Skip to main content

स्व. खुशवंतसिंग

स्व. खुशवंतसिंग यांचे विचार आणि मते ( त्यांच्या एका पुस्तकातून).
.. -------------------------------------------- 
एकंदरच मला वादळी माणसांबद्दल कायमचे कुतूहल वाटत आले आहे. एकेकाळचे वादळी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व, तसेच इलस्ट्रेटेड विकलीचे संपादक स्व. खुशवंतसिंग यांची 'ट्रेन टू पाकिस्तान' ही इंग्रजी कादंबरी ४-५ वर्षांपूर्वी वाचली. त्यामागोमाग ह्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा देखील लगेच पाहिला होता. यामुळे १९४७ साली झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीचा थोडाफार तरी अंदाज आला. खुशवंतसिंगांचा जन्म लाहोरचा ! फाळणीच्या वेळी ते ३२ वर्षांचे होते; म्हणजे त्यांच्या उमेदीच्या वर्षांत त्यांनी भयंकर हिंदू मुस्लिम दंगलीतील रक्तपात बघितला. एव्हढेच नव्हे, तर त्यावेळच्या कित्येक पिडीतांसारखे त्यांनाही लाहोर सोडून दिल्लीला यावे लागले. तत्पूर्वी LLBचे शिक्षण त्यांनी लंडनमध्ये पूर्ण केले. लाहोरमध्ये ते वकिलीही करत असत. तर अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे लेखन हे कित्येक दृष्टीने मार्मिक आणि महत्वाचे असते. अलीकडे त्यांचे 'मन:पूर्वक खुशवंतसिंग' हे पुस्तक माझ्या हाती आले, जे  मला आवडले. तूर्त तरी खुद्द खुशवंतसिंगान्वर ब्लॉग लिहिण्याइतके माझे वाचन झालेले नाही. पण त्यांची काही मते आणि विचार अधोरेखित करावेसे वाटले, ते खालीलप्रमाणे : 
-----------------------------------------------------------------------------------------------------------

स्व. खुशवंतसिंग यांचे विचार आणि मते ( त्यांच्याच शब्दांत )

- लिखाण केल्याने माझा अहं सुखावतो. 

 - माझं हृदय अजूनही तरुण आहे, आणि तितकंच वात्रटही ( at 95yrs) 

 - आनंद मिळविण्यासाठी सगळ्यात आधी हवं, ते आरोग्य..!! दुसरी गोष्ट हवी ती म्हणजे बऱ्यापैकी पैसे. पैशाची कमतरता माणसाला निराशावादाकडे नेते. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे घर हवे.भाड्याचं घर तुम्हाला हवा तसा आराम, आनंद आणि सुरक्षिततेची भावना देऊ शकत नाही. चौथी गोष्ट म्हणजे समजूतदार जोडीदार मिळणे. आणखी एक गोष्ट म्हणजे काहीतरी छंद जोपासा..

 - एकटं राहणं खूप हितकारक असतं. शांततेतून खूप ऊर्जा मिळविता येते. 

 - वेळ अजिबात वाया घालू नका. तुमच्या हातात असणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. मी कधीही प्रार्थना करण्यात, प्रेमात किंवा नातेसंबंधात वेळ वाया घालवलेला नाही. 

 - मला माझं स्वत्व जपायला आवडतं आणि ते मी लिखाणातून जपलं आहे

 - घयुरला भेटण्याआधी मुस्लिम समाजाविषयीची माझी मतं अगदी पूर्वग्रहदूषित आणि साचेबद्ध होती.

 - हिंदू आणि मुस्लिम समाजातील टोकाचे विचार करणारे लोक मला खुपतात.

 - राजकारण आणि धर्मकारण हे दोन वेगळे विषय आहेत, असे मला वाटते. 

 - झुंडशाही करणारे पक्षही राजकारणातून हाकलून द्यायला हवेत. 

 - मी नाही म्हणू शकत नाही, हाच माझा सर्वात मोठा दोष आहे. 

 - लिखाण ही एकट्याने एकांतवासात करण्याची गोष्ट आहे. मी उत्तम लेखक आहे असं मी मानत नाही. 

 - चांगला लेखक कसा होतो..?? खूप कष्ट, प्रामाणिकपणा आणि निर्भयता!! कायम मोकळेपणाने व्यक्त व्हा.    आपण आहोत त्यापेक्षा वेगळे असल्याचे सोंग घेऊ नका. माझ्या आत्मचरित्रात मी सारं काही उघडं केलं आहे.

 - भिंद्रनवाले प्रकरणात मी खलिस्तानवाद्यांच्या हिट लिस्टवर होतो. 

 - माझी २ श्रद्धास्थाने.... महात्मा गांधी आणि मदर तेरेसा !! 

 - Good Read: Autobiography of an unknown Indian- Nirad Choudhary

 - आपले आत्ताचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सर्वोत्तम आहेत. 

 - "दमणे ही शारीरिक स्थिती नाही, मानसिक आहे."- इति स्व. इंदिरा गांधी 

 - नवश्रीमंतांच्या पैशाचा दिखावा हा हळूहळू दिल्लीच्या संस्कृतीचा भाग बनला. 

 - माझ्या दिल्ली ह्या कादंबरीत मी दिल्लीची गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे.

 - ३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधी हत्येनंतर अनेक शिखांना दिल्लीत मारण्यात आले. अनेक गुरुद्वारे जाळण्यात आली. ह्या दंगलीसंदर्भात मी मला मिळालेले पद्मभूषण परत केले

 - सोबतीची आवड असणं, प्रसन्न राहणे, हार न मानणं, बढाया मारणे हे शिखांचे गुणविशेष होत. 

 - मी जातीयवाद पसरविणाऱ्या पक्षांना कडाडून विरोध करतो. 

 - आज जगभरात सगळ्यांनाच असुरक्षित वाटू लागलं आहे. सुरक्षिततेसाठी ते धर्माचा आधार शोधतात. 

 - पाकिस्तानात कुठल्याही गोष्टीसाठी रॉला जबाबदार धरलं जातं. ( RAAW)

 - पाकिस्तान ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे त्या देशाबद्दल मला नेहमीच प्रेम वाटत आले आहे. 

 - मला जर कोणी एखाद्या धर्माची निवड करायला सांगितली, तर मी जैन धर्म निवडेन. 

 - आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग दान करायचा ही शिखांची परंपरा आहे. 

 - "अब उर्दू क्या है, एक कोठे की तवायफ मजा हर एक लेता है, मुहब्बत कम करते है...!! " -खुर्शीद अखसार बिसरानी

 - लोकांमध्ये फार वेळ राहिलं, की मला कंटाळा येतो. त्यापेक्षा मी वाचन आणि संगीतात रमतो. 

 - शिखांना संपविणारी आणि भारतासाठी दुर्दैवी असलेली खलिस्तानवादी चळवळ संपविण्यात माझा वाटा आहे.

- तुम्ही आत्तापर्यंत नक्की काय केलंत असं त्यांना कोणी विचारलं तर त्याचं उत्तर खुशवंतसिंगांनी खालील उर्दू ओळींनी दिलं आहे :

                                               क्या पूछते हो हाल मेरे कारोबार का,
                                               आईने बेचता हूँ अंधो के शहर में ...II 


                                                                        ---------000000-------

ब्लॉग लेखन : विकास कात्रे , ठाणे 
मोबाईल : ९८३३६१०८७५

Comments