If someone asks me what is one of the most beautiful things which happened to me during 2025-26, my immediate answer would be 'Chikitsak 76 batch Golden Jubilee Re-union !! म्हणजे फक्त ७ फेब्रुवारीचा दिवस नाही; तर ६ महिन्यांपूर्वी ज्या दिवशी अवधूत गोखलेने मला फोन करून ग्रुपमध्ये ॲड केले, त्या दिवसापासून ....म्हणजे ५ ऑगस्ट २०२५ पासून ते अगदी आजपर्यंत........
----------------------------------------------------------------------------------------
त्याचं असं झालं....
मी पाचवी ते नववी चिकित्सकमध्ये होतो. आठवीपर्यंत 'ड' तुकडीत, तर नववीमध्ये 'क' तुकडीत. ९वी झाल्यावर मात्र आम्ही गिरगांव सोडून ठाण्यात राहायला आलो. त्यामुळे १०वी चा योग ठाण्यातला होता. त्यावेळी जनसंपर्काची साधने आत्तासारखी नव्हती. त्यामुळे ९ वी नंतर शाळेशी, गिरगावशी, आणि शालेय मित्रांशी संपर्क तुटल्यासारखाच झाला. नाही म्हणायला नंतर सर्जन झालेला स्व. डॉ. सुनील नलावडे, यश ज्वेलर्सचा मालक(आणि मॅरेथॉन बॉय...) उदय पोवळे हे एकेकाळचे मित्र पुन्हा माझ्या संपर्कात आले. पण त्यामुळे चिकित्सकच्या आठवणी थोड्याफार चाळविण्यापलीकडे फार काही घडलं नाही. (इंजिनीअरिंगच्या काळात नाबर सरांची मात्र अचानक भेट झाली. कारण त्यांचा मुलगा संतोष माझा IIT मधील खास मित्र!! त्यामुळे सरांच्या माहिमच्या घरी आणि न्यू जर्सीतील संतोषच्या घरी मी अगदी राहून देखील आलोय).
वर म्हटल्याप्रमाणे गेली काही वर्षे मी उदय पोवळेच्या बऱ्यापैकी टचमध्ये आहे. वास्तविक उदयच्या आणि माझ्या आवडीनिवडींमध्ये खूप फरक आहे. उदा. मॅरेथॉन शर्यत मी फक्त रिक्षेतून बघतो (किंवा वॉकला जाताना मी शॉर्ट कट शोधतो), तसेच दागिन्यांचे दुकान बघितले की मी रस्ता क्रॉस करतो, किंवा बियरच्या नुसत्या वासाने सुद्धा मला झिंग येते. तसं असलं तरी १ ली ते ४ थी झावबावडीतील शिशुविहारमधील सहअध्ययन, आमच्या दोघांच्या वागण्याबोलण्यातील एकंदर मोकळेपणा आणि आम्हाला असलेली लेखनाची आवड एव्हढ्या भांडवलावर आमची मैत्री आजही नीट उभी आहे. ५ ऑगस्ट २०२५ रोजी उदयने माझा नंबर/ नाव अवधूतला दिला. ७६ च्या बॅचच्या होऊ घातलेल्या सुवर्णमहोत्सवाची संकल्पना माझ्यापर्यंत पोचली ......आणि माझ्या अंगावरून एक अदृश्य मोरपिस फिरले. बकेट लिस्टमध्ये न लिहिताच मनात दबा धरून बसलेली केव्हापासूनची माझी इच्छा पूर्ण होणार होती. अवधूतने पहिल्याच फोनमध्ये मला जिंकले; ते त्याच्या बोलण्याच्या अनौपचारिक शैलीमुळे आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे. इतक्या वर्षांनी ५० वर्षांपूर्वीचे मित्र भेटणार ह्या कल्पनेनेच मी भारावून गेलो होतो. पण त्याचबरोबर ह्या माणसापुढे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान आहे, हे देखील जाणवले. (कारण २०१४ ते २०१९ या दरम्यान मी संगीतातील ८०-९० कलाकारांचा असाच एक ग्रुप ४ -५ वर्षे चालविला होता, त्यामुळे त्यातील खाचखळगे, ups/downs, कुरबुरी मी अनुभवले होते). पण अवधूतच्या बोलण्यात निश्चय जाणवला आणि त्याचा हा बेत तडीला जाईल असं वाटलं. जसजसे एकेक विद्यार्थी- विद्यार्थिनी ग्रुपमध्ये add होत गेले, तसा तसा पुनर्भेटीचा आनंद वृद्धिंगत होऊ लागला. (Happiness is along the journey म्हणजे तरी दुसरे काय वेगळं असतं ??) हळूहळू प्रत्येकाची नव्याने ओळख होऊ लागली. जुन्या खुणा पटू लागल्या. धैर्यशील सूर्यवंशीला तर त्यावेळी तो डब्यात काय आणायचा, हे देखील मी फोनवर सांगितले. ८-१० दिवसात माझे १५-२० जणांशी दीर्घ फोन झाले, त्यामध्ये ५० वर्षात पुलाखालून किती पाणी गेले आहे हे समजले. त्यात career achievents पेक्षा सुद्धा एका अनामिक औत्सुक्याचे शमन, शाळेविषयी आत्मियता, गिरगांवची अस्मिता आणि पुनर्भेटीचा आनंद अशा संमिश्र भावना होत्या.
जवळ जवळ महिनाभर असे फोन चालू होते. कधी अवधूत, कधी राजीव, कधी उदय,तर कधी गिरीश एकबोटे. एकदा माझी पत्नी आश्चर्याने म्हणाली सुद्धा की " विकास, तुला एव्हढे कसले फोन येतात रे हल्ली..??" (तिचा हा प्रश्न तिच्या 'चिकित्सक' वृत्तीला साजेसाच होता म्हणा..
). हा हा म्हणता ८० - ९० सहाध्यायींच्या ह्या छान ग्रुपमध्ये मी मिसळून गेलो. थोडीशी मला खट्टू करणारी गोष्ट म्हणजे, माझ्या 'ड' तुकडीतील फक्त तीन जण ह्या रीयुनियनच्या गळाला लागले. मुली तर कुठे कडेकपारीत दडून बसल्यात देव जाणे. मुलींची लग्न झाल्यावर आडनावे बदल्यामुळे trace करणे आणखी अवघड होऊन बसते. असो.!!
). हा हा म्हणता ८० - ९० सहाध्यायींच्या ह्या छान ग्रुपमध्ये मी मिसळून गेलो. थोडीशी मला खट्टू करणारी गोष्ट म्हणजे, माझ्या 'ड' तुकडीतील फक्त तीन जण ह्या रीयुनियनच्या गळाला लागले. मुली तर कुठे कडेकपारीत दडून बसल्यात देव जाणे. मुलींची लग्न झाल्यावर आडनावे बदल्यामुळे trace करणे आणखी अवघड होऊन बसते. असो.!!WA वर सगळ्यात उत्साही म्हणजे विद्या गाळवणकर , विजय नायगावकर , सुरेश जोशी, उदय पोवळे, राजन मुरांजन, कुमार गोखले , नितीन आंबर्डेकर , अविनाश पाठक, विनायक जोशी , उद्देश वैद्य, अवधूत गोखले , अनुराधा आंबेकर ! ह्या सर्वांचे ग्रुप बांधणीतील योगदान खूप मोठे आहे. पोस्ट करण्यात मी दुसऱ्या फळीत होतो; पण जे काही चालले होते त्यात रमलो होतो हे नक्की. निदान पंचवीसएक जण तरी काहीना काही लिहित होते. एक ग्रुप टिकून राहायला एव्हढे खतपाणी पुरेसे होते. कुणी स्पष्टवक्ते, कुणी माहितगार, कुणी बोधप्रद लिहिणारा, कुणी कवयित्री, कुणी चिमटे काढणारा, कुणी मोट बांधणारा, कुणी समीक्षात्मक लिहिणारा, कुणी गाणे म्हणणारा, तर कुणी गाणे म्हणून हसवणारा, असे एक ना अनेक प्रकार. पण यामुळे आपला ग्रुप बोलत राहिला. ( गमतीचा भाग म्हणजे हे चालू असताना पन्नासएक जण पॅव्हेलियनमध्ये बसून नुसतीच मजा बघत होते. हे ग्रुपवर असून अलिप्त राहणं कसं काय जमतं हे लोकांना, देवच जाणे. बहुधा ही अध्यात्माकडे यशस्वी वाटचाल असावी). म्हणता म्हणता अवधूतच्या नेतृत्वाखाली कमिटी तयार झाली, गिरगावात बैठका झडू लागल्या आणि ७ फेब्रुवारीचा कार्यक्रम सर्वांच्याच मेंदूत आकार घेऊ लागला. २०२५ चे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे ३ महिने ग्रुपमध्ये घमासान पोस्ट्स आल्या. सर्वांनी स्वतःविषयी जमेल तितकी माहिती दिली. काही बँक एम्प्लॉयीज, काही यशस्वी उद्योजक, काही सरकारी ऑफिसमधील एम्प्लॉयीज, काही इंजिनियर्स, काही सीएज, काही डॉक्टर्स, कॉम्प्युटर इंजिनियर्स, काही अभिमान वाटावा असे समाजसेवक, काही कलाकार, कुणी सिनेमा शौकीन, पोलिस खात्यातील पदाधिकारी , काही परदेश स्थायिक असे जबरदस्त मिक्स ग्रुपमध्ये होते. असे 'अठरा पकड मिक्स' तुम्हाला सहसा इतरत्र मिळत नाही. (उदा. इंजिनियरिंग कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये हल्ली ७०-८० टक्के IT engineers असतात. ते सगळे एकसुरी बोलतात,असं माझं मत आहे ). अवधूत, सतीश सराफ, नितीन आंबर्डेकर, ज्योत्स्ना म्हात्रे, मोहन नारकर, विनायक जोशी, अविनाश पाठक , विनायक सहस्रबुद्धे , विद्या गाळवणकर ही सर्व नावे विश्वासार्हच होती. ह्या सगळ्याचे मला खूप अप्रूप वाटले. अमेरिकास्थित उदेश वैद्यने आलेल्या निवडक प्रोफाईलसचे एक सुंदर ई-बुक देखील बनवले. दर दिवशी ग्रुपच्या उत्साहात थोडी थोडी भरच पडत होती. (नाही म्हणायला अध्येमध्ये काही कारणावरून निवडक लोकांच्या किरकोळ शाब्दिक चकमकीही झाल्या; पण अपवादानेच. कुठल्याही ग्रुपमध्ये निर्वेधपणे वावरायला एक वेगळी प्रकृती किंवा temperament लागते. टोकाची भूमिका घेणाऱ्या hardliner लोकांना हे जमत नाही). पण सर्वांचा भाव निर्मळ असल्यामुळे आपला '७६ चा चिकित्सक ग्रुप' तुकारामाच्या गाथेसारखा 'तरला' असेच मी म्हणेन !
एकीकडे कमिटीचे काम व्यवस्थित चालू आहे याची सर्वांना खात्री व्हावी, यासाठी अवधूत अध्येमध्ये अगदी सामोश्यासहित मिटिंगचे फोटो टाकत असे. (मात्र ह्यातील कुठलीही मीटिंग आपण बसूयात... कॅटेगरीतील नव्हती
). २०२६चे वर्ष उजाडले आणि सर्वांचा काउंटडाउन सुरू झाला. कार्यक्रमासंबंधी अतिरिक्त गोपनीयता राखून कमिटीने सर्वांची उत्सुकता शिगेला पोचवली होती. ७ जानेवारीला WA वर POLL घेतले गेले. त्यामध्ये फेब्रुवारीतील महाइव्हेंटला ५० जण येतील असा कौल पडला. कमिटीला हुश्श झाले. (प्रत्यक्षात इव्हेंटच्या वेळी हा आकडा ८० च्या वर गेला, हे आणखी कौतुकास्पद). ३१ जानेवारीपर्यंत देणगी रक्कम ५ लाखाच्या वर गेली. इव्हेंटला आमचा बॅचमेट none other than सरन्यायाधीश भूषण गवई येणार ही बातमी आली और सबके हौसले बुलंद हो गये....!!

). २०२६चे वर्ष उजाडले आणि सर्वांचा काउंटडाउन सुरू झाला. कार्यक्रमासंबंधी अतिरिक्त गोपनीयता राखून कमिटीने सर्वांची उत्सुकता शिगेला पोचवली होती. ७ जानेवारीला WA वर POLL घेतले गेले. त्यामध्ये फेब्रुवारीतील महाइव्हेंटला ५० जण येतील असा कौल पडला. कमिटीला हुश्श झाले. (प्रत्यक्षात इव्हेंटच्या वेळी हा आकडा ८० च्या वर गेला, हे आणखी कौतुकास्पद). ३१ जानेवारीपर्यंत देणगी रक्कम ५ लाखाच्या वर गेली. इव्हेंटला आमचा बॅचमेट none other than सरन्यायाधीश भूषण गवई येणार ही बातमी आली और सबके हौसले बुलंद हो गये....!!

......आणि अखेर ७ फेब्रुवारी उजाडला. कोणी कसे शाळेत पोचायचे याचे मेसेजेस झाले. मी विनायक जोशीच्या आलिशान गाडीने पोटातील पाणी न हलता शाळेत पोचलो. इतके वर्षांनी झालेले शाळेचे प्रथमदर्शन मोहवुन टाकणारे होते. शाळेच्या भव्यतेची साक्ष देणारे चिरकालीन दगडी प्रवेशद्वार कमिटीने लावलेल्या सुबक झोकदार तोरणामुळे आकर्षक दिसत होते; जणु काही पुढे होणाऱ्या सोहळ्याची नांदीच होती ही !! आत गेल्यावर शाळेच्या काही सुहास्यवदनी ललनांनी (उर्फ स्टाफने) प्रत्येकाचे स्वागत केले. पण रजिस्ट्रेशन करत असताना शाळेच्या असंख्य आठवणींनी मनात एकच कल्ला केला. काय पाहु आणि काय नको असे झाले. इतक्या वर्षांत कित्येकांचे राहण्याचे अक्षांश रेखांश बदलले, विश्वपर्यटन देखील कदाचित झाले असेल; पण आपल्या शाळेची भव्यता आपल्याला अजूनही जाणवते आणि अभिमानाने छाती फुलून येते. आज आम्ही शाळेत आलो नव्हतो, तर त्या पवित्र वास्तूत आलो होतो. पण जसजसे मनाच्या कुपीत एकेकाळी साठवलेला एकेक सांधी कोपरा दिसू लागला, तेव्हा पुन्हा शाळेत आल्याचा देजाहू अनुभव आला. कमिटी आणि बाकी आपल्या बॅचच्या मित्र मैत्रिणींनी आदल्या दिवशी वागळे हॉल असा काही सजविला होता, की ते पाहून मी स्तिमित झालो. थोड्याच वेळात हा समारंभ खूप उंचीवर जाणार याची खूणगाठ पटली. जरी वागळे हॉलची ओळख लागायला मला ४ सेकंद लागले, कारण स्टेजची जागा आता पूर्ण बदलली आहे. ह्याला म्हणतात स्थित्यंतर..!! . (ह्याच वागळे हॉलमध्ये आम्ही वि स पागे यांचं भाषण ऐकलं होतं, आमच्यातील काही विद्यार्थ्यांनी केलेलं अंमलदार नाटक पाहिलं होतं, ७४ साली शाळेने आणलेल्या EC TV वर एकनाथ सोलकरचे शतक पाहिले होते). ! इथे बाहेर काउंटरवर प्रत्येकाच्या नावे एका शाही पिशवीतून भेटवस्तू देण्यात येत होत्या. अशा १०० पिशव्या तयार होत्या. संजय होनाळे आणि सुबोध पालकर ह्या दोघांचाही ह्यासाठी हातभार लागला. सकाळी १०-१०.३० पर्यंत सगळेजण वागळे हॉलच्या लॉबी मध्ये हजर झाले आणि मित्रभेटींना नुसता ऊत आला. एकेकाळच्या कोवळ्या चेहऱ्याची आम्ही मुलं आता 'बापे लोक' दिसत होतो. (ह्या संदर्भात मुलींविषयी मी काय बरं लिहावे...?? आलेल्या मुलींपैकी फक्त ३-४ मुली माझ्या परिचयाच्या होत्या. खरं म्हणजे माझ्यासाठी ही शरमेची बाब आहे). सर्वच मुलामुलींच्या चेहेऱ्यावर स्मरणरंजनाचा आनंद नुसता विलसत होता. उद्देश वैद्य (US), गजानन पवार(UK) , मीनल गाडगीळ(US), यतीन मराठे (Germany)आणि नोहा रामराजकर (Israel) ही मंडळी आवर्जून परदेशातून आली होती, ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे . अशा 'भारीत' अवस्थेत एकमेकांना पाहता येणं हेच celebration आहे असं मला वाटतं. नाश्त्याला ५० वर्षांपूर्वी आपल्या कँटीनमध्ये मिळायचा तो *पट्टीचा समोसा* आणि *ब्रेड भजी* योजणे खूपच भावले. (१० पैशाचा पॉकेट मनी आठवला). हरीच्या चिंच बोरांच्या mock mini stall ने मुलींना रडवले असावे. (किंवा किमानपक्षी एखादी मुलगी सतीशला म्हणाली असावी.."अब रुलाओगें क्या??" शबरीची बोरे खाऊन दस्तुरखुद्द रामचंद्र नव्हते का हेलावले..?? पण सतीशचा भाव त्याच जातीतला होता. त्याने एक प्रकारे आपली सेवा केली ).
एवढ्यात ढोल ताशा पथकाची सलामी झडली आणि आपल्या बॅचचे मेरुमणी म्हणता येतील असे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई मोठ्या दिमाखात तिसऱ्या मजल्यावर प्रकट झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सचिवांनी त्यांना अनौपचारिकपणे शाळेचा अपडेट दिला. भूषणजींबरोबर बहुतेकांनी आपापली छायाचित्रे काढून घेतली. आणि वेळेनुसार सगळेजण नाश्ता आटोपून वागळे हॉलमध्ये स्थानापन्न झाले. (मला अवधूतने खाजगीत त्याचे घड्याळ दाखवले. कमिटीने ज्या ज्या गोष्टी बारीक लक्ष घालून केल्या, त्यातील योजनाबद्ध वेळापत्रक ही महत्त्वाची बाब आहे). आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमासाठी अव्याहतपणे राबणारे बॅचचे मुख्य सचिव श्री. सतीश सराफ यांनी माईक घेऊन कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. बऱ्याच गोष्टीत पुढाकार घेणाऱ्या सतीशला compeering चे देखील चांगले अंग आहे. सभाधिटपणा आणि तारतम्य हे मोठे गुण त्याच्याकडे आहे. सगळे करून आपण कशातच नाही, असे अवधूतचे वागणे-बोलणे होते. हा ईश्वरी गुण आहे. सत्कार आणि भाषणादी कार्यक्रम नीट पार पडले. ह्या समारंभासाठी अगत्याने आलेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती नाईक ( वय ८०च्या पुढे ) आणि अकाउंट्स ऑफिसमधील एके काळचे आधारस्तंभ श्री आचार्य सर ( वय ९० च्या पुढे ) यांचाही सत्कार औचित्याने करण्यात आला. उदेश वैद्य (अमेरिका) आणि नोहा रामराजकर( इज्राईल) ह्या परदेशस्थित बॅचमेट्सनी हलक्याफुलक्या आठवणी सांगून छान मनोगत व्यक्त केले. आपली शाळा प्रगतीपथावर आहे हे मुख्याध्यापिका सौ. गावडे यांच्या भाषणातून समजले. शाळेच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक आहे, असे लक्षात आले. (ह्याविषयी बरीचशी माहिती आपल्या कमिटीकडे असावी, कारण त्यांनी शाळेच्या पदाधीकाऱ्यांना कायम संपर्कात ठेवले होते). देणगीवजा आलेल्या रकमेतून एक उत्तम प्रकारची साउंड सिस्टीम आपण शाळेला सप्रेम भेट दिली. एवढेच नाही, तर रु. १,७५,००० चा धनादेशही अर्पण केला. तत्काळ सचिव श्री. गुरुनाथ पंडित यांनी जाहीर केले की, ह्या रकमेइतकीच भर त्यात घालून ठेवीवर येणाऱ्या व्याजाचा योग्य तो विनियोग दरवर्षी शाळेतील सर्वात हरहुन्नरी विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला बक्षीस/ शिष्यवृत्ती देऊन होणार आहे. टाळ्यांच्या कडकडाटात ह्या घोषणेचे श्रोतृवृंदाकडून स्वागत झाले. भूषणजींचे वेळापत्रक इतके व्यस्त असूनही त्यांनी आयत्या वेळेस स्वतःचा कार्यक्रम बदलून ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी हार्वर्ड, केम्ब्रिज विद्यापीठातही दिलेल्या भाषणाचे फौंडेशन चिकित्सक शाळेत रोवले गेले असे अभिमानाने ते म्हणाले. शाळेच्या विविध उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तलिखितांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच अजून ५ वर्षांनी शाळेला १२५ वर्ष पूर्ण होतील, तेव्हा तो साजरा करण्यासाठी स्वतः येण्याचे आश्वासनही दिले.
आम्हाला शिकविणारे कित्येक लाडके शिक्षक शिक्षिका ( जशा नार्वेकर बाई, पालकर बाई, चंद्रगिरी बाई, स्वतः नाबर सर ....), तसेच आमचे काही बॅचमेट्स आता आपल्यात नाहीत ही भावना सगळ्यांनाच चटका लावणारी होती. ह्या सर्व जणांना उपस्थितांनी २ मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.🌸🌸🌸
दुपारचे १.३० वाजून गेल्यामुळे भोजनाच्या कार्यक्रमाला अग्रक्रम देण्यात आला. सर्वांना एकमेकांशी भेटण्या-बोलण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थी ह्या उत्सवाचा हेतू साध्य झाला. तसं काही १ तासात फार बोलणं होतं असंही नाही ; पण ५० वर्षांचे अंतर कापण्यासाठी एक चिंगारी पुरेशी असते. यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम होणार होते. ह्याची रूपरेषा आखून तो सादर करण्याची धुरा उत्साही राजन मुरंजनने उचलली होती. सगळ्या सादरकर्त्यांकडून आधी माहिती मिळवून राजनने मकरंद म्हात्रे आणि राजीव गोविलकर यांच्या समवेत दर्जेदार सूत्रसंचालन केले. ( जेवण झाल्यावर श्रोतृवृंदाला जागं ठेवणं काही सोपं काम नव्हतं ). उदय पोवळे(कविता वाचन) , डॉ. नूतन जोशी (कविता वाचन), मकरंद म्हात्रे( हिंदी गीते), विकास कात्रे ( पेटीवादन ), स्वतः राजन (हिंदी गीते ), राजीव गोविलकर (मिमिक्री ) आणि सुधीर शिरगावकर ( हिंदी गीते ) अशा बॅचच्या विविध विद्यार्थी विद्यार्थिनींनी कला साहित्याची व्यासपीठावर मुक्त उधळण केली. विविध क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या १९७६च्या विद्यार्थ्यांनी याही क्षेत्रात आपण कमी नाही याची नोंद केली. दिवसभर चालू असलेल्या ह्या Golden jubilee reunion कार्यक्रमाची सांगता फारच कल्पकतेने होणार होती. जमलेल्या जवळजवळ ऐंशी एक विद्यार्थ्यांनी एका वर्गात जमून ५०वर्षांपूर्वीच्या काळाला हलकासा स्पर्श करायचा होता. ह्या वर्गातच एक छायाचित्र घेतले गेले आणि स्मरणरंजनाने संपृक्त झालेल्या ह्या अदभूत सोहळ्याची सुफळ सांगता झाली.
आम्ही सर्वच्या सर्व जण एका अनामिक चिरंतन समाधानाचा ठेवा घेऊन आपापल्या घरी परतलो...!!
विकास कात्रे ( १९७६ ची बॅच )
मोबाईल : ९८३३६१०८७५



Comments
Post a Comment