Skip to main content

बटाटे वडा

 


बटाटे वडा                                                                      

स्सल मराठी रसिक खवय्याला खाताना बेभान करणारे 'बटाटे वडा' हे खाद्य किती जुनं आहे, ह्याचा तपशील माझ्याकडे नाही. पण माझ्या नाबाद ६४ वर्षांच्या इनिंग मधली निदान ५० वर्षे तरी ह्या खाद्याने मला खाण्यातला कदाचित क्षणिक पण स्वर्गीय आनंद दिलाय. असे म्हणतात कि दादरच्या अशोक वैद्य यांनी १९६६ साली दादर स्टेशनच्या बाहेर पहिला वडा पावचा स्टॉल टाकला होता. खरं म्हणजे हा वडा पाव आणि मिसळ पाव ह्या दोन गोष्टी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरु झाल्या होत्या. पण आमच्यासारख्या पांढरपेशा वर्गाने त्यावरही यथेच्छ ताव मारून त्यांचे भाव वाढवले आणि मूळ उद्देश नाहीसा झाला.

१९७०च्या सुमारास आम्ही गिरगांवात असताना आमच्या लहानपणी माझी आई कधीतरी बाहेरून येताना बाहेरून आम्हां सर्वांसाठी बटाटेवडा आणीत असे. (माझी आई तेव्हा क्लासला जाऊन external SSC करत होती. त्यामुळे घरातील मुलांना येताना काही ना काही खाऊ आणायचीच). वर्तमानपत्रात गुंडाळलेले साताठ घरगुती वडे आणि लसणीची चटणी असे पार्सल घेऊन आई आमच्या छोट्याश्या घरात शिरली कि लगेच घमघमाट यायचा नुसता. लगेचच आम्ही भावंडे तिच्या पिशवीचा ताबा घ्यायचो. मग अवघा आनंदी आनंद असे. आम्ही ह्या वड्याचे नामकरण 'रहाळकरणीचा वडा' असे केले होते. बरेच दिवसपर्यंत मी रहाळकरबाईंना पहिले देखील नव्हते. कारण ही डिश आमच्याकडे उठसुठ न आणता 'पर्वणी' म्हणूनच येत असे.  मग एके दिवशी आईबरोबर मी असताना त्यांचे दर्शन झाले. ठाकूरद्वार नाक्यावरून पालशेतकर सोनारांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ह्या बाईंचे मुख्यत्वेकरून कांदे बटाटे रताळी अळू , अळकुड्या विकण्याचे प्रशस्थ दुकान होते. अशा जमिनीच्या खालून वर येणाऱ्या भाज्यांच्या दुकानात वरून स्वर्गातून खाली पृथ्वीवर अवतरलेले 'बटाटेवडा'  हे 'खाद्य मिळत असे. अर्थातच हा जोड-धंदा होता आणि तोही मार्केटिंग वाल्यांच्या भाषेत सांगायचं तर व्हॅल्यू ऍडेड, निष प्रॉडक्ट .... आणि  तेही फॉरवर्ड ईंटीग्रेशन करून !!😆 ह्या चाळीशीत असलेल्या बाई त्या काळातही  एकट्या हा बिझिनेस करीत असत ( म्हणजे पराक्रमीच बाईं होती ही !!). पदार्थाच्या नाविन्यामुळे आम्हाला तिच्याकडचे वडे अगदी चवदार लागत.  तिच्या हाताला उत्तम चव देखील असावी.  बाहेरील प्रशस्थ दुकान आणि आतल्या बाजूस असलेला तिचा छोटेखानी भटारखाना ह्यामध्ये एक दरवाजा, असे नेपथ्य होते . ह्या दरवाज्याच्या उंबऱ्यातच बसून ह्या बाई आलेले भाजीचे गिऱ्हाईक आणि एकीकडे आमच्यासारखे आलेले बटाटेवड्यांचे क्लायंटहि सांभाळत. असो... तर माझ्या बटाटेवड्याच्या चोचल्याचा उगम हा असा गिरगावातील आहे. पण नंतर नंतर आई घरीच बटाटेवडे करीत असे (बहुदा बाबांच्या सांगण्यावरून असेल). ती अन्नपूर्णा असल्यामुळे वडे चविष्ट बनवत असे, ह्यात वाद नाही. पण बाहेरच्या वड्यासारखी किक मात्र येत नसे. 'बटाटेवडा' हा आमच्या संगीताच्या भाषेत सांगायचं तर उत्तरांगीप्रधान राग आहे. उत्तरांगीप्रधान 'सोहोनी' राग पुरियासारखा मंद्र सप्तकात गायला तर त्याची लिज्जत रहात नाही. त्यासाठी सारखा वरचा 'षड्ज' लागलाच पाहिजे  ( म्हणजे मिरचीचा झटका !! ). हे तामसी खाणे आहे असे अध्यत्मातले लोक म्हणतात, ते काही उगीच नाही. 

त्यानंतर आम्ही गिरगावातून ठाण्यात राहायला आलो आणि माझी भेट आत्ता TJSB आहे ना, तिथल्या गजानन वडापाववाल्याशी पडली. ती देखील माझ्या अकराव्वी बारावीतल्या मित्रांबरोबर!! मित्रांबरोबर वडापाव खाण्यातली गोडी ज्याची तोच जाणे. आम्हाला मिळणाऱ्या पॉकेटमनीमध्ये १५ पैशांचा वडापाव सहज यायचा. ह्या साक्षात गजाननाने भक्ताला दाखवलेला 'नैवेद्य' प्राशन करायचा आणि तेव्हढ्या इंधनावर आम्ही सगळे तलावपाळीला चार  

पाच चकरा सहज लावायचो. दुर्दैवाने एके दिवशी तिथून 'गजानन' हलला आणि आम्ही सगळे 'आतून' हललो. त्यानंतर काही महिने विसर्जन केल्यासारखा हा 'गजानन' भूमिगत होता. आता ह्या गजाननाची प्रतिष्ठापना नव्याने विष्णूनगरमध्ये झाली आणि हां हां म्हणता त्याने पूर्वीसारखा जम बसवला. पूर्वी नुसतीच लसणाच्या चटणीची भुकटी देणाऱ्या ह्या महाभागाने आता स्पेशल पिवळ्या ओल्या चटणीची रेसिपी बनवली, जी आजतागायत कुठल्याही गृहिणीला बनवता आलेली नाही. अर्थात ही ओली चटणी घेण्यासाठी वर्तमानपत्रांच्या ऐवजी विशिष्ट प्रकारचे द्रोण आले. माझ्या मते त्याने वड्याचीही रेसिपी बदलली होती. पूर्वीसारखा तांबूस रंगाचा वडा न देता आता वड्यालाही 'पिवळा' रंग आला. वड्याबरोबर अतरंगी लोकांसाठी  'होश' उडवणारा हिरव्या मिरचीचा ठेचाही तो देऊ लागला. हे बेमालूम कॉम्बिनेशन गजाननवाला निदान २५-३० वर्षे तरी सहज विकतोय. विष्णुनगरमध्ये ट्राफिक जॅम करू शकेल इतकी वड्यातील दर्दी लोकांची गर्दी हे दुकान जमवते. त्याला ठाणेकरांची  'नाडीपरीक्षा' उत्तम झाली होती, हेच खरे !!

विष्णूनगर - घंटाळी परिसरातले वड्याचे दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजे 'श्रद्धा वडापाव' !! काय असेल ते असो, पण गजाननच्या तुलनेत श्रद्धाचा वडापाव मला चटक लावणारा मुळीच वाटत नाही. पण 'बायको' माझ्याबरोबर असताना प्रचंड खरेदीनंतर ( म्हणजे 'साडी' हे वेगळे सांगायला पाहिजे का..??) राम मारुती रोडच्या गर्दीतून वाट काढून त्रासलेल्या नवऱ्यांसाठी हा जॉईंट 'विरंगुळा' म्हणून नक्की छान आहे, असे मत इथे नोंदवण्याचे धाडस मी करतो. कॉलेजमध्ये गेल्यावर आणखी एका 'वडा रेसिपी'ने आम्हाला वेड लावले होते. तो म्हणजे 'कुंजविहार'चा वडा !! हॉटेलची स्वच्छता बाहेरून बघून जे हॉटेलात जातात, त्यांना ह्या वड्याची मजा कळणार नाही . (घरंदाज गायकी गर्वाने ऐकणाऱ्या लोकांना गजल कशाशी खातात ते कळत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे). स्टेशनच्या समोर असलेल्या ह्या हॉटेलने मुंबई लोकलच्या तीन गुणांशी इमान राखलंय. १. गर्दी : कायम गर्दी असलेलं हे हॉटेल आहे. त्याचे मुख्य कारण इथे मिळणारा स्पेशल 'वडा' हे आहे. २. तुम्ही ह्या हाटेलात शिरल्यावर जागा मिळणे, हे लोकलमध्ये बसायला जागा मिळण्याइतकेच दुरापास्त असते. त्यामुळे बसलेल्या लोकांना "सरकून घ्या" असे सांगून, चौथ्या सीटवर बसून वडा खाण्याची तयारी हवी. हे व्हाईट कॉलरवाल्यांचे काम निश्चितपणे नाही.(मी कधी गेलोच तर मुद्दाम निळा शर्ट घालून जातो)😅.  ३. ह्याचे मेनूकार्ड लोकलवर स्टेन्सिल करून लावलेल्या कर्जत, अंबरनाथ लोकल्सच्या जीर्ण पिवळ्या बोर्डसारखे आहे. इथे पाव ही गोष्ट वड्याबरोबर नाही, तर मिसळीबरोबर जास्त चालते. इथे जास्त कौतुक आहे ते वड्याबरोबर बशीतून किंवा प्लेटमधून येणाऱ्या चिंच-गुळाच्या चटणीचे !!  वड्याचा निदान ४० टक्के भाग जर ह्या चटणीत बुडालेला नसेल, तर तुम्हाला इथल्या वड्याची लिज्जतच कळणार नाही. हा 'बसंत-बहार' सारखा जोड राग आहे. इथे वड्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आता हे करोना प्रकरण संपल्यावर एकदा त्याचा जम्बो वडापाव खायचाय....खूप जाहिरात करतोय लेकाचा !!  अजूनही ३-४  बटाटेवड्यांचे चांगले जॉईंट्स आहेत ठाण्यात. उदा. गोखले स्नॅक्स,  कुलकर्णी वडासम्राट, राजमाता वडा पाव , दुर्गा स्नॅक्स , वगैरे. आमच्या गिरगावातल्या रहाळकरींण  बाईंसारखा अगदी घरघुती वडा खायचा असेल, तर तुम्ही ए. के. जोशी हायस्कुलच्या गल्लीत शिरा. तिथे जोशी बाई नावाच्या सत्शील गृहिणी गाडीवरती  स्वच्छ सामुग्री वापरून घरच्यासारखे वडे बनवतात. ह्यामध्ये सोडा नसतो हे विशेष नमूद करावे लागेल. फक्त चितळ्यांच्या दुकानासारखे इतरांची तंद्री लागलेली पहात ५ मिनिटे थांबावे लागेल😆.Good things take time...you see !!

आता जरा मुंबई-पुण्याकडे वळूयात.  छबिलदासचा वडा दादरमध्ये शोभून दिसतोपण तो  कधी चुकून ठाण्यात आलातर त्याला न्यूनगंड येईल. तुम्ही नंतर मसाला दूध किंवा पियुष मागवणार असाल, तर दादरच्या पणशीकरकडे त्यांचा सात्विक बटाटेवडा जरूर आधी खायला हरकत नाही. चांगले कॉम्बिनेशन आहे. शिवाय आमचे आणि पणशीकरांचे पेढे, मसाला दूध, दुधी हलवा आणि पियुष ह्या विशेष गोष्टींमुळे खूप जुने संबंध आहेत. अगदी अलीकडच्या काळात मी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये एका कार्यक्रमाच्या मध्यंतरांत 'मयुरेश केटरर'चा बटाटेवडा खाल्ला तो खरोखरंच वाखाणण्यासारखा होता. कर्जतचा वडा चांगला का लागतो ह्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे कल्याण सोडल्यावर प्रवाश्यांना गाडी थांबून जीवसृष्टी बघायला मिळते ती एकदम कर्जतला. ( सॉरी, 'नेरळ' हे दिवाळीतल्या भाकड दिवसासारखे 'भाकड स्टेशन आहे असे  मी मानतो. ज्यांची इथे फार्म हाऊसेस आहेत त्यांनी मला क्षमा करावी ). शिवाय कल्याण-कर्जत ह्या ४५ मिनिटांच्या प्रवासात आपल्या बाजूला बसलेले प्रवाशी आपल्याला विविध तऱ्हेने किती त्रास देतातायत, गॅंगवेमध्ये किती लोक उभे राहतायत, आपल्याला नको असेल तरी पुढचे लोक खिडकीची काच वर करतायत किंवा नाही,  एकाच फॅमिलीतले ४-५ लोक घरी असल्यासारखे किती पटर पटर करतायत ह्या सगळ्याचा अंदाज कर्जत येईपर्यंत आपल्याला येतो. ह्यातील कुठल्याही एका संकटावर आपण कर्जतचा वडा खाऊन मात करू शकतो. थंडी असेल तर हा वडा जास्त खपतो. बटाटेवड्याची आपल्याला लागणारी चव ही स्थळ-काळ-वेळ- कंपनी ह्यावर अवलंबून असते.  मुंबई-पुणे प्रवासात लागणारा दत्तवडा मला बरोबर रसिक कंपनी असेल, तरच आवडतो. कल्याणच्या मंडळींना फक्त 'खिडकीवडा'च जर आवडत असेल, तर 'देव त्यांचे कल्याण करो' एव्हढेच मी म्हणेन.  तुमचे अगदीच ग्रह फिरले असतील, तर तुम्हाला उडप्याकडे जाऊन बटाटेवडा खावा लागेल. मुंबईत मी ही चूक करत नाही. पण कर्नाटकात गेलो कि सांबारचा नॉशिया घालवण्यासाठी आलू बोन्डा नावाचा विपरीत पदार्थ मी कधीतरी ऑर्डर करतो. आमच्याकडे आळशी माणसाला आळसबोन्डा का म्हणतात ते त्यामुळे कळलं. आलू बोन्डाबरोबर सांबार देणे हा बटाटेवड्याचा अपमान समजतो मी. असो !! वडापाव ह्या डिशला बाँबे बर्गर असं म्हणून काही आचरट 'पाववाल्या' लोकांनी हेवा वाटून सूड उगवलाय असं मला वाटते.  पुण्यात जोशी वडेवाल्यांनी जागोजागी स्टॉल उघडलेत. पण त्यांच्या बटाटेवड्यावर पुणेकर खुश आहेत कि नाही, हे अजून अधिकृतपणे कळलेले नाही. अजून तरी ह्याला कुणी "जगात भारी" असं म्हटल्याचं ऐकिवात नाही. त्यातल्या त्यात पुण्यामध्ये बटाटेवडा खाण्याची वेळ माझ्यावर आलीच, तर मी टिळक रोडवरच्या बादशाही मध्ये जाईन. बाहेरचे आवरण केवळ आतील सारणाच्या लज्जारक्षणापुरते ठेवून केलेल्या ह्या बटाटेवड्याची चव आगळीवेगळी आहे. ह्याला मी सात्विक वडा म्हणतो. 'चटणी' म्हणून ताकात कालवलेला ठेचा दिला जातो इथे. अत्यंत निर्विकारपणे सर्विंग केले जाईल इथे. "खायचे असले तर खा, नाहीतर पळा" हा इथला पुणेरी खाक्या !!( ... 'फुटा' असे सौजन्याने म्हटलेले नाही). मी आत्तापर्यंत शेकडो ठिकाणी 'बटाटेवडा' हाणलाय. त्यामुळे माझी वड्याची 'चव' आता समृद्ध झालेय. ह्या अनुभवावर गीतेशप्पथ पण गर्वाने मी सांगू शकतो कि "बटाटेवड्याची हेडक्वार्टर ही आणखी कुणीकडे नसून  ठाण्यातच आहे आणि आमची कोठेही शाखा नाही" !!😅


Comments