लिहून मुक्ती मिळविलेला माणूस - खुशवंतसिंग
खुशवंतसिंग ...!! ह्या गृहस्थाची २ पुस्तके वाचुन सुद्धा माझे त्यांच्याविषयी कुतूहल म्हणावे तसे शमले नाही. त्यांचे अंतरंग कळले नव्हते एव्हढाच त्याचा अर्थ. म्हणून मी तातडीने त्यांचे आत्मचरित्र आणले आणि १०-१५ दिवसात वाचून संपविले. ब्लॉग लिहिण्याची इच्छा दोन कारणांनी झाली ...१) लेखक आणि व्यक्ती म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला हे वाचकांना सांगणे २) आदत से मजबूर म्हणून......
बघुयात किती जमते लिहायला ते ...
आधी खुशवंतसिंग यांचे बालपण कसे गेले, ते पाहुयात. खुशवंतसिंग यांचे बालपण आणि अर्धे तारुण्य स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ( आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील कर्तृत्वाचे तसेच कार्याचे मूल्यमापन व्हायला हवे). त्यांचा जन्म १९१५ साली थरच्या वाळवंटातील हदाली (जे आता पाकिस्तानात आहे ) येथील संपन्न कुटुंबात झाला. कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत होते. त्यांच्या खापर-पणजोबांचा मिठाचा धंदा होता. साधारण पहिले महायुद्ध संपल्यावर त्यांना भूखंडाच्या स्वरूपात मोठा फायदा झाला. त्यांचे वडील इंग्रज धार्जिणे होते. गोऱ्या लोकांची ऊठबस करून त्यांनी आपल्या बांधकाम व्यवसायात भरपूर फायदा करून घेतला. ह्या दरम्यान दिल्लीमधील संपूर्ण साऊथ ब्लॉक बांधण्याचे महत्त्वाचे कंत्राट त्यांच्या वडिलांना मिळाले आणि इथे ह्या कुटुंबाची चांगलीच बरकत सुरू झाली. (त्या काळात ६००० कामगार त्यांच्या वडिलांकडे काम करत होते). आजच्या काळात दोन दोन लाख रुपये फिया घेणाऱ्या शाळा आहेत, तश्या हायफाय शाळेत (मॉडर्न स्कूल) खुशवंतसिंगचे शिक्षण झाले. त्यांचा शालेय शिक्षणाचा कालावधी १९२० -३० असा होता. शालेय जीवनात ते खोडकर होते ( पण वाह्यात किंवा फुकट गेलेले असे म्हणता येणार नाही). पण वृत्ती मनस्वी असावी असे दिसते. घरच्या श्रीमंतीमुळे भरगच्च पॉकेटमनी मिळायचा, त्यामुळे उडाणटप्पू मुले त्यांच्या नेहमीच आसपास असत. आणि चुकीच्या संगतीने काय होते, हे वेगळे सांगायला नको. दिमतीला त्या काळात एक मोटर सायकल देखील होती. त्यामुळे खुशवंतजींना विद्यार्जनात अंमळ रस कमीच होता. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे शाळेमध्ये असलेल्या एका तरुण शिक्षिकेमुळे दर्जेदार इंग्रजी साहित्य वाचनाची त्यांना गोडी लागली. (एका परीने इथे शाळेत उत्तम शिक्षक असण्याचे महत्व अधोरेखित होते). पुढे इंग्रजीत भरपूर वाचन आणि लेखन करून एक कथाकार, कादंबरीकार, संपादक म्हणून खुशवंतसिंग नावारूपाला आले, ह्याचे प्रथम-श्रेय कदाचित त्या शिक्षिकेला द्यावे लागेल.
पुढे ते दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये दाखल झाले. इथे असतानाच त्यांना इंग्रजी आणि उर्दू साहित्याची गोडी लागली. इंग्रजी साहित्याचा आपला पाया मजबूत करण्यासाठी खुशवंतसिंग जाणीवपूर्वक बायबल आणि उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके वाचत असत. शेक्सपिअरची २ नाटके त्यांनी मुखोदगत केली होती. कला-काव्य-संगीताची देखील त्यांना आवड होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील चेतन आनंद, बलराज सहानी आणि बी आर चोप्रा हे खुशवंतसिंगचे कॉलेजमधील सहाध्यायी होत. इंटरच्या परीक्षेनंतर केवळ वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी पदवीसाठी लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. वास्तविक खुशवंतसिंग लेखक म्हणून पुढे येतील, असे त्यांच्या लाहोरच्या कॉलेजमधील एका शिक्षिकेने हेरले होते. पण लेखन करून प्रपंच कसा चालणार, ह्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना वकिलीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. खुशवंतसिंगची वाद घालण्याची प्रवृत्ती बघून त्यांनी वकिली पेशाकडे जावे असे त्यांच्या आईवडिलांना वाटले. तसेच वडिलांच्या व्यवसायातील आणि जमीनजुमल्याचे खटले असायचे; ज्याची कागदपत्रे उर्दूमध्ये असायची. यासाठी दूरदृष्टीने वडिलांनी त्यांना उर्दू विषय शिकायला लावला. (ह्यात कायद्यापेक्षा फायद्याचाच विचार जास्त दिसतो). उर्दूचा उपयोग त्यांना वकिलीत काय झाला असेल नसेल, पण उर्दूतील काव्यवाचनासाठी नक्कीच झाला. ह्या पुस्तकात गालिब आणि इक्बालचे शेर ते जागोजागी उद्धृत करतात. १९३४ साली कलाशाखेची पदवी त्यांनी कशीबशी मिळविली. अभ्यासात फार प्रगती नसून खुशवंतसिंगांनी इंग्लंडला LLBच्या टर्म्स भरल्या. असले शौक हे फक्त श्रीमंतांची मुलेच करू जाणोत.
कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ऐन तारुण्यात लंडनमध्ये गेलेल्या खुशवंतसिंगांचे अधिक लक्ष extra curricular गोष्टींकडे होते. विशेष करून स्त्रियांशी त्यांची मैत्री सहज होत असे. त्यांच्या दृष्टीने ह्यात लपविण्यासारखे काही नव्हते. (ते कशाला......त्यांनी The company of women नावाचे एक स्वतंत्र पुस्तकही लिहून प्रकशित केले होते. त्यातील बऱ्याच गोष्टी ह्या आत्मचरित्रात असाव्यात असा माझा कयास आहे). खुशवंतसिंगांचे व्यक्तिमत्व हे रसिक रंगेल होतं. त्यांचा वावर श्रीमंती वर्तुळात झाल्यामुळे त्यांनी तारुण्यात व्यक्तिस्वातंत्र्य पुरेपूर उपभोगले. त्यांची नि:संकोच वृत्ती त्यांच्या रसिक वृत्तीला पोषक होती; जी तरुण स्त्रियांशी वागताबोलताना दृगोच्चर होत असे. (मैत्रीसाठी त्यांनी कुणावर बळजबरी मात्र केली नाही. पण गंगाधर टिपरेंनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे बहुतेक त्यांच्या बेंबीत 'कस्तुरी' असावी 😀). पौगंडावस्थेतील-तारुण्यातील स्त्री आकर्षण, त्यांच्या सहवासात आलेल्या देशी परदेशी स्त्रिया, या संदर्भातील प्रामाणिक किस्से सिंगसाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात यथेच्छ वर्णिले आहेत. ह्या भावनेचे जाणीवपूर्वक नियमन केल्याचा मात्र कुठेच उल्लेख आढळत नाही. त्यांच्या आयुष्याची ही अविभाज्य बाजू अनिर्बंध वाटते. ह्याची मुख्य ४ कारणे असावीत ..१. स्वैर वृत्ती २. श्रीमंती राहणी ३. परदेशात कुणाचाही अंकुश नाही ४. परदेशातील सैल संस्कृती. वेश्येकडे गेल्याचा प्रसंग, तसेच लंडनमध्ये लिलियन/ मारिया आणि आणखी काही मैत्रिणींशी केलेली जवळीक, तसेच त्यांच्या उच्चभ्रू वर्तुळातील अन्य लोकांची लफडी कुलंगडी असे अनेक प्रसंग खुशवंतसिंगांनी विषयानुरूप पण अगदी नीर-गाठ-उकल पद्धतीने आणि पारदर्शकतेने सांगितले आहेत. त्यात थोडाफार सेक्सविषयी तपशील आहेच, पण प्रसंगी ह्या संदर्भातील त्यांच्या स्वतःच्या न्यूनगंडाचे आणि फजितीचेही किस्से आहेत. हे लिहिताना 'मी आहे तसा वाचकांना दिसावा' हाच त्यांचा हेतू असावा. ह्याला कुणी सवंग म्हणेल किंवा अनिर्बंध म्हणेल ह्याची फिकीर ते लिहिताना करीत नाहीत. ह्या आत्मचरित्रात स्वतःच्या अपेक्षाभंगाचे, तेजोभंगाचे आणि अवसानभंगाचे किस्से देखील खुशवंतसिंगांनी मोकळेपणाने वर्णिले आहे. ("आपण आहोत त्यापेक्षा वेगळे असल्याचे सोंग घेऊ नका. माझ्या आत्मचरित्रात मी सारं काही उघडं केलं आहे"- खुशवंतसिंग). प्रिन्स्टन विद्यापीठात आपण इच्छुक आणि हुशार विद्यार्थ्यांना वरच्या पातळीवर जाऊन शिकवू शकलो नाही, हे खुशवंतसिंग प्रांजळपणे मान्य करतात. " I was a bad lawyer, 2nd rate diplomat and 03rd rate teacher". - असा कबुलीजबाब खुशवंतसिंगांनी हिंदुस्थान टाइम्समध्ये दिलेला होता. प्रामाणिक आत्मचरित्र लिहायला धाडस लागते, आणि ते खुशवंतसिंग यांच्याकडे भरभरुन होते. असो !
लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण चालू असताना कंवल मलिक नावाची एके कालची बालमैत्रीण ( एक सुंदर युवती बनून ) त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली. ती मॉन्टेसरीचे उच्च शिक्षण घ्यायला आली होती. 'एक फुल दो माली' प्रमाणे तिच्यावर लट्टू असणारे खुशवंतसिंग सोडून अजून दोघे होते. पी. सी. लाल ( बांगला देश युद्धाच्या वेळचे भारताचे वायुसेना प्रमुख ) आणि अमरजित सिंह !! ह्या प्रकरणावर एखादा हिंदी सिनेमा होईल असे चढउतार लेखकाने रंगविले आहेत, कि ज्यामध्ये माणसाच्या काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह ह्या षड्रिपूंचे दर्शन होते. असे असले, तरी नंतर कंवलचा विवाह खुशवंतसिंग यांच्याशीच झाला. कंवल दिसायला सुंदर असली, तरी तिचे सामान्यज्ञान यथातथाच होते. त्या काळात जर्मनीतील न्यूरेनबर्गमध्ये राहत असलेल्या कंवलला जगभर गाजत असलेल्या हिटलरचे नाव जेमतेमच माहिती होते, यावरून कल्पना यावी. कायद्याची पदवी पदरात पाडून घेण्यासाठी खुशवंतसिंगना तीनच्या ऐवजी ५ वर्षे लागली. त्या आधी त्यांनी ICS ची परीक्षाही देऊन पाहिली; परंतु अपुऱ्या तयारीमुळे यश आले नाही. ह्या पार्श्वभूमीवर कंवलशी होणाऱ्या लग्नाबाबत एकंदरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु सगळ्या शंका दूर होऊन अखेर हे लग्न १९३९ मध्ये मोठ्या थाटामाटात दिल्ली येथे पार पडले. दिल्लीतील सगळ्यात मोठ्या रिअल इस्टेटचे एकमेव मालक म्हणजे खुशवंतसिंगचे वडील; त्यामुळे लग्नानिमित्त वडिलांनी १००० लोकांना दिलेल्या कॉकटेल पार्टीमध्ये खूप थोरामोठ्यांची उपस्थिती होती. दस्तूरखुद्द महंमद अली जीना सुद्धा हजर होते. हे लग्न झाले खरे, पण नंतर विविध कारणांमुळे ह्या जोडीने दाम्पत्य म्हणून ठेवलेली मूल्ये ( किंवा नीतिमूल्ये ) अगदी सैल होती. तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन कायमच बऱ्याच अंशी तणावपूर्ण असायचे. एक वेळ अशी आली होती कि त्यांच्या पत्नीने त्यांना सोडून जायचा निर्णय घेतला होता.
आता मात्र लग्न झाल्यामुळे वकिलीचा पेशा स्वीकारलेल्या खुशवंतसिंगना लाहोरला जाऊन गंभीरपणे वकिली करणे क्रमप्राप्त होते. लाहोरला गेल्यावर मित्रांच्या, वडिलांच्या निकटवर्तीयांच्या ओळखीतून वकिली व्यवसायात बस्तान बसविण्याचा प्रामाणिक प्रयत्न खुशुवंतनी केला. सुरवातीचा उमेदवारीचा काही काळ सोडल्यास नंतर थोडेफार यश मिळूही लागले होते. काही भुरट्या लोकांनी खोटी आश्वासने देऊन त्यांची फसगतही केली. पण काही कारणांनी त्यांचे वकिलीत लक्ष लागेना. त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर "वकिलीचा हा व्यवसाय भयानक कष्टाचा आणि नीतिमत्ता न बाळगणारा होता". एव्हढे सगळे करून 'समाधान न मिळणे' हा दुसरा भाग. यामुळे अखेरीस वकिलीकडे दुर्लक्ष करून त्यांनी इंग्रजी साहित्याचे वाचन पुन्हा सुरु केले (जो त्यांचा मूळ पिंड होता). टॉलस्टॉय, आल्डस हक्सले, डॉ राधाकृष्णन, ऑस्कर वाइल्ड वगैरे लेखकांचे साहित्य वाचण्यात त्यांनी विशेष रस घेतला. This basically endorses that he was intellectual..!! दुसरीकडे 'द ट्रिब्यून' मासिकासाठी ते पुस्तक परीक्षणेही ते लिहू लागले. Urge for writing...!!
हे सर्व चालू असताना भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दुसरे महायुद्ध ह्या जागतिक स्तरावर घडणाऱ्या अभूतपूर्व घडामोडी शिगेला पोचल्या होत्या. परंतु सिंग कुटुंबियांना ह्या दोन्ही घटनांचे फारसे सोयरसुतक नसावे. खुशवंतसिंगांचे वडील तर गोऱ्या लोकांचे लांगुलचालन तथा खुशमस्करी करण्यात व्यग्र असत. आपण आज नेटवर्किंग वगैरे मोठे मोठे शब्द वापरतो. पण हे गृहस्थ त्या काळात नेटवर्किंग करून मोठमोठाली कंत्राटे घेऊन बक्खळ पैसे मिळवीत होते. 'English rule upon India' was a BOON for people like him !! कशाला ते स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतील ?? खुशवंतसिंग मात्र सुशिक्षित आणि बहुश्रुत असल्यामुळे भारतातील इतर बुद्धिजीवी पण बूर्ज्वा (bourgeois) लोकांसारखी त्यांची ह्या घटनांविषयी निदान काही ठाम मते तरी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ते साम्यवादी विचारसरणीचे असल्याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आला आहे. ( लाहोर येथे वकिली करताना साम्यवादी कम्युनिस्ट अशिलांचे त्या संदर्भातील खटले खुशवंतसिंग मोफत चालवत, असाही एक उल्लेख आहे). ते फॅसिझमच्या विरोधात होते. जेव्हा रशियाने जर्मनीशी युद्ध पुकारले, तेव्हा त्यांना आनंद झाला. गांधीजींच्या 'चले जाव' चळवळीला त्यांचा विरोध होता. इंग्रज सहजासहजी भारत देश सोडणारे नव्हते असे त्यांचे प्रामाणिक मत होते. "भारतात युद्धकार्यासाठी जे तरुण ब्रिटिश नंतर आले, ते पूर्वीच्या ब्रिटिशांपेक्षा वेगळे होते आणि भारताशी मैत्री करण्याकडे त्यांचा कल होता, तसेच इंग्लंडमध्ये साम्यवादी सत्तेवर आल्यामुळे भारताचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले". ही खुशवंतसिंगांची विशेष टिपण्णी मला खूप बोलकी वाटली (पान ११५, ११६). ज्या राज्यात मुस्लिम जास्त आहेत, अशी दोन राज्ये भारताच्या दोन्ही टोकांना तयार व्हावीत ह्या मुस्लिमांच्या मागणीचे ते पुरस्कर्ते होते. (लाहोर जवळील हदालीचा जन्म, मंझूर कादीर नावाचा जिवलग मित्र -जो नंतर पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री झाला), घयुर नावाची मुस्लिम मैत्रीण, उर्दूचे शिक्षण आणि लाहोरमधील ७ वर्षांची वकिली एव्हढ्या गोष्टी त्यांना मुस्लिमांचे प्रेम लागण्यासाठी पुरेश्या होत्या. ( ते म्हणतात "घयुरला भेटण्याआधी मुस्लिम समाजाविषयीची माझी मतं अगदी पूर्वग्रहदूषित आणि साचेबद्ध होती") .स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत पाकिस्तानात (विशेषतः पंजाबात) झालेल्या वांशिक दंगलीचे आणि हिंसाचाराचे लेखक स्वतः साक्षीदार होते. मंझूर कादीरच्या मदतीने अक्षरशः हिंदी चित्रपटासारखे ते लाहोरहून सुरक्षितपणे दिल्ली गाठू शकले. लंडनमध्ये ५ वर्षे LLB चे शिक्षण, लाहोरमध्ये ७ वर्षे वकिली करण्याचे प्रयत्न केल्यावर हा व्यवसाय आपल्या योग्यतेचा नाही ह्या निष्कर्षाप्रत खुशवंतसिंग आले. सकृतदर्शनी, Lack of Self actualization आणि ह्या क्षेत्रातील रसातळाला गेलेली नीतिमत्ता ह्या गोष्टी अशा निर्णयाला कारणीभूत ठरल्या. फाळणी झाली आणि खुशवंतसिंग यांच्या वकिली सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
वकिली सोडल्यामुळे उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे क्रमप्राप्त होते. पस्तीशी ओलांडली, तरी शिडात वारं शिरल्यासारखं खुशवंतसिंगच्या कारकिर्दीचे तारू अजूनही हेलकावे खात होते. पण वडिलांकडून पैशाचे पाठबळ असल्याने ते तरले इतकंच. अशातच सरदार पटेल यांच्या शिफारशीवरून खुशवंतसिंगना लंडनमधील दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. (जरी, या क्षेत्राबद्दल खुशवंतसिंगना ओ की ठो माहिती नव्हते. शिवाय सरदार पटेल यांना खुशवंतसिंग कसे माहिती ...? ह्याचा मात्र कुठेच उल्लेख नाही. कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकात असेल ). ह्या कार्यालयात नेहरूंचे विश्वासू कृष्ण मेनन हाय कमिशनर होते आणि त्यांच्या सहाय्यासाठी गांधीजींचे निष्ठावंत सुधीर घोष होते. दोघांचा ३६चा आकडा होता. कुडुम कुडुम किंवा बंगाली बॉस असला की राजकारणाचा आणि एम्पायर बिल्डिंगचा अनुभव आला नाही तरच नवल. दूतावासात खुशवंतसिंग ह्यांना ह्याचा नित्य अनुभव येत होता. अशा उच्च वर्तुळात काय काय चालते त्याचे मजेशीर आणि मासलेवाईक किस्से ईत्यंभूतपणे सिंगांनी ह्या पुस्तकात वर्णिले आहेत. विशेष म्हणजे नेहरूजी, गांधीजी आणि पटेलजी (ज्यांना भारतीय स्वातंत्र्याचे आर्कीटेक्ट म्हटले जाते), त्यांचे एकमेकांशी काय नाते होते त्यावर थोडाफार प्रकाश खुशवंतजींनी टाकला आहे. मेनन यांनी नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रात घोष यांचा उल्लेख 'पटेलाईट' असा केला होता. पंडित नेहरूंबरोबरचे खुशवंतसिंगचे लंडनमध्ये घडलेले किस्से देखील आश्चर्यकारक आहेत. कोटावर गुलाबाचे फुल लावणारे आणि लहान मुलांमध्ये सुद्धा पॉप्युलर असणारे गोड चेहऱ्याचे चाचा नेहरू असे असतील असं आपल्या स्वप्नातही येणार नाही (नेमके कसे त्यासाठी हे पुस्तक वाचावे😀). खुशवंतसिंग यांनी कृष्ण मेनन यांची संभावना 'एक कडवट स्वभावाचा आणि लांबण लावणारा बॅरिस्टर' अशी केली आहे ( पान १२७). सुंदर आणि देखण्या स्त्रिया मेनन यांना विशेषत्वाने आवडत. असे दिसते की मेनन यांची हाताखालच्या माणसांकडून नेहमीच लांगुलचालन करण्याची अपेक्षा असे (चांगल्या कामाची नाही). ह्या कार्यालयात मेनन हे सर्वेसर्वा होते. त्यांना विचारणारे कोणीच नव्हते. नेहरूंचा विश्वासू माणूस हे त्यांचे सर्वात मोठे Qualification (आणि बलस्थान) होते. पं. नेहरूंचे कृष्ण मेननविषयीचे अंधप्रेम त्यांना संरक्षणमंत्री करण्यापर्यंत गेले. मेनन यांची बरीच अंडीपिल्ली खुशवंतसिंगांनी पुस्तकात लिहिली आहेत. ते जन्मजात खोटारडे होते असे स्पष्टपणे लिहिले आहे (page 153).असो! अशा autocratic माणसाच्या कार्यपरीघात काम करणे खूप अवघड होते; जे खुशवंतसिंगनी लांगुलचालन न करता केलं. ह्या आत्मचरित्रात बऱ्याच ठिकाणी मोठ्या वर्तुळातील लोकांच्या वागण्याबोलण्यातील विरोधाभास आणि ढोंगीपणा ठिकठिकाणी कोपरखळ्या मारून लेखकाने उजेडात आणला आहे. उदा. गांधीवादी असलेल्या सुधीर घोषनी जनसंपर्क कार्यालयाला मंजूर झालेला सगळा एन्टरटेन्मेंट अलाउन्स एका दिवसात संपवून टाकला. 😃 लंडननंतर खुशवंतसिंगची बदली कॅनडामधील जनसंपर्क कार्यालयात झाली. इथल्या १ वर्षाच्या मुक्कामात अनेक कॅनेडियन कवी आणि लेखकांच्या कलाकृतींचा आस्वाद खुशवंतसिंगनी घेतला; तसेच निसर्गाचाही खूप आस्वाद त्यांनी घेतला. परंतु १ वर्षांतच काही कारणांमुळे मेनन यांनी खुशवंतसिंगांची बदली पुन्हा लंडन येथे केली. कॅनडा सोडताना ड्युटी फ्री स्कॉचच्या मुबलक बाटल्यांची ऑर्डर द्यायला मात्र खुशवंतसिंग विसरले नाहीत. खुशवंतसिंगांच्या बाबतीत थ्री डब्ल्यूज लिहायचे झाले तर ते WHISKY, WOMEN & WRITING असे लिहावे लागतील. 😄
खरं म्हणजे परत लंडनला आल्यावर खुशवंतसिंगनी मेनन यांच्याबरोबर चांगला जम बसवला होता. मेनन यांना मॅनेज करणे त्यांना जमले होते. आयर्लंडमधील राजदूत व्हायची त्यांना संधीही चालून आली होती. पण त्यांचा मूळ पिंड पुन्हा उफाळून वर आला. आपल्याला आयुष्यात काय व्हावेसे वाटते यावर डोक्यात भरपूर मंथन झाले. एव्हढ्यातच त्यांच्या प्रथम पुस्तकाचे प्रकाशन होऊन त्याला चांगले यश मिळाले. निर्णय घेण्यासाठी एव्हढे कारण पुरेसे होते. शेवटी कंटाळून इंग्लंडमधील दूतावासाची नोकरी खुशवंतसिंगनी सोडली आणि तिथेच राहून थोडे दिवस लेखनाचा प्रपंच आखला. एखाद्या मोठ्या देशातील भारताचा राजदूत होऊ शकणारे खुशवंतसिंग केवळ लेखनाच्या उर्मीमुळे नोकरी सोडून मोकळे झाले (कलासाहित्य निर्मितीची आतून खरी आच असल्याचे हे लक्षण आहे!! Artistic discontent). फॅमिलीला तिथे ठेवणे परवडण्यासारखे नव्हते, त्यामुळे त्यांना भारतात पाठविले गेले. (इथे हि गोष्ट नमूद केली पाहिजे कि खुशवंतसिंग आणि त्यांच्या पत्नीचे संबंध बरेच दिवस तणावपूर्ण होते). जवळ असलेल्या पुंजीवर ६ महिने एकट्याने इंग्लंडात राहायची त्यांची तयारी होती. म्हटले तर हा निर्णय खूप अधांतरी आणि धाडसी होता, कारण लेखक म्हणून यशस्वी व्हायची हमी कोण देणार ?? काही दिवसांत त्यांनी शॉर्ट हिस्टरी ऑफ शीखस हे पुस्तक लिहून हातावेगळं केलं आणि भारत पाकिस्तान फाळणीवरील कादंबरी लिहायला त्यांनी सुरवात केली. १९५० मध्ये भारतात येण्याचा निर्णय घेतला. लेखनातून थोडेफार मानसिक समाधान मिळाले असले, तरी फारसे पैसे न मिळाल्यामुळे खुशवंतसिंगची कुटुंबाकडून थोडीफार अवहेलना देखील झाली. वास्तविक इंग्लंडमध्ये त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. पण भारतात त्याचे कुणाला सोयर सुतक नव्हते. अखेर 'एकला चलो रे' या चालीवर खुशवंतसिंगनी दिल्ली सोडून भोपाळचा रस्ता धरला. आर्थिक विवंचना जाणवत होतीच. त्यामुळेच आकाशवाणीवर २ वर्षे सिंग यांनी काम केले. इतक्यातच यूनेस्कोमध्ये पॅरिस येथे 'मास कम्म्युनिकेशनचे काम पाहण्यासाठी बोलावणे आले, जे डोळे झाकून सिंगसाहेबांनी स्वीकारले .
पॅरिसमध्ये त्यांचे आई वडील सोडल्यास खुशवंतसिंगांचे बाकी कुटुंब राहत होते ( साधारण १९५६). मुले शाळेतही जायची. आयुष्यातील निदान २०-२५ वर्षे लाहोर, लंडन, पॅरिस, अमेरिका, कॅनडा, उरुग्वे, स्पेन, डेन्मार्क, स्वीडन, अफगाणिस्तान असे अनेक देश पाहिलेला ( अर्थात १२ गावचे पाणी प्यायलेला ) आणि असंख्य लोकांना भेटलेला खुशवंतसिंग हा माणूस होता, हे लक्षात ठेऊन त्याचे चरित्र अनुभवले पाहिजे. त्यांची मुस्लिमांशी कशी दोस्ती झाली हे वर लिहिलेच आहे. पाकिस्तानात जन्म घेतलेल्या खुशवंतसिंगांना तो परदेश कधीच वाटला नाही. स्वातंत्र्यानंतर पन्नासएक वर्षे तरी ते तेथील सगळे ऋणानुबंध जपून होते. जुने मित्रमैत्रिणी २५ -३० वर्षांनी भेटले, तरी खुशवंतसिंग त्यांच्याशी तेव्हढ्याच उत्कटतेने पुन्हा वागू शकतात. He always valued old friendship....which is a rare quality !! तरुण असताना एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे खुशवंतसिंगना मुस्लिमांविषयी प्रेम वाटू लागलं (पान ४६). मुख्य म्हणजे पत्रोपत्री का होईना, पण त्यांची ही दोस्ती तिच्या वयाच्या ८० व्या वर्षी पर्यंत कायम राहिली. अन्य बहुसंख्य भारतीय जसे इंग्लिश लोकांमध्ये फार मिक्स होत नाहीत, तसे खुशवंतसिंग नव्हते. खिलाडू वृत्तीचे होते. ते निदान डझनभर इंग्लिश कुटुंबियांच्या बरोबर राहिले होते. इंग्लिश लोक खूप रिझर्व असतात ह्या आपल्या लोकांचा समज त्यांनी खोटा ठरविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक लेखकांशी त्यांची दोस्ती होती. ह्याचा अर्थ त्यांचे गद्य-पद्य लेखन त्यांनी स्वतः वाचून पचविले असणार, हे ओघाने आलेच. कॅनडा हा देश त्यांना खूप आवडला. ह्या देशाने त्यांना निसर्गाचा आस्वाद घ्यायला शिकविले. फ्रेंच लोक जितके कलाप्रेमी, दानशूर तितकेच वागण्या बोलण्यात तुसडे असतात असं त्यांचं मत होतं. युनेस्कोमध्ये नोकरीसाठी असताना खुशवंतसिंगनी लिहिलेल्या ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी इंग्लंडमधील ग्रोव प्रेसने प्रकाशित केली, जिला त्या काळात एक हजार डॉलर्सचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला. (कुणाची स्वप्ने काय असतात बघा..पण पुरस्काराच्या पैशांमधून त्यांनी मर्सिडीज बेंझ घेतली आणि दोन वर्षातच ती तोट्यात विकली. उंची शौक....दुसरं काय म्हणणार ?? आपण त्यांना 'मनस्वी' म्हणूयात). यूनेस्कोमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचे वेगवेगळे अनुभव खुशवंतसिंगांना आले. श्रेय लाटण्यासाठी मोठ्ठे मोठे लोक कसे हपापलेले असतात ( डॉ. तरलोचनसिंग), तसेच दुसऱ्याच्या जीवावर चैन करणारे (धिंग्रा पुराण), स्त्री लंपट लोक, अभिनेत्री लीला नायडूची कहाणी ह्या संदर्भात घडलेले बरेच मनोरंजक किस्से आत्मचरित्रात आहेत. कृष्ण मेनन, रफिक झकेरिया, आर्थर लाल (युनोमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी), जनरल जगजितसिंग अरोरा (आर्मी चिफ १९७१),पी सी लाल (वायुदल प्रमुख १९७१), मंगत राय ((ICS /जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव), भरत राम (उद्योगपती), प्रेम कृपाल (Unesco Chairman) असे एकेक बडे बडे लोक त्यांचे समकालीन आणि काहीना काही कारणाने त्यांच्या संपर्कात आलेले. उच्चायुक्त आणि भारताचे सेवक म्हणवून घेणारी मंडळी किती बहकलेली असु शकतात, ते वाचून आपल्याला अचंबित व्हायला होते. आपण फक्त त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात वरवरच्या छान बातम्या वाचायच्या; त्यांचे अंतरंग मात्र वेगळेच असते. त्यांच्याच भाषेत लिहायचे तर "थोरामोठ्यांचे गोडवे गाणारा 'भाट' मी नाही. त्यापैकी ज्यांना अगदी जवळून जाणून घेण्याचा योग आला, त्यातले बरेचसे प्रत्यक्षात ढोंगी , बेमुर्वतखोर , खोटारडे आणि अतिसामान्य असल्याचे माझ्या लक्षात आले". ( पान १०)अशा भेटलेल्या अनेक चित्रविचित्र माणसांवर खुशवंतसिंग यांनी आपल्या कथा बेतल्या आणि स्वतंत्र पुस्तक केले आहे. श्रीमंती चैनीचे किस्से खुशवंतनी रंगवून लिहिले आहेत. यामध्ये कंत्राटे मिळविणे, पार्ट्या करणे, सर्रास मदिरापान यापासून विवाहबाह्य संबंधांपर्यंत बरंच काही वाचायला मिळते. ह्या उच्च वर्तुळांमध्ये कमालीची अनिर्बंधता हा लसावी निघतो. कुणालाच काही वाईट दिसत नाही. युनेस्कोच्या नोकरीमध्ये फारसा दम नव्हता (किंवा त्यांना तो वाटला नसावा). पण त्यांनी वाट बघून राजीनामा पाठवून दिला. आणि मग पुनःच हरी ओम .....!!
एक मात्र नक्की आहे कि जिथे कुठे खुशवंतसिंगांना नोकरी मिळाली, तिथे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण नियतीची इच्छा काही वेगळीच असावी. युनेस्को सोडून भारतात आल्यावर अशीच एक संधी त्यांच्याकडे चालून आली. भारताच्या नियोजन मंडळाने 'योजना' नावाचे साप्ताहिक सुरु केले होते. त्याचा संपादक होण्यासाठी त्यांना विचारण्यात आले. शासनाच्या पंचवार्षिक योजनांना प्रसिद्धी देणे एव्हढेच त्याचे उद्दिष्ट होते. पण त्याबरोबरच संपूर्ण भारत फिरण्याची त्यांना संधी मिळणार होती. अर्थातच खुशवंतसिंगजींनी होकार भरला !! 'योजना'चे संपादन आणि युनिसेफचे कार्य हरहुन्नरी खुशवंतसिंगांनी १ वर्षभर अतिशय हौसेने केलं. एव्हढ्यात ''इलस्ट्रेटेड विकली'चे संपादन आणि रॉकफेलर फौंडेशनकडून शिखांवर संशोधन करण्याची अशा २ ऑफर्स त्यांना एकाच वेळी आल्या. रॉकफेलरचे ३ वर्षांचे काम त्यांनी पसंत केले आणि ते कामाला लागले (इलस्ट्रेटेड विकली तेव्हा नावारूपाला आला नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे). कुठलेही लिखाण मी खूप intensely वाचतो , त्यामुळे इथे मला बरेच प्रश्न पडले ... खुशवंतचा पिंड संशोधनाचा तर नव्हता ?? कि रॉकफेलर परदेशी असल्याने त्यांना हा मोह पडला ..?? कि त्यांनी निर्णय घेताना आर्थिक लाभाचा विचार केला असेल ..?? कि शीख धर्मासाठी काहीतरी करावे असे त्यांना आतून वाटले असेल ..?? मला हे प्रश्न पडले आणि त्याचे उत्तर लगेच पुढच्याच प्रकरणात मिळाले. खुशवंतसिंगांचा मानस एखाद्या विषयात जास्तीतजास्त प्रभुत्व मिळवून त्यात जमेल तेव्हढे लेखन करण्याचा होता. ( वर लिहिल्या[प्रमाणे याआधी शिखांवर त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झालेच होते). खुशवंतसिंग म्हणतात .."शीख धर्म आणि त्याचा इतिहास या विषयावर मी जे काम केलं आहे , त्याने मला रसरशीत समाधान दिलं आहे. शीख धर्माचा इतिहास लिहिणे हे माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय होते. "- यातच सर्व काही आलं. ह्या संदर्भात त्यांनी लंडन, अमेरिका, जपान, हॉंगकॉंग, सिंगापूर , रंगून अशा अनेक ठिकाणी मुक्काम करून प्रचंड माहिती मिळविली. आवडीचे काम असले कि माणसे कुठल्याही थराला जातात. ह्या कामाचे दोन्हीही खंड अनुक्रमे प्रिन्सटोन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांनी प्रकाशित केले. त्यामुळे सिंगसाहेबांना पुढे परदेशातच व्याख्यानासाठी, शिकविण्यासाठी अनेक संधी मिळाल्या. प्रिन्सटोन, हवाई , स्वार्थमोर इत्यादी विद्यापीठात अध्यापन करण्याचा अनुभवदेखील खुशवंतसिंगना मिळाला. अनेक ओळखी झाल्या, अनेक अनुभव मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्व आता परिपक्व झाले होते (साधारण वय वर्षे ४५ असावे).
Illustrated Weeklyचे महाव्यवस्थापक जे. सी. जैन ह्यांच्या डोक्यात आधीपासूनच खुशवंतसिंगांचे नाव 'संपादक' म्हणून घोळत होते. आधीच्या संपादकाला डिच्चू दिल्यानंतर साहजिकच त्यांनी पुन्हा सिंगसाहेबांना विचारणा केली. रॉकफेलरचे काम आता झाले असल्याने यावेळी मात्र विकलीचे काम त्यांनी स्वीकारले. विकली साप्ताहिकात काम सुरु झाल्यावर तिथला स्टाफ, आत्तापर्यंत त्यात बरेवाईट लिहिणारे लोक , जाहिरातींचे प्रमाण, छायाचित्रकार , व्यंगचित्रकार , लोकल संत्रीमंत्री , छपाईमधल्या 'लोच्या' अशा एक ना अनेक गोष्टींशी त्यांना सामना करावा लागला. विकलीचा खप (८०,००० प्रति) काही वाईट नव्हता, पण तो वाढण्याची नितान्त गरज होती. त्यासाठी त्यांना अंकाच्या स्वरूपात खूप बदल करावे लागले. कंटाळवाणी आणि निरुपयोगी सदरे बंद करावी लागली. रफिक झकेरिया यांच्या दबावामुळे त्यांची पत्नी फातिमा हिला सहाय्यक संपादक म्हणून घावे लागले. पण ती गुणी होती आणि तिच्या चांगल्या कामाचे श्रेय सिंगसाहेबांनी तिला खुलेपणाने दिले आहे. काही दिवसातच सिंगसाहेब मुंबईकर झाले. ऑफिसला जाता येता रस्त्यावरील पानटपरीवाला , भेलपुरीवालाही एव्हढेच काय तर भिकारीसुद्धा त्यांना ओळखत असत. वेगवेगळी माणसे कामासाठी भेटायला यायची आणि आपापले रंग दाखवून जायची. दिवसेंदिवस खुशवंतसिंग अधिकाधिक अनुभवी होत होते. स्वतःजवळ असलेले व्यवस्थापन कौशल्य, स्वतःची निर्मितीक्षमता, राजकीय आकलन , उत्तम निरीक्षण शक्ती , जनसंपर्क, वक्तृत्व ,हजरजबाबीपणा ,खिलाडू वृत्ती ,निर्णयक्षमता ह्या गुणांमुळे त्यांनी विकलीचे संपादक म्हणून चांगलाच जम बसविला. एकाएकी ह्या साप्ताहिकाचा खप कशाने वाढला असेल...?? रामन राघवच्या कव्हर स्टोरीमुळे !! अर्थात खुशवंतसिंगनी स्वतः त्यासाठी खूप मेहेनत घेतली होती. वाचकांना आकृष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या कव्हर स्टोरीज ते छापत होते ....कधी शकील बानू , कधी कॅब्रे डान्सर्स वगैरे. एक दिवस सिंगसाहेबांनी वेगळे सदर सुरु केले ....विविध जातीजमातींवर !! हे सदर सुरु झाले आणि विकलीचा खप धर्मयुगच्या पुढे गेला. पुढे १९७१च्या भारत-पाक युद्धानेही विकलीला हात दिला. राजू भारतन क्रिकेटवर मेहेनतीने आणि उत्तम लिहीत असे (कव्हरवरती पतौडीचा मोठ्ठा फोटो असलेला विकलीचा issue मला अजूनही आठवतो). ह्या सिलसिल्यामध्ये सिंगसाहेबांचा पाकिस्तान दौरा झाला. त्यांनी भुट्टो, टिक्काखान आणि झिया ऊल हक वगैरे अगदी टॉपच्या मंडळींच्या मुलाखती साप्ताहिकासाठी घेतल्या. ( खुशवंतसिंग सोडल्यास एव्हढा access कुठल्यातरी पत्रकाराला मिळवता आला असता का ??) पाच वर्षांत विकलीचा खप ४,१०,००० (म्हणजे पाच पट) इतका वाढला. मासिकातल्या संपादकीय पानाला खूप मोठा वाचक वर्ग लाभला. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार वगैरे सगळे सिंगसाहेबांचे लांगुलचालन करीत. विकलीच्या (आणि खुशवंतसिंगांच्या) प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत होता; ज्याची परिणती त्यांना १९७५ मध्ये पद्मभूषण मिळण्यात झाला !! पान २६७ वर खुशवंतसिंगजी प्रांजळपणे कबुल करतात कि हे यश त्यांच्या डोक्यात गेले आणि त्यांना 'ग' ची बाधा झाली. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणाचा हा अगदी ठोस पुरावा होय . सत्तरच्या दशकात विकलीमध्ये मुस्लिमांच्या बाजूने सातत्याने लेखन केल्याने खुशवंतसिंग यांची मुस्लिमांचा कैवारी अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली. खरं म्हणजे त्यांच्या डोक्यात होती ती एक idealogy.....आणि आदर्शवाद नेहमीच टीकेस पात्र होतात, कारण ते सर्वव्यापक किंवा सर्वसमावेशक नसतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी पाकिस्तानात दिलेल्या भाषणात त्यांनी फाळणी आणि स्वतंत्र हिंदू-मुस्लिम राष्ट्रे ह्या संदर्भात बोलताना अगदी मर्मावर बोट ठेवले आहे. (पान ३५६). पाकिस्तानात जाऊन कॉन्फरन्समध्ये काश्मीर या विषयावर बोलायला काय धाडस लागेल, ह्याची कल्पना केलेली बरी. पण खुशवंतसिंगनी हे १९९४ साली केलं होतं. असे अनेक किस्से ह्या आत्मचरित्रात वाचायला मिळतात.
विकली सारखे साप्ताहिक नावारूपाला आणणाऱ्या खुशवंतसिंगांनी वाचकांची नाळ बरोब्बर ओळखली होती हे तर खरेच. ह्या आत्मचरित्रात देखील त्यांनी विषयपरत्वे काहीबाही लिहून वाचकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे . काही पाने सिनेसृष्टीतील ताऱ्यांचे किस्से सांगण्यासाठी खर्चिली आहेत, पण खरेखुरे लिहून हं ..(उगीच मायापुरी सारखे नाही ). धर्मेंद्र , राज कपूर , नर्गिस दत्त , मीना कुमारी , परवीन बाबी , देवयानी चौबळ (जिचे आडनाव खळबळ असे हवे होते) या मंडळींचे किस्से खरोखरच मासलेवाईक आहेत. मीडिया क्षेत्रात असल्यावर तुमच्या बाजूला कोण येऊन बसेल सांगता येत नाही. आपल्या शेजारी बसलेल्या मीनाकुमारीला खुशवंत ओळखू शकले नाहीत, ह्यासारखे आश्चर्य ते काय ...!!!अखेरीस मोरारजींचे जनता सरकार सत्तेवर आले आणि खुशवंतसिंगांची उचलबांगडी झाली.... त्याआधी इंदर मल्होत्रा आणि नंतर गिरीलाल जैन यांची झाली तशीच .... Ashok Jain was known for sacking editors unceremoniously..!!
विकली नंतर खुशवंतना वर्तमानपत्राच्या संपादकीय पदाच्या ऑफर्स येत राहिल्या. त्यापैकी गांधी कुटुंबियांच्या मालकीचे द नॅशनल हॅराल्ड ह्या वृत्तपत्राचे ते ६ महिने संपादक होते. सिंगसाहेबांना इंदिराजींशी डायरेक्ट access होता. खुशवंतसिंग हे संजय गांधी आणि इंदिराजींच्या इतके जवळचे कसे ह्याचे उत्तर मात्र ह्या पुस्तकातून मिळत नाही. (आणिबाणीपूर्वी ) "इंदिराजींच्या प्रशासनावर आम्ही खूष होतो " असे त्यांनी लिहिले आहे. पण म्हणजे नक्की काय ? यावर अधिक प्रकाश त्यांनी टाकायला हवा होता. हे त्यांचं मत पुढील काही वर्षांतच बदललं. कारण त्या काळात इंदिराजी तर खूप द्रुतगतीने सर्वनाशाकडे (कि आत्मनाशाकडे ??) कूच करीत होत्या. खुशवंतसिंगांचे इंदिराजी आणि संजयशी जवळचे संबंध होते हे त्यावेळी सर्वश्रुत होते. (जरी इंदिराजींशी एक दोन वेळा झालेली शाब्दिक चकमक त्यांनी विस्ताराने ह्या पुस्तकात लिहिली आहे). वेळ आली कि ते सडेतोडपणे आणि हजर जबाबीपणे बोलत. नंतर ते के के बिर्ला ह्यांच्या हिंदुस्थान टाइम्सचे संपादक झाले. एक दिवस संजय गांधी यांनी HT मधील 'समाजवादी' स्टाफला काढण्यासाठी त्यांच्याकडे एक लिस्ट आणून दिली. ह्यातील प्रत्येक स्टाफची जातीने शहानिशा / चौकशी करून मगच खुशवंतसिंगनी पुढील काय तो निर्णय घेतला. त्यांनी अंधभक्ती कधी केली नसावी. तसेच अन्याय सहन करणे देखील त्यांच्या रक्तात नव्हते . इंदिरा गांधी, संजय, मनेका, राजीव यांच्या कुटुंबातील खाजगी सुंदोपसुंदी, कलह आणि लक्तरे त्यांनी जशी घडली तशी लिहिली आहेत. एखादी व्यक्ती जरी पंतप्रधान झाली, तरी तिचे 'मनुष्यत्व' अगदी खालच्या पातळीवर कसे येऊ शकते ह्याचे वर्णन सिंगांनी काहीही आडपडदा न ठेवता केले आहे. राजकारणाचे चक्र फार विचित्र असते. एखाद दुसरा अपवाद सोडला, तर सगळे स्वार्थाला चिकटलेले. यामध्ये तत्वाला चिकटून राहणाऱ्या माणसाची कुत्तरओढ होते, जशी खुशवंतसिंगची अनेक वेळा झाली. जिथपर्यंत लेखक म्हणून त्यांचा charisma होता, तिथपर्यंत जनमानसात त्यांचा वाढता प्रभाव राहिला. राज्यसभेत खासदार म्हणून काही वर्षे त्यांनी काम केले. पण राजकारणात सक्रिय भाग घेतला, तेव्हा त्यांची फरफट झाली. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी शिखांच्या झालेल्या कत्तली निषेधार्थ त्यांनी 'पद्मभूषण' पुरस्कार परत केला आणि अधिकृतपणे काँग्रेसजनांची खप्पा मर्जी ओढवून घेतली. ह्यामुळे ते शिखांचे हिरो झाले खरे, पण काही जणांनी त्यांना हिंदूंचे शत्रू ठरवले. स्वतः शीख असले तरी, अकाली पक्षही कसा आतून पोखरला गेला होता, ह्याचा क्रमशः पाढा त्यांनी आत्मचरित्रात वाचला आहे. 'खलिस्तान' संकल्पनेला त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे आतंकवाद्यांच्या ते हिटलिस्टवर होते. त्यांना सरकारकडून २० वर्षे पोलीस बंदोबस्त होता. १९८४ मध्ये इंदिराजींची हत्या झाली. खुशवंतसिंगजी म्हणतात "देशामध्ये जे काही चुकीचं वाईट आणि घडत होतं , त्याला त्याच कारणीभूत होत्या ह्याची मला खात्री झाली".
कालिदास, शेक्सपियर, टागोर, टॉलस्टॉय, इकबाल, इलियट यांच्या साहित्यकृती वाचलेला हा माणूस होता . कुठल्याही गंभीर विषयावर साधक बाधक चर्चा करण्याची त्याची पात्रता होती. देवाशी दोन हात ह्या प्रकरणात ते दिसून येते. तसे बघायला गेले, तर खुशवंतसिंगजी हे नास्तिकच म्हणायला हवेत. पण प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य यावे यासाठी प्रार्थना करणे त्यांना मान्य होते. तीर्थक्षेत्रांना बाजरी स्वरूप आलेले त्यांना अजिबात आवडत नव्हते. पवित्र ग्रंथांचं वाचन हे स्वसंमोहनाशी निगडित आहे असे ते म्हणतात. ज्या माणसाने शीख धर्मावर/समाजावर इतके विपुल लेखन केले , त्या खुशवंतसिंगांनी ह्या समाजाच्या सगळ्या श्रद्धा आणि परंपरा यांचा विचारपूर्वक त्याग केला. ह्याची त्यांनी केलेली कारणमीमांसा भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे. ते म्हणतात " जी गोष्ट मी मुक्तपणे करू शकत नाही, ती करणे म्हंणजे पाप होय "( पान २८०). म्हणजे खुशवंतसिंगांना अनिर्बंध आणि स्वैर संस्कृतीच्या स्वीकृतीची अपेक्षा होती का ?? खुशवंतसिंगांनी त्यांचा संसार व्हिसीटींग प्रोफेसर सारखा केला. सुरवातीची त्यांची सर्व पोस्टिंग्स ही इतर देशांत होती. तिथे बरेच वेळा त्यांचे कुटुंबीय बरोबर असल्याचे उल्लेख आहेत. पण नोकरी गेल्यावर कुटुंबाला भारतात परत पाठविल्याचेही उल्लेख आहेत. भोपाळची २ वर्षेही ते एकटेच होते . तसेच विकलीची मुंबईतील ९ वर्षे ते एकटेच राहिले. हे सर्व त्यांच्या पत्नीला पटलेच असेल असे नाही . पण त्याची फिकीर त्यांनी फारशी केल्याचे दिसत नाही. अशा परिस्थिती पत्नीची आणि मुलांची परवड होत असावी. असे असले, तरी like 'Chip of the old block', राहुलसिंग ह्या त्यांच्या मुलाने लेखक , पत्रकार , संपादक म्हणून खुशवंतसिंगांची परंपरा पुढे चालू ठेवली . राहुलसिंग हे अनुक्रमे Readers Digest आणि The Indian Express चे संपादक होते. ह्या दीर्घलेखाची सांगता आपण राहुलसिंगने त्याच्या वडिलांचे वर्णन एका वाक्यात केले आहे , ते शेवटी उद्धृत करून करूयात ....
"He could walk with Kings but yet had a common touch".- हे किपलिंगचे उद्गार आपल्या वडिलांचे वर्णन करताना राहुलसिंगने वापरले आहेत.
ब्लॉग लेखक : विकास कात्रे , ठाणे ( ९८३३६१०८७५)
---------------------------------------------------------------------------------------------------
विशेष आभार:
१) मराठी साहित्य रसिकांना उमाताई कुलकर्णी, चंद्रशेखर मुरगुडकर,मंगला निगुडकर, अपर्णा वेलणकर यांसारखे अनुवादक लाभल्याने इतर भाषांतील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती वाचता आल्या. मराठी वाचकांनी त्यांचे कायम ऋणी राहिले पाहिजे . खुशवंतसिंग यांचे मूळ इंग्रजीतील आत्मचरित्रही मुरगुडकरांच्या सुरेख भाषांतरामुळे मला वाचता आले आणि एके काळचे हे वादळी व्यक्तिमत्व मला उलगडले.
२) लिहिताना एखाद वेळी अडगळीत गेलेला एखादा शब्द किंवा वाक्प्रचार वापरावासा वाटतो . पण आधी त्याच्या खऱ्या अर्थाची खात्री करून घ्यावी लागते. यासाठी माझ्याकडे २ मार्गदर्शक आहेत ....पहिल्या म्हणजे आमच्या स्नेही व गुरुसमान असणाऱ्या विदुषी डॉ. विजया टिळक आणि दुसरी म्हणजे माझी सुविद्य पत्नी सुचित्रा !! ह्या दोघांचेही आभार....

Comments
Post a Comment