Skip to main content

बरसन लागी रे...!!

 


 बरसन लागी रे...!! 

मला शास्त्रीय संगीताची खरी आवड १९८० साली लागली असे म्हणता येईल. आणि प्रगतीही झपाट्याने झाली. आमच्या इन्स्टिटयूटमध्ये कल्चरल ट्रॉफीसाठी होणाऱ्या स्पर्धांमध्ये मला वाद्यवादन  स्पर्धेत १९८१, ८२, ८३, ही सलग ३ वर्षे मला प्रथम पारितोषिक होते.  शास्त्रीय संगीत फार काही जाणकारीने नाही, तरी जाणीवपूर्वक ऐकता येऊ लागले. त्यामुळे सुरवातीच्या काळात प्रत्यक्ष ऐकलेल्या उत्तम कलाकारांच्या मैफिलीतील असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, कि आजही ते स्मरणरंजनाचा आनंद देतील. किशोरीताईंचा हुसैनी तोडी व मीरा मल्हार,  संगीत मार्तंड जसराजजींचे गोरख कल्याण व जोग राग (१९९२-IIT), अभिषेकी बुवांचा धीरगंभीर जोगकौन्स ( १९८० ठाणे), भीमसेनजींचा सवाईला गायलेला भारदस्त रामकली (१९८२), वसंतरावांचा 'छेडो ना छेडो' वाला खेळकर बिहाग ( गडकरी, ठाणे), परवीन सुलतानाचा आसदार गुजरी तोडी ( सवाई , १९९२), मालिनीताईंचा मारवा ( ठाणे ), बिरजू महाराज -झाकीर अभूतपूर्व जुगलबंदी ( १९८१- IIT ), उल्हास कशाळकरांचा बसंत बहार ( २००१, ठाणे ) गंगुबाईंचा अवाढव्य पुरिया धनाश्री ( २००० औंध), उशिरा आलेल्या  शाहेदभाईंचा जमलेला श्याम कल्याण (२००१ ठाणे), पं. चिमोटे यांचा संवादिनीवरील लाजबाब बिहाग ( १९९०-छबिलदास) आणि अलीकडेच निवर्तलेल्या डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांची मल्हार मैफिल अशा एक ना अनेक मैफिली डोक्यात अक्षरशः कोरलेल्या आहेत.  ह्यापैकी एका अविस्मरणीय मैफिली विषयी मी थोडंसं विस्ताराने लिहिणार आहे. 

मला वाटतं १९८१ची गोष्ट असेल. त्या काळी आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आणि नुकतेच रिटायर झालेले माझे माननीय मित्र (निवृत्तएअर मार्शल श्री अरुण गरुड (प्रभाकर) तेव्हा फ्लाईट लेफ्टनंट वगैरे असावेत. मी वीसेक वर्षांचा असेन आणि IIT त शिकत होतो. एकदा  प्रभाकर सुट्टीवर आले असताना ते मला पार्ले टिळक विद्यालयात असलेल्या एका पावसाळी मैफिलीला आवर्जून घेऊन गेले होते. मैफिल होती श्रीमती प्रभाताई अत्रे यांची !! प्रभाताईंचं कलावतीमधलं 'तन मन धन तोपे वारु' अजूनही रसिकांच्या मनात पिंगा घालत होतं. त्यामुळे अर्थातच शाळेचे प्रेक्षागृह खचाखच भरले होते. बाहेर पाऊस 'मी' म्हणत
होता. आम्ही दोघं ( देवाचे नाव घेऊन) आपापल्या ओल्या छत्र्या बाहेरच्या बालदीत ठेवून कसेबसे हॉलमध्ये शिरलो. पार्लेकर आणि मुंबईकरांच्या रसिकत्वाचा दरवळ प्रेक्षागृहात भरून राहिला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्कंठतेचं तेज आणि चातकाची तृष्णा दाटलेली स्पष्ट दिसत होती.  आणि एव्हढ्यात जणू सोज्वळतेचे प्रतीक असलेल्या प्रभाताईंचे सुभग दर्शन झाले. साक्षात हातात वीणा घेतलेली शारदादेवीच !! हाफ व्हाईट साडी आणि वीतभर 'मरून' रंगाच्या काठांची त्यांनी परिधान केलेली खानदानी साडी ही जणू त्यांच्या गायनशैलीचे प्रतीक असावी असेच आजपर्यंत वाटत आले आहे मला. प्रभाताईंच्या गाण्यात कधीही कुठलाही क्षुद्रालंकार किंवा उच्छृंखलपणा मी आजतगायत ऐकलेला नाही. त्यांचं गाणं अविकारी, अविचल आहे !! त्यांचं गाणं गुहागरसारख्या एखाद्या हिरव्यागर्द टुमदार गावातून शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखं आहे, जिच्या काठावर जाऊन तृषित गानरसिकांनी ओंजळीने गाणं प्यावं तसं !! 

वर्षा ऋतूमुळे प्रभाताईं आज फक्त वेगवेगळे मल्हार गाणार होत्या. सुरुवात मिया मल्हारने झाली. नंतर त्या गौड मल्हार आणि शेवटी सूर मल्हार गायल्या. मागोमाग असे ३ मोट्ठे मल्हार गाणे किती अवघड आहे हे इतके वर्षांच्या व्यासंगामुळे मला आता कळते आहे. मिया मल्हारमध्ये कोमल गंधार, अल्प धैवत ; तर गौड मल्हारात शुद्ध गंधार, वक्री धैवत आणि सूरमल्हारमध्ये तर धैवताचे अनन्यसाधारण स्थान /महत्व हे लागोपाठ भान ठेऊन गायचे आणि शिवाय रंग जमवायचा म्हणजे अवघडच. गायकाच्या तन्मयतेची कसोटीच ती ! मैफिलीमध्ये जमीन बनविण्यासाठी मिया मल्हारसारखा राग नाही. पहिल्या षड्जानंतर येणारी नि ध नी सा ही मींडयुक्त स्वराकृती गायकाला आणि श्रोत्यांना आपोआप अंतर्मुख बनवते. प्रभाताईंचा मंद्रातला निकोप पंचम लागला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्याचा फील आला. बाकीबा म्हणतात तसे 'जलद भरुनी आले' पण अंमळ जड पावलांनी. मिया मल्हारांतील आंदोलनयुक्त कोमल गंधार जणू पावसाच्या लहरी स्वभावाचा प्रत्यय देतो. एकदा पडू लागला कि थांबेल तर तो पाऊस कसला. ताईंचा मिया मल्हार असा काही रंगला, कि देहभान हरपले. काहीतरी विलक्षण आणि हवंहवंसं वाटणारं आपण ऐकतोय हे जाणवत होतं. पूर्वपुण्याईच पाहिजे हे मिळायला. ताईंनी 'बरसन लागी रे' ही द्रुत एकतालातील बंदिश सुरु करून पावसाच्या आगमनावर जणू शिक्कामोर्तब केले. गौड मल्हार म्हणजे मुंबईचा पाऊस; एकदा सुरु झाला कि छत्री आणि रेनकोटचे देखील काही चालत नाही. ठहराव म्हणून कुठे नाहीच. हा गौड मल्हार म्हणजे icing on cake होता.  बाहेर पाऊस धो धो पडत होता आणि इथे गोड गळ्याच्या प्रभाताईंनी अशी काही मैफिल जमवली होती, कि जणू काही हा पाऊस त्या मैफिलीचा अविभाज्य भाग बनलेला होता (Unity कि काहीतरी म्हणतात ना तसं !!).  साडेतीन तास त्यांनी श्रोत्यांवर अक्षरशः सुरांची बरसात केली. साथसंगत होती अनंत राणे आणि दीपक नेरुरकर यांची !! मैफिल संपली तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. 

मनावर 'स्वरांचं ओलेपण' आणि कपड्यांवर 'पावसाचं ओलेपण' अशा अलौकिक अवस्थेत आम्ही पार्ल्यातीलच एका रेस्टॉरंटवर पोहोचलो.  प्रभाकर मला छान हॉटेलात जेवणासाठी घेऊन आले होते. तिथे जेवताना जे काही 'टोमॅटो सूप' आम्ही प्यायलो, तसे सूप मी नंतर कधीही प्यायल्याने मला स्मरत नाही. (कदाचित त्या दिवशी गाण्यापासून खाण्यापर्यंत सगळंच मंतरलेलं असावं !!). तेव्हापासून मैफिलीत कुठल्याही गवयाने मल्हार गायला कि मला प्रत्येक वेळी ह्या मैफिलीची आठवण होतेच होते. एव्हढेच काय, त्यानंतर मी कितीतरी मल्हार ऐकले, पण आजही मी जेव्हा मैफिलीत मिया मल्हार संवादिनीवर वाजवतो तेव्हा प्रभाताईंचीच 'बरसन लागी रे ' ही द्रुत बंदिशच वाजवणं पसंद करतो आणि प्रभाताईंच्या ह्या अविस्मरणीय मैफिलीचा स्मरणरंजनाचा आनंद घेतो. ( Ref: Raaga Miyan Ki Malhar- Part 2). 

अशी अविस्मरणीय मैफिल मला दिल्याबद्दल एअर मार्शल गरुड यांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच !!🙏🙏

लेखक : विकास कात्रे 
मोबाईल - ९८३३६१०८७५

Comments