गाण्यात अखंडपणे ती प्रतीत होत राहते. ताईंच्या स्वतःच्या लिखाणात नमूद केलेली आणि रसिकांना त्यांच्या गाण्यातून नेहमीच जाणवलेली अशीच आणखी काही मूल्ये (जशी भावगर्भ, श्रवणरम्य, सहज, गतिरम्य वगैरे) ताईंनी नुसती आपल्या गाण्यात अंतर्भूतच केली नाहीत, तर जाणीवपूर्वक जपली आहेत.  त्यांचे संगीत ऐकताना तितकीच संवेदनशीलता रसिकांकडून अभिप्रेत आहे (निदान जाणकारांकडून !!). साधारण दोनएक वर्षांपूर्वी श्री. टी . एम . कृष्णा या कर्नाटकी शास्त्रीय संगीतकाराने या संदर्भात ताईंबद्दल " THE HINDU " ह्या वृत्तपत्रांत अत्यंत समर्पक असे लिहिलेले होते  ते येथे उधृत करण्यासारखे आहे " I almost hear a quest in her voice, a search for something profound in every swara. This quest makes us dive deep into this quest. Sometimes it may not be easy to listen to her as she drives you deep into this quest; you need to be as passionate about the journey.” 

सुरुवातीच्या थोड्याश्या मुक्त आलापिनंतर, मध्यलय झपतालातील " निरंजन कि जे… " या अप्रतिम बंदिशीची प्रतिष्ठापना करण्यात आली.  समेच्या अर्धी मात्रा आधी  सुरु होणाऱ्या ( किंवा जेमतेम अर्ध्या मात्रेचा मुखडा असणाऱ्या ) या बंदिशीची सम “निरंजन “ या नादमय शब्दांतील ' रं' वरील अनुस्वारीत अक्षरावर  आहे. तरीही त्याचे उच्चारण  ताई  जोरकसपणे न  करता, अगदी  नेमक्या वजनानेच करतात. हीच बंदिश इतर गायक कसे गातांत हे ऐकले म्हणजे माझे म्हणणे पटेल. (या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदांत लिहिल्याप्रमाणे मला इतर निवडक गायकांचे गाणे देखील आवडते. परंतु इथे आपण ताईंनी  स्वीकारलेल्या विशिष्ट गानप्रणालीचा उहापोह करीत आहोत. त्यामुळे त्यांच्या गायकीचा तुलनात्मक अभ्यास करताना कुणाचाही नामोल्लेख न करता त्यांच्या फक्त गायन पद्धतीचा योग्य ठिकाणी संदर्भ घेणे आवश्यक वाटते. तरी गैरसमज नसावा !!). निरंजन म्हणजे "परमेश्वर", म्हणजेच नमित होण्याची जागा आहे; लयीच्या आहारी जाऊन स्वरांची आणि शब्दांची फेकाफेक करण्याची नाही याचे त्यांना भान आहे. शब्दांना ताई खूप जपतात. शिवाय आपल्या गाण्यात काय शोभून दिसेल या गोष्टीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. वरती वर्णिलेली हीच ती संगीतातील संवेदनशीलता !! आपल्या दोन लाडक्या शिष्यांबरोबर( कु. तेजश्री आमोणकर आणि सौ. नंदिनी बेडेकर) बंदिशीचे सहगायन ताईंनी केले (जयपूर घराण्याच्या प्रथेप्रमाणे दोन वेळा). यामुळे एक प्रकारचे मंगलतेने भारलेले वातावरण सुरमन्दिरांत तयार झाले.  यापुढे काहीतरी भव्यदिव्य ऐकायला मिळणार अशी मनोवस्था श्रोतृवृन्दात निर्माण झाली.  

" निरंजन कि जे… " हि बंदिश ’ हुसेनी तोडी’  या रागाची  शास्त्रानुसार सांगितलेली बरीच व्यवच्छेदक लक्षणे दाखवते.   ही बंदिश " निं सा रे s निं धं , रे निं s धं पं s s, सा रे म प नि ध s प,  प ध नि सा॑ s , , रे ग मरे s सा , म प ध s प s रे s s " अशा विविध स्वराकृतींनी हुस्सैनी तोडी हा राग अधोरेखित करते; अर्थांत, रंग भरण्यासाठी योग्य कॅनव्हास तयार करते. हुस्सैनी तोडी रागाची हळुवार पण  निश्चयात्मक बढत सुरू झाली. झपतालाच्या डौलदार मध्यलयीमुळे आणि ताईंच्या आवाजांतील गोलाईमुळे  म्हणा, जणू काही हत्तीची सुरेख अंबारीच पुढे सरकत आहे असे वाटत होते. प्रत्येक आलापाची उपज वेगळी पण तरीही चाललेल्या आविष्काराला साजेशी !! सकाळच्या प्रहरी सूर्योदय होतांना समुद्रकिनारी पाण्यात उभे राहिल्यावर जणू काही प्रत्येक आलापिरूपी संथ लाट आपल्या पावलांना  हळुवार स्पर्श करून जाते आहे असा फिल आला.  प्रत्येक लाट आपल्याला काहीना काही सांगते आणि अंतर्मुख बनविते….. असे हे एका परीने निसर्गाशी एकरूप झालेलं गाणं !!   

हुसेनीतील ताईंनी टिपलेली असंख्य ‘सौंदर्यस्थळे’ हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल होईल. त्यांची मीमांसा एका लेखांत करणे हि अशक्यप्राय बाब आहे कारण आयुष्यभर ताईंनी केलेल्या चिंतनाचा आणि परिश्रमाचा तो सुंदर परिपाक आहे. तरीही वानगीदाखल त्यातील काही ठळक जाणविलेली वैशिष्ट्ये इथे निश्चितपणे नमूद करण्यासारखी आहेत.  हुसेनी तोडीतील ताईंच्या आलापचारीतील प्रत्येक आलाप षड्जावर न्यास पावणारा होता ( साधारण आठव्या नवव्या मात्रेवर संपणारा) आणि तालाच्या दहा मात्रा  संपल्यावर त्याला  लागुनच त्यावर जणू नम्र अनुबोधन देणारी बंदिशीची  षड्जावरील ‘सम’, नंतर पुढे  ३ मात्रा गुंजन करत राहणारा तोच षड्ज, शिवाय  समेत मिसळून जाणारी भरत कामतांची  तबल्याच्या लवेवरील षड्जाचीच गोड आस …..असा हा ‘षड्ज-शर्करा’ योग होता !!  काफीच्या कोमल नि, सा , शुध्द रे, कोमल ग  यांच्या गट्टीत सामील झालेला  ' शुध्द निषाद ' हा ‘पाहुणा’ हुसेनीतील अंगभूत सौंदर्य विलक्षण खुलवतो. कधी पं निं s सा , धं निं सा , तर कधी रेसानिंसा अशा सुरावटीतून तो आपली वेगवेगळी रूपे आणि अस्तित्व दाखवतो. कोमल निषादाच्या जोडीने तो हुसेनीचा कलात्मक आशय वाढवितो. तोडीतल्या कोमल गंधाराची श्रुति ऐकायची असेल तर ती ताईंकडूनच !! हा गंधार 'कोमलतर’ होता का ‘कोमलतम' हे त्यांचा एखादा जवळचा शिष्य किंवा शिष्याच खात्रीने सांगू शकेल. काही असले तरी हा गंधार हृदयाला भिडणारा होता हे निश्चित !! शिवाय काफी थाटातील शुध्द रिषभ आणि हा तोडीतला 'विशिष्ट' गंधार ह्यांचा एक वेगळाच 'अनुबंध' हुसेनीत जाणवला !! ( वास्तविक काफी थाटातल्या बरवा, सिंदुरा या रागांतही शुध्द रे आणि कोमल ग हेच स्वर पाठोपाठ आरोही घेतले जातात परंतु त्यांतील गंधार ‘चढा’ असतो. असे श्रुतीभेद ताईंच्या गायनातून नेहमीच अनुभविता येतात ते त्यांच्या गानतपस्चर्येमुळे !)

ताईंनी विस्ताराने मांडलेल्या या रागात अनेक रागांच्या छटा जाणविल्या.  व्याकरणात सांगितल्यानुसार , ‘मपधप ग s रे s’ असे देसी ( किंवा देसी तोडी ) रागाचे अंग त्यांत आहेच.  शिवाय काही विशिष्ट स्वरसंगतींमुळे  भीमपलास (निंs निं s सा ss), जय जयवंती ( धं निं रेs ), जौनपुरी (सा रे म प s ), काफी कानडा (नि s प रे s), तिलककामोद (पधमपसा॑ s s), रामदासी मल्हार (मंपंधंनिंसा ssss ) वगैरे रागांच्या छटा हुसेनीच्या वेगवेगळ्या अंगांत जाणवल्या.  सर्वसामान्य श्रोत्यांना अशा जागा  परिचित असल्यामुळे खूप आवडतात.  तर जाणकारांना हुसेनीच्या ह्या सर्वसमावेशक वृत्तीचे आणि ताईंच्या उत्तुंग प्रतिभेचे कौतुक वाटते; कारण हा सगळा मेळ ठरवून घातलेला नसतो. शुद्ध निषादासहित घेतल्या गेलेल्या नि सा रे रे s " यासारख्या स्वराकृतींच्या पार्श्वभूमीवर कोमल निषादाचा भीमपलासच्या अंगाने " निं s सा sss " असा  केलेला सुपरिचित आरोही वापर शीतल वाऱ्याच्या झुळकेइतका सुखद वाटतो. रागाच्या पुर्वांगांत सतत नवनिर्मितीने होणारा एक प्रकारचा तणाव तो कमी करतो (शिवाय     मं पं निं s,  निं सा रे s,  सा रे s ह्यांसारख्या गंभीर आणि खोल स्वराकृती नाही म्हटले तरी एक प्रकारचा तणाव उत्पन्न करतात तो वेगळा).  उत्तरांगांत, तिलक कामोदच्या अंगाने पधमपसा॑ s s , तसेच काफी कानड्याच्या अंगाने नि s रे s अशा स्वराकृतींनी 'हुसेनी तोडी'ला ताईंनी अधिक समृध्द केले. एवढया सर्व छटा असूनही ताई ह्या रागाचा एकजिनसीपणा (Homogeneity) पुरेपूर राखतात, हे मोठेच आश्चर्य आहे. याचे कारण ताई कुठलाही राग गाताना त्या त्या रागाशी एकरूप होऊन गातात, हेच होय !! या मैफिलीत त्या  हुसेनीमय झालेल्या स्पष्ट दिसत होते.  

साधे आणि सोपे अलंकार हे अमूर्त गाण्यात कुठे प्रविष्ट करायचे याचे काही नियम नाहीत. गायन किंवा वादन अधिक सुंदर करण्यासाठी त्यांचा कलात्मक वापर गायकाकडून अभिप्रेत आहे.  नाहीतर हेच अलंकार गाण्याला बाळबोध, विस्कळीत किंवा कलाहीन बनवू शकतात. ( एखाद्या स्त्रीने स्वतःला न शोभणारे अलंकार घातल्यास ते नाही का हास्यास्पद दिसते …? काही कलाकार तर हे अलंकार आपण घासून पुसून कसे तयार केले आहेत ते श्रोत्यांपुढे मांडून रसिकांना उबग आणतात ) ताईंनी हुसेनीत काही अलंकारांची अशी काही बेमालूम योजना केली त्याला तोड नाही. सम यायच्या आधीचा २-३ मात्रांचा कालावधी एखाद्या लयदार अलंकाराने त्या अशा काही कलात्मक रीतीने भरून काढत होत्या कि त्यामुळे अलंकाराचेच सौंदर्य अधिक प्रकाशात आले.  अमूर्त आलापीच्या पटावर ताईंनी extempore पण विवक्षित जागी केलेली ' रेसारे , मरे, पमरे सानिसा ' यांसारख्या सोप्या अलंकारांची योजना काही पटींत रागाची रंजकता वाढविणारी होती. शास्त्रीय संगीतातील 'अवघडदास' असणे म्हणजेच श्रेष्ठ, किंवा ‘दुर्बोधता’ हे विद्वत्तेचे प्रतिक मानणाऱ्यांनी यातून शिकण्यासारखे आहे.   ताईंनी इथे अवघड राग सोपा करून म्हटला आणि तोही साध्या साध्या गोष्टी योजून.  रागाचे सौंदर्य दाखविण्यासाठी त्यांना अर्ध्या आणि पाव मात्रांचे हिशोब करत बसावे लागले नाही  कि तबल्याशी मारामारीही करावी लागली नाही ( किंबहुना तसा थोडा प्रयत्न तबलजीकडून दिसल्यावर त्यांनी कामतांकडे  थोडी नाराजीच व्यक्त केली. यांत  बरंच  काही आले….. ). अर्थांत अवघड राग सोपा करून म्हणणे हा त्यांच्या सिध्दीचा भाग आहे. 

एक दोन वेळा  ( म s s रे निं s म), (सारे रेम, मप रेम s ) , (निं रे म ध नि ध s) यासारख्या मोजक्याच पण  हुसेनीत सहसा ऐकिबात नसणाऱ्या स्वरसंगती घेतल्या. ज्यांना शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत कदाचित ‘तिरोभाव’ म्हणता येईल अशा; यातून त्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्तेचे ( Flashes of extraordinary brilliance)  दर्शन घडते . ‘तिरोभाव’ हा सहसा दुसऱ्या रागाच्या आधाराने व्यक्त होतो, पण इथे ताईंनी हुसेनीच्याच सुरांचा आधार घेत एकदम वेगळ्या रंगांच्या छटा सहजपणे निर्माण केल्या हे मुद्दाम सांगितले पाहिजे. त्यामुळेच कि काय, पण त्या छटा लगेच हुसेनीच्या मूळ रंगांत विरघळूनही गेल्या.  हे काम फ़क़्त एखादा असाधारण कलाकारच करू शकतो. पं. सत्यशील देशपांडे यांनी कुमारजींच्या गाण्याचे वर्णन करताना एका लेखांत म्हटले आहे कि " कलेचे गुढरम्य प्रदेश हे शास्त्र –व्याकरणाच्या सीमेला चिकटून तिथेच असतात ” त्याची मला आठवण झाली.  एवढे करून आपले गाणे 'गूढ' आहे असा मात्र ताईंचा अविर्भाव कधीही नसतो हे विशेष !! बरे त्याच त्याच सौंदर्यस्थळांत ताई  कधीच अडकून राहत नाहीत ( टाळ्या मिळेपर्यंत थांबून राहणे तर आणखीनच दूर… ).  उलटपक्षी, त्याच सुंदर स्वराकृतीतून  एखादी नवीन अप्रतिम जागा किंवा उपज त्यांच्या गळ्यातून निघून जाते. 

पूर्वांगात श्रोत्यांना अंतर्मुख केल्यावर ताईंनी रागाच्या मध्यांगाचा (म प ध) देखील मनसोक्त आस्वाद घेतला. पंचमाला तात्पुरते गौणत्व देऊन त्यांनी धैवताच्या साथीने शुध्द मध्यमावर केलेले काम अत्यंत मनोहारी होते. त्यातही परंपरेपेक्षा ताईंची सर्जनशीलताच अधिक जाणविली. मध्यमावर केलेल्या या ‘प्रेमवर्षावा’नंतर, त्यांनी पंचम-धैवताचेदेखील सुंदर 'मानपान ' केले आणि त्यावरील वेगळ्या अंगाने केलेला ठेहराव किती वेगळा परिणाम साधू शकतो याचे दर्शन रसिकांना घडवले. मध्यांगांत ताईंनी रागाचा इतका परिपोष केला कि जवळजवळ प्रत्येक उपस्थित  रसिकाला 'दिव्यत्वाची’ प्रचीती आली असे म्हणता येईल. ( यापुढील गाणे मी मनातल्या मनांत 'कर' जोडूनच ऐकले).  मला तर हे गाणे भूतलावरचे नाही असेच वाटू लागले.  आत्तापर्यंत मी ऐकलेल्या ताईंच्या गाण्यांहून ‘ हे’ गाणे सर्वार्थाने आगळे वेगळे होते असं मला वाटतं. रागाच्या सर्व अंगांना योग्य तो न्याय गायकाला देता आलाच पाहिजे असे एकदा कुमारजींनी विधान केले होते, तो आपण कसा देऊ शकतो हे ताईंकडून शिकावे.

आता थोडे ताईंच्या गानवैशिष्ट्यांविषयी …!! त्याविषयी लिहिणं आत्म्याचं वर्णन करण्याइतकेच ते अवघड आहे. मी जर एका रागांतील सौंदर्यस्थळांवर स्वतंत्र अभ्यास होईल असं वर लिहिलंय, तर एव्हढे सगळे राग मिळून काय होईल याची आपण कल्पनाच केलेली बरी. तरीही सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे ताईंच्या गाण्याचे मी माझ्या अल्प बुद्धीने थोडेसे रसग्रहण करतो आहे. परंतु त्यांचे गाणे ह्याच्याही खूप पलीकडचे आणि अनंत आहे हे वाचकांनी लक्षांत घ्यावे. शेवटी त्यांच्या गाण्याला आपण शब्दांत कितीसे पकडणार …??

ताई नेहमीच आकारामध्ये आलापचारी करतात व त्यामध्ये नेहमी मिंड आणि आस यांचा पुरेपूर उपयोग असतो . त्यामुळे  आवाजाची गोलाई व अखंडता कायम राहते.  कुठलाही  क्षुद्रालंकार, किंवा हरकती मुरकतींसारखी सांगीतिक प्रलोभने त्यांची तपस्याभंग करीत नाहीत. She has artistically and ardently inculcated a certain ‘code of musical conduct’ during her musical journey, which doesn’t accommodate even a decimal of ‘gimmickry’.  Till date, I have never seen her singing to the gallery. For that matter, she tops the list of musicians who maitain a highest degree of ‘culture’ in terms of classical musicality.  एका अर्थी त्यांचे गाणे ‘अविकारी’ आहे.  हे फ़क़्त साधकालाच शक्य आहे. यामुळे ताईंच्या गाण्याचा बोज (dignity)  नेहमीच अत्युच्च स्तरावर असतो. संस्कार आणि परंपरेचा यांत जसा वाटा आहे, त्याहूनही अधिक ताईंच्या स्वतःच्या चिंतनाचा आणि डोळस परिश्रमाचा आहे.  त्यांनी स्वतःची वेगळी वाट चोखाळली आहे आणि ती सोनेरी आहे.  असो !  

ताईंच्या अफाट निर्मितीक्षमतेमुळे त्यांचे गाणे नेहमीच एकदम ताजे वाटते. त्यांचे गाणे उपजयुक्त असल्याने त्यांतील प्रत्येक स्वरविचार एक वेगळाच संदर्भ घेवून आलेला असतो. तसेच त्यांचा  आधीचा आणि पुढील आलाप यांत कमालीचे घनिष्ट आणि सौंदर्यपूर्ण नाते असते,  ज्यामुळे हाती घेतलेला विचार सुफळ संपूर्ण होतो. कणस्वरांचा वापर सहजसुंदर आणि नैसर्गिक असतो. ‘अचूकता’ म्हणजेच ‘Perfection’ हा त्यांच्या गाण्याचा आणखी एक खास पैलू किंवा गुण, जो त्यांच्या नसानसांत भिनला आहे. She is always uncompromising when it comes to a quality of any performance she delivers. ज्या गायिकेला नुसत्या भूप रागावर पेटंट घेता येईल, त्या ताईंनी अगदी शेवट शेवटच्या मैफिलींमध्ये मला भूप गायला झेपेल ना गं ...?? असा धक्कादायक प्रश्न आपल्या शिष्येला विचारला होता. यावरून त्यांचा रागाकडे आणि परफॉर्मिंग आर्टकडे पाहण्याचा एकंदरच दृष्टिकोन काय होता याची कल्पना येईल. ( हा काही फाजील नम्रपणा नक्कीच नाही). उत्तुंग प्रतिभाशक्ती असणाऱ्या कलाकारांना सगळ्यांत जास्त रियाझ करावा लागतो असा माझा तर्क आहे. कारण कुठली जागा कधी गळ्यातून किंवा वाद्यातून जाईल काही सांगता येत नाही. आणि जे गायले जाईल ते ‘बावनकशी’च पाहिजे असा ताईंचा आग्रह असतो. हे तत्व ग्राह्य धरले तर, ताईंनी त्यांच्या स्वर्गीय गाण्यासाठी किती तपस्चर्या केली असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी…!! 

‘ताईंचा आवाज’ हेच मुळी एक स्वतंत्र माध्यम आहे. तलम , सुरेल , मधुर , नादमय, स्थिर, मार्दव , परीपक्व अशा विविध गुणांनी तो युक्त आहे !! त्यामुळेच  त्यांच्याकडे जी असामान्य प्रतिभा आहे ती पेलण्यास हा आवाज समर्थ आहे. ताईंनी  योग्य ते संस्कार, चिंतन आणि परिश्रम करून तसा तो बनविला आहे. ताईंच्या कुठल्याही स्वराचा आरोही लगाव अत्यंत नेमक्या वजनाचा तसेच अवरोही न्यास  आसपूर्ण होता.  ज्या स्वराचा परिपोष करायचा, तो भावपूर्णच असला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण आस्वाद घ्यायचा हे खूप मोठे तत्व ताई पाळतात. कुठल्याही स्वरावरील त्यांचा ठहराव न  बोचणारा ; उगीचच स्वतःच्या आवाजातील जव्हारीची किंवा तयारीची जाणीव न करून देणारा होता ( किंवा नेहमीच  असतो). नाद्ब्रम्हापुढे लीन झाल्याशिवाय हे शक्य नाही. जरूर असेल तेव्हा, किंवा गाणे परिणामकारक करण्यासाठी योग्य तिथे त्या 'स्वरनियमन' किंवा Voice Modulation देखील  करतात. ताईंचे गाणे कमालीचे ‘स्त्रीसुलभ’ आहे. ते त्यांच्याच आवाजात सुंदर लागते. त्यांच्या गाण्याचा 'आदर्श' इतरांनी जरूर ठेवावा  पण त्यांच्यासारखे हुबेहूब गायचा प्रयत्न कोणी करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे (आणि तसं करणं वाटतं तितकं सोपहि नाही ). कारण ताईंचे गाणे हे त्यांना ‘स्फुरलेले’ आहे हे कुठेतरी लक्षांत ठेवावेच लागेल. लयकारी करणाऱ्या इतर गायकांपेक्षा ताईंची लयकारी सूक्ष्म आहे आणि ती त्यांच्या गाण्यांतून सतत प्रवाही असते.  गाण्यातील 'लय' ही  बोलांनी मुद्दाम दाखविण्यापेक्षा, ती त्यांच्या आलापीला सावलीसारखी साथ करते. एरवी बहुसंख्य गायक-गायिका लयीच्या अंगाने गाताना तालाच्या मात्रांवर आघात करण्याची सहसा पद्धत आहे (तेही अविर्भावासहित). To me, this is rather an ‘accentuated’ method of displaying a ‘laya ang’ of Hindustani classical music. As against this, Kishoritai’s ‘layakari’ is more subtle and it seamlessly flows throughout her Khayal renderings. This can be experienced & felt by a knowledgeable audience while it’s intrinsic beauty unknowingly touches hearts of common audience. एका अर्थी, ताईंचे गाणे हि संगीतातील एक ज्ञानेश्वरीच आहे असे म्हणावेसे वाटते. रसिकांनी त्यातील एखादी तरी ओवी अनुभवावी … !! 

यानंतर ताईंनी बंदिशीतील बोलांचा उपयोग करून थोडी खेळकर लयकारी केली तीही, आत्तापर्यंत केलेल्या आलापाचारीला शोभेल अशीच होती. तानक्रियेला सुरुवात बोलातानेपासून झाली. एखादी छोटीशी गमकयुक्त तान घेवून नंतर ती कशी सुरेख विकसित करता येते याचे जणू प्रात्यक्षिकच ताईंनी दिले. यानंतर, कदाचित विशी पंचविशीत गळ्यातून जातील अशा थक्क करणाऱ्या गमकयुक्त, अलंकारिक, तर काही सपाट तानांची बरसात ताईंनी वयाच्या ८३ व्या वर्षी श्रोतृवृन्दावर केली.  या वयातही त्यांचा आवाज वरच्या पंचमापर्यंत जाऊ शकतो आणि तोही सहजपणे !!! तारसप्तकांत ताई रागाचा विशिष्ट परिणाम साधण्यासाठीच गातात (protocol म्हणून नाही). अशीच एक संपूर्ण आवर्तनाची तान घेवून आणि बंदिशीची स्थायी म्हणून त्यांनी ‘हुसेनी तोडी’ या आपल्या यज्ञाची सांगता केली. ताई आज स्वतःहून प्रफुल्लाताईंसाठी गायल्या. त्यांच्याविषयी ४ शब्द बोलून ताईंनी जौनपुरी सदृश (पण दोन्ही धैवत असलेल्या) एका रागांत प्रफुल्लाताईंसाठी केलेली स्व-रचित बंदिश म्हटली आणि मध्यंतर केला. 

मध्यंतरानंतर ताईंनी यमनी बिलावल हा राग सादर केला. ताईंच्या मैफिलीला जाताना श्रोत्यांनी बासुंदीनंतर श्रीखंड देखील खाण्याची तयारी ठेवावी (ताईंना ‘मसालेदार’ गायची सवय नसल्याने  मसालेभात पुढे येणार नाही हे ध्यानांत ठेवावे, असेही थोडे विनोदाने म्हणता येईल). हुसैनीच्या पार्श्वभूमीवर या रागाची निवड खूप आवडली. हुसैनीत कोमल गंधाराचे प्राबल्य तर यमनी बिलावलमध्ये शुद्ध गंधाराकडे यजमानपद (तेही यमन आणि बिलावल या दोन्हींकडून !!) हुसैनीत अजिबात नसलेला तीव्र मध्यम हा यमनचा 'जीव कि प्राण' स्वर ! अशा मूलभूत फरकांमुळे आणि ताईंच्या असाधारण कल्पकतेमुळे ‘यमनी बिलावल’ ऊठून दिसला नाही तरच नवल !! अगदी खरं सांगायचे तर मनांतून मला ताईंचा देवगिरी ऐकायचा होता. पण आज ताईंनी मी 'न' ऐकलेलेच पेश करायचे ठरविले असावे. त्यामुळे त्यांनी सादर केलेले दोन्ही राग माझ्यासाठी टयूटोरिअल होते. मला यातून झालेल्या आकलनानुसारच मी हा लेख लिहितो आहे. (त्यामुळे माझ्या interpretation मध्ये किंवा अन्यत्र काही चूक झाली असल्यास जाणकारांनी कृपया क्षमा करावी). ताईंनी विलंबित रूपक ठेक्यांत 'प्रेम गलियन… ' हि बंदिश घेतली होती. हि बंदिश त्या पूर्वीपासून गात असाव्यात कारण याचा उल्लेख कै. सुहासिनी मुळगावकरांच्या लेखनांत आल्याचे मला स्मरते. रुपकसारख्या ७ मात्रांच्या छोटया तालातील ताईंनी केलेलं काम खूप मोठं आहे. किंबहुना त्यांच्यासारखा संथ लयीतील रूपक आकाराने भरणारा गायक कलावंत मी तरी पाहीला नाही. अगदी लगेच सांगण्यासारखी उदाहरणे म्हणजे त्यांचं नटमल्हारमधील 'बरखाs s ऋतु आ s यी’ किंवा मीरा मल्हार मधील ' तुम घन से s s ' हे रूपकमधलं काम ज्यांनी ऐकले आहे, त्यांना हे पटेल. सम आणि काल पहिल्याच मात्रेवर असलेल्या रुपकमधील खाली-भरीचे सौष्ठवदेखील ताईंच्या गाण्यातून पुरेपूर प्रतिबिंबित होते. त्यांनी रूपकची अशी काही लय घेतली होती कि मला तर बिरजू महाराजांच्या नजाकती पदन्न्यासाचीच आठवण झाली (हाय हाय ...!!). 

रागाच्या पुर्वांगांत " निं सा रे ग , निं रे ग , निं रे ग म ग रे ग, निं सा रे ग प म ग रे गs,  म् ग रे गs " यासारख्या स्वराकृती  घेवून ताईंनी या जोडरागाविषयी श्रोत्यांत एक प्रकारचे कुतूहल निर्माण केले .  शुध्द मध्यमाचा यमन कल्याणच्या अंगाने सुरेख उपयोग करून त्या यमन आणि बिलावल या दोन्ही रागांची मैत्री किती घट्ट आहे ते दाखवितात. या यमनी बिलावलच्या स्वर-मंडलांत सगळ्यांत 'रसिक स्वर' जर कुठला असेल तर तो तीव्र मध्यम !! ह्या मध्यमाचे सामर्थ्य अचूकपणे हेरून ताईंनी त्याचा यमनमध्ये मेलडीसाठी तर बिलावलच्या `कॅनव्हास वर त्याचा contra-melody म्हणून सौंदर्य निर्मितीसाठी सुरेख वापर केला. "प म् ग रे s सा , रे ग म् धs मगरेग , रे ग म् ध  नि ध म् ग" अशा नेमक्या जागी योजलेल्या स्वरसंगतींनी श्रोत्यांत एकच हलचल जाहली. ताईंनी प्रतिसादांत देखील श्रोत्यांना मागे टाकले. कशाकशाचे म्हणून कौतुक करावे अशा गोड संभ्रमांत श्रोतृवृंद पडला.  यमनी बिलावलचे नऊ वेगवेगळे स्वर जणू ताईंच्या समोर नम्रपणे उभे राहून ह्या परीने (म्हणजे ताईंनी) त्यांना प्रत्येकाला परिसस्पर्श करावा म्हणून ताईंना विनवणी करीत आहेत असे चित्र माझ्या मन:चक्षु समोर उभे राहिले. तारसप्तकांत ताईंच्या पेशकारीत यमन अंगाचा प्रभाव दिसला. ताईंनी लयकारीत बोल-बनाव केले पण ते संयतपणे!  जे काही गाईले ते शब्दाच्या कलानेच.  शब्दांची उलथापालथ आणि मोडतोड त्यांच्या बैठकीत बसत नाही. इथे गळ्याच्या आणि तालाच्या तयारीपेक्षा गायकीचा सुबकपणा त्या अधिक महत्वाचा मानतात आणि रागाची त्यांनी मांडलेली संपूर्ण कलाकृती पाहिली कि हे अगदी पटण्यासारखे आहे.  ( एखाद्या लयबध्द आणि गोलाई असलेल्या मूर्तीमध्ये काटकोन त्रिकोण असतात का , तद्वतच ! हा ‘Parallel aesthetics’ चा प्रांत असावा ). त्यांच्या गळ्याला आणि बुध्दीला काहीच अशक्य नाही व ते आलापाचारी आणि तानेमधून दिसतेच. गाण्यासारखे पुष्कळ काही असते, पण त्या सगळ्याचा समावेश आपल्या बैठकींत गायकाला कलात्मक दृष्ट्या करता येईलच असे नाही आणि याचा विचार मोठे गायक करतातच. पण ताई तो अधिक सूक्ष्म स्तरावर करतात असं वाटतं. विलंबितनंतर ताईंनी आद्ध्या तीन तालातील 'कवन बटरिया …' हि अल्हैय्यामधील  त्यांची लाडकी द्रुत बंदिश पेश केली. ‘सम्प्रदाय’ या प्रसिद्ध आल्बममुळे अल्हैय्या बिलावलदर्शन रसिकांना त्यांच्याकडून झालेच होते. काही मोठे कलाकार एखादा राग घेवून ‘रागदर्शन’ असा स्वतंत्र कार्यक्रम किंवा प्रयोग ( उदा.  मल्हारदर्शन वगैरे ) करून त्याच रागतल्या १०-१२ बंदिशी सादर करतात. यासाठी फारसे कष्ट पडतात असे मला वाटत नाही. आजकाल नवशिके गायक सुद्धा एका रागातील  ४-५ बंदिशी सलगपणे सादर करतात . त्याने काय रागाचे दर्शन होते का ?? ताईंनी मात्र कुठलाही अविर्भाव न आणता किंवा असा कुठलाही ‘स्टंट’ न करता आतापर्यंत अनेक रागांचे यथार्थ दर्शन विस्तृतपणे गाऊन रसिकांना घडवले आहे (ज्यामुळे रागाची व्यापकता आणि सौंदर्य समजते). सगळ्या बाजूंनी रागाचे असे दर्शन घडवायला मात्र खूप तपस्चर्या लागते. असेच हुसेनीचे आणि यमनी बिलावलचे दर्शन आज ताईंनी सर्व श्रोतृवृन्दाला घडविले.  पुन्हा एकदा तानांची बरसात ( आतषबाजी नव्हे.. ) झाली. ताईंसारखी अवरोही तान येण्यासाठी एखाद्या गायकाला एक जन्म देखील अपुरा पडेल. बिलावल संपला आणि ढग फुटून पाउस पडतो तशा सभागृहांत टाळ्या कोसळल्या व या अभूतपूर्व मैफिलीची सांगता झाली. 

इतक्या उंचीवर गाणे चालू असतांना साथीदारांची कसोटीच असते. असे असले तरी मागे तानपुऱ्यावर साथ करणाऱ्या कु. तेजश्री आमोणकर (ताईंची नात) आणि सौ. नंदिनी बेडेकर या दोघींनीही हे शिवधनुष्य उत्तमपणे पेलले. चालू असलेला रंग न बदलू देता योग्य ठिकाणी आणि नेमके गाऊन त्यांनी ताईंना मध्ये मध्ये विश्रांती देखील दिली. श्री मिलिंद रायकर यांनीदेखील व्हायोलीनवर ताईंच्या हुसेनीचा लहेजा छान पकडला होता. श्री भरत कामत अतिशय यशस्वी तबलजी असून त्यांचा हातही गोड आहे. ताईंच्या बरोबर ठेका अत्यंत मुलायम तसेच आसपूर्ण असावा लागतो. हे काम तबलजी कामतांनी उत्तमपणे पार पाडले.   चिराग कोल्ह्टकरांची संवादिनी साथसंगत थोडी कमी ऐकू येत होती पण ती आसपूर्ण होती. ताईंचे गाणे वाजविताना  शब्द किंवा व्यंजने वाजविण्याची जरुरी नाही  हे त्यांना माहित असावे. असो ! बाकी उपस्थित श्रोत्यांच्या दृष्टीने कदाचित मैफिल संपली असेल, पण माझ्या दृष्टीने मात्र अजूनहि  काही बाकी होते… 

आज परमेश्वराने म्हणा किंवा माझ्या सद्गुरूने म्हणा, माझे भरपूर लाड पुरवायचे असे ठरवलेच होते. कारण या सगळ्या स्वर्गीय संगीतयोगानंतर मला ‘स्वप्नपूर्ती योग’ देखील होता. वरती लिहिल्याप्रमाणे मी सगळ्या घराण्यांचे शास्त्रीय संगीत गेल्या तीसेक वर्षांत भरपूर ऐकले आहे. कदाचित माझ्या कुंडलीतील विशेष ग्रहस्थितीमुळे मला संगीतांत रुची असणारे आणि त्यांत उत्तम व्यासंग करणारे मित्रमैत्रिणी लाभले आहेत. कुठेही काही छान ऐकले किंवा मिळाले तर लगेच ते माझ्यापर्यंत पोचते. मग तो भीमसेनजींचा जमलेला ‘शुध्द कल्याण’ असो, गजाननबुवांचे खाजगीतलं व्हायोलीनवादन असो किंवा अमिरखांसाहेबांचा लाइव्ह ‘बसंत बहार’ असो; अगदी वाट काढत माझ्यापर्यंत येतेच. त्यामुळे ऐकणे खूप झाले. माझा सोलो पेटीवादनाचा व्यासंग जोपासण्यासाठी मी अधाशासारखे पेटीवादन ऐकल्याचे मला आठवतंय. त्यांतच ८-१० वर्षे शास्त्रीय गाणे शिकण्याचासुध्दा पुढे योग आल्यामुळे मी शास्त्रीय गाणे अगदी मनापासून ऐकत आलोय. सुरवातीला नीटनेटके गायनवादन तर कधी सुरेल किंवा कधी नखऱ्याचे गाणेदेखील मला आवडायचे. मध्यंतरी पाचदहा वर्षे अमिरखांसाहेबांचे गूढ गाणे ऐकण्यात गेली. त्यांच्या गाण्यातील उपज, सरगम आणि त्यांची introvert गायकी अजूनही मला आवडते. अभिषेकीबुवां हे गाण्यातील माझे अजून एक मोठे श्रध्दास्थान !! त्यांच्या धीरगंभीर गाण्याचा माझ्यावर अगदी गहरा असर आहे. कुमारजींच्या ५-५ मिनिटांच्या ध्वनिफिती मनांत खळबळ उडवून जातात. कान्हेरेबुवाचं (माझे गुरुजी) तलम सोलो-हार्मोनिअमवादन मनाला मोरपंखी स्पर्श करून जातं आणि माझ्या पेटीतील फुंकर कायम ठेवतं ! काही दिवस उल्हास कशाळकरजींचे तालीमबद्ध, आक्रमक पण नीटनेटके ग्वाल्हेर आग्र्याचे गाणे मन उल्हसित करून गेले. अशा एक ना अनेक गाण्यांनी आणि वादनांनी माझे छोटेसे जीवन समृद्ध केले आहे. त्या दृष्टीने परमेश्वराचा मी अत्यंत ऋणी आहे. आता नवीन किंवा उदयोन्मुख गायक वादकांना मी कुतूहलाने ऐकतो. नवीन काही असेल तर अगदी कान देऊन ऐकतो. माझ्या अनेक आवडत्या गायक वादकांना मी ‘रोजची पूजाअर्चा’ करतात तसे श्रद्धेने ऐकतो. पण किशोरीताईंचं गाणं ऐकल्यावर मी थेट देवळाच्या गाभाऱ्यातच पोचतो. खरं म्हणजे ताईंचे गाणे मला खऱ्या अर्थी कळेपर्यंत माझी चाळीशी ओलांडली. पण त्यानंतर मात्र गेल्या १०-१२ वर्षांत या गाण्याने माझे संगीतजीवन अवघे व्यापून टाकले. सागरासारखा विस्तीर्ण अहिर भैरव, हिमनगासारखा उत्तरांगी केदार (चतर सुघर…), विलंबित तीन तालातील आसपूर्ण आणि लयदार बसंत बहार, मती गुंग करणारा मीरा मल्हार अशा असंख्य कलाकृतींनी किशोरीताईंनी माझ्या मनावर एक प्रकारची मोहिनीच घातली. विद्वत्ता, भाव, प्रतिभा आणि परिश्रम यांचा इतका सुरेल संगम मला कुठेही सापडला नाही. त्यांच्या गाण्यांत मला मंदिरातील मांगल्य, मीरेची कृष्णभक्ती, महासागराचे अथांगत्व आणि सरस्वतीचं तेज जाणवतं. त्यांचे गाणे ऐकल्यापासून मला अगदी जुन्या पिढीतले ऋषितुल्य  गायक-गायिका (जसे कै. भास्करबुवा बखले, उ. अल्लादियांखांसाहेब, गानतपस्विनी श्रीमती मोगुबाई कुर्डीकर ) यांचे गाणे ऐकता ‘न’ आल्याबद्दल मनाला लागलेली एक प्रकारची रुखरुख खूप कमी झाली. ताईंचे गाणे माझ्या अंत:करणांत चिरकाल टिकून राहणारे मला वाटते. कदाचित हा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग असेलही. पण माझ्या या मताशी मी अत्यंत प्रामाणिक आहे. या मैफिलीच्या निमित्ताने मला किशोरीताईंच्या गाण्यातील नेमके काय भावते हे मी वर अगदी पारदर्शीपणे लिहिले आहे. आणि मला खात्री आहे कि संगीतातील खऱ्या सुजाण रसिकांचे, मर्मज्ञांचे आणि कलाकारांचे मतदेखील यापेक्षा फारसे वेगळे नसावे.

ज्या व्यक्ती आणि त्यांचे काम किंवा कला मला आयुष्यांत वंदनीय वाटल्या, तिथे नेहमीच माझी मान झुकली आहे.  आज अशा या पूजनीय आणि सर्वव्यापी गानसरस्वतीचा “चरणस्पर्श” मला मैफिल संपल्यावर अगदी तीर्थप्रसादाप्रमाणे मिळाला आणि मी तो ‘स्वप्नवत’ वाटणारा क्षण विलक्षण उत्कटतेने अनुभवला. ताईंनी पाठीवर मायेने हात ठेवला आणि मी कृतार्थ झालो….!! हा 'क्षण’ म्हणजे माझ्या छोटयाश्या संगीत-व्यासंगातील किंवा वाटचालीतील 'एव्हरेस्ट' आहे असं मी मानतो.………!!      

**********************II हरि ॐ II**********************

Comments

  1. Simply great indepth analysis.This article itself is a guideline for upcoming & students & singers.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you much Shailesh !! Am very glad to read what you wrote...

      Delete
  2. लेख तेव्हाही वाचला होता ,आता परत उजळणी झाली असली तरीही अप्रतिम, परत परत वाचला तरी मन भरत नाहीये.विकासजी,या प्रकारचे यथार्थ वर्णन करून गायनाला,व गानसरस्वतीला योग्य न्याय देणे तुम्हालाच जमू शकते🙏धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार राधिकाजी, खूप धन्यवाद..!! तुमच्यासारख्या कलाकारांची पावती मिळाली, की लेखाचे सार्थक झाले असे वाटते.

      Delete
  3. विद्वत्ता, भाव, प्रतिभा आणि परिश्रम यांचा इतका सुरेल संगम मला कुठेही सापडला नाही.

    I think this sentence of yours aptly summarizes the brilliance of Kishoritai...

    तुम्ही केलेले रसग्रहण वेगळयाच उंचीचे, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक आहे.

    Simply great!

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सारंग,
      खऱ्या अर्थाने माझा लेख तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचला, हे वाचून खूप आनंद झाला. एव्हढा मोठा लेख तू वेळात वेळ काढून अनुरूप प्रतिक्रिया दिलीस, त्याबद्दल तुझे खूप आभार..🙏🙏

      Delete

Post a Comment